बुधवार, ८ जुलै, २०२०

गुरू अन् आत्मविश्वास प्रदाता अधिविभाग


टीम बीजेसी: बीजेसीच्या मौखिक परीक्षा झाल्यानंतर अखेरच्या दिवशी शशिकांत मुळ्ये सरांनी काढलेले छायाचित्र. यात डॉ. अशोक चौसाळकर, डॉ. ओमप्रकाश कलमे, जगन्नाथ पाटील, ज्येष्ठ पत्रकार दशरथ पारेकर यांच्यासमवेत आम्ही विद्यार्थी. 

जगन्नाथ पाटील सरांसमवेत दिल्ली-आग्रा अभ्यास सहलीदरम्यान ताजमहालसमोर टीम बीजेसी.

हैदराबादच्या रामोजी फिल्मसिटीला भेट देणारी आमची एमजेसीची पहिलीच बॅच.


(शिवाजी विद्यापीठाचा वृत्तपत्रविद्या व संवादशास्त्र अधिविभाग यंदा सुवर्णमहोत्सव साजरा करीत आहे. त्या निमित्ताने या विभागातील सन १९९८ ते २००० या दोन वर्षांच्या शैक्षणिक कालावधीतील आठवणींना दिलेला उजाळा...)

शिवाजी विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या व संवादशास्त्र अधिविभागाचा माजी विद्यार्थी म्हणून जेव्हा मी विचार करू लागतो की, या विभागाने मला नेमके काय दिले? तेव्हा उत्तरादाखल दोन बाबी प्रकर्षाने माझ्यासमोर येतात, त्या म्हणजे डॉ. अशोक चौसाळकर यांच्यासारखा गुरू आणि आत्मविश्वास होय.

वृत्तपत्रविद्या व संवादशास्त्र अधिविभागात प्रवेश घेण्याबाबत चौकशीसाठी आलेल्या दिवसापासून तत्कालीन अधिविभागप्रमुख डॉ. चौसाळकर सरांचा माझ्यावर इतका प्रभाव पडला की आजही तो तसूभर सुद्धा कमी झालेला नाही. त्यांच्याविषयी मी संधी मिळेल तेव्हा विविध व्यासपीठांवरुन लिहीले आहेच. सरांचे सहकार्य, तत्पर मार्गदर्शन, ताज्या विषयांबाबत सर्वंकष संदर्भ गोळा करून त्यांची मुद्देसूद मांडणी करण्याची हातोटी या साऱ्या बाबींचा माझ्यावर मोठा प्रभाव आहे. माझ्या पीएच.डी.च्या विषय निवडीपासून ते ती पूर्ण होईपर्यंत प्रत्येक टप्प्यावर मला लाभलेले मार्गदर्शन किती मौलिक स्वरुपाचे आहे, हे शब्दांत मांडणे कठीण आहे. डॉ. ओमप्रकाश कलमे यांची संज्ञापनशास्त्र शिकविण्याची हातोटी, डॉ. निशा मुडे-पवार यांच्यामुळे आंतरराष्ट्रीय पत्रकारितेचा अभ्यास करण्याची जागृत झालेली प्रेरणा, डॉ. जगन्नाथ पाटील आणि दयानंद कांबळे यांच्या सान्निध्यात ब्रॉडकास्ट जर्नालिझमशी झालेला परिचय, आदरणीय गोविंद पानसरे यांच्याकडून राज्यघटनेचे कलम १९-१ (अ) सलग आठवडाभर शिकण्याचा आनंद, शशिकांत मुळ्ये यांनी छायाचित्रण कलेशी करून दिलेली ओळख व करून घेतलेल्या विविध असाईनमेंट्स या आणि अशा कित्येक बाबी या विभागानं आम्हाला दिल्या. माजी अधिविभाग प्रमुख डॉ. रत्नाकर पंडित यांच्या ऋजू स्वभावाचा तर मी चाहताच आहे. पीएच.डी.चे ते माझे मार्गदर्शक. त्यांचा अथक लकडा माझ्यामागे नसता तर कदाचित माझ्या हातून हे संशोधन पूर्ण झाले असते की नाही, याविषयी माझा मलाच संदेह वाटतो. याखेरीज ज्येष्ठ संपादक दशरथ पारेकर, डॉ. कविता गगराणी, वरिष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांचा स्नेह सुद्धा याच कालावधीत लाभला. पत्रकारितेत कार्यरत अनेक संपादक, पत्रकार यांचा परिचय सुद्धा याच कालावधीत झाला. त्यामुळे स्थानिक पत्रकारितेशी एक प्रकारची जवळीक व आत्मियता निर्माण झाली.

बीजेसीमध्ये असताना जगन्नाथ पाटील यांच्यासमवेत केलेली दिल्ली-मुंबई अभ्यास सहल आणि एमजेसीमध्ये डॉ. निशा मुडे यांच्यासमवेत केलेली तिरुपती-हैदराबादची अभ्यास सहल या अत्यंत अविस्मरणीय ठरल्या. त्या सहलींच्या आठवणी आजही जागविताना खूप छान वाटते. या सहलीमुळेच हैदराबादच्या रामोजी फिल्मसिटीविषयी आपल्या परिसरातला पहिला माहितीपर लेख सकाळच्या कलारंजन पुरवणीसाठी मला लिहीता आला, ही सुद्धा एक नोंद घेण्यासारखी बाब आहे. शिकत असतानाच त्यावेळचा टीव्ही सुपरस्टार शेखर सुमन आणि अतुल परचुरे यांची मुलाखत घेता आली. त्यांना अनुक्रमे सकाळच्या कला-रंजन आणि लोकमतच्या चित्रगंधा या पुरवण्यांमध्ये उत्तम स्थानही लाभले, या माझ्या विद्यार्थी दशेतल्या छापून आलेल्या महत्त्वाच्या लेखांच्या आठवणी मला आजही खूप प्रेरणा देतात.

या कालावधीत जोडल्या गेलेल्या मैत्राविषयी लिहावयाचे, तर त्यासाठी वेगळे पुस्तकच लिहावे लागेल; इतके हरहुन्नरी, तऱ्हेतऱ्हेचे पण जीवापाड प्रेम करणारे मित्र-मैत्रिणी मला लाभले. आज एकमेकांपासून कदाचित दूर असलो तरी आमचा स्नेह, प्रेम कायम आहे. जेव्हा एकमेकांची आठवण होते, एकमेकांना गरज असते, तेव्हा आम्ही एकत्र असतो. ही या विभागाचीच देण होय.

हे गुरूंचं देणं आणि मैत्राचं लेणं, जसं विभागानं मला दिलं, तसंच माझ्या आयुष्यामध्ये पत्रकारिता आणि जनसंपर्काच्या क्षेत्रात कोणत्याही परिस्थितीत काम करण्याचा आत्मविश्वास इथल्या शिक्षणानं माझ्यात पेरला, हे मी प्रांजळपणाने सांगू इच्छितो. विभागाच्या अभ्यास सहलींव्यतिरिक्त विविध सेमिनारमधील सादरीकरणे, गटचर्चा, मान्यवर पत्रकार, संपादकांची विशेष व्याख्याने, विविध कार्यक्रम-उपक्रमांच्या आयोजनातील सक्रिय सहभाग, त्यांचे वृत्तलेखन, विद्यापीठाबाहेरीलही व्याख्याने-कार्यक्रमांना उपस्थिती, माध्यमविद्या व संज्ञापक यांच्यासाठीचे लेखन व संपादन, छायाचित्रण कलेचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण, डॉक्युमेंटरी निर्मिती, लघुशोधप्रबंध लेखन आदी विविध बाबींमुळे कोणत्याही क्षेत्रात गेलो तरी यशस्वी होऊ, असा आत्मविश्वास निर्माण झाला. त्यामुळेच गेल्या साधारण वीस वर्षांमध्ये केबल न्यूज निर्माता, सकाळसारख्या दैनिकात उपसंपादक, महाराष्ट्र शासनात सहाय्यक संचालक (माहिती), लोकराज्यचा सहसंपादक, शासनाच्या महान्यूज वेबपोर्टलचा संस्थापक-सहसंपादक, उपमुख्यमंत्री कार्यालयाचा जनसंपर्क अधिकारी, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळात व्यवस्थापक (जनसंपर्क), जिल्हा माहिती अधिकारी, सहाय्यक कुलसचिव अशा विविध पदांवर मला यशस्वीपणे काम करता आले. व्यक्तीगत जनसंपर्क, शासकीय जनसंपर्क आणि संस्थात्मक जनसंपर्क अशा जनसंपर्काच्या विविध आघाड्यांवर काम करता आले. या सर्व ठिकाणी काम करीत असताना अनुभवाचे उत्तम संचित गोळा करता आले.

विभागाने प्रदान केलेला हाच आत्मविश्वास नव्या पिढ्यांमध्ये पेरण्याचे काम शक्य होईल, तितके मी आता करीत असतो. नवी पिढी प्रचंड गतिमान आहे, हुशार आहे, सजग आहे, महत्त्वाचे म्हणजे तिला माहिती तंत्रज्ञानाचे पंख लाभले आहेत. या पंखांच्या सहाय्याने भरारी घेत असताना त्यांची दिशा योग्य राहील, याची दक्षता आपल्यासारख्या असंख्य माजी विद्यार्थ्यांची आहे, अशी माझी भावना आहे. त्यातही पत्रकारिता आणि जनसंपर्काचे क्षेत्र इतके सर्वव्यापी आहे की आपल्या विभागाचा विद्यार्थी जवळपास प्रत्येक महत्त्वाच्या शहरात, करिअरच्या क्षेत्रात आणि शासकीय विभागांतही असल्याचे दिसते. या साऱ्यांच्या अनुभवाचा लाभ अधिविभागाने आपल्या प्रत्येक बॅचला मिळवून दिला पाहिजे. दरवर्षी माजी विद्यार्थ्यांमधले काही जणांनी जरी येऊन आपले अनुभव विद्यार्थ्यांशी शेअर केले, तरी त्यातून आजी विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअरची दिशा सापडण्यास ते मार्गदर्शक ठरेल, असे वाटते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा