‘माणूस हा समाजशील प्राणी आहे.’ माणसाच्या बाबतीत वेळोवेळी
सांगितलं जाणारं एक महत्त्वाचं वाक्य आहे हे! माणसातली समाजशीलता काढून टाकली अगर निघून गेली की
फक्त प्राणी शिल्लक राहतो. भारतीय घटनेनं या समाजशीलतेला स्वातंत्र्य, समता,
बंधुता आणि धर्मनिरपेक्षता या मूल्यांची जोड देऊन अधिक व्यापक आणि सर्वसमावेशक
बनविलेलं आहे. मात्र, वेळोवेळी ही समाजशीलता सोडून देऊन आपण प्राणी- नव्हे, जनावर कसे आहोत, याचंच
प्रत्यंतर देण्याच्या मागे आपण लागलेलो आहोत की काय, असे वाटावे, अशी परिस्थिती
आपल्या भोवतालात निर्माण होऊ लागली आहे.
माणसाच्या सद्यस्थितीतील जगण्यावर आता भौतिकवाद आणि चंगळवादाची पुटंच्या पुटं
चढलेली आहेत. सध्याचा कालखंडच बाजारीकरणाचा असल्यानं माणसाला जास्तीत जास्त ग्राहक
म्हणूनच या बाजारात किंमत राहणार, हे वास्तव मानलं तरीही काही मूल्यं ही आपलं
माणूसपण शाबूत ठेवण्यासाठी, अबाधित राखण्यासाठी आवश्यक असतात. मूल्यांची बूज ही
आपल्या माणूसपणाची साक्ष देणारी महत्त्वाची गोष्ट असते. ती संपुष्टात आली की आपलं
माणूसपण सिद्ध करणंच मुश्कील होऊन बसेल, असा आजचा सारा माहौल झालेला आहे.
वाढत्या नागरी वस्त्या, शहरीकरण, जगण्यासाठीची प्रत्येकाची अहमहमिका, जीवघेणी
स्पर्धा या साऱ्या कोलाहलामध्ये माणूसपणाचा मागमूस हळूहळू अस्तंगत होत चालल्याचे
चित्र निर्माण होते आहे. माणसांच्या आडव्या वस्त्यांनी जागा व्यापल्या,
अतिक्रमल्या तेव्हा आता उंचच उंच, टोलेजंग इमारती बांधून माणूस त्या आलिशान
खुराड्यांमधून कोंबड्यांप्रमाणं आपले संसार थाटू लागला. ‘सोसायटी’
असं ‘समाज’ला समांतर नाव लेऊन समाजाचं जणू
लघु प्रतिरुप म्हणून जिथं माणसांनी सहनिवास करणं अभिप्रेत असतं, तिथं सुद्धा तो
परस्परांप्रतीचा उच्चनीचभाव, धर्म, जाती, भाषा, प्रांतादी भेदभाव जपत, जोपासत
राहिला आहे. विविधतेत एकात्मतेचे सूत्र सांभाळून भेदांसह आपला देशबंधू-भगिनी
म्हणून माणूस जोडला जात होता, तोवर तेही स्वीकारार्ह होते. आता मात्र आपण या
भेदांच्या बाबतीत आपल्या भिंती अधिक मजबूत करीत चाललो आहोत. मनभेद निष्ठूरपणाने
निर्माण करीत आहोत.
मुंबईसह बऱ्याच महानगरांमध्ये या भेदाभेदांची हद्द होताना दिसते आहे. विशेषतः
मुस्लीम समाजाच्या संदर्भात हा भेद, विरोध अधिक तीव्रतर आहे. सुरवात झाली शाकाहारी
सोसायट्यांच्या उभारणीपासून. काही विशिष्ट शाकाहारी समाजातल्या लोकांनी एकत्र येऊन
याची सुरवात केली आणि तिथेच ‘सोसायटी’ या नावाला कलंक लावायला सुरवात
केली. त्यांनी आपल्या समाजातल्या लोकांसाठी भव्य टाऊनशीप उभ्या केल्या मात्र तिथे
केवळ शाकाहारी लोकांनाच बुकिंग करण्याची परवानगी दिली. यातही मेख अशी की, त्या
समाजाखेरीजचे इच्छुक लोक हे काही पूर्ण वेळ शाकाहारी नव्हते अगर नसतात. आणि
चौकशीअंती वस्तुस्थिती समजतेच की. त्यामुळे ना इतर समाजघटकांतील कोणी अशा
सोसायट्यांच्या नादी लागले, ना त्यांनी अशा त्रयस्थ-समाजघटकांना आपल्यात सामावून
घेण्यात इंटरेस्ट दाखविला. मुस्लीम समाजघटक हा तर खूपच लांबचा विषय ठरला. अशा
तऱ्हेने या ‘एकसमाजी’ सोसायट्या साकार झाल्या- घटनेतील
तरतुदींना पद्धतशीर फाटा देऊन.
दहशतवादी घटनांमध्ये अधिकतर मुस्लीम समाजातील लोकांचा समावेश दिसून येतो, असे
बेगडी कारण देत मुस्लीम समाजातील लोकांना कित्येक सोसायट्यांमध्ये फ्लॅट विकतच
काय, पण भाड्यानेही देऊ नयेत, असा अलिखित संकेतच जणू रुढ झालाय. प्रत्येक दहशतवादी
जसा मुस्लीम नाही, तसा प्रत्येक मुस्लीम दहशतवादी कसा ठरवू शकतो आपण? सोसायट्यांना कोणी दिला हा अधिकार? किती तरी मुस्लीम बंधू-भगिनी
अत्यंत प्रगल्भपणाने विविध क्षेत्रांत आपले योगदान देत आहेत. या समाजाच्या,
देशाच्या प्रगतीमध्ये आपला वाटा उचलीत आहेत. अशी वस्तुस्थिती असताना आपण मात्र
धर्माच्या नावाखाली समतेच्या तत्त्वाला हरताळ फासतो आहोत, हे अन्यायकारक नव्हे काय? काही भडकाऊ लोक सामाजिक अस्थैर्य
निर्माण करण्यासाठी धर्म व जातिभेदांना सातत्याने चिथावणी देत असतात. त्यासाठी
कोणत्याही प्रकारचे खोटेनाटे, भडक प्रचारकी साहित्य समाजमाध्यमांतून जाणीवपूर्वक
गतिमानतेने पसरविले जाते. असल्या अफवेखोर साहित्याची कोणत्याही प्रकारे शहानिशा न
करता त्यावर विश्वास ठेवून अकारण मनामध्ये गैरसमज बाळगून त्या कलुषित दृष्टीनेच
मुस्लीम समाजघटकांकडे पाहिले जाते. या संपूर्ण समाजाला एकाच पारड्यात तोलून आपण
किती घनगंभीर चूक करतो आहोत, माणुसकीला हरताळ फासतो आहोत, याची मूलभूत जाणीवच
खुंटते तिथे. समाजासमाजामध्ये तिरस्काराची, द्वेषाची, भेदभावाच्या भावनेची दरी
निर्माण होण्यास, ती जाणीवपूर्वक वाढवित नेण्यास जर मूलतः आपणच कारणीभूत ठरतो
आहोत, तर उद्या मुस्लीम लोक हे त्यांची त्यांची स्वतंत्र वस्ती थाटतात, त्यांच्या
त्यांच्या स्वतंत्र कॉलन्या, सोसायट्या निर्माण करतात, असल्या वावदुक आरोपांचे
आरोपण आपण त्यांच्यावर करीत असताना प्रत्यक्षात ते बोट आपण आपल्याकडेच करायला हवे.
शेवटी तीही माणसंच आहेत, त्यांनाही राहायला चांगलं घर, चांगली वस्ती, चांगली
सोसायटी हवी आहे. तुम्ही नाकारत राहाल, तर ते स्वतःच्या स्थापन करणारच ना! मात्र, असे करीत असताना आणि
त्यांना तसे करायला भाग पाडत असताना दोन्हीकडच्या ‘सोसायट्या’
खऱ्या अर्थाने स्वतःला ‘समाज’ म्हणवून घेण्यास पात्र असतील का,
याचा विचार कोणत्या ‘समाजा’ने करायचा मग?
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा