शुक्रवार, ८ डिसेंबर, २०१७

अनप्रेडिक्टेबल



('दै. पुण्यनगरी'च्या कोल्हापूर आवृत्तीने गतवर्षीप्रमाणे यंदाही स्वतंत्र दिवाळी विशेषांक काढला. या देखण्या अंकात उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जाँग-ऊन याच्याविषयी लिहीण्यासाठी संपादक मित्रवर्य श्री. अशोक घोरपडे आणि श्री. समाधान पोरे यांनी प्रवृत्त केले. वाचकांनी त्याचे उत्तम स्वागतही केले. हा लेख दै. पुण्यनगरीच्या सौजन्याने माझ्या ब्लॉगवाचकांसाठी साभार पुनर्प्रकाशित करीत आहे.- आलोक जत्राटकर)



आम्ही ताकदवान आहोत, शांत आहोत; पण म्हणून आमच्या संयमाची परीक्षा पाहू नका. रॉकेटमॅनने आपला अण्वस्त्र निर्मिती कार्यक्रम थांबविला नाही तर तुम्हाला उद्ध्वस्त करण्याखेरीज आमच्यासमोर पर्याय नाही... अमेरिकेसारख्या जगातील सर्वशक्तीमान महासत्तेचा अध्यक्ष जेव्हा संयुक्त राष्ट्रसंघाच्या व्यासपीठावरुन भौगोलिकदृष्ट्या त्यांच्या तुलनेत एक दशांशही नसणाऱ्या उत्तर कोरियासारख्या देशाला इशारा देतो, तेव्हा त्यातील गांभीर्य मोठे असते. त्याचवेळी त्याच व्यासपीठावरुन युद्धाची चिथावणी देणाऱ्यांनो, जर तशी वेळ आलीच तर हवाई सीमांची तमा न बाळगता तुमची बॉम्बर विमाने वरच्या वर उडवून देऊ. कोण उद्ध्वस्त होते ते पाहूच!’ असे प्रतिआव्हान देण्याचे धाडस जेव्हा संबंधित देशाचा पराष्ट्रमंत्री करतो, तेव्हा अखिल जगाच्या दृष्टीने हे गांभीर्य अधिकच वाढलेले असते. महत्त्वाचे म्हणजे चीन, रशिया आणि जपानसारखे देश या प्रसंगी सबुरीची भाषा करीत असले तरी त्यांच्याही संयमाचा अंत पाहणे, कोणालाच परवडणारे नाही.
उत्तर कोरियाचा अण्वस्त्र निर्मितीचा कार्यक्रम हा काही आजचा नाही. मात्र, या वर्षभरात त्यांनी ज्या गतीने आपला अण्वस्त्रनिर्मितीचा कार्यक्रम चालविला आहे, ती गती केवळ अचंबित करणारी नव्हे, तर चिंतेत भर टाकणारी आहे. सन २०१७च्या फेब्रुवारीत यशस्वी अणुचाचणी घेतल्यानंतर ऑगस्टच्या अखेरच्या आठवड्यात साऱ्या सागरी व हवाई सीमांचा भंग करीत उत्तर कोरियाने जपानवरुन आपल्या बॅलेस्टीक क्षेपणास्त्राची चाचणी घेतली होती. सुमारे ७०० किलोमीटरची उंची गाठून जवळ जवळ ३७०० किलोमीटरचे अंतर पार करून हे क्षेपणास्त्र जपानच्या समुद्रात पडले. गुआम येथील अमेरिकी लष्कराचा तळ त्याचे लक्ष्य असल्याची शक्यता वर्तवण्यात आली. त्यानंतर सप्टेंबर २०१७मध्ये लगेचच आपली सहावी महाशक्तीशाली अणुबॉम्बची चाचणी घेतली. हा अणुबॉम्ब नव्हे, तर हायड्रोजन बॉम्ब असल्याची शक्यता वर्तवण्यात आली. उत्तर कोरियाने देखील त्याचा इन्कार केलेला नाही.
उत्तर कोरियाचा रोष त्याच्या स्थापनेपासूनच दक्षिण कोरिया, जपान आणि अमेरिकेवर आहे. त्याला कारणेही आहेत. सन १९४५मध्ये जपानच्या वसाहतवादापासून मुक्त झालेला अखंड कोरिया, त्यानंतर १९४८मध्ये त्याचे दक्षिण व उत्तर असे झालेले विभाजन आणि १९५३मध्ये उत्तर कोरियात उदयास आलेली किम घराण्याची वंशपारंपरिक राजसत्ता म्हणा किंवा हुकुमशाही म्हणा, यामध्ये या सर्वांची बीजे आहेत. सर्वशक्तीमान असल्याचा साक्षात्कार आणि मग तो रुजविण्यासाठी, बिंबवण्यासाठी आणि सिद्ध करण्यासाठी कोणत्याही टोकाला जाण्याची तयारी हे या घराण्याचे वैशिष्ट्य आहे. सध्याचा नेता किम जाँग-ऊनही त्याला अपवाद नाही, उलट तो त्याच्या लहरी स्वभावामुळे आजोबा किम ईल-संग आणि वडील किम जाँग-ईल यांच्यापेक्षा कित्येक पावले पुढेच आहे.
किम जाँग-ऊन हा त्याचा सणकीपणा आणि लहरी स्वभावासाठी (कु)प्रसिद्ध आहे. सलग तिसऱ्या पिढीकडे आलेली राजसत्ता आणि त्यातून आपले वर्चस्व, अस्तित्व अबाधित राखून आपले व्यक्तीमाहात्म्य जनतेच्या मनावर येनकेन प्रकारे लादत राहणे, इतके की तिच्यावर तिचे गारूड- नव्हे, दहशत कायम राहावी. त्याचवेळी जनतेने आपल्याला दैवतही मानत राहावे, यासाठी सर्व उपलब्ध साधनांचा, माध्यमांचा वापर करणे, आपल्या माहात्म्याचा डंका (प्रोपोगंडा) सातत्याने वाजत-गाजत राहिला पाहिजे, जनतेच्या कानावर आणि जगाच्या पाठीवर त्याच्या कहाण्या सातत्याने जात राहिल्या पाहिजेत, याची काळजी अत्यंत प्रयत्नपूर्वक किम जाँग-ऊन याच्याकडून घेतली जात आहे. सणकीपणा किंवा लहरीपणा हा त्याच्या राजकीय मुत्सद्देगिरीचा एक महत्त्वाचा भाग आहे. जागतिक व्यासपीठावर अनप्रेडिक्टेबल अशी प्रतिमा निर्माण करून जगाला सातत्याने संभ्रमात ठेवण्याच्या रणनीतीचे ते एक महत्त्वाचे अंग आहे. म्हणूनच सातत्याने अनप्रेडिक्टेबल वागून, तशी उदाहरणे जगाच्या कानी जात राहतील, आपल्या निर्दयपणाचे किस्से गाजत राहतील, त्यातून दहशत निर्माण होत राहील, याची दक्षता किम जाँग-ऊन याने उत्तर कोरियाची सत्ता हाती घेतल्यापासून प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे घेतलेली आहे.
आज आधुनिक संवाद साधनांच्या क्रांतीमुळे आपण सहजरित्या वर्ल्ड इज अ ग्लोबल व्हिलेज म्हणतो. पण उत्तर कोरियाच्या राज्यकर्त्यांनी या ग्लोबलतेपासून स्वतःला अर्थात आपल्या जनतेला अत्यंत जाणीवपूर्वक दूर ठेवले आहे. सर्व प्रकारच्या माध्यमांवर सरकारचे पूर्ण नियंत्रण आहे. येथे रेडिओ-टेलिव्हीजनवर पूर्णपणे उत्तर कोरियन सरकारच्याच वाहिन्या दिसत राहतात, ऐकू येतात. नागरिकांना घरातील रेडिओ बंद करण्याची परवानगी नाही. सरकारी प्रोपगंडा सातत्याने त्यांच्या कानी पडत राहावा, यासाठी ही दक्षता घेण्यात आली आहे. अत्यंत गतिमान इंटरनेट सेवा तेथे आहे. मात्र, इंटरनेट सेवा सुद्धा मोजक्या लोकांना उपलब्ध आहे आणि ती सुद्धा अत्यंत फिल्टर्ड आहे. राजधानी प्योंगयांगमध्ये केवळ सरकारी कर्मचाऱ्यांनाच राहण्याची परवानगी आहे. इतर जनतेने राजधानीत येऊन वसण्याचा विचारही मनात आणता कामा नये, असा इथला दंडक आहे.
माध्यमांवरचे हे कडक निर्बंधच सुरवातीला सांगण्याचे कारण म्हणजे भारतासारख्या देशात आपण जे काही माध्यमस्वातंत्र्य उपभोगत आहोत, त्याच्या एक टक्काही स्वातंत्र्य उत्तर कोरियन जनतेला नाही. त्यांना स्वतःचा आवाज नाही. असला तरी किंवा कोणी काढण्याचा प्रयत्न केला तरी, त्याचा आवाज थेट बंद करण्यात येतो. इथे लोकांनी तेच बोलायचे किंवा ऐकायचे, जे इथे सरकार म्हणते किंवा ऐकवते. आपल्याकडे एखाद्या अभिनेत्रीला अगदी दिवस गेल्यापासूनच्या बातम्या माध्यमांमध्ये गाजत राहतात. पण, उत्तर कोरियाच्या हुकूमशहाची बायको जेव्हा खूप दिवस जनतेला दिसत नाही, तेव्हा एक तर ती गर्भवती असावी अगर या तानाशहाने तिची हत्या केली असावी, अशी दबकी चर्चा होते. जेव्हा तिला मूल झाल्याची बातमी येते, तेव्हा हे कदाचित त्याचे तिसरे अपत्य असावे, अशा स्वरुपाची बातमी बाहेर येते. तसेच, या अपत्याचे लिंग कोणते, याची माहितीही आजतागायत लोकांना होऊ शकत नाही. किंबहुना, त्याला जी पहिली दोन अपत्ये आहेत, त्यातील केवळ दुसरी मुलगी आहे, एवढीच माहिती लोकांपर्यत येते. पहिल्या आणि तिसऱ्या अपत्याची काहीही माहिती उपलब्ध होऊ दिली जात नाही. इतकी गोपनीयता बाळगली जाते.
या पार्श्वभूमीवर, किम जाँग-ऊन याच्याविषयी त्याच्या सणकीपणाचे जितके किस्से उपलब्ध आहेत, तितकी माहिती त्याच्या व्यक्तीगत जीवनाबद्दल विशेषतः पूर्वायुष्याबद्दल उपलब्ध नाही. उपलब्ध करून दिली जात नाही. उत्तर कोरियाच्या आणि किम जाँग-ऊनच्या गोपनीयतेची सुरवात अगदी त्याच्या जन्मतारखेपासूनच होते. गंमतीचा भाग म्हणजे किम जाँग-ऊनच्या तीन जन्मतारखा सांगितल्या जातात. उत्तर कोरियन अधिकारी त्याची जन्मतारीख ८ जानेवारी १९८२ अशी सांगतात, तर दक्षिण कोरियाचे गुप्तचर अधिकारी ती ५ जुलै १९८४ मानतात. मात्र माजी बास्केटबॉल स्टार आणि किम जाँगचा मित्र डेनिस रॉडमन याने सप्टेंबर २०१३मध्ये त्याची उत्तर कोरियात भेट घेतली, त्यावेळी ही जन्मतारीख ८ जानेवारी १९८३ असल्याचे सांगितले. आता यातल्या कोणत्याही बाबीची शहानिशा करणे शक्य नसल्याने आज माहितीच्या युगातही विकिपिडियाने देखील या तिन्ही जन्मतारखा त्याच्या प्रोफाईलमध्ये दिल्या आहेत. यामध्ये एकच गोष्ट खरी की, १९८२ ते १९८४ या दरम्यान किम जाँग-ऊन याचा जन्म झाला. किम जाँग-हुई आणि किम जाँग-ईल यांचे हे दुसरे अपत्य. किम जाँग-चुल हा त्याचा वडील भाऊ तर किम यो-जाँग ही धाकटी भगिनी. भावाचा जन्म १९८१चा, तर बहिणीचा १९८७चा.
उत्तर कोरियातून बाहेर पडण्याची संधी मिळालेल्या (देश सोडण्याची परवानगीही येथे नागरिकांना नाही.) काहींच्या मते आणि काही जपानी वृत्तपत्रांतून प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार, किम जाँग-ऊन स्वित्झर्लंडमधल्या बर्न येथील एका खाजगी आंतरराष्ट्रीय शाळेत १९९३ ते १९९८ या कालावधीत शिकला. चोल-पाक किंवा पाक-चोल असे बनावट नाव धारण करून तो तेथे शिकत होता, अशी माहिती देण्यात येते. एक लाजराबुजरा आणि वर्गमित्रांत मिसळून राहणारा चांगला विद्यार्थी अशी त्याची प्रतिमा होती. बास्केटबॉलची त्याला जबरदस्त आवड होती. एक वरच्या वर्गातला मुलगा नित्य त्याच्यासोबत असे. तो त्याचा कदाचित अंगरक्षक असावा. त्यानंतर १९९८ ते २००० या कालावधीत किम जाँगने तिथल्याच कोनिझ येथील शाळेत पाक-ऊन किंवा ऊन-पाक असे नाव धारण करून पुढील शिक्षण घेतले. उत्तर कोरियन असेंब्लीमधील एका वरिष्ठ सदस्याचा मुलगा अशी त्याची तेथे नोंद आहे. सन २०००मध्ये त्याने अचानक मधूनच शाळा सोडली. तेथेही त्याच्याविषयी बास्केटबॉलची आवड असणारा चांगला विद्यार्थी अशी ओळख होती. मात्र वर्गातील त्याची उपस्थिती आणि त्याचे गुण या बाबतीत मात्र सारा आनंदीआनंदच होता. एकदा वर्गात पोर्न मॅगेझीन पाहताना तो पकडला गेल्याचाही किस्सा सांगितला जातो. स्वित्झर्लंडमधील उत्तर कोरियाचे तत्कालीन राजदूत रि चोल यांच्याशी त्याचे चांगले संबंध होते. ते त्याचे मार्गदर्शक, हितचिंतक म्हणून कार्यरत होते. किम जाँग-ऊनला अमेरिकन नॅशनल बास्केटबॉल असोसिएशन आणि मायकेल जॉर्डन यांचे भारी आकर्षण होते, असे त्याचे (पाक-ऊनचे) तत्कालीन सहपाठी सांगतात. कोबे ब्रायंट आणि टोनी कुकॉकसोबतची त्याची छायाचित्रे त्याने दाखविल्याचेही ते सांगतात. एप्रिल २०१२मध्ये नव्याने प्रकाशझोतात आलेल्या काही कागदपत्रांवरुन किम जाँग-ऊन हा १९९१पासूनच स्वित्झर्लंडमध्ये राहिला असल्याचे निष्पन्न झाले आहे. फ्रान्समधल्या लायॉन युनिव्हर्सिटीच्या ॲनाटॉमिक ॲन्थ्रॉपॉलॉजी विभागाचे प्रमुख राओल पेरॉट यांनी किमच्या २०१२ आणि १९९९मधील छायाचित्रांचा अभ्यास करून त्या दोहोंमध्ये ९५ टक्के साम्य असल्याचे स्पष्ट केले. त्यावरुन पाक-ऊन आणि किम जाँग-ऊन या दोन्ही व्यक्ती एकच आहेत, असा निष्कर्ष त्यांनी काढला. किम जाँग-ऊनचा बंधू किम जाँग-चुल हा सुद्धा स्वित्झर्लंडमध्ये त्याच शाळेत शिकला. किम जाँग-ईल यांनी मुलांना स्वित्झर्लंडमध्येच ठेवले. त्यांच्यासोबत त्यांची आईही जिनिव्हा येथे काही काळ राहात होती.
सन २००२ ते २००७ या कालावधीत मात्र किम जाँग-ऊन हा प्योंगयांगमधल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची प्रशिक्षण शाळा समजल्या जाणाऱ्या किम ईल-संग विद्यापीठात शिकला. पुढे जून २०१०मध्ये त्याच्याकडे अधिकारी पदाची सूत्रे सुपूर्द होईपर्यंत त्याचे वयाच्या अकराव्या वर्षीचे एकमेव छायाचित्र जगाला माहीत होते. अध्येमध्ये एखादे छायाचित्र प्रसिद्ध होई, पण ते त्याचेच आहे किंवा नाही, याविषयी मतभेद असत. ३० सप्टेंबर २०१० रोजी एका समूह छायाचित्राच्या रुपात त्याचे पहिले अधिकृत छायाचित्र प्रसिद्ध झाले. पक्षाच्या परिषदेत वडिलांपासून दोन जागा सोडून पहिल्या रांगेत बसलेल्या किम जाँग-ऊनच्या त्या छायाचित्रासह परिषदेमध्ये सहभागी होण्यासाठी जातानाचे न्यूजरील फुटेजही पद्धतशीरपणे प्रसिद्ध करण्यात आले. २०१३मध्ये मलेशियातल्या खाजगी हेल्प विद्यापीठाने त्याला अर्थशास्त्रातली मानद डॉक्टरेट प्रदान केली.
किम जाँग-ऊनचा सावत्र वडीलभाऊ किम जाँग-नाम हा खरे तर वडिलांनंतर सत्ता सांभाळेल, असे २००१पर्यंतचे चित्र होते. मात्र त्या वर्षी टोकियोतल्या डिस्नेलँडला जाण्यासाठी बनावट पासपोर्टच्या आधारे जपानमध्ये शिरकाव करण्याच्या प्रयत्नात असताना तो पकडला गेला आणि त्याने नाराजी ओढवून घेतली. सन २०१७मध्ये मलेशियात त्याचा संशयास्पद मृत्यू झाला. उत्तर कोरियन एजंटांनीच त्याची हत्या केल्याचा संशय आहे.
किम जाँग-ऊनचा वडीलबंधू किम जाँग-चुल हा खरे तर उत्तराधिकारी व्हायचा, पण त्याचे वागणे बरेचसे बायकी स्वरुपाचे होते. तसेच किम जाँग-ईल यांना किम जाँग-ऊनमध्ये आपले वडील किम ईल-संग यांचा भास व्हायचा. त्यामुळे १५ जानेवारी २००९ रोजी त्यांनी त्यालाच आपला उत्तराधिकारी घोषित केले. उत्तर कोरियाच्या रबरस्टँप संसदेच्या निवडणुकीत दि. ८ मार्च २००९ रोजी किम जाँग-ऊन विजयी झाला. मात्र, त्याचे नाव सर्वसाधारण कायदेमंडळ प्रतिनिधींमध्ये नव्हे, तर त्यावरील मध्यम दर्जाच्या राष्ट्रीय सुरक्षा आयोगावर होते. हा आयोग म्हणजे उत्तर कोरियाच्या लष्कराचाच एक प्रमुख भाग आहे. त्याचवेळी किम जाँग-ऊन हाच किम जाँग-ईल यांचा उत्तराधिकारी असेल आणि कोरियन वर्कर्स पार्टीबरोबरच उत्तर कोरियाचा अनभिषिक्त सर्वेसर्वा असेल, हे खऱ्या अर्थाने स्पष्ट झाले. त्याला योंगम्योंग-हान तोंगजी अर्थात ब्रिलियंट कॉम्रेड ही सन्माननीय पदवी बहाल करण्यात आली. त्याचप्रमाणे त्याच्या वडीलांनी संसदेसह जगभरात पसरलेल्या उत्तर कोरियन स्टाफला किम जाँग-ऊन याच्याप्रती निष्ठा बाळगण्याची शपथ देवविली. आजोबा किम ईल-संग आणि वडील किम जाँग-ईल यांच्याप्रमाणेच किम जाँग-ऊन याच्यासाठीही स्तुतीगीत रचण्यात आले आणि ते गाण्यास नागरिकांना प्रोत्साहन देण्यात येऊ लागले. त्याच कालावधीत स्वतःचा परिचय करून देण्यासाठी किमने चीनला गोपनीयरित्या भेट दिली, असेही सांगितले जाते. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने मात्र अशी कोणतीही भेट झाल्याचा इन्कार केला.
२७ सप्टेंबर २०१०मध्ये किम जाँग-ऊन याला कोरियन लष्करातील वरिष्ठ दाएजांग पद देण्यात आले. हे अमेरिकेच्या फोर-स्टार जनरलच्या बरोबरीचे पद मानले जाते. त्याच्या दुसऱ्याच दिवशी २८ सप्टेंबरला किम याची उत्तर कोरियाच्या मध्यवर्ती लष्करी आयोगावर व्हाईस चेअरमन म्हणून तसेच कोरियन वर्कर्स पार्टीच्या मध्यवर्ती समितीवर नियुक्ती करण्यात आली. अशा प्रकारे किम जाँग-ईल यांचा उत्तराधिकारी बनण्याच्या सर्व बाबींची पूर्तता त्वरेने करण्यात आली. १० ऑक्टोबर २०१० रोजी किम जाँग-ऊन वडिलांच्या बरोबरीने वर्कर्स पार्टीच्या ६५व्या वर्धापनदिन समारंभास उपस्थित राहिले. त्या ठिकाणी कार्यकर्त्यांवर त्यांचे अस्तित्व आणि उत्तराधिकारत्व बिंबविण्यात आले. किम यांचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी प्रथा मोडून, कधी नव्हे ते आंतरराष्ट्रीय माध्यमांच्या प्रतिनिधींना या परिषदेत प्रवेश देण्यात आला.
जानेवारी २०११पासून किम जाँग-ऊनचे मामा जँग सेंग-थाएक आणि राष्ट्रीय सुरक्षा आयोगाचे व्हाईस चेअरमन ओ कुक-रयॉल यांच्यामध्ये सत्तेसाठीचा संघर्ष उफाळून आला. दरम्यान, १७ डिसेंबर २०११ रोजी किम जाँग-ईल यांचे अकाली निधन झाले. त्यांनी निर्धार केलेला असूनही किम जाँग-ऊन याच्या उत्तराधिकारत्वाबद्दल आणि अननुभवी असल्यामुळे क्षमतेबद्दल साशंकता निर्माण करण्यात आल्या. त्यांच्या वतीने जँग सेंग-थाएक यांनी रिजंट म्हणून कारभार पाहावा, असा एक मतप्रवाह पुढे येऊ लागला.
त्याच वेळी किम जाँग-ऊन याच्यावर किम जाँग-ईल यांच्यासारखाच महान कमांडर, किम यांचा महान क्रांतीकारक वारसदार, पक्ष, लष्कर आणि जनता यांचा अत्युत्कृष्ट नेता अशी स्तुतीसुमनेही प्रोपगंडा करणाऱ्यांकडून उधळली जाऊ लागली. त्याला किम जाँग-ईल यांच्या अंत्ययात्रा समितीचा अध्यक्ष करण्यात आले. कोरियन सेंट्रल न्यूज एजन्सीने तर या साऱ्यांवर कळस केला. केवळ त्याचे आजोबा आणि वडील यांच्यासाठीच वापरण्यात येणारे महान स्वर्गीय व्यक्तीमत्त्व हे संबोधन किम जाँग-ऊनसाठी त्यांनी वापरले. वर्कर्स पार्टीनेही त्यांच्या संपादकीयात आपल्या रक्ताश्रूंची शपथ घेऊन किम जाँग-ऊन यांना आपला सर्वोच्च कमांडर, नेता मानून त्याच्याप्रती आपली निष्ठा जाहीर केली. २४ डिसेंबर २०११ रोजी याची रितसर घोषणा करण्यात आली. पाठोपाठ ३० डिसेंबरला त्याची पक्षाच्या पॉलिट ब्युरो प्रमुखपदी निवड करण्यात आली. ९ जानेवारी २०१२ रोजी त्याच्या कुमसुसान पॅलेससमोर निष्ठा प्रदर्शित करण्यासाठी आणि गौरव करण्यासाठी कोरियन पीपल्स आर्मीच्या वतीने भव्य रॅली आयोजित करण्यात आली. सन २०१३मध्ये जगातील सर्वाधिक प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत किम जाँग-ऊनला ४६वे स्थान लाभले. इतक्या गतिमान पद्धतीने त्याने सर्व कारभार आपल्या हाती घेतला. देशात किमईलसंगीझम व किमजाँगइलिझम या विचारधारांची प्रस्थापना करणे हा एककलमी कार्यक्रम पक्षाला प्रदान केला. थोडक्यात आपली अबाधित सत्ता उत्तर कोरियावर निरंकुशरित्या प्रस्थापित करणे, हाच त्याचा कार्यक्रम ठरला आणि त्यासाठी सर्वांना त्याने जुंपले. एप्रिल २०१२मध्ये आजोबा किम ईल-संग यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने त्याने पहिले जाहीर भाषण केले. त्यामध्ये उत्तर कोरियाला ऑनवर्ड्स टुवर्ड्स द फायनल व्हिक्टरी (अंतिम विजयाच्या दिशेने) वाटचाल करण्याचा संदेश दिला.
वडिलांच्या अंत्ययात्रेप्रसंगी सर्व जनतेने रडलेच पाहिजे, असा आदेश किमने जारी केला. हजारो नागरिकांनी त्यामुळे रस्त्यावर उतरून आपल्या शोकाचे प्रदर्शन केले. मात्र त्याचवेळी ज्यांनी तसे केले नाही, अशा सर्वांना अटक करून नंतर त्यांना गोळ्या घालून ठार करण्यात आले, असेही त्याच्या बाबतीत सांगितले जाते.
किम जाँग-ऊन याच्यावर आजोबा किम ईल-संग यांचा प्रचंड प्रभाव आहे. त्याचे वागणे, बोलणे हे त्यांच्याप्रमाणेच आहे, असे त्याच्या वडिलांचेही मत होते. त्यामुळे त्यांच्या पदचिन्हांवरच वाटचाल करण्याचा किमने जणू चंग बांधला. आजोबांच्या नंतर त्यांना प्रदान करण्यात आलेला सर्वोच्च ग्रँड मार्शल हा किताब किमलाही प्रदान करण्यात आला. आपल्या आजोबांप्रमाणे दिसण्यासाठी त्याने चेहऱ्यावर प्लास्टीक सर्जरी केल्याचेही सांगण्यात येते. नववर्षाप्रित्यर्थ जनतेला संदेश देण्याची प्रथा किम ईल-संग यांनी त्यांच्या काळात सुरू केली होती. किम जाँग-ईल यांनी मात्र आपल्या १७ वर्षांच्या कारकीर्दीत एकदाही जनतेशी संवाद साधला नव्हता. टीव्हीवरुन संवादाऐवजी वर्कर्स पार्टीच्या मुखपत्रात ते संपादकीय लिहीत असत. किम जाँग-ऊन याने त्या प्रथेचे पुनरुज्जीवन केले आणि टीव्हीवरुन उत्तर कोरियन जनतेला संबोधित करण्यास सुरवात केली. जानेवारी २०१३मध्ये त्याने अण्वस्त्र निर्मिती कार्यक्रमाला गती देण्याचा निर्धार करून देशात मार्शल लॉ लागू केला. सन २०१४मध्ये उत्तर कोरियातल्या रबरस्टँप संसदेसाठी निवडणूक घेण्यात आली. किम जाँग-ऊनला साहजिकच कोणीही प्रतिस्पर्धी नव्हता. जनतेला केवळ होय किंवा नाही यापैकी एक पर्याय निवडून मतदान करण्याचा अधिकार (?) देण्यात आलेला होता. लोक मोठ्या संख्येने मतदानासाठी बाहेर पडले आणि सर्वांनीच किमला होय असे मतदान केल्याचे सांगण्यात आले आणि तो बिनविरोध निवडून आल्याची घोषणा झाली.
या दरम्यानच्या काळात सल्लागार म्हणून काम पाहणारा मामा जँग सेंग-थाएक हा आपल्यापेक्षा अधिक वरचढ होईल की काय, या भीतीने किमला ग्रासले. त्यातून त्याच्यावर देशविरोधी कारवाया केल्याचा आरोप ठेवून शिक्षा सुनावण्यात आली. त्याच्यावर एकाच वेळी १२० शिकारी कुत्री सोडण्यात आली. काही क्षणांत त्या कुत्र्यांनी मामाचा फडशा पाडला. या शिक्षेची अंमलबजावणी होत असताना सर्व अधिकारी, कर्मचारी आणि जनतेला उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले, जेणे करून आपल्या निष्ठाभंगाची किती टोकाची कठोर शिक्षा होऊ शकते, याचे प्रत्यंतर सर्वांना यावे. आत्या क्योंग यांनी आपल्या पतीच्या हत्येविरोधात आवाज उठविण्याचा प्रयत्न केला. त्याचे फळ त्यांनाही भोगावे लागले. त्यांच्यावर विषप्रयोग करून त्यांचीही हत्या करण्यात आली. हत्येचे कारण मात्र हार्ट अटॅक सांगण्यात आले. ही हत्या दाबण्याचा किमने मोठा प्रयत्न केला. मात्र, मे २०१५मध्ये कोरियातून पळून गेलेल्या एका सैन्याधिकाऱ्याने त्याने आत्याची हत्या केल्याची माहिती जगासमोर आणली.
उत्तर कोरियाचा सुरक्षा प्रमुख ह्योंग याँग याची हत्याही अशाच क्षुल्लक कारणावरुन करण्यात आली. किम जाँग-ऊन याने बोलावलेल्या बैठकीमध्ये याँग यांना डुलकी लागली आणि ते पाहून किमच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. सुरक्षा प्रमुखालाच त्याने तत्क्षणी अटक करण्याची आज्ञा दिली आणि त्याला थेट अँटी एअरक्राफ्ट गननेच उडवले. सर्व अधिकाऱ्यांसमोर ही शिक्षा अंमलात आणली, जेणे करून त्यांच्या मनात कायमस्वरुपी दहशत बसावी.
किम जाँग-ऊन इतका सणकी आहे की, त्याची मैत्रीण ज्या संगीताच्या ग्रुपमध्ये गायिका होती, तो ग्रुप पोर्न फिल्म्स बनवित असल्याचा संशय येताच त्याने त्या मैत्रिणीसह संपूर्ण ग्रुपलाच गोळ्या घालून ठार केल्याचे सांगतात.

लोकांसाठी कडक नियम बनवून त्यांना सातत्याने दबावाखाली ठेवणे, हे तर या हुकुमशहाचे महत्त्वाचे कर्तव्यच होऊन बसले आहे. त्यामुळे उत्तर कोरियात एखाद्याने काही गुन्हा केला, तर त्या गुन्ह्याची शिक्षा त्याच्या तीन पिढ्यांना भोगावी लागते. म्हणजे एखाद्या गुन्ह्यात आजोबाला फाशी झाली, तर त्याचा मुलगा आणि नातू यांनाही फाशी दिली जाते. अमेरिकन संस्कृतीचे प्रतीक असणारी जीन्स घालण्यास नागरिकांना येथे परवानगी नाही. सरकारने नागरिकांना २८ केशभूषा ठरवून दिलेल्या आहेत. त्यातील दहा पुरूषांसाठी तर १८ महिलांसाठी आहेत. त्याव्यतिरिक्त अन्य हेअरस्टाईल करण्यास परवानगी नाही. पुरूषांना तीन इंचांपेक्षा अधिक केस वाढविण्याची परवानगी नाही. उत्तर कोरियातल्या गरीबांची छायाचित्रे काढण्यास सक्त मनाई आहे. बायबल जवळ बाळगणे हा सुद्धा तेथे गुन्हा आहे. पोर्न पाहणे, दक्षिण कोरियन चित्रपट पाहणे यांवर बंदी आहे. पर्यटकांना मोबाईल फोन, लॅपटॉप, कॅमेरा जवळ बाळगता येत नाही. या वस्तू एअरपोर्टवर उतरल्यावर तेथेच सोडून जावे लागते. त्या परततानाच ताब्यात मिळतात. नागरिकांना स्वतःची मोटार खरेदी करण्यासही बंदी आहे. या नियमांचे उल्लंघन केल्यास कारावासापासून फाशीपर्यंत कोणतीही शिक्षा होऊ शकते.
एकीकडे स्वतःची अशी कठोर, लहरी शासक म्हणून जाणीवपूर्वक प्रतिमा निर्माण करीत असतानाच दुसरीकडे उत्तर कोरियाचा देव अशी प्रतिमाही निर्माण करण्याचे किम जाँग-ऊनचे सातत्यपूर्ण प्रयत्न सुरूच आहेत. हे प्रयत्न त्याच्या आजोबापासूनचेच आहेत. त्यात नवीन काही नाही. चित्र, नाट्य, शिल्प, संगीत आदींबरोबरच किम ईल-यंग यांनी जगाची निर्मिती केली, अशी श्रद्धा उत्तर कोरियन जनतेत पसरवण्यात आली. पुढे किम जाँग-ईल यांच्याकडे सत्ता आली, तेव्हा हवामान नियंत्रित करण्याची क्षमता असलेला महापुरूष अशी त्यांची प्रतिमा ठसविण्यात आली. आता जगद्निर्माता आजोबा आणि हवामान-पुरूष बाप यांचा नातू व मुलगा असलेल्या किम जाँग-ऊन याने ही परंपरा पुढे चालविणे तसे क्रमप्राप्तच. त्यामुळे आपला जन्म दोन इंद्रधनुष्याच्या बरोबर मध्यावर झालेला असून त्या प्रसंगी आकाशात एका नवीन ताऱ्याचा जन्म झाल्याचेही किम सांगतो. आपल्या वडिलांप्रमाणे हवामान आपल्याही कह्यात असल्याची दर्पोक्ती तो करतो. एकूणच स्वतःला कोरियन जनतेचा देव म्हणून सिद्ध करण्यासाठी त्याची धडपड सातत्याने सुरू असते. ऱ्यांगगँग प्रांतातल्या एका मोठ्या डोंगरावर आकाशाच्या दिशेने त्याने १६०० फूट लांबीचा एक संदेश कोरला आहे, जो उपग्रहांच्या छायाचित्रांतही स्पष्ट दिसतो. जनरल किम जाँग-ऊन आचंद्रसूर्य चिरायू होवोत!’ अशा आशयाचा तो संदेश आहे.
त्याच्या स्वभावाच्या अनप्रेडिक्टेबिलीटीचा आणखी एक किस्सा सांगितला जातो. प्योंगयांगमध्ये एक मोठी अपार्टमेंट कोसळून मोठी जीवितहानी झाली. त्यावेळी किम अत्यंत दुःखी झाला आणि रात्रभर झोपला नाही, असे वृत्त बीबीसीने एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या हवाल्याने दिले. दुसरे म्हणजे नुकसानग्रस्तांना भरपाईची घोषणा करतानाच त्यांची क्षमायाचना करणारे अधिकृत शासकीय पत्रक किम याच्या वतीने जारी करण्यात आले, ही बाब सर्वांसाठीच मोठी आश्चर्यजनक व धक्कादायक होती. मात्र, ही दुर्घटना नेमकी काय होती, आणि त्यात नेमकी हानी काय झाली, हे खूप काळाने बाहेर आले. एक २३ मजली इमारत कोसळून त्यात शंभरहून अधिक लोक ठार झाले होते.
आज किम जाँग-ऊन ज्या अण्वस्त्र चाचण्यांमुळे चर्चेत आला आहे, त्या चाचण्या काही आजच्या नाहीत. त्याचे आजोबा किम ईल-संग यांच्या कारकीर्दीपासूनच त्याची सुरवात झालेली आहे. मौज अशी की, १९८५मध्ये अण्वस्त्रनिर्मिती करणार नाही, असे सांगत उत्तर कोरियाने आंतरराष्ट्रीय अण्वस्त्रबंदी करारावर स्वाक्षरी केली आणि तेथपासूनच त्यांच्या अण्वस्त्रनिर्मितीच्या कार्यक्रमाला खऱ्या अर्थाने सुरवात झाली. १९८६मध्ये योंगब्योन येथे संशोधन अणुभट्टी कार्यान्वित करण्यात आली. त्यानंतर १९९१मध्ये उत्तर व दक्षिण कोरिया हे दोन्ही देश संयुक्त राष्ट्रसंघात सामील झाले. १९९३मध्ये अण्वस्त्रबंदी कराराचा उत्तर कोरियाने भंग केल्याचा आरोप आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाने केला आणि आण्विक कचरा ठेवलेल्या ठिकाणांची पाहणी करण्यासाठी मागणी केली. त्यावेळी आयोगाला न जुमानता करारातून बाहेर पडण्याचीच धमकी उत्तर कोरियाने दिली.
दरम्यान, जुलै १९९४मध्ये किम ईल-संग यांचे निधन होऊन किम जाँग-ईल सत्तेत आले. त्यानंतर लगेचच ऑक्टोबर १९९४मध्ये आपला अण्वस्त्रनिर्मिती कार्यक्रम स्थगित करण्याबाबत उत्तर कोरियाने अमेरिकेशी समझोता केला. त्या मोबदल्यात अमेरिकेने उत्तर कोरियाला जड इंधन आणि दोन हलक्या-पाण्यावर आधारित अणुभट्ट्या दिल्या. दरम्यानच्या काळात फमाईन वादळ आणि पूर यांमुळे उत्तर कोरियात जवळजवळ तीस लाख नागरिक मृत्युमुखी पडले. त्याचवेळी दक्षिण कोरियासोबत तणावाचे प्रसंगही वाढत होते. १९९८मध्ये उत्तर कोरियाने आपल्या दीर्घ पल्ल्याच्या मल्टिस्टेज क्षेपणास्त्राची चाचणी घेतली. हे क्षेपणास्त्र जपानवरुन उडून पॅसिफिक सागरात कोसळले. उत्तर कोरियाच्या जगाला ज्ञात असलेल्या क्षमतेपेक्षा हा पल्ला कैक पटीने मोठा होता. त्यामुळे अमेरिकी अध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू. बुश यांनी विध्वंसक शस्त्रे तयार करणाऱ्या इराक, इराणच्या जोडीने उत्तर कोरियालाही सैतानी राष्ट्र (ॲक्सीस ऑफ एव्हील) म्हणून जाहीर केले.
सन २००२मध्ये अमेरिका, दक्षिण कोरिया आणि जपान यांनी उत्तर कोरिया गोपनीयरित्या युरेनियम आधारित अणु कार्यक्रम राबवित असल्याचा आरोप करून त्याला पुरविण्यात येणाऱ्या इंधनाच्या बोटी रोखून धरल्या. पण, त्यांच्या या दबावापुढे न झुकता त्याच वेळी योंगब्योन इथली अणुभट्टी नव्याने कार्यान्वित करीत असल्याची घोषणाच उत्तर कोरियाने केली. २००३मध्ये उत्तर कोरिया अण्वस्त्रबंदी करारातून बाहेर पडला, तसेच दक्षिण कोरियासोबतचा अण्वस्त्रमुक्त कोरियन टापूचा करारही बासनात गुंडाळला. त्याच वर्षी उत्तर कोरियाने प्लुटोनियम आधारित अणुबॉम्ब बनविले. सन २००५मध्ये प्रथमच आपण स्वसंरक्षणार्थ अण्वस्त्रे बनविली असल्याचे उत्तर कोरियाने जाहीररित्या मान्य केले. २००९मध्ये पुन्हा दीर्घ पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांबरोबरच अणुचाचणीही घेतली. यामुळे उत्तर कोरियाला संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेच्या रोषाला सामोरे जावे लागले, पण त्याला न जुमानता त्यांनी आपला अणुकार्यक्रम पुढे सुरूच ठेवला.
किम जोंग-ईल यांच्या निधनानंतर २०११मध्ये किम जाँग-ऊन यांनी कारभार हाती घेतल्यानंतर तर याला खूपच गती देण्यात आली. अमेरिका आणि जपानला लक्ष्य करून क्षेपणास्त्र विकासाचा कार्यक्रम राबविण्यात आला. सहा अणुचाचण्या, त्यात एक हायड्रोजन बॉम्ब चाचणी आणि अण्वस्त्रे वाहून नेऊ शकणारी दीर्घ पल्ल्याची गाईडेड क्षेपणास्त्रे इथपर्यंतचा प्रवास या किम घराण्यातील तीन नेतृत्वांखाली उत्तर कोरियाने आजतागायत केला आहे, तोही कोणत्याही देशाच्या कसल्याही बंदीला न जुमानता.
किम जाँग-ऊन याचा आजपर्यंतचा एकूण प्रवास, त्याचे वय आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्याचा लहरी, बेभरवशी स्वभाव यामुळे उत्तर कोरियाच्या या अण्वस्त्र कार्यक्रमाचा धोका जागतिक समुदायाला प्रकर्षाने भेडसावतो आहे. एकदा म्हणायचे, आम्ही केवळ स्वसंरक्षणार्थ अण्वस्त्रे तयार करतो आहोत; एकदा विचारायचे, टाकू का अणुबॉम्ब? तसेच, सातत्याने आंतरराष्ट्रीय सीमांचे उल्लंघन करून शेजारी राष्ट्रांवरुन त्यांच्या सागरी सीमांमध्ये आपल्या क्षेपणास्त्रांच्या चाचण्या घेणे आणि अमेरिकेसारख्या सर्वशक्तीमान महासत्तेला सातत्याने चिथावण्या देऊन डिवचणे अशा कुरापतींमुळे जागतिक विशेषतः आशियाई विभागातील शांतता कलुषित होते आहे. आज अण्वस्त्र कोणत्याही देशाने कोणावरही सोडले तरी, त्यात संपूर्ण जगाचाच विनाश अटळ आहे, याची सूज्ञ जाणीव प्रत्येक राष्ट्राने बाळगणे आवश्यक आहे. प्रश्न एवढाच आहे की, किम जाँग-ऊन नामक या लहरी हुकुमशहाला हे समजावणार कोण?

४ टिप्पण्या: