शुक्रवार, ५ जानेवारी, २०१८

अस्वस्थ भोवताल अन् बाळशास्त्रींचे स्मरण





मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी १८३२ रोजी वयाच्या अवघ्या एकोणीसाव्या वर्षी द मुंबई दर्पण (इंग्रजी नाव) किंवा दर्पण (मराठी नाव) या वृत्तपत्राची मुहूर्तमेढ रोवली. या गोष्टीला उद्या (६ जानेवारी २०१८) १८६ वर्षे होताहेत. हा दिवस पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. यंदाच्या पत्रकार दिनाला अस्वस्थतेची किनार लाभली आहे. 

सन २०१८च्या पहिल्याच दिवशी भीमा-कोरेगावचे निमित्त करून राज्यात सुरू झालेला गदारोळ आणि त्यानंतर गेल्या पाचेक दिवसांत उद्भवलेली परिस्थिती पाहता माध्यमे आणि माध्यमकर्मींवरील जबाबदारी ही पुन्हा नव्याने अधोरेखित झाली आहे. आज बाळशास्त्रींचे स्मरण करीत असताना केवळ त्यांनी पहिले मराठी वृत्तपत्र काढले इतकेच सांगितले जाते. पण, त्यापलिकडे बाळशास्त्रींचे जे कर्तृत्व, त्याची मात्र फारशी चर्चा होताना दिसत नाही. आजच्या माध्यमकर्मींवरील जबाबदारीची जाणीव करून देत असताना बाळशास्त्रींनी केवळ एक पत्रकार म्हणूनच नव्हे, तर एक व्यासंगी, सव्यसाची विचारवंत, अभ्यासक, गणितज्ज्ञ म्हणूनही आपल्या कार्याचा ठसा उमटविला. त्यांच्या चौफेर वावरातूनच पत्रकार-संपादक म्हणून त्यांचे एक सर्वंकष व्यक्तीमत्त्व निर्माण झाले. या त्यांच्या व्यक्तीमत्त्वाचा परिचय करून घेणे आजघडीला अत्यंत गरजेचे बनले आहे.

बाळशास्त्रींनी वृत्तपत्र सुरू केले, त्यामागे त्यांची विशिष्ट अशी विचारधारा होती. केवळ काहीतरी करावे म्हणून त्यांनी निश्चितच हा खटाटोप मांडलेला नव्हता. मोठ्या व्यासंगाची, तपश्चर्येची त्याला पार्श्वभूमी होती. तुम्ही म्हणाल, एकोणीसाव्या वर्षी कसला आलाय व्यासंग? हो, आजच्या परिस्थितीत आपला प्रश्न कदाचित लागू ठरेल, मात्र बाळशास्त्रींच्या बाबतीत मात्र आपला प्रश्न पूर्णतः गैरलागू आहे. याचे कारण म्हणजे आई सगुणाबाई आणि वैदिकशास्त्र पारंगत वडील गंगाधरशास्त्री यांच्या सान्निध्यात त्यांचे सुरवातीचे शिक्षण झाले. प्राचीन वाङ्मयाचे बाळकडू त्यांना घरातूनच मिळाल्याने तेराव्या वर्षी त्यांनी संस्कृत व मराठी भाषांवर प्रभुत्व मिळविले. मराठी लेखन-वाचन, व्यावहारिक गणित, तोंडी हिशोब, रामदास-तुकारामांची चरित्रे, वामन-मोरोपंतांच्या कविता, अमरकोश-पंचकाव्ये आदींत तर ते आठव्या वर्षीच पारंगत झाले. पुढे इंग्रजीच्या अध्ययनासाठी त्यांनी मुंबईच्या दि बॉम्बे नेटिव्ह स्कूल, बुक अँड स्कूल सोसायटीमध्ये प्रवेश घेतला. त्यातही त्यांनी नैपुण्य मिळविले. अवघ्या सतराव्या वर्षी त्यांनी नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या सेक्रेटरीपदासाठी अर्ज केला. त्यावेळी त्यांना संस्कृत, इंग्रजी, मराठी, उच्च गणित, भूगोल, गुजराथी, बंगाली, फारसी या विषयांत गती असल्याचे त्यांनी नमूद केले होते. त्यावेळी त्यांना डेप्युटी सेक्रेटरी म्हणून नियुक्ती मिळाली, पुढे सेक्रेटरी पदी त्यांना बढतीही मिळाली.

बाळशास्त्रींची विद्वत्ता पाहून ब्रिटीशांनी एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये त्यांची इंग्रजीच्या प्राध्यापक पदी नियुक्ती केली. सतरा इंग्रज प्राध्यापकांमधले एकमेव भारतीय आणि मराठी प्राध्यापक बाळशास्त्री होते. ज्येष्ठ नेते दादाभाई नौरोजी आणि गणिताचे प्रकांड पंडित केरूनाना छत्रे हे बाळशास्त्रींचे विद्यार्थी. पुढे सरकारने त्यांची दक्षिण विभागातील मराठी व कन्नड शाळा तपासणीसाठी मुख्य शाळा तपासनीस म्हणूनही नियुक्त केले. त्या अर्थाने ते पहिले मराठी शिक्षण अधिकारी ठरले. बोर्ड ऑफ एज्युकेशन स्थापन करून त्याद्वारे चांगले प्रशिक्षित अध्यापक तयार करावेत, ही बाळशास्त्रींनी मांडलेली कल्पना होती. पुढे त्यातूनच १८४५मध्ये अध्यापक वर्ग अर्थात डी.एड. व बी.एड. महाविद्यालय सुरू करण्यात आले. त्याचे पहिले संचालक म्हणूनही बाळशास्त्रींनी काम पाहिले. गावाकडून मुंबईत शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी वसतीगृहही सुरू केले.

बाळशास्त्रींनी दर्पणच्या रुपाने मराठीतील पहिले वृत्तपत्र सुरू केले. सुरवातीलाच मी म्हटल्याप्रमाणे त्यामागे त्यांची निश्चित अशी भूमिका होती. त्यावेळी ब्रिटीशांकडून वृत्तपत्रांवर कडक निर्बंध असले तरी ते सभ्य व प्रतिष्ठित भाषेत त्यांच्या धोरणांवर टीका करीत असत. विविध सामाजिक विषयांवर अत्यंत विचार प्रवर्तक व द्रष्टे संपादकीय विचार ते मांडत. अंध गुरूभक्ती, कर्मकांडे, उच्चनीचता, जातिभेद, धर्मातिरेक, स्त्रियांवरील अत्याचार व बंधने, विधवा विवाह, केशवपन अशा अनेक बाबींवर त्यांनी सडेतोड विचार मांडले. २६ जून १८४० रोजी द लास्ट फेअरवेल या अग्रलेखानिशी त्यांनी दर्पणचा अखेरचा अंक प्रकाशित केला. पण, इथे त्यांची पत्रकारिता मात्र थांबली नाही. मराठीतले पहिले मासिक दिग्दर्शन (दि. १ मे १८४०) याचे ते संस्थापक संपादक होते. त्या माध्यमातून त्यांनी आपली पत्रकारिता व लेखन पुढे सुरू ठेवले.
बॉम्बे नेटिव्ह लायब्ररी या मुंबईतल्या पहिल्या सार्वजनिक वाचनालयाचे संस्थापक (१८४५), नेटिव्ह इम्प्रूव्हमेंट सोसायटी या लोकसुधारणा व्यासपीठाचे संस्थापक संस्थापक, पहिल्या विद्यार्थी वसतिगृहाचे संस्थापक, कुलाबा वेधशाळेचे पहिले मराठी संचालक अशा अनेक जबाबदाऱ्या बाळशास्त्रींनी यशस्वीपणे सांभाळल्या. ज्ञानेश्वरीची पहिली छापील प्रत (शीळाप्रत) त्यांनी १८४६मध्ये प्रसिद्ध केली. त्यांच्या फ्रेंच भाषेतील प्राविण्याबद्दल फ्रान्सच्या बादशहाने त्यांचा गौरव केला. 

ज्योतिष व गणित विषयातही त्यांचा मोठा अधिकार होता. ‘Differential Calculus’ या विषयावर शून्यलब्धि हे पहिले मराठी पुस्तक बाळशास्त्रींनी लिहीले. त्याशिवाय त्यांनी नीतिकथा, सारसंग्रह, इंग्लंड देशाची बखर भाग आणि , भूगोल विद्या गणित, बालव्याकरण, भूलोकविद्येची मूलतत्त्वे (ही दोन्ही पुस्तके त्यांच्या पश्चात सुमारे पंचवीस वर्षे प्राथमिक शाळेतून पाठ्यपुस्तक म्हणून चालू होती), हिंदुस्थानचा इतिहास, हिंदुस्थानातील इंग्रजांच्या राज्याचा इतिहास, ज्ञानेश्वरी या मौलिक श्रेष्ठ भक्तिग्रंथाचे त्यांनी मराठीत प्रथम शिळा प्रेसवर प्रकाशन केले. बाळशास्त्रींनी या व्यतिरिक्त अनेक विषयांवर ग्रंथ लिहीले. अशा अफाट कर्तृत्वाच्या बाळशास्त्रींचे १७ मे १८४६ रोजी वयाच्या अवघ्या चौतिसाव्या वर्षी विषमज्वराने निधन झाले.

अवघ्या ३४ वर्षांच्या आयुष्यात एखादा मनुष्य किती उत्तुंग कामगिरी बजावू शकतो, याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे बाळशास्त्री होते. बाळशास्त्रींचे केवळ मराठी वृत्तपत्रसृष्टीलाच नव्हे, तर एकूणच भारतीय साहित्य, गणित, शिक्षण आदी क्षेत्रांना जे मौलिक योगदान लाभले, ते अतुलनीय आहे.
बाळशास्त्रींनी एकोणीसाव्या शतकाच्या पूर्वार्धात ज्या व्यासंगाची चुणूक दाखवून परकीयांवरही आपल्या व्यक्तीत्वाची आणि कर्तृत्वाची जी छाप पाडली, त्याच्या किती टक्के व्यासंग आज आपल्याला उपलब्ध असलेल्या साधनसंपत्तीच्या, माहिती तंत्रज्ञानाच्या युगात आपण प्रस्थापित करतो आहोत, याचा विचार करण्याची गरज आहे.

व्यासंगाच्या जोडीनेच ज्या सामाजिक जबाबदारीचे दिग्दर्शन बाळशास्त्रींनी त्यांच्या कार्यातून केले, ते सामाजिक भान पत्रकारांनी जपले पाहिजेच, पण मानवी मूल्यांचा जनतेमध्ये आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून कशा प्रकारे प्रसार करता येईल, याचाही विचार करण्याची गरज आहे. भारतीय घटनाकारांनी समता, स्वातंत्र्य व बंधुता ही सांविधानिक मूल्ये या देशाला प्रदान केली आहेत. ती केवळ संविधानाच्या प्रास्ताविकेची शोभा वाढविण्यासाठी निश्चितच नाहीत. या देशातल्या प्रत्येक नागरिकाने त्यांचा अंगिकार करावा, त्यानुसार अंमल करावा, ही अपेक्षा त्यात अध्याहृत आहे. प्रत्यक्षात मात्र सारे विपरित घडते आहे. जातीपातींच्या अस्मितांच्या निखाऱ्यांवर हळुवार फुंकर घातली, तरी त्यातून शेवटी विस्तव मोठाच होतो, अग्नी प्रदीप्त होतो, या मूलभूत जाणीवेपासून समाज बधीर कसा होईल, हे पाहिले जाते आहे. त्यासाठी जात्यंध शक्ती कार्यरत असतात. कारण धर्मातिरेक वाढत राहणे आणि जातीजातींमधील तेढ, दुरावा कायम राहणे, हे त्यांच्यासाठी दूरगामी हिताचे असते. त्यासाठी मग काही लोकांचे जीव गेले, डोकी फुटली, नागरिकांचे, देशाचे नुकसान झाले तरी त्यांची हरकत नसते. या देशाच्या एकतेला, अखंडतेला, एकात्मतेला नख लावण्याचे प्रयत्न अशा प्रवृत्ती सातत्याने करीत राहात असतात. आणि आपल्या देशाला स्वातंत्र्याच्या ७० वर्षांपेक्षा जातिभेदाची हजारो वर्षांची परंपरा आहेच. त्या जातीय उतरंडीचा आधार घेऊन तथाकथित वरच्याच्या मनात खालच्यांबद्दल शूद्रतेची भावना आणि खालच्याच्या मनात वरच्याबद्दल तिरस्काराची भावना आरामात पेरता येते. त्यासाठी समाजमाध्यमांच्या नवीन प्लॉफॉर्मचाही आधार घेऊन अधिक व्यापक प्रमाणावर भारतीय तरुणांची मने एकमेकांविरुद्ध कलुषित केली जाताहेत. या भोंगळ जातीय अस्मितांच्या विखारी विषपेरणीला हे तरुणही बळी पडत आहेत. त्यातून संपूर्ण भारतातच एकमेकांविरुद्ध संशय आणि अराजक माजतो आहे, माजविला जातो आहे. 

या देशातून जातीला हद्दपार करून समतेची प्रस्थापना करून भारत हा भगवान बुद्धाच्या मानवी मूल्यांच्या पायावर उभा करण्याचे भारतीय घटनाकारांचे स्वप्न होते. मात्र, त्याच घटनाकारांची जात काढून केवळ त्यांनी लिहीली म्हणून घटना नाकारणारे महाभागही या देशात आहेत, याला काय म्हणावे? जातीपुढे माणूस, त्याची विद्वत्ता, त्याचे ज्ञान यांना काहीच महत्त्व न देण्याची एक वेगळी प्रवृत्ती खतपाणी घालून जोपासली जाऊ लागली आहे. 

या साऱ्या अस्वस्थ भोवतालामध्ये सामाजिक पर्यावरण प्रदूषित होते आहे. हे प्रदूषण दूर करण्याची जबाबदारी जशी संसद, विधीमंडळ, स्थानिक स्वराज्य संस्था, न्यायपालिका यांच्यावर आहे, तशीच ती लोकशाहीचा चौथा स्तंभ असणाऱ्या पत्रकारितेची सुद्धा आहे, या क्षेत्रात वावरणाऱ्या प्रत्येक पत्रकाराची, संपादकाची आहे. या देशातल्या हजारो वर्षांपासून वंचित, शोषित, पिडित समाजघटकांना नैसर्गिक न्यायानुसार विकासाची संधी आपण प्रदान करणार आहोत की नाही? या देशाच्या विकासाच्या मुख्य प्रवाहात त्यांना सामावून घेणार की नाही? या देशाच्या प्रगतीमध्ये योगदान देण्याची संधी आणि त्याचा आनंद आपण त्यांना देणार आहोत की नाही? हे आजचे अत्यंत महत्त्वाचे कळीचे प्रश्न आहेत. 

त्या दृष्टीने प्रत्येक पत्रकाराने या देशाचे जबाबदार नागरिक म्हणून अत्यंत संवेदनशीलतेने त्यांच्या प्रश्नांकडे पाहण्याची गरज आहे. या देशात सामाजिक सौहार्द आणि सलोखा कायम राखण्याच्या दृष्टीने या सर्व समाजघटकांना एका समान पातळीवर आणण्यासाठी तशा प्रकारच्या संधी त्यांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आज निर्माण झाली आहे. बाळशास्त्रींचा वारसा सांगत असताना आजच्या पत्रकारांनी पत्रकारितेची मूलतत्त्वे, तिची सामाजिक बांधिलकी आणि सांविधानिक मूल्ये प्रकर्षाने जपण्यासाठी प्रतिबद्ध होण्याची गरज आहे.


(या लेखामधील बाळशास्त्रींच्या माहितीसाठी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर या यशवंत पाध्ये यांच्या पुस्तकाचा तसेच मित्रवर्य जयंत धुळप यांच्या लोकसत्तामधील लेखाचा संदर्भ म्हणून आधार घेतला आहे.)

४ टिप्पण्या: