बुधवार, ९ फेब्रुवारी, २०२२

अजीब दास्ताँ है ये...

 



गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे ६ फेब्रुवारी २०२२ रोजी निधन झाले. भारतीय संगीताच्या क्षेत्रात सुमारे आठ दशके लीलया विहरणारा आठवा सूर हरपला. खरोखरीच प्रत्येक भारतीयाच्या जीवनात निर्माण झालेली ही पोकळी वर्णन करण्यासाठी खरे तर शब्द अपुरेच पडत राहतील. आकाशवाणीवरील पहाटेच्या भूपाळीपासून ते रात्री उभीराच्या भुले बिसरे गीतपर्यंत हरघडी  आपल्याला साथ देणारा, आपले आयुष्य संगीतमय करणारा हा स्वर लोपल्याचे दुःख वर्णनातीत आहे.

एखादी व्यक्ती जाते, एखादा कलाकार जातो, तेव्हा त्याच्या चांगल्या योगदानाची आठवण काढून त्याविषयी कृतज्ञता व्यक्त करून श्रद्धांजली वाहिली जावी, असा अलिखित संकेत असतो. त्याप्रमाणे माध्यमांतून, समाजमाध्यमांतून लतादिदींच्या विषयी चाहत्यांनी भरभरून लिहीले देखील. त्यांच्या अनेक आठवणी, किस्से यांना अक्षरशः ऊत आला. ही बाब चांगलीच म्हणावी. व्यक्तीशः सांगायचे झाले, तर अशा अनेक व्यक्ती आहेत की, ज्यांच्या उत्तुंग योगदानाबद्दल मला त्यांच्या मृत्यूनंतरच समजले आणि मी हयातभर त्यांच्या प्रेमात पडलो. लताबाईंच्या जीवनपटाचे, कारकीर्दीचे तर आपण साक्षीदार आहोत, याचा खरे तर आपल्याला अभिमान वाटायला हवा. तसा तो मला वाटतो सुद्धा!

एका संपादक मित्राने सोशल मीडियावर लताबाईंच्या अनुषंगाने एक सुंदर प्रश्न विचारला, लतादिदी गेल्याचे समजल्यानंतर त्या क्षणी आपल्या मनी कोणते गाणे आले?’ खरे तर अवघडच प्रश्न. कारण लतादिदींची गाणी आठवण्याची गरजच पडत नाही आपल्याला. दररोज त्यांचे कोणते ना कोणते गीत गुणगुणत असतोच आपण. त्यातले तत्क्षणी एखादेच आपल्या मनात येणे तसे अवघडच. गीतांची नुसती गर्दी झालेली मनात. गाण्यांनी प्रथमच मनात कल्लोळ मांडलेला. त्या महान गायिकेच्या आवाजाचे गारुडच असं की, तिची अनेक गीते मनःपटलावर नुसती रुंजी घालू लागलेली. काही चित्रवाणीच्या पडद्यावर दाखविली जात होती तर काही आकाशवाणीच्या सुरावटींबरोबर वातावरणात सर्वदूर विहरत होती. त्यामुळे संपादक मित्राच्या या प्रश्नाला उत्तर देणे माझ्या आवाक्यापलिकडचे होते. मात्र, शेकडो लोकांनी त्या प्रश्नाला कॉमेंटच्या माध्यमातून उत्तर दिले होते. काहींनी खरोखरीच काही अवीट, अजरामर तर काहींनी माहिती नसलेली अगर विस्मरणात गेलेल्या गीतांचीही याद दिली. मात्र, त्यात एक प्रवाह औचित्यभंग करणारा होता आणि विशेषतः त्यामध्ये युवा पत्रकारांची संख्या लक्षणीय होती, हे माझ्यासाठी फार चिंताजनक होते. अशा अनेक व्यक्ती आहेत की ज्यांच्या कलाकारीच्या आपण प्रेमात असतो, मात्र, त्यापलिकडे जाऊन त्यांच्या वर्तनविषयक इतर अनेक बाबी आपल्याला पटत असतीलच, असे नाही. किंवा त्या आपण पटवून घेतल्या पाहिजेत, असेही नसते. त्या त्या वर्तनामागे ज्याची त्याची स्वतःची एक कारणमीमांसा असू शकते. अगर जोपर्यंत अखिल सामाजिक, राष्ट्रीय हितसंबंधाला बाधा पोहोचेल, अशा पद्धतीने ती वागत नाही, तोवर तिचे उत्तरदायित्व मर्यादित राहते. या उत्तरदायित्वाची मर्यादा अथवा कक्षा हवी तितकी वाढविता येऊ शकते, हे जरी खरे असले तरी त्या मर्यादेच्या कक्षेवर आपण अतिक्रमण वा अधिक्रमण करू नये, हेही तितकेच खरे आणि योग्य.

माझ्याही मनात लतादिदींच्या अनुषंगाने गीता दत्त, सुमन कल्याणपूर, अनुराधा पौडवाल अशी नावे आली. जयप्रभा स्टुडिओ आणि त्यापलिकडेही अनेक किस्से आठवले. बाबासाहेबांची गीते म्हणण्यास दिलेला त्यांचा नकारही आठवला. पण, यामध्ये नुकसान आंबेडकरी समाजाचे झालेले नाही. लताबाईंच्या कारकीर्दीत राहून गेलेली एक उणीव म्हणून त्याकडे पाहायला हवे. भारतीय समाजाचे बाबासाहेबांविषयीचे आकलन हा एक सार्वत्रिक आत्मचिंतनाचाच भाग आहे. त्याला लतादिदी अपवाद ठरत नसतील, तर त्याला भारतीयांचे हे सामाजिक मानसिक पर्यावरण कारणीभूत आहे, असा आरोप करावा लागतो. काहीही असो, लतादिदींनी भारतरत्न स्वीकारला तो देशाचे पहिले दलित राष्ट्रपती डॉ. के.आर. नारायणन् यांच्या हस्ते, ही बाब आपण नजरेआड करू शकत नाही. दिदींनी वडिलांच्या माघारी चिमुरड्या वयात उचललेली कुटुंबाची जबाबदारी आणि त्या जबाबदारीचं आयुष्यभर निभावलेलं ओझं कसं विसरणार? त्यांच्या गीतांनी आपल्या सुखदुःखात दिलेली साथ कशी नाकारणार?

काहीही असो! व्यक्ती गेल्यानंतर तिच्या चांगल्या बाबी आपण आठवाव्यात, त्यातील अधिक चांगल्याचा स्वीकार करावा आणि माणूस म्हणून तिच्या हातून झालेल्या चुकांचा पाढा वाचत न बसता, त्या पाठीवर टाकून पुढे चालत राहावे, या संकेताचा इथे लोकांना विसर पडला, याचा खेद मात्र निश्चितपणाने मोठा आहे. विशेषतः पत्रकारितेच्या क्षेत्रात नव्याने उमेदवारी करीत असलेल्या युवा मित्र-मैत्रिणींनी या गोष्टीचे भान अत्यंत कटाक्षाने सांभाळण्याची गरज मला तीव्रतेने अधोरेखित करावीशी वाटते. याचे कारण म्हणजे आपल्या लेखणीच्या माध्यमातून किमान सामाजिक प्रबोधन करण्याची अन्य घटकांपेक्षा काही अधिकची संधी या घटकाला प्राप्त झालेली असते. अशा वेळी कालकथित व्यक्तीबद्दलच्या पूर्वग्रहांना जर माध्यमकर्मी औचित्यभंग करून स्थान देऊ लागली, तर त्यासारखी चुकीची दुसरी गोष्ट असणार नाही. त्याहूनही व्यथित करणारी बाब म्हणजे असे पूर्वग्रह मनात बाळगल्याने मानसिकदृष्ट्या कलुषित होणारी ही मने पुन्हा अन्य बाबींकडे स्वच्छ दृष्टीकोनातून पाहू शकतील का, पाहू लागतील का, हा अस्वस्थ करणारा प्रश्न मनात डोकावतो. समाजमानस अधिकाधिक सजग, सबळ आणि सकारात्मक घडावे, यासाठीची प्रमुख जबाबदारी ज्याच्या खांद्यावर, तो पत्रकारितेमधील हा नव युवा वर्ग. आणि तो जर अशा पूर्वग्रहदूषित नजरांनी भोवतालाकडे पाहू लागला, तर त्या पूर्वग्रहांवर सातत्याने फुंकर घालून फुलवित राखणारे अनेक प्रबळ प्रवाह सध्या भोवतालात कार्यरत आहेत, त्यांच्या चिथावणीने आपण पथभ्रष्ट होण्याचा धोका अधिकच वाढतो.

माझ्या तरुण मित्र मैत्रिणींना सांगणे एकच, एखाद्या विषयाच्या सर्व बाजू माहिती करून घेणे आणि त्याविषयी समाजमानसाला अवगत करीत राहणे, हा आपल्या कर्तव्याचा भाग आहेच. ते कर्तव्य आपण बजावित राहिले पाहिजेच. मात्र, काळ-वेळ पाहून त्याचा सारासारविवेकाने निर्णय घेतला जाणेही तितकेच महत्त्वाचे आहे. तसे न झाल्यामुळेच शाहरुख खानने लतादिदींसाठी फातेहा पढल्यानंतर त्यांच्या चिरशांतीसाठी दुआ मागितली, त्याचे इतके भ्रष्ट आकलन करवून घेऊन उठविण्यात आलेल्या वावटळीचे भारतीय समाजात वादळात रुपांतर झालेच नसते. आपल्या भारतीयत्वाचे धिंडवडे आपणच असे काढले नसते!

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा