गुरुवार, २० ऑगस्ट, २०१५

दि व्हॉईस ऑफ एशिया: जगन्नाथ पाटील





('दै. लोकमत'च्या कोल्हापूर आवृत्तीचा आज, दि. २० ऑगस्ट २०१५ रोजी ११वा वर्धापन दिन.. या निमित्तानं 'लोकमत'नं 'ग्लोबल कोल्हापूरकर' या अनोख्या विषयावर विशेष पुरवणी प्रकाशित केली आहे. या पुरवणीमध्ये माझे गुरू व मित्र डॉ. जगन्नाथ पाटील यांच्या उच्चशिक्षणाच्या दर्जावृद्धीसाठी जगभर सुरू असलेल्या कार्याविषयी आणि त्यांना प्राप्त सन्मानांविषयी लेख लिहीण्याची संधी ज्येष्ठ संपादक वसंत भोसले, मित्रवर्य चंद्रकांत कित्तूरे, यशोवर्धन मोरे आणि संतोष मिठारी यांच्या आग्रहामुळं लाभली. डॉ. जगन्नाथ पाटील यांनीही त्यासाठी आवश्यक सहकार्य दिले. विशेष म्हणजे हा लेख पुरवणीची कव्हरस्टोरी म्हणून प्रकाशित करण्यात आला. दै. लोकमतच्या सौजन्याने माझ्या ब्लॉग वाचकांसाठी हा लेख शेअर करीत आहे.- आलोक जत्राटकर)


अमेरिकेतलं शिकागो शहर… सन १८९३मध्ये भारताच्या स्वामी विवेकानंदांनी जिथं जागतिक धर्म परिषदेत विश्वबंधुत्वाचा उद्घोष केला आणि जणू काही त्या माध्यमातून सर्व धर्मांचं सारच नव्यानं जगाला पटवून देण्याची कामगिरी केली; त्याच शिकागोमध्ये १ एप्रिल २०१५ रोजी भारतातला आणखी एक युवक 'येस, वुई कॅन' या अमेरिकन राष्ट्रध्यक्षांच्याच शब्दांत जागतिक उच्चशिक्षणामध्ये वंचितांच्या समावेशनाचा आणि सामाजिक न्याय प्रस्थापनेचा उद्घोष करीत होता. निमित्त होतं इंटरनॅशनल नेटवर्क फॉर क्वालिटी ॲश्युरन्स एजन्सीज् इन हायर एज्युकेशन (INQAAHE) या संस्थेच्या रौप्यमहोत्सवी परिषदेचं! आणि हा युवक होता जगभरातील उच्चशिक्षण संस्थांची शिखर संस्था म्हणून कार्य करणाऱ्या INQAAHE या संघटनेचा नवनिर्वाचित अध्यक्ष. त्या युवकाचं नाव होतं, डॉ. जगन्नाथ सीताराम पाटील ऊर्फ सर्वांचे लाडके 'जेपी'! मी मात्र त्यांना 'पाटील सर' म्हणूनच नेहमी संबोधतो.
बार्सिलोना (स्पेन) इथं मुख्यालय असणाऱ्या आणि हार्वर्ड, ऑक्सफर्ड या जागतिक मानांकित विद्यापीठांचं गुणवत्ता मूल्यमापन करणाऱ्या अमेरिका, युरोपमधील संस्थाही ज्या संघटनेच्या सदस्य आहेत, अशा उच्चशिक्षणाच्या क्षेत्रातील अत्यंत महत्त्वाच्या अशा INQAAHE च्या अध्यक्षपदी विराजमान होणारे डॉ. जगन्नाथ पाटील हे केवळ पहिले भारतीयच नव्हे, तर पहिले आशियाई व्यक्ती होत. गेल्या २५ वर्षांच्या वाटचालीत या संघटनेच्या अध्यक्षपदी आजतागायत केवळ अमेरिका, युरोप आणि ऑस्ट्रेलियातील तज्ज्ञांचीच वर्णी लागली होती. डॉ. पाटील यांच्यामुळं प्रथमच आशियाला या शिखर संस्थेचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली. ही निवडणूक सोपी नव्हती. जर्मनी आणि संयुक्त अरब अमिरातीच्या उमेदवारांच्या विरोधात झालेल्या तिरंगी लढतीत डॉ. पाटील यांच्या नामांकनाला चीन, रशिया, श्रीलंका या देशांचं समर्थन लाभलंच; शिवाय, पाकिस्तान, मलेशिया, दक्षिण कोरिया यांच्यासह लॅटिन अमेरिका, आफ्रिका आणि काही युरोपियन देशांचाही पाठिंबा त्यांना लाभला. सुमारे २५० देश सभासद असलेल्या या संघटनेच्या निवडणुकीपूर्वीच इतका मोठा पाठिंबा मिळवून जणू काही डॉ. पाटील यांनी निम्म्याहून अधिक लढाई जिंकलेली होती. अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारत असताना शिकागो येथील त्यांच्या भाषणानं उर्वरित देशांच्या प्रतिनिधींचीही मनं जिंकून घेतली, हे त्यांचं मोठं यश आहे.
कोल्हापुरी फेटा आणि शेरवानी घालून या सोहळ्याला उपस्थित राहून INQAAHE सारख्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरुन त्यांनी कोल्हापुरी परंपरांचा आणि विशेषतः राजर्षी शाहू महाराजांचा सन्मानपूर्वक उल्लेख केला. समाजातील वंचित, मागासवर्गीय घटकांसाठी १९०२ साली शिक्षणात आणि रोजगार संधींत आरक्षण देणारा एक महान राजा आम्हाला लाभला, अशा शब्दांत त्यांनी त्यांचा गौरव केला. आपले शिक्षक जे.एम. साळुंखे, जी.टी. महाजन आणि डॉ. अशोक चौसाळकर यांच्यासह शिवाजी विद्यापीठाचाही त्यांनी अत्यंत सन्मानानं उल्लेख केला. 'माझ्या शिक्षकांच्या अनुभवावरुन मी एक गोष्ट ठामपणे सांगू शकतो, ती म्हणजे कुठलंही आधुनिक तंत्रज्ञान वा कोणतीही शिक्षणपद्धती ही एखाद्या समर्पित शिक्षकाला कधीच पर्याय ठरू शकत नाही,' असं ठाम प्रतिपादन त्यांनी केलं. शिवाय, 'माझ्या शिवाजी विद्यापीठानं कदाचित नोबेल विजेते निर्माण केले नसतील, ग्लोबल रँकिंगमध्येही ते नसेल कदाचित; पण, या विद्यापीठानं भारतातल्या ग्रामीण भागात पहिल्या पिढीचे हजारो उच्चशिक्षित घडविले, याचा मला अभिमान आहे.' अशा शब्दांत विद्यापीठाचा गौरव केला.
शिकागो येथे झालेल्या या पदग्रहण समारंभाचं युट्यूब, फेसबुक आणि ट्विटरवरुन जगभरात थेट प्रक्षेपण झालं. त्यातलं नूतन अध्यक्षांचं अर्थात पाटील सरांचं भाषणही खूप गाजलं. या भाषणातील काही उल्लेख सुरवातीलाच विस्तारानं देण्याचं कारण म्हणजे पाटील सरांच्या व्यक्तीमत्त्वाचा नेमका उलगडा त्यांच्या या उद्गारांतून येतो. जगातल्या उच्चशिक्षणातल्या शिखर संस्थेच्या अध्यक्षपदी विराजमान होतानाही आपल्या मुळांचा संदर्भ देताना त्यांना संकोच वाटत नाही; किंबहुना, अत्यंत अभिमानपूर्वक त्यांचा ते उल्लेख करतात, हे त्यांचे पाय अद्यापही जमिनीवर असल्याचं लक्षण!
दुर्दम्य आत्मविश्वास, भाषेवर उत्तम प्रभुत्व आणि पराकोटीचं संघटनकौशल्य ही पाटील सरांच्या व्यक्तीमत्त्वाची महत्त्वाची वैशिष्ट्ये म्हणून सांगता येतील. किंबहुना, या गुणांच्या बळावरच त्यांनी आजपर्यंतची वाटचाल केलेली आहे, असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही.
राधानगरी (जि. कोल्हापूर) तालुक्यातल्या तिटवे गावात वीरपत्नीच्या पोटी जन्मलेल्या जगन्नाथ यांचं शिक्षण गावातल्याच नागोबाच्या देवळात भरणाऱ्या शाळेत झालं. १९७१च्या युद्धात त्यांच्या वडिलांना वीरगती प्राप्त झाली, तेव्हा ते आईच्या गर्भातच होते. पितृप्रेमाला मुकलेल्या जगन्नाथांवर मातृप्रेमाची मात्र बरसात होत राहिली. कोल्हापूरच्या राजर्षी शाहू विद्यानिकेतनमध्ये त्यांनी माध्यमिक शिक्षण घेतलं. डॉ. ज्ञानेश्वर मुळेही इथलेच विद्यार्थी. महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी मात्र त्यांना परिस्थितीशी दोन हात करावे लागले. अर्धवेळ नोकरी करत त्यांनी बी.एस्सी. पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. 'दैनिक सकाळ'च्या प्रशासकीय विभागात काम करत व 'दै. लोकमत'मध्ये इंटर्नशीप करत त्यांनी शिवाजी विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या व संवादशास्त्र अधिविभागातून त्यांनी बी.जे.सी. व एम.जे.सी. या पदव्युत्तर पदव्या प्राप्त केल्या. एम.जे.सी.ला ते विद्यापीठात प्रथम आले. पीएच.डी.च्या संशोधनासाठी त्यांना शिवाजी विद्यापीठाची संशोधन शिष्यवृत्ती मिळाली. वृत्तपत्रविद्या व संवादशास्त्र या विषयात नेट, सेट उत्तीर्ण होणारे व पीएच.डी.सुद्धा पूर्ण करणारे ते शिवाजी विद्यापीठाचे पहिले विद्यार्थी ठरले. दुसऱ्या बाजूला 'इंडियन एक्स्प्रेस'सारख्या प्रतिथयश दैनिकासाठी कोल्हापूर प्रतिनिधी म्हणूनही त्यांनी उत्तम कामगिरी बजावली. कुशिरे इथल्या बनावट नेत्रौषधीसंदर्भात त्यांनी केलेलं सडेतोड वार्तांकन हे बऱ्याच लोकांच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालणारं ठरलं.
पाटील सरांनी आम्हाला बीजेसीला ब्रॉडकास्ट जर्नालिझम शिकवलं. त्यांची शिकविण्याची, संवाद साधण्याची शैली ही खरोखर अप्रतिम अशीच होती. त्यांच्यामुळं या विषयात आम्हाला गोडी निर्माण झाली. बीजेसीची मुंबई व दिल्ली टूर त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही यशस्वीरित्या पूर्ण केली. त्या पंधरा दिवसांतील त्यांचा वावर आणि सहवास आम्हा विद्यार्थ्यांना खूप काही शिकविणारा होता, आत्मविश्वास देणारा होता. एमजेसीला तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली मला विज्ञान पत्रकारिताविषयक लघु-शोधप्रबंध सादर करता आला, ही माझ्यासाठी खूप अभिमानाची बाब आहे. या कालावधीत आम्हा दोघांत मैत्रीचे बंध निर्माण झाले. त्या अर्थानं ते माझे गुरूही आहेत आणि एक उत्तम मित्रही!
त्याचवेळी शिवाजी विद्यापीठाच्या सहाय्यक कुलसचिवपदी त्यांची निवड झाली होती. विद्यापीठात एक कार्यक्षम अधिकारी म्हणून आपल्या कामाचा ठसा उमटवित असतानाच त्यांची भारतातील उच्चशिक्षण संस्थांच्या गुणवत्तेचे मूल्यांकन करणाऱ्या 'नॅक' (बंगळूर)च्या सहाय्यक सल्लागारपदी त्यांची निवड झाली. इथेच त्यांच्या कारकीर्दीला उत्तम कलाटणी मिळाली. 'नॅक'चे पहिले अध्यक्ष डॉ. अरुण निगवेकर, प्रा. राम ताकवले यांच्यानंतर नॅकवर काम करणारे ते एकमेव मराठी व्यक्ती आहेत. साधारण गेल्या बारा वर्षांच्या कालावधीत त्यांनी नॅकवर विविध अधिकार पदांवर काम केले. देशातल्या उच्च शैक्षणिक संस्थांच्या गुणवत्ता वाढीसाठी काम करत असतानाच त्यांनी हजारहून अधिक महाविद्यालयांचे समन्वयक म्हणून काम पाहिले. नॅकचे उपसल्लागार, प्रादेशिक समन्वयक आणि प्रभारी सल्लागार म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. याच काळात त्यांना युनेस्को, युरोपियन कमिशन आणि जागतिक बँकेच्या विविध प्रकल्पांवर शिक्षणविषयक सल्लागार म्हणून काम करण्याची संधी मिळाली. शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी त्यांनी अमेरिकेसह फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, जर्मनी अशा चाळीसहून अधिक देशांचा दौरा केला आहे. मेलबर्न (ऑस्ट्रेलिया), क्वालालंपूर (मलेशिया), हाँगकाँग आदी ठिकाणी आंतरराष्ट्रीय कार्यशाळाही त्यांनी घेतलेल्या आहेत. मॉरिशसच्या उच्चशिक्षण आयोगाची पुनर्रचना करण्यासाठी नियुक्त आंतरराष्ट्रीय समितीचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. सन २००७मध्ये त्यांच्या कामगिरीबद्दल ऑस्ट्रेलिया सरकारचा प्रतिष्ठेचा 'एन्डेव्हर ॲवॉर्ड', थायलंडच्या पंतप्रधानांकडून मानपत्र असे आंतरराष्ट्रीय सन्मानही त्यांच्या वाट्याला आले आहेत. उच्चशिक्षणाच्या गुणवत्ता वाढीसाठी त्यांनी दोन आंतरराष्ट्रीय पुस्तकंही लिहीली आहेत. आशियातील पन्नासहून अधिक देश सदस्य असलेल्या एशिया-पॅसिफिक क्वालिटी नेटवर्क (APQN) या संस्थेवर सन २००९ ते २०१३ या कालावधीत ते तीन वेळा निवडून आले. पहिल्यांदा उपाध्यक्ष तर दुसऱ्यांदा थेट अध्यक्षपदावर त्यांनी आपले नाव कोरले. ए.पी.क्यू.एन.चे अध्यक्ष होणारे ते पहिलेच भारतीय ठरले. आणि आता जगभरातील शैक्षणिक संस्थांच्या गुणवत्तेसाठी काम करणाऱ्या संस्थांच्या शिखर संघटनेच्या अध्यक्षपदावरील निवडीमुळे तर त्यांच्या नेतृत्वगुणांवर आणि क्षमतेवर आंतरराष्ट्रीय शिक्कामोर्तबच झाले आहे. विशेष म्हणजे नॅक असो, एपीक्यूएन असो किंवा INQAAHE असो, या तीनही संस्थांमध्ये पाटील सरांनी जी पदे भूषविली, किंवा भूषवित आहेत, त्या पदांवर निवड झालेले ते सर्वात तरुण व्यक्ती आहेत.
इतकी मोठी भरारी मारत असताना ते तिटवे या आपल्या जन्मगावाला मात्र विसरलेले नाहीत. ज्या गावात एसटी नव्हती; आजही बँक किंवा हायस्कूलही नाही, त्या गावातील विद्यार्थ्यांची आपल्यासारखी शिक्षणासाठी परवड होऊ नये म्हणून शहीद पब्लिक स्कूलची स्थापना करण्यात त्यांनी पुढाकार घेतला. 'जगभर कर्तृत्व गाजविणारे 'ग्लोबल कोल्हापुरी' घडविण्याचे' व्हीजन बाळगून या स्कूलचा पाया घालण्यात आला आहे. केवळ क्रमिक, पाठ्यपुस्तकी ज्ञानात विद्यार्थ्यांनी अडकून पडू नये, यासाठी विविध क्षेत्रांतील मान्यवरांना या ठिकाणी आणून त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी ते उपलब्ध करून देतात. यातून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास निश्चितपणानं वाढतो आहे. अगदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगसारख्या आधुनिक संवादसाधनांचा उपयोगही त्यासाठी केला जातो आहे. उच्चशिक्षणाच्या क्षेत्रात देशाचे; नव्हे आशियाचे नेतृत्व करीत असताना प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाची प्रयोगशाळाच जणू शहीद पब्लिक स्कूलच्या रुपानं पाटील सरांनी उभारली आहे.
INQAAHE चं नेतृत्व स्वीकारल्यानंतर विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी जागतिक स्तरावरील सर्व अधिकृत शैक्षणिक संस्थांची एकत्रित यादी व माहिती उपलब्ध करण्याचा मानस त्यांनी जाहीर केला आहे. त्याचप्रमाणं शैक्षणिक गुणवत्तेच्या निकषावर पर्यायी रँकिंग व्यवस्था उभारण्याचाही निश्चय त्यांनी केला आहे. त्यासाठी त्यांनी कामाला सुरवातही केली आहे. उच्चशिक्षणाच्या क्षेत्रात विकसित देशांची बाजारपेठ समजल्या जाणाऱ्या गरीब व विकसनशील देशांची भूमिका जागतिक व्यासपीठांवरुन खंबीरपणे मांडणारे पाटील सर 'दि व्हॉइस ऑफ एशिया' म्हणून ओळखले जातात. नव्या जबाबदारीमुळे ते 'व्हॉईस ऑफ द वर्ल्ड इन क्वालिटी हायर एज्युकेशन' म्हणून निश्चितपणे आपले अस्तित्व निर्माण करतील, असा विश्वास वाटतो.

...तरच कोल्हापुरी बनतील जगात भारी!
या लेखाच्या निमित्तानं पाटील सरांशी संवाद साधला असता त्यांनी कोल्हापूरच्या तरुणांविषयी खूप सकारात्मक मतप्रदर्शन केलं. ते म्हणाले, जग जिंकण्याची ईर्ष्या, क्षमता खरं तर कोल्हापूरच्या मातीतच आहे. मात्र, त्यासाठी इथल्या तरुणांनी कोल्हापूरच्या बाहेर पडायला हवे. पोकळ अस्मितेच्या कोषात अडकून पडण्याऐवजी आपला मानसिक संकुचितपणा झुगारून देऊन जागतिक आव्हानांशी भिडायला हवे. तसे झाले तरच, 'जगात भारी- कोल्हापुरी!' हे आपले आवडते घोषवाक्य प्रत्यक्षात अवतरू शकेल.'
'कोल्हापूरच्या प्रेमाचा अंकित'
आपल्याला भारतासह विविध देशांतून व्याख्यानांसाठी अनेक निमंत्रणे येत असतात. त्यापैकी मोजकीच निमंत्रणे मी स्वीकारतो. मात्र कोल्हापूरचं एकही निमंत्रण मला नाकारता येत नाही, किंबहुना, जगाच्या पाठीवर मी कोठेही गेलो तरी कोल्हापूरचाच विचार माझ्या मनात असतो. मॉरिशसच्या विमानतळावर उतरत असताना सहप्रवाशांचं लक्ष निळ्याभोर सागराकडं लागलेलं असतं, त्याचवेळी माझं लक्ष मात्र तिथली उसाची शेती वेधून घेत असते आणि माझ्या कोल्हापूरची आठवण करून देत असते. या भूमीनं मला इतकं भरभरून प्रेम दिलं आहे की, या प्रेमाचा मी अंकित आहे. त्यातून उतराई होण्यासाठी मी तळमळीनं कार्यरत राहीन, अशी कृतज्ञतेची भावनाही पाटील सर व्यक्त करतात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा