मंगळवार, २१ जानेवारी, २०२०

राजा ढाले: उपेक्षेचा प्रज्ञावंत धनी

राजा ढाले (Image Copyright: Indian Express)


राजा ढाले यांचं निर्वाण झालं आणि त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या तसंच त्यांचं जहालपण न झेपणाऱ्या अशा साऱ्यांनाच उमाळा फुटला. त्या उमाळ्याच्या दिशा वेगवेगळ्या होत्या. त्यातून राजाभाऊंची होणारी प्रतिमानिर्मिती विस्कळित स्वरुपाची होती. रंगबिरंगी काचेचे तुकडे जमिनीवर विखरावेत, मात्र त्यातून एकच एक अशी प्रतिमा हाती न लागावी, असं या साऱ्या माहौलाचं स्वरुप. ज्या राजाभाऊंनी प्रस्थापित व्हायचं नाही, या भूमिकेतून प्रस्थापितांनी ज्या ज्या गोष्टी केल्या आणि त्यातून त्यांचं प्रस्थ निर्माण केलं, त्या साऱ्याच गोष्टींना नकार दिला. त्यामुळं खरं तर चळवळीबरोबरच समाजाचंही मोठं नुकसान झालं. त्यामुळंच राजाभाऊंच्या वाङ्मयाचं, त्यांच्या हरेक निर्मितीचं डॉक्युमेंटेशन हे त्यांच्या अखेरच्या काळात सुरू झालं. त्यामध्ये मग त्यांच्या समग्र वाङ्मयाचा पहिला खंड असो, मंगेश नारायणराव काळे यांच्या खेळचा विशेषांक असो, असे मोजके निर्विवाद महत्त्वाचे प्रयत्न झाले. त्यांची दखल घेणं आवश्यक. अलिकडेच गौतमीपुत्र कांबळे यांनी सेक्युलर व्हिजनचा राजा ढाले विशेषांक काढला, तोही महत्त्वाचाय. नुकताचमाणगाव परिषदेच्या शताब्दी महोत्सव समितीच्या वतीने राजा ढाले स्मृतिविशेषांक प्रकाशित करण्यात आलाय, तो अद्याप पाहायचाय.
या पार्श्वभूमीवर एका अत्यंत महत्त्वाच्या त्रैमासिकात राजाभाऊंना श्रद्धांजली म्हणून एक लेख छापून आलाय. हा लेख वाचल्यानंतर माझ्यासारख्याला प्रश्न पडतो की, ही खरंच श्रद्धांजली आहे की संभावना? आधुनिक स्वातंत्र्योत्तर मराठी साहित्य, संस्कृती, समाज व राजकारण यांतील एक अपरिहार्य पात्र’’ असं राजाभाऊंचं वर्णन या लेखात करण्यात आलंय. राजाभाऊंना अपरिहार्य पात्र म्हणणं यासारखा दुसरा त्यांच्यावर अन्याय होणार नाही. ज्या माणसानं संपूर्ण दलित पँथर चळवळीला आपल्या अभ्यासाचं, विद्वत्तेचं अधिष्ठान देऊन तिला एक विशिष्ट उंची प्राप्त करून दिली; ज्यानं आपल्या अभ्यासपूर्ण विवेचनानं महाराष्ट्राच्या साहित्यिक-सांस्कृतिक क्षेत्रातलं राजकारण चव्हाट्यावर आणलं, ज्यानं आंबेडकरी साहित्याला प्रतिष्ठेची किनार प्राप्त करून दिली, ज्यानं आंबेडकरी पत्रकारितेला अभ्यासाचे, संशोधनाचे आयाम दिले, त्या राजाभाऊंची अपरिहार्य पात्र म्हणून संभावना करणं पूर्णतः चुकीचं आहे. यू लव्ह हिम ऑर हेट हिम, यू कॅननॉट इग्नोर हिम इतकं सरळसाधं अस्तित्व राजाभाऊंचं नव्हतं. त्याहूनही अधिक काटेकोर आणि तडफदार आणि इथल्या हरेक प्रस्थापित व्यवस्थेची शल्यचिकित्सा करून तिच्यावर उपचार करण्यास सिद्ध असलेला हा या समकाळातला एक महत्त्वाचा नेता होता. त्यानं साऱ्या प्रस्थापितांना फाट्यावर मारण्याचं धोरण कायमच सांभाळलं, पण तितक्या सहजतेनं हा समाज राजाभाऊंना फाट्यावर मारू शकत नाही, हेही तितकंच खरं. संबंधित लेखात नामदेव ढसाळ यांच्या सान्निध्यात आठेक वर्षे काम केल्यानंतर त्यांच्याच परिप्रेक्ष्यातून राजाभाऊ माहित असलेल्या या व्यक्तीनं त्यांचं काहीही न वाचता किंवा त्यांच्याविषयी काहीही जाणून न घेता अवघ्या एका भेटीच्या बळावर त्यांच्या व्यक्तीमत्त्वाचं जे दंभयुक्त मूल्यमापन केलं आहे, ते मला व्यक्तीशः स्तरहीन वाटतं. पुढं त्यांनी त्यांच्या लेखनाबद्दल वगैरे काही साहित्यिक मूल्यमापन वगैरे केलं आहे, तेही पूर्वग्रहबाधितच. पहिल्या भागानं सारीच माती केलीय एवढं खरं. श्रद्धांजली कशी असू नये, याचा हा एक उत्तम वस्तुपाठ या निमित्तानं मिळाला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यानंतर महाराष्ट्राच्या सामाजिक-सांस्कृतिक परीघामध्ये दलित-बौद्ध समाजाला जर कोणतं उच्चविद्याविभूषित, विद्वान नेतृत्व लाभलं असेल तर ते म्हणजे राजाभाऊच होय. बाबासाहेबांप्रमाणेच सप्रमाण बोलणं अन् लिहीणं, निर्भिडपणा, निडरपणा, अभ्यास, व्यासंग, सामाजिक-राजकीय चिकित्सा, परखड व वस्तुनिष्ठ धार्मिक विश्लेषण आणि त्यापुढं जाऊन देखणं कॅलिग्राफिक अक्षर, कलासक्तता, जागतिक संस्कृतीचा काटेकोर अभ्यास, साहित्य व काव्यक्षेत्रातला सजग वावर असे अनेक पैलू राजाभाऊंच्या व्यक्तीमत्त्वाला होते.
व्यक्तीगत स्तरावर सांगायचं झाल्यास मी राजाभाऊंचे एकूण तीन कार्यक्रम केले. जयसिंगपूरची धम्म परिषद आणि सांगली व कोल्हापूर येथील एकेक व्याख्यान. विशेष म्हणजे या तीनही कार्यक्रमांत त्यांनी धम्माचं विश्लेषण केलेलं होतं. इतकं नितांतसुंदर विश्लेषण मी त्यापूर्वी ऐकलं नव्हतं. खरं सांगायचं, तर राजाभाऊंमुळे मला धम्म समजून घेण्याची प्रेरणा निर्माण झाली. धम्मातील विवेकवाद, विज्ञाननिष्ठा यांविषयी मनात जाणीवा निर्माण झाल्या. त्यानंतर बाबासाहेबांचं बुद्ध आणि त्याचा धम्म समजून घेणं मला थोडं सोपं गेलं. अशा व्याख्यानांतून राजभाऊंना मी ऐकलं, प्रत्यक्ष वन टू वन भेट मात्र कधीही झाली नाही. त्यापूर्वी धम्मलिपीच्या लेखांमधून त्यांच्या परखड स्वभावाची जाणीव झालेली होती. एखादी गोष्ट तार्किकतेच्या व पुराव्यांच्या कसोटीवर पारखून घेऊन तिचे तीक्ष्ण व सूक्ष्म विश्लेषण करण्याची हातोटी हे राजाभाऊंचे अविच्छिन्न वैशिष्ट्य. अशा विश्लेषणाची पखरण धम्मलिपीच्या अंकांमधून त्यांनी केलेली आहे. बाबासाहेब जसे समतेच्या विरोधकांवर अगर जातिभेदाच्या समर्थकांवर प्रहार करीत असताना बोचरी टीका करायला कमी करीत नाहीत, तेच वैशिष्ट्य राजाभाऊंच्या लेखणीतही आढळते. त्यांच्या अतिप्रसिद्ध सत्यकथेची कथा आणि काळा स्वातंत्र्यदिन या लेखांमधून त्याची प्रचिती येतेच. समग्र वाङ्मयातले त्यांचे सर्वांगीण, चौफेर लेखन वाचल्यानंतर या माणसाच्या प्रतिभेची चुणूक आपल्याला दिसते. अगदी पळसदरीवरला ललितलेख जरी वाचला, तरी त्यांच्या चिकित्सक अन् कुशाग्र बुद्धीची जाणीव होते. छोट्या छोट्या गोष्टींमध्येही पुरावे, दाखले देऊनच लिहिण्या-बोलण्याची सवयच जणू त्यांनी स्वतःला लावून घेतलेली होती. त्यांच्या प्रत्येक लेखातून ती झळकत राहते. आंबेडकरी चळवळीत काम करणाऱ्या प्रत्येक नेता-कार्यकर्त्याला प्रस्थापित व्यवस्थेच्या अनेक प्रश्नांची उत्तरे द्यावी लागत असतात. त्याच्या स्वतःसमोरही अनेक प्रश्नांचे मोहोळ उठलेले असते, तेही शमवायचे असते. आणि मगच त्याचा काही पावलं पुढं जाण्याचा मार्ग मोकळा होतो. त्यावेळी ही व्यासंगाची सवय ज्याने लावून घेतली असेल, तोच पुढे पाऊल टाकू शकेल, अन्यथा ही व्यवस्था तुम्हाला तिच्यासमोर नतमस्तक व्हायला भाग पाडते. त्याचवेळी तुमच्या चळवळीची वा आंदोलनाची भविष्यातील वाटचालही निश्चित झालेली असते- अंधाराच्या दिशेने.
राजाभाऊंच्या कार्याविषयी आपल्या समाजात किती अनास्था होती, याचं एक उदाहरण दिल्याखेरीज राहवत नाही. सत्तरच्या दशकात पँथर चळवळ गाजविलेले राजाभाऊ महाराष्ट्रालाच नव्हे, तर महाराष्ट्राबाहेरही माहिती झालेले होते. या पार्श्वभूमीवर, माणगाव येथे महाराष्ट्र शासनाच्या वतीने माणगाव परिषदेचा ६१वा स्मृती महोत्सव मोठ्या दणक्यात साजरा करण्यात आला. महोत्सवाचा समारोप परिसंवादाने झाला. यावेळी जोगेंद्र कवाडेंच्या इंदिरा गांधी व काँग्रेसवरील हल्ल्याने आयोजक घायाळ व हवालदिल झाले. ते असो! पण, या परिसंवादाच्या वार्तांकनामध्ये दक्षिण महाराष्ट्रातील एका आघाडीच्या वृत्तपत्राच्या बातमीदाराने यावेळी राजा ढाले या अन्य दुसऱ्या एका दलित नेत्याचेही प्रक्षोभक भाषण झाले. असे एकाच वाक्यात त्यांना संपविले आहे. यातला दुसऱ्या हा शब्द माझ्यासाठी अधिक वेदनादायी आहे. खरे तर कवाडेंच्याही आधी आंबेडकरी चळवळीच्या प्रथम फळीत स्थान असलेल्या या नेत्याची ही संभावना प्रस्थापित माध्यमांनी अशीच अखेरपर्यंत चालविली, हे जितके खरे, तितकेच राजाभाऊंनीही त्यांच्या या वर्तनाची बिलकुल भीडभाड ठेवली नाही, अगर त्यांच्या लांगुलचालनाचे धोरण स्वीकारले नाही, हे त्याहून खरे!
राजाभाऊंच्या विषयी अनेक प्रवाद आहेत. काही खरे आहेत, काही जाणीवपूर्वक पसरवले गेलेले आहेत. तो एका स्वतंत्र चर्चेचाच विषय आहे. तथापि, प्रा. विनय कांबळे या त्यांच्या अत्यंत जवळच्या सहकारी मित्राने त्यांच्याविषयी एक किस्सा सांगितला, तो येथे देतो म्हणजे राजाभाऊ काय होते, हे वेगळे सांगण्याची आवश्यकता भासू नये. प्रा. कांबळे सांगतात की, राजाभाऊंना कधीही भेटायला जायचे झाले किंवा ते कधी येणार म्हटले की मोठे दडपण यायचे. आम्ही विक्रोळीला त्यांच्या घरी गेलो की दार उघडून गालातल्या गालात स्मित करीत ते या म्हणायचे. आत जाऊन बसलो की, पहिला प्रश्न, कधी आलात?, पुढचा प्रश्न, कुठे उतरलात? आणि त्यापुढचा प्रश्न- काही खाल्लंत की तसेच आहात? या तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर नकारात्मक असेल तर घरात किंवा समोरच्या हॉटेलात आधी खायला घालत. आणि यानंतरचा जो प्रश्न असायचा, ज्याचं आमच्यावर दडपण असायचं, ते म्हणजे आपल्या गेल्या भेटीपासून ते आजपर्यंत काय वाचलंत?’ या प्रश्नाचं उत्तर द्यावंच लागायचं. ते दिल्यानंतर आणखी एक पुढचा प्रश्न असे, याचा आपल्या चळवळीला, आपल्या समाजाला काय उपयोग? मग त्यावर राजाभाऊंसमवेत आमची तपशीलवार चर्चा व्हायची. मग ते आपण काय वाचलं ते सांगायचेच, शिवाय नवीन काही वाचनासाठी सुचवायचे. नवीन काही लिहीलेलं वाचायला द्यायचे. अगदी इंग्रजीमधील दर्जेदार साहित्याशीही आमच्यासारख्या मराठीच्या माणसांना जोडण्याचं काम राजाभाऊंनी केलं.
प्रा. विनय कांबळे यांच्या या एका अनुभवातून राजाभाऊंची तळमळ आपल्या लक्षात आल्याखेरीज राहात नाही. राजाभाऊंची ही ध्येयनिष्ठा लक्षात घेतली तर बाकी साऱ्या वाद-प्रवादांना आपण फाट्यावर मारायला हरकत नाही. राजाभाऊंच्या बाबतीत एक गोष्ट राहून राहून वाटते, ती म्हणजे प्रस्थापितांना नकार देताना स्वतःलाही प्रस्थापित होण्यापासून रोखण्याचं अजब असाध्य राजाभाऊंनी साध्य केलं होतं. ही गोष्ट सोपी नाही. मात्र, त्याचमुळे आंबेडकरोत्तर कालखंडातला दुसरा आंबेडकर होण्याची शक्यता सुद्धा याचमुळे लयाला गेली. किंबहुना, बाबासाहेबांनी या देशातल्या तमाम धर्मांध, जातीय शक्तींशी महान लढा उभारला, तो त्यांनी आपली आपल्या प्रखर विद्वत्ता आणि प्रज्ञेची उंची व प्रतिभा वाढविल्यामुळेच! बाबासाहेब या बाबतीत कुठे जराही कमी पडले असते, तर भारतीय समाजाने त्यांचे काय केले असते, याचे राजा ढाले हे उत्तम उदाहरण ठरावे!

२ टिप्पण्या: