सोमवार, २ एप्रिल, २०१८

दोष कुणाचा?

(लघु-कादंबरी: भाग-१)



(सन १९९५मध्ये 'दोष कुणाचा?' लिहीली. तेव्हा मित्रमंडळींमध्ये प्रायव्हेट सर्क्युलेशनमध्ये ती खूप वाचली गेली. एक हस्तलिखित तर अक्षरशः चोरीला गेले. मित्रांनी आपल्या पसंतीची मोहोर या कथेवर उमटविली. बंधु अनुप जत्राटकर यांच्या मनावरही तिची छाप उमटलेली. त्यामुळं  काही दिवसांपूर्वी त्यांनी फाइलीत बंदिस्त असलेली ही लघु-कादंबरी माझ्याकडून मागून घेतली. तिच्यावर आवश्यक ते संपादकीय संस्करण करून त्यांच्या www.anupjatratkar.com या वेबसाईटवर PEN या सदरांतर्गत आठ भगांत ती क्रमशः प्रकाशित केली. ती मी वेळोवेळी माझ्या फेसबुक वॉलवरही शेअर केली. मात्र, ती एकत्रित स्वरुपात प्रकाशित करावी, असा आग्रह वाचक मित्रांकडून झाल्याने माझ्या या प्लॅटफॉर्मवर आज ती पुनर्प्रकाशित करीत आहे. त्यामुळे वाचकांना सलग वाचनाचा आनंदही मिळेल, अशी आशा आहे. कथेचे हक्क माझ्याकडेच राखून ठेवले आहेत. - आलोक जत्राटकर )


प्रकरण एक
 मी नाशिकमधल्या का सुखवस्तू कुटुंबातील मुलगा. एकुलता एक!  वडिलांचं किराणा मालाचं दुकान.  अगदी जोरात चालत होतं.  त्यामुळे बारावीनंतर मी दुकानात बसावं अशी घरच्यांची प्रामाणिक इच्छा होती. पण मला पुढे शिकायचं होतं, त्यासाठी घरच्यांचा रोष ओढवला तरी चालेल, असं माझं मत होतं. बापानं स्पष्ट सांगितलं, 'पुढच्या शिक्षणाला माझ्याकडून एक पैचीही मदत मिळणार नाही.' मीही तडक घराबाहेर पडलो.  आईनमात्र स्वत: जवळचे काही पैसे माझ्या स्वाधीन केले आणि मला प्रोत्साहन दिले. मी मग एका इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानात नोकरी धरली व ती करत करत ग्रॅज्युशन पूर्ण केल.  त्यानंतर जेव्हा घरी गेलो तेव्हाही बाबा जूनही तोच हट्ट धरुन बसलेले. 'आता दुकान सांभाळ!' पण मला त्यात काही इंटरेस्ट नव्हता. तसं मी स्पष्टच सांगितलं.
            पूर्वी नोकरी करीत असताना जे काही थोडेफार पैसे साठवले होते, ते नोकरी शोधण्याच्या कामी मला उपयोगी पडणार होते. मी आधीच ठरवलं होतं की, आपल्या गावांत कितीही चांगली नोकरी मिळाली तरी करायची नाही. जरा आपल्या कक्षेतून दूर सरकून बाहेरच्या जगाचाही अनुभव घ्यायला हवा, असा विचार मनाशी पक्का करुन मी पुण्याचा रस्ता पकडला आणि तिथेच माझ्या आयुष्याला कलाटणी मिळाली.
          नोकरीसाठी फिरुन-फिरुन दमलो होतो.  पुण्यासारख्या शहरात नोकरी मिळणे अतिशय दुरापास्त गोष्ट होऊन बसली आहे. पण तरीही मला एका कारखान्यात सुपरवायझरची समाधानकारक नोकरी मिळाली. नोकरी तर मिळाली पण रहायच्या जागेचे काय? असा प्रश्न मला भेडसावू लागला. लॉजला पैसे संपण्यापूर्वीच नवीन जागा शोधणे भाग होते.  तेव्हा घर भाड्याने घेण्यासाठी ते शोधत मी फिरु लागलो. अखेर एके ठिकाणी विचारणा केली असता दोन महिन्यांपूर्वीच दोन खोल्यांचे घर त्यांनी भाड्याने दिले असल्याचे सांगितले. तसेच, भाडेकरू एकटा पुरुषच होता. मी घर मालकांना विनंती केल्यावर त्यांनी मला त्या 'महेश पाटील' नामक 'गृहस्था'ला जान भेटण्यास सांगितले. त्यांची हरकत नसेल तर मी त्यांच्या त्या घरात पार्टनरशीपमध्ये राहू शकणार होतो. त्यानुसार मी घर मालकाचे पत्र आणि पत्ता घेतला आणि भेटायला गेलो.  ता या मनुष्याचा स्वभाव कसा असेल, त्याला पटवायचा कसा, याबद्दल मी विचार करीत चाललो होतो. 'घर मालक तर चांगलाच होता, प्रश्नच नाही.  पण या भाडेकरुनं नकार दिला तर काय करायचे?' पण, 'गरजवंताला अक्कल नसते'. त्या घरासमोर पोहचलो. दारावर 'महेश पाटील, सिव्हील इंजिनिअर' अशी टेम्पररी पाटी लटकहोती.
            मी बेल वाजवली. थोडयाच वेळात दार उघडले गेले. आतला मनुष्य समोर आला. मी पहातच राहिलो.  हा एखादा मध्यवयीन मनुष्य (की म्हातारा?) असेल, असा जो माझा अंदाज होता, तो साफ चुकला.  समोर न पंचविशीतला तरुण होता. वर्ण निमगोरा, चेहरा आकर्षक आणि हसमुख होता. चेहऱ्यावर उगवलेल्या दाढीमुळे चंद्राला ग्रहण लागावे, तसा काहीसा तो दिसत होता.  बाकी शरीरयष्टी तशी किरकोळच होती.
'माझ्याकडे काही काम आहे का?’-तो
या त्यांच्या गोड आणि आपुलकीच्या आवाजाने मी भानावर आलो.  मग मी त्याला माझा परिचय दिला.  'मी लक्ष्मण सुर्यवंशी नुक्तीच एका फॅक्टरीत सुपरवायझरची नोकरी मिळाली.  पण रहायच्या जागेचा प्रॉब्लेम ! जर तुमची हरकत नसेल तर मी तुमच्यासोबत राहिलो तरी चालेल असे घर मालकांनी सांगितले आहे.  तुमच्या संमतीसाठी मी आलो आहे.  मालकांचे पत्रही आहे.'- मी 
असे म्हणत त्याला पत्र दाखवले तो पत्र घेवून वाचू लागला.
'प्लिज नाही म्हणू नका !' -मी कळकळीच्या स्वरात म्हणालो.
आता तु काय म्हणतो इकडे माझे लक्ष लागून राहिले होते. 
'माफ करा हं!...'-तो
 त्यांच्या तोंडचे उद्गार ऐकून मी पुरता निराश होवून परत फिरु लागलो.  पाठीमागून त्यांच्या खळखळून हसण्याचा आवाज आला.  आधीच माझा राग आनावर झाला होता.  घुश्श्यातच मोठयाने म्हणालो, 'दुसऱ्याच्या असहाय्यतेवर हसण्याला पुरुषार्थ म्हणत नसतात.
यावर पुन्हा मोठयाने हसत तो म्हणाला,
'अहो, परत फिरा.  मी 'माफ करा' असं म्हटलं ते तुम्हाला जाण्याबद्दल नव्हे तर घरात न बोलावल्याबद्दल म्हटलं होतं.  पण अर्धवट ऐकून चिडलात.  या, आत तरी या.
मला अतिशय शरमल्यासारखं झालं.  मग दोघांनी मिळून चहा घेतला.  त्यांच्यासोबत राहायचे ठरले.  त्यानेसुध्दा आपण एकटे फार बोअर होत असल्याचे सांगितले.  मग आम्ळी दोघांनी एक मजेशीर करार केला.  दोघांनी निम्मेनिम्मे भाडे देण्याचे ठरले.  एक दिवस त्याने व एक दिवस मी असा स्वयंपाक करण्याचे ठरले कारण दररोज बाहेरचे जेवण परवडण्यासारखे नव्हते.  रविारी मात्र दोघेही सुट्टीवर असल्याने त्या दिवशी बाहेर जेवायचे ठरले.  हा रविवारचा खर्चही अल्टरनेटली करायचे ठरले.  अशा तऱ्हेने करारावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर मगच दुसऱ्या दिवशी मी लॉजवरचे माझे सामान घेऊन त्यांच्याकडे आलो.
            आता त्याचा माझा इतका परिचय झाल की समवयस्क असे आम्ही एकमेकांना 'महया' आणि 'लक्ष्या' म्हणूनच बोलावत होतो.  मी त्याला माझी एकूण परिस्थिती तसेच घरचे वातावरण या संबंधी माहिती सांगितली.  त्यावर तो आश्चर्यचकित होऊन माझ्याकडे पहातच राहिला. गप्पातून त्याच्याबद्दल मला असे समजले की, त्याचे वडिल कोल्हापूरला असतात.  आई मात्र त्याला जन्म देत असतानाच बाळंतपणात वारली होती.  तोसुध्दा एकुलता एकच होता.  सरकारी कामावर नेमणूक झाल्याने हा इथे आला होता.  इथेच सेटल होण्याचा त्याचा विचार होता.  लग्नाच्या बाबतीत मात्र तो नेहमीच उदासीन असे.  कदाचित, ब्रह्मचारीच राहण्याची त्याची इच्छा होती.  'खरंच तसं होतं की कायमला माहित नव्हतं.  कारण बहुतेकजण लग्न ठरेपर्यंतच आपल्या ब्रम्हचर्याचं कौतुक जगाला सांगत असतात.असो.  आणखी एक असं की, त्याची एक मानलेली बहिण होती.  लग्नानंतरसुध्दा ती नवऱ्यासोबत वडीलांकडे राहत होती.  कारण एक तर वडिलांची देखभाल ठेवणारं जवळचं असं कोणी नव्हतं.  आणि  दुसरं  म्हणजे  तिचे  मिस्टर  तिथल्याच स्टेट बैंकेत मॅनेजर होते.  तिच्यावर महेशचे अतिशय प्रेम होते.  तिचा एकही शब्द तो खाली पडू देत नसे, कारण आईमाघारी तिनेच त्याला सांभाळून मोठे केले होते.  पण गेल्या तीन चार वर्षात तो तिला भेटलासुध्दा नव्हता.  तिने लग्नाचा विषय काढला तर?
          एकदा मी कामावरुन घरी आलो तर बाहेरुन खिडकीतून, महेश एका सुंदर तरुणीशी बोलत बसल्याचे दिसले.  महेश, आणि मुलगीहे समीकरण काही माझ्या ध्यानात येईना पण जिज्ञासा मला शांत बसू देईना.  मी दाराशीच लपून उभा राहिलो व त्यांचं बोलणं ऐकू लागलो.  खरं तर ही एक बेकार सवय होती पण हे काय गौडबंगाल आहे ते मला समजून घ्यायचं होतं.
महेश म्हणत होता,
'अगं अशी अचानक भेटशील असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं.'
'मलाही नाही.  पण काय रे, मी इथे शिकतेय हेही तुला माहित नव्हतं का? मी तुझ्या घरी किती तरी पत्र पाठविली होती.  पण एकाचंही उत्तर देशील तर शपथ?’- ती
'अगं पण मी मिरजेमध्ये होतो.  तेव्हापासून मी फारच थोडया वेळा घरी गोलो होतो.  त्यात तुझा पत्ताही ठाऊक नव्हता?'
'आता तर आपली भेट झाली ना आता आपण दूर नाही व्हायचं.'
'म्हणजे?'-महयाच्या तोंडून आश्चर्यवाचक प्रश्न.
'महेश, तू काही म्हणेनास का मला? पण आज जे माझ्या मनात आहे ते मी तुला सांगणार आहे.  महेश, आय लव्ह यू ! आणि मला केवळ तुझ्याशीच लग्न करायचंय. मी माझ्या आईलाही सर्व सांगितलंय.  आता फक्त तू हो म्हण.'
तिचे हे उद्गार ऐकून महेश चाट् पडला असेल पण मला मात्र धक्का बसला.  प्रथमच आयुष्यात इतकी धाडसी मुलगी पहात होतो.  आता हे ब्रम्हचारी काय बोलतात इकडे मी कान देऊन ऐकू लागलो.
महेश बोल लागला,
'प्रीती, तू मनात काहीही न ठेवता मला बोललीस.  मला त्याचा राग नाही आला.  पण एक सांगतो प्रीती.  माझ्या आयुष्यात असे काही प्रसंग घडले आहेत, की मी सर्व भावभावनांपलिकडे गेलो आहे.  त्यामुळे तू प्लीज माझ्यासाठी थांबू नको.  लग्न करुन तू तुझा संसार आनंदाने थाट.  माझ्या शुभेच्छा तुझ्यापाठी आहेतच.  आपले संबंध हे चांगले मैत्रीचेच रहावेत, अशी माझी इच्छा आहे.  तेव्हा तू विचार कर !'
 आता मला दुसरा धक्का बसला.  एखादी मुलगी स्वत:हून लग्नाचं प्रपोजल मांडत असताना ते नाकारणारा मनुष्य किती मुर्ख त्याच्याजागी मी असतो तर तिने विचारायची वाटच पाहिली नसती.  पण आता माझी एंट्री घ्यायची वेळ झाली होती, म्हणून मी परत लांब गेलो.
'..... मी नीट विचार केलाय.  तुझ्याशिवाय मी इतर कुणाबरोबरही सुखी राहू शकणार नाही.  मी तुझी वाट पाहीन !...'
प्रीती बोलत असतानाच मी दारात गेलो. मला पाहून ती एकदम बोलायची थांबली. महेशने तिच्याशी माझा परिचय करुन दिला. 
मी सध्या माझ्या पार्टनरबद्दल सांगितले ना, तो हाच तो लक्ष्मण ! आणि लक्ष्या ही प्रीती देशमुख!  कोल्हापूरमध्ये आमच्या अपार्टमेंटमध्ये रहात होती.  आता आईबरोबर इथे पुण्यात राहते.
महेश असा काही बोलत होता की इथे यापूर्वी घडलेला प्रकार मला माहितच नव्हता.  मी ही मग तसे न जाणवू देता तिला 'नमस्कारम्हटले आणि आत निघून आलो.  तीसुध्दा मग लगेच 'बाय' म्हणून महेशचा निरोप घेऊन निघून गेली.  जाताना मात्र मला उगीचच तिच्या डोळयात अश्रू तरळयाचा भास झाला.
            महेशचे अंतरंग जाणून घेण्याच्या हेतून मुदाम त्याला डिवचून म्हणालो,
'काय ब्रम्हचारी महाशय, लग्नाचा विचार तर नाही ना?'
यावर तो नेहमीप्रमाणे खळखळून हसेल असे वाटून त्याच्याकडे पाहिले तर त्याच्या चेहऱ्यावरचे भाव पटापट बदलले.  नेहमीच्या हास्याची जागा कधीही न दिसणाऱ्या रागाने घेतली होती.  डोळयात किंचित दु:खाची झलक होती.  तो मोठयाने म्हणाला,
'लक्ष्या, पुन्हा लग्नाचा विषय काढून छेडलेस तर तुझी खैर नाही.  ती फक्त माझी मैत्रीण होती.  भेटली म्हणून घरी आणले.  बस्स!  यापलीकडे तिचा माझा काही संबंध नाही.
एवढे बोलून तो पटकन् फिरुन बाहेर गेला.  मला मात्र कसेसेच वाटले.  सगळं माहित असूनही कुळून त्याला चिडवायची दुर्बुध्दी झाली असं मला वाटू लागलं होतं.  मनात खळखळ माजली. आपण  भलतच बोलून गेलो हे कळत होतं पण आता इलाज नव्हता ! कळत न कळत का असेना माझ्याकडून त्याच्या पूर्व-आयुष्यातली एखादी दुखरी जखम डिवचली गेली होती, हेच खरं होतं !

प्रकरण दोन:
 
रक्षाबंधनाचा दिवस. मला माझ्या चुलत बहिणीकडून राख्या आल्या असल्यामुळं मी तसा आनंदातच होतो.  पण महेश मात्र अत्यंत उदास होता.  बहिणीच्या आठवणीने तो व्याकुळ झाला होता.  मला त्याची ती उदासिनता पाहवत नव्हती.  स्वयंपाकाची पाळी आज माझी असल्यानं मी तयारी करत होतो.  बाहेरुन बेलचा आवाज आला.  महेशनं नाईलाजानंच दार उघडलं.  आणि जवळ जवळ ओरडलाच, 'ताई, तू इकडे कशी काय?' 
त्याच्या त्या आनंदाच्या ओरडण्याने मी बाहेर आलो.  पाहतो तर दारात साधारण पस्तिशीची स्त्री उभी होती.  अन् तिच्या गळयात पडून लहान बाळासारखा महेश रडत होता.  ती त्याच्या पाठीवरुन हात फिरवित होती.  शेवटी त्याला शांत करुन ती त्याच्यासोबत आत आली.  महेशचा आनंद चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता.  ताई त्याला म्हणाल्या,
'मयू, काय रे ही काय दशा करुन घेतलीसआणि असा लहानासारखा रडू नकोस.  जा तोंड धुवून ये बघू.तो गेला, तोवर मी ताईंना माझा परिचय दिला.  महेश तोंड पुसत बाहेर आला.  त्याने भावोजी व भाच्यांची चौकशी केली.  मी तोवर आतमध्ये निरांजन वगैरे घेवून ओवाळण्याची तयारी केली.  ताईंनी माझी खूपच स्तुती केली. 
            आम्हा दोघांनाही ताईंनी ओवाळले.  राख्या बांधल्या, मला आनंद झालाच पण महेशच्या चेहऱ्यावर आज वेगळंच समाधान दिसत होतं.  जणू गेल्या पाच वर्षात तो या समाधानापासून दूर होता.
ताई महेशला म्हणाल्या,
'गाढवा, इतक्या वर्षात नुसती पत्रेच पाठवलीस भेटायल म्हणून कधी आला नाहीस.  शेवटी पप्पांनी मला, इकडे यायला सांगितले.  केलं की नाही सरप्राइज? जा पहिल्यांदा बाजारातून काही तरी गोड घेवून ये आणि तुमच्या स्वयंपाकाच कायजेवलात की नाही आजून?' 
महेश माझ्याकडे पाहून म्हणाला,
'आज साहेब जेवण करणार आहेत.  ते जेव्हा वाढतील तेव्हाच आमचे जेवण!
यावर ताईने स्वत:च स्वयंपाक करण्याचा निर्णय घेतला.  त्या स्वयंपाक खोलीत आल्या.  महेश काहीतरी आणायला म्हणून गेला. 
मी ताईंना स्वयंपाकखोलीत मदत करु लागलो.  आमची श्रम विभागणी ऐकून त्यांना कौतुक वाटले.  ताईंनी मला त्यांची कथा सांगितली की, त्या पाच वर्षाचे असताना महेशच्या आई-वडीलांनी त्यांना अनाथालयातून दत्तक घेतले होते.  त्यानंतर पाच वर्षांनी महेशचा जन्म झाला.  पण त्याची आई वारली.  पण वडिलांची ताईवरची माया थोडीही कमी झाली नव्हती.  त्यांनी खंबीरपणे दोघांचा सांभाळ केला.  महेशलाही ताईशिवाय क्षणभरही करमत नसे. मी ताईंना महेशचा लग्न न करण्याच्या निर्णयाबद्दल सांगितले तेव्हा ताई म्हणाल्या,
'अरे रक्षाबंधनाच्या निमित्ताने जरी आले असले तरी मी त्याच कामगिरीवर आले आहे.  बरं, ती प्रीती देशमुख मुलगी इथे आली होती का?'
'होय, एकदा आली होती.  त्यानंतर काही आलेली नाही.
तिची ढीगभर पत्र घरी आली आहेत.  तिला हा बाहेर शिकत असल्याचं माहितच नव्हतं.  ती तशी खुपच चांगली मुलगी आहे.  आमच्या शेजारीच रहायची, तिच्या आईसोबत, वडील नाहीत बिचारीचे.  पण मयू तिच्याबद्दल कधी बोलतो का रे?’ ताईने विचारले.
'तिच्याच काय पण इतर कोणत्याही मुलीबद्दल तो काही बोलत नाही.मी काही बोललो तर माझ्यावरच चिडतो.  तुम्हीच त्याची गाडी जरा रुळावर आणा.इतक्यात बेल वाजली आणि तो विषय तिथेच संपला.
          फारच दिवसांनी इतके चवदार जेवण जेवून आम्ही सर्वजण समाधानाने बाहेर आलो.  अगदी नकळतपणे महेशने ताईच्या हेतूसाठी वाट करुन दिली. तो म्हणाला,
'ताई मघाशी गडबडीत ओवाळून घेतले, ओवाळणी म्हणून तुला काय हवं ते माग.
यावर ताई म्हणाल्या,
'मयू, आता दिलेला शब्द फिरवायचा नाही.  मला ओवाळणी म्हणून तू प्रीतीला माझी भावजय म्हणून घरात आण.  ती खरोखरच चांगली मुलगी आहे.  न आवडण्यासारखं असं तिच्यात काही नाही.  पण तुझी जर काही वेगळी पसंद असेल तर न संकोचता सांग कारण, शेवटी तुलाच तिच्याबरोबर आयुष्य काढायचे आहे.
'अगदी बरोबर ताई, अहो याचा असा हा ब्रम्हचर्याचा पण! त्यामुळे ब्रम्हचर्याचा मित्र म्हणून मुली माझ्याकडेही पहात नाहीत.'
मी व ताईंनी अपेक्षेने महेशकडे पाहिले.  त्याच्या चेहऱ्यावर त्या दिवशीचेच भाव उमटले होते.  पण त्यात क्रोधापेक्षाही अधिकतर दु:खाचेच भाव होते.  कोणीतरी खपली पडलेली जखम नखाने रक्ताळावी तशा व्याकुळ वेदना त्याच्या डोळयात तरळल्या.  तसले भाव महेशच्या चेहऱ्यावर पहायची सवय नसल्याने ते सहन न होऊन माझी नजर खाली वळली आणि मटकन् खुर्चीत बसलो.  ताईसुध्दा महेशच्या चेहऱ्यावरचे विषण्ण भाव निरखीत होत्या.  त्यांनाही हे पूर्णपणे अनपेक्षित होते.  तरीही मोठया धीराने त्या पुढे झाल्या.  त्याच्या खांद्यावर हात ठेवला.  त्या हातांनीच त्याला लहानपणापासून आधार दिला होता, सावरले होते.  त्यांच्यातील विश्वास त्याला दिलासा देत होता.  त्या उद्गारल्या,
'मयू, तुझ्या चेहऱ्यावर जे दु:ख उमटलेलं आहे, ते तुझ्या दृष्टीने अतिशय भयंकर असेच असावे.  अन्यथा माझा छकुला इतका दुबळा केव्हापासून झाला की साध्या दु:खाने खचून जावा.  माझ्या हातची माया इतकी असहाय्य नव्हती. तुला माझ्या ममतेची शपथ आहे.  आज तुला मन मोकळे केलेच पाहिजे.  त्यामुळे तुझ्या मनालाही स्वस्थता वाटेल.'
त्या आश्वासक शब्दांनी महेशला धीर आला,
'ताई, ज्या गोष्टीची भीती होती.  ज्या भीतीपोटी मी तुला भेटलो नाही.  तीच आज तू माझ्यासमोर मूर्तीमंत साकार केलीस.  प्रीतीबदल बोलायचं तर ती खरोखर एक गुणी आणि कोणालाही आकर्षित करणाऱ्यां व्यक्तिमत्त्वाची मुलगी आहे.  पण मला वेगळीच भीती जाणवते आहे.  पण आज मी तुझ्यापासून काही लपवणार नाही, सर्व काही सांगणार आहे.  मग भले तू मला काही म्हणावेस लहानपणापासून तूच एक अशी आहेस की जिने नेहमी मला समजून घेतले.  बाबा नोकरीत सतत बाहेर असायचे.  त्यांच्याहीपेक्षा मला तुझाच जास्त लळा लागला.  एक आईदेखील आपल्या मुलासाठी यापेक्षा अधिक काही करत असेल असं मला वाटत नाही. ताई, तुला आठवतं, कोल्हापूरात आपल्या अपार्टमेंट समोरच्या 'वनविहार' अपार्टमेंटमध्ये आठवले रहात होते.'
'हो, तू बारावीला असताना त्यांची बदली गुजराथला झाली.  त्यांची अनुराधा आणि तू एकत्र खेळायचास लहानपणापासून.  मीही लहानपणी तुम्हाला कधीकधी नवरा-बायको म्हणून चिडवायची.  अस्सा कांही चिडायचास की बस्स मग माझी हसता हसता पुरेवाट व्हायची.'
'बरोबर ताई, अनुराधा माझी एक जीवलग मैत्रीण होती.  तिचा स्वभावही खूपच मोकळा होता.  खूपच गोड मुलगी होती ती.  ती वारंवार आजारी असायची, का ते मला माहित नव्हतं! मी मग तिला तिच्या अभ्यासात मदत करायचो.  ताई तिने अकरावीत माझ्यावर प्रेम असल्याचं सांगितलं होतं.  पहा माझं ते वय नव्हतं की मी लगेच होकार द्यावा.  मी तुला काहीच बोललो नाही.  पण फार विचार करुन मी त्यांच्या घरी गेलो आणि तिच्या आईला सर्वकाही सांगितलं.  तिच्या आईला काहीसा धक्का नसल्याचं मला जाणवलं.  पण त्यांनी मला जे काही सांगितलं त्यावर माझा विश्वास बसेना.  पायाखालची जमीन सरकल्याचा भास झाला.  त्या मला काकुळतीने म्हणाल्या,
'महेश, आजवर आम्ही आमच्या मुलीची काळजी करत होतो.  तिला सुखी ठेवण्यसाठी आम्ही खूप कष्ट घेतलेत.  आजपासून तूही त्यात सहभागी हो.  अनूचे हदय प्रमाणापेक्षा कमकुवत आहे.  याहून पुढे जाऊन सांगायचं म्हणजे डॉक्टरनी तिची जास्तीत जास्त दोन वर्षे गॅरंटी दिली आहे.  आम्ही प्रयत्नांची शर्थ करतोस, पण व्यर्थ ! तूही तिला धक्का लागेल असे काही वर्तन करु नको.  तिला सतत खूश ठेवण्याचा प्रयत्न कर.  आम्ही तिला किंवा तुला काही बोलणार नाही.  मी तिच्या पप्पांनाही हे सांगेन.  तू इथपर्यंत मला सांगायला आलास यातच मला तुझ्याबद्दल खात्री झाली आहे.  पण प्लीज अनूला याची जरासुध्दा कल्पना देऊ नकोस.  एवढं माझ्यासाठी कर.'
अनूसाठी मग मी काय वाटेल ते करण्याची तयारी ठेवली.  तिच्या मनाला दुखावेल असे काहीही न करण्याचे ठरवले.  बारावीच्या अभ्यासाला मग दोघांनी मिळूनच सुरवात केली.  तेव्हाच तिच्या वडिलांची गुजराथला बदली झाल्याचे कळले.  माझ्यापासून दूर जाताना ती फार दु:खी झाली.  माझ्यासाठी मनाला सारखी रुखरुख लागून राहिली.  ही तिच्याबद्दलची सहानुभूती होती की प्रेम हे माझं मलाच समजत नव्हतं.'
खोलीत काही काळ शांतता पसरली.  त्या शांततेचा भंग करीत ताईच म्हणाल्या,
'अरेरे ! पण तू एवढयाच कारणासाठी इतका दु:खी झालायस.  नुसता पत्ता दे.  मी आणि तुझे भावोजी लवकरच गुजराथला संपर्क साधू.'
यावर एक दीर्घ उसासा टाकून महेशने बोलायला सुरुवात केली,
'ताई, हेच एक कारण असतं तर मलाही तुझ्यापेक्षा जास्त आनंद झाला असता, पण गुजराथला गेल्यावर, हवा बदलल्यामुळे अनू दोन तीन महिन्यातच आजारी पडली आणि आई वडिलांच्या प्रयत्नांना काहीही दाद न देता ती निघून गेली... मला एकटा सोडून ! माझ्या बारावीच्या अभ्यासावर परिणाम होऊ नये म्हणून तिच्या आईंनी मला काहीच कळविले नव्हते.  पण परीक्षा संपताच मला त्यांनी पत्राने तसे कळवले.  मला काय करावे कळेना.  काही सुचेनासे झाले.  आयुष्यात प्रथमच मी दीर्घ खचलो.  एक मोठी पोकळी निर्माण झाल्याचा भास झाला, कधीही न भरुन निघणारी पोकळी तेव्हा प्रेम म्हणजे काय असावे याचा मला अंदाज आला.  एखादी व्यक्ती समोर नसतानाही तिला आपले सर्वस्व मानून तिच्यासाठी त्याग करण्याचा नि:स्वार्थी विचार म्हणजेच प्रेम हे मला जाणवले.  पण ताई, तेव्हापासून का कोणास ठाऊकतेव्हा पासून एक अपराधीपणाची भावना मनात घर करुन राहिली.  अनूचा मृत्यु माझ्यामुळेच झाला असे मला वाटू लागले.  जर मी तिच्याजवळ असतो तर ती मला सोडून जाऊच शकली नसती, नव्हे मी जाऊच दिले नसते. अनूला भेटण्यासाठी आता एकच पर्याय होता.  तो म्हणजे आत्महत्या....

प्रकरण तीन:
“...अनूला भेटण्यासाठी आता एकच पर्याय होता.  तो म्हणजे - आत्महत्या आणि त्यासाठी मी एका दिवशी रंकाळयावरही गेलो.  ताई, जग काय वाटेल ते बोलते याचा प्रत्यय मला त्या दिवशी आला.  'भ्याड लोक आत्महत्या करतात' हे सर्वसामान्यांत प्रचलित वाक्य साफ खोटं, चुकीचं असल्याचं मला दिसलं.  आत्महत्या करण्यासाठी प्रबळ साहस, कमालीचा निर्धार, मनाचा खंभीरपणा आणि जगातील सर्व पाश सोडण्याची तीव्र इच्छाशक्ती असावी लागते.  पण या शेवटच्या एकाच गोष्टीत मी अयशस्वी ठरलो.  ताई, त्यावेळी माझ्या मनात फक्त तुझा विचार आला, फक्त तुझा.  'ज्या ताईने आपल्यासाठी इतके काही केले, तिला आपल्या मृत्युमुळे काय वाटेल, तिची काय अवस्था होईल?'  या आणि या एकाच विचाराने मला परत फिरण्यास भाग पाडले.  नंतर ताई, तुझ्या प्रोत्साहनाने मी मिरजेला गेलो.  तिथे मात्र केवळ अभ्यास करायचं ठरवलं.  तुझं आणि पप्पाचं स्वप्न मला पूर्ण करायचं होतं.  इंजिनिअर होऊन !  दु:ख विसरण्यासाठी मी स्वत:ला अभ्यासात दडवून घेतलं.  मित्रही फारसे जोडले नाहीत.  नाही म्हणायला रुम पार्टनरशीच जास्त मैत्री होती.  त्याला एकदा माझ्या पाकिटातला अनुचा फोटो दाखवला होता.  बाकी काहीच बोललो नव्हतो. 
            एक दिवस मी अभ्यास करत असतानाच पार्टनर धावत पळत खोलीत शिरला.  तो फारच धापत होता.  मी त्याला पाणी दिले आणि जरा शांत व्हायला सांगितले.  तो अतिशय उत्तेजित झाला होता.  म्हणाला, 'शहाण्या, तुझी फोटोतली सुंदरी, तिथे कैंटीनमध्ये मजा करत्येय आणि तू इकडे अभ्यास? वा, वा...!! कशी जमायची जोडी?'
            मला त्याचा फारच राग आला, म्हणालो, 'दीपक, पुन्हा असली फालतू चेष्टा करायच्या भानगडीत पडू नको.  मला खपणार नाही.यावर तो म्हणाला, 'वा रे  वा ! तुमची स्वप्नसंदुरी आम्ही पाहिल्याचा एवढा राग?' मग मी शांतपणे त्याला विचारंल, 'खरंच पाहिलंस तिला? कशी दिसते?' पार्टनर हसत म्हणाला, 'अगदी फोटोतल्यासारखी!कधीही चेष्टा न करणारा पार्टनर असं म्हणतोय.  त्यात तथ्य असणारच की काहीतरी.  त्याबरोबर मी झटकन उठून कपडे चढविले आणि पार्टनरबरोबर कॅन्टीनमध्ये गेलो.  तिथे एका टेबलापाशी पाच मुलींचा ग्रुप बसला होता.  त्यांच्यात अनू बसली होती.  तिच्यासमोरचेच एक टेबल पकडून मी बसलो.  अनु आणि इथं? अस मला प्रश्न पडला.  पण माझे डोळे कधी धोका खाणारे नव्हते.  ती हास्यविनोदात रंगली होती.  पण तिच्यात काहीतरी फरक वाटत होता.  हो, तिने तिची हेअर स्टाईल बदलली होती.  पूर्वीचे लांबसडक केस कापून रबरबँड लावून पाठीवर मोकळेच सोडले होते.  तसेच, ती बरीचशी बारीक झाली होती.  रंगही किंचित फिका पडला होता.  महत्वाचं म्हणजे डॉक्टरचा पांढरा कोट आणि स्टेथॅस्कोप, या दोन वस्तू तिच्या जवळ होत्या.  म्हणजे अनू मेडिकल ट्रेनिंग घेत होती.  तर, पण मग तिच्या आईने मला खोटं पत्र का घालावंया मागचा त्यांचा हेतू काय त्या दिवशी किती काकुळतीने त्यांनी मला अनूच्या खुशीसाठी राजी केले होते.  मला काहीचं समजेना वाटलं उटून सरळ जावं नि तिलाच विचारावं, पण मैत्रिणींसमोर योग्य वाटलं नसतं अनूनेही किती प्रेम केलं माझ्यावर, किती काळजी घेत होतो मी तिची.  सर्व सर्व काही आठवलं.  मी तिला आठवत होतो की नव्हतो हे कळायला मार्ग नव्हता.
            मी विचार करत असतानाच त्यांचा ग्रुप तिथून उठला.  एक मुलगी काऊंटरवर बील भरत असताना अनूने एखाद्या तिऱ्हाईताकडे पाहतात तसेच माझ्याकडे पाहिले आणि मैत्रिणींबरोबर निघून गेली.  मला अतिशय संताप आला.  मात्र त्या दिवसापासून माझी अस्वस्थता वाढली होती.
            दीपकने धावाधाव करुन तिच्याबद्दलची सर्व माहिती मला प्राप्त करुन दिली.  एक म्हणजे, ती अनू नव्हतीच.  पुन्हा माझ्या मनात अपराधीत्वाची भावना वाढली.  तिच्यासंबंधी व आईसंबंधी मी नको तो विचार केला होता.  काय अधिकार होता मला दोघींनीही किती नि:स्वार्थपणे मला आपला मानला होता.  छे छे  !!
            अनूसारखी दिसणारी ती मुलगी होती, दिव्या अगरवाल.  तिचे वडिल इथल्या हॉटेल व्यवसायाचे प्रमुख सूत्रधार मानले जात होते.  मेडिकलच्या फर्स्ट इयरला ती होती. मी मात्र तिच्यात अनूला शोधण्याचा प्रयत्न करीत होतो.  मी तिचा पत्ता प्राप्त केला आणि धाडस करुन एक निवावी पत्र तिला पाठवले.  त्यात माझ्या प्रेमाचा स्पष्ट उल्लेख केला.  तसेच तिला केस वाढवून त्यांची वेणी घालण्याची विनंती केली.  अनूला दिव्याच्या रुपात प्राप्त करण्याच्या खटपटीला इथूनच सुरुवात झाली.  पण योग्य परिणाम साधला गेला.  चार महिन्यातच दिव्याचे केस मानेपासून पाठीपर्यंत वाढले आणि ती वेणी घालू लागली.  जणू माझी अनूच जशी नंतर धाडसाने माझे नांव, पत्ता घालून एक पत्र पाठवले.  काही दिवसांत तिला मीच पत्रलेखक असल्याचे समजले कारण जेव्हा मी तिच्यासमोरुन जात असे तेव्हा ती माझ्याकडे पहात असे.  पण तरीही तिने काहीच प्रतिसाद दिला नाही.  मी वारंवार तिला पत्रे पाठविली आणि माझ्या प्रेमाचा पुनरुच्चार केला.  परिणाम मात्र उलटाच दिसून आला.  ती तेव्हापासून मला पाहिले की बिथरल्याप्रमाणे वागू लागली.  माझ्या सावलीलाही घाबरु लागली.  वास्तविक मी तिला कधीही धमकावयाचा किंवा भिती दाखवण्याचा प्रयत्न केला नव्हता.  पण मला ती हवी होती.  अनूचे प्रायश्चित मला करायचे होते.  त्यासाठी मी दिव्याचा हव्यास धरला होता.  अजून मी तिच्याशी एकदाही बोललो नव्हतो.  संधीच मिळत नव्हती.
            कदाचित तिला क्लासमधली मुले छेडत असावीत.  पण यामागे माझा हात असल्याचा तिला संशय आला म्हणून तिने एका विश्वासू माणसाला मला धमकी देण्यास पाठवले.  मला त्याचा स्वभाव अजिबात आवडला नाही.  त्यामुळे मी त्याला स्पष्ट बोललो, तिची इच्छा नसेल तर मी माघार घेतो पण आजपर्यंत मी तिला एकदाही त्रास दिलेला नाही.'
एखादा मनुष्य आपल्या प्रिय व्यक्तीला त्रास होण्यासारखे कधीतरी वागेल का प्रेम तर एकमेकांची सुखदु:खे वाटून घेण्यासाठी असते.  त्याला स्वार्थाचा लवलेशही नसतो. 
            ताई जेव्हा अनू गुजराथला गेली होती.  तेव्हा मी तिच्यासाठी काही कविता केल्या होत्या.  ती आल्यावर ऐकवण्यासाठी ! पण दुर्दैवाने ती आता कधीच येणार नव्हती.  माझ्या तिच्याबद्दलच्या सर्व फिलिंग्ज या कवितांत मी व्यक्त केल्या होत्या.  या कविता मी दिव्याला देण्याचे ठरवले.  आणि तिच्या एका मैत्रिणीमार्फत तिच्यापर्यंत पोचवल्या. त्या मैत्रिणीकडून दिल्याने मला भेटायला येण्यासाठी निरोप पाठवला.  'काय बोलेल? कशी वागेल? विचारांचे मनान काहूर माजले.  त्याच अवस्थेत तिला भेटायला गेलो.  मला पाहून म्हणाली, 'तुमच्याबद्दल मला कोणतेही आकर्षण नाही.  प्लीज, इथून पुढे मला त्रास देवू नका.असे म्हणून ती मला कवितांचे कागद परत करु लागली.  पण मी माझा राग आवरुन तिला बोललो, 'या मी तुझ्यासाठी केल्या आहेत.  त्यांचे वाट्टेल ते कर.अशाप्रकारे माझी दिव्याशी पहिली बोलणी झाली.  त्यावेळी मला वाटले 'हीच ती अनू का? की जिने मला तिच्या प्रेमाचा स्वीकार करण्यास भाग पाडले.पण यात बिचाऱ्या दिव्याचा काय दोष होतातिला मी आवडत नसेल तर मी का अट्‌टाहास धरावामीच अनू आणि दिव्या या दोन भिन्न स्वभावाच्या व्यक्तींची सरमिसळ करीत होतो.  हा माझाच दोष होता ना!  पण तो जात का नव्हता? का ? याचे उत्तर मलाही ठाऊक नव्हते.
            त्यावर्षी परीक्षेत जेमतेमच पास झालो.  मग मात्र दिव्याचा विचारही न करण्याचे ठरविले.  अनूच्या आठवणींबरोबर स्वत: संपायचे मात्र इतरांना अजिबात दु:खी करायचे नाही, असंच ठरवलं.  त्याप्रमाणे दिव्याशी असणारे सर्व संबंध मी तोडले जे प्रत्यक्षात अस्तित्वातच नव्हते.  पण दिव्याला मात्र याची कल्पना आली नसावी.
            रक्षाबंधनाचा आदला दिवस ! दुसऱ्या दिवशी ताईकडे जायचे या विचाराने मन आनंदाच्या डोहात तरंगत होते.  एका मुलींच्या ग्रुपला पास करुन पुढे गेलो.  त्यांच्यात दिव्या असेल, हा विचारही माझ्या मनाला शिवला नाही.  मी माझ्या तंद्रीतच होतो.  तोच मागून 'महेश, एक मिनिट!' अशी हाक ऐकू आली. थांबून मागे पाहिले तर दिव्याच मला बोलावत होती, 'महेश, मी तुम्हाला उद्या राखी बांधणार आहे, दोन वाजता 'सिंगार हॉटेल' मध्ये या, नाहीतर मला तुमच्या हॉस्टेलवर यावं लागेल.तिचे हे अनपेक्षित उद्गार ऐकून मी काहीच बोललो नाही.  वितळवलेल्या लोखंडाचा तप्तरस कानात ओतावा तसे ते शब्द माझ्या कानावर पडले.  मी धडपडलो.  डोळयासमोर अंधारी आली.  त्याच अवस्थेत रुमवर गेलो आणि धाडकन कॉटवर अंग झोकून दिले.  अतिशय जडपणा जाणवत होता.  मघाचा ताईकडे जाण्याचा आनंद कुठल्या कुठे गेला.  मन विषण्ण झाले.  पुन्हा विचारात गुंग झालो.  काय करावे तेच उमजेना.  वेगळीच भीती मनात घर करुन राहिली होती.  काय होईल उद्या जिला मी माझ्या प्रियतम् अशा अनूचा अधिकार देणार होतो, ती माझ्या ताईच्या अधिकारावर अतिक्रमण करु पहात होती.  मला दिव्याचा तिरस्कार वाटू लागला.  जर ती मला भाऊ मानून राखी बांधणार होती तर ती तेव्हाच का बोलली नाही जेव्हा मी तिला माझ्या नावाने पहिले प्रेमपत्र पाठवले; तेव्हा का बोलली नाही जेव्हा तिला मी कविता दिल्या.  तेव्हा योग्य ती वेळ होती.  मी तिला समजून घेतले असते.  पण आता फार उशीर झाला होता.
            शेवटी ठरविले उद्या जर दिव्याने राखी बांधली तर बांधून घ्यायची, मग वाट्टेल ते होवो ! दीपकनेही जड मनाने तोच सल्ला दिला, म्हणाला, 'मित्रा, तुझे आता फायनल इअर आहे.  पुन्हा भेटाल न भेटाल.  जाताना एकमेकांबद्दल काहीही कटू मनात राहू नये. जा मित्रा, घे बांधून राखी!  तुझ्या मनाच्या सहनशक्तीला माझेही बळ लाभू दे.मी धन्य झालो - कुठे हा मित्र आणि कुठे.....
            ताई मी जेव्हा तिच्याकडून राखी बांधून घेत होता, तेव्हा तिच्या चेहऱ्यावर कोणतातरी आसुरी आनंद ओसंडून वाहतोय की काय असेच मला भासत होते.  असं वाटत होतं की, आजूबाजूचे सर्वजण माझ्याकडे कुत्सितपणे पाहतायत.  ताई, तुझ्याकडून राखी बांधून घेताना जे समाधान लाभते ते तर मला लाभले नाहीच.  उलट मनाची उद्विग्नता वाढली.  वाटलं, 'अरे, ही मुलगी उद्या डॉक्टर होईल.  त्यासाठी पेशंटचं मानसशास्त्र समजून घेता यायला हवं.  पण ती जिथं माझं हदय जाणू शकली नाही तिथं इतरांचं काय पैसा मिळेल हो भरपूर पण मन: शांतीचं काय ?'  ते काही होवो इथून पुढे आपण आणि आपलं काम बस्स पप्पा आणि ताई यांना समाधानी ठेवण्यासाठीच आपलं आयुष्य वेचायचं.  मग वाट्टेल तो त्रास का सोसावा लागेना !
            मला कळून चुकलं की माझ्या अशा मन:स्थितीमध्ये मी कोणाही मुलीला सुख देऊ शकणार नाही.  तिच्याशी मनाने एकरुप होणं मला जमणारच नाही.  जीवनाचे सार्थक का केवळ लग्न करण्यातच आहे ते तर आपल्या प्रियजनांना प्रेम देण्यात आणि सुख देण्यात आहे.
            ताई, आज मी स्वत:च्या पायावर उभा राहून पैसा मिळवतोय.  दोन चार मुलींनी स्वत: मला प्रपोज् केले पण मी त्यांना स्पष्टच नकार दिला. म्हणून म्हणतोय ताई, याबाबतीत मला तू समजून घे.  माझ्या लग्नाचा विषय डोक्यातून काढून टाक.  मला तुमच्या समाधानातच सुख मानू द्या. आज तुला सर्व सांगितल्यांन मनावरचं ओझं कमी होऊन अगदी हलकं वाटतंय.'

प्रकरण चार:
बराच वेळ कोणीच काहीही बोललं नाही.  ताई कॉटच्या सळीला डोकं टेकून बसल्या होत्या.  मला काही बोलायला सुचेना, गेले वर्षभर आपण ज्या माणसासोबत रहात आहोत, त्याने आपल्या दु:खाची ही बाजू कधी प्रकाशातच आणली नाही.  मी मात्र त्याला बऱ्याचदा दोष देत होतो.  दुसऱ्याला नेहमी आनंदात ठेवायचे एवढेच त्याला माहित होते.  सतत हसमुख असणाऱ्या या चेहऱ्याभोवती इतकी चिंतावलये असतील, याची मला कल्पनाही आली नव्हती किंवा त्याने येवू दिली नव्हती.  त्याच्या चेहऱ्यावर आता मला वेगळेच तेज भासू लागले.  आगीतून तावून सुलाखून निघालेल्या तलवारीच्या पात्याप्रमाणे !
            थोडयात वेळात ताई सावध होऊन बोलू लागल्या, 'मयू, तू सोसलंस ते सर्व खरोखरच अतिशय वाईट आहे.  जो सोसतो त्यालाच त्या वेदना कळतात.  मला एकाच गोष्टीचा अभिमान वाटतो की इतका सर्व अपमान सोसूनही कुणाचेही वाईट करण्याचा विचारही तुझ्या मनात आला नाही.  आज माझ्या संस्कारांचे सार्थक झाल्याचा मला आनंद वाटतो.  वरं, तू मला दिव्याचा पत्ता दे.  मी तिला तुझ्यासाठी राजी करते.  अरे, केवळ राखी बांधून कोणी कुणाची बहिण होत नसते.  त्याकरीता अंत:करणातून उमाळा यावा लागतो.  तू तिच्या आयुष्यातून बाजूला झालास.  हा तुझा मोठेपणा आहे पण हीच गोष्ट तिला 'नीच' दाखवण्यास कारणीभूत ठरते.'
            'म्हणूनच ताई.  तू तिच्याशी कोणतीच बोलणी करु नकोस.  लायकी नसतानाही तिने तुझ्याशी बरोबरी करण्याचा प्रयत्न केलायं याचा तिला पश्चाताप करावा लागेल.'
            'पण तेव्हा फार उशीर झालेला असेल, मयू.'
            'ताई, आयुष्यात कोणतीच गोष्ट वेळेवर घडत नाही.  केवळ भाग्यवंतांच्या बाबतीतच असं घडू शकतं.  दुर्दैवाच्या खाईत लोटल्या गेलेल्या अभाग्यांना ते साधत नाही, हेच खरं.'
            संध्याकाळ झाल्याचंही कोणाच्या ध्यानी नाही आलं अखेर मीच चहा करण्यासाठी म्ळणून स्वयंपाकखोलीत आलो.  चहा करताना अभावितपणे माझा हात डोळयांच्या ओल्या नेत्रकडा पुसण्याकडे गेला.  चहा झाल्यावर ताई जाण्यास निघाल्या, जाताना इतकंच बोलल्या, 'मयू, मी माझ्या परीने तुला सांगितलं.  निर्णय काय तो तूच घ्यायचास.  मी पप्पांची समजूत घालीन.'
            दरम्यानच्या काळात महेशला मोठमोठी सरकारी टेंडर्स मिळत गेली.  त्यात त्यांचा बराच फायदा झाला.  अखेर त्याने सरकारी नोकरीचा राजीनाम देऊन स्वत:ची 'अनुराधा कन्स्ट्रक्शन कंपनी' उभी केली.  त्याच्या पूर्वीच्या कामगिरीमुळे तो पुढेही सतत बिझी राहू लागला.  मलाही त्याने कारखान्यातली नोकरी सोडायला लावून त्याच्याच कंपनीत मॅनेजरची नोकरी दिली.  कंपनीच्या पहिल्या वर्षीच प्रॉफीटमधून त्याने एक टुमदार बंगला पुण्यातच बांधला.  मग तो आणि मी त्या नव्या बंगल्यात ट्रान्स्फर झालो.  तसेच, कोल्हापूरहून त्याने आपल्या आजारी पप्पांनाही इलाजासाठी आणवले.  ताई आणि भावोजी मात्र कोल्हापूरातच राहिले.
            कंपनीचा व्याप सांभाळताना वडिलांकडे अजिबात दुर्लक्ष होता कामा नये, असे महेशचे प्रामाणिक मत होते.  त्यासाठी त्याने ससून हॉस्पिटलमधील त्याच्या एका डॉक्टर मित्राला एखाद्या नर्सची नेमणूक करण्यास सांगितले.
            दुसऱ्या दिवशी पहाटे तो कंपनीच्या कामानिमित्त मुंबईला गेला.  मग सकाळी मी पोर्चमध्ये वर्तमानपत्र वाचत बसलो होतो.  पप्पा अजून उठले नसल्याने चहा वगैरे काहीच झालेलं नव्हतं.  इतक्यात दारासमोर लुना थांबल्याचा आवाज आला.  सकाळी सकाळी कोण आलं म्हणून मी पाहू लागलो तर एक नर्स दारात उभी होती.  तिला पाहिल्यावर मला आश्चर्याचा सुखद धक्का बसला कारण ती नर्स दुसरी तिसरी कोणी नसून प्रीतीच होती.
            'अरे, तुम्ही इकडे कशा आलात?' माझा प्रश्न.
'अहो, मी नर्सिंगचा कोर्स कंप्लीट केलाय आणि ससून हॉस्पिटल जॉईन केले.  काल डॉक्टर देशपांडयांनी मला इथे या पत्त्यावर यायला सांगितलं होतं.  म्हणजे तुमच्या वडिलांना बरं नाही तरकाय झालंय त्यांना?'
'आत या.  जरावेळ एका ठिकाणी शांत बसा.  तुमच्या सर्व प्रश्नांची मी उत्तरे देईल.यावर गोड हास्य करुन ती आत आली, आणि सोफ्यावर बसली.  जवळच खुर्चीत मी बसलो.  'हां, आता माझ्या प्रश्नांची तुम्हाला उत्तरं देण्यास काहीच हरकत नसावी.प्रीतीचा मिस्कील प्रश्न.
मग मीही सांगायला सुरुवात केली.  'एकतर हे घर माझं नाही.  हे घर महेशचं आहे आणि त्याच्या वडिलांना नेहमी दम्याचा त्रास होत असतो.  आम्ही दोघे अजूनही एकत्रच राहतो.' 'मग, महेश कुठय?' 'अहो, तो कंपनीच्या कामानिमित्त मुंबईला गेलाय.  रात्रीपर्यंत येईलच.  बरं, महेशचे वडिलही तुमच्या ओळखीचे असतीलच.  त्यामुळे तुम्ही त्यांची व्यवस्थित काळजी घ्याल.  याची मला खात्री आहे.'
प्रीती मात्र काहीशी नाराज होऊन बोलली, पण माझं इथं येणं महेशला आवडेल?'
'का नाही? जर माझीच काही हरकत नसेल तर तो काय करणार आहे मला.असे म्हणत महेशचे वडीलच बाहेर आले.  प्रीतीने त्यांच्याकडे बघून स्मित केले आणि म्हणून उठून त्यांना आधार द्यायला लागली.  'अहे नर्सवाई, आलयाआल्या लगेच डयुटीचा चार्ज नको घ्यायला काही.  जरावेळ, बसा.  अरे, लक्ष्मण आपल्या सर्वांनाच चहा ठेव बरं.' 'पप्पा, मी करते की.  त्यांना कशाला उगीच त्रास.  मला किचन दाखवा, एवढयात करुन आणते.मी उठलेला परत बसलो पण पप्पा म्हणाले, 'अगं प्रीती.  उद्यापासुन तुझ्याच हातचा चहा पिणार आहे.  चहाच काय स्वयंपाकही तुच करायला हवास.  या दोघांच्या हातचं खाऊन कंटाळलोय झालं.  पण तू या लक्ष्याच्या हातचा चहा पिऊनच बघ एकदा.  असाल मस्त करतो की बस्स।पप्पांच्या स्तुतीने मी उठून लगेच कीचनमध्ये चहा करण्यासाठी शिरलो. 
पप्पा आवरण्यासाठी म्हणून गेले.  आणि प्रीती माझ्या मागोमागच किचनमध्ये आली आणि डायनिंग टेबलच्या खुर्चीत बसली.  मला काहीतरी ती विचारणार असावी असे वाटले.  पण बहुतेक सुरुवात कोठून करावी तेच तिला समजत नव्हते.  अखेर मनाचा धीर करुन तिनं विचारलं, 'महेश कधी माझ्याबद्दल बोलतो?'  मला क्षणभर काय उत्तर द्यावे हेच कळेना.  मग तिला म्हणालो, 'अधूनमधून निघतो तुमचा विषय.  ताई रक्षाबंधनाला आल्या होतया तेव्हा तर तुम्ही त्यांना भावजय म्हणून पसंत असल्याचंही त्या बोलल्या.  पण महेशही तुम्ही त्याची एक जीवलग मैत्रीण असल्याचं मान्य करतो.  पण लग्नाच्या बाबतीत तो एकूणच उदास आहे.'
 'पण एवढं असं काय घडलयं की ज्यामुळे महेशने आपल्या सर्व सुखाला दु:खाची झालर लावलीय?'
मग मात्र मी प्रीतीला मला माहित असलेली सर्व कथा थोडक्यात एेकवली.  तिच्यादेखील डोळयातून टपकन् अश्रंूचे दोन मोती गालावरुन खाली ओंघळले.  मी तिच्याकडे अतिशय करुणा भावनेने पहात होतो.  इतक्यात पप्पा कीचनमध्ये पोचले आणि लक्ष्या रागाने म्हणाले, अरे तुम्ही दोघे एकमेकांकडे असेच पहाच राहणार आहात की या म्हाताऱ्याला चहा देणार आहात.  बिचारा चहा सुध्दा कंटाळून उतू जाऊ लागलाय.आणि प्रीतीकडे वळत ते म्हणाले, 'बरं कायगं सूनबाई, तू या लक्ष्याबरोबर जर बोलत बसलीस ना तर तुझं कोणतंही काम हा धडपणे होऊ देणार नाही.  बोलघेवडा आहे नुसता.पप्पांच्या तोंडून 'सूनबाई' ही हाक एेकून प्रीतीने प्रफुल्लीत होऊन झटकन् त्यांचे पाय धरले.  तिला हंुदका आवरेना.  पप्पांनी मग तिच्या दंडाला धरुन उभे केले आणि तिला म्हणाले, 'जरी अजून झाली नसलीस ना तरी माझ्या मनाने तुला सून म्हणून केव्हाच स्वीकारलंय.  तेव्हा शांत हो, स्वत:ला सावर.' हुंदका आवरुन प्रीती फक्त इतकंच बोलली, 'आज मला माझ्या आयुष्याचं सार्थक झाल्यासारखं वाटतंय.'
नंतर आम्ही सर्वांनी मिळून चहा घेतला.  प्रीती जेवणाची तयारी करु लागली.  मी तिला हाताखाली मदत करत होतो.  पप्पा मात्र बाहेर बागेत फेरफटका मारत होते.  थोडया वेळाने ते आत आले.  आत आल्यावर त्यांनी प्रीतीला विचारलं, 'अगं सूनबाई, मघा मी तुला विचारलं नाही पण तुझी आई कशी आहेतिची तब्येत वगैरे तर ठीक आहे ना?' प्रीतीच्या चेहऱ्यावर उद्विग्नता पसरली.  तिने मोठया संयमाने सांगितलं, 'पप्पा, आई दीड वर्षांपूर्वीच वारली.  तिीच सेवा मला व्यवस्थित करता आली नाही म्हणून नंतर मी नर्सिंगचा कोर्स करुन आता हॉस्पिटलमधल्या इतर रोग्यांची सेवा करण्यातच समाधान मानते आहे.'
'पण मग तुझी आई अशी अचानक कशी वारली? आणि तू आता राहतेस कोठे?' पप्पांनी आपुलकीने विचारले.
'तीन वर्षांपूर्वीच आईला हदयविकाराचा पहिला झटका आला होता.  मी तिला कोणताही ताण पडू देत नव्हते.  तरीही तिला हदयविकाराचा दुसरा झटका आला.  उपचारांची संधीही न देता ती मला सोडून गेली.  त्यानंतर मी लेडीज हॉस्टेल मध्ये एक ब्लॉक घेतला आणि तिथेच राहत्येय.  या जगात मला आपलं असं एकही माणूस राहिले नाही.स्वत:वर प्रचंड नियंत्रण ठेवून प्रीती बोलत होती.  तिचा निर्धार पाहून पप्पांनाच भरुन आले.  'कोणी नाही असं का म्हणतेस बेटा?'  तुझा पप्पा असताना तुला कसली काळजीमी. तर म्हणतो, तू इथं माझ्याजवळच रहायला यायला हवीस, नव्हे आलेच पाहिजेस.'
'पण, मला इथं आलेलं पाहून महेशला काय वाटेल?'
'हे बघ बेटा, ते सर्व माझ्यावर सोपव.  शेवटी तुला माझी सेवा करण्यासाठी दवाखान्यानंच पाठवलं आहे.  तेव्हा तो तुला काही म्हणणार नाही आणि हा लक्ष्या केव्हा उपयोगी पडणार आहे.  हा घालेल त्याची समजूत !  काय रे घालशील ना?  मी 'होय' म्हणालो.  पण हे एक मोठं दिव्यच होतं हेही तितकंच खरं !
मी नंतर काही न बोलता गप्प राहिलो.  राहून-राहून मी मनातल्या मनात प्रीती आणि कल्पनेतली दिव्या यांच्यात नकळतपणे तुलना करुन पाहिली.  प्रीती दिव्यापेक्षा कैक पटींनी सरस ठरत होती.
प्रीतीने केलेला स्वयंपाकही अतिशय रुचकर झाला होता.  मला तार्‌इंची तीव्रतेने आठवण झाली.  मी भरपेट जेवून मगच ऑफिसकडे रवाना झालो.
रात्री घरी परत आलो तेव्हा प्रीती संध्याकाळचा स्वयंपाक करुन, पप्पांना जेवायला घालून.  त्यांना गोळया देऊन निघून गेली होती.  पप्पांनी दरवाजा उघडला.  अजून महेश आलेला नव्हता.
पप्पा म्हणाले, 'ती वेडी मुलगी, इकडं यायला तयारच होत नव्हती.  पण आज तिला मी राजी केलंय.  तू आज रात्री महेशबरोबर बोल आणि उद्या सकाहभ् जाऊन प्रीतीचे सामान घरी घेऊन ये.  बरं, मी आत झोपायला जातोय.  महेश आला की दोघं मिळून जेवून घ्या.'
नंतर मीही फ्रेश झालो आणि महेशची वाट बघत टी.व्ही.ऑन करुन बसलो.  बसल्याजागी कधी डुलकी लागली तेही समजलं नाही.  बेलच्या कर्कश्य जाग आली.  मी उठून घडयाळ पाहिले तर आता अकरा वाजले होते.  दार उघडले.  तो महेशच होता.  'अरे लक्ष्या, मिटींग अगदी सक्सेसफुल्ल झाली.  ढाब्याच्याबाहेर जी नवीन इमारत बांधायची आहे, तिचं कॉन्टॅ्‌रक्ट आपल्यालाच मिळेल.  शिवाय तिथल्याच ठिकाणचे फाइव्ह-स्टार हॉटेलही आपणच कन्स्ट्रक्ट करु.  तशी व्यवस्थाच करुन आलोय.मला अतिशय आनंद झाला. 'कौंग्रेच्युलेशन्स् ! मग ही संधी सेलीब्रेट कराची ना?' 'नाही रे बाबा, आताच नको.  अजून दीड दोन वर्षे तरी ते काम सुरु होण्याची शक्यता नाही.  मंजुरी अद्यापही आलेली नाही.  येईल तेव्हा मात्र आपल्यालाच ते काम मिळेल.  बरं, तू अजून जेवण्यासाठी थांबला असणारच.  तिथले लोक मला थांबण्याचा आग्रह करत होते पण मला तुझी खोड माहित आहे.  म्हणून त्यांना नकार देऊन सरळ इकडं आलो.  चल किचनमध्ये.  मी फ्रेश होऊन येतोच.'
जेवताना मी सकाळपासून घडलेला सर्व वृत्तांत त्याला सांगितला.  विशेषत: प्रीतीच्या असहाय्य स्थितीवर जास्त भर दिला.  महेशच्या मनातील खळबळ त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. बराच वेळ तो कांहीच न बोलता शांत बसून होता. ती शांतता असह्य होवू लागली होती. बर्‍याच वेळानं त्यानं बोलण्यासाठी तोंड उघडलं आणि माझ्या डोळ्य़ात खोलवर पहात तो बोलू लागला...
                                                                                                                           (क्रमशः)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा