मंगळवार, २१ जानेवारी, २०२०

श्री शाहू समाधीस्थळ झाले; त्यामागचा उद्देशही जपू या!



श्री शाहू समाधीस्थळ, नर्सरी बाग, कोल्हापूर

राजर्षी शाहू महाराज यांच्या अंतिम इच्छेनुसार कोल्हापूरच्या नर्सरी बागेत सुमारे शंभर वर्षानंतर का असे ना, पण श्री शाहू समाधीस्थळ देखण्या स्वरुपात साकार झाले. त्याच वेळी आपण शाहूरायांपेक्षा शंभर वर्षे मागे आहोत, किंवा शाहू महाराज त्यांच्या काळाच्या शंभर वर्षे पुढे होते, हेही लक्षात आणून देणारी ही घटना आहे.
शाहू महाराजांच्या इच्छेनुसार गंगाराम कांबळे यांनी २ एप्रिल १९२५ साली श्री शाहू स्मारक सोमवंशी मंडळ स्थापन करून त्या माध्यमातून राजर्षींचे एक छोटे स्मारक नर्सरी बागेमध्ये उभे केले होते. दरवर्षी शाहू सप्ताह साजरा करून त्यांच्या स्मृती जागविल्या जात असत. सन १९३२मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही या स्मारकाला भेट देऊन शाहू महाराजांप्रती आपल्या आदरभावना व्यक्त केल्या होत्या. तथापि, कालौघात हे सारे उपक्रम आणि आठवणी लुप्त झाल्या होत्या. सन २०१४पासून पुन्हा या स्मारकाच्या कामाकडे नागरिकांनी लक्ष वेधले आणि खऱ्या अर्थाने समाधीस्थळाच्या पुनरुज्जीवनाला सुरवात झाली. आज हे काम पूर्णत्वाला गेले आहे. आणखीही सुशोभीकरणाची कामे करण्याचे राज्यकर्त्यांनी ठरविले आहे. या बाबी होत राहतीलच; पण, शाहू महाराजांना आपली समाधी नर्सरी बागेतच का हवी होती, तो उद्देश जपला जाण्यासाठीही सार्वत्रिक प्रयत्नांची गरज आहे. एक तर, या बागेत श्री बयासाहेब महाराज, श्री राधाबाई साहेब नं.१, श्री. जयसिंगराव घाटगे, श्री राधाबाई साहेब महाराज, श्री ताईसाहेब महाराज, श्री रावसाहेब सरलष्कर, श्री कमलजा बाईसाहेब आदी राजघराण्यातील व्यक्तींच्या समाधी आहेत. (दै. सकाळ, दि. १८ जानेवारी २०२०) पण, राजघराण्याचे समाधीस्थळ म्हणून केवळ इथे आपली समाधी व्हावी, एवढाच मनसुबा महाराजांचा नव्हता, तर त्या पलिकडे अत्यंत उदात्त विचार त्यांच्यासारख्या सहृदयी राजाने केलेला होता- तो म्हणजे ज्या अस्पृश्य समाजाला त्यांनी अत्यंत ममतेने हृदयाशी कवटाळले, ज्यांच्यासाठी प्रस्थापित समाजव्यवस्थेशी उघड संघर्ष केला, त्यांना शिक्षण व सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी अत्यंत कर्तव्यकठोरपणाने कायदेकानून केले आणि ज्या समाजाचे महाराजांना अतीव प्रेम लाभले, त्या समाजाच्या सान्निध्यात आपण कायमस्वरुपी राहावे, लोकांनी त्याच्या आठवणी जागवाव्यात आणि आपले जिवितकार्य पुढे अखंडित चालू राखावे, अशी भावना महाराजांची असल्याचे दिसते. प्रिन्स शिवाजी यांच्या मृत्यूनंतर राजपूतवाडीच्या कॅम्पवर अत्यंत संन्यस्त वृत्तीने राहणारे महाराज जेव्हा कधीही आपल्या खडखड्यातून राजवाड्याच्या दिशेने जायला निघत, तेव्हा त्यांचा पहिला थांबा या अस्पृश्य वस्तीजवळ असे. इथल्या नागरिकांची आस्थेवाईकपणे चौकशी करून गंगाराम यांच्या हाटेलात सोबत्यांसह चहापान करून मगच स्वारी पुढे वाड्याकडे रवाना होत असे. इतका जिव्हाळा या समाजासमवेत महाराजांचा जुळला होता. समता आणि करुणेचा महासागर असलेल्या शाहू महाराजांच्या मनात अस्पृश्यतेविषयी, जातिभेद किंवा कोणत्याही भेदाभेदाविषयी कमालीची चीड होती. त्यांनी व्यक्तीगत जीवनात अशा कोणत्याही भेदाला थारा दिला नाही. समतेच्या विचारांचा इतका कृतीशील पाईक त्या काळात दुसरा सापडणे अशक्यच होते. याच्यासम हाच! त्यामुळे नर्सरी बागेतील स्मारक हे या राजाच्या समतेच्या विचारांचे, समताधिष्ठित कृतीशीलतेचे संदेशवहन करणारे आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून महाराजांच्या या समतेच्या विचाराला देशभरात कृतीशीलतेचे परिमाण देऊन अंमलात आणले, त्यामुळे आजच्या समाजाच्या सार्वजनिक आचरणात जातीयता, अस्पृश्यता दिसत नाही; तथापि, जातिभेदाला खतपाणी घालून मनीमानसी रुजविण्याचे, जातीच्या बळकटीकरणाचे पद्धतशीर प्रयत्नही आजच्या भोवतालात सुरू आहेत, हे नाकारण्यात तरी काय हशील? त्यामुळे राजर्षी शाहू समाधीस्थळ हे केवळ एक चित्ताकर्षक पर्यटनस्थळ अथवा निर्जीव स्मारक होऊन उपयोग नाही. हयातभर समतेचा अखंड जागर करणारा एक महातपस्वी राजर्षी येथे चिरनिद्रा घेत आहे, त्या समतेच्या जागराची प्रेरणा देणारे हे ठिकाण आहे; ही भारताची समताभूमी आहे, या जाणीवेची सर्वदूर रुजवात होणे, हे श्री शाहू समाधीस्थळाचे प्रयोजन असायला हवे!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा