मंगळवार, ३ नोव्हेंबर, २०२०

तुम अपना देखो, मैं अपना देखूँ...

('दै. पुढारी'च्या साप्ताहिक बहार पुरवणीत रविवार, दि. १ नोव्हेंबर २०२० रोजी प्रकाशित झालेला लेख दै. पुढारीच्या सौजन्याने माझ्या ब्लॉगवाचकांसाठी पुनर्प्रकाशित करीत आहे.- डॉ. आलोक जत्राटकर) 
तुम अपना देखो, मैं अपना देखूँ.. असं म्हणत कोविड-१९च्या लॉकडाऊनच्या काळात ओटीटी प्लॅटफॉर्मनी घराघरात, नव्हे हाताहातात स्थान मिळवलं. लॉकडाऊन त्यांच्या पथ्यावर पडलं. अनेक प्रस्थापित कंपन्या आता या क्षेत्रात उतरताहेत. मात्र, या माध्यमातून दर्शकाच्या माथी कोणत्या प्रकारचा कन्टेन्ट मारला जाणार? त्याला दर्जेदार काही मिळणार की नाही, असा सवाल उपस्थित करणारा लेख...


कोविड-१९च्या महामारीमुळं सक्तीचं लॉकडाऊन झेलावं लागलेल्या देशवासियांना आधार राहिला तो केवळ प्रसारमाध्यमांचा! टीव्ही, रेडिओ, वर्तमानपत्रं आणि हातातल्या स्मार्टफोनमधील सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स. याच काळात टीव्हीच्या साचेबद्ध कन्टेन्टपलिकडचा कन्टेन्ट देऊन ओटीटी (ओव्हर द टॉप) प्लॅटफॉर्म्सनीही आपलं चांगलंच बस्तान बसवलं आणि लोकप्रियताही प्रस्थापित केली. मनोरंजनाचं पर्यायी व्यासपीठ म्हणून या काळात ही व्यासपीठं पुढं आली. चित्रपटगृहं बंद असण्याच्या काळात चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी पसंद म्हणूनही पुढं आले. अमिताभचा गुलाबो-सिताबो, सुशांत सिंह राजपूतचा दिल बेचारा ही त्याची उदाहरणं. आता हे चित्रपट यशस्वी झाले किंवा कसे, याचं मोजमाप करणं अवघड असलं तरी सरासरी दर्शक त्यांना लाभला, असं म्हणता येईल. आणि सदैव उपलब्ध असल्यानं आजही दर्शक ते पाहात असतात.

भारतात ओटीटी प्लॅटफॉर्म पुरविणाऱ्या टेलिव्हिजन वितरक कंपन्यांमध्ये डेन नेटवर्क, डीटूएच, टाटा स्काय, एअरटेल डीटीएच, सन आदी आहेत. रिलायन्स जिओ, भारती एअरटेल, व्ही या टेलिकॉम कंपन्या आहेत. सारेगामा, टीव्हीएफ प्ले, फिल्टरकॉपी, इरॉस नाऊ, आल्टबालाजी आदी कन्टेन्ट प्रोव्हाइडर तर डिस्ने+हॉटस्टार, झी-५, सन एनएक्सटी आदी ब्रॉडकास्टर आणि अमेझॉन प्राईम व्हिडिओ, नेटफ्लिक्स, एमएक्स प्लेअर, व्हूट इत्यादी स्वतंत्र ओटीटी प्लॅटफॉर्म असणाऱ्या कंपन्या आहेत.

लॉकडाऊनच्या काळात ओटीटी व्यासपीठांनी ज्या प्रकारे कामगिरी केली त्यावर एक नजर टाकली असता असं दिसतं की, साधारण एप्रिल-मे २०२० या तीव्र लॉकडाऊनमध्ये साधारण ४३७.४ दशलक्ष लोकांनी या प्लॅटफॉर्मकडे आपला मोर्चा वळवला. तर त्यांच्या सबस्क्रीप्शनमध्ये सुमारे ७५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. वैविध्यपूर्ण प्रकारचा कन्टेन्ट ही या ओटीटी व्यासपीठांची क्षमता आहे, त्याच वेळी अपवाद वगळता बहुतांशी व्यासपीठांनी आपला कन्टेन्ट क्राईम-सेक्स-थ्रिलर आणि व्हायोलन्स (सीएसटीव्ही) या चतुःसूत्रीभोवती अधिकतर गुंफला आहे. दर्शकाला गुंगवून, गुंतवून ठेवण्यासाठी आणि त्याला आपल्याच व्यासपीठाकडे येण्यास प्रवृत्त करण्याकरिता अशा प्रकारच्या कन्टेन्टची रचना केली जाते. यामागे आता कंपन्यांची व्यावसायिक गणिते काम करू लागली असली, तरी त्यामुळे उत्तमोत्तम कन्टेन्ट निर्मितीच्या पुरेपूर शक्यता असतानाही सीएसटीव्हीच्या चौकोनात ही व्यासपीठे गुरफटलेली दिसतात. सध्या कोणत्याही प्रकारची सेन्सॉरशीप नसणं, हा स्वातंत्र्याचा स्वैराचार म्हणावा, इतका गैरफायदा घेणाऱ्याही काही वेब सिरीज आहेत. गरज नसताना शिव्यांचा भडिमार, सॉफ्ट पोर्नकडं झुकणारी उत्तान दृश्यं, स्त्री देहाचं नको तितकं प्रदर्शन, प्रचंड हिंसाचार, गुन्हेगारीचं अतिरेकी उदात्तीकरण या गोष्टी त्यातून घडताहेत. कथेची गरज या नावाखाली अशा गोष्टी केल्या जातात, पण काहीही करून दर्शक मिळवण्याचा हेतू त्यातून लपून राहात नाही. कुशल बद्रिके, संतोष जुवेकर हे मराठी पडद्यावरचे नावाजलेले, गुणी (?) कलाकार. या दोघांनी स्ट्रगलर साला ही वेब सिरीज केली. सुरवातीला तिचं कौतुक झालं. दर्शकही चांगले लाभले. पण, पुढं पुढं वाक्यागणिक, शब्दागणिक त्यांनी शिव्यांचा असा भडिमार करायला सुरवात केली की त्यांचा कंटाळा आला. चांगली कन्सेप्ट घेऊन केलेला, उत्तम होण्याच्या शक्यता असलेला एक चांगला प्रयोग त्यांच्या या शिव्या-प्रयोगानं नकोसा झाला. अमेय आणि निपुणचा कास्टिंग काऊचचा प्रयत्न दखलपात्र ठरला; मात्र, पुढं त्याला सेलिब्रिटींच्या मर्यादा पडल्याचं जाणवलं.

हिंदी वेबसिरीजमध्येही सर्रास शिव्यांचा भडिमार आढळतो. सामाजिक परिस्थिती, भोवताल प्रत्ययकारितेनं दाखवण्यासाठी, बिंबविण्यासाठी शिव्या वापरल्या जातात. पण, किती प्रमाणात? F*#K हा शब्द हॉलिवूडनं गेल्या शंभर वर्षांच्या इतिहासात वापरला नसेल, इतक्यांदा आपला तो वर्षभरातच वापरून झालाय, असं वाटतं ऐकताना व पाहताना. शिवी न वापरता अन्य आक्रमक शब्दांचा वापर करून कथेची, परिस्थितीची तीव्रता वाढविता येतेच की. पण, आपली सारी प्रतिभा हे सारे सेन्सॉर्ड शब्द अनसेन्सॉर्ड माध्यमात वापरण्याकडं लागलेली आहे. आताच संयम बाळगला, सेल्फ रेग्युलेशन्स घालून घेतली, तर उद्या सरकारी सेन्सॉरची भीती बाळगायची गरज नाही. स्वातंत्र्य आहे, म्हणून स्वैराचार करायचा आणि पुढं सरकारनं निर्बंध घातले की घटनेतल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं कलम पुढं करून त्याआड लपायचं. असं करण्याची खरंच गरज काय? तसंही आता ओटीटी व्यासपीठांनाही काही तरी सेन्सॉर असावं, म्हणून काही व्यक्ती, संस्था सर्वोच्च न्यायालयात गेलेल्या आहेतही!   

काही बडी नावं या वेब सिरिजच्या माध्यमातून झळकताहेत. आर. माधवन, अभिषेक बच्चन, राधिका आपटे, सुश्मिता सेन, सैफ अली खान, नवाजुद्दीन सिद्दीकी, मनोज बाजपेयी, दिया मिर्झा, अली जफर, के.के. मेनन अशी काही नावं वानगीदाखल सांगता येतील. नुकतंच आश्रमया वेब सिरीजच्या माध्यमातून ज्येष्ठ निर्माते-दिग्दर्शक प्रकाश झा यांनी या क्षेत्रात पदार्पण केलंय. झा हे वास्तवाला भडकपणाची डुब देऊन पुन्हा तेच कसं वास्तव आहे, अशा ड्रामाटाइज्ड पद्धतीनं सादर करण्यात माहीर आहेत. आणि इथं तर सेन्सॉरही नाही. बाबा राम रहीमच्या (रंगेल) प्रकरणावर आधारित असणाऱ्या या सिरीजमध्ये सर्व आवश्यक मटेरियल ठासून भरलेले आहेच, शिवाय, सस्पेन्स-ड्रामाची फोडणीही आहे. म्हणजे मामला एकुणात हिट आहे. थेट नसले तरी सिरीजच्या माध्यमातून आलेले बायोपिकच हे. पण, आपण जिनिअस (आइनस्टाईन, पिकासो) सारख्या ट्रु टू लाइफ बायोपिक्स का निर्माण करू शकत नाही? आपल्याकडं किती तरी लिजंड्स आहेत. फक्त अस्मिताकरण आणि दैवतीकरणाच्या नादात आपण त्यांचं माणूसपण घालवून बसलो आहोत आणि आपलं दैवत जन्मल्यापासून मरेपर्यंत महानच होतं, त्याचं तसंच सादरीकरण झालं पाहिजे, हा अनाठायी राजकारण-प्रेरित आग्रह आपल्याला तसं करण्यापासून रोखतो आहे का, याचाही कधी तरी विचार करण्याची गरज आहे.

ओटीटी प्लॅटफॉर्मवर उत्तम प्रकारचा कन्टेन्ट असणाऱ्या वेब सिरिजही आहेत. पाताल लोक, बंदिश बँडिट्स, स्पेशल ओपीएस अशी काही नावं सांगता येतील. पूर्वी एपिकवरुन सादर झालेल्या रविंद्रनाथ की कहानियाँही आहेत. पण त्या सध्या तरी अपवादच म्हणाव्या लागतील. आता मनोरंजन क्षेत्रातल्या मोठमोठ्या कंपन्यांनी या प्लॅटफॉर्मकडं आपला मोर्चा वळवला असल्यानं इथून पुढं तरी चांगला कन्टेन्ट निर्माण होईल, अशी अपेक्षा ठेवता येईल का, की या कंपन्याही महसूल आणि व्यवसाय वाढविण्याच्या नादात प्रस्थापित मार्गानंच जाऊन स्पॉईल होतील, हे पाहावं लागेल.

खरं तर, मागणी तसा पुरवठा हे सूत्र न अवलंबता अत्यंत दर्जेदार कन्टेन्ट या व्यासपीठांवरुन निश्चितपणे देता येणं शक्य आहे. तरुणांना लव्ह, सेक्स, व्हायोलन्स, थ्रिलर यातच रस आहे, असं आपणच ठरवून तसाच कन्टेन्ट त्यांना देत राहाणं, योग्य नाही. प्रत्यक्षात आजच्या तरुणाला विरंगुळा तर हवाच आहे, पण त्या बरोबर काही तरी चांगलंही हवंय. त्यासाठी तो जगभरातल्या सर्व भाषांतल्या वाहिन्या, वेबसाइट्स धुंडाळतोय. ते त्याला आपल्या माध्यमांतून, आपल्या भाषांतून देऊ शकण्याची क्षमता आपल्यात आहे. तसं सकस साहित्यही आहे आपल्याकडं. तशी इच्छाशक्ती मात्र हवीय.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा