सोमवार, १३ एप्रिल, २०१५

ऊर्जा-4: छंदालाच व्यवसायात रुपांतरित करा: विठ्ठल कामत
('ऊर्जा: संवाद ध्येयवेड्यांशी' या उपक्रमामध्ये चौथे पुष्प गुंफले ज्येष्ठ हॉटेल व्यावसायिक व लेखक श्री. विठ्ठल कामत यांनी. अत्यंत ओघवत्या शैलीत त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. त्याचे हे शब्दांकन…)माझ्या मित्रांनो, मी या ठिकाणी भाषण करण्यासाठी नाही, तर संभाषण करण्यासाठी, संवाद साधण्यासाठी आलो आहे, हे लक्षात घ्या. कारण भाषण रटाळ व्हायची शक्यता असते, पण संभाषण मात्र हे निश्चितपणानं रसाळच असतं. कोल्हापूर हे श्री महालक्ष्मीबरोबरच खाद्यसंस्कृतीचं शहर आहे. इथले कित्येक पदार्थ जगभरातल्या खवय्यांच्या जिभेचे चोचले पुरवतात. फक्त एकच आहे, की आपण आपल्या पदार्थांचं मार्केटिंग करायला विसरतो आहोत. त्यासाठीच्या टीप्स देण्यासाठीच मी, साक्षात विठ्ठल कामत इथं आलो आहे. आताच आपल्या विद्यापीठाच्या तलावावर मी सहा वेगवेगळ्या प्रकारचं पक्षी पाहून येतो आहे. कॅम्पसवरचे मोरही दिसले. सूर्यास्तही पाहिला. या साऱ्या गोष्टी लोकांना आपल्याकडे खेचण्यासाठी पुरेशा आहेत. फक्त त्या योग्य पद्धतीनं त्यांच्यापर्यंत पोहोचविण्याचं कसब तुमच्या अंगी असलं की झालं.
उद्योग-व्यवसाय म्हणजे तरी काय असतं हो? स्वस्तात घ्या आणि महागात विका. पण, त्यासाठीची अक्कलहुशारी मात्र तुमच्याकडं असायला हवी. नाही तर साऱ्याच गोष्टी अक्कलखाती जमा होतील. तुमच्या मनगटात ताकत असेल, तर जगप्रवासाचंही तिकीट मिळविण्याची क्षमता तुमच्यात निर्माण होते, हे लक्षात ठेवा. मात्र, त्यासाठी कुठलाही उद्योग-व्यवसाय न निवडता जी तुमची आवड आहे, तो तुमचा छंद आहे, त्याला उद्योगाचं, व्यवसायाचं स्वरुप देता आलं तर यशाची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढते. त्यासाठी 'गॅप, मॅप आणि टॅप' या त्रिसूत्रीचा वापर करा. विठ्ठल कामतनं पण त्याच्या आयुष्यात हीच त्रिसूत्री वापरलीय, हे लक्षात घ्या. कोणत्या क्षेत्रात, कोणत्या बाबतीत 'गॅप' आहे, त्याचा शोध घ्या. ही संधी कितपत विस्तारता येऊ शकते, त्याची चाचपणी करा, ती 'मॅप' करा, तिचा आराखडा आखा आणि मग त्या क्षेत्रात पूर्ण क्षमतेने उतरा. संधी पूर्णतः 'टॅप' करा. 'अगर देखना है तुम्हे, हमारे उडने का अंदाज, तो आसमाँ को कह दो, और ऊँचा हो जाए।' अशा पद्धतीनं या कक्षा जिद्दीनं अधिकाधिक विस्तारत नेल्या पाहिजेत. यश तुमचंच आहे.
हॉटेलिंगच्या क्षेत्रातही संधींचं अवकाश विस्तारत आहे. आपण आपल्याच पाकक्रिया विसरत चाललो आहोत. देशात दर दीडशे किलोमीटरवर जशी भाषा, तशी पाकक्रियाही बदलते. जिभेचे चोचले पुरविणारा आपला देश आहेत. हजारो पाकक्रिया आपल्या माताभगिनींनी विकसित केल्या आहेत. त्यांचं फक्त मार्केटिंग करण्याची गरज आहे. आपला हॉटेल व्यवसाय चालेल, वाढेल, असा आपला देश आहे. त्याला अच्छे दिन येण्याची प्रतीक्षा आहे. माझ्या परीनं मी काम केलं आहे, करतो आहे. तुम्हीही करा. अडचणींना घाबरू नका. अडचणी येणारच. परीक्षा पाहणारच. 'ऐ बुरे वक्त जरा अदब से पेश आ, वक्त को वक्त नहीं लगता बदलने में।' हे सांगण्याची धमक विकसित करा. अडचणी येतात पण, त्या रडविण्यासाठी नव्हे, तर घडविण्यासाठी, हे लक्षात ठेवा. कोणताही उद्योग-व्यवसाय करा, पण आपल्या ग्राहकाला कधीही नाराज होऊन जाऊ देऊ नका. 'मौत के बाद याद आ रहा है कोई, मेरी कब्र की मिट्टी उठा रहा है कोई, या खुदा दो पल की जिंदगी दे मुझे, मेरी दुकान से नाराज हो के जा रहा है कोई।' इतकी आत्मियता, प्रामाणिकपणा आपल्या ग्राहकांशी निर्माण व्हायला हवी.
चांगल्या पद्धतीचं मार्केटिंग करत असताना 'कम खर्चा, जादा चर्चा' हे सूत्र लक्षात ठेवा. तुमचा ग्राहक हाच तुमचा खरा जाहिरात करणारा आहे, हे लक्षात ठेवा. मी लंडनमध्ये गेलो असताना तिथल्या ऑथेंटिक इंडियन म्हणवणाऱ्या 'शान'मध्ये इडली पाहिली, तर रबर बरे म्हणावे, अशी परिस्थिती होती. मी त्यांना म्हणालो, की 'यापेक्षा चांगली इडली तुम्हाला मी करून देऊ शकेन.' तोपर्यंत मी आयुष्यात एकदाही इडली बनविलेली नव्हती. पण, आईला इडली करताना कित्येकदा पाहिलेलं होतं, त्या बळावर हा विश्वास माझ्या मनी जागला होता. तिथल्या मालकिणीनं 'ठीक आहे, उद्या कर.' असं सांगून संधी दिली. रात्री ती यिस्टचा डबा घेऊन माझ्याकडं आली. मी यिस्ट वापरण्यास नकार दिला, तेव्हा तिनं अत्यंत अविश्वासानं माझ्याकडं पाहिलं. यिस्ट आरोग्यास अपायकारक असल्यानं आजही मी माझ्या कोणत्याही पदार्थात ते वापरत नाही. मालकीण यिस्टचा डबा घेऊन निघून गेली. मी पीठ आंबवायला ठेवलं. पण, लंडनच्या मायनस डिग्री तापमानात ते आंबणार कसे? शेवटी खोलीतल्या हीटरजवळ रात्रभर ते ठेवले आणि सकाळी लुसलुशीत इडल्या तयार केल्या. डिस्प्लेमध्ये इटली, खोबऱ्याची चटणी मांडून ठेवली असताना एक इंग्रज नागरिक आला. त्यानं मला विचारलं, 'वॉट इज धीस?' मी उत्तरलो, 'धीस इज राइस पुडिंग.' मग त्यानं चटणीकडं बोट करू विचारलं, 'ॲन्ड धीस?' मी पुन्हा उत्तरलो, 'इट्स द कोकोनट सॉस. द राइस पुडिंग टेस्ट्स बेस्ट विथ कोकोनट सॉस.' आणि अशा तऱ्हेनं माझा पहिला ग्राहक मला मिळाला. त्याची प्रतिक्रिया म्हणून पुढील काळातला तिथला सर्वाधिक हिट पदार्थ तो ठरला. पुढं मग मी डोसा केला आणि त्यात मसाला रोल करून तिथल्या ग्राहकाला पेश केला. सांबार खाण्यास त्याला वेळ नसल्यानं रोल करून दिल्यानं त्याचीही लोकप्रियता वाढली. समोरचा ग्राहक पाहून, जसा देश, तशी भाषा बोलण्याचा धडा मला तिथून मिळाला. माझ्या हजरजबाबीपणाची त्याला जोड दिली. त्यामुळं आज जगातील चौदा भाषा मी बोलू शकतो. लोकांशी त्यांच्या भाषेत संवाद साधल्यानं त्यांच्यातही आपुलकी निर्माण होते.
Mrs. & Mr. Vithal Kamat at Shivaji University's (Kolhapur) picturesque lake
ज्या देशात उद्योगासाठी जाल, तिथले कायदेकानून, नियम आधी समजावून घ्या. याचा धडा माझ्या स्वतःच्या जपानमधील उदाहरणानंच देईन. जपानमध्ये माझ्या पहिल्यावहिल्या रेस्टॉरंटचं उद्घाटन होतं. ज्या दिवशी संध्याकाळी उद्घाटन व्हायचं होतं, त्या दिवशी दुपारी तिथला शासकीय सर्वेक्षक पाहणीसाठी आला. रेस्टॉरंटच्या दर्शनी भागातच मी तंदूर लावलेला होता. तो पाहून तो म्हणाला, 'तुम्ही तंदूरसाठीचं लायसन्स घेतलेलं नाही. तेव्हा तुम्ही ते लावू शकत नाही.' मला खरंच, त्याची कल्पना नव्हती. रेस्टॉरंटच्याच लायसन्समध्ये मी ते गृहित धरलेलं होतं. आता इतक्या कमी कालावधीत तंदूरसाठी लायसन्स मिळणंही शक्य नव्हतं. स्थानिक लायसन्स नसल्यानं माझा प्रशिक्षित माणूस ते तंदूर वापरू शकणार नव्हता. मी प्रयत्न करून पाहिला, तर इतका जोराचा चटका बसला की, पुन्हा त्यात हात घालण्याचं धाडस मला झालं नाही. तेव्हा मी तिथं स्थानिक हरकाम्या टाइपची कामं करणाऱ्या कामगाराला बोलावलं. त्याला मी छोटे छोटे गोळे लाटून त्यावर काजू, ड्राय फ्रूट्स पेरले आणि त्याक्षणी त्या छोट्या नानचं नामकरण केलं- काबुली नान. मी आजतागायत काबूल कुठं आहे ते पाहिलेलं नाही, पण हा नान आजही जपानमध्ये पॉप्युलर आहे आणि मला सांगायला अभिमान वाटतो की गेली अनेक वर्षे माझा तोच जपानी कर्मचारी ते बनवतो आहे. अशा अडचणी येणार, हे गृहित धरून त्यावर मार्ग शोधत आपण पुढं जात राहायला हवं.
आणखी एक अनुभवाचा सल्ला देतो की, तुमच्या ग्राहकाला वय नसतं, तर हृदय असतं, हे लक्षात घ्या. ऑर्किडच्या उभारणीच्या काळात आम्ही शाळेतल्या लहान लहान मुलांसाठी आठवड्यातून एकदा साइट व्हिजिट ठेवायचो. त्यांना तिथं खेळू द्यायचो आणि त्यांच्यासाठी काही तरी स्पर्धा घेऊन बक्षीसंही द्यायचो. ऑर्किडच्या विस्तारासाठी मला अडीचशे कोटींचं कर्ज घ्यावं लागणार होतं. आता एवढी रक्कम कोणती बँक देईल, या विवंचनेत मी होतो. मी एका बँकेच्या शाखेत गेलो. तिथल्या दरवानानं बँकेचे वरिष्ठ मॅनेजर आले असून एवढ्यात ब्रँच मॅनेजरला भेटू शकणार नसल्याचं सांगितलं. माझ्यासाठी ही संधीच होती. मी त्याला म्हणालो, 'अहो, त्या साहेबांनीच मला बोलावलंय. त्यांना सांगा विठ्ठल कामत आलेत म्हणून.' मी असंच ठोकून दिलं होतं. त्या शिपायानं माझ्याकडं विचित्र नजरेनं पाहिलं आणि तो आत गेला. तर 'कुठे आहेत विठ्ठल कामत?' अशी विचारणा करत ते वरिष्ठ अधिकारीच बाहेर आले. ते म्हणाले, 'कामत साहेब, तुमच्याबद्दल माझ्या नातीनं कालच मला सांगितलं. तुम्ही घेतलेल्या स्पर्धेत काल तिला बक्षीस मिळालं आहे. बोला, कितीचं कर्ज हवंय?' मी उडालोच. म्हणजे निरपेक्षपणे केलेलं माझं काम. त्यातून नशीबानं साहेबाच्या नातीला बक्षीस मिळालेलं. अशा प्रसंगातून जीवन खूप काही शिकवून जातं. अडीचशे कोटीचं कर्ज त्या छोटीमुळं मला मिळून गेलं. याठिकाणी आणखी एक सांगतो. तुम्ही उद्योगासाठी, व्यवसायासाठी कर्ज जरुर घ्या. पण, ते घेतलेल्या कारणासाठीच खर्च करा, म्हणजे झालं.
ऑर्किडमध्ये तेरा मिनिटांत सर्व्हिस न दिल्यास जेवणाचं बिल न आकारण्याच्या माझ्या निर्णयाचाही मला खूप लाभ झाला. काही वेळा देशातल्या अन्य प्रांतातल्या ग्राहकांना पहिल्यांदा मुद्दामहून मोफत देण्याचा लाभ मला त्यांच्या किंवा त्यांच्या मित्र मंडळींच्या पुढच्या ट्रीपमध्ये आवर्जून झाला. लॉयल कस्टमर देशाच्या कानाकोपऱ्यात निर्माण झाले. दर्जाच्या बाबतीत आमच्या कोणत्याही रेस्टोमध्ये कधीही तडजोड केली जात नाही. मी स्वतः पत्नीसमवेत कित्येकदा आमच्या रेस्टोजना ग्राहक बनून सरप्राइज व्हिजिट करत असतो. आणि अशा व्हिजिटमध्ये अद्यापपर्यंत तरी कोणीही फेल गेलेलं नाही, याचा अभिमान वाटतो.
त्यामुळं विद्यार्थ्यांना माझं असं सांगणं आहे की, आपल्या देशात ९९६ प्रकारचे जॉब आहेत. त्यातलं तुम्ही काहीही करा. त्यांना पालकांनी साथ द्या. ज्या त्या वयात जे ते करा. नाही तर पुढं आयुष्यभर पस्तावण्याची वेळ येईल. तसं होऊ देऊ नका. 'हम होंगे कामयाब- एक दिन' नव्हे, तर 'हम होंगे कामयाब- हर दिन' अशा निर्धारानं आयुष्याला सामोरे जा- बस्स!

२ टिप्पण्या: