![]() |
Dr. Krishna Kirwale with students of Dr. Ambedkar Centre |
अस्वस्थतेनं मनाचा
पूर्ण ताबा घेतलाय.. दोन दिवसांपूर्वी ज्या माणसासोबत दोन-अडीच तास गप्पा मारल्या, बाबासाहेब,
संशोधन आणि समाजकार्य अशा अनेकविध विषयांवर चर्चा केली, त्या माणसाचा खून झाल्याची
वार्ता कानावर आली, तर काय अवस्था होईल एखाद्याची? नेमकी तीच अवस्था अनुभवतोय मी! डॉ. कृष्णा किरवले यांच्या
अचानक झालेल्या खुनामुळं खरंच सैरभैर झालोय. त्यांच्यासारख्या माणसाचा खून होऊ
शकतो, तर मग कोणाचाही जीव इथं सुरक्षित नाहीय, असं काहीसं फिलींग आलंय. भीती
जीवानिशी जाण्याची नाहीय, ती आहे एक आंबेडकरी विचारांचा थोर संशोधक आणि अभ्यासक
गमावल्याची! अशा घटनांमुळं केवळ एक व्यक्ती जात नसते कधीच, तर त्याच्याबरोबर त्याची साधना,
चिंतन, त्यासाठी त्यांनी अखंडित मांडलेला ज्ञानयज्ञ आणि ते ज्ञान समाजाला
मुक्तहस्ते वाटण्यासाठी त्यांची सुरू असलेली धडपड, या साऱ्या गोष्टी संपून जातात.
एका साधक व्यक्तीच्या जाण्यानं समाजाची हानी होत असते, ती अशी! समाजाला ते सारं पुन्हा मिळविण्यासाठी,
साऱ्या गोष्टी पुन्हा नव्यानं, सुरवातीपासून सुरू कराव्या लागत असतात. त्यासाठी
पुन्हा तितकाच वेळ द्यावयाची तयारी असली तर ठीक, अन्यथा झालेलं सामाजिक, वैचारिक
नुकसान भरून काढणं अशक्यच असतं.
![]() |
Dr. Krishna Kirwale |
डॉ. किरवले यांच्याशी
माझा स्नेह अगदी नेमकेपणानं सांगायचा तर सन २००५पासून जुळला. तेव्हा मी कोल्हापूर सकाळमध्ये
काम करीत होतो. शालिनीताई पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या
घटनानिर्मितीमधल्या योगदानाविषयी तसंच आरक्षणाविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याची मोहीम
उघडली होती. मोठी वावटळ त्यांनी उडवून दिलेली होती. त्या वावटळीवर स्वार होण्याची
अनेकांची धडपडही सुरू होती. त्यावेळी शालिनीताई त्यांच्या भाषणांतून
बाबासाहेबांच्या घटनानिर्मितीतील योगदानाबद्दल काही प्रश्न उपस्थित करीत असत. त्या
प्रश्नांतही काही नाविन्य नव्हतं. काही वर्षांपूर्वी अरुण शौरी यांनीही तेच प्रश्न
उपस्थित केले होते आणि त्या पुष्ट्यर्थ उपयोगी पडतील, इतकेच दाखले दिले होते. तर,
शालिनीताईंच्या त्या प्रश्नांची उत्तरं देणारा ‘खोट्या प्रश्नांची खरी उत्तरं’ हा माझा लेख रविवार सकाळच्या
‘सप्तरंग’ पुरवणीत प्रसिद्ध झाला. त्या दिवशीच डॉ. किरवले यांनी शालिनीताईंच्या
वक्तव्याचा समाचार घेण्यासाठी एक सभा कोल्हापुरात आयोजित केली होती. त्यांनी माझा
नंबर कुणाकडून तरी पैदा करून मला फोन केला, म्हणाले, ‘तुमच्या लेखानं माझं बरंचसं
काम हलकं केलं. आता मी या सभेत स्ट्रेटेजी ठरविण्यावर जास्त भर देऊ शकेन.’ आणि खरंच त्यांनी त्या
सभेत जाहीरपणे लोकांना सांगितलं की, ‘बाबासाहेबांचं घटनानिर्मितीतलं योगदान समजून घेण्यासाठी
सर्वांनी आजच्या सप्तरंगमधला लेख वाचावा.’
त्यानंतर मी एकदा
त्यांना खास भेटण्यासाठी म्हणून मराठी विभागात गेलो आणि त्यानंतर कधीही विद्यापीठात
गेलो की, जर्नालिझम डिपार्टमेंट आणि आंबेडकर सेंटर या दोन ठिकाणांना भेट
दिल्याखेरीज निघायचो नाही. बाबासाहेब हा आम्हा दोघांना जोडणारा एक समान धागा होता.
पुढं मी मुंबईला शिफ्ट झालो तरी आमचा दूरध्वनीवरचा संवाद सुरू राहिला. शिवाजी
विद्यापीठात परत आल्यानंतर आंबेडकर सेंटर हे पुन्हा किरवले सरांबरोबर हक्कानं चर्चा
करण्याचं ठिकाण असायचं. रात्री ऑफिस सुटल्यानंतर घरी जाता जातानाही सेंटरच्या
दारात त्यांची अशोक चक्रांकित एसएक्सझेड दिसली की, त्यांना भेटायची तीव्र इच्छा
व्हायची. दारातूनच ‘आहात का सर?’ अशी हाक दिली की, ‘या, या, वेलकम’ असं स्वागत करायचे. मग एकूणच आंबेडकरांचं
साहित्य, त्यांचे विचार, त्यांचा रिलेव्हन्स या अनुषंगानं सातत्यानं आमच्या चर्चा
होत राहिल्या.
कुलगुरू डॉ. देवानंद
शिंदे यांनी बाबासाहेबांच्या १२५व्या जयंतीच्या निमित्तानं संलग्नित १२५
महाविद्यालयांत एकाच वेळी एकाच दिवशी १२५ व्याख्याने आयोजित करण्याचा संकल्प सोडला
आणि त्यासाठी डॉ. डी.आर. मोरे यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त केलेल्या समितीत डॉ.
किरवले यांच्यासोबत काम करण्याची संधी मला लाभली. व्याख्यानमालेनंतर त्या
व्याख्यानांचा संग्रह विद्यापीठातर्फे प्रकाशित करण्याचेही कुलगुरूंनी ठरविले.
तेव्हा त्याच्या संपादनाच्या कामी मला किरवले सरांसमवेत सहसंपादक म्हणून काम करता
आलं, याचा आज विशेष अभिमान वाटतो आहे.
याच पुस्तकातील काही
फेरसंपादित प्रकरणांवर चर्चा करण्यासाठी ते परवा माझ्याकडे आले होते. दोन अडीच तास
अगदी मनमुराद गप्पा आम्ही मारल्या. मध्यंतरी औरंगाबादला असताना त्यांच्या
प्रकृतीच्या काही तक्रारी होत्या. त्याविषयी मी विचारपूस केली. अगदी ट्रॅक्शन
लावण्याची वेळ आलेली. तेव्हा त्यांना मी गंमतीनं म्हणालो, ‘सर, निवृत्तीमुळं कामाचा
व्याप कमी झाल्यामुळं या बाकीच्या गोष्टींनी डोकं वर काढलंय. आता तुम्ही खऱ्या
अर्थानं तुमचा सारा वेळ समाजासाठी देऊ शकणार आहात. त्यामुळं असं आजारी पडण्याचा
तुम्हाला अधिकार नाही.’ त्यावर त्यांनी ‘बरोबर आहे तुमचं’, असं म्हणत नेहमीप्रमाणं खळखळून हसून
दाद दिली होती. माझं संशोधन, नुकताच राष्ट्रीय परिषदेत सादर केलेला पेपर या
विषयीही त्यांना मी आवर्जून माहिती दिली. त्यांनीही कौतुक केलं. आणि थोड्या वेळानं
‘आणखी आठ पंधरा दिवसांत भेटू या,’ म्हणत ते निरोप घेऊन बाहेर पडले. तेव्हा मला कल्पना असण्याचं कारण
नव्हतं की, ही त्यांच्याशी माझी अखेरची भेट ठरणार आहे. कारण त्यांचं ते वयही
नव्हतं आणि वेळही नव्हती. पण, त्यानंतर दोन दिवसांतच त्यांचा निर्घृण खून झाला आणि
माझा एक वैचारिक मार्गदर्शक काळाच्या पडद्याआड गेला.
किरवले सर, अजून बरंच काम
तुमच्या हातून व्हायचं होतं, बऱ्याच गोष्टी आपल्याला मिळून करावयाच्या होत्या. पण,
त्या आता राहून गेल्या आहेत. आमच्याकडून होईल तितकं आम्ही करूच पण तुमचं थेट मार्गदर्शन
यापुढे लाभणार नाही, याची खंत आयुष्यभर राहील. माझा आपणास अखेरचा जय भीम!!!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा