रविवार, ५ डिसेंबर, २०२१

पदाई!


 

पदाबाई जत्राटकर



(ज्येष्ठ पत्रकार श्री. सुभाष धुमे यांच्या 'व्हिजन २०२१' या दसरा-दिवाळी विशेषांकासाठी माझी आजी पदाबाई जत्राटकर हिच्या काही स्मृतींना उजाळा देता आला. आज, रविवार, दि. ५ डिसेंबर २०२१ रोजी तिचा दुसरा स्मृतिदिन... या निमित्त हा लेख माझ्या ब्लॉगवाचकांसाठी साभार पुनर्मुद्रित करीत आहे.- डॉ. आलोक जत्राटकर)

पदाई... माझी आजी... वडिलांची आई... तिला जाऊन आज, ५ डिसेंबरला दोन वर्षं होताहेत... एक अत्यंत संपृक्त, समाधानी आयुष्य जगून वयाच्या साधारण १०३ ते १०५ या दरम्यान ती गेली... हे वयही तिच्या सगळ्या पिढीसारखं अंदाजानंच काढलेलं आम्ही... राजर्षी शाहू महाराजांच्या काळात आलेल्या महामारीची आठवण आपल्या अगदी सुरवातीच्या आठवणीपैकी एक असल्याचं ती सांगायची... त्यावेळी तिचं वय कळतं अर्थात पाचेक वर्षे असं गृहित धरून आम्ही तिच्या वयाचा ठोकताळा मांडलेला... म्हणून आम्ही ते वय १०३ इतकं मानलेलं... निपाणीत बाबासाहेबांना तिनं सभेत पाहिलेलं... म्हणूनही ती मला भारी वाटायची... ती कधी बोलता बोलता एकदमच कुठल्याही काळात जायची आणि आमच्यासमोर त्या काळाचा पट उलगडला जायचा... तिच्या अंगानं तिला आठवेल तसं उमजलेलं, उमगलेलं सांगत राहायची... आम्ही ऐकत राहायचो... बंधू अनुपनं एकदा त्याच्या स्टुडिओत तिला कॅमेऱ्यासमोर बसवून तिला तिच्या जन्मापासूनच्या आठवणी सांगायला लावल्या होत्या... पण, म्हातारीला कॅमेऱ्यासमोर तसं संगतवार काही सांगता येईना... अखेरीस अनुपने तिच्यासमोर हात टेकले... दोघे स्टुडिओतून खाली आले... आणि बसल्यानंतर मग पुन्हा म्हातारीची तार लागली आणि सांगू लागली काही गोष्टी खुलून खुलवून... अनुपनं कपाळावर हात मारुन घेतला... अशी आमची आजी!

मूळची शिरगुप्पीची पदाबाई... किती तरी वर्षांपूर्वी जत्राटच्या दत्तूची बायको म्हणून घरात आली... घरात एक-दोन म्हसरं, म्हारकीची एक पट्टी आणि तिच्या आज्जेसासऱ्यानं- रामानं गावच्या इनामदाराकडनं जितल्याली दुसरी एक शेताची पट्टी... इनामदारानं पैज ठेवल्याली... लोखंडाचा तापलेला गोळा हातातनं पडू न देता जिथवर जो कोणी जाईल, त्येवढी जमीन त्येला बक्षीस... रामा पैलवान गडी... विडा उचलला आणि लोखंडाचा तापलेला गोळा बी... हातात गोळा फिरवत पळत सुटला आणि जवळ जवळ बारा गुंठं जमीन बक्षीसात मिळवली... ह्यो किस्सा म्हातारीनंच कवा तरी सांगितलेला... ह्या दोन तुकड्यांत शेती पिकवली तरी भागायचं न्हाई... मग, आपली शेती करून पदाबाई दुसऱ्याच्या शेतात बी राबायची... शेतीचा सीझन सपला की दत्तू गावच्या बँड पथकात कलाट वाजवायचा... त्यो एक येगळाच नाद व्हता त्येला... पण, त्यातनं कमाई पन बरी व्हायची. कुटुंबाला हातभार व्हायचा... त्येची आई निलारानी... एकदम खवाट अन् कडक म्हातारी... पदाबाईवर तिचा वचक भारी... पण तीही सासूच्या तालमीत तश्शीच, तिच्यासारखीच तयार होत होती... हळूहळू पदाबाई साऱ्या भावकीची अन् गावची सुद्धा पदाई कधी झाली, ते तिचं तिलाही समजलं नाही... तंगू, तारू ह्या तिच्या वारकीच्याच सख्या... पण, त्या तारवाक्का न् तंगवाक्का झाल्या... आदराचं आईपण मात्र माझ्या ह्या आज्जीनं मिळवलेलं... ते सन्मानाचं पद तिनं शेवटच्या क्षणापर्यंत चालवलं, गाजवलं अन् टिकवलं...

पदाईचं दुःख एकच होतं... जल्मल्यालं मूल एक दीड वर्षाचं होईस्तोवर जगायचं अन् कुठल्या कुठल्या आजारानं अचानकच दगावायचं... चार-पाच पोरं तिची तशीच गेलेली... त्यानं ती खचलेली... दरम्यानच्या काळात निला म्हातारी पण गेलेली... मग शेवटी तिनं गावच्या जंगलीसायबाला नवस बोलला... त्या नवसानं एक ल्येकरू झालं... नवसाचं म्हणून त्याचं कान-नाक टोचल्यालं... घाबरून पदाईनं त्येचं लवकर नाव पण ठेवलं न्हाई... पन, पोर मोठं होऊ लागलं... आणि सासूच्या नावावरनंच पदाईनं त्येचं नाव ठेवलं निलाप्पा म्हणून... गावच्या शाळेत आलेल्या सिदनाळे मास्तरच्या धाकानं गावातले मायबाप पोरास्नी शाळंत पाठवू लागली... सगळ्या समाजाची, जातीधर्माची पोरं एका वर्गात शेजारी शेजारी बसून शिकू लागली... निलाप्पा म्हणजे नवसानं जगल्यालं, जगवल्यालं पोर, म्हणून पदाई त्याची डोळ्यात तेल घालून काळजी घ्यायची... तिकडं निलाप्पाला पण शाळेची गोडी लागली... मास्तरांचा सहवास आवडू लागलेला... त्यांचं शिकवणं आवडू लागलेलं... निलाप्पाचं बोरूचं अक्षर एकदम दृष्ट लागावं असं... गुरूजी घोटवूनच घ्यायचे तसे... पदाईला बुकातलं काय कळत न्हवतं, पन गुरूजींवर, शाळेवर तिचा ईस्वास दांडगा... बाबासाहेबांनी पन तसंच सांगितलेलं, तिला आठवायचं... पोराला शिकवायचं, एवढं तिनं ठरवलेलं... किती, केवढं?.. तिला तर कुठं ठावं होतं... पण, ठरलंवतं एवढं नक्की... निलाप्पानं एकदा तिला विचारलंवतं... आई, मी केवढं शिकू? ... त्यावर पदाईच्या तोंडून शब्द उमटल्याले- बंदा रुपाया शिक!’… चवली-पावलीच्या जमान्यात राहणाऱ्या पदाईला शिक्षण कळत न्हवतं, पण व्यवहार समजे... त्यातनंच आपल्या पोरानं बंदा रुपायाएवढं, म्हणजे एकदम स्टँडर्ड, मोठ्ठं शिकावं, भरघोस शिकावं, ही भावना तिच्या त्या उद्गारातनं प्रकट झालेली...

घरची परिस्थिती, कमवायचं अन् खायचं अशीच... दाल्ला बँड घ्येवून पंचक्रोशीत लोकांच्या कार्यातनं वाजवत फिरायचा... सुपाऱ्या घेऊन गेला की दिवसच्ये दिवस तिकडंच... आला की विडीकाडीचा खर्च ठेवून घेऊन घरखर्चाला द्यायचा... पदाई त्यातही काटकसरीनं टुकीचा, नेटका संसार करायची... कधी कधी घरात खायला काहीच नसायचं... थोडी शाळू सापडायची... ती दळून तिचंच पिठलं, तिचीच भाकर पोराला खाऊ घालून शाळेला पाठवायचं आणि आपण पोटभर पाणी पिऊन दुसऱ्याच्या शेतात भांगलायला जायचं... दिवसभर काम करून दिवसाची कमाई, शेतमालकानं दिलेल्या थोड्या शेंगा किंवा शाळू घेऊन घरी परतायचं आणि मग लेकराला पुन्हा गरम गरम खाऊ घालायचं...

एक दिवस तर घरात अन्नाचा एक दाणाही नव्हता... चाणाक्ष निलाप्पाच्या ते लक्षात आलं... आईला आपल्यासाठी काही तजवीज करावी लागू नये, म्हणून तो सकाळच्या पारीच घरातनं गायब झाला... पदाईला काही समजंना, पोर गेलं कुटं? दप्तरबी न्हाई नेल्यालं. ग्येला आसंल कुठं तरी हुंदडायला म्हणून तिनं विषय सोडून दिला... पाणी पिऊन कामावर गेली... संध्याकाळी घरी आली, तरी पोराचा कुठं पत्त्या न्हाई... सगळ्या गावातनं फेरफटका मारला, तरी कुठं दिसंना... पदाई कंटाळून शेवटी घराकडं परतली... न्हाई म्हटलं तरी रागाचा पारा आता तिचा चढलेलाच... त्येवढ्याच निलाप्पा हळूच घरात आला... सदऱ्याचा वटा करून त्यात भरतील त्येवढ्या आणि खिसं भरून आणलेल्या शेंगा आईच्या पुढ्यात रिकाम्या केल्या... दुसऱ्या खिशातनं एक मूठ काही तरी काढलं आणि तेही आईसमोर धरलं... त्यानं मूठ उघडली तर काही पैसे होते... पदाईला काय समजंना... ती फक्त एवढंच विचारती झाली, कुटं गेल्तास रं ईळभर? मी गावभर हुडकून आलो. निस्ता जिवाला घोर लागलावता..घरातली परिस्थिती बघून निलाप्पा त्या दिवशी आई कामाला जाते, त्याच्या बरोब्बर उलट्या दिशेच्या रानात कामाला गेलावता. दिवसभर उपाशी पोटानं त्येनं पन त्या शेतात शेंगा उपसायचं काम केलं. शेंगांचा ह्यो ढीग लावला. तवा कुटं सांच्याला त्येच्या हातात दिसभराची मजुरी आणि त्या वटाभर शेंगा मिळाल्यावता. त्ये समदं घिऊनच त्यो घराकडं आल्ता. पदाईला जसं त्येनं ह्ये सांगितलं, तसं तिच्या डोळ्याला धारा लागल्या. लेकराला जवळ घिऊन तिनं कुरवाळलं. म्हणाली, आज कामाला ग्येलास ते ठीक. खरं, परत पुन्यांदा असं जाऊ नकोस. आपल्याला चांगली साळा शिकून मोटं व्हायचाय. मजूर न्हाई. मी लागंल तेवढं कष्ट करीन, खरं तू शिकायचं निस्त. पदाईनं तिच्या कष्टाचा आवाका आणखी वाढवला. तारवाक्काच्या संगतीनं तंबाखू इकायला ती तळकोकणाकडं चालत जाय लागली. दोघी संगती संगतीनं कधी पायवाटनं, कधी जंगलातनं वाट काढत जायच्या. डोक्यावर, काखंत तंबाखूचं वज्झं लादून लिंगनूर, सुरुपली, कुरुकली, मुरगूड, गारगोटी, आजरा असं करत करत माल संपेस्तोवर विकत जायच्या. डोईचं वज्झं असं हलकं करून पुन्हा येताना तिकडनं तांदूळ घिऊन यायच्या. त्येची तर कथाच हाय. बाँड्रीवरनं तपासनीस तांदळाचं ट्रक अन् ट्याम्पो पास करायचीत. अन् ह्या बाया, जे दोन-पाच किलो घिऊन यायच्या, त्ये जप्त करायचीत. मग, त्यास्नी हुलकावनी द्येत, आडवाटंनं, जंगलातनं जीव आणि तांदूळ दोन्ही वाचवत ह्या दोघी बाँड्री क्रॉस करायच्या अन् मग कुटंबी न थांबता, कुणाच्या नजरेत न येता बिगीबिगी गावाकडं परतायच्या.

ह्याच दरम्यान पदाईच्या काळजाचा ठोका चुकवनारी आणखी एक घटना घडली. निलाप्पा सुट्टीचा एकदा गेल्ता नदीवर पवायला. नदीवर पवायला जाणं, ही तवा क्वामन गोष्ट व्हती. तसा त्यो व्हता पण पट्टीचा पवणारा. नेहमीप्रमानं तो गेला पवत पवत नदीच्या मध्यात. पण, कधी नव्हं ते घावला भवऱ्यात. लागला गटांगळ्या खायाला. सोबतच्या मैतरांनी बोंबाबोंब करून समदा गाव उठवला. दोनी काठांवर गावातल्या लोकांनी गर्दी क्येली. कोन, कुनाचा पोरगा म्हणून विचारणा झाली. पदाईचं एकमेव नवसाचं पोर आता एवढं मोठं होऊन हातातनं जातंय का काय, अशी अवस्था झालेली. समद्या गावाचाच जीव घुटमळल्याला. त्या गर्दीतनं पदाई वाट काडत काठावर आली आणि समोरचं दृश्य बघून तिनं तिथं बसकणच मारली. रडाय-आरडाय लागली. कुनी तरी वाचवा माझ्या लेकराला, विनवू लागली. पण, भवऱ्यात जायाचं धाडस करणार कोण? आता ह्यो काय वाचत न्हाई, असंच वाटू लागलेलं. तेवढ्यात जीव खाऊन भवऱ्याबरोबर झटापट करणारा निलाप्पा त्यातनं बाहेर निघाला खरा; पण, धारंला लागला. वाहून जाऊ लागला. तिथनं फुडं काही अंतरावर गावातल्या काही म्हशी पाण्यात डुंबायला सोडल्या व्हत्या. त्यात रखमी नावाची एक सगळ्यात आक्रस्ताळी आन् मारकी म्हस हुती. ती रस्त्यावर दिसली की पोरासोरांचीच काय, बायाबापड्यांची पण तारांबळ उडायची. रखमी कवा काय करंल, कवा ढुशी मारंल, काय नेम नसायचा. तिची शिंगं बी तशीच लांबसोर अन् धडकी भरवणारी निमुळती होती. अशी रखमी पन त्यात पवत हुती. धारंला लागल्याला निलाप्पा नेमका त्या म्हशींच्या टप्प्यात आलेला. आणि त्यातबी नेमकी रखमीच त्याच्या पुढ्यात व्हती. गाव हे सारं बघत होता. निलाप्पा येक वेळ पाण्यापास्नं वाचंल, खरं आता रखमीच्या तावडीतनं काय सुटत न्हाई, आसंच वातावरण निर्माण झालेलं. पदाईनं तिथनंच रखमीला शिव्यांची लाखोली वाहायला सुरवात केली. सारा गाव जीव डोळ्यात आणून आता काय व्हतंय म्हणून माना उंचावून टकामका बघू लागला. इकडं निलाप्पाचा जीव घाबरा झालावता, खरं त्येनं धीर सोडला न्हवता. भवऱ्यात हातपाय मारुन पेटकं आल्यालं. दमछाक झालेली. त्येला कशाचा तरी आधार हवा होता. तो रखमीच्या रुपानं त्येला समोर दिसत व्हता. रखमी जणू काही त्येला आधार द्यायलाच प्रवाहाच्या मध्यात थांबल्याली. रखमीजवळ पोचताच त्येनं पुढं हून गापकन तिची दोन्ही शिंग धरली आन् तिच्या पाठीवर त्येनं स्वतःला झोकून दिलं. रखमीच्या मानंला कवळा घालणाऱ्या निलाप्पाला बघून इकडं काठाला गावाचाच जीव जणू गळ्याला आलंला. पदाईनं तर गापकन डोळंच मिटून घेतलं. पन, कशी कोण जाणे, रखमीनं जरा उगंच मान हिकडं तिकडं हलवल्यागत केलं आणि आपली आंघुळ सोडून तिनं थेट काठाकडं पवत यायला सुरवात क्येली. ह्ये आक्रित समदा गाव बघत हुता. रखमी काठावर आली, तोवर निलाप्पाच्या बी जीवात जीव आलेला. जरा दम गेल्यानं हुशारी आलेली. काठ दिसल्याबरोबर त्येनं रखमीच्या पाठीवरनं खाली उडी मारली. रखमीनं पन एकवार त्येच्याकडं वळून बघितलं आन् पुन्हा हुंदडत आपल्या नेहमीच्या तालात घराकडं चालायला सुरवात केली. साऱ्या गावानं जल्लोष केला. एरव्ही रखमीच्या वागणुकीसाठी सगळ्यांच्या शिव्या खाणाऱ्या रखमीच्या मालकाला बी भरून आलं. त्यो तिकडं पळत जाऊन रखमीच्या गळ्यात पडून रडाय लागला. हिकडं निलाप्पा जे पळत सुटला, ते थेट पदाईच्या कुशीत शिरून रडाय लागला. मायलेकरांच्या डोळ्यातनं पाण्याच्या धारा लागलेल्या. सारा गाव हे दृश्य डोळं भरून पाहात होता. तिथनं फुडं जवा शक्य आसलं तवा पदाईच्या हातचा घास रखमीसाठी धाडला जाऊ लागला. निलाप्पाचं पवणं मात्र आता नदीच्या मध्यातनं काठावर आल्यालं. पदाईची तशी सक्त ताकीदच हुती त्येला!

पदाईचा संसार असा चाललेला. तशी ती वांडच हुती. भावकीवर शब्द चालवायची. शांत स्वभावाचा दत्तूही तिचा शब्द पडू द्यायचा नाही. आपली बाय संसार एकहाती सांभाळतीया म्हणून समदं ब्येस चालू हाय, ही त्येची भावना हुतीच. पन, कधी शब्दाला शब्द लागला तरी तिच्याफुडं आपलं काय चालत न्हाई, ह्येबी आता त्येला अनुभवानं कळून चुकलं हुतं. त्यो आता त्याच्या ब्यांड पथकात चांगलाच रमला व्हता. मागणी पण चांगली हुती. हुन्नरगीच्या ब्यांडापरास आपलं वाजवनं चांगलं व्हायला पायजे. त्येंच्याइतकी मागणी आणि दर आपल्याला मिळायला पायजेल, अशी ईर्ष्या त्यो आपल्या पथकात पेरत असायचा. त्या दिशेनं त्यांचं वाजाप चाललं पण होतं. हुन्नरगीयेवढी नसली तरी त्यांना पर्यायी म्हणून मागणी येत हुती. यातनं आणखी चांगलं दिवस येतील, अशा भावनेतनं काम करत हुता.

निलाप्पा नव्वी-धावीला आसंल, तवा आधनंमधनं पोटात दुखतंय म्हणून दत्तू तक्राद करायचा. खाणं वेळी-अवेळी, त्यात कलाट वाजवून पोटावर ताण यायचा, त्यातनं दुखत आसंल म्हणून दुर्लक्ष करायचा. पदाई काय तरी काढा-बिढा उकळून द्यायची. तेवढंच बरं वाटायचं. आणि स्वारी ऑर्डरीवर निघायची. डॉक्टर बिक्टरकडं जायाचं, हे त्या वेळी डोक्यात नसायचंच कुनाच्या. आणि कुणी डाक्टरकडं गेलंय आणि जिवंत परत आलंय, आसंबी दिसायचं न्हाई. कारण सगळं करून थकलं की मगच दवाखान्याची पायरी चढली जायाची. त्यावेळी डॉक्टरकडच्या उपचारांचा काही उपयोगच नसायचा. आणि माणूस गेल्याचा बोल मात्र डॉक्टरांना लागायचा. सगळीकडचीच ही अवस्था. आणि डॉक्टरला द्यायला पैसा असायचा कुणाकडं? तेव्हा दत्तूला अन् पदाईला डॉक्टरची आठवण होण्याचं कारणच नव्हतं.

एक दिवस दत्तू आला, त्येच मुळात तापानं फणफणून. आला तसा त्येनं हाथरुणच धरलं. पोटातल्या कळा वाढतच चालल्या. घरगुती उपाय, वैदूचं औषध, समदं करून झालं. वैद्यानंच डॉक्टरला दाखवा, म्हणून सांगितलं; तसं, पदाईला टेन्शल आलं. मनाचा हिय्या करून निप्पाणीला डॉक्टरला दाखवलं. त्येनं पोटाचा फोटु काढला. आनि पोटाचा आल्सर आसल्याचं सांगितलं. लवकर आपरेशन कराय पायजेल, आसं बी सांगितलं. पैका लागणार व्हताच त्यासाठी. दोघं नवरा-बायको घराकडं कशीबशी परतलीत. काय करावं, ह्येचा इचार करून डोक्याचा भुगा व्हायची येळ आल्याली. पैशापेक्षा पन आपरेशन म्हंजे प्वाट बिट फाडायचं, ही कल्पनाच त्यांना सहन हुईना झाल्याली. त्या परास वैद्यालाच जालीम औषिद द्यायला सांगू या आणि फुडचं फुडं बघू, आसं त्येंनी ठरवलं. पण, ह्ये ठरवणं दत्तूच्या जीवावर आणि पदाईच्या संसारावर बेतलं. त्या आजारातनं दत्तू उठलाच न्हाई. घरातनं भाईर पडला, त्यो चौघांच्या खांद्यावरनंच.

ऐन तारुण्यात पदाईवर वैधव्य लादलं गेलं. एकुलतं पोर पदरात. त्येला वाढवायचं, हुभं करायचं आव्हान पेलण्यासाठी दुःखावर मात करत ती पदर खोचून हुभी ऱ्हायली. दत्तू जणू ब्यांड वाजवायला भायेर गेलाय आणि आपण दोघंच घरात आहोत, अशी मनाची समजूत घालत तिनं आपला दिनक्रम चालवला. निलाप्पाला आभ्यासात काय कमी पडू द्यायचं न्हाई. जेवढं शिकंल, त्येवढं शिकवायचं, ही एकच जिद्द बाळगून ती राबत ऱ्हायली. निलाप्पा म्याट्रिक पास झाला. समाजातला, गावातला पहिला म्याट्रिक पास झाल्याला पोरगा. पदाईचा जीव सुपायेवढा झाला. तिचा बंदा रुपाया घडत व्हता. निलाप्पा कालिजात जायला लागला. बीए पण पास झाला. गावातला, समाजातला पैला बीए त्योच. निलाप्पानं आईला सांगितलं, मला फुडं शिकायचंय. पदाई त्येला घेऊन थेट गावच्या रामगोंड पोलीस पाटलाच्या दारात जाऊन हुभी ऱ्हायली. पोलीस पाटील म्हणजे देवमाणूस. ते पण निलाप्पाची प्रगती ऐकून, पाहून होते. त्यांचं त्याच्यावर बारीक लक्ष होतं. शिवाजी विद्यापीठात एम.ए. करायला कोल्हापुरात राहावं लागणार होतं. पोर कधीच गावाबाहेर न राहिलेलं. पोलीस पाटलांनी पदाईला आश्वस्त केलं. निलाप्पाचं पुढचं शैक्षणिक पालकत्व जणू त्यांनी स्वीकारलं. कोल्हापुरात नाळे म्हणून त्यांचे दुकानदार मित्र होते. ते त्याला घेऊन त्यांच्याकडं गेले. ह्यो माझा पोरगा हाय. हिथं शिकाय ठेवतोय. कधी काही पैसे लागलं, तर द्यायचे. हिशोबाचं आपलं आपुन बगू. आसं सांगितलं. नाळे दुकानदारांनी पण आपला शब्द दोन वर्षं पाळला. निलाप्पा अडीनडीला, गरजेला त्यांच्याकडून पैसे मागायचा. कशाला, असं देखील न विचारता ते तितके पैसे त्यांना द्यायचे. पाटील आण्णा ते त्यांना देत आसंत. निलाप्पा एमए पण झाला. गावातला पैला पोस्ट ग्रॅज्युएट पोरगा. पदाईनं कलईदार रुपाया घडवला होता. फुडं त्येनं गावातला पैला पीएचडी डॉक्टर व्हायचा पण मान मिळवला. गावानं दोन्ही वेळेला त्याचा जाहीर सत्कार केला.

त्यावेळी निप्पाणीला अर्जुननगरच्या माळावर देवचंद कॉलेज सुरू झालेलं. देवचंद शेटजी चांगल्या शिक्षकांच्या शोधातच असत. त्यांनी एमए झालेल्या निलाप्पाला बोलावून नोकरी दिली. त्यावेळी निलाप्पा कणकवली, सांगली आणि निप्पाणी असं तीन ठिकाणी दोन दोन दिवस सीएचबी काम करत होता. एक रविवारचा दिवस त्येवढा आईसोबत राहायला मिळायचा. नोकरीमुळं या मायलेकरांचा संसार जरा स्थिरस्थावर होऊ लागला. देवचंद कॉलेजमध्ये फुल टाईम ऑर्डर झाली, तेव्हा कुठं चांगलं स्थैर्य निर्माण झालं. पदाईच्या कष्टाला असं फळ मिळालं.

निलाप्पानं नाळे दुकानदार आणि पाटील आण्णांनी केलेल्या मदतीचा सगळा हिशोब व्यवस्थित लिहून ठेवलेला. एक दिवस त्येवढे पैसे घेऊन तो आण्णांपुढं उभा राहिला. आपली हिशोबाची वही उघडली, त्यांना नाळ्यांकडून घेतलेली रक्कम आणि आण्णांनी व्यक्तीगतरित्याही दिलेली मदत या साऱ्यांचा तपशीलवार हिशोब सांगितला. आणि तेवढी रक्कम आण्णांच्या समोर ठेवली. पाटील आण्णांना त्याच्या प्रामाणिकपणाचं कौतुक आणि अभिमान वाटला. पदाईच्या संस्काराचं हे फळ होतं. आण्णांनी हसून त्याला ती रक्कम परत केली आणि म्हणाले, तुला गरज होती या पैशाची, आणि तुझ्यात गुणवत्ताही होती. म्हणून मी मदत केली. समाजात अजून अशी कित्येक मुलं शिक्षणापासून वंचित आहेत किंवा ज्यांना शिकतानाही अडचणी येतात. अशा मुलांना तू मदत करीत राहा. त्यातनंच माझी तुला केलेली मदत सार्थकी लागली, असं मी समजेन. आण्णांच्या या प्रेरक शब्दांनी निलाप्पाला मोठं बळ मिळालं. त्या पैशात आणखी थोडी भर घालून देवचंद कॉलेजमध्ये समाजशास्त्रात पहिल्या येणाऱ्या विद्यार्थ्याला त्यानं दर वर्षी एक स्कॉलरशीप सुरू केली. त्याशिवाय, दर वर्षी काही विद्यार्थी-विद्यार्थिनींचं शैक्षणिक पालकत्व स्वीकारून त्यांची फी, परीक्षा फी, शैक्षणिक साहित्याचा खर्च अशा अनेक प्रकारे दर वर्षी मदत करायचं धोरण स्वीकारलं. त्यातनं त्यांना मानसपिता मानणाऱ्या अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनींची फौजच देवचंदमध्ये तयार झाली.

पदाईचं आयुष्य असं सार्थकी लागत होतं. लेकाचं लग्न केलं तिनं. सांगलीच्या एदा मास्तरची लेक सून म्हणून घरात आली. नातवंडं झाली. लेकानं शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक प्रगती केली, पण आयुष्याच्या कुठल्याही टप्प्यावर आईला अंतर दिलं नाही. मी त्यांचा मुलगा म्हणून अगर तिचा नातू म्हणून दोघांना प्रेमानं कधीही बोलत बसलेलं पाहिलं नाही. किंबहुना, दोघं सातत्यानं एकमेकांवर काही ना काही कारणानं खेकसतच असत. पण, ते खेकसणं हाच त्यांच्यातला एक बॉण्ड होता. बाबांनी तिच्यासाठी फार मोठ्या असाईनमेंट घेण्याचं टाळलंच. दिवसभर कुठंही जावं लागलं तरी रात्री घरी येण्याची त्यांनी सवयच लावून घेतलेली. नाईलाजानं मुक्काम करावा लागला तरी एका रात्रीपेक्षा नाहीच कधी. आमच्या घराला कुलुप लावावं लागण्याची वेळ कधी आली नाही, आजी असेस्तोवर!


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा