(कोल्हापूर येथील राजाराम महाविद्यालयातील इंग्रजी
अधिविभाग प्रमुख प्रा. रघुनाथ कडाकणे यांच्या ‘श्वासोच्छवासांच्या मध्यंतरातील कविता’
या काव्यसंग्रहाचे शुक्रवारी (दि. १० जानेवारी) शिवाजी विद्यापीठात सुरू
असलेल्या मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याअंतर्गत प्रकाशन झाले. त्या निमित्ताने 'दै. सकाळ'च्या कोल्हापूर आवृत्तीमधील 'साहित्यरंग' पुरवणीत प्रकाशित झालेला विशेष लेख 'सकाळ'च्या सौजन्याने माझ्या ब्लॉगवाचकांसाठी पुनर्प्रकाशित करीत आहे...)
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील निपाणीशेजारच्या बुदलमुख गावातून शहरात
शिकण्यासाठी आलेला एक युवक, ज्याच्यासाठी निपाणी हे निमखेडे सुद्धा मेट्रो शहराहून
कमी नाही. असा युवक देवचंद महाविद्यालयात शिक्षण घेत असताना आपल्या शिक्षणाच्या,
जगण्याच्या साऱ्या शक्यता, साऱ्या व्याप्ती माणूसपणाभोवती गोळा करतो आणि संपूर्ण शक्तीनिशी
अत्यंत उभारीने भरारी घेतो, आपली कारकीर्द शिक्षणी पेशातच उभी करतो आणि सातत्याने
माणूसपणाच्या जाणीवा अधोरेखित आणि वृद्धिंगत करीत राहतो, त्या युवकाच्या हातून एक
जाणीवसमृद्ध कलाकृती उभी राहते, जी पुन्हा एकदा सामाजिक जाणीवांचे भान अन्
अस्तित्व अधोरेखित करते पुन्हा नव्याने, त्या साहित्यिकाचे नाव आहे प्रा. रघुनाथ
कडाकणे आणि त्याच्या या कलाकृतीचे नाव आहे, ‘श्वासोच्छवासांच्या मध्यंतरातील कविता’.
Dr. Raghunath Kadakane |
प्रा. कडाकणे हे लौकिकार्थाने कोल्हापूरच्या राजाराम
महाविद्यालयातील इंग्रजी व मराठी अधिविभागांचे प्रमुख असले तरी तो त्यांच्या
पोटापाण्याचा व्यवसाय झाला. खरे तर, प्रा. कडाकणे हे एक अत्यंत जाणीवसमृद्ध अन्
सजग अशा प्रकारचे समाजाचे जागल्याच आहेत. त्यांनी आजपर्यंत ‘माझे मिथ्याचे प्रयोग’ ही एक आगळीवेगळी कादंबरी आणि ‘इन कम्पॅरिझन भालचंद्र नेमाडे’ज कोसला अँन्ड जे.डी. सॅलिंजर्स ‘दि कॅचरइन द राय’’ हा संशोधन ग्रंथ सिद्ध
केला आहे. त्यानंतर त्यांच्या निवडक कवितांचा संग्रह असलेल्या ‘श्वासोच्छवासांच्या मध्यंतरातल्या
कविता’ हा संग्रह मराठी
काव्यरसिकांच्या सेवेत दाखल होतो आहे. एक अत्यंत वेगळ्या प्रकारची, प्रवाही
अस्तित्ववादी, रोमँटिक आणि जाणीवानिर्देश करणारी कविता प्रा. कडाकणे यांनी मराठी
रसिकांना सादर केली आहे. इंग्रजी साहित्याचे उत्तम व्यासंगी अभ्यासक असलेल्या
प्रा. कडाकणे यांचे मराठी भाषेवरील प्रभुत्वही तितकेच असामान्य स्वरुपाचे आहे. या
पार्श्वभूमीवर, त्यांच्या या नूतन काव्य संग्रहाचा विचार करणे आवश्यक आहे.
या संग्रहाच्या प्रस्तावनेमध्ये ज्येष्ठ समीक्षक
प्रा. रणधीर शिंदे यांनी म्हटले आहे की, “कडाकणे यांच्या या संग्रहातील कविता विविध भावसंवेदनांचा आविष्कार करणारी कविता आहे. ‘स्व’ आणि जीवनाकडे
पाहण्याची त्यांची विशिष्ट अशी दृष्टी आहे. ‘स्वग्राम आणि भवताल’, ‘अंतर आणि स्थित्यंतर’, ‘समकालीन संदर्भ वगैरे’, ‘सृजनेंद्रियाच्या प्रत्यारोपणानंतर’, ‘निर्वात पोकळीत निःसंदर्भ’ या प्रमेयसूत्रांतून त्यांनी जीवनाचे दर्शन घेतले आहे. एका अर्थाने पंचमहाभुतांच्या जीवनरंगांनी व्यापलेली ही कविता आहे. मानवी अस्तित्व, भोवताल, सृष्टी आणि
कलानिर्मितीच्या रहस्यभेदाने पछाडलेली ही कविता आहे. पंचेद्रियांच्या या
अनुभवसूत्रांमध्ये आंतरिक संगतीदेखील आहे. त्यातून प्रकटणाऱ्या अनुभवसंवेदनांच्या
फांद्या एकमेकांत मिसळलेल्या आहेत किंवा मिसळून परस्परांना छेद देऊन साकारल्या
आहेत. कडाकणे यांच्या कवितांमधून वास्तववादी,
रोमँटिक व अस्तित्ववादी जाणीव प्रेरणांची सरमिसळ झालेली आहे. या तिहेरी गुंफणीतून
ते जगाचा, जीवनानुभवाचा प्रत्यय घेत आहेत.”
खरे तर, या प्रस्तावनेमध्येच या संपूर्ण कवितासंग्रहाचे सार एकवटले आहे.
एकीकडे सकारात्मक परंपरांचा स्वीकार करीत असतानाच त्यांमधील रुढीवादाला नकार
देणारी अशी ही कविता आहे. जन्म आणि मृत्यू अशा दोन श्वासांमधील जीवन नावाचे अंतर
कापत असताना जे जीवनानुभव, जी आसक्ती आपल्या सामोरी येते, तिला आपण कसे भिडतो,
याचा वेध घेणारी, धांडोळा घेणारी आणि त्याचा लेखाजोखा मांडणारी प्रा. कडाकणे यांची
ही कविता आहे. गावातील भौतिक गोष्टींपासून सुरू होणारी त्यांची ही काव्ययात्रा
तारुण्याच्या नवथर अनुभव व अनुभूती पार करीत केव्हा आदिभौतिकाच्या मार्गाचे क्रमण
करू लागते आणि कधी त्या अनुभवांच्या पार निर्वात पोकळीत विसावण्यास सिद्ध होते, हे
लक्षातही येत नाही. नेमके हेच या कविता संग्रहातील प्रत्येक कवितेचे यश आहे, असे
म्हणावे लागते. प्रत्येक काव्यरसिकाने त्याचा आस्वाद घेतलाच पाहिजे, इतक्या
प्रत्ययकारी स्वरुपाच्या या कविता आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा