दिवंगत कवी ना.वा. देशपांडे यांची ग्रंथसंपदा शिवाजी विद्यापीठास देण्याबाबतचे पत्र उपग्रंथपाल डॉ. डी.बी. सुतार यांना प्रदान करताना श्रीमती सुनंदा देशपांडे |
प्रा. शशिकांत चौधरी यांचा एकदा फोन आला. ‘कोल्हापूरचे दिवंगत ज्येष्ठ कवी ना.वा. तथा नारायण
वामन देशपांडे यांच्या पत्नी सुनंदा यांना त्यांचे ग्रंथ चांगल्या ठिकाणी
द्यावयाचे आहेत. मी त्यांना विद्यापीठाखेरीज अन्य दुसरे उत्तम ठिकाण असू शकत नाही,
असे म्हटले आहे. या कामी आपली मदत हवीय. काय करता येईल, पाहा.’ बाईंची कळकळ त्यांनी परोपरीनं मला सांगितली. त्यामुळं
या ग्रंथदान प्रक्रियेला गती द्यावी, असं वाटून गेलं. आमचे उपग्रंथपाल डॉ. डी.बी.
सुतार यांच्या कानी मी ही बाब घातली. तेही स्वभावानं अत्यंत सकारात्मक. म्हणाले, ‘आधी जाऊन नेमके कोणती पुस्तके
आहेत, अवस्था काय आहे, हे पाहून घेऊ, आणि मग ठरवू. एखादी व्यक्ती गेली, की तिच्या
पुस्तकांची माघारी राहिलेल्या लोकांना घरात अचडण होऊ लागते. मग, घरातली ही अडगळ
एखाद्या ग्रंथालयाला दान केल्याचे दाखवून घर रिकामे करून घेतात आणि वर फुकटचे
पुण्य आणि प्रसिद्धीही पदरात पाडून घेत असतात.’ सुतार सरांनी त्यांच्या कारकीर्दीतील एक सार्वत्रिक
अनुभव सांगितला.
दुसऱ्या दिवशी चौधरी सरांना फोन करून मंगळवार पेठेतल्या विठ्ठल मंदिराशेजारील
देशपांडे यांच्या घरी गेलो. सुनंदाबाईंचं वय झालेलं. दोन खोल्यांच्या छोट्याशा
फ्लॅटमध्ये ‘नावां’च्या माघारी उरलेला एकटीचा संसार
त्या रेटत असलेल्या दिसल्या. आमचं त्यांनी अतिशय आपुलकीनं स्वागत केलं. आधी चहा
दिला. आणि बोलता बोलता त्या आमच्याशी कमी आणि स्वतःशीच अधिक असं सांगू लागल्या.
यातून समजलं ते असं...
कवी ना.वा. देशपांडे हे कोल्हापुरातल्या अनेक नामवंत शाहीरांचे लाडके रचनाकार
होते. अनेक पोवाडे, गीते, छंदबद्ध रचना त्यांनी केल्या. दिवंगत संगीतकार दिनकरराव
पोवार यांनी त्यातल्या अनेक संगीतबद्धही केल्या. शीघ्रकवी लहरी हैदर, ज्येष्ठ कवी
ग.दि. माडगूळकर आणि ज्येष्ठ साहित्यिक शिवाजी सावंत यांच्याशी त्यांचा मोठा स्नेह
होता. माडगूळकर तर त्यांना मानसपुत्रच मानत असत. राजर्षी शाहू महाराज यांच्या
विचारकार्यावर देशपांडे यांची नितांत श्रद्धा होती. असे हे देशपांडे वयाच्या
८६व्या वर्षी गेले. प्रथेप्रमाणे पिंडदान वगैरे कार्यक्रमाच्या वेळी कावळा काही
केल्या पिंडाला शिवेना. बऱ्याच नातेवाईकांनी काहीबाही सांगून पाहिलं, पण भोवती
नाचणारे कावळे शिवायला मात्र तयार होईनात. त्यावेळी आपलं पराकोटीचं दुःख सांभाळत
सुनंदाबाई नैवेद्यापुढे हात जोडून उभ्या राहिल्या. म्हणाल्या, “मला माहितीय, तुमचा जीव तुमच्या
पुस्तकांत अडकलाय. मी ती सांभाळेन का?
की रद्दीत घालून रिकामी होईन, असंही वाटत असेल तुम्हाला. मात्र, या क्षणी तुम्हाला
एकच आश्वासन देते की मी असेपर्यंत आपली सगळी पुस्तकं जीवापाड सांभाळेनच, शिवाय,
माझ्या हयातीतच ती एखाद्या चांगल्या ठिकाणी देण्याची व्यवस्थाही करेन.” असं त्यांनी म्हणताक्षणी कावळा
पिंडाला शिवला आणि तत्क्षणी देशपांडेंच्या पुस्तकांची योग्य निरवानिरव या गोष्टीचं
त्यांच्या अंतिम इच्छेत रुपांतर झालं आणि वयोज्येष्ठ सुनंदाबाईंनाही त्यांच्या
उर्वरित आयुष्यासाठीचं ध्येय गवसलं.
आता कावळा शिवणं वगैरे गोष्टी माझ्यासारख्या माणसाला कधीही न रुचणाऱ्या वा
पटणाऱ्या. मात्र, या गोष्टी मेलेल्यांसाठी नसतातच मुळी. त्या असतात, मागे
उरलेल्यांच्या मनाचे खेळ पुरविण्यासाठी. पाहा ना, एखाद्याच्या पिंडावर समस्त
नातेवाईक नैवेद्याचा इतका ढीग घालतात आणि प्रत्येक जण रोखून आपापल्या पदार्थावर
बारकाईनं लक्ष ठेवून असतो. स्मशानात सगळ्यांचाच नैवेद्य खावून पोटे ढिम्म भरलेले
कावळे या सर्व कार्यक्रमाचा कधी नव्हे ते केंद्रबिंदू असतात. कावळा शिवेपर्यंत
उपस्थितांमध्ये त्यांच्या त्यांच्या नातेवाईकांच्या कावळा शिवण्याच्या गोष्टींना
ऊत आलेला असतो. केवळ जन्म आणि मृत्यू या दोन बिंदूदरम्यानचाच प्रवास मान्य
असणाऱ्या माझ्यासारख्या माणसाला उपस्थितांच्या त्या सगळ्या गोष्टी ऐकत ‘हो’ ला ‘हो’ मिळविण्याखेरीज पर्यायही राहात
नाही. अशा वेळी कावळा मग एखाद्याच्या भजीच्या तुकड्याला स्पर्श करतो आणि मग त्यानंतर
कावळ्यावरचा केंद्रबिंदू त्याच्याकडे सरकतो. मग, त्या माणसाला भजी कशी आवडायची; ज्याने तो नैवेद्य आणला,
त्याच्याशी त्याचे कसे बरेवाईट संबंध होते, अशा गोष्टींची चर्चा सुरू होते. मग चर्चेचे
केंद्रस्थान आपसूकच प्राप्त झालेला तो ‘डोमकावळा’ स्वतःही मग मृतासोबतचे त्याचे असले नसलेले संबंध आणखी
खुलवून सांगत आपल्यावरचा फोकस अन्यत्र सरकणार नाही, याची दक्षता घेऊ लागतो. असो! विषयांतर झालं. आपला विषय आहे
सुनंदाबाईंनी देशपांडेंना दिलेल्या वचनाचा!
त्यानंतरच्या दोनेक वर्षांत अनेक व्यक्ती, संस्था, संघटनांनी त्यांच्याकडे देशपांडेंच्या
ग्रंथसंग्रहाची मागणी केली. पैसे देण्याचीही तयारी दर्शविली. मात्र, सुनंदाबाईंनी
चाणाक्षपणे त्यांची चाचपणी करून गोड बोलून मार्गी लावले. प्रा. चौधरी आणि देशपांडे
यांचेही खूप चांगले संबंध होते. चौधरींना ते मुलासारखे प्रेमाने वागवायचे. ते
सुनंदाबाईंना अधूनमधून भेटायला जात. कोरोनाचे सावट वाढू लागले, तशी सुनंदाबाईंची वचनपूर्तीविषयीची
चिंताही वाढू लागली. ती त्यांनी चौधरींच्या कानी घातली आणि मग त्यानुसार पुढील
गोष्टी घडून आम्ही सुनंदाबाईंच्या पुढ्यात होतो.
हा सारा वृत्तांत सांगताना त्यांच्या डोळ्यांतून अखंड अश्रूधारा वाहात होत्या.
देशपांडेंना दिलेल्या वचनपूर्तीतून मोकळे होण्याची वेळ जवळ आली आहे, याचे समाधान
एकीकडे तर त्यांचा हस्तस्पर्श झालेला ठेवा आता दुरावणार, याचे थोडे वाईटही वाटत असणार
त्यांना. मात्र, त्याचवेळी जोपर्यंत विद्यापीठ आहे, तोपर्यंत ना.वा. देशपांडे
यांची ग्रंथसंपदा तिथे असणार, त्यातून वाचक ‘ना.वां.’शी
जोडला जात राहणार, याचा आत्मिक आनंदही त्यांना होता.
एका लाकडी फडताळाला पडदा लावून त्यांनी अतिशय नेटकेपणाने ना.वां.ची पुस्तके
जपून ठेवली होती. तो पडदा त्यांनी बाजूला केला आणि आम्ही थक्क झालो. एखाद्या
माणसाचं पुस्तकप्रेम कसं असावं, याचा एक दाखलाच जणू आम्ही पाहात होतो.
सुनंदाबाईंनी सांगितल्यानुसार एखादं नव पुस्तक घरी आलं किंवा आणलं, तर ते
दिवसरात्र बसून वाचल्याखेरीज देशपांडेंना चैन पडत नसे. आणि त्याचवेळी त्या
पुस्तकाला छानसं कव्हर घालून बोरूच्या टाकेनं त्यावर अतिशय सुंदर स्वहस्ताक्षरात
ते पुस्तकाचं आणि लेखकाचं नाव लिहीत. स्पाईनवरही तशाच टपोऱ्या अक्षरात त्यांनी
पुस्तकाचं नाव लिहीलेलं होतं. त्या फडताळातल्या पुस्तकांच्या केवळ स्पाईनवर नजर
फिरवून देशपांडेंच्या प्रगल्भ आणि चौफेर वाचनाची साक्ष आम्हाला पटत होती. किती तरी
जुनी, दुर्मिळ पुस्तकेही त्या संग्रहात दिसली. मात्र, आजही जर त्यांचे कव्हर
काढले, तर जणू आजच ते बाजारातून आणले आहे की काय, असे वाटेल, इतक्या आत्मियतेनं ती
जोपासलेली.
काही दिवसांनी आम्ही जाऊन तो ४५६ पुस्तकांचा संग्रह शिवाजी विद्यापीठाच्या
वतीनं ताब्यात घेतला. सुनंदाबाईंनी आपले काही जवळचे नातेवाईक, शेजारी-पाजारी यांना
बोलावून त्यांच्या साक्षीनं तो ठेवा आमच्याकडं सुपूर्द केला. ‘आता कोणत्याही क्षणी मृत्यू आला
तरी मी निश्चिंत मनानं जायला मोकळी झाले,’ हे
त्यांचे निरोप घेतानाचे अखेरचे शब्द माझ्या कानात आणि मनात घुमत राहिले. एका
अनोख्या ‘शब्द’प्रितीचा साक्षीदार होताना मी
मात्र पूर्णतः निःशब्द झालेलो होतो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा