शुक्रवार, १७ सप्टेंबर, २०२१

निपाणीतील प्रबोधनपर्वाचा सच्चा पाईक: आयुर्वेदाचार्य मच्छेंद्रनाथ चिकोडे

 

आयुर्वेदाचार्य मच्छेंद्रनाथ चिकोडे



चिकोडे कुटुंबियांनी जतन केलेली आयुर्वेदाचार्यांची उपचार सामग्री

आयुर्वेदाचार्य चिकोडे यांच्या संग्रहातील आयुर्वेदिक व युनानी उपचार पद्धतींवरील दुर्मिळ ग्रंथ


निपाणी येथील चिकोडे वाड्यातील राजा रविवर्मा यांच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पेंटिंगची प्रतिकृती  

प्रा. राजन चिकोडे यांनी चिकोडे प्रतिष्ठानतर्फे स्मृतिचिन्ह प्रदान करून सन्मानित केले.



निपाणी या सीमाभागातील महत्त्वाच्या व्यापारी गावात विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात आयुर्वेदाचार्य मच्छेंद्रनाथ तुकाराम चिकोडे हे एक नावाजलेलं व्यक्तीमत्त्व होतं. खरं तर मच्छिंद्रनाथांच्या नावावरुन त्यांचं नाव ठेवलेलं असल्यानं ते तसं लिहीणं अपेक्षित होतं; मात्र, स्वतः त्यांनीच ठिकठिकाणी स्वतःचं नाव मच्छेंद्रनाथ असं लिहील्यानं लेखात सर्वत्र ते तसंच वापरलं आहे. असो! तर, या मच्छेंद्रनाथांची यंदा शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती साजरी करण्यात येत आहे. १७ फेब्रुवारी १८९७ ते ९ जानेवारी १९५१ असं अवघं ५४ वर्षांचं आयुष्य लाभलेल्या मच्छेंद्रनाथांची १२५ वी जयंती साजरी करावी, असं काय वेगळं कर्तृत्व त्यांनी गाजवलं असेल, असा प्रश्न पडला. म्हणून त्यांचे नातू आणि आमचे ज्येष्ठ स्नेही प्रा. राजन चिकोडे यांच्यासमवेत चर्चा केली. खरं तर, कोणत्याही घरातल्या तिसऱ्या-चौथ्या पिढीला आपल्या वारशाबद्दल फारसं काही देणंघेणं असल्याचं सहसा आढळत नाही; मात्र, राजन सर त्याला अपवाद. आयुर्वेदाचार्य मच्छेंद्रनाथ, त्यांचे बंधू ज्योतिषाचार्य वैद्य गोरखनाथ तुकाराम चिकोडे, त्यांच्या मातोश्री श्रीमती चंद्राबाई तुकाराम चिकोडे, त्यांचे पुतणे स्वातंत्र्यसैनिक गोपाळराव व गणपतराव ज्ञानोबा चिकोडे या सर्वांचा वारसा राजन सरांनी अत्यंत अभिमानपूर्वक जपला आहे. या सर्वांच्या कार्याचे आपण वारसदार आहोत, त्या लौकिकाला साजेसे कार्य आपण करीत राहिले पाहिजे, अशी एक आंतरिक तळमळ त्यांच्याशी बोलताना जाणवत राहिली.

राजन सरांनी आयुर्वेदाचार्य मच्छेंद्रनाथांसह उपरोक्त सर्वच लोकांच्या कार्याची माहिती संकलित स्वरुपात वाचावयास दिली. ती वाचून माझ्या नजरेसमोर एक वेगळेच मच्छेंद्रनाथ उभे राहिले. निपाणी परिसरातील एक वैद्यकीय सेवाव्रती म्हणून तर त्यांनी लौकिक मिळविला होताच, पण त्यापलिकडे जाऊन निपाणी विभागातील प्रबोधन पर्वाचे एक सच्चे पाईक म्हणून त्यांची प्रतिमा माझ्या मनात निर्माण झाली. महत्त्वाचे म्हणजे त्यांच्या विचार व कार्याचा धागा हा पूर्णांशाने महात्मा फुले यांच्या सत्यशोधकी परंपरेशी जुळणारा आहे. या परंपरेची गांधीवादाशी सांगड घालून आपले सामाजिक व आरोग्यविषयक कार्य लोकाभिमुख पद्धतीने चालविण्याची किमया त्यांनी आपल्या अवघ्या अर्धशतकी आयुष्यात साधली होती. हा संस्कार पुढच्या पिढ्यांमध्ये प्रवाहित करण्याचे महत्त्वाचे कामही त्यांनी केले.

मच्छेंद्रनाथ हे खरे तर मूळचे आयुर्वेदिक व युनानी उपचारांचे जाणकार वैद्य. माहितीने व परंपरेने त्यांनी हा व्यवसाय सेवाव्रत म्हणून अंगिकारला होता. निपाणीतील मोजक्या  नोंदणीकृत आरोग्य चिकित्सकांपैकी ते एक सुपरिचित वैद्य होते. त्यांच्या वैद्यकीय कार्याचा लौकिक केवळ परिसरातच नव्हे, तर अगदी मुंबई, पुण्यापर्यंत पसरला होता. तेथून लोक उपचारांसाठी त्यांच्याकडे येत असत. त्यांच्याकडे आलेल्या प्रत्येक रुग्णाचा वैयक्तिक तपशील, त्याच्या व्याधीचे स्वरुप, त्याची लक्षणे आणि त्याच्यासाठी योजलेली चिकित्सा उपचार पद्धती याच्या अत्यंत तपशीलवार नोंदी वैद्यराजांनी त्यांच्या चोपड्यांमध्ये सुवाच्य हस्ताक्षरात नोंदवून ठेवलेल्या आहेत. महिलांचे आजार, पुरूषांच्या जुनाट व्याधी यावर त्यांचे उपचार प्रभावी ठरल्याचे या नोंदींवरुन दिसून येते. निपाणी ही तंबाखूची व्यापारपेठ. इथे वखारी भरपूर, तसेच तिथला कामगार स्त्री-पुरूष वर्गही मोठा. तंबाखूच्या वखारींमध्ये काम करणाऱ्या या लोकांना दमा, धापेसह श्वसनाचे विविध विकार असत. या आजारांवर मच्छेंद्रनाथांनी रामबाण उपचार पद्धती विकसित केल्याचे या संदर्भात त्यांच्याकडे उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या संख्येवरुन लक्षात येते. गरीब लोकांवर ते मोफत उपचार करतच, पण, दूरवरुन आलेल्या एखाद्या रुग्णाला परतीच्या प्रवासासाठी आर्थिक मदतही करत. मच्छेंद्रनाथ हे एक सच्चे आरोग्यकर्मी होते, असे म्हणता येते कारण त्यांच्याकडे उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या यादीमध्ये गुजराथी ,मुस्लिम बंधू-भगिनींपासून ते मागासवर्गीय रुग्णाईतांची संख्याही लक्षणीय असल्याचे दिसते. खऱ्या अर्थाने आरोग्यसेवेचे व्रत त्यांनी सांभाळल्याचे यातून दिसून येते. त्यांचा हातगुण चांगला असल्याची प्रचिती ठिकठिकाणच्या रुग्णांनी पाठविलेल्या पत्रांवरुन येते. त्याचप्रमाणे आरोग्याच्या क्षेत्रात काम करणारे अनेक वैद्य हे आपल्या औषधांच्या फॉर्म्युल्यांबाबत खूप जागरुक असतात. सहसा ते हा फॉर्म्युला कोणाला सांगत नाहीत. तथापि, मच्छेंद्रनाथ यांनी मात्र या संदर्भात अत्यंत खुले धोरण स्वीकारल्याचे दिसते. आपल्या प्रत्येक रुग्णासाठी अवलंबलेली उपचार पद्धती त्यांनी तपशीलात दिली आहेच; शिवाय, त्यांनी आपले स्वतःचे मच्छेंद्रनाथ चूर्णतयार केले होते, ते बहुरोगांवर गुणकारी असल्याचे सिद्ध झाले होते. लोकप्रियही होते. त्या चूर्णाचा फॉर्म्युला सुद्धा मच्छेंद्रनाथांनी त्यांच्या एका चोपडीत ठळकपणाने नोंदवून ठेवला आहे. अगदी आजही कोणा आयुर्वेदाचार्याला त्यावरुन पुन्हा मच्छेंद्रनाथ चूर्णतयार करून बाजारात उपलब्ध करता येईल, इतका काळाच्या पुढचा पारदर्शीपणा त्यांच्या उपचारांमध्ये दिसून येतो. त्यांच्या या सवयीचा फायदा त्यांच्या निधनानंतरही रुग्णांना होऊ शकला. वयाच्या ५४व्या वर्षी ते अकाली निवर्तल्यानंतर त्यांचे ज्योतिषाचार्य बंधू गोरखनाथांनी वैद्यकीय व्यवसायाची धुरा सांभाळली. मच्छेंद्रनाथांनी सर्व नोंदी अचूक व तपशीलवार नोंदविल्यामुळे ते उपचार पुढे चालविणे सोपे गेले. स्वातंत्र्य चळवळीत कार्यरत असणाऱ्या प्रत्येकाला त्यांच्याकडे मोफत उपचार मिळत, हे आणखी एक वैशिष्ट्य आणि महत्त्वाचे योगदान.

मच्छेंद्रनाथांचे घर हे स्वातंत्र्यसैनिकांचे हक्काचे ठिकाण असे. मातोश्री चंद्राबाई उर्फ अम्माई त्या बाबतीत धडाडीच्या होत्या. रात्री अपरात्री आलेल्या स्वातंत्र्यसैनिकांना जेऊ-खाऊ घालण्याची जबाबदारी त्या आनंदाने पेलत. घरातलेच दोन तरुण गोपाळराव व गणपती हे स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय होतेच. रत्नाप्पाण्णा कुंभार यांच्याबरोबर जेजुरीच्या लुटीसह कोल्हापूरमधला विल्सनचा पुतळा फोडण्यामध्ये तसेच निपाणीतील पोस्ट ऑफिस व चावडी जाळण्यात त्यांच्या सहभाग होता. सरदार वल्लभभाई पटेल यांच्यासह येरवडा जेलमध्ये त्यांनी तुरुंगवासही भोगला. या दोघा बंधूंना मच्छेंद्रनाथांची प्रेरणा लाभलेली होती.

वैद्यकीय सेवेच्या पलिकडे सामाजिक कार्यातही मच्छेंद्रनाथांचा प्रभावी वावर होता. निपाणीतील सुप्रसिद्ध श्री सिद्धेश्वर बिरदेव मंदिराचे ते प्रमुख संकल्पक. अगदी मंदिराच्या आराखड्यापासून ते रचनेपर्यंत सारी कल्पना त्यांचीच. त्यासाठी आवश्यक निधी जमवून मंदिर उभे करेपर्यंत साऱ्या कामाची जबाबदारी त्यांनीच पुढे होऊन पेललेली. मात्र, त्यांच्या या कामातील पुढाकारावरुन त्यांच्यावर धर्मभोळेपणाचे आरोपण मात्र करता येणार नाही. ते धर्मश्रद्ध जरुर होते, पण ती श्रद्धा डोळस होती. मोठ्या संख्येने पसरलेल्या धनगर व खाटिक समाजाच्या शैक्षणिक व वैचारिक प्रबोधनासाठी त्यांना एका व्यासपीठाची गरज होती. ती गरज या मंदिराच्या माध्यमातून त्यांनी पूर्ण केली. हे केवळ देवाचे मंदिर नव्हते, तर निपाणीत उभारले गेलेले पहिले समाज मंदिर होते. मच्छेंद्रनाथ धर्मभोळे असते, तर समाजाच्या प्रथेनुसार मंदिराच्या पायरीवर देवासमोर पशुबळी देऊन त्यांनी परंपरेचे पालन केले असते. मात्र, प्रत्यक्षात त्यांनी या मंदिरात कोणत्याही प्रकारच्या पशुपक्ष्याचा बळी देण्यास विरोध केला. त्यांच्या या निर्णयाविरोधात समाजातील अनेक घटक त्यांच्याविरुद्ध उभे ठाकले. मात्र, मच्छेंद्रनाथ आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. त्यांच्या निर्धारासमोर समाजाला नमते घ्यावेच लागले. मंदिराच्या परिसराला त्यांनी आपल्या प्रबोधनाचे केंद्रच बनविले होते. मंदिर परिसरात फिरायला जाताना सोबत ते वाटेत भेटणाऱ्या सर्व जाती-धर्माच्या छोट्या मुलांना घेऊन जात. त्यांच्या हातून त्यांनी मंदिराच्या भोवती औषधी वनस्पतींची लागवड केली आणि त्यांची निगा राखण्याचे धडे देत. त्याचप्रमाणे त्या औषधी वनस्पतींचे गुणधर्मही ते त्या मुलांना समजावून सांगत. आपोआपच वृक्षारोपणासह वनस्पतींविषयक ज्ञानाचा प्रसारही अशा पद्धतीने ते करत. या मंदिरात वेळोवेळी भरणाऱ्या सभांमधून ते समाजातील मुलांना, युवकांना शिक्षण घेण्यासाठी सातत्याने प्रेरित करीत असत. मुलांसाठी त्यांनी गणितांजली, अंकगणित, पदार्थविज्ञान अथवा सृष्टीशास्त्र ही पुस्तके अत्यंत सोप्या भाषेत लिहीलेली आहेत. या विषयांचा सराव ते विद्यार्थ्यांकडून करून घेत असावेत, असे दिसते. नाडीपरीक्षेविषयीही त्यांनी एक पुस्तक लिहीले आहे.

समाजबांधवांमध्ये अज्ञानाच्या बरोबरीनेच व्यसनाधिनता मोठ्या प्रमाणात असल्याचे त्यांच्या लक्षात आले. व्यसनामुळे लोकांच्या संसाराची राखरांगोळी होत असल्याचे पाहून मच्छेंद्रनाथांनी मद्यपान व्यसनमुक्ती चळवळीस प्रारंभ केला. त्यासाठी त्यांनी पिंकेटिंगसारखी चळवळ त्या काळात मोठ्या जोमाने चालविली आणि अनेक कुटुंबांची वाताहत वाचविली. हे त्यांचे फार मोठे कार्य आहे.

त्या काळात आणखी एक महत्त्वाचे कार्य त्यांनी उभारले, ते म्हणजे निपाणीत वक्तृत्वोत्तेजक मंडळाची स्थापना होय. अशा प्रकारचे मंडळ हे त्या काळात केवळ पुण्यासारख्या ठिकाणीच काय ते पाहावयास मिळायचे. मात्र, निपाणीत अशा प्रकारे वक्तृत्वोत्तेजक मंडळ स्थापन करून युवकांना तेथे वक्तृत्वासाठी प्रेरित करण्याचे महत्कार्य मच्छेंद्रनाथांनी केले. त्यासाठी ते स्वतःच्या संग्रहातील वृत्तपत्रांसह भगवद्गीता, रामायण, महाभारत, ज्ञानेश्वरी, नवनाथ कथासार, पांडव प्रताप, रुक्मिणी स्वयंवर आदी ग्रंथ युवकांकडून वाचून घेत असत. आयुर्वेदासह विविध उपचार पद्धतींवरील ग्रंथ तर त्यांच्या संग्रही होतेच, शिवाय स्वामी विवेकानंद, महात्मा गांधी, लोकमान्य टिळक यांचे ग्रंथही होते. चिकोडे परिवाराने ते आजही प्राणापल्याड जपले आहेत. या संग्रहात बायबलची एक दुर्मिळ प्रतही पाहावयास मिळाली. वाचनाबरोबरच कलासक्तपणाही मच्छेंद्रनाथांचा महत्त्वाचा पैलू होता. राजा रविवर्मा यांच्या अनेक जगप्रसिद्ध चित्रांच्या प्रतिकृती थेट रविवर्मा यांच्या कार्ला-लोणावळा इथल्या प्रेसमधून त्यांनी मागविल्या. चिकोडे वाड्याच्या भिंती आजही त्या चित्रकृतींनी सालंकृत आहेत.

मच्छेंद्रनाथांनी तरुण वयात टिळक पर्वाची प्रखरता आणि अस्त, त्याचप्रमाणे गांधीपर्वाचा उदय पाहिला. स्वाभाविकपणे स्वातंत्र्य चळवळीतील योगदानासाठी त्यांनी काँग्रेसचे सदस्यत्व स्वीकारले. गांधीजींच्या विचार व कार्याचा एक स्वाभाविक प्रभाव त्यांच्यावर पडल्याचे दिसते. गांधीजींच्या हत्येनंतर त्यांनी जो श्रद्धांजलीपर लेख लिहीला, त्यामधून हा प्रभाव नेमका कशा पद्धतीचा होता, ते आपल्या लक्षात येते. महात्माजींसारख्या अलौकिक, थोर विभूतीच्या गुणांचे, उपकाराचे माप घेणे म्हणजे समुद्राचे पाणी मापून जमिनीवर ओतून घेणे जसे अशक्य आहे; तसेच, महात्माजींच्याही ज्ञानाचे महात्म्य सांगणे कोणासही दुर्गम्य आहे, इतके ते अगाध आहे,’ असे त्या लेखात मच्छेंद्रनाथ म्हणतात. मात्र, त्याच लेखात त्यांनी महात्माजींची तीन वचने दिली आहेत, ती अशी:-

१.     नाशवंत अशा इहलोकीच्या राज्याची मला इच्छा नाही. स्वर्गराज्यासाठी म्हणजेच मुक्तीसाठी मी धडपडत आहे. माझ्या देशाची आणि मानव समाजाची सेवा करता करता अखंड झिजणे हाच माझ्या मोक्षाचा मार्ग.

२.     मैं इस बात का सबूत देता हूँ कि, बिना हवा और पानी के, चाहे मैं जी जाऊँ, परंतु बिना ईश्वर के जिना असम्भव है। आप मेरी आँखे निकाल लें, मैं मरुंगा नहीं। आप मेरी नाक काट लें, उससे भी मैं मरुंगा नहीं। परंतु ईश्वर में मेरे विश्वास को उडा दें, तो मैं मरा पडा ही मिलूँगा।

३.     जिस एक प्रशंसा को मैं पसंद करूँगा और किंमती समझूँगा वह तो उन प्रवृत्तियों में योग देना है, जिनसे मेरी जिन्दगी लग गई है। हर एक स्त्री-पुरूष जो साम्प्रदायिक मेल पैदा करने या अस्पृश्यता के कलंक को मिटाने या गाँव का हितसाधन करने में कोई एक भी काम करता है, वह मुझे सच्चा सुख और शांति पहुँचाता है।

ही विधाने येथे सविस्तर देण्याचे कारण म्हणजे मच्छेंद्रनाथ गांधीजींच्या कार्याकडे किती सजगपणाने पाहात होते, त्याची प्रचिती त्यांमधून येते. पहिले विधान हे गांधीजींच्या मानवतावादी भूमिकेचे निदर्शक आहे, दुसरे विधान हे त्यांची सश्रद्ध ईश्वरनिष्ठा दर्शविते, तर तिसऱ्या विधानातून समता व सहिष्णुता या सांवैधानिक मूल्यांचा आग्रह प्रतिपादित झालेला दिसतो. म्हणजेच मच्छेंद्रनाथ गांधीजींच्या मानवतावादी व मानवी मूल्याधिष्ठित समाजाचा आग्रह धरणाऱ्या विचारसरणीचे चाहते आहेत, असा निष्कर्ष आपणास काढता येतो.

उपरोक्त चर्चेवरुन आपल्याला थोडक्यात असे म्हणता येईल की, आयुर्वेदाचार्य मच्छेंद्रनाथ तुकाराम चिकोडे हे एक तळमळीचे सत्यशोधक प्रबोधनकर्ते होते. त्यांनी केलेले सामाजिक, शैक्षणिक प्रबोधनाचे कार्य, उभारलेल्या चळवळी या साऱ्यांचा सांधा आपल्याला थेट सत्यशोधक चळवळीशी जोडता येऊ शकतो. महात्मा गांधी यांच्या ज्या विचारांचा त्यांच्यावर प्रभाव पडला, ती मानवतावादी भूमिका ही स्वातंत्र्य, समता, बंधुता या मानवी मूल्यांशी, अर्थातच पुन्हा महात्मा फुले यांच्या विचार-कार्याशी नाते सांगणारी आहे. त्यांचे समग्र जीवनकार्यही फुले यांच्याप्रमाणेच अत्यंत सेवाव्रती स्वरुपाचे असल्याचे दिसून येते. त्या काळात राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रेरणेने सत्यशोधक चळवळीचा जो प्रसार संयुक्त महाराष्ट्राच्या व्यापक भूगोलावर झाला, त्यामध्ये बेळगाव-निपाणी परिसराचाही समावेश होता. या विभागात प्रबोधनाची चळवळ मूळ धरून होती. त्या झाडाचीच एक महत्त्वाची शाखा मच्छेंद्रनाथांच्या रुपाने निपाणीत विकसित झाली आणि तिने या विभागाच्या प्रबोधनपर्वात आपले योगदान दिले, अशी माझी प्रामाणिक भावना आहे.


1 टिप्पणी: