Manisha Mhaiskar लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Manisha Mhaiskar लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, ७ मे, २०१४

महान्यूज आणि मी!

(माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचा उपक्रम असलेल्या 'महान्यूज' या वेबपोर्टलला नुकताच उत्कृष्ट ई-प्रशासनासाठीचा सुवर्ण पुरस्कार मिळाला. या निमित्ताने दि. ५ मे २०१४ रोजी 'महान्यूज' वेबपोर्टलवर प्रकाशित झालेला माझा लेख ब्लॉग वाचक मित्रांसाठी शेअर करीत आहे.- आलोक जत्राटकर)
 
'महान्यूज आणि मी' या विषयावर लेख देण्यासंदर्भात काल महान्यूज शाखेतून  फोन आला आणि त्यानंतर माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या एका ध्यासपर्वाच्या स्मृतींनी माझ्या मनाचा ताबा घेतला. 'महान्यूज' या वेब पोर्टलची निर्मिती ही जितकी महत्त्वाकांक्षी योजना होती, तितकीच ती निर्मिती प्रक्रिया खूप जिकीरीची आणि तरी सुद्धा एक समृद्ध अनुभव देणारी होती. साधारण सहा-एक महिन्यांचा तो कालखंड खूप भारावलेपणाचा होता. आमच्या कार्यक्षमतेची परीक्षा आणि कामाचा कस पाहणारा असा होता. आम्हा शासकीय अधिकाऱ्यांना अतिशय प्रोफेशनली काम करण्याची संधी आणि स्वातंत्र्य देऊन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाची कॉर्पोरेट प्रतिमा इस्टॅब्लिश करण्यात 'महान्यूज'चा अतिशय मोठा वाटा आहे. महाराष्ट्र शासनातील घडामोडींची माहिती एका क्लिकवर उपलब्ध करून राज्यातील वृत्तपत्रांसाठी अधिकृत आणि अपडेट शासकीय माहितीचा खजिना खुला करण्याचं काम महान्यूजनं केलं. त्याचबरोबर राज्यातील नागरिकांना हवी असणारी अनेक योजनांची माहिती त्यांना मिळू लागली आणि देशातील व जगभरातील मराठी बांधवांना महाराष्ट्र शासनाच्या लोकहितैषि उपक्रमांची माहिती देऊन त्यांना शासनाशी जोडणारा एक महत्त्वाचा दुवा महान्यूज बनलं. रोजगार संधी शोधणाऱ्या युवकांसाठी सार्वजनिक, शासकीय, निमशासकीय क्षेत्रांत उपलब्ध होणाऱ्या संधींची माहिती रोजच्या रोज अपडेट करून एका क्लिकवर देण्याचं फार महत्त्वाचं काम महान्यूज करत आहे. आणि त्यामागं तत्कालीन महासंचालक आणि आताच्या सचिव मनीषा म्हैसकर यांची तळमळ आणि संचालक श्रद्धा बेलसरे व प्रल्हाद जाधव यांच्या सक्रिय मार्गदर्शनाचाही वाटा आहे.
'महान्यूज' या वेबपोर्टलची संकल्पना प्रत्यक्षात येण्यापूर्वी आणि दि. 19 सप्टेंबर 2008 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री (स्व.) विलासराव देशमुख यांच्या हस्ते या पोर्टलचं लोकार्पण होण्यापूर्वी साधारणपणे दोन ते अडीच वर्षे म्हैसकर मॅडम यांनी महासंचालनालयातील अधिकाऱ्यांची शासकीय चौकटबद्ध कार्यपद्धती बदलण्यासाठी केलेली मशागत ही खऱ्या अर्थानं भरीव पायाभरणी करणारी होती. 'केवळ खुलासे काढणारा आणि कळकट कागदावर मळकट बातम्या देणारा विभाग' (हे मॅडमचे शब्द!) अशी वृत्तपत्र प्रतिनिधींच्या मनातली महासंचालनालयाची सन 2006 पूर्वीची प्रतिमा तोपर्यंत पुसण्यात यश आलं होतं. सन 2006मध्ये मिडियामध्ये काम केलेल्या साधारण वीस सहाय्यक संचालकांची आमची नवी बॅच महासंचालनालयात दाखल झाली होती. या ताज्या दमाच्या टीमच्या जोरावर आणि पूर्वीच्या अधिकाऱ्यांच्या अनुभवाच्या बळावर म्हैसकर मॅडमनी विभागाचा चेहरामोहरा पालटण्याचा ध्यास घेतला. त्यातून विभागीय संपर्क कक्षातून उत्तम प्रकारच्या निर्दोष प्रेस नोट, प्रासंगिक लेख, माहिती यांचा ओघ वाढीस लागला. ब्लॅक ॲन्ड व्हाईट 'लोकराज्य'चं संपूर्ण फोर कलर 'न्यू लूक लोकराज्य'मध्ये रुपांतर झालेलं होतं आणि त्याचं समाजाच्या सर्व स्तरांतून स्वागत झालेलं होतं. गरज नसताना पण स्वतःला चाचपण्याच्या दृष्टीनं 'लोकराज्य' ऑडिट ब्युरो ऑफ सर्क्युलेशन (एबीसी)लाही सामोरं गेलं आणि देशातील विविध शासकीय मुखपत्रांमध्ये सर्वाधिक खपाचं (3,45,997) तर खाजगी मासिकांमध्ये 'वनिता' (मल्याळम) आणि 'मेरी सहेली' (हिंदी) यांच्याखालोखाल तिसऱ्या क्रमांकाचं सर्वाधिक खपाचं मासिक होण्याचा बहुमान 'लोकराज्य'नं पटकावला होता. या यशानं प्रेरित होऊन 'ऊर्दू लोकराज्य'चंही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दणक्यात लोकार्पण करण्यात आलं होतं. त्याचीही यशस्वी आगेकूच सुरू झालेली होती. मुद्रित माध्यमांमध्ये अशी मोहोर उमटवित असतानाच इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्येही आकाशवाणीवरील 'दिलखुलास' आणि दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरील 'जय महाराष्ट्र' हे कार्यक्रम लोकप्रियतेचे नवनवे उच्चांक प्रस्थापित करत होते. या यशाला आता नवमाध्यमाचं परिमाण मिळवून देण्याचा विचार म्हैसकर मॅडम यांच्या डोक्यात घोळत होता. त्या दृष्टीनं इंटरनेटवर वेबपोर्टल तयार करून राज्यातीलच नव्हे, तर जगभरातील मराठी भाषिक वाचकांशी जोडण्याची महत्वाकांक्षा त्यांच्या मनी होती. त्यातून त्यांनी राज्यभरातल्या अधिकाऱ्यांमधून डॉ. गणेश मुळे यांची टीम लीडर म्हणून तर त्यांच्या जोडीला डॉ. किरण मोघे, मनीषा पिंगळे आणि तांत्रिक बाजू सांभाळण्यासाठी मयुरा देशपांडे, अरविंद जक्कल आणि आर्टिस्ट सुनील डुंभेरे यांची निवड केली होती. ही टीम मॅडमच्या मार्गदर्शनाखाली कामालाही लागली होती. त्यावेळी मी 'लोकराज्य'चा सहसंपादक म्हणून काम पाहात होतो. साधारण मे 2008मध्ये म्हैसकर मॅडमनी मला बोलावून 'महान्यूज टीममध्ये काम करणार का?' असं विचारलं. मी नाही म्हणायचा प्रश्नच नव्हता. कारण त्यापूर्वीही मॅडमनी मला अगदी विश्वासानं मुख्यमंत्र्यांच्या अमेरिका, युरोप आणि दाव्होस दौऱ्याचं वार्तांकन, समन्वयन आणि अहवाल तयार करण्याचं काम माझ्यावर सोपवलं होतं. ते मी यशस्वीपणे केलं होतं. अतिशय महत्त्वाच्या अशा उद्योग, ऊर्जा या विभागांच्या विभागीय संपर्क अधिकारी पदाची जबाबदारी दिली होती. ती व्यवस्थितपणानं पार पाडली होती. 'दिलखुलास', 'जय महाराष्ट्र'साठी वेळोवेळी आदेशानुसार योगदान देत होतो. त्याचप्रमाणं 'लोकराज्य'च्या टीममध्येही अतिशय मनापासून काम करीत होतो. त्यामुळं मॅडमच्या कार्यपद्धतीची मला अगदी जवळून जाणीव झाली होती. त्यांना कन्टेंन्ट नेमका कसा हवा आहे, हे लक्षात येऊन हव्या त्या पद्धतीनं देण्यात माझा हातखंडा झाला होता, असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. कदाचित त्यामुळंच 'महान्यूज'च्या कन्टेन्टवर काम करण्यासाठी त्यांनी माझी निवड केली होती. मीही त्यांच्या आदेशाबरहुकूम महान्यूज टीमला जॉईन झालो. काम प्रचंड होतं. राज्यभरातून दररोज यशकथांच्या अक्षरशः शेकडो इ-मेल्स प्राप्त होत होत्या. त्यामुळं त्यातील मजकूर डाऊनलोड करून घेणं आणि त्यांचं विभागनिहाय, विषयनिहाय सॉर्टिंग करणं ही जबाबदारी प्रामुख्यानं मी, मोघे सर आणि पिंगळे मॅडम यांच्यावर होती. बेलसरे मॅडम, मुळे सर हे प्रशासकीय तर देशपांडे मॅडम, जक्कल आणि तांत्रिक सल्लागार संजीव लाटकर हे तांत्रिक बाजू सांभाळत होते.
अनेक चर्चा, बैठकांमधून 'महान्यूज'मध्ये सुरवातीलाच एकूण तेरा सदरं आणि त्या दिवशीच्या राज्यातील सर्वाधिक महत्त्वाच्या पाच बातम्या असाव्यात, असं नियोजन होतं. सदरांमध्ये महाइव्हेंट, ई-बातम्या, साक्षात्कार (मुलाखती), महासंस्कृती, शलाका, तारांकित (यशकथा), चौकटीबाहेर, आलेख (शासकीय योजनांची तपशीलवार माहिती), फर्स्ट पर्सन, गॅलरी (छायाचित्रे), महाऑप (रोजगार संधी), हॅलो (वाचक प्रतिक्रिया), लोकराज्य (कर्टन रेझर), दिलखुलास व जय महाराष्ट्र (मुलाखतींचे शब्दांकन) यांचा समावेश होता. आणि महत्त्वाचं म्हणजे ही सर्व सदरं आम्हाला रोजच्या रोज अपलोड करावयाची होती- अगदी रविवार आणि सार्वजनिक सुटीच्या दिवशी सुद्धा! हे म्हणजे एक स्वतंत्र दैनिक चालविल्याप्रमाणंच होतं. त्यामुळं कितीही मजकूर आला तरी या 'महान्यूज' नामक महाराक्षसाच्या पोटात तो लगेच गडप होईल, याची जाणीव आमच्या सर्व टीमला होतीच. त्यामुळंच आम्ही कन्टेन्ट जनरेशनवर खूप मेहनत घेत होतो. दैनंदिन बातम्या वगळता किमान पहिले दोन ते तीन महिने तरी सदरांचा मजकूर व्यवस्थित पुरला पाहिजे आणि त्या कालावधीत पुढल्या तीन महिन्यांचा मजकूर उभा करावयाचा, असं आमचं नियोजन होतं. त्यानुसार आम्ही कामाला सुरवात केली होती.
राज्यभरातून आलेला मजकूर ई-मेलवरून डाऊनलोड करून घेण्याच्या प्रक्रियेत असतानाच मनिषा पिंगळे मॅडमच्या इनबॉक्समध्ये आलेल्या एका स्पॅम-मेलनं त्यातल्या सर्व इ-मेल्स अक्षरशः करप्ट झाल्या. शेकडो इ-मेल्समधला सारा मजकूर नाहीसा झाला. हा एक मोठा धडा आम्हाला सुरवातीच्या टप्प्यातच मिळाला. तरीही त्यापूर्वीच्या नोंदी आम्ही घेतलेल्या असल्यामुळं पुन्हा सर्व जिल्हा माहिती अधिकाऱ्यांशी बोलून दोन दिवसांत सारा डाटा जनरेट करण्यात आम्हाला यश आलं. त्यावेळी बाजारात उपलब्ध असलेलं सर्वात प्रभावी ॲन्टीव्हायरस सॉफ्टवेअर आमच्या संगणकांवर तातडीनं इन्स्टॉल करण्यात आलं.
सर्व डाटा डाऊनलोड करून सॉर्ट करण्याचं काम आम्ही साधारण तीन आठवड्यांत संपवलं असेल. त्यानंतर आमचं महत्त्वाचं काम सुरू झालं, ते म्हणजे त्या संपूर्ण मजकुराचं संपादन करण्याचं! ऑनलाइन मिडियावरील मजकुरासाठीची महत्त्वाची पूर्वअट म्हणजे तो शॉर्ट बट स्वीट आणि क्रिस्पी असला पाहिजे. वाचकाला जास्त स्क्रोल न करावे लागता संपूर्ण स्टोरी आशयासह समजली पाहिजे. या आणि आणखी व्यवधानांसाठी डॉ. मुळे यांनी एक स्टाइलबुकच तयार केलं. त्यामुळं कन्टेन्टच्या आमच्या टीमवर जबाबदारी होती- ती प्रत्येक स्टोरीला शॉर्ट पण आशयसंपन्न बनवण्याची. राज्यभरातून आलेला मजकूर हा प्रिंटच्या साच्यातला असल्यामुळं एक हजार ते अडीच हजार इतक्या शब्दसंख्येचा प्रत्येक लेख होता. आम्ही त्या साऱ्या यशकथा वाटून घेऊन संपादनाचं काम सुरू केलं. कितीही शब्दसंख्येचा लेख असला तरी त्याला पाचशे ते आठशे शब्दांत बसवण्याचं काम आम्ही पत्रकारितेमधला सारा संपादनाचा अनुभव पणाला लावून करत होतो. पण, पुढं गंमत अशी झाली की, महान्यूजची ट्रायल पेजेस तयार झाली, तेव्हा त्यामध्ये आम्ही संपादित केलेला मजकूर एका सिंगल स्क्रोलमध्येच बसत होता. त्यामुळं आमच्या अपेक्षेपेक्षा तो खूपच शॉर्ट वाटत होता. म्हैसकर मॅडमनाही ते पटलं आणि आम्ही पुन्हा ते सारे लेख बाराशे ते दीड हजार शब्दांचे केले. मूळचे लेख माहीत असल्यामुळं ते फारसं अवघड गेलं नसलं तरी हे वाढीव कामही आम्ही तातडीनं पूर्ण केलं.
लाटकर सरांनी डमी साइट आमच्या हवाली केली. त्यावर काम सुरू झालं. साइटमधल्या त्रुटी जशा लक्षात येतील, तशा आम्ही आमच्या तांत्रिक टीमला आणि वरिष्ठांना सांगत होतो. त्यावर काम केलं जात होतं. ऑफिसमध्ये दररोज दिवसातून तीनवेळा आमचं ब्रेनस्टॉर्मिंग सेशन व्हायचं ते बेलसरे मॅडमच्या केबीनमध्ये. पहिलं सकाळी कार्यालयात आल्या आल्या- त्यात दिवसभराचं नियोजन केलं जायचं. दुपारी तीनच्या बैठकीत त्या नियोजनाचा फॉलोअप आणि स्टेटस पाहिला जायचा. आवश्यक तिथं ॲडिशन, डिलीशन व्हायचं आणि संध्याकाळी पाचच्या बैठकीत मजकुरावर अंतिम हात फिरवला जायचा. कामाची एक कॉर्पोरेट स्टाइल ठरुन गेली. दरम्यानच्या काळात वर्षा फडके-आंधळे या नव्या महिला अधिकाऱ्यासह बी.के. झंवर, संजय ओरके व नव्यानं निवड झालेले नंदकुमार वाघमारे, संतोष तोडकर, अंजू कांबळे, मंगेश वरकड आणि प्रमोद धोंगडे ही ताज्या दमाच्या माहिती अधिकाऱ्यांची फळीही महान्यूज टीमला जॉइन झाली आणि कामाचा झपाटा आणखीच वाढला. महान्यूज टीम त्यावेळी महासंचालनालयाच्या (चांगल्या अर्थाने) हेव्याचा विषय होती. कारण आम्ही सारे जण नेहमीच एकत्रित आणि युनिक राहण्याचा प्रयत्न करत असू. म्हैसकर मॅडम आणि बेलसरे मॅडमही हौशी! त्यामुळं महान्यूज टीमनं ठरविलेल्या ड्रेसकोडमध्ये त्याही सामील होत असत. किंबहुना, तो ठरविण्यात त्यांचाही पुढाकार असे.
असं असताना कामाचा ताणही होता. मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी उद्घाटनासाठी दिलेली 19 सप्टेंबर 2008 ही तारीख जवळ येईल, तसतसा आमचा उत्साह आणि मनावरचा तणाव वाढतच होता. त्या काळात सकाळच्या सत्रात बेलसरे मॅडमनी त्यांच्या केबीनमध्ये आमच्यासाठी योगाची सेशनही घेतली आहेत.
उद्घाटनासाठी आमच्या प्रत्येक टीम मेंबरनं काही घोषवाक्यही तयार केली होती. त्यावर चर्चा होऊन त्यातल्या काही निवडक घोषवाक्यांचे स्टँडी तयार करून उद्घाटनाच्या ठिकाणी लावण्याचं ठरलं. 'वर्षा' बंगल्यावर सकाळी उद्घाटन होणार होतं. त्यासाठी वेगळं काय करता येईल, यावर विचारमंथन सुरू असतानाच मुख्यमंत्र्यांचे जनसंपर्क अधिकारी अनिरुद्ध अष्टपुत्रे यांनी फ्लॅशमध्ये एक प्रोग्राम तयार करून मुख्यमंत्र्यांनी माऊस क्लिक करताच अगदी चौघडे, ढोलताशांच्या गजरासह (हे सारं व्हर्च्युअलच!) एक महाद्वार उघडते आणि त्यातून महान्यूजचा लोगो सामोरा येतो आणि लगेच पोर्टलचे होम पेज उघडते, अशी कल्पना मांडली. महासंचालकांनी ती उचलून धरली आणि अष्टपुत्रे सरांनी तसा प्रोग्राम तयार करवूनही घेतला.
या उद्घाटनानंतर मुख्यमंत्र्यांना पोर्टलबद्दल लाइव्ह प्रेझेंटेशन देण्याचेही ठरले होते. त्यासाठी नॅरेशनला म्हैसकर मॅडम आणि प्रेझेंटेशनच्या लॅपटॉपवर मी बसावे, असे ठरले होते. या ठिकाणीही मॅडमच्या क्राइसिस मॅनेजमेंटच्या व्यवधानाची प्रचिती आली. समजा, पोर्टल ऐनवेळी ऑनलाइन उघडले नाही, तर प्लॅन ए, बी आणि सी अशी तयारी करण्यात आली. 'प्लॅन ए'मध्ये पोर्टलची एचटीएमएल पेजेस लॅपटॉपवर सेव्ह करण्यात आली. ऑनलाइन पोर्टल नाही उघडले तर ही पेजेस 'ॲज इट इज' दाखवायची. तोही प्लॅन वर्क नाही झाला तर, 'प्लॅन बी'मध्ये पोर्टलच्या सर्व पेजेसचे पॉवरपॉइंट प्रेझेंटेशन तयार केले गेले. आणि 'प्लॅन सी'मध्ये त्या प्रेझेंटेशनची हँड-आऊट्सही तयार ठेवण्यात आली. प्लॅन सी पर्यंत जावे लागणे शोभादायक नव्हते, पण ती तयारी आम्ही ठेवली होती. उद्घाटनाच्या दिवशी क्रीम कलरच्या ड्रेसकोडमध्ये महान्यूज टीम 'वर्षा' बंगल्यावर पोहोचली. उद्घाटन समारंभ अगदी झोकात पार पडला. मुख्यमंत्र्यांनी, मुख्य सचिवांनी या प्रकल्पाबद्दल अतिशय समाधान व्यक्त केले आणि त्याच्या यशस्वितेसाठी शुभेच्छा दिल्या. म्हैसकर मॅडमचे नॅरेशन आणि माझे प्रेझेंटेशन यांचं ट्युनिंग अगदी उत्तम जमलं. त्यामुळं दुपारी मंत्रालयाच्या मिनी-थिएटरमध्ये पत्रकार परिषदेमध्येही त्यांच्यासमवेत प्रेझेंटेशनला मीच उपस्थित राहिलो. अशाच पद्धतीनं मग राजभवनवर तत्कालीन राज्यपाल एस.सी. जमीर आणि मंत्री हर्षवर्धन पाटील यांनाही प्रेझेंटेशन देण्यात आले. राज्यपालांनी त्यावेळी एक मार्मिक प्रश्न उपस्थित केला होता, "या तुमच्या उपक्रमाचा माझ्या चंद्रपुरातल्या आदिवासी बांधवांना काय लाभ होणार?" त्यावर म्हैसकर मॅडमनीही खूप प्रभावी उत्तर दिलं होतं. त्या म्हणाल्या होत्या, "सर, आम्ही त्यांच्यासाठीच्या साऱ्या योजनांची माहिती या पोर्टलवर देणार आहोत, जेणे करून त्याठिकाणी कार्यरत असलेल्या शासकीय, अशासकीय व्यक्ती, संस्थांना त्यांची माहिती होईल आणि सरकारी दफ्तरातून त्यासंदर्भात थेट मदत मिळवून देता येईल किंवा काम करता येईल. भविष्यात त्यांच्यापर्यंत सहज पोहोचण्याचा हा एक महत्त्वपूर्ण पर्याय असेल. तंत्रज्ञानाचे लाभ तिथपर्यंत पोहोचविण्यासाठीच हा उपक्रम आम्ही आरंभला आहे." आज त्यांच्या या विधानाची प्रचिती आपल्याला येते आहेच.
उद्घाटन झालं, पण आता महान्यूज टीमची जबाबदारी वाढली होती. पहिल्या तीन दिवसांतच दहा हजारांहून अधिक हिट्स पोर्टलला मिळाल्या. यावरुन लोकांचं पोर्टलवर बारकाईनं लक्ष आहे, हे दिसत होतं. माझ्याकडं त्यावेळी तारांकित हे यशकथांचं आणि आलेख हे विविध शासकीय योजनांची माहिती देणारं सदर आणि लोकराज्य यांची जबाबदारी होती. त्याशिवाय, अन्य साऱ्या सदरांचा आणि सर्व बातम्यांचा मजकूर प्रूफरिडींगसह फायनल करण्याची जबाबदारीही माझ्यावर होती. खूप काटेकोरपणे काम करावं लागत असे. एक चूकही महागात पडेल, असा तो नाजूक कालखंड होता. टीममधल्या सर्वांनाच याची जाणीव होती, म्हणून कित्येकांनी आपल्या कितीतरी सार्वजनिक आणि साप्ताहिक सुट्यांचा स्वखुशीनं बळी दिला होता. मी स्वतःही चार-पाच महिन्यांहून अधिक काळ एकही दिवस सुटी न घेता अखंडितपणे काम केले.
म्हैसकर मॅडमनाही आमच्यावरील या दडपणाची जाण होती. त्यामुळंच महान्यूजला एक महिना पूर्ण झाल्याच्या दिवशी त्यांनी सर्व टीमला एक मस्तपैकी पार्टी दिली आणि त्याचवेळी सर्वांच्या कामाचं कौतुक करणारी प्रशस्तीपत्रंही प्रदान केली. हा आम्हा साऱ्यांसाठी एक अनपेक्षित आणि सुखद धक्का होता.
या ॲप्रिसिएशननं भारावलेली महान्यूज टीम पुन्हा नव्या जोमानं कामाला लागली ती अगदी आजतागायत अथकपणे कार्यरत आहे. दरम्यानच्या काळात म्हैसकर मॅडम मुंबई महानगरपालिकेत गेल्या. मी सुद्धा उपमुख्यमंत्री कार्यालयात जनसंपर्क अधिकारी झालो, एमटीडीसीत मॅनेजर, पर्यटन व सार्वजनिक बांधकाम मंत्री कार्यालयाचा जनसंपर्क अधिकारी, रायगड जिल्ह्याचा माहिती अधिकारी आणि आता शिवाजी विद्यापीठाचा जनसंपर्क अधिकारी झालो, तरी माझ्या महान्यूज टीमच्या प्रगतीवर मी नेहमीच नजर ठेवून असतो. अलीकडं पोर्टलनं नवं रुप धारण केलं, ऑनलाइन मिडियामध्ये असे कालसुसंगत बदल करणं आवश्यकही आहे. आता तर ई-प्रशासनाच्या सुवर्ण पुरस्काराची मोहोरही महान्यूज टीमच्या कामगिरीवर उमटली आहे. यावेळी पुन्हा म्हैसकर मॅडमच माहिती व जनसंपर्क विभागाच्या सचिव आहेत, ही सुद्धा अत्यंत योगायोगाची गोष्ट. त्यामुळंही महान्यूज टीमचा आनंद आणि उत्साह द्विगुणित झाला असल्यास नवल नाही. मी आज त्याठिकाणी प्रत्यक्ष उपस्थित नाही, पण या साऱ्या आठवणी उचंबळून येत असताना किती लिहू अन् काय लिहू, असं मला झालं आहे. महान्यूज टीमच्या कामगिरीचा मला निरतिशय अभिमान आहे. सुवर्ण पुरस्कार प्राप्त महान्यूजच्या पायोनिअर टीमचा एक महत्त्वाचा भाग म्हणून मला काम करता आलं, अशी अभिमानाची भावना मनी दाटून येते आहे. शेवटी आपलं लेकरू ते आपलंच, हेच खरं!

सोमवार, ६ ऑगस्ट, २०१२

'डीजीआयपीआर' सोडताना...!


(सोबतचा लेख म्हणजे माझ्या गेल्या सहा वर्षांच्या कारकीर्दीबाबत माझ्या मनात उमटलेले तरंग आहेत. ते शब्दबद्ध करण्याचा हा प्रयत्न आहे. कुणाला त्यामध्ये 'मी' डोकावल्यासारखा वाटेल. माझ्याच कारकीर्दीचा धावता आढावा असल्यामुळं ते साहजिकही आहे. पण हे 'मी'पण कुणावरही लादण्याचा अथवा कुणाला काही पटवण्याचाही प्रयत्न नाही. यात काही मित्रांची नावं आहेत, पण कित्येकांची नाहीत. याचा अर्थ त्यांचं सहकार्य, मार्गदर्शन मी नाकारतोय, असा मुळीच नाही. सुचेल तसं लिहीत गेल्यामुळं आणि विस्तारभयास्तवच ही नावं देता येऊ शकली नाहीयेत, इतकंच!  माझ्या मनात कुणाबद्दलही काही खंत-खेद अथवा राग-द्वेष नाही. तुमचं प्रेम माझ्यावर आहेच, यापुढंही ते अबाधित राहील, याची मला खात्री आहे.- आलोक जत्राटकर)

कोल्हापुरात शिवाजी विद्यापीठात सहाय्यक कुलसचिव पदावर रुजू होण्यासाठी म्हणून गेल्या 31 जुलैला माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातून (डीजीआयपीआर) कार्यमुक्त झालो. त्यानंतर मंत्रालयातून बाहेर पडताना माझ्या सर्व मित्र-मैत्रिणींना इ-मेल आणि फेसबुकवर निरोपाचा संदेश टाकला. त्या क्षणापासून मित्र-मैत्रिणींचे अत्यंत भावपूर्ण असे शुभेच्छा संदेश येण्यास सुरवात झाली. महालक्ष्मी एक्स्प्रेस कोल्हापूरच्या दिशेनं धावू लागली आणि मोबाईलवर येणाऱ्या प्रत्येक एसएमएस आणि इ-मेलगणिक माझं मन मागं मागं जाऊ लागलं.
जुलै 2006मध्ये 'डीजीआयपीआर'मध्ये माझी सहाय्यक संचालक (माहिती) या पदावर निवड झाल्याचं पत्र मिळालं, तेव्हा मी 'कोल्हापूर सकाळ'मध्ये उपसंपादक होतो. 'सकाळ'मध्ये चांगला रमलो होतो, सर्व प्रकारची जबाबदारी सांभाळत होतो. दिलीप लोंढे, संजय पाटोळे यांच्या अनुभवी मार्गदर्शनामुळं पत्रकारितेमधील एलेव्हन्थ अवर आव्हानांचा सामना करण्याचा आत्मविश्वासही आला होता. त्याचवेळी सामोऱ्या चालून आलेल्या या संधीमुळं थोडासा द्विधा मनःस्थितीत होतो. पण राज्य शासनात काम करण्याची नवीन संधी मिळते आहे, तर ती घेतली पाहिजे, असं सर्वांचंच मत पडलं आणि 9 जुलै 2006 रोजी माझे 'सकाळ'मधील सहकारी रवींद्र राऊत आणि विशाल ढगे यांच्यासोबत मुंबईत दाखल झालो. मीनाताई ठाकरे पुतळ्याच्या अवमानावरुन त्याच दिवशी दादरमध्ये पेटलेल्या दंगलीनं आमचं स्वागत केलं. त्यावेळी रवीचा मोठा भाऊ आमच्या मदतीला धावला. त्यानं गिरगावमध्ये एका सुरक्षित लॉजमध्ये आम्हाला नेलं. आमची भिती मोडण्यासाठी त्याच संध्याकाळी तिथून हाजीअलीपर्यंत कम्पलसरी पदयात्रा घडवली. त्यावेळी आमची भीड थोडीशी चेपली.
दुसऱ्या दिवशी, १० जुलै २००६ रोजी सकाळी आम्ही सारे 'डीजीआयपीआर'मध्ये जॉइनिंग देण्यासाठी दाखल झालो. जॉइनिंग दिलं की सोडतील, असं आम्हाला वाटलं होतं. पण तिथं थेट आमच्या ट्रेनिंग सेशनला सुरवात झाली. महासंचालक मनिषा म्हैसकर, संचालक प्रल्हाद जाधव आणि श्रद्धा बेलसरे, उपसंचालक देवेंद्र भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली हे सत्र सुरू झालं. आणि दुसऱ्या दिवशी ११ जुलै रोजी संध्याकाळी माधवाश्रमाकडं परतत असताना दुसरा जोरदार दणका आम्हा सर्वांना बसला. वेस्टर्न रेल्वे लाइनवर लोकलच्या फर्स्ट क्लासच्या डब्यांमध्ये दहशतवाद्यांनी बॉम्बस्फोटांची मालिका घडवून आणली, ज्यात कित्येक निष्पाप जीवांना नाहक प्राण गमवावे लागले. मुंबईत नव्यानंच आलेल्या आम्हा सर्वांचं मॉरलच या दुर्घटनेमुळं खच्ची झालं. मोबाइल नेटवर्क जॅम झाल्यामुळं घरच्यांशी संपर्क नाही, कुठं बाहेर जेवायला जायचे वांधे आणि बाहेर अस्ताव्यस्त पसरलेले गर्दीचे लोंढे, यामुळं आमच्यातला प्रत्येकजणच मनात अस्वस्थ होता. आता घरी परत गेल्यावर कोणी परत येईल की नाही, अशीही शक्यता वाटू लागली- इतकं भीतीनं मन व्यापलं होतं.
पण दुसऱ्या दिवसापासून आमच्या बॅचमधला प्रत्येकजण शासनाच्या क्राइसिस मॅनेजमेंट यंत्रणेचा भाग बनला. पत्रकारितेतला अनुभव पणाला लावून प्रत्येकानं यावेळी काम केलं. 'दोन मिनिटे श्रद्धांजलीची!' ही मोहीम यशस्वी झाली. संपूर्ण मुंबई शहरानं आपलं कामकाज दोन मिनिटं थांबवून बॉम्बस्फोटातील मृतांना श्रद्धांजली वाहिली.
दरम्यानच्या काळात 13 जुलै 2006 रोजी आमच्या पोस्टिंगची ऑर्डर निघाली. मला न्यूज सेक्शनमध्ये देण्यात आलं. मला बरं वाटलं. म्हटलं, आपला मूळचा एडिटिंगचाच जॉब इथं करता येऊ शकेल. पण साधारण महिनाभरातच पुन्हा झालेल्या फेररचनेमध्ये मला डीएलओ (विभागीय संपर्क अधिकारी) पदाची जबाबदारी देण्यात आली. माझ्याकडं उद्योग, ऊर्जा, वस्त्रोद्योग, रोजगार आणि स्वयंरोजगार या विभागांची जबाबदारी होती. उद्योग आणि ऊर्जा हे विषय त्यावेळी एकदम हॉट होते. मुख्यमंत्री विलासराव देशमुख, उद्योगमंत्री अशोक चव्हाण, उद्योग सचिव व्ही.के. जयरथ, त्यांचे ओएसडी चंद्रहास चारेकर आणि प्रमोद राठोड त्याचप्रमाणं एमआयडीसीचे सीईओ राजीव जलोटा ही टीम एकदम ॲक्टीव्ह होती. नवीन विशाल प्रकल्प धोरण, 2006मध्ये नव्यानं आखण्यात आलेलं नवीन औद्योगिक व गुंतवणूक धोरण आणि अतिशय चर्चेत असलेलं सेझ धोरण यांचं वारं वाहात होतं. उद्योग विभागाची नवीनच जबाबदारी माझ्यावर असली तरी मंत्री अशोक चव्हाण यांच्यासह जयरथ साहेब आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी माझ्यावर अतिशय मोठा विश्वास दाखवला. आणि त्यानंतरच्या काळात सुमारे 1 लाख 32 हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीच्या साधारण 40 ते 45 प्रकल्पांच्या सामंजस्य करारांच्या कार्यक्रमांचं नियोजन, समन्वयन आणि वार्तांकन करण्याची संधी मला मिळाली. ही संधी माझ्यासाठी अतिशय महत्त्वाची ठरली कारण या नियोजनाच्या निमित्तानं मुंबईतल्या सर्व महत्त्वाच्या पत्रकार मित्रांशी माझा जवळ जवळ दैनंदिन संपर्क प्रस्थापित झाला आणि तेव्हापासून निर्माण झालेला हा जिव्हाळा आजतागायत कायम आहे.
ऊर्जा विभागाचे मंत्री श्री. दिलीप वळसे-पाटील हे सुद्धा अत्यंत कार्यक्षम! परंतु, त्यावेळी राज्यात सुरू असलेल्या भारनियमनामुळं विरोधक अतिशय आक्रमक झालेले होते. त्यावेळी मंत्री कार्यालय, मुख्यमंत्री कार्यालय, वीज कंपन्या, एमईआरसी या सर्व घटकांशी सातत्यानं संपर्कात राहून वीजेच्या संदर्भात सातत्यानं होत असलेल्या बैठका आणि वीज निर्मितीसाठीचे राज्याचे प्रयत्न या बाबतीतही अतिशय प्रामाणिक मांडणी आणि वार्तांकन करण्याचा मी प्रयत्न केला. 'जय महाराष्ट्र' आणि 'दिलखुलास' या कार्यक्रमांसाठीही मी माझ्या परीनं योगदान दिलं. 'दिलखुलास'मध्ये तत्कालीन अपारंपरिक ऊर्जा मंत्री विनय कोरे यांच्या रुपानं मंत्री महोदयांची पहिली मुलाखत घडवून आणता आली, या गोष्टीची नोंद मला इथं आवर्जून घ्यावीशी वाटते. तत्पूर्वी, या कार्यक्रमात सचिवांच्या व अन्य मान्यवरांच्या मुलाखती होत होत्या.
त्यावेळचे वस्त्रोद्योग सचिव श्री. सिन्हा साहेब आणि रोजगार व स्वयंरोजगार सचिव गोरख मेघ यांचंही मला खूप मोलाचं मार्गदर्शन लाभलं. कधीही त्यांच्याकडं गेलो की, अतिशय आपुलकीनं विचारपूस करणारे आणि वेळ असला तर आवर्जून विविध विषयांवर खास गप्पा मारण्यासाठी बोलावणारे असे आयएएस अधिकारी मला लाभले, ही फार मोठी गोष्ट होती.
डीएलओ सेक्शनमध्ये असतानाच मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि उद्योगमंत्री अशोक चव्हाण यांचा महाराष्ट्रातील औद्योगिक गुंतवणूक वाढविण्यासाठी तसंच अमेरिकेतील गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी अमेरिका दौरा ठरला. त्या दौऱ्याच्या वार्तांकनासाठी 'एमआयडीसी'मध्ये विशेष कक्ष स्थापन करण्यात आला होता. महासंचालक मनिषा म्हैसकर आणि संचालक प्रल्हाद जाधव यांनी या दौऱ्याच्या वार्तांकनासाठी समन्वयक म्हणून माझी नियुक्ती केली. दौऱ्याच्या बातम्या आणि छायाचित्रे यांना तत्काळ राज्यभर प्रसिद्धी देण्यासाठी मी माझ्या परीनं शंभर टक्के प्रयत्न केले. याच दौऱ्यात त्यांनी बिल गेट्स यांच्या मुख्यालयाला भेट दिली होती. ती छायाचित्रं तर जवळजवळ प्रत्येक वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली. मुख्यमंत्री महोदय दौऱ्यावरुन परतल्याच्या दुसऱ्याच दिवशी राज्यभरात प्रसिद्ध झालेल्या बातम्यांचा बाऊंड अहवाल त्यांना सादर करण्यासाठी म्हैसकर मॅडम आणि मी त्यांच्या सहाव्या मजल्यावरील दालनात गेलो. मुख्यमंत्र्यांनी सर्व अहवालांवरुन नजर फिरवली आणि इतकी जोरदार प्रसिद्धी यापूर्वी कधीही झाली नव्हती, असे प्रशंसोद्गार काढले, म्हैसकर मॅडमचं अभिनंदन केलं. तेथून बाहेर पडताना मॅडमनी माझ्या पाठीवरही शाबासकीची थाप दिली. ही शाबासकी आणखी चांगल्या कामगिरीसाठी प्रोत्साहित करणारी ठरली.
पुढं आणखी एकदा मुख्यमंत्री विलासराव देशमुख हे दाव्होस (स्वित्झर्लंड) इथं होणाऱ्या 'वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम' या जागतिक महत्त्वाच्या परिषदेसाठी आणि जर्मनीतील महत्त्वाच्या उद्योग समूहांची पाहणी करण्यासाठी दौऱ्यावर गेले होते. या परिषदेच्या वार्तांकनाचं समन्वयन आणि 'लोकराज्य'च्या विशेषांकाचं नियोजन करण्याची जबाबदारीही म्हैसकर मॅडमनी माझ्यावर सोपविली होती. या विशेषांकासाठी राजीव जलोटा यांची मुलाखत घेण्यासाठी म्हणून मी त्यांच्याबरोबर त्यांच्या मोटारीतून मुंबई ते पुणे असा प्रवास केला.
'लोकराज्य टीम'चा एक महत्त्वाचा घटक असलेला अभिजीत कुलकर्णी त्याचवेळी मिडियात परत जाण्यासाठी म्हणून बाहेर पडला. त्याच्या जागी 'लोकराज्य टीम'चा घटक होण्याची संधी मला मॅडमनी दिली. साधारण सात महिन्यांच्या या कालावधीत पर्यावरण, उद्योग आणि ऊर्जा अशा विशेषांकाच्या निर्मितीमध्ये मला योगदान देता आलं. या अंकांच्या पेजिनेशनच्या निमित्तानं अंधेरी इथल्या 'कालनिर्णय'मधील सहकाऱ्यांशीही चांगलं मैत्र प्रस्थापित झालं.
याचवेळी म्हैसकर मॅडमच्या मनात विभागाचं 'महान्यूज' नावाचं एक वेब पोर्टल तयार करण्याची कल्पना घोळत होती. त्यासाठी त्यांनी डॉ. गणेश मुळे, डॉ. किरण मोघे, मनिषा पिंगळे, देशपांडे मॅडम अशा सिन्सिअर अधिकाऱ्यांची निवड करून त्यांना खास मुख्यालयात पाचारण केलं होतं. थोड्याच दिवसांत माझाही या टीममध्ये समावेश केला गेला. बी.के. झवर, नंदू वाघमारे, संतोष तोडकर, प्रमोद धोंगडे, अंजू कांबळे, आर्टिस्ट सुनिल, संजय ओरके, जक्कल हे सुद्धा या टीमचे घटक झाले. साऱ्यांनी अतिशय झपाटल्यासारखं काम केलं आणि चार महिन्यांत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते 'वर्षा' बंगल्यावर अगदी डिजिटल पद्धतीनं या वेबसाइटचं प्रकाशन झालं. सर्वच स्तरांतून पोर्टलचं स्वागत झालं. त्यामुळं दर्जा टिकवून ठेवण्याचं आव्हान आम्हा सर्वांसमोर होतं. दररोज दुपारी तीन वाजता बेलसरे मॅडमच्या केबीनमध्ये म्हैसकर मॅडम स्वतः आमचं ब्रेनस्टॉर्मिंग सेशन घ्यायच्या, नियोजन करायच्या. पुन्हा पाच वाजता अंतिम आढावा घेतला जायचा. दिवसागणिक वाढत जाणाऱ्या हिट्सनी आमचा आत्मविश्वासही वाढला आणि 'महान्यूज'ही चांगल्या पद्धतीनं एस्टॅब्लिश झालं.
दि. 26-11-2008 रोजी मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला. मुंबई पोलिसांच्या शौर्यानं आणि बलिदानामुळं कसाबच्या रुपानं दहशतवादाचा चेहरा प्रथमच जगासमोर आला. त्यावेळी तातडीची गरज म्हणून म्हैसकर मॅडमनी तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासाठी 'डीजीआयपीआर'चा विशेष प्रेस ब्रिफिंग सेल नागपूर अधिवेशनाच्या दरम्यान तयार केला आणि त्याची जबाबदारी माझ्यावर सोपविली. मुंबईमध्येही हा सेल कंटिन्यू झाला. कल्याणहून पहाटे 3.35 वाजताची पहिली ट्रेन पकडून सीएसटी स्टेशनला पोहचणं, पेपरचा गठ्ठा घेऊन रायडरच्या मागं मोटारसायकलवर बसून 5.55 वाजता मंत्रालयात दाखल होणं आणि सव्वासात वाजता प्रेस कटिंग वर्षा बंगल्यावर पोहोचवणं, अशी अतिशय महत्त्वाची कामगिरी मी सहा महिन्यांहून अधिक काळ पाहात होतो. हाही एक वेगळा आणि जबाबदारीचा अनुभव महासंचालनालयात मला घेता आला.
दि. 2 जुलै 2009 रोजी म्हैसकर मॅडमची मुंबई महानगरपालिकेच्या सह-आयुक्तपदी नियुक्ती झाली. त्याच सायंकाळी उपमुख्यमंत्री कार्यालयाचा जनसंपर्क अधिकारी म्हणून माझीही नियुक्ती झाल्याचा आदेश मला प्राप्त झाला. निवृत्त जनसंपर्क अधिकारी वसंत पिटके आणि तत्कालीन जनसंपर्क अधिकारी रंगनाथ चोरमुले यांच्या मार्गदर्शनाखाली माझं उपमुख्यमंत्री कार्यालयातलं काम सुरू झालं. पीएस मलिकनेर, ओएसडी सतिश सोनी (आपल्या सबॉर्डिनेट अधिकाऱ्याच्या प्रमोशनबद्दल संपूर्ण स्टाफला पार्टी देणारा हा अधिकारी शासकीय यंत्रणेमधला अतिशय कॉ-ऑपरेटिव्ह व्यक्ती आहे. कुणी काहीही काम घेऊन येवो, रिक्त हातानं कधी तो परत जाणार नाही. कुणालाही परोपरीनं मदत करण्याची वृत्ती यांच्या नसानसात भिनलेली आहे.) आणि संदीप बेडसे या अधिकाऱ्यांनीही मला सातत्यानं मार्गदर्शन केलं. पत्रकार मित्रांशी तोपर्यंत माझा चांगला संपर्क प्रस्थापित झाला होताच, त्यामुळं इथंही उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचा जनसंपर्क सांभाळताना फारशी अडचण उद्भवली नाही. बातम्या पाठविण्यासाठी जास्तीत जास्त इमेलचा वापर, कार्यक्रमांच्या प्रसिद्धीसाठी एसएमएस आणि ऑनलाइन छायाचित्रे आणि बातम्या उपलब्ध करण्यासाठी ब्लॉग अशा प्रकारे इंटरनेट सुविधेचा पुरेपूर वापर करण्यास सुरवात केली. त्याचं पत्रकार मित्रांनी स्वागतही केलं.
पुढं अजितदादा पवार उपमुख्यमंत्री झाले. भुजबळ साहेबांवर सार्वजनिक बांधकाम व पर्यटन या विभागांच्या मंत्रीपदाचा कार्यभार सोपविण्यात आला. त्यावेळी भुजबळ साहेबांनी मला 'रामटेक'वर बोलावलं, आणि एक वाक्य उच्चारलं. ते म्हणाले, 'तू माझ्यासोबत काम करावंस, अशी माझी इच्छा आहे.' पिटके साहेब आणि हरि नरके सर साक्षीदार आहेत, या प्रसंगाचे! 'तू माझ्याबरोबर काम कर रे', असा आदेशही ते देऊ शकले असते, पण त्यांच्या या अतिशय सौहार्दपूर्ण वाक्यानं मी हेलावलो. मी तसा कोण होतो त्यांच्यासमोर? चाळीस वर्षांहून अधिक- अतिशय संस्मरणीय आणि वादळी राजकीय कारकीर्द असलेल्या भुजबळ साहेबांसमोर तसं माझं काय मोठं आस्तित्व होतं? जेमतेम सहा वर्षांची पत्रकारितेतली आणि चार वर्षांची शासनातली नोकरी. पण त्यांच्या सन्मानपूर्वक बोलण्यामुळं मी त्यांना होकार दिला. खोटं सांगत नाही, दुसऱ्या दिवशी 'रामटेक'वर जेव्हा पर्यटन सचिव, एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक, सह-व्यवस्थापकीय संचालक यांची बैठक झाली, त्यावेळी 'एमटीडीसी'वर व्यवस्थापक (जनसंपर्क) या पदावर माझी नियुक्ती करण्याबाबतच्या पत्रावर साहेबांनी पहिली सही केली. 'एमटीडीसी'तही तत्कालीन एमडी किरण कुरुंदकर, जॉइंट एमडी अविनाश ढाकणे, दिलीप शिंदे यांच्याबरोबरच सध्याचे एमडी जगदीश पाटील, महाव्यवस्थापक किशोरी गद्रे यांनीही मला वेळोवेळी आवश्यक ते सर्व सहकार्य केलं.
भुजबळ साहेबांसोबत काम करताना खूप मजा आली. रात्री बारा बारा वाजेपर्यंत कित्येकदा भाषणं करत बसलो मंत्रालयात. पण त्यावेळीही ऑफिसबाहेर पडताना एक उत्तम भाषण आपल्या हातून तयार झाल्याचं समाधान असायचं. भुजबळांसारख्या वक्तृत्वावर प्रचंड प्रभुत्व असणाऱ्या मुलुखमैदानी तोफेला शब्दरुपी दारुगोळ्याची रसद पुरवण्याची संधी मला मिळाली आणि माझे शब्द त्यांच्यासारख्या मास-लीडरच्या तोंडून लाखोंच्या जनसमुदायाला नादावून सोडताहेत, हे दृश्य कित्येकदा पाहण्याचं भाग्य मला मिळालं. जे एरव्ही कदापिही शक्य नव्हतं, ते या शासकीय नोकरीमुळं शक्य झालं. भुजबळ साहेबांशी कामाचं ट्युनिंगही खूप उत्तम प्रकारे जमलं होतं. एखाद्या कार्यक्रमाच्या पत्रिकेवर केवळ 'जत्राटकर' असं लिहून खाली सही करून ती माझ्याकडं आली, की त्याचं काय करायचं ते मला क्लिअर व्हायचं. अगदी महत्त्वाचा विषय असला की मी त्यांना काय मुद्दे अपेक्षित आहेत, त्याची चर्चा करायचो आणि त्यांच्या सूचनेनुरुप भाषण तयार करायचो. कित्येकदा वेळेअभावी सभेच्या मंचावर गेल्यावरच साहेबांना भाषणाची कॉपी वाचायला मिळायची आणि ते डायरेक्ट भाषण करायचे. इतका त्यांचा विश्वास माझ्यावर होता. भुजबळ साहेबांचा हा विश्वास मला जिंकता आला आणि त्याला कधीही धक्का देण्याचं काम माझ्याकडून झालं नाही. ही त्यांच्यासोबतच्या कारकीर्दीतली फार मोठी उपलब्धी वाटते मला. विश्वास जिंकणं सोपं असतं, पण त्याला क्षणात तडा जाऊ शकतो. सुदैवानं माझ्या विश्वासार्हतेला कधीही तडा जाणार नाही, याची सातत्यानं दक्षता घेतली. 'डीजीआयपीआर'मधून रिलिव्ह होत असताना मी साधारण तीन-साडेतीन वर्षांत भुजबळ साहेबांसोबत आणि त्यांच्यासाठी केलेल्या कामाचा जेव्हा आढावा घेतला, तेव्हा मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशी मिळून सुमारे साडेतीनशे भाषणं, साधारण तितक्याच बातम्या आणि सुमारे सव्वा पाच हजार छायाचित्रं, त्याखेरीज सप्लीमेंटरी आर्टिकलच्या स्वरुपातल्या सतराशेहून अधिक फाइल्स इतका डाटा रेकॉर्ड मला आढळून आला. एरव्ही ठरवलं असतं तरी इतक्या वैविध्यपूर्ण विषयांवर लिखाण होणं, ही अशक्यप्राय गोष्ट होती माझ्यासाठी!
दि. 21 जून 2012 रोजी मी रायगडच्या जिल्हा माहिती अधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला. दुर्दैवानं त्याच दिवशी दुपारी मंत्रालयाला अग्नीप्रलयानं वेढलं. त्यामुळं इमर्जन्सी ड्युटी म्हणून दोन दिवसांत पुन्हा भुजबळ साहेबांसोबत दाखल झालो. तिकडं रायगडचं कामही सुरूच होतं. दोन्हीकडचं काम करत होतो. रायगड कार्यालयातल्या सहकाऱ्यांनीही मला अखेरच्या दिवसापर्यंत उत्तम सहकार्य केलं. शेवटच्या दिवशी पुष्पगुच्छ आणि श्रीफळ देऊन मला सदिच्छाही दिल्या.
या नोकरीनं मला जगदीश मोरे, वसंत पिटके, विशाल ढगे, प्रशांत सातपुते, किशोर गांगुर्डे, अजय जाधव, युवराज पाटील, आकाश जगधने, शिवाजी सोंडुलकर, संजय नाईक, अभिनंदन मोरे, अविनाश पाटील, शैलेश चांगले, दत्तात्रय खिल्लारी, विनोद निकम,  विजय मोरे  असे कित्येक लाइफटाइम, एजलेस मित्र दिले. मैत्रीच्या धाग्यानं जोडल्या गेलेल्या पत्रकार मित्रांची संख्या तर अगणितच! तीच माझी आयुष्याची खरी मिळकत!
मनिषा म्हैसकर, प्राजक्ता लवंगारे, विजय नाहटा या आयएएस अधिकाऱ्यांमुळं आणि संचालक प्रल्हाद जाधव, श्रद्धा बेलसरे यांच्यामुळं मला 'डीजीआयपीआर'अंतर्गत येणाऱ्या सर्व विभागांमध्ये तसंच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री कार्यालय आणि महामंडळावरही काम करण्याचा अनुभव मिळाला. वीस-तीस वर्षं सेवा झाल्यानंतर सुद्धा कित्येकांना जी संधी मिळत नाही, जो अनुभव मिळत नाही, तो मला केवळ सहा वर्षांत मिळाला. जिल्ह्यावर काम करणं बाकी होतं; तो अनुभवही शेवटच्या 40 दिवसांत घेता आला. त्यामुळं इथं आपल्याला परिपूर्ण, संपृक्त अनुभव आल्याची माझी भावना झाली. त्याचवेळी शिवाजी विद्यापीठात काम करण्याची संधी चालून आली. ती नाकारावी, असंही त्यात काही नव्हतं. घरापासून जवळच आणि स्वतःच्या विद्यापीठात काम करता येणार होतं. शिवाय बदलीही नाही. म्हटलं, चला, हाही अनुभव घेऊन पाहू या पुढची काही वर्षं. वन शूड कीप मूव्हिंग अहेड!

रविवार, २८ सप्टेंबर, २००८

एका क्लिकवर महाराष्ट्र!

 (दै. लोकमतच्या मुंबई आवृत्तीत रविवार पुरवणीमध्ये दि. २८ सप्टेंबर २००८ रोजी वरिष्ठ प्रतिनिधी श्री. अतुल कुलकर्णी यांनी महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचा उपक्रम असलेल्या 'महान्यूज' वेब पोर्टलविषयी लिहीलेले विशेष फीचर...)


महासंचालक मनिषा पाटणकर-म्हैसकर आणि संचालक श्रद्धा बेलसरे-खारकर यांच्यासमवेत 'टीम महान्यूज'. (बसलेल्या डावीकडून) वर्षा आंधळे, मयुरा देशपांडे-पाटोदकर. (उभे डावीकडून) प्रमोद धोंगडे, नंदकुमार वाघमारे, मंगेश वरकड, डॉ. गणेश मुळे, किरण मोघे, आलोक जत्राटकर आणि अंजू कांबळे




मुंबई, दि. २७ सप्टेंबर : एखाद्या कॉर्पोरेट ऑफिस थाटणाऱ्यालादेखील शक्य न होणारे कार्य माहिती व जनसंपर्क विभागाने एका क्लिकसरशी करून दाखविले आहे. राज्याचा हा विभाग जगाच्या गतीसोबत धावू शकतो हे दाखवून देताना महाराष्ट्राच्या उदरात काय काय दडले आहे, याचा खजिनाही ई-वाचकांसाठी खुला करण्याचे मोठे काम या विभागाने केले आहे. हे करत असताना महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटलादेखील मोठे आव्हान या पोर्टलने उभे केले आहे.

माहिती खात्याकडून बातम्यांचे टपाल आले की आता घरी जाण्याची वेळ झाली असा समज गेली काही वर्षे रुढ होता. कारण सगळ्या दैनिकांमधे आपापले काम आटोपून घरी निघाल्यानंतर कधीतरी दिवसभर काय घडले, याचे टपाल येत असे. ते टपाल यायचे, ते देखील विस्कळीत स्वरुपात. काळ बदलला. कॉम्प्यूटर आले, तसे बातम्यांचे स्वरुप बदलले. त्यानंतर कालांतराने माहिती आणि जनसंपर्क विभाग चर्चेत आला तो रंगीत लोकराज्यने स्वतःचे रंगरुप बदलत माहिती देण्याची पद्धती देखील बदलली तेव्हा. त्याच काळात दिलखुलास हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरुन सुरु करण्यात आला. (त्यासाठी या खात्याने ऊर्जा विभागाला धन्यवाद द्यायला हवेत. कारण गावात सकाळी-सकाळी लाईट गेले की बंद पडलेले रेडिओ सुरु होतात आणि त्यावर दिलखुलास कार्यक्रम लागतो !) त्यानंतर या विभागाकडून 'जय महाराष्ट्र' या सह्याद्री वाहिनीवरील कार्यक्रमाद्वारे मंत्र्यांपासून ते अधिकाऱ्यांपर्यंत अनेकांच्या माहितीपूर्ण मुलाखती येऊ लागल्या. पण माहिती खात्याचे बातम्या देण्याचे मुख्य काम खऱ्या अर्थाने आजच्या काळाशी सुसंगत झाले ते महान्यूज या पोर्टलमुळे!

एकेकाळी राज्यातल्या विविध दैनिकांना शासकीय बातम्या पुरविणारा विभाग अशी स्वतःची ख्याती या विभागाने पूर्णपणे पुसून स्वच्छ करीत आधुनिक जगाशी नवी ओळख करून दिली. आज http://www.mahanews.gov.in या पोर्टलमध्ये किमान पाच दहा दैनिकं चालविण्याची ताकद आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. महाईव्हेंन्ट, साक्षात्कार, महासंस्कृती, तारांकित, फर्स्टपर्सन, चौकटीबाहेर, महाऑप, गॅलरी, हॅलो अशा विविध सदरांच्या माध्यमातून या पोर्टलने अवघा महाराष्ट्र एका क्लिकवर आणून ठेवला आहे. केवळ एवढेच नव्हे, तर बंद पडलेले एम्प्लॉयमेंट न्यूज कल्चरदेखील या महान्यूजने जिवंत केले आहे. या पोर्टलवरील 'महाऑप' या सदरात नोकरी मिळण्याची किमान सहा हजार ठिकाणं उपलब्ध करून दिलेली आहेत. सरकार केवळ माहितीच देते, असे नाही; तर, त्यासोबत तुम्हाला रोजगारही देते, याचे हे उत्तम उदाहरण आहे. इंडो-तिबेट पोलीस दलात ६६ जागा भरल्या जाणार आहेत, इथपासून ते बँक ऑफ बडोदामध्ये लिपिकाच्या हजार जागा भरणार आहेत, हे सांगण्याचे व त्याच्याशी संबंधित ईमेल किंवा वेबसाईट सांगण्याचे कामही हे पोर्टल करीत आहे. (मनसेच्या कार्यकर्त्यांनादेखील कोठे मराठी तरुणांना नोकऱ्या आहेत हे शोधण्यासाठी याचा फायदा होऊ शकतो !)'

एकीकडे नोकरी सांगण्याचेच काम हे पोर्टल करते, असे नाही; तर, त्यासोबत महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती, श्रद्धास्थाने, वस्त्रप्रावरणे, लोककला, संतपरंपरा, सण-उत्सव, गडकिल्ले यांची माहिती, नवनवीन बातम्या, वेगवेगळ्या मुलाखती, राज्यभरातील विविध फोटो असा खजिनाच यातून खुला होतो.

माहिती खात्याला 'गुडलूक' देणाऱ्या खात्याच्या सचिव मनीषा पाटणकर-म्हैसकर या पोर्टलच्या एडिटर इन चिफ आहेत, तर सीईओची जबाबदारी दमदारपणे सांभाळली आहे श्रद्धा बेलसरे यांनी. त्यांच्या टीममध्ये डॉ. गणेश मुळे यांच्यासोबत वर्षा आंधळे, आलोक जत्राटकर, डॉ. किरण मोघे, नंदकुमार वाघमारे, अंजू कांबळे, प्रमोद धोंगडे, मंगेश वरकड यांच्यासह मयुरा देशपांडे, सुनील पाटील, अरविंद जक्कल असा चमू काम करीत आहे. कधी काळी हे सगळे लोक सरकारी खात्यात काम करीत होते, हे सांगताना आता संकोच वाटावा, इतका व्यावसायिकपणा या सगळ्या टीममध्ये आला आहे. अर्थात याचे सारे श्रेय दिलखुलासपणे मनीषा म्हैसकर यांनाच द्यावे लागेल. संपूर्ण विभागाला सतत नवनव्या योजनांत गुंतवून टाकण्याचे व कात्रणं कापण्यातून सुटका करण्याचे काम त्यांनी केले. पोर्टलमुळे विभागाची प्रतिमा बदलली, काम करणाऱ्यांमध्ये जबरदस्त आत्मविश्वास आला. आता या विभागात काम करणाऱ्यांच्या बसण्याची व्यवस्था मात्र समाधानकारक नाही. ती देखील 'गुडलूक' असायला हवी. तेवढे झाले की मंत्रालयात एखादे कॉर्पोरेट ऑफिस कार्यरत असल्याची जाणीव सतत सगळ्यांना होत राहील.