रविवार, ३० जून, २०१९

मेरे अंदर मेरा छोटासा शहर रहता है...





('दै. सकाळ'च्या निपाणी कार्यालयाच्या वर्धापन दिनानिमित्त दि. ३० जून २०१९ रोजी 'नातं मातीशी' या विषयावर विशेषांक प्रकाशित करण्यात आला. मित्रवर्य संजय साळुंखे याच्या आग्रहामुळं या विशेषांकात प्रसिद्ध झालेला लेख माझ्या ब्लॉग वाचकांसाठी साभार सादर करीत आहे.- आलोक जत्राटकर)

निपाणी... लहानपणापासून म्हणजे अगदी कळता झालो तेव्हापासून निपाणीच्या स्टँडमध्ये येण्यासाठी बस काटकोनात वळायची आणि स्टँडच्या प्रवेशद्वारावरचीनिपाणी अशी भली मोठी मरुन रंगातली वळणदार कोरलेली मराठी अक्षरं मनाचा वेध घ्यायची... खूप काही सूचित करायची... विशेषतः त्यांत ओतप्रोत भरलेली मराठी अस्मिता ओसंडून वाहायची... अलिकडंच झालेल्या स्टँडच्या नूतनीकरणात अनेक जुन्या गोष्टींबरोबर ही मराठी अक्षरं आणि त्याबरोबर त्या अनेक गोष्टी लुप्त झाल्या आहेत. काळाच्या ओघात अशा गोष्टी घडणार, घडत राहणार!
एक गाव म्हणून प्रत्येक ठिकाणाचं स्वतःचं असं एक व्यक्तीमत्त्व असतं. निपाणीचंही आहे. शहर नव्हे, पण अगदी खेडंही नाही, असं हे स्वरुप. अनेक खेड्यांच्या मध्यवर्ती, कर्नाटक-महाराष्ट्राच्या सीमेवरचं पहिलं महत्त्वाचं गाव. त्यामुळं सीमाप्रश्नाच्या चळवळीमध्येही मराठी भाषकांच्या अस्मितेला सातत्यानं जागृत राखणारं, आत्मभान देणारं, अत्यंत व्हायब्रंट आणि सजग जाणीवांचं गाव. तंबाखूचं अमाप पीक असल्यामुळं तंबाखू उत्पादक, विडी कामगार, शेतमजूर, तंबाखू व्यापारी आणि विडी कारखान्यांचं गाव. कामगार असल्यामुळं कामगार चळवळ आणि नेत्यांचाही गाव. सौंदत्तीच्या रस्त्यावर असल्यामुळं देवदासी आणि जोगत्यांचाही गाव. मध्यवर्ती ठिकाणामुळंच चालत आलेली बाजारपेठेची मक्तेदारी. विशेषतः कापड व्यापार. लग्नाचा बस्ता असो की किरकोळ कापड, साडी खरेदी; पंचक्रोशीची इथल्या चंडुलाल शेटजीच्या दुकानाला सर्वाधिक पसंती. एकीकडं आचार्य अत्रेंच्या तो मी नव्हेचमधल्या लखोबा लोखंडे या तंबाखू व्यापाऱ्याचं गाव म्हणून साहित्यिक-सांस्कृतिक परीघात फेमस झालेल्या शोषक निपाणीची काळोखी बाजू अनिल अवचटांच्या अंधेरनगरी निपाणीमधून बाहेर आली. त्या शोषणातून तंबाखू कामगार महिलांच्या मुक्ततेसाठी आणि न्यायासाठी झगडा मांडणाऱ्या सुभाष जोशींसारख्या लढवय्याची ही निपाणी. गिरणीतल्या पिठावरच्या रेघोट्यांनाही सक्षम साहित्यिक अजरामरत्व प्राप्त करून देणाऱ्या महादेव मोरेंचीही ही निपाणी. विविध क्षेत्रांत कर्तबगारी सिद्ध केलेल्यांचा हा गाव.
कष्टकरी कामगार वर्गाचा वावर असल्यानं इथल्या खाद्यसंस्कृतीवर त्याचं पडलेलं प्रतिबिंब जाणवण्याइतकं. सकाळी कामावर जाण्यासाठी स्टँडवर उतरलेल्या कामगार वर्गाचं पोट भरावं म्हणून सांगावकरांच्या कल्पकतेमधून सुरू झालेली चपाती-भाजी हा आता वर्ल्ड फेमस इन निपाणी असा खाद्यपदार्थ. संध्याकाळी कांदाभजी, मिरची भजी आणि भडंग. सकाळची पुरीभाजी, शाममधली डोसा-आंबोळी आणि पापडी,वैष्णवमधला कुंदा व खवा पेढे हे या खाद्यसंस्कृतीचं पुढं झालेलं एक्स्टेंशन. एसटी स्टँडवरचं वैभव आणि आराम डायनिंग आणि जुन्या मोटार स्टँडवरच्या प्रभातसारख्या काही घरगुती खानावळींमधल्या इथल्या सामिश भोजनाला अस्सल गावरानपणाचा ठसका होता. आता या साऱ्याच बाबतीत एक प्रकारचं कॉस्मोपण आल्यामुळं सगळीकडं आता सगळेच पदार्थ मिळतात. भजीच्या गाड्यांपेक्षाही भेळ, चायनीज भेळ आणि चिकन ६५च्या गाड्यांनी आता सारंच अधिक्रमित केलंय. काळाच्या ओघात हे होणार, हे मान्य केल्यानंतरही निपाणीची सामिश भोजन परंपरा मात्र कुठं तरी अस्तंगत झाल्यासारखी वाटतेय. गेल्या काही वर्षात हे प्रकर्षानं जाणवतंय. जागतिकीकरणाबरोबर देशातल्या इतर कोणत्याही शहराप्रमाणं निपाणीनंही आपली कूस बदललीय. तिचं व्यक्तीमत्त्व पालटलंय. पण, म्हणून तिचं अंगभूत सौंदर्य मात्र कमी झालेलं नाही. तंबाखू व्यापारी पेठेची ओळख मागं पडून आता सर्व प्रकारच्या शिक्षण संस्थांचं गाव म्हणून नव्यानं ओळख निर्माण झालीय निपाणीची. संपूर्ण गावात एकेकाळी केवळ दोन रिक्षा होत्या, आता रिक्षा व्यवसाय हा जणू इथला एक प्रतिष्ठेचा व्यवसाय बनून गेलाय, इतक्या रिक्षा झाल्यात गावात. नव्या-जुन्याचं फ्युजन आता प्रकर्षानं जाणवतंय.
या पार्श्वभूमीवर, निपाणीचं माझंपण हे माझ्यासाठी माझ्या वडिलांची कर्मभूमी म्हणून खूप मोलाचं आहे. खरं तर गेल्या वीसेक वर्षांत माझ्या कर्मभूमी म्हणून मुंबई आणि विशेषतः कोल्हापूरविषयी माझ्या मनात खूप वेगळं स्थान आहे; पण, निपाणीबाबतचा जिव्हाळाही तितकाच अनोखा आहे. माझ्या व्यक्तीगत आयुष्यात या शहराचं स्थान महत्त्वाचंय याचं कारण म्हणजे माझ्या आयुष्यातला सर्वाधिक महत्त्वाचा टीनएजला कालखंड मी इथं घालवला. शिक्षणापासून ते पहिल्या नोकरीपर्यंतचा कालखंड इथंच गेला. कोणाच्याही आयुष्यात हा काळ अविस्मरणीयच असतो. अपवाद माझाही नाही. इथल्या कैक गोष्टींनी मी कधी भारावलोय, तर कधी रागावलोय. आयुष्यातल्या काही कटु आठवणी मला इथंच मिळाल्या, तर आयुष्याचं सर्वात मोठं संचित असणारं खरं मैत्र मला इथंच लाभलं. पहिलं प्रेम इथंच लाभलं आणि प्रेमभंगाचं शल्यही. आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक प्रसंगाला उत्कटपणानं सामोरं जायला मला या गावानंच शिकवलं. अपयश पचवून यशाला भिडण्यासाठी पुन्हा सज्ज व्हायला शिकवणारंही हेच गाव आहे.
निपाणीशी निगडित माझ्या आठवणी जागवत जागवत मी इतका मागं गेलो, ते थेट अशोकनगरातल्या गुमठाणावरांच्या माडीवर जेव्हा आम्ही भाड्यानं राहात होतो तिथंवर. मी साधारण दोनेक वर्षांचा असेन, पण त्या वयातलाही एक प्रसंग मला प्रकर्षानं आठवतोय, तो म्हणजे या घरात माझ्या हाताच्या बोटाला मोठ्या काळ्या मुंगळ्यानं दंश केला होता आणि मी प्रचंड रडलो होतो. त्यानंतरच्या कालखंडात जगातल्या तमाम काळ्या मुंगळ्यांवर मी सूड उगवत सुटलो होतो. त्या एका मुंगळ्यापायी मी त्यांच्या कित्येक पुढच्या पिढ्यांची कत्तल केली होती. जेव्हा थोडं समजू उमजू लागलं, तेव्हा हे सत्र थांबलं. आज माझ्या मुलांना मी कीडामुंग्यांनाही जीव असतो, हे तत्त्वज्ञान सांगत असतो. त्यामागं पुन्हा आपल्या हातून असं कृत्य होऊ नये, ही भावना असते. अशोकनगरचाच उल्लेख निघालाय म्हणून सांगतो, अगदी लहानपणापासून ते अगदी टीवाय होईपर्यंत याच पेठेतल्या दुकांनातून बाबा आमच्यासाठी कपडे घेत- खरं तर कापड घेत आणि लगेच पी. काजम काकांच्या कडे ते शिवायला टाकत. पुढे शिकायला बाहेर पडल्यानंतर कापड घेऊन ड्रेस शिवून घेतला, घातला; पण, त्या शिवण्याला काजम काकांची सर काही आल्यासारखी वाटेना आणि तिथून पुढं हे कपडे घेणं थांबलं आणि आता उक्ते कपडे घालतानाही या गोष्टी मी मिस करतोच.
पुढं आईच्या नोकरीच्या निमित्तानं कागलला शिफ्ट झालो. माझं काही शिक्षण आजोळी सांगलीत आणि कागलला झालं. दरम्यान बाबांनी श्रीनगरमध्ये जागा घेतली. आणि ते थोडेसे संभ्रमात असत की घर निपाणीत बांधावं की, कागलमध्ये जागा घेऊन बांधावं. मला काही फारसं कळत असण्याचं कारण नव्हतं, पण ते जेव्हाही कधी विषय काढत, तेव्हा मी निपाणीतच घर बांधण्याचा आग्रह धरीत असे. का, याचं कारण आजही सांगता येणार नाही. पण, निपाणीबद्दल काही तरी वेगळी ओढ होती, एवढं मात्र खरं.
माझे वडील नोकरी करायचे, ते देवचंद कॉलेज आणि देवचंद शेटजी यांच्याबद्दल माझ्या मनात त्या वयातही अपार आदर आणि अभिमान होता. आजही आहे. त्या काळात सीमाभागातील विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालय उभं करावं असं वाटणं आणि ते जास्तीत जास्त दर्जेदार शिक्षणासाठी ओळखलं जावं, या तळमळीतून शेटजींनी ते उभारलं, याचं मला भारी अप्रूप होतं. शेटजी गेले, तो दिवस माझ्या आयुष्यातला एक नितांत दुःखाचा दिवस होता. पुढं याच संस्थेच्या मोहनलाल दोशी विद्यालयात आणि याच महाविद्यालयात मला शिक्षण घेता आलं, ही बाबही महत्त्वाची.
माझ्या आयुष्यावर प्रभाव टाकणाऱ्या गुरूंची तर फौजच या गावानं मला प्रदान केली. जीएनके सर, आरएनके सर, जेपीके मॅडम, पी.के. जोशी सर, चौगुले सर, पाटील सर, परीट सर, पंगू सर, रानडे सर, चिले सर- नावं तरी किती घ्यावीत. थेट शिकविणाऱ्यांखेरीज ज्यांचा विशेष प्रभाव पडला, त्यामध्ये अच्युत माने, जे.डी. कांबळे, सुभाष जोशी, उल्हास वराळे, ए.जी. जोशी, विठ्ठल घाटगे, एन.एस. काझी, दिवाकर असे बाहेरच्यांसाठी प्राध्यापक, विचारवंत पण माझ्यासाठी काका असणाऱ्या व्यक्तींचाही समावेश आहे. माझं व्यक्तीमत्त्व घडण्यामध्ये यांचा वाटा किती महत्त्वाचा आहे, हे शब्दांत सांगणं कठीण आहे.
कागलमध्ये पाचवी-सहावीत असताना ज्युदो शिकत होतो. त्यावेळी दिवाळीच्या सुटीत निपाणीच्या रोटरी क्लबनं देवचंद कॉलेजमध्येच आठवडाभराचा रायला कॅम्प आयोजित केला होता. आयुष्यात पहिल्यांदा असा घराबाहेर राहिलो, तो निपाणीत. या आठवड्यानं माझ्या व्यक्तीमत्त्व विकासात पायाभूत भूमिका बजावली. प्राचार्य डॉ. एम.जे. कशाळीकर यांचं सान्निध्य आणि डॉ. सुहास शहा यांचं आयुष्यभराचं प्रेम लाभण्याची ही सुरवात होती. आयुष्यातलं पहिलं उत्स्फूर्त भाषण, ग्रुप डिस्कशन वगैरे अनेक बाबी पहिल्यांदा इथंच पाहिल्या, त्यात सहभागी झालो. कॅम्पमधला सर्वात लहान पार्टीसिपंट असल्यानं साऱ्यांचं लक्ष माझ्याकडं असे. प्रचंड आत्मविश्वास या कॅम्पनं माझ्यात ओतला.
पुढं इथल्या श्रीनगरमध्ये घर बांधल्यानंतर मी मोहनलाल दोशी विद्यालयात नववीत प्रवेश घेतला. शाळेच्या पहिल्या दिवशी रानडे सरांच्या केदारबरोबर शाळेअगोदर जीएनके सरांच्या ट्यूशनमध्ये गेलो. माझ्या आयुष्यात तोपर्यंत मी कोणत्याही ट्यूशनला गेलो नव्हतो. मी अटेंड केलेली ही आयुष्यातली एकमेव ट्यूशन. पण, त्यामुळं जीएनकेंसारखा एक भारी विज्ञान शिक्षक मला लाभला. माझ्या मैत्रीच्या परीघ विस्ताराची ती सुरवात होती. ही ट्यूशन आणि शाळा यांच्यामुळं श्रीनिवास व्हनुंगरे, माधव कुलकर्णी, निशांत जाधव, सुभाष शिंत्रे, सिद्धार्थ शहा, अनुप शहा असे कितीतरी मित्र मिळाले. वर्गात (स्व.) प्रशांत आंबोलेसारखा जबरदस्त मित्र मिळाला. मोहनलाल दोशी विद्यालयातल्या प्रत्येक शिक्षकाचं मला इतकं प्रेम लाभलं की विचारू नका. मी नववीत हिंदी-संस्कृत घेतलं. हिंदीच्या वाळवे मॅडम तर अप्रतिमच शिकवायच्या. पण, कागलमध्ये आठवीत संस्कृत नव्हतं. त्यामुळं जेपीके मॅडमनी मला त्यांच्या घरी बोलावून नववीच्या पहिल्या दोन महिन्यांत माझ्याकडून आठवीचं संस्कृत करून घेतलं आणि नववीचं संस्कृत शिकण्यास मी लायक झालो. कोणत्याही मोबदल्याविना शिकविणाऱ्या जेपीके मॅडमचं ऋण कोणत्या शब्दांत व्यक्त करावं? त्यांनी दिलेल्या आत्मविश्वासामुळंच पुढं बारावीपर्यंत संस्कृत शिकण्याचा आत्मविश्वास तर आलाच, पण आरएनके सरांसारखा उत्तम शिक्षकही लाभला. जेपीके मॅडमनी कथाकथन, नाटक अशा अनेक गोष्टींत भाग घ्यायला प्रोत्साहन दिलं. शाळेत पी.के. जोशी सरांच्या प्रशंसेला पात्र व्हायचं म्हणजे काही खायची गोष्ट नव्हती. मात्र, सरांचं मला जे अकृत्रिम प्रेम लाभलं, ते शब्दांत सांगणं कठीणाय. सरांनी त्यांचं प्रेम शब्दांतून कधीच व्यक्त केलं नाही, पण ते माझ्यापर्यंत पोहोचलं नाही, असं मात्र नाही. माझं जर्नल लिहीणं त्यांना आवडायचं. वर्गातल्या बाकीच्यांना आणि मला तेवढा शेरा, यातूनच काय ते समजायचं. सारा वर्ग जळायचा. माझी व्हॉलीबॉलची सर्व्हीस सरांना खूप आवडायची. तुकडीबरोबर झालेल्या चुरशीच्या अंतिम सामन्यात मी एक जोरदार ड्रॉप मारून गोल नोंदविला तेव्हा सरांनी वा रे पठ्ठ्या म्हणत समोरच्या बाजूला मारलेली उडी मी आजही विसरू शकत नाही. म्हणून माझं एमजेसीचा लघुशोधप्रबंध मी कागलचे ढोले गुरूजी आणि पी.के. जोशी सर यांना संयुक्तपणे अर्पण केला. चौगुले सरही माझ्यावर खूप प्रेम करणारे. माझ्या प्रगतीकडं जाणीवपूर्वक लक्ष देणारे. पुढं मी निपाणीत जेव्हा निपाणी दर्शन ही पहिली केबल न्यूज सेवा सुरू केली, तेव्हा त्या काळात खिशातून पाचशे रुपये काढून मला बक्षीस देणारे चौगुले सर. त्यांचं हे प्रेम कसं विसरता येईल?
नववीत असतानाच इथल्या बुलियन कॉम्प्युटर या खाजगी संस्थेत संगणकाशी ओळख झाली. बेसिक, कोबॉल, फोरट्रॅन या भाषा शिकलो. प्रिया शहा ही त्यावेळी माझी तिथली सहाध्यायी होती. पुढं अप्टेकमधून संगणकाची पदविका घेतली, तेव्हा या क्षेत्रात आवड निर्माण होण्यासाठी बोरगावे मॅडम आणि चेतन नागांवकर यांनी माझ्यावर खूप परिश्रम घेतले आहेत.
पुढं देवचंद कॉलेजमध्ये विज्ञान शाखेला प्रवेश घेतला आणि माझ्या गुरूंचा अन् मित्रांचा परीघ आणखी विस्तारला. विरेंद्र बाऊचकर, भालचंद्र काकडे, दिलीप पाटील, अश्विन उपाध्ये, मनिषा कलाजे, सुषमा चव्हाण, मृणालिनी चव्हाण, सुलेखा सुगते हा लाइफटाइम ग्रुप इथंच जमला.
शिवाजी विद्यापीठातून पत्रकारितेचं पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यानंतर सोलापूरच्या दैनिक संचारसाठी बेळगाव जिल्हा प्रतिनिधी म्हणून मी निपाणीतून काम पाहू लागलो. पहिलं ऑफिशियल वार्तांकन मी निपाणीतूनच केलं, ते बामसेफच्या परिषदेचं. तिथून मग माझी पत्रकारितेमधली कारकीर्द सुरू झाली. उमेश शिरगुप्पे, पिटू शांडगे, संजय साळुंखे या मित्रांच्या साथीनं निपाणी दर्शनया निपाणीतल्या पहिल्या केबल न्यूज सेवेचा प्रारंभ केला. या सेवेचा पहिला संस्थापक-संपादक म्हणून मी काम पाहिलं. निपाणी दर्शनमुळं इथल्या सर्व क्षेत्रांतल्या लोकांशी वन टू वन संपर्क प्रस्थापित होऊ शकला. मात्र, चारेक महिन्यांतच सकाळमध्ये उपसंपादक म्हणून निवड झाल्यानं मी पुढील करिअरसाठी इथून बाहेर पडलो. मात्र, जितका दूर जात गेलो, तितकं हे गाव हृदयात खूप आत आत शिरत गेलं. बाहेरगावी असताना कधीही मी आजारी पडलो, काही दुखलं खुपलं, तर मला हटकून निपाणीची आठवण येते. अशा वेळी मी हमखास इथंच येतो. इथं येताक्षणी माझं निम्मं आजारपण निघून जातं. उरलेलं काम पाटील डॉक्टरांचं इंजेक्शन करतं. वेदनेच्या प्रसंगी आपल्याला आठवतात ती आपली माणसं, आपला गाव. त्या अर्थानं निपाणी हे माझं वेदनाशामक आहे, माझं रि-एनर्जायझर आहे. मी जिथं फिरतो, तिथं सीमावासियांच्या वेदनेचा हुंकार म्हणून वावरतो. हा हुंकार माझा स्थायीभाव आहे. कर्नाटकाकडून मी भाषिक परप्रांतीय आहे, तर महाराष्ट्राकडून भौगोलिक परप्रांतीय. निपाणीला लाभलेली उपरेपणाची ही भळभळती वेदना माझ्यात खूप खोलवर जिवंत आहे. म्हणूनच निपाणीशी माझं नातं अधोरेखित करताना नीलेश मिस्राच्या पुढील ओळी आठवतात -
बात बेबात पे अपनी ही बात कहता है,
मेरे अंदर मेरा छोटा सा शहर रहता है।


२ टिप्पण्या:

  1. अलोकजी !
    नमस्कार !
    निपाणी दै. सकाळ वर्धापनदिनाच्या "नातं मातीशी" विशेषांकातील तुमचा "मेरे अंदर मेरा छोटासा शहर रहता है" हा निपाणीच्या आठवणी जपणारा लेख त्याच दिवशी वाचला होता. निपाणीच्या तुमच्या बऱ्याच आठवणी, अनुभव सामावलेल्या या लेखात, आमच्याही मनातलं बरंच काही असल्यामुळे छान वाटलं. ज्या गावात आपण हायस्कूल, काॅलेजचं जीवन घालवतो त्या गावाबद्दलच्या आठवणी म्हणजे "ठेवणीतल्या" असतात. मुंबईसारख्या स्वप्ननगरीपर्यंत फिरून येऊनही तुम्ही मनाच्या एका कोपऱ्यात निपाणीच्या सुंदर आठवणी जपून ठेऊन, त्या दै. सकाळच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने वाचकांसाठी खुल्या केल्यात, त्याबद्दल निपाणीकरांना कौतुक आहे.
    लिखाणाबद्दल तुमचे अभिनंदन आणि शुभेच्छा !
    विशेषकरून यानिमित्ताने तुम्हाला लिहितं केल्याबद्दल संजय साळुंखेचे आभार !
    आपला,
    सुनिल किरळे.
    साई शंकर नगर, निपाणी.
    8867644691.
    13/07/2019

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. प्रिय सुनील जी,
      सप्रेम नमस्कार.
      आपण दिलेल्या अत्यंत सविस्तर प्रतिक्रियेबद्दल अगदी मनापासून धन्यवाद...

      हटवा