शनिवार, ४ एप्रिल, २०१५

ऊर्जा-3: जे काम कराल; ते स्वतःचे समजून करा: हणमंत गायकवाड('ऊर्जा: संवाद ध्येयवेड्यांशी' या शिवाजी विद्यापीठ व सकाळ माध्यम समूह यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित उपक्रमाअंतर्गत तिसरे पुष्प गुंफले ते भारत विकास ग्रुप कंपनीचे उद्गाते श्री. हणमंत गायकवाड यांनी. त्यांनी साधलेल्या संवादाचे हे शब्दांकन…)
मित्र हो, मुलाखतीपेक्षा आपणा सर्वांशी थेट संवाद साधणं मला सोपं जाईल, अशी माझी भावना आहे. त्यामुळं माझ्याबद्दल, माझ्या वाटचालीबद्दल मी स्वतःच सारी माहिती तुम्हाला देतो. सुरवात करण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात घ्या की, भलेही मी आज यशस्वी उद्योजक म्हणून गणला जात असलो, तरी त्यासाठी लागणारं कोणतंही भांडवल किंवा साधनसामग्री माझ्याकडं नव्हती. सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या मुलाची स्वप्नं तरी काय असणार? चांगला अभ्यास करायचा, युपीएससी, एमपीएससीच्या परीक्षा द्यायच्या आणि एक चांगला सरकारी अधिकारी व्हायचं, असं काहीसं स्वप्न मी बाळगून होतो. उद्योजक होईन, असं कधी ठरवलंही नव्हतं किंवा वाटलंही नव्हतं. पण झालो खरा. मी चालत राहिलो आणि कारवाँ बनत गेला, इतकंच.
मी कोरेगावच्या एका सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा. वडील सारखे आजारी असायचे. त्यामुळं तुटपुंज्या शिलकीवर घर कसंबसं चाललेलं. घरमालकांशी वाद होते. त्यांनी घराची वीजही कापलेली. त्यामुळं दहा बाय बाराच्या खोलीत कंदिलाच्या उजेडातच माझा अभ्यास सुरू असायचा. चौथीत मला शिष्यवृत्ती मिळाली. तेव्हा, आम्ही वडिलांच्या उपचारासाठी पुण्याला फुलेवाडीत आलो. तिथली खोली दहा बाय दहाची. आई शिक्षिका होती. तिच्या कमाईत वडिलांचे उपचार, माझं शिक्षण भागणं शक्य नव्हतं. तिनं जोडीला पापड लाटणे, शिलाई करणे अशी जोडकामं करायला सुरवात केली. माझं गणित चांगलं होतं. त्यामुळं दहावीला ८८ टक्के मार्क मिळाले. मी इलेक्ट्रॉनिक्स डिप्लोमाला प्रवेश घेतला. त्याच सुमारास वडिलांचं निधन झालं. आता काम करण्याखेरीज माझ्यासमोर पर्याय नव्हता. शिकत शिकतच कामं करण्यास सुरवात केली. पापड, सॉस विकणं सुरू केलं. सुटीच्या काळात पेंटिंगची काम करायला सुरवात केली. डिप्लोमा झालो. पुढं व्हीआयटीमध्ये इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला. पण, पुन्हा पैशाचा प्रश्न होताच. आईनं पंधरा हजारांचं कर्ज काढलं. कॉलेज घरापासून एकवीस किलोमीटर लांब होतं. बसचं एक रुपया भाडंही परवडणारं नव्हतं. त्यामुळं रोज एकवीस किलोमीटर सायकल चालवत जायचो. या प्रवासादरम्यान स्वतःला स्फूर्ती देणारी गाणी मोठमोठ्यानं म्हणायचो. बाबूजींचं 'यशवंत हो, जयवंत हो' हे तेव्हापासून आजतागायत मला स्फूर्ती देणारं गीत आहे. या काळातला एक गंमतीदार किस्सा सांगतो. माझ्या सायकलच्या सीटचे रिबिट निसटलेले होते. त्यामुळं काही खोडकर मुलं, ती सीट काढून लांब कुठं तरी फेकून द्यायचे. रिबिट बसविण्याचेही पैसे नव्हते. त्यामुळं ती सीट शोधायची, पुन्हा बसवायची आणि घराकडं निघावं लागायचं. त्यावर मी एक नामी उपाय शोधला. माझ्या गळ्यात शबनम असायची. मी कॉलेजात पोहोचलो की स्वतःच सीट काढून त्या शबनममध्ये टाकायचो आणि वर्गात जायचो. आता हसू येतंय, पण ते दिवस तसे खूपच परीक्षा पाहणारे होते.
एका शिक्षकांनी माझं गणित चांगलं असल्यानं ट्यूशन घेण्याविषयी सल्ला दिला. शिकत असतानाच साधारण तीनेक वर्षं मी ट्यूशन्स घेतल्या. विद्यार्थ्यांचा वाढता प्रतिसाद लाभला. मिळकतही चांगली सुरू झाली. पण, तेच ते शिकवण्याचा मलाच कंटाळा आला. म्हणून ट्यूशन बंद केल्या. शिक्षक लोक वर्षानुवर्षे तेच ते आणि तेच ते कसं काय शिकवू शकतात, कोण जाणे?
त्यावेळी बालेवाडीला आशियाई स्पर्धा होणार होत्या. त्यावेळी आयोजकांकडं गेलो. म्हणालो, 'मला काही काम द्या. कोणतंही काम सांगा. करेनच.' त्यावेळी अंतर्गत काँक्रिटचे रस्ते बांधायचं काम मला मिळालं. मात्र, अट अशी होती की सात दिवसांत काम पूर्ण करायचं. मी दणकून होकार देऊन टाकला. इकडची, तिकडची कामकरी माणसं जमवली आणि कामाला सुरवात केली. त्यांना चांगल्या प्रतीचं नाष्टा, जेवण आणि रात्रीच्या श्रमपरिहाराची विशेष सोय केली. त्यामुळं त्या लोकांनी सात दिवसांत काम पूर्ण केलं. पण, कोयनेच्या भूकंपामुळं स्पर्धा पुढं गेली आणि दरम्यानच्या काळात रस्त्यांची लेव्हल बिघडली. माझं बिल तटवण्यात आलं. मी पुन्हा माझ्या त्या कामगारांकडं गेलो. त्यांना अडचण सांगितली. त्या सर्वांनी पुन्हा ते काम चांगल्या पद्धतीनं केलं आणि मग मला माझे पैसे मिळाले.
इंजिनिअर झाल्यानंतर टाटा मोटर्समध्ये मला नोकरी मिळाली. तिथं पारंपरिक पद्धतीनं कामं चालायची. माझे सहकारी गणेश लिमये यांच्या साथीनं मी इलेक्ट्रीक केबल वापराविषयी थोडं संशोधन केलं. आणि जुन्या केबल्स इलेक्ट्रीक केबल्सनी रिप्लेस केल्यानंतर कंपनीची जवळ जवळ दोन ते तीन कोटी रुपयांची बचत झाली. त्यामुळं तिथंही कंपनीनं मुख्य व्यवस्थापकाच्या पगाराइतकं बक्षीस मला दिलं.
त्यावेळी कंपनीच्या हाऊस किपिंगचा मुद्दा अडचणीचा झाला होता. मी विचारलं, मी करून पाहू का? कंपनीनं परवानगी दिली. आणि अशा तऱ्हेनं मला नोकरी देणारी कंपनीच हाऊस किपिंगच्या क्षेत्रातली माझी पहिली क्लाएंटही ठरली. भारत विकास ग्रुपचा उदय झाला तो असा. मी स्वतः स्वामी विवेकानंदांना खूप मानतो. त्यांनी भारतीयत्वाची जाणीव माझ्या मनात जागवली. स्वतःसाठी किंवा इतर संकुचित काही विचार न करता देशाचा विचार करायला त्यांनी शिकवलं. त्यामुळं कंपनीचं नावही मी देशाचा विकास डोळ्यांसमोर ठेवूनच ठरवलं. मला हे नाव देताना संबंधित शासकीय यंत्रणांनी प्रथम नकारच दिला. कारण यातून कंपनीचा हेतू, कार्यक्षेत्र काहीच स्पष्ट होत नव्हतं. पण, मी सुद्धा त्यांना स्वच्छतेतून भारताचा विकास करण्याचा माझा मनोदय असून त्यासाठी हे नाव उपयुक्त असल्याचं पटवून देण्याचा आटोकाट प्रयत्न केला. अखेरीस हे नाव मिळालं. केवळ आठ कर्मचारी घेऊन मी काम सुरू केलं. अगदी झपाटून आणि मनापासून काम केलं. कामाचा दर्जा चांगला राखण्याला प्राधान्य दिलं. त्यामुळं कामातून काम मिळत गेलं. पुण्यातलं काम पाहून बेंगलोरच्या कंपनीतलं काम मिळालं, तिथून चेन्नईतलं आणि तिथून हैदराबादमधलं. असा विस्तार वाढत गेला. आमचं कामचं आमचं मार्केटिंग करत होतं. कॉर्पोरेट कंपन्यांबरोबरच शासकीय कामंही मिळत गेली. त्यातून महाराष्ट्राचं मंत्रालय, दिल्लीत पंतप्रधान, उपराष्ट्रपती यांची निवासस्थानं, राष्ट्रपती भवन, सर्वोच्च न्यायालय, सीबीआय हेडक्वार्टर अशी कामं मिळाली. त्यावेळी संसदेवर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला होता. त्यामुळं संसदेच्या बाहेरच्या परिसराची देखभाल बीव्हीजीला मिळाली. आतली देखभाल मात्र पीडब्ल्यूडी विभागाकडंच होती. माझ्या लोकांनी अगदी स्वातंत्र्यापासून धुळीनं विटलेल्या लाल रंगाच्या संसदेच्या पायऱ्यांचा मूळ रंग त्यांना प्राप्त करून दिला. ते पाहून खासदारांना आश्चर्य वाटलं. त्यांनी हे काम कोणी केलं, म्हणून विचारलं. 'बीव्हीजी' इतकं चांगलं काम करत असेल, तर आतली देखभालही याच कंपनीला द्यायला हवी, असा आग्रह त्यांनी धरला आणि अशा प्रकारे संसदेच्या अंतर्गत देखभालीचं कामही बीव्हीजीला मिळालं. त्यानंतर तीन वर्षे बंद अवस्थेत असलेला एक साखर कारखानाही मी केवळ बावीस दिवसांत कार्यान्वित केला. आता देशाबाहेर काठमांडू-नेपाळ येथील कचरा व्यवस्थापनाचं कामही बीव्हीजीला मिळालं आहे, हे सांगताना मला अभिमान वाटतोय.
आज सुमारे दोन हजार कोटींहून अधिक उलाढाल असणाऱ्या माझ्या कंपनीत ७५ हजारांहून अधिक कर्मचारी काम करताहेत. माझ्या माणसांवर माझा पूर्ण विश्वास आहे. माझं काम वाढवताना मी माझ्या नफ्यापेक्षा माझ्या कर्मचाऱ्यांचं उत्पन्न कसं वाढेल, हे पाहतो. मी त्या साऱ्या परिस्थितीतून गेलो आहे. त्यामुळं कंपनीच्या कामाव्यतिरिक्त उरलेल्या वेळेत माझ्या कामगारांना मल्टिस्कील्स देण्याला माझं प्राधान्य राहिलं आहे. त्या वेळेत ते अन्य बाहेरची काही कामं करून कुटुंबाला अधिक हातभार लावू शकतील. आणि तसं होतं आहे. खरं तर स्कील्ड माणसांची आज जगभरात गरज निर्माण झाली आहे. जर्मनीचंच उदाहरण घेऊ. तिथं स्कील्ड आरोग्य कर्मचाऱ्यांची गरज आहे. पण, जर्मन शिकून आरोग्य सेवाविषयक प्रशिक्षण घेऊन तिथं जाऊन काम करण्याची तयारी असेल, तरच ती संधी घेता येईल. त्यासाठी युवकांनी विविध कौशल्ये आत्मसात केली पाहिजेत. ज्ञानसंपन्न बनलं पाहिजे. आणि ते ज्ञान कसं विकायचं, याचंही कौशल्य त्यांनी स्वतःत विकसित करायला हवं. जे काम कराल, ते स्वतःचं समजून करण्याची भावना मनात बाळगाल, तर प्रत्येक कामातून यश आणि समाधान मिळेल, याची खात्री बाळगा.
अशाच पद्धतीनं काम केल्यानं माझ्या लोकांचाही माझ्यावर विश्वास बसला आहे. इथल्यापेक्षा तिप्पट पगाराच्या नोकऱ्यांच्या ऑफर त्यांना मिळाल्या, तरी बीव्हीजी सोडण्यास त्यांनी नकार दिला, इतकी आत्मियता त्यांच्यात निर्माण झाली आहे. माझ्या कुटुंबाचा ती घटक बनली आहेत. यातली बरीचशी माणसं मला रस्त्यात भेटली, त्यांना मी सोबत घेतलं, विश्वास टाकला, म्हणून ही बांधिलकी आमच्यात कायम आहे. मी कधीही कामापुरते संबंध जोडले नाहीत. एकदा जोडले की ते कायमचेच, असं माझ्या बाबतीत झालं. प्रामाणिक काम करत, आयुष्यभराचे बंध निर्माण करत करत माझी वाटचाल सुरू आहे आणि तेच मला मिळालेल्या यशाचं गमक आहे, अशी माझी कृतज्ञ भावना आहे.

२ टिप्पण्या:

  1. प्रत्युत्तरे
    1. धन्यवाद विवेक जी! गायकवाड साहेब बोललेच मुळी अगदी मनापासून आणि तळमळीने! त्यामुळे ते थेट हृदयाला भिडले.

      हटवा