वारणा विज्ञान केंद्राचे समन्वयक डॉ. जॉन डिसोझा आणि त्यांचे सहकारी प्रितेश लोले यांच्यासमवेत जत्राटकर कुटुंबिय. |
एकविसाव्या शतकात आपण स्वतःला एक वैज्ञानिक समाज
म्हणवून घेतो; मात्र प्रत्यक्षात आपल्या बहुतांश कृती या विज्ञानवादाला धाब्यावर
बसविणाऱ्या असतात. या शतकातील पिढी ही चिकित्सक, बहुआयामी घडविण्यासाठी जे काही
करावयास हवे, त्यामध्ये पूर्णतः यशस्वी झालो आहोत, असे म्हणता येत नाही. ‘WHY?’ असे विचारण्यास ना
आपण आपल्या मुलांना प्रोत्साहन देतो किंवा त्या ‘WHY?’चे उत्तर देण्यास कोणी पालक, शिक्षक पुढे
सरसावतो. याला काही सन्माननीय अपवाद आहेतही. पण, बहुतांशी समाजाचे चित्र विपरित
आहे. विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानविषयक गोडी निर्माण व्हावी, त्यांच्यात जिज्ञासा
निर्माण व्हावी, त्यांचे कुतूहल शमन व्हावे आणि अधिक विज्ञानवादी दृष्टीकोन
त्यांच्यात विकसित व्हावा, यासाठी प्रयत्न करणाऱ्या अनेक व्यक्ती, संस्था आहेत.
त्यापैकी दक्षिण महाराष्ट्रातील एक अत्यंत महत्त्वाचे केंद्र वारणानगर येथील
तात्यासाहेब कोरे शैक्षणिक संकुलामध्ये विकसित करण्यात येत आहे. तात्यासाहेब कोरे
फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य आणि आमचे सन्मित्र डॉ. जॉन डिसोझा यांच्याकडून
गेली तीनेक वर्षे या विज्ञान केंद्राबद्दल आणि तेथे विकसित करण्यात येत असलेल्या
वैज्ञानिक सोयीसुविधांबद्दल, उपक्रमांबद्दल माहिती मिळत होती. त्यामुळे वारणानगरचे
वारणा सायन्स अँड इनोव्हेशन अॅक्टिव्हिटी सेंटर प्रत्यक्ष पाहण्याची ओढ
लागून राहिली होती. मुळातच तात्यासाहेब कोरे यांच्या स्वप्नातून साकार झालेल्या
वारणानगर परिसराविषयी आणि येथील विविध उपक्रमांविषयी माझ्या मनात नितांत आदर आहे. चांगल्या
भावनेतून चालविलेली सहकार चळवळ एखाद्या विभागाचे रुपडे कसे पालटून टाकू शकते, याची
कोल्हापूर परिसरात अनेक उदाहरणे आहेत, त्यात वारणानगर अग्रेसर आहे. सहकाराच्या
माध्यमातून झालेल्या विकासाचा लाभ मिळवून देत शैक्षणिक सुविधांची उभारणी येथे
करण्यात आली. वारणेचा ‘बाल वाद्यवृंद’ हा तर माझ्या लहानपणापासूनचा जिव्हाळ्याचा विषय.
असो! तर,
अशा या समाजाभिमुखता जपणाऱ्या वारणा समूहाच्या शैक्षणिक संकुलात महाराष्ट्र शासनाच्या
राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाच्या सहकार्यातून वारणा सायन्स अँड इनोव्हेशन
अॅक्टिव्हिटी सेंटर साकारले आहे. डॉ. जॉन डिसोझा यांनी त्यासाठी केलेला
पाठपुरावा आणि मा. विनयरावजी कोरे यांना त्यांचे लाभलेले प्रोत्साहन यामुळे
वारणानगरच्या शैक्षणिक संकुलात सुमारे तीन एकर परिसरावर हे विज्ञान केंद्र
उभारण्यात आले आहे. डॉ. डिसोझा हे खरे तर फार्मसीचे तज्ज्ञ. त्यांच्या क्षेत्रात
तर ते एक अग्रगण्य संशोधक आहेतच. मात्र, त्यांनी ज्या आत्मियतेने वारणेचे हे
केंद्र साकारण्यासाठी योगदान दिले आहे, त्याचे कौतुक करण्यास शब्द अपुरे आहेत. ते
जेव्हा अत्यंत निरलसपणे या कामाच्या उभारणीबद्दल आपलेपणाने सांगत असतात, त्यावेळी माझ्या
मनात त्यांच्याविषयी अभिमानाची भावनाच केवळ दाटून येत राहिली. प्रत्येक
संस्थेमध्ये असे डिसोझा असतात, गरज असते ती फक्त त्यांना ओळखून त्यांच्या पाठीवर प्रोत्साहनाचा
हात ठेवण्याची.
सन २०१७ साली ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ पद्मश्री डॉ.
अनिल काकोडकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेल्या या विज्ञान केंद्रात
विद्यार्थ्यांना मूलभूत विज्ञानाचा परिचय करून देणाऱ्या, दैनंदिन जीवनातील घडामोडींमागील
वैज्ञानिक तथ्ये आणि सत्ये समजावून सांगणाऱ्या अनेक गोष्टी, अनेक साधने, उपकरणे,
प्रयोग आणि खेळणी आहेत. हसत-खेळत विज्ञान कसे शिकावे, शिकवावे, याचे हे केंद्र
मूर्तीमंत प्रतीक आहे. येथे गेल्या तीन वर्षांत सुमारे २० हजारांहून अधिक
विद्यार्थी, शिक्षकांनी भेट दिली आहे. एकदा येऊन गेलेला विद्यार्थी येथे
पुनःपुन्हा येण्याची मनिषा बाळगूनच परततो. किंबहुना, निघताना येथून पाय निघत नाही,
इतक्या अप्रतिम वैज्ञानिक माहितीचे भांडार येथे आहे. येथील इनोव्हेशन सेंटर म्हणजे
तर विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला पुरेपूर आव्हान देणारे आहे. ‘ओल्ड इज गोल्ड’ संकल्पनेवरील येथील
कक्षात जुन्या मोडक्या तोडक्या, जगाच्या दृष्टीने स्क्रॅप वस्तूंचेही पुनर्वापराचे
मूल्य अधोरेखित करण्याचे आणि अशा वस्तूंपासून विविध कल्पक उपकरणे निर्माण करण्याचे
हे प्रशिक्षण केंद्रच आहे. त्यासह भूविज्ञान, पदार्थविज्ञान, रसायनशास्त्र, जीवशास्त्र
या विषयांतील संशोधनासाठी आवश्यक असणारी साधनेही येथे उपलब्ध आहेत. गरज आहे ती
त्यांचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या संशोधक विद्यार्थ्यांची.
आमच्या सम्यक, स्विनीने येथील सारेच प्रयोग खूपच
एन्जॉय केले. येथील संशोधक सहकारी प्रितेश लोले यांनी अत्यंत प्रेमाने आम्हाला
सारे प्रयोग पुष्कळ वेळ देऊन दाखविले, समजावून सांगितले. डॉ. डिसोझा, प्रितेश आणि
त्यांनी साकारलेल्या या विज्ञान केंद्रात आमचा दिवस कसा संपला, हे लक्षातही आले
नाही.
डॉ. डिसोझा यांनी या केंद्राच्या विविध उपक्रमांसंदर्भात
अगत्याने माहिती दिली. त्यातील ‘शनिवारी विज्ञानवारी’ हा उपक्रम मला खूपच आवडला. येथील निवडक
विद्यार्थी परिसरातील शाळांमध्ये शनिवारी जातात आणि छोट्या छोट्या घरगुती
साधनांपासून विविध वैज्ञानिक प्रयोग करून दाखवितात; रोजच्या जीवनातील विज्ञान समजावून
सांगतात. यामुळे शालेय जीवनापासूनच वैज्ञानिक दृष्टीकोन विकसित होण्यासाठी मदत
होते, ज्याची आपल्या देशाला खरेच खूप गरज आहे. याशिवाय, केंद्रातील रिक्रिएशन
सभागृहात वेळोवेळी अनेक विज्ञानविषयक व्याख्याने, उपक्रम व कार्यशाळांचे आयोजन
करण्यात येते. त्यांना वाढता प्रतिसादही लाभतो आहे. या केंद्राने इतक्या
अल्पावधीमध्येच केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाच्या ‘विज्ञान प्रसार’ या स्वायत्त
उपक्रमामध्ये ‘गोल्ड कॅटेगरी क्लब’ म्हणून स्थान प्राप्त केले आहे, ही अत्यंत गौरवाची
बाब आहे.
या केंद्राच्या परिसराचे व अन्य विकासाचे काम
अद्याप सुरू आहे. अत्यंत सौंदर्यशाली दृष्टीने येथील लँडस्केपिंग करण्यात आले आहे.
भविष्याचा वेध घेऊन येथे अनेक नवीन प्रकल्प साकारण्यात येत आहेत, जे देशात एकमेवाद्वितिय
स्वरुपाचे असतील. आपल्या विभागातील मुलांना, मुंबई, बेंगलोर, दिल्ली इत्यादी ठिकाणी
जाऊन जे विज्ञानाचे आविष्कार पाहणे अशक्य असतात, त्यातील अनेक प्रकल्प येथे
साकारण्यात येत आहेत. त्यामुळे हे वैज्ञानिक संकुल लवकरच देशातील एक महत्त्वाचे विज्ञान
व नवोन्मेष केंद्र म्हणून पुढे येईल, याची खात्री आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा