रविवार, ३ जानेवारी, २०२१

स्वराज्याच्या ‘नाक, कान, डोळ्यांना’ हवीय शासकीय ओळख...

 


महेश दिगंबर गदाई (जोेशी) व किशन जोशी हे वासुदेव

महेश गदाई (जोेशी) या वासुदेवाचे सादरीकरण (व्हिडिओ)


 

बऱ्याच दिवसांनी आज सकाळी जाग आली तीच मुळी चिरपरिचित वासुदेवाच्या आवाजानं आणि त्याच्या टाळचिपळ्यांच्या नादानं... बाबांना विचारलं, तर म्हणाले, नाही रे! कोपऱ्यावरच्या मंदिरात काही ना काही कार्यक्रम सुरू असतो... पण, तो आवाज घुमत घुमत वेगवेगळ्या दिशांनी माझ्याकडं येतच होता... जवळ जवळ येत अखेरीस अकराच्या सुमारास आमच्या गेटबाहेर तो आवाज आलाच... एकाला दोन वासुदेव दारात उभे होते... त्यांना आत बोलावलं. विचारपूस केली. त्यांच्यासोबत मस्त चहापान केलं. मी सकाळपासून ऐकत असलेल्या खड्या तरीही गोड आवाजाचे मालक होते महेश दिगंबर गदाई (जोशी), जे आळंदीचे असल्याचं त्यांनी सांगितलं. आणि त्यांच्यासोबत दुसरे वासुदेव होते, ज्यांना महेशजी गुरूजी म्हणून संबोधत होते, त्यांचं नाव किशन जोशी. ते बारामतीचे होते. यांनी आजवर त्यांच्या समाजातील ठिकठिकाणच्या २१ मुलांना वासुदेव होण्याचं प्रशिक्षण दिलेलं आहे. या दोघांशी बोलण्यातून अनेक गोष्टी उलगडत होत्या.

वासुदेव हे मूळचे रोयखेल येथील असल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र, तो तेथून आता राज्यात सर्वत्र पोटापाण्यासाठी विखुरला आहे. बारामती येथील जोशीवाडा मात्र मोठा असून मूळच्या या भटक्या जमातीमधील बरेचसे वासुदेव तेथे आता स्थायिक झाले आहेत. असे असले तरी पोटासाठी त्यांच्यामागची भटकंती मात्र अद्याप सुटलेली नाही. उलट ती दिवसेंदिवस अधिक कठीण होत चाललेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी बहिर्जी नाईकांच्या साथीनं आपलं गुप्तहेरांचं जाळ विस्तारत असताना त्याकामी हेळवी, वासुदेव, पिंगळे, कुडमुडे जोशी इत्यादी भटक्या सर्वसंचारी जमातींचा मोठ्या खुबीनं वापर केला. सातत्यानं सर्वत्र भटकून गुजराण करणाऱ्या या लोकांवर शत्रूची नजर पडण्याची शक्यता नव्हतीच. आणि पडली तरी गुप्तहेर म्हणून त्यांच्याकडे संशयाची सुई वळणार नव्हती. नेमकी हीच बाब हेरून महाराजांनी या लोकांवर स्वराज्यासह शत्रूच्या प्रदेशांतील हालचाली टिपण्याची आणि माहिती पोहोचविण्याची जबाबदारी सोपविली होती. या लोकांनीही ती इमानेइतबारे पार पाडली. एके काळी अशा प्रकारे छत्रपतींच्या स्वराज्याचे नाक, कान आणि डोळे असणाऱ्या या भटकणाऱ्या समाजासमोर अद्याप अनेक समस्या आ वासून उभ्या आहेत. पूर्वी या भटक्या लोकांना कोणी जमेतही धरत नव्हतं- अगदी शिरगणतीतही. पुढे त्यांचा समावेश होऊ लागला. ते आपल्या लोकसंख्येचा भाग बनले. पण, त्यांच्या कामाच्या स्वरुपामुळं त्यांना एका ठिकाणी राहणं शक्य नव्हतं आणि त्यामुळं शिकणंही शक्य होत नव्हतं. शिक्षणाचा विषय निघाला आणि महेश वासुदेवांच्या हसतमुख चेहऱ्यावर वेदनेची एक कळ उमटली. म्हणाले, सायबा, तुम्हाला तुमच्या वडिलांनी शिकवलं म्हणून तुम्ही शिकला. बाप करेल ते पोरगा करतो. आमचा बापही हेच करायचा, आम्हीही हेच करतो. शाळा शिकू शकलो नाही, याचं शल्य आहेच. पण, पुढची पिढी शिकवावी, त्यांनी काही चांगलं कामधाम, रोजगार करावा, असं माप वाटतं; पण शिकल्यानंतर नोकरीसाठीही पाच-दहा लाख मागतात लोक. हातावरचं पोट असलेल्या आम्ही कुठून आणायचा इतका पैका? त्यात आता पूर्वीसारखा लोकांचा विश्वासही नाही राहिला आमच्यावर. शंभरातले वीस लोक प्रेमानं काही देतात. ८० लोक उभंही करून घेत नाहीत. चोरदरोडेखोरांनी आमचे वेश धारण करून बदनाम केलंय आम्हाला. लोक खूप संशयानं पाहतात आमच्याकडे. त्यांच्या नजरा छळत राहतात आम्हाला सारख्या. खूप वाईट वाटतं.

याला जोडून किशन गुरूजी पुढं सांगू लागतात, दोन तीन वर्षांपाठी वडार समाजातल्या निष्पाप लोकांना मुलं पळविणाऱ्या टोळीतील समजून ग्रामपंचायतीत कोंडून लोकांनी दगडांनी ठेचून मारलं- त्यांचं काहीही ऐकून न घेता! याचा आमच्यासारख्या भटक्या समाजातील लोकांवर खूप मानसिक आघात झाला आहे. लोकांच्या संशयी नजरांनी आम्ही खूप सैरभैर होतो. एकाच दारात सातत्यानं जाणं योग्य नाही म्हणून आम्ही दूरदूर भटकंती करीत राहतो, राज्य, प्रदेशाची सीमा न बाळगता. मात्र, कर्नाटकसारख्या अनेक भागांत लोकांना वासुदेव माहिती नाहीत. लोक विचारतात, कशाला आलात? आम्ही सांगतो, देवदर्शनाला. मग लोक म्हणतात, झालं ना दर्शन? मग आमच्या गावातल्या गल्लीबोळांतून कशाला फिरता? निघायचं मुकाट्यानं बाहेर! आता या लोकांना आम्ही कसं सांगावं की आम्ही वासुदेव आहोत. आमचा पिढीजात व्यवसायच हा आहे. लोक ऐकण्याच्या मनःस्थितीत नसतात. आम्हाला निघावेच लागते तिथून. पूर्वी लोक आमच्या पालांना जागा द्यायचे त्यांच्या शेतवडीत. आता हजार-दोन हजार रुपये भाडे मागतात पाल टाकण्यासाठी. कसे करावे आम्ही?

यावर उपाय काय, असे त्यांनाच विचारले असता महेश वासुदेव सांगू लागले, आमच्या समाजाने शासनाकडे वेळोवेळी ओळखपत्राची मागणी केली आहे. मात्र, ती अद्याप अपूर्ण आहे. शासनाच्या यादीत आमच्या जमातीची नोंद भटक्या जमातींमध्ये एनटी (बी)मध्ये तेराव्या क्रमांकामध्ये मेढंगी जोशी या नावानं केली आहे. शिकताना, नोकरीसाठी त्याचा उपयोग होईल. आता एका ठिकाणी स्थायिक झाल्यानं आधार कार्डही मिळालंय. पण, आमच्यासारखे लोक ज्यांना आता हा वासुदेवाचा परंपरागत व्यवसाय करण्याखेरीज पर्याय नाही, त्यांचं जगणं सोपं होण्यासाठी आम्हाला शासनानं ओळखपत्रं द्यावीत, म्हणजे किमान आमच्याकडे संशयानं पाहणाऱ्या लोकांना आम्ही किमान काही तरी पुरावा दाखवू शकू.

मी कुतुहलानं एनटी (बी) टेबल काढून पाहिलं, त्यात भटक्या जमातींच्या गोसावी, बेलदार, भराडी, भुते, चित्रकथी, गारुडी, लोहार, गोल्ला, गोंधळी, गोपाळ, हेळवे, जोशी, काशी कापडी, कोल्हाटी, मैराळ, मसणजोगी, नंदीवाले, पांगुळ, रावळ, शिकलगार, ठाकर, वैदू, वासुदेव, भोई, बहुरुपी, ठेलारी, ओतारी, एनटी-सी- धनगर, एनटी-डी वंजारी, मरीआईवाले, कडकलक्ष्मीवाले, मरगम्मावाले, गिहारा/ गहारा, गुसाई/ गोसाई, मुस्लीम मदारी, गारुडी, सापवाले व जादुगार, गवळी व मुस्लीम गवळी, दरवेशी, वाघवाले- शाह (मुस्लीम), अस्वलवाले आदी ३७ प्रकारांचा समावेश असल्याचे दिसले. तेराव्या क्रमांकावर जोशी असून त्यांचे बुडबुडकी, डमरुवाले, कुडमुडे, मेढंगी, सरोदे वा सरोदी, सहदेव जोशी, सरवदे आणि सरोदा असे आठ प्रकार नमूद आहेत.

केवळ वासुदेवच नव्हे, तर या साऱ्याच भटक्या जमातींना आपण आधी माणूसपणाची ओळख दिली पाहिजे, हे तर खरेच आहे; मात्र माणसांच्या या जगात अद्याप त्यांना त्यांची स्वतःची ओळख असणारे एखादे कागदपत्र, ओळखपत्र असले पाहिजे, त्याची त्यांच्या रोजच्या जगण्यासाठी थोडीशी का असेना, मदत होणार आहे. जो सच्चा आहे, तो त्याचा गैरवापर कशासाठी करेल? शासकीय यंत्रणा त्यांची शहानिशा करण्यास निश्चितपणे समर्थ आहे. स्वातंत्र्याच्या ७० वर्षांनंतरही ज्यांच्या जगण्याचा, त्या जगण्यातील झगड्यांचा फैसला जमात पंचायतीच्याच हातात आहे, जो अद्याप एकदाही साध्या ग्रामपंचायतीची पायरीही चढलेला नाही, अशा समाजघटकांचा सांधा मुख्य प्रवाहाशी जोडण्यासाठी शासनाने त्यांना किमान त्यांची ओळख प्रदान करण्याची गरज आहे, हा आमच्या या संवादाचा समारोपीय निष्कर्ष होता.

आमच्या शिवाजी विद्यापीठाच्या नुकत्याच घोषित करण्यात आलेल्या राजर्षी शाहू लोकविद्या अभ्यास केंद्रासाठी आपला एखादा व्हिडिओ करू द्याल का, अशी मी विनंती महेश वासुदेवना केली. त्यांनी ती मान्य करून लगेच दोन मिनिटांचं सादरीकरण केलं. तेही सोबत शेअर केलं आहे.

सुरवातीला आमच्या संवादात परस्परांप्रती थोडा अविश्वास होता, त्यामुळं हातचं राखून बोललं जात होतं त्यांच्याकडून, हे लक्षात येत होतं. पण, सुरवातीला घरचा पत्ताही न सांगणाऱ्या या दोघांनी शेवटी जाताना इमर्जन्सीसाठी माझं कार्ड घेतलं. स्वतःचा संपर्क क्रमांक सुद्धा दिला. कोल्हापूरला आल्यावर विद्यापीठात येऊन तिथंही सादरीकरण करण्याचं आश्वासन दिलंय. पुढच्या वर्षी पुन्हा आपल्या घरी येतो, असं सांगून ते निघाले आणि ही नवीन माणसं आपल्याशी जोडली गेल्याचं समाधान मनी दाटून आलं...


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा