सोमवार, १६ नोव्हेंबर, २०१५

थ्री पीस!
 (दै. सकाळ (कोल्हापूर)नं यंदा प्रथमच स्वतंत्र दिवाळी अंक प्रकाशित केला. या अंकासाठी माझे गुरू संजय पाटोळे सर, मित्रवर्य सुजीत पाटील यांनी आवर्जून मला लिहीण्याची गळ घातली. ठोकळेबाज लेख नव्हे, तर काही वेगळं अपेक्षित होतं त्यांना. मग, थोडा विचार केला आणि घेतलं लिहायला.  वरिष्ठ पत्रकार, लेखक व कवी विजय चोरमारे सर यांना बिर्ला फाऊंडेशनची फेलोशीप मिळाली असताना, सन २०००मध्ये त्यांच्या या फेलोशीपअंतर्गत सर्वेक्षक म्हणून काम करण्याची संधी चोरमारे सरांनी मला दिलेली होती. या व्यापक सर्वेक्षणानं मला एक व्यक्ती म्हणून खूप समृद्ध केलं, ज्याचा उपयोग मला पुढं माझ्या पत्रकारितेतील कारकीर्दीसाठी झाला. या सर्वेक्षणादरम्यान आलेले काही अनुभवच मी लिहायला घेतले. खूप साऱ्या अनुभवांतून द बेस्ट थ्री निवडून त्यातून हा 'थ्री पीस' साकारला. माझ्या ब्लॉग वाचकांना तो निश्चितपणे आवडेल, असा विश्वास आहे.- आलोक जत्राटकर) 
--
प्रत्येक व्यक्तीच्या कारकीर्दीच्या सुरवातीला संघर्षाचा, धडपडीचा काळ हा असतोच. माझ्याही होता. पश्चिम महाराष्ट्राच्या संदर्भात सुरू असलेल्या एका महत्त्वपूर्ण सर्वेक्षणात सर्वेक्षक म्हणून मला सहभागी होता आलं. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना 33 टक्के आरक्षणासंदर्भात असलेल्या या सर्वेक्षणांतर्गत कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सोलापूर हे चार जिल्हे एकट्यानं फिरून सॅम्पलिंगद्वारे निवडलेल्या महिलांच्या त्यांच्या घरी, कार्यालयात जिथं शक्य असेल तिथं जाऊन मुलाखती घ्यायच्या. प्रश्नावली व्यवस्थित भरून घेऊन प्रकल्प संशोधकांकडं सुपूर्द करायच्या, असं त्याचं थोडक्यात स्वरुप होतं. नुकताच विद्यापीठाचा पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करून बाहेर पडलेलो होतो. कुठं तरी नोकरी मिळवायच्या धडपडी दरम्यान हे सर्वेक्षकाचं काम स्वीकारलं. आर्थिक लाभाचा विचार नव्हता, पण आयुष्य समृद्ध करणारा अनुभव ठरेल, असं मनात कुठेतरी वाटलं. आणि ते खरंही होतं. महिला आरक्षणाच्या या पहिल्या टप्प्यात जिथं स्थानिक स्वराज्य संस्थांत पुरूषांची मक्तेदारी होती, तिथं बऱ्याच ठिकाणी राजकीय सोयीसाठी घरातल्याच महिलेला पुढं करून तिच्या नावानं कारभार करण्याचेच बहुतांशी प्रकार असण्याची शक्यता होती. (आजही चित्र फारसं बदललेलं नसलं, तरी महिला सजग होताहेत, हे आशादायी आहे.) त्यामुळं अशा अनोळखी गावात जाऊन घरच्यांचा विश्वास संपादन करून, संबंधित महिलेला बोलतं करण्यासाठी खरं तर माझं सारं कौशल्य पणाला लावावं लागणार होतं. तसं मी ते लावून माझं सर्वेक्षण यशस्वीरित्या पूर्ण केलं. या साधारण चारेक महिन्यांच्या कालावधीत, पश्चिम महाराष्ट्राच्या या चार जिल्ह्यांत खेडोपाडी एकट्यानं फिरत असताना अनेक बरे-वाईट अनुभव आले. पण, संयमाची, चांगुलपणाची कसोटी पाहणारेही काही प्रसंग आले. त्यातल्या निवडक अनुभवांनी शिवलेला हा थ्री पीस!

***

शिरोळ तालुक्यातलं एक गाव. अगदी टोकाचं. पंचगंगेचं पात्र गावाला वळसा घालून गेलेलं. नदीच्या पल्याड कर्नाटकातलं गाव. गावाला एसटी जायची दिवसातनं चारदा. वडापच जास्त. शिरोळमधनं एसटीची वाट बघून शेवटी दुपारी वडापनं लोंबकळतच गावात पोचलो. एका वडाच्या पाराखाली मारुतीचं मंदिर. त्या मंदिराला वळसा घालून त्याच्या दारातच वडाप उभी राहिली. ते म्हणजे एसटी स्टँड. उतरलो. ग्रामपंचायतीला पाच महिलाच होत्या. म्हणजे साऱ्यांच्या मुलाखती घेणं आलं. एक हिंदू महिला. बाकी साऱ्या मुसलमान. गाव मुस्लीमबहुल. लोकांना विचारत विचारत एकेका सदस्याच्या घरी जाऊन मुलाखती घ्यायला सुरवात केली. सातला शेवटची एसटी होती. ती यायच्या आत मुलाखती उरकायल्या हव्या होत्या. गावात भावकीच्या वादातनं दोन स्वतंत्र मशिदी झालेल्या. साडेसहाच्या सुमाराला मी त्या हनुमानाच्या पाराजवळ आलो. अर्धा-पाऊण तास वाट पाहणं होतं. त्यानंतर जयसिंगपूरमार्गे कोल्हापूर. नऊपर्यंत घरी आरामात पोहचायचं या मूडमध्ये. आणखीही एक दोन सहप्रवाशी होते. एक माहेरवाशीण सासरला जायचं म्हणून आलेली. तिला पोचवायला भाऊ आलेला. दुसरा माणूस होता गावातलाच. खांद्याला शबनम होती. सांगलीला वगैरे काही कामासाठी जायचं होतं त्याला.
शनिवार असल्यानं हनुमानाच्या दर्शनासाठी लोक येत होते. पण शहरासारखी गर्दी वगैरे नव्हती. थोड्या अंतरावर जाडजूड मिशा उगवलेली पोरंही गोट्या खेळत होती. त्यांचा जोरजोरात कल्ला सुरू होता. हे सगळं आसपास सुरू असताना माझं लक्ष घड्याळाकडं लागलेलं. सव्वासातचा काटा पार झालेला. शबनमवाले मला धीर देत होते, 'गावाकडं असंच असतं हो. साडेसहा म्हणजे साडेसातच असतात.' मान हलवून त्यांना सकारात्मक प्रतिसाद देण्यापलीकडं माझ्या तरी हातात काय होतं. साडेसातचा काटा आठकडं सरकलेला. शेवटची वडापही गावात पोचलेली. ती आता परत शिरोळला जाणार नव्हती. आठाचा काटा साडेआठकडं सरकला, तसा माहेरवाशिणीचा भाऊ तिला घेऊन घराकडं परतला. गोट्या खेळणारी पोरंही आपापल्या घराकडं निघालेली. मला धीर देणाऱ्या शबनमवाल्याचा धीरही सुटला. 'काम मरू दे च्यायला. जातो घराकडं,' असं म्हणून तोही निघाला. पावणेनऊ होत आलेले. त्या संपूर्ण परिसरात मंदिराच्या दिव्याचाच तेवढा काय तो प्रकाश पसरलेला. पाराच्या परिसरात तो प्रकाश आणि मंदिराचा पुजारी एवढेच काय ते माझ्या सोबतीला होते. सव्वानऊच्या सुमाराला पुजारीही मंदिराचं लोखंडी दार बंद करून निघाला. जाताना 'पावणं, यश्टी आली न्हाई वाटतं. आता मुक्कामाचीच येतीया जणू.' असं म्हणून चालते झाले. मुक्कामाच्या एसटीचं टायमिंग दहाचं होतं. आता केवळ तो दिव्याचा प्रकाशच माझ्या सोबतीला उरलेला. पलीकडं नदीच्या संथ पाण्याच्या प्रवाहाची खळखळ ऐकू येत होती. पानांची सळसळही ऐकू येत होती. त्यावेळी मोबाईल वगैरे प्रकरण अद्याप यायचं होतं. त्यामुळं संपर्काचं काहीच साधन नव्हतं.
त्या अनोळखी ठिकाणी काळोखात मी एकटा होतो. एसटी नाही आली, तर घरी कसं परतायचं? काय करायचं? मघाच्या त्या आडदांड पोरातलं कुणी आलं आणि मारुन जवळचं होतं नव्हतं ते लुटून नेलं तर? चालत निघावं का? पण त्या निर्जन, सुनसान रस्त्यावरुन चालणार तरी किती? आजूबाजूला सारी ऊसाची शेती. निघालो तर कोल्हे आपल्याला सोडतील का? रात्र इथंच काढावी लागणार की काय? त्या मुस्लीम सरपंच बाईंच्या घरी जावं का? गेलो तर त्यांना सांगणार काय? आणि सांगितलं तरी त्यांनी आपल्या सांगण्यावर का विश्वास ठेवावा? लोकांचा आपल्याविषयी काही गैरसमज झाला तर..? अशा एक ना अनेक विचारांनी मनात नुसतं थैमान घातलं. एवढ्यात त्या शांततेचा भंग करत दोन्ही मशिदींमधून अजानची बांग कानावर आली. ती कानावर आली आणि त्याबरोबर माझ्या डोळ्यांतून घळाघळा अश्रूंच्या धारा लागल्या. आपलं घर अवघं साठ किलोमीटर सुद्धा नाही आणि ते अंतरसुद्धा आता केवढं मोठं वाटू लागलं. आईबाबांची आठवण झाली. इथं आपण अशा अवस्थेत आहोत आणि हे त्यांना सांगूही शकत नाही. कशाला असल्या भानगडीत पडलो कुणास ठाऊक? पण आता पश्चाताप करून उपयोग काय? मन नुसतं सैरभैर झालेलं. हवेत गारठा वाढलेला. लामणदिव्याची ज्योतही आता मंदावत होती. कोल्हेकुई आणि पानांची सळसळ मात्र वाढलेली. ठिकठिकाणी चहा झालेला असला तरी आता पोटात भुकेची आग उठलेली. पण त्याही पेक्षा महत्त्वाचं होतं, ते इथून निघणं आणि कसंही करून किमान जयसिंगपूरच्या स्टँडवर पोहोचणं. तिथं मग बसून रात्रही काढता येईल.
अशी बिकट अवस्था झालेली असताना रात्री साडेदहाच्या सुमाराला मोटारीची घरघर कानावर पडली. ती एसटी असावी, यासाठी कधी नव्हे ते मारुतीरायाकडं मी धावा सुरू केला. एरव्ही तमाम देव मंडळींशी तसा आमचा दोस्ताना वगैरे कमीच. आणि खरंच ती एसटी होती. माझ्यासह पाराला वळसा घालून धडधडत उभी राहिली. मोजून दोन प्रवासी त्यातून उतरले. मी कंडक्टरला काहीही विचारता थेट एसटी जाऊन बसलो. जाणार असली तर मी पुढं जाणार होतो आणि मुक्काम करणार असली, तरी मी काही खाली उतरणार नव्हतो. पण, गाडी जाणार होती. ती सातचीच एसटी होती. सांगलीत शिवपुतळ्याची विटंबना झाल्यानं दंगल उसळली होती. त्यामुळं नेहमीप्रमाणं एसटीच्या मोटारीच दंगलकर्त्यांचं लक्ष्य बनल्या होत्या. पण, त्याच एसटीची चातकासारखी वाट पाहताना आणि तिला पाहिल्यानंतर माझ्या मनाला लाभलेली शांती, त्यावेळी माझ्याखेरीज इतर कुणाला समजू शकणार होती? माझी अवस्था बहुतेक कंडक्टरच्या लक्षात आली. मला म्हणाले, 'जयसिंगपूरपर्यंत चला. चुकून एखादी एसटी आली सांगलीकडनं तर कोल्हापूरला जाऊ शकाल. नाही तर तिथंच थांबावं लागेल.' मी म्हटलं, 'इथल्यापेक्षा जयसिंगपूरचं स्टँड कधीही चांगलंच.' एसटी निघाली. 'संकटकाळी बाहेर पडण्याचा मार्ग' असलेल्या मागच्या खिडकीतून लामणदिव्याच्या अंधूक प्रकाशात हळूहळू दृष्टीआड होत चाललेल्या त्या पाराकडं पाहात राहिलो. ते दृष्य कायमस्वरुपी माझ्या मनावर कोरलं गेलेलं आहे. जयसिंगपुरात पोहोचलो. सुदैवानं अर्ध्या तासात कोल्हापूरकडं जाणारी एसटीही मिळाली. साडेबारा-एकच्या सुमारास कोल्हापुरात पोहोचलो. बावडेकरांच्या गाड्यावर गरमागरम बुर्जीपावचा एकेक घास पोटात उतरू लागला, तसतसं मनावरचं मणामणाचं ओझंही हळूहळू उतरू लागलं.

***

सांगली जिल्ह्यातल्या सर्वेक्षणाचं काम आटोपलेलं होतं. निपाणीला जायचं होतं. रात्री साडेदहाच्या आसपास एका वाहनानं कोल्हापूरच्या तावडे हॉटेलला उतरलो. स्टँडला जाण्यात काही अर्थ नव्हता. कारण शेवटची बस आता मिळण्याची शक्यता नव्हती. मग तिथूनच मिळेल तो ट्रक, टेम्पो पकडून निपाणीला पोहोचायचं, असं ठरवलेलं. अकराच्या सुमारास एक दुधाचे रिकामे कॅन घेऊन बेळगावकडं निघालेला एक टेम्पो मिळाला. आता, तासाभरात आरामात घरी पोहोचणार, या भावनेनं मन निश्चिंत झालं. ड्रायव्हर, क्लिनर आणि त्या दोघांच्या मध्ये मी, असा आमचा प्रवास सुरू झाला. 'सायब, तुमी कुटलं? कुटं गेल्तासा.' वगैरे प्राथमिक विचारपूस वगैरे झाली. दिवसभराच्या प्रवासानं अंग आंबलेलं होतं. डोळ्यांवर झापड येत होती. पण तिला आवरुन समोर पाहात बसलो होतो. दुधगंगा नदीचा पूल ओलांडला. कर्नाटकच्या हद्दीत प्रवेश झाला. त्यावेळी ड्रायव्हर-क्लिनरमध्ये कन्नडमधून काहीतरी बोलाचाली झाली. निपाणीत राहात असलो तरी कन्नड शिकण्याचा, बोलण्याचा कधी योग आला नव्हता. त्यामुळं ते काय बोलले, हे समजण्याला मार्ग नव्हता. आतापर्यंत माझ्याशी मराठी बोलणारे अचानक कन्नड बोलू लागले, त्यामुळं माझ्या मनात संशय निर्माण झाला. कोगनोळी फाटा आला तसा टेम्पो सरळ हायवेवरुन धावता फाट्यावरुन त्यांनी आत वळवला. तेव्हा महामार्ग अद्याप चौपदरी झालेला नव्हता. त्यामुळं टोल चुकवण्यासाठी त्यांनी टेम्पो आत घातला, असंही म्हणता येत नव्हतं. कोगनोळी गाव म्हणजे रात्री आठ-साडेआठलाच शांत होणारं. गाव सोडल्यानंतर आतून हायवेकडं येणारा रस्ता त्यावेळी अत्यंत निर्जन. वाटेवर एक ओढा. त्याच्या भोवती दाट झाडी, त्यात निवडुंगच अधिक. बांधकाम म्हणाल तर माळावरचं एक मंदिर आणि इलेक्ट्रीसिटी बोर्डाचं सबस्टेशन, इतकंच. कोगनोळी पास होईपर्यंत काही वाटलं नाही. पण गाव सोडल्यानंतर निर्जन रस्त्याला गाडी लागली आणि माझ्या जीवाची घालमेल सुरू झाली. एवढ्यात क्लिनरनं कन्नडमधून ड्रायव्हरला काही सांगितलं. ड्रायव्हरनं स्पीड कमी करत उजव्या हातानं एका कोपऱ्यात हात घातला आणि कसली तरी कापडी पुरचुंडी माझ्या मागून त्याच्याकडं फेकली. रस्ता ओबडधोबड असल्यानं स्पीड आणखीच कमी झालेला.
त्यावेळी कोल्हापूरच्या शिंदे बंधूंची लुटमार चर्चेचा विषय होती. यांची टोळी रात्रीच्या वेळी स्टँडवरून गरजू प्रवाशांना हेरून आपल्या मोटारीतून लिफ्ट देत. त्या प्रवाशाच्या आजूबाजूला टोळीतलेच लोक बसत. गाडी निर्जन ठिकाणी आली की त्या प्रवाशाकडील साऱ्या चीजवस्तू चाकूचा धाक दाखवून लुटत. आणि त्याला मध्येच सोडून देत. पण, सोडून देताना त्याच्या अंगावरचे सारे कपडे काढून घेत. म्हणजे लाजेखातर तो लगेच काही हालचाल करू शकणार नाही. निपाणीच्या आणि आमच्या एका जवळच्या व्यक्तीला या प्रसंगातून जावं लागलेलं  होतं. प्रसंगी ताजा होता, प्रत्यक्षातही आणि माझ्या मनातही.
या साऱ्या प्रसंगांनी माझ्या मनात फेर धरला. चांगलं काहीच सुचेना. मघापासून एकमेकांसोबत बोलणारे, ते दोघेही आता शांत बसलेले. जणू योग्य ते ठिकाण येण्याची वाट पाहात असल्यासारखे. मला हळूहळू का होईना, पण घाम फुटू लागलेला. पण, असा अनवस्था प्रसंग आपल्यावर गुदरलाच तर काय करायचं, याची मी मनातल्या मनात जुळवाजुळव करू लागलो. अगदी कपडे काढून घेतले तरीही काय करता येईल, याचाही विचार सुरू केला. त्यावेळी निपाणी-कागल तिकीट दहा रुपयाच्या आसपास होतं. कोगनोळीपासून निपाणीपर्यंत पाच रुपयांत पोहोचता येणार होतं. माझ्या शर्टाच्या खिशात पाच रुपयांची एक नोट होती. मी त्या दोघांचं लक्ष नाही, असं पाहून हळूच ती नोट खिशातून बाहेर काढली आणि पँटच्या खिशातून रुमाल काढला आणि तो खाली पडू दिला. रुमाल उचलण्याच्या बहाण्यानं मी खाली वाकलो आणि ती पाचाची नोट माझ्या सॉक्समध्ये सरकवली. आणि पटकन वर झालो. आता केवळ वाट पाहायची होती- कधी, काय करतात त्याची. टेम्पोत आणि बाहेरही शांतता होती. केवळ टेम्पोची घरघर आणि समोरच्या रस्त्यावर, झाडांवर पडणारे प्रकाशझोत, एवढंच काय ते  आमच्या प्रवासाची साक्ष देणारं. अखेर ते ओढ्याचं वळण आलं. वळणावर गाडी आणखीच स्लो झाली. मी मानसिक तयारी केलेलीच. आता क्लिनर शेजारच्या पुरचुंडीतलं काही तरी आपल्या नाकावर दाबणार आणि आपल्याला लुटणार. एकीकडं श्वासाची गती वाढली असतानाच मी कसा आणि किती वेळ श्वास रोखून धरता येईल, याची केविलवाणी प्रॅक्टीस चालवलेली. ते काही जमतच नव्हतं, खरं तर. त्यामुळं येणाऱ्या प्रसंगाला तोंड देण्याखेरीज, किंवा त्यांच्या स्वाधीन होण्याखेरीज काहीच करता येणार नाही, याची एव्हाना मला जाणीव झालेली. पण, ओढ्याचं ते वळण मागं पडलं.
आता मंदिराचा टर्न बाकी होता. टेम्पो पुढं निघाला. चढाला लागला, स्लो झाला; तसा घामाचा एक ओघळ माझ्या मानेवरुन पाठीवर घरंगळला. उजवीकडं मंदिर, त्याचं प्रशस्त आवार, त्या आवारातलं चिंचेचं झाड नजरेला पडलं. अंधाराच्या पोकळीत त्याची भरीव आकृती आणखीच भीतीदायक वाटत होती. म्हटलं, आता कुठल्याही क्षणी... हळूहळू टेम्पो अंधार आणि शांतता दोन्ही चिरत निघाला होता. मंदिरही मागे पडलं. पुढं इलेक्ट्रीसिटीचं स्टेशन होतं. तिथं बऱ्यापैकी उजेड होता. आता समोरच्या काचेतून तो प्रकाश आमच्या चेहऱ्यावर पडत होता. इलेक्ट्रीसिटी बोर्डाच्या जवळ पोहोचतो पोहोचतो, तोच क्लिनरची हालचाल सुरू झाली आणि पुन्हा माझ्या मनातली चलबिचलही. तिरक्या नजरेनं डोळ्याच्या कोपऱ्यातून त्याच्या हालचाली मी टिपत होतो. त्यानं ती कापडी पिशवी अलगद खोलायला सुरवात केली होती. समोर मला हायवेही दिसत होता. आता काही मिनिटांतच टेम्पो पुन्हा हायवेला लागणार होता. म्हणजे तेवढाच कालावधी होता, त्यांच्याकडं आणि माझ्याकडंही. क्लिनरनं पिशवीत हात घालून एक कसलीशी डबी काढली आणि दुसऱ्या हाताच्या चिमटीत पिशवीतून काहीतरी घेतलं. एक जाना पहचाना वास माझ्या नाकात शिरला- तंबाखूचा. त्या पिशवीतून तंबाखू घेऊन डबीतला चुना त्यावर घेऊन पठ्ठ्यानं शांतपणानं त्यांचं मर्दन सुरू केलं. मी मनात त्याला शिवी हासडली, 'XXX च्या तंबाखूच मळायची होती तर, एवढा वेळ हातात धरून कशाला बसलावता? चंची फेकल्या फेकल्या मळायला काय झालं होतं? नुस्ता जीवाला ताप. इथं तू त्या पिशवीचं काय करणार, ह्या विचारानंच जीवाची घालमेल झालीवती.' मनातलं सगळं झाल्यावर त्याला म्हटलं, 'जरा डबल मळा!' त्यावर त्यानंही आनंदानं चंचीतनं आणखी थोडी तंबाखू काढली, चुना घेतला. मळला. आणि चिमूटभर धरली माझ्यासमोर. मी पण त्याच्या हातातनं घेऊन दाढंत धरली. बऱ्याच वेळानं त्याच्याकडं बघून स्मितहास्य केलं. ड्रायव्हरकडं पाहिलं, तर तो एक मोठ्ठं वळण घेऊन टेम्पो हायवेवर घेण्याच्या तयारीत होता. त्या वळणावर मीही जरा क्लिनरला बाजूला घेत खिडकीतनं पिंक बाहेर टाकली आणि टेम्पो हायवेला लागला.

***

सातारा जिल्ह्यातल्या फलटण तालुक्यातल्या एका गावी जायचं होतं. तिथं एक पंच महिला होत्या. त्यांची मुलाखत घ्यायची होती. सकाळीच साताऱ्यातनं निघालो. फलटणच्या अलिकडंच एका फाट्यावर उतरून थोडं अंतर चालत गेलं की येतंच गाव, अशी माहिती कंडक्टरनं दिलेली. त्याच्यावर विश्वास ठेवून उतरलो फाट्यावर. उन्हं डोक्यावर आलेली. मी चालायला सुरवात केली. एखादी वाडी दिसली की, मला वाटायचं आलं गाव. तिथं पोहोचून विचारलं की सांगणाऱ्याचा हात आणखी पुढच्याच दिशेनं व्हायचा. असं करत करत पाच-सहा किलोमीटर उन्हात तळपत अखेर त्या गावात पोहोचलो. आता पंचाचं घर शोधायचं होतं. तेही असंच विचारत विचारत.
त्यांच्या घराच्या अंगणात पोहोचलो. घर प्रशस्त होतं. दारात पोहोचलो. दारावर टकटक केलं. एक वयस्कर गृहस्थ, बहुधा त्या महिलेचे सासरे असावेत, सामोरे आले. त्यांना मी ओळख करून दिली. माझ्या येण्याचा उद्देश सांगितला. त्यांनी मला आत घेतलं. घर खरंच मोठं होतं. पूर्वी कसं मधून मोठी बोळकंडी थेट मागच्या परसदारापर्यंत घेऊन जायची, तशी रचना होती. मी ज्या खोलीत बसलो, तिला प्लायवूड मारुन तीन खोल्या केलेल्या. सासरेबुवांनी सुनेला हाक मारुन बोलावलं. ओळख करून दिली. सूनबाईंनी गूळ पाणी आणून दिलं आणि त्या पुन्हा माजघरात गायब झाल्या. मी त्या काकांशी टाइमपास म्हणून बोलत राहिलो. पण अर्धा तास गेला तरी सूनबाई बाहेर काही येईनात. माझी अस्वस्थता वाढली. मी त्या काकांना म्हणालो, 'ताईंना बोलवा बाहेर. दहाच मिनिटं लागतील. मी मुलाखत घेतो आणि निघतो. मला पुढं फलटणकडंही जायचंय आणि पुन्हा साताऱ्याला परतायचंय.' ते म्हणाले, 'अगदी थोडाच वेळ थांबा.' असं म्हणून सासरेबुवाही आत गेले. दहाएक मिनिटे झाली. त्या खोलीत मी एकटाच. चुळबुळत बसण्यापलीकडं काही करूही शकत नव्हतो. दहा मिनिटांनी बाहेरून कोणीतरी आल्याचा आवाज आला. ताईंचे यजमान होते. बहुधा शेतावरुन आले असावेत. त्यांच्या आवाजानं सासरेबुवा बाहेर आले. ताईंच्या यजमानांची आणि माझी ओळख करून दिली. ते 'आलोच' म्हणून आत गेले.
मी पुन्हा त्या काकांना ताईंना बाहेर बोलावण्याविषयी सांगितलं. तेव्हा ते मला म्हणाले, 'साहेब, आता जेवल्याशिवाय जायचं नाही.' मी नकारार्थी मान हलवून काही बोलणार इतक्यात तेच पुढं म्हणाले, 'नाही म्हणू नका. पितृपक्ष सुरू आहे. आज आमच्या घरी त्याचं जेवण आहे. तुमच्या रुपानं आमची पितरंच जणू घरी दाखल झाल्यासारखं वाटतंय. नाही तर तुम्ही कोण, कुठले? एवढ्या लांबून कशाला आला असता आमच्याकडं?' मी म्हटलं, 'अहो तसं काही नसतं. मी तसं मानतही नाही. तुम्ही उगाच माझ्यासाठी त्रास करून घेऊ नका. मुलाखत उरकली की निघून जाईन. मग होऊ द्या, तुमचं नियोजनाप्रमाणं.' तोवर ताईंचे यजमानही आले, म्हणाले, 'आम्ही तुम्हाला जेवल्याशिवाय जाऊ देणार नाही. तुम्ही काही मानत नसला तरी हरकत नाही. आम्ही मानतो. त्यामुळं आमची विनंती तुम्ही नाकारू नका.' मघापासून माजघरात कदाचित स्वयंपाकाच्या तयारीत गुंतलेल्या ताईही बाहेर आल्या. आमचं बोलणं आत ऐकू जात असणारच. त्या म्हणाल्या, 'साहेब, तुम्ही जेवल्याशिवाय मुलाखत-बिलाखत काही मी देणार नाही बरं का!' हुशार ताईंची ही मात्रा लागू पडली. म्हटलं, 'होऊ द्या तुमच्या मनासारखं!' ताई आनंदानं आत गेल्या. आम्ही बसलो होतो, त्याच्या पलीकडच्या खोलीत भोजनाची तयारी त्यांनी सुरू केली. आतबाहेर दोन-तीन महिलांची लगबग सुरू झाली. थोड्या वेळानं ताईंनी सासरेबुवांना पानं वाढल्याचा इशारा केला. घराच्या अंगणात माझ्या हातावर पाणी घालून त्या खोलीत सासरेबुवा मला घेऊन गेले. एकूण पाच पाट मांडले होते. दोन्ही बाजूला दोन-दोन आणि मध्यभागी एक. त्या मधल्या ताटासमोर अत्यंत रेखीव, मोठी रांगोळी घातली होती. एका बाजूला सुवासिक उदबत्त्या लावल्या होत्या. पुरणपोळीचा बेत होता. उदबत्त्या आणि पुरणपोळीचा गंध मिळून वेगळाच भूक चाळविणारा सुवास खोलीभर पसरला होता. मी आपला सवयीनं एका बाजूच्या पाटाकडं सरकलो. तोच, त्या काकांनी मला अगत्यानं हाताला धरून त्या मधल्या पाटावर बसवलं. मी आयुष्यात एवढा कधीही संकोचलो नसेन, त्यापूर्वीही आणि त्यानंतरही. मला मान वर करून बघायचंही धाडस झालं नाही, त्या संकोचापोटी. दोन्ही बाजूच्या पाटांवर सासरेबुवा, त्यांचे चिरंजीव आणि आणखी दोघे नातेवाईक बसले होते. मी अंधश्रद्धा मानणारा माणूस. पण त्या लोकांची पराकोटीची श्रद्धा मी नाकारू तरी कसा शकणार होतो? त्यांची ती श्रद्धा पाहून माझ्या अवनत डोळ्यांतून दोन अश्रूंचे थेंब माझ्याही नकळत गालांवर ओघळले. मी तसाच खालमानेनं काही बोलता जेवत राहिलो. ताई हवं नको ते आग्रहानं वाढत राहिल्या. वाढण्यापूर्वी प्रत्येकीचं माझ्या पानासमोर वाकून नमस्कार करणं तर अगदीच जीवघेणं होतं. अखेर जेवण संपलं. त्यानंतर पुन्हा पलीकडच्या खोलीत बसलो. ताईंचं जेवण अजून व्हायचं होतं. तरी हातावर पाणी घेऊन त्या आल्या. मी म्हणालो, 'तुम्ही जेवून घ्या. मी थांबेन आणखी थोडा वेळ.' त्यावर त्या म्हणाल्या, 'साहेब, तुम्ही केवळ आमचा मान राखण्यासाठी जेवलात, याचं मोठं समाधान आहे. आता तुमचा जास्त वेळ घेणार नाही.' असं म्हणून ताईंनी मनापासून प्रश्नांची उत्तरं दिली. सासरेबुवा आणि यजमानही उपस्थित होते. माझी प्रश्नावली संपली. साऱ्यांचा निरोप घेऊन मी घराबाहेर पडलो. बाहेर पडताना किमान त्या काकांचा आशीर्वाद घ्यावा म्हणून मी वाकलो. तर त्यांनी तसं करण्यापासून रोखलं. मग मी घराबाहेर पडलो. पायात शूज सरकवले. माझ्याही नकळत त्या घराच्या समोर वाकून साऱ्या घरालाच नमस्कार केला आणि पाठ फिरवून निघालो. माझ्या पाठीमागे दोन डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहू लागलेल्या पाहताही मला जाणवत होत्या.

४ टिप्पण्या: