सोमवार, ६ डिसेंबर, २०२१

चल उचल कबीरा तेरा भवसागर डेरा...!

 



महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी त्यांचे स्मरण करीत असताना त्यांनी आपल्या अखेरच्या क्षणापर्यंत ज्ञानार्जनाशी जे दृढ नाते जपले, त्याचेच मला स्मरण होत राहते. बाबासाहेबांचा १ डिसेंबर ते ५ डिसेंबर १९५६ या कालावधीतील दिनक्रम किंवा त्यांनी केलेली कामे पाहता ते अखेरपर्यंत या ज्ञानसाधनेत किती निमग्न होते, याचीच प्रचिती येत राहते. त्यांचे ग्रंथप्रेम, बुद्धाप्रती निष्ठा, लेखनासक्ती या सर्वांची प्रचिती देणारे हे पाच दिवस आहेत. बाबासाहेबांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाने बाबासाहेबांच्या जीवनकार्याची पारायणे तर करायलाच हवीत, मात्र या अखेरच्या क्षणांचेही स्मरण करून त्यांचे कार्य पुढे नेण्यासाठी प्रतिबद्ध होणे आवश्यक आहे.

१ डिसेंबर रोजी बाबासाहेब दिल्लीतल्या मथुरा रोडवर भरविण्यात आलेले बुद्धिस्ट आर्ट्स एक्झिबिशन पाहण्यास गेले होते. प्रदर्शन पाहून झाल्यानंतर तेथेच आपल्या मोटारीत बसून पुस्तक वाचत होते. त्यावेळी तेथे सोहनशास्त्री आले. त्यांना पाहून बाबासाहेबांनी हसून विचारले, काय शास्त्री? काय पाहिले प्रदर्शनात?” यावर शास्त्री उत्तरले, बाबासाहेब, सर्व प्रदर्शन पाहिले व ते मला आवडलेही! पण बाबासाहेब, बुद्धाचे पुतळे अनेक आहेत आणि प्रत्येकात बुद्धाचे अवयव निरनिराळ्या आकाराचे. हे कोडे मला उलगडत नाही. यावर बाबासाहेब थोडे हसून म्हणाले, हे कोडे आहे खरे! पण, ते फारसे कठीण नाही. बुद्धाच्या परिनिर्वाणानंतर सुमारे सहाशे वर्षांनी बुद्धाचे पुतळे बनविण्याची प्रथा सुरू झाली. श्रेष्ठतम पुरूषांच्या अवयवांची जी वर्णने आहेत, त्यात मोठ्या आकाराचे कान, आजानुबाहू, कुरळे केस, गोल चेहरा, भव्य कपाळ इत्यादिकांचा समावेश होतो. ही वर्णने परंपरेने लोक ऐकत आले आणि चित्रकार, शिल्पकार त्या वर्णाबरहुकूम पण स्वतःच्या प्रतिभेची जोड देऊन अशा श्रेष्ठतम पुरूषांची चित्रे व शिल्पे तयार करू लागले. बुद्धाची चित्रे व त्यांचे पुतळे त्यांच्या नंतरच्या सहाशे वर्षांतील कलावंतांनी तयार केले. भारतीय कलावंतांनी बुद्धाचे अवयव भारतीय पद्धतीने काढले. चिनी, जपानी, सिलोनी, तिबेटी वगैरे कलावंतांनी त्यांच्या त्यांच्या देशांतील पुरूषश्रेष्ठांचे अवयव बुद्धाला दिले. यामुळे बुद्धाची चित्रे व त्यांचे पुतळे यांत अवयवांचे निराळेपण प्रेक्षकांना ठळक दिसून येते. सिद्धार्थ गौतम हा अत्यंत देखणा होता. ते देखणेपण जसेच्या तसे कोणत्याही कलावंताला रेखाटता येणे अशक्य आहे. आपण बुद्धाची चित्रे व पुतळे यांकडे लक्ष न देता त्याची तत्त्वे व शिकवण यांकडे सर्व लक्ष केंद्रित केले पाहिजे. बाबासाहेबांचा हा खुलासा ऐकून सोहनशास्त्री खूष झाले. त्यांच्याशी गप्पा आटोपून बाबासाहेबांनी ड्रायव्हरला मोटार कॅनॉट प्लेस रोडवरील बुक डेपोकडे घेण्यास सांगितले. तिथे १५-२० मिनिटे त्यांनी ग्रंथ पाहिले व ५-७ ग्रंथ खरेदीही केले.

रविवारी, २ डिसेंबरला सकाळीच चहा घेऊन कार्ल मार्क्सच्या दास कॅपिटल ग्रंथातील संदर्भित मजकूर परत डोळ्यांखालून घालून बुद्ध अँड कार्ल मार्क्स या आपल्या ग्रंथाच्या लेखनासाठी बसले. लिहीलेल्या मजकुराची पाने ते नानकचंद रत्तू यांच्याकडे टाईपिंगला देत होते. संध्याकाळपर्यंत हे काम चालले.

संध्याकाळी दिल्लीतील अशोकविहार महरौली येथे तिबेटचे दलाई लामा यांच्या सत्काराचे आमंत्रण होते. तेथे बाबासाहेब उपस्थित राहिले. समारंभानंतर बरेच लोक बाबासाहेबांना भेटावयास त्यांच्या बंगल्यावर आले. वऱ्हांड्यात खुर्च्या मांडलेल्या.बौद्ध धम्माच्या प्रसारासाठी काय केले पाहिजे, हा चर्चेचा मुख्य विषय होता. रात्री आठनंतर लोक निघाले. बाबासाहेबांनी तेथे हलके भोजन घेतले. माझ्या हयातीत माझे हे ग्रंथ प्रकाशित होतील का? बौद्ध धम्माचा प्रसार जोरात चालेल का?” याबाबत नाकचंदांशी तळमळीने बोलत राहिले. साडेदहाच्या सुमारास झोपी गेले.

सोमवारी, ३ डिसेंबरला पुन्हा लिहावयास बसले. संध्याकाळी ती पाने नानकचंदांकडून टाईप करवून घेतली. संध्याकाळी आपल्या आजारी म्हाताऱ्या माळ्याला पाहण्यासाठी त्याच्या खोलीवर गेले. माळी बाजल्यावर पडलेला. अंगात ताप आणि खोकल्याने हैराण, अशी त्याची अवस्था. त्याची वृद्ध पत्नी शेजारी बसलेली. बाबासाहेबांना पाहताच माळी उठण्याचा प्रयत्न करू लागला. बाबासाहेबांनी त्याला उठू दिले नाही. त्याच्या कपाळाला हात लावून पाहिला, तेव्हा माळ्याच्या डोळ्यात पाणी तरळले. तो गहिवरुन म्हणाला, आज प्रत्यक्ष भगवान माझ्या झोपडीत आला. त्याने आपल्या दोन्ही हातांनी बाबासाहेबांचे हात पकडून आपल्या कपाळाला लावला अन् रडू लागला. त्याची पत्नीही रडू लागली. बाबासाहेब म्हणाले, असे कशाला रडायचे?” माळी म्हणाला, भगवान, मी आता एक-दोन दिवसांचाच सोबती आहे. मला मृत्यूच्या अगोदर भगवानाचे दर्शन झाले, हे माझे महाभाग्यच. बाबासाहेब म्हणाले, अरे रडू नका. औषधोपचार करा. मी औषध पाठवून देतो. मृत्यू टाळता येत नाही, पण औषधोपचाराने थोडा आराम मिळतो व काही काळ पुढेही ढकलला जातो. मृत्यूला का एवढे भितोस? सर्वांना कधी तरी मरायचेच आहे. मलाही मरायचे आहे. मरण कोणाला चुकविता येत नाही. तू सांत हो व मी पाठवितो ते औषध घे. असे दिलासादायक बोलून बाबासाहेब तेथून निघाले आणि माळ्याला लागणारी औषधे केमिस्टकून मागवून त्याच्याकडे पोहोचती केली.

१६ डिसेंबरला बाबासाहेबांनी मुंबईला दीक्षा समारंभ भरविण्याचा कार्यक्रम ठरविला होता. त्यासाठी बाबासाहेबांनी रेल्वेची चार फर्स्ट क्लासची तिकीटे काढावयास सांगितली होती. ती मिळत नसल्याचे नानकचंदांनी सांगताच १४ डिसेंबरला बाबासाहेब व माईसाहेब यांची विमानाची व इतरांची मिळेल त्या रेल्वे तिकीटाची व्यवस्था करायला सांगितले. त्यावेळी लॉनवरच्या खुर्च्यांवर माईसाहेबांचे वडील, बंधू व डॉ. मालवणकर बसले होते. बाबासाहेबांचा मूडही चांगला होता. तेव्हा मेव्हण्याने निरानिराळ्या कोनांतून त्यांचे फोटो घेतले.

मुंबईतील समारंभावेळचा मुक्काम बॅ. समर्थ यांचे चुलत चुलते कुमारसेन समर्थ यांच्याकडे करण्याचे बाबासाहेबांनी ठरविले होते. ते जमत नसेल तर त्या चार दिवसांच्या राहण्याची व्यवस्था बॅ. समर्थ यांच्या घरी करावी, असे पत्र बाबासाहेबांनी नानकचंदांना टाईप करायला सांगितले आणि त्यावर स्वाक्षरी करून ते सकाळी पोस्टात टाकायला सांगितले.

त्यानंतर बुद्ध अँड कार्ल मार्क्स या ग्रंथाचा बराचसा मजकूर व आलेल्या पत्रांना द्यावयाची उत्तरे यांचा मजकूर नाकचंद टाईप करीत बसले. माईसाहेबांचे वडील, बंधू व सामराव जाधव या तिघांनी त्याच रात्री मुंबईस जायचे ठरविले व ते स्टेशनवर गेले. बाबासाहेब झोपी गेल्यानंतरही नानकचंदांनी हातातील टाइपिंग संपवून ते कागद टेबलावर नीट ठेवले व रात्री एक वाजता तेथेच झोपले.

४ डिसेंबरला बाबासाहेब सकाळी पावणेनऊच्या सुमारास उठले. नानकचंदांनी रात्री टाइप केलेल्या पत्रांवर सह्या घेतल्या व दहा वाजता बाहेर पडले. सकाळी ११ वाजता बाबासाहेबांना भेटायला जैन धर्माचे काही लोक आले. त्यांनी जैन व बौद्ध धर्मांतील तत्त्वांची सम व विषम स्थळे याविषयी त्यांच्याशी चर्चा केली. या बाबतीत अधिक विचारविनिमय व्हावा व दोन्ही धर्मांतील लोकांचा मिलाफ व्हावा, यासाठी योजना आखावी, अशी त्यांनी बाबासाहेबांना विनंती केली. बाबासाहेब म्हणाले, उद्या रात्री साडेआठनंतर आपण यावर अधिक चर्चा करू. दुसऱ्या दिवशी येण्याचे आश्वासन देऊन ती मंडळी बाहेर पडली. त्या संध्याकाळी बाबासाहेबांनी काही पत्रे स्वतः लिहीली. त्यापैकी एक आचार्य अत्रे यांना व दुसरे श्री. एस.एम. जोशी यांना होते. शिवाय, रिपब्लिकन पक्षाचे ध्येय, धोरण, कार्यक्रम वगैरे मुद्यांसंबंधी माहिती देणारा १०-१२ पानांचा इंग्रजी मजकूर; ब्रह्मदेशाच्या सरकारने भारतात बौद्ध धम्माचा प्रसार करण्यासाठी सहाय्य करावे, अशा अर्थाचे त्या सरकारास पत्र- असे सर्व लिखाण बाबासाहेबांनी स्वतःच्या हस्ते तयार करून ते टाइप करावयास नानकचंदांकडे दिले. व १६ डिसेंबरच्या कार्यक्रमाच्या व्यवस्थेसंदर्भात पत्र लिहायलाही सांगितले.

दि. ५ डिसेंबर १९५६ रोजी संध्याकाळी ५.३० वाजता कार्यालय सुटल्यावर नानकचंद बंगल्यावर आले. तसा साहेबांचा नोकर सुदाम याने त्यांना फोन केला होता. बाबासाहेबांना झोप लागत नव्हती. थोडेसे अस्वस्थ होते. अशाही परिस्थितीत मधूनमधून बाबासाहेब बुद्ध अँड कार्ल मार्क्स या ग्रंथाचा मजकूर लिहीत, त्यामुळे त्यांच्या हातून तीन-चारच कागद लिहून झाले होते. नानकचंदांना बाबासाहेबांचा चेहरा म्लान झालेला व ते अस्वस्थ असलेले दिसले. साहेबांनी त्यांच्याकडे लिहीलेले कागद टाईप करायला दिले आणि बिछान्यावर जाऊन पडले.

आधीच ठरल्याप्रमाणे थोड्याच वेळात जैन धर्माचे लोक चर्चा करण्यासाठी दाखल झाले. त्यांनी नानकचंदांजवळ भेटण्यास आल्याचा निरोप बाबासाहेबांना दिला. मी फार थकलो आहे, त्यांना उद्या बोलाव, असे ते म्हणाले; मात्र, लगेच मी एक पाच-दहा मिनिटांनी खाली येतो. त्यांना बसायला सांग. असे सांगितले. थोड्या वेळाने नानकचंदांचा आधार घेऊन ते बाहेर वऱ्हांड्यात पाहुण्यांशी बोलावयास येऊन बसले. त्या दोन जैन व्यक्तींनी बाबासाहेबांना उत्थापन देऊन नमस्कार केला. दुसऱ्या दिवशी, ६ डिसेंबरला जे जैनांचे संमेलन भरणार आहे, त्यातील जैन मुनींबरोबर बौद्ध धम्म व जैन धर्म यांचे ऐक्य व्हावे, याबद्दल बाबासाहेबांनी चर्चा करावी, अशी इच्छा प्रदर्शित केली आणि श्रमणसंस्कृति की दो धाराएँ- जैन और बौद्ध ही पुस्तिका भेट दिली. उद्याच्या चर्चेसंबंधी नक्की वेळ ठरवू या, या जैन गृहस्थांच्या बोलण्यावर बाबासाहेबांनी त्यांना चिटणीसांना फोन करून शक्यतो संध्याकाळची वेळ घेण्यास सांगितले. कारण सकाळी त्यांना जमणार नव्हते. ते लोक निघून गेल्यानंतर बाबासाहेब तेथेच थोडा वेळ डोळे मिटून बसून राहिले आणि हळू आवाजात बुद्धम् शरणम् गच्छामि त्रिसरण म्हणू लागले. त्यानंतर नानकचंदांना बुद्ध भक्तिगीते ही रेकॉर्ड लावायला सांगितली व त्या गीतांबरोबर स्वतःही गुणगुणू लागले. नोकराने जेवणास बोलावले, तेव्हा जेवणाची इच्छा नाही म्हणाले. पुन्हा नानकचंदांच्या आग्रहाने जेवावयास उठले. डायनिंग हॉलचा मार्ग ड्राईंग रुममधून जात होता. त्या हॉलच्या दोन्ही बाजूंना भिंतीच्या कडेने ग्रंथांची कपाटे ओळीने लावलेली. ग्रंथांनी खच्चून भरलेली कपाटे. ग्रंथांनी भरलेले स्टँड्स. त्यातील एक ग्रंथ घेऊन बाबासाहेबांनी तो उघडला. तो ठेवून दुसरी अलमारी उघडून त्यातील अत्यंत दुर्मिळ पुस्तकांतील काही ग्रंथ काढून नानकचंदच्या हातात दिले. त्या अलमारीच्या बाजूच्या अलमारीत कायद्याची, त्यापुढच्या अलमारीत समाजशास्त्राची, त्याच्या बाजूला तत्त्वज्ञानाची, पुढे अर्थशास्त्र, त्यापुढे राजकारणाची, त्याच्या बाजूला चरित्रग्रंथ होते. आपले हे सर्व अद्यावत  ग्रंथभांडार पाहून त्यांनी एक दीर्घ निःस्वास सोडला. हळूहळू चालत डायनिंग टेबलला येऊन बसले. दोन घास खाल्ले व पुन्हा हॉलमध्ये येऊन बसले. नानकचंदला डोकीला तेल लावून मसाज करायला सांगितले. मसाज संपल्यावर काठीच्या सहाय्याने उभे राहिले आणि एकदमच मोठ्याने म्हणाले, चल उचल कबीरा तेरा भवसागर डेरा...

परत हॉलमधून आपल्या ग्रंतांकडे पाहात बिछान्याकडे आले आणि आडवे झाले. नेहमीप्रमाणे नानकचंद पाय चोळू लागले. त्यावेळी मघाशी कपाटातून काढलेली पुस्तके चाळून पाहू लागले. टेबलावर पुस्तकांशिवाय काही ग्रंथांची टिपणे, लिहीलेली प्रकरणे, टाईप केलेला मजकूर यांची ढीग पडलेला होता. बाबासाहेब थकलेले दिसत होते. चेहराही निस्तेज झाला होता. त्यांना झोप येऊ लागली, तेव्हा नानकचंदांनी जायची परवानगी मागितली. तेव्हा ते म्हणाले, जा आता. पण उद्या सकाळी लवकर ये. लिहीलेला मजकूर टाइप करावयाचा आहे. नानकचंद निघाले, तेव्हा रात्रीचे ११.१५ झाले होते. इतक्यात सुदामने त्यांना साहेब बोलावत असल्याचे सांगितले. ते गेले असता म्हणाले, अरे ती अत्रे आणि एस.एम. जोशींना लिहीलेली पत्रे आणि बुद्ध अँड हिज धम्म हे सर्व इथे माझ्याजवळ ठेव. त्यावरुन मला दृष्टी फिरवायची आहे. नानकचंदने त्याप्रमाणे केले व ते जायला निघाले तेव्हा ११.३५ झाले होते.

नानकचंदांनी उद्धृत केलेला बाबासाहेबांच्या आयुष्यातला हा अखेरचा संवाद होय. दुसऱ्या दिवशी, ६ डिसेंबरला बाबासाहेब उठलेच नाहीत.

महापरिनिर्वाण दिनानिमित्त या महामानवास कोटी कोटी प्रणाम!!!


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा