गुरुवार, २० जानेवारी, २०२२

प्रागतिक मुक्ततावादी राष्ट्रवादाचा पुरस्कर्ता: डॉ. सूरज येंगडे

Dr. Suraj Yengade



मूळचे महाराष्ट्रातील आणि सध्या अमेरिकेतील हार्वर्ड केनेडी स्कूल येथील संशोधक डॉ. सूरज येंगडे या वर्षी 'लोकसत्ते'त चतु:सूत्र सदरात लिहीणार आहेत. दोन वर्षांपूर्वी हा तरूण संशोधक भारतात आला असताना शिवाजी विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यास केंद्राने माणगाव परिषद शतकमहोत्सवी व्याख्यानमालेंतर्गत  त्यांचे  व्याख्यान आयोजित केले होते. डॉ. श्रीकृष्ण महाजन यांनी त्याकामी पुढाकार घेतलेला. यावेळी सूरज यांच्याशी संवाद साधण्याची, ऐकण्याची संधी लाभलेली. त्यांचं व्यक्तिमत्त्व प्लीजंट आहेच, अन् ते आपली मतं, आपलं संशोधन संयतपणानं मात्र ठोसपणानं मांडतात. त्यांची केशभूषा भारतातील एका सुप्रसिद्ध व्यक्तिमत्त्वाची आठवण देते, मात्र ते तेवढंच. त्याखालच्या डोक्यातले विचार हे १८० अंशांनी वेगळे आहेत.

सूरज यांनी त्यावेळी राष्ट्रवादाच्या अनुषंगाने बाबासाहेबांची आणि समकाळाची मांडणी केली होती.

 "सध्याचा आपला राष्ट्रवाद हा द्वेषाधारित असून त्याने आपला बुद्धीप्रामाण्यवाद आंधळा करून सोडला आहे," असे स्पष्ट मत त्यांनी नोंदविले होते. 

 "डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटल्याप्रमाणे भारतीय समाज हा हजारो जातीजातींत विभागला गेला आहे. त्या अंतर्गत आणखी पोटजाती आहेत. इथली प्रत्येक जात ही एक स्वतंत्र राष्ट्र आहे आणि इथला प्रत्येक नागरिक हा ज्याच्या त्याच्या जातीय-राष्ट्राशी प्रामाणिक आणि बांधील राहण्यासाठी प्रयत्नशील असतो. या प्रत्येक पोटजातीत जिचा तिचा राष्ट्रवाद आहे. ही बाब एखाद्या स्फोटकापेक्षा कमी नाही. म्हणून खऱ्या राष्ट्रवादाच्या प्रस्थापनेसाठी प्रथमतः हा जातीजातींमधील, पोटजातींमधील भेद संपूर्णतः नष्ट करण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे आपला राष्ट्रवाद हा परस्पर द्वेषाबरोबरच क्रिकेट-राष्ट्रवाद आहे. यामुळे खेळामध्ये अभिप्रेत असलेल्या खिलाडूवृत्तीला हरताळ फासला जातो आणि अखिलाडू राष्ट्रवाद हा खरा राष्ट्रवाद पुढे आणला जातो. अंबानी, अदानी, मल्ल्या असले धनिक लोक आपल्या राष्ट्रवादाची भूमिका व दिशा ठरवितात. तो देशाचा राष्ट्रवाद म्हणून पुढे केला जातो. कष्टकरी, मजूर, महिला, शोषित, वंचित यांचा राष्ट्रवाद हा आपला कधीच होत नाही. त्याचबरोबर जुन्या काळात संस्कृतीच्या नावाखाली झालेल्या चुकीच्या, समाजविघातक गोष्टींचे नव्याने पुनरुज्जीवन आणि त्यांची बहुजनांच्या पाठिंब्यावरच पुनर्प्रस्थापना करून सांस्कृतिक राष्ट्रवाद या गोंडस नावाखाली थोपविण्याची प्रक्रियाही सुरू आहे. राष्ट्रवादाचा पुरस्कारच करावयाचा असेल तर तो आर्थिक राष्ट्रवादाचा केला पाहिजे." असे मत सूरज यांनी मांडले होते. 

राष्ट्रवाद या संकल्पनेच्या उगमाविषयी त्यांची मांडणीही चिंतनप्रवण करणारी आहे. ते सांगतात, "राष्ट्रवाद ही संकल्पना समूहवादातून पुढे आलेली आहे. पूर्वीच्या काळी माणूस छोट्या छोट्या समूहांतून राहायचा. त्यामुळे साहजिकच तिथे असुरक्षिततेची भावना मोठ्या प्रमाणात असायची. या असुरक्षिततेमधून त्यांना बाहेर काढण्याचे आश्वासन देणारा त्यांचा म्होरक्या असायचा. त्याच्याप्रती त्यांना वारंवार उद्घोष व जयजयकार करून आपली निष्ठा प्रदर्शित करावी लागायची. त्यातून त्या राजाचे अनुयायी मोठ्या प्रमाणावर तयार होत असत. पुढे आपले वर्चस्व टिकविण्यासाठी वेगवेगळे कायदे करून समाजघटकांवरील आपले नियंत्रण व वर्चस्व अबाधित राखण्याचा हे वरिष्ठ घटक प्रयत्न करीत. मनुस्मृती आणि तत्सदृश कायद्यांनी कनिष्ठ समाजघटकांवर असे वर्चस्व प्रस्थापित केले होते. त्या बळावर त्यांनी हजारो वर्षे आपली सत्ता त्यांच्यावर गाजविली. भारतातील विषमतेचे मूळ या सामाजिक कारणांमध्येच दडलेले आहे. हीच असुरक्षिततेची भीती व दहशत आजच्या राष्ट्रवादातही प्रतिबिंबित झालेली दिसते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे राष्ट्रवादाला भावनिक व मानसिक स्तरावरील दुधारी तलवार म्हणत. राष्ट्रवादासाठी तुम्हाला एक बाह्यशक्ती आणि तिची भिती यांची गरज असते. भीती नसेल तर राष्ट्रवादाचीही गरज नाही, असे ते म्हणत. खरे तर आजच्या युगात अशी भीती नसेल तर आपण उत्तम ग्लोबल सिटीझन होऊन जाऊ; मुक्त, स्वतंत्र व्यक्ती म्हणून वावरू शकू. मात्र, जागतिकीकरणाने आपल्याला जगाशी उन्मुक्तपणे जोडले, हा सकारात्मक आणि आर्थिक बाबतीत दुय्यमत्व लादले, हा नकारात्मक, असे परिणाम आपल्यावर झाले. या काळात अशा प्रकारचे राष्ट्रवादी होणे आपल्याला परवडणारे नाही. राष्ट्रवाद हवाच असेल तर तो प्रागतिक मुक्ततावादी असायला हवा, महिला सबलीकरणाचा आग्रह धरणारा राष्ट्रवाद असायला हवा, मध्ययुगीन, पुराणमतवादी संकल्पनांतून बाहेर कढून भारतीय समाजाला आधुनिकतेच्या दिशेने घेऊन जाणारा राष्ट्रवाद हवा, भावनिक आणि मानसिक असुरक्षिततेमधून बाहेर काढणारा राष्ट्रवाद हवा, कोणाला वाचविणारा अगर कोणाला बदनाम करणारा नव्हे, तर फुले-शाहू-आंबेडकरांच्या मार्गाने जाणारा राष्ट्रवाद हवा." हेही आवर्जून सांगायला सूरज विसरत नाहीत. 

म्हणूनच डॉ. सूरज येंगडे यांना "वाचायला" मी उत्सुक आहे... आपणही जरूर वाचा...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा