शनिवार, २६ मार्च, २०२२

संत रविदासांच्या ‘बे-गम-पुऱ्या’त...



सन २०२२ सुरू झालं आणि या वर्षीचं पहिलं पुस्तक हाती आलं, ते म्हणजे डॉ. रविंद्र श्रावस्ती यांचं शोध संत रविदासांचा होय. डॉक्टरसाहेबांकडून वेळोवेळी या पुस्तकाच्या लेखन प्रगतीविषयी समजत होतं आणि त्यातून या पुस्तकाविषयीच्या कुतूहलात वाढच होत होती. महत्त्वाचं म्हणजे रविदासांचं चरित्र माहिती होतं, त्यांच्याविषयीच्या काही दंतकथा माहिती होत्या. किंबहुना, कथांपेक्षा दंतकथांतलेच रविदास अधिक माहिती असलेले. अनुप जलोटा यांच्या भक्तीपूर्ण आवाजानं ओथंबलेलं प्रभुजी तुम चंदन हम पानी... हे माझ्या आवडत्या भजनांपैकी एक. हे भजन रविदासांचंच. त्यावेळी रविदास मनात खोल कुठं तरी घुसलेलेच, पण, भजन ऐकताना अनुपजींच्या आवाजाचीच मोहिनी अधिक पडलेली. या साऱ्या दंतकथा आणि ज्ञात-अज्ञात रविदासांबद्दल मनात असलेल्या कल्पनांवरले पहिले आवरण भेदले, ते डॉ. गेल ऑम्वेट यांनी. सिकींग बेमगपुरा वाचलं. वाचलं तेव्हा संशोधकीय आणि सैद्धांतिक मांडणीच्या पलिकडे आकलन झालं, ते एका सामाजिक लोकशाहीवादी राष्ट्रसंताचं! रविदासांची ही तेव्हा मनात निर्माण झालेली प्रतिमा पूर्णरुपात साकार होण्यासाठी २०२२ साल उजाडावं लागलं.

पंधराव्या शतकातला एक संत त्याच्या स्वप्नातल्या शहराची- नव्हे देशाची प्रतिमा कशी रेखाटतो, तर बेगमपूर म्हणून! थेट अर्थ घेतला तर त्यात स्त्रीवादाचा अंतर्भाव, प्रभाव दिसतोच, किंबहुना तो आहेही. जी व्यक्ती समतेची सच्ची पुरस्कर्ती म्हणून प्रबोधनाची मशाल हाती घेते, ती स्त्रियांच्या हक्कांचा हुंकार भरणार नाही का? रविदासांनी तो भरला आहेच. पण, त्याही पुढे जाऊन जहाँ कतई गम न हो असे ते बेगमपूर... म्हणजेच जिथे दुःख नाही, वेदना नाहीत, अशांती नाही, अस्वच्छता नाही, भेदभाव नाही, विषमता नाही, परस्परांप्रती कटुता नाही, असे शहर होय. अर्थातच, शांती, समता, बंधुता, स्वातंत्र्याचा, सहिष्णुतेचा म्हणजेच लोकशाहीवादी, मानवी मूल्यांचा इतका थेट उद्घोष आणि तोही त्या कालखंडात एक संत करतो, ही केवढाली मोठी क्रांतीकारक घटना होती.

आजकाल आपण आपल्या भ्रष्ट राजकीय स्वार्थप्रेरित हेतू साध्य करण्यासाठी साऱ्याच संतांची आणि राष्ट्रपुरूषांची जात काढण्याचं पातक करतो आहोत. त्याला पूरक अशी मिथकं जोजावणं आणि ती सातत्यानं लोकांच्या मनावर बिंबवत राहणं, ही अशा लोकांची गरज बनून राहिली आहे. आपण त्याला बळी पडतो आहोत, हा आपला मूर्खपणा किंवा भ्याडपणा, काही समजा. पण हे होते आहे. पाच शतकांपूर्वी रविदास या साऱ्या गोष्टींतून बाहेर पडू पाहत होते, हे केवढे क्रांतदर्शित्व. त्याच बळावर डिकास्ट अर्थातच महामानव बनलेल्या रविदासांना आपण पुन्हा पकडून जातीच्या चौकटीत आणि त्यांच्या पिढीजात धंद्याचे प्रतीक म्हणून वापरतो आहोत, हा त्या महामानवाच्या कर्तृत्वाचा केवढा घोर अपमान. आता रविदासांबद्दल लिहीतो आहे म्हणून त्यांचा उल्लेख केला, मात्र सध्या प्रत्येक जातीत-पोटजातींत हे राजकारण धुमसते आहे.

डॉ. श्रावस्ती यांनी संत रविदासांचा शोध घेत असताना केवळ त्याच्या जीवनकाळापुरता पाच-सहा दशकांपुरता हा शोध न राखता त्याच्यामागे दोनेक हजार वर्षे आणि पुढे तीनेकशे वर्षे अशा व्यापक पटावर त्यांचे विश्लेषण केले आहे. श्रावस्ती सरांची ही शोधयात्रा प्रचंड रंजक आणि माहितीने ओतप्रोत भरलेली आहे. मुळातच ते अत्यंत गंभीर प्रवृत्तीचे समाजचिंतक आणि संशोधक आहेत. वैद्यकशास्त्राचे समग्र गांभीर्य त्यांच्या सामाजिक चिकित्सेच्या लेखनामध्ये एकवटलेले आढळते. ही सामाजिक शल्यचिकित्सा ते अत्यंत कौशल्याने करतात. टाके तर घालतातच, ते कुठे कुठे टोचायला तर हवेच, पण त्यापुढे जाऊन समाजमानस दुरुस्तही व्हायला हवे, या दृष्टीने त्यांचा समग्र लेखनव्यवहार केंद्रित झालेला आहे. संत रविदासांचा शोधही त्याला अपवाद नाही. खरं तर रविदासांविषयीच्या अधिकृत साहित्याची उपलब्धता अगदी मर्यादित आहे. अशा मर्यादित संदर्भसाधनांच्या आधारे अनेक धागेदोर जुळवत, काहींची फेरमांडणी करत त्यांनी हा सुमारे ५०० पृष्ठांचा महाग्रंथ साकारला आहे. एकूण २४ प्रकरणे, चार परिशिष्टे आणि संदर्भ सूची असा त्याचा पसारा आहे. पसारा आहे, मात्र तरीही तो आटोपशीर आहे. फुलोरा आहे, मात्र रविदासांच्या चरित्रकार्याचा सुगंध त्यासभोवार पसरला आहे. संशोधन आहे, मात्र संशोधकीय रुक्षपणाला त्यात पूर्ण फाटा आहे. समजावून सांगण्याची, पटवून देण्याची त्यांची म्हणून अशी एक शैली आहे. एक एक मुद्दा घेऊन त्याचे विश्लेषण करावयाचे आणि हे सारे विश्लेषित मुद्दे पुनश्च एकत्र करून त्यातून एका नव्या समग्राची मांडणी करण्याचा प्रयत्न करणे, हे डॉ. श्रावस्ती यांचे लेखनवैशिष्ट्य आहे. त्यांचे शब्दप्रभुत्व कमालीचे आहे. त्यांची शैलीही अत्यंत उद्बोधक आणि मर्मग्राही आहे. संयत पण मुद्देसूद मांडणीचे उत्तम उदाहरण म्हणजे त्यांचे लेखन.

भगवान बुद्धापासून ते कबीर-तुकाराम-नामदेवांपर्यंतच्या कालखंडाचा रविदासांच्या अनुषंगाने वेध घेत असतानाही कुठेही विषयापासून दूर गेले आहेत, असे होत नाही. रविदासांचा वेध घेणाऱ्या आख्यायिका, मिथके, दंतकथा त्याचप्रमाणे हिंदीतील अभ्यासक, संशोधक डॉ. जसवीर सिंह, डॉ. बी.पी. शर्मा, डॉ. चमन लाल, डॉ. पीतांबरदत्त बडथ्वाल इत्यादींनी रविदासांचे केलेले संकलन यांचा आढावा घेऊन पुन्हा त्याचा अधिक सूक्ष्मपणाने आणि तपशीलाने वेध घेण्याची अत्यंत कौशल्यपूर्ण कामगिरी डॉ. श्रावस्तींना इथे साधली आहे. संत रविदासांचा निर्गुणतेशी धागा जोडत असतानाच त्याच्या व्याप्तीचा अवकाश अधिकाधिक मोठा करीत अंतिमतः त्याचा विस्तार इतका विशाल झाला आहे की, बुद्धाच्या सद्धम्माच्या संकल्पनेला अर्थातच मानवतावादाच्या मूळ सिद्धांताला जाऊन ते मिळतात. एक कुशल संशोधक आपल्या अप्रतिम मांडणीच्या जोरावर किती महत्त्वपूर्ण कामगिरी साकार करू शकतो, त्याचे प्रत्यंतर हा ग्रंथ वाचताना येते. हा ग्रंथ डॉ. गेल ऑम्वेट आणि डॉ. भारत पाटणकर यांना अर्पण केला आहे, याचे त्यामुळेच आश्चर्य वाटत नाही. कारण सुरवातीला म्हटल्याप्रमाणं डॉ. ऑम्वेट यांची संशोधकीय चिकित्सादृष्टी आणि डॉ. पाटणकर यांची राष्ट्रप्रेमाने भारित कार्यकर्तव्य सजगता, याचे संमिश्रण त्यामध्ये स्वाभाविकरित्या आहे.

ग्रंथाचे मुखपृष्ठ हे आपल्याला परिचित असणाऱ्या रविदासांच्या प्रतिमेपेक्षा वेगळे अन् तरीही उत्कट आहे. शहजादा दारा शुकोह याने कबीर आणि रविदासांचे एकत्रित पेंटिंग करवून घेतले होते. त्यातले हे रविदास आहेत. जे मुखपृष्ठाच्या बाबतीत, तेच आतल्या रविदासांच्या शब्दचित्राच्या संदर्भातही तितकेच सार्थ आहे. मिथकांच्या पलिकडले, प्रत्यक्षातले रविदास वाचताना त्यांची मानवी मूल्यांप्रतीची सजगता आणि आस ही आत खोलवर रुतत जाते. आपल्याला आवाहन करीत राहते. लेखक रविदासांना तर जातीतून बाहेर काढतातच, पण त्याच्यातील प्रखर राष्ट्रीय वृत्तीही अधोरेखित करतात. हे राष्ट्रीयत्व खूप निर्मळ आहे, निरागस आहे, पारदर्शी आहे; महत्त्वाचं म्हणजे सकारात्मक विद्रोही आहे. तिथपर्यंत पोहोचण्याचा मार्ग दाखविणारा हा ग्रंथ आहे. मात्र तिथपर्यंत आपण कधी पोहोचणार आहोत, कोणास ठावे?

---

शोध संत रविदासांचा

लेखक: डॉ. रविंद्र श्रावस्ती

प्रकाशन: नाग-नालंदा प्रकाशन, इस्लामपूर

पृष्ठे: ४९६

किंमत: रु. ५६०/-

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा