सोमवार, २८ सप्टेंबर, २०२०

पृथ्वीला सावरणाऱ्या हातांचं प्रेमकाव्य!

 



उरापोटावर पाण्यास वाहाती।। कचरा घालीती।। शेणामध्ये।।१।।

कासोटा घालून शेण तुडवीती।। गोवऱ्या थापीती।। उन्हामध्ये।।२।।

महात्मा फुले यांच्या या अखंडानं सुरवात करून शेणाच्या जन्माचं सार्थक करता करता स्वतःच खांड होऊन जळणाऱ्या आणि घरादाराला पोतीरा फिरवणाऱ्या पोरींसाठीच हा काला... अशा हृद्य अर्पणपत्रिकेपासून मनाचा ताबा घेणारा शेणाला गेलेल्या पोरी हा चंद्रशेखर कांबळे यांचा कवितासंग्रह आजच्या समस्त कवितेच्या गदारोळात वेगळा उठून दिसणारा महत्त्वाचा प्रयोग आहे. संग्रह हाती घेतला तेव्हा संग्रहात एखादी कविता पुस्तक शीर्षकाची असेल, असा माझा समज होता. पण, एकेक पान उलटत गेलो आणि अगदी अखेरच्या पानापर्यंत शेणाला गेलेल्या पोरींच्या भावविश्वात गुंतून पडलो, हरपून गेलो, अस्वस्थ झालो. सुमारे ११२ पानांमध्ये आपल्या गावगाड्यातल्या पोरींचं अस्वस्थ वर्तमान कवीनं अत्यंत संवेदनशीलतेनं मांडलं आहे. गावच्या पोरींचं जगणं, जळणं हे सारंच इथं शेणीच्या प्रतीकातनं सामोरं येत जातं, बोचकारत जातं, कुरतडत जातं. अस्वस्थतेबरोबरच आपण त्यांच्यासाठी काहीच करू शकत नसल्याची असहायतेची, अपराधीपणाची भावनाही काही ठिकाणी निर्माण होते. गावगाडा त्यांच्या जगण्याला न्याय देण्यात परंपरेनं कसा कमी पडत गेला आहे, त्यांचं जगणं मरणं, सारंच कसं दुर्लक्षित राखलं जातं, राहतं, हे कवी आपल्याला वेगवेगळ्या अंगानं सांगत राहतो.

शेणाला गेलेली पोर

नाही परतली दिसभर

घर गावाची पावलं

पसरत गेली रानभर...

असं म्हणून तो त्या हरवलेल्या पावलांची गोष्ट सांगायला सुरवात करतो आणि आपणही त्या शोधयात्रेत असोशीनं सामील होतो आणि अखेरीस -

मेल्यानंतर उरते,

शेणी आणि पोरीत असं हिरवंगार पाणी

असं म्हणून भीषण वास्तवाची जाणीवही करून देतो. म्हणायला या साठ कविता आहेत. पण, आपल्या पोरींच्या जगण्याचं आणि मरण्याचं एक महाकाव्यच आहे. राजन गवस सरांनी त्यांच्या अभिप्रायामध्ये शेणीच्या प्रतीकाआडून पोरींच्या मनाचा तळ ही कविता शोधते, हेच या कवितेचं बलस्थान आहे, असं म्हटलं आहे. त्याची प्रचिती संग्रहाच्या पानोपानी येत राहते.

हा संग्रह वाचताना मला कुसुमाग्रजांच्या पृथ्वीच्या प्रेमगीताची वारंवार आठवण येत होती. पण, त्याचा ढाचा अन् साचा वेगळा होता. चंद्रशेखरांनी घेतलेला हा वेध खूप वेगळा आहे. पृथ्वीला सावरणाऱ्या, सजवणाऱ्या हातांचं ते प्रेमकाव्य आहेच, पण, त्यांचं रुदन, त्यांचा दाबला जाणारा आवाज अन् आक्रोशही बिटविन द लाइन्स अधोरेखित करणारं आहे. मराठी कवितेमधील एक अभिनव आणि महत्त्वाचा प्रयोग म्हणून हा संग्रह संस्मरणीय ठरेल, असा विश्वास आहे.

(दर्या प्रकाशनानं हे पुस्तक प्रकाशित केलं आहे. त्याच्या मागणीसाठी ७८४१०५६३०१ आणि ७७७५८१५५३० या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधता येईल.)

1 टिप्पणी: