Dr. Bhalchandra Kakade लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Dr. Bhalchandra Kakade लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, २ मे, २०२६

डॉ. भालचंद्र काकडे स्मृती व्याख्यानमालेत यंदा ज्येष्ठ विचारवंत डॉ. प्रकाश पवार

डॉ. भालचंद्र काकडे

डॉ. प्रकाश पवार


कोल्हापूर, दि. २ मे: शिवाजी विद्यापीठाचे माजी विद्यार्थी आणि निपाणीचे सुपुत्र शास्त्रज्ञ डॉ. भालचंद्र काकडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त ‘डॉ. भालचंद्र काकडे स्मृती व्याख्यानमाला’ ऑनलाईन स्वरूपात आयोजित करण्यात आली आहे. यंदा या व्याख्यानमालेमध्ये ज्येष्ठ विचारवंत डॉ. प्रकाश पवार यांचे ‘भारताचा विज्ञानवाद’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. सोमवार, दि. ४ मे २०२६ रोजी सायंकाळी ७.०० वाजता ‘आ’लोकशाही’ (@alokshahi) या युट्यूब वाहिनीवरून हे व्याख्यान प्रसारित होणार आहे, अशी माहिती आयोजक डॉ. आलोक जत्राटकर यांनी दिली.

दि. ४ मे रोजी डॉ. भालचंद्र काकडे यांचा पाचवा स्मृतिदिन असून त्यानिमित्त ही व्याख्यानमाला आयोजित करण्यात येत आहे. ‘भारताचा विज्ञानवाद’ या विषयातून डॉ. पवार विज्ञाननिष्ठ विचारसरणी, समाजजीवनातील वैज्ञानिक दृष्टिकोन आणि भारतीय परंपरेतील विवेकनिष्ठ प्रवाह यांचा परामर्श घेणार आहेत.

डॉ. प्रकाश पवार हे महाराष्ट्रातील प्रख्यात राजकीय विश्लेषक असून त्यांनी राज्यातील सामाजिक-राजकीय घडामोडींवर सखोल अभ्यासपूर्ण भाष्य केले आहे. राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील त्यांचे चरित्रग्रंथ विशेष गाजले आहेत. विविध माध्यमांमधून ते सातत्याने प्रबोधनपर लेखन व व्याख्याने देत असतात. समकालीन राजकारण, इतिहास आणि समाजरचना यांचा परस्परसंबंध उलगडून सांगण्याची त्यांची शैली अभ्यासकांमध्ये लोकप्रिय आहे.

डॉ. भालचंद्र काकडे स्मृती व्याख्यानमाला ही विज्ञान विषयाला वाहिलेली असून गेल्या काही वर्षांत विविध क्षेत्रातील मान्यवरांची लक्षवेधक व्याख्याने या व्याख्यानमालेत झाली आहेत. ही व्याख्याने मोठ्या प्रमाणावर प्रेक्षकांनी प्रतिसाद देऊन ऐकली आहेत. सदर व्याख्यानमाला ‘आ’लोकशाही’ या युट्यूब वाहिनीवरून प्रसारित होणार असून प्रेक्षकांना @alokshahi या वाहिनीवर जाऊन त्यामध्ये सहभागी होता येईल. अगर पुढील लिंकद्वारेही सहभागी होता येईल.

https://youtu.be/z1CPpm8lL2k?si=78zLC8UgX225Eagw


रविवार, ४ मे, २०२५

डॉ. भालचंद्र काकडे स्मृती व्याख्यानमाला (वर्ष चौथे):

संविधान, विज्ञानाच्या सृष्टीबरोबरच दृष्टी घेणेही आवश्यक: राजवैभव शोभा रामचंद्र

 

संविधान संवादक राजवैभव शोभा रामचंद्र

(राजवैभव शोभा रामचंद्र यांचे संपूर्ण व्याख्यान येथे ऐका)


कोल्हापूर, दि. ४ मे: भारतीय नागरिकांनी संविधान आणि विज्ञानाची सृष्टी घेतली, मात्र अद्याप दृष्टी घेणे बाकी आहे, असे प्रतिपादन संविधान संवादक राजवैभव शोभा रामचंद्र यांनी आज केले. आलोकशाही युट्यूब वाहिनीवर आयोजित डॉ. भालचंद्र काकडे स्मृती व्याख्यानमालेमध्ये चौथ्या वर्षीचे पुष्प गुंफताना ते भारतीय संविधानातील वैज्ञानिक दृष्टीकोन या विषयावर बोलत होते.

राजवैभव शोभा रामचंद्र यांनी भारतीय संविधान आणि वैज्ञानिक दृष्टीकोन या दोहोंच्या अनुषंगाने अत्यंत चिकित्सक मांडणी केली. ते म्हणाले, भारतीय संविधानाने देशातल्या प्रत्येक नागरिकाला एक चेहरा, स्वतःची ओळख दिली. ते आपल्या जगण्याचा एक भाग आहेच, पण ती प्रत्येक भारतीयाला स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता प्रदान करणारी एक मूल्यव्यवस्था आहे. तर कार्यकारणभाव हा वैज्ञानिक दृष्टीकोन आहे. प्रत्येक घटनेमागे काही तरी कारण आहे आणि त्या कारणांचा शोध घेणे हा वैज्ञानिक दृष्टीकोन आहे. विज्ञान नावाची गोष्ट ही खूप विनम्र असते. सर्वच शोध लागलेले नाहीत, पण कधी तरी लागतील, हा विश्वास ती प्रदान देते. त्याचप्रमाणे भारतीय संविधानही खूप विनम्र आहे. विज्ञानवादी असूनही ते या देशातल्या नागरिकांच्या विश्वास, श्रद्धा आणि उपासना यांना मान्यता देते. त्यावर घाला घालणाऱ्यांनाही ते पाठीशी घालत नाही. ही फार मोठी खुबी या संविधानामध्ये आहे.

वैज्ञानिक दृष्टीकोनाचा स्पष्टपणे उल्लेख असणारे भारतीय संविधान हे जगातील एकमेव असल्याचे सांगून राजवैभव म्हणाले, भारतीय संविधानाने विज्ञानवादाला आधार देण्याचे महत्त्वाचे काम केले आहे. ५१ व्या कलमामध्ये आम्ही विज्ञानवादाचा प्रचार, प्रसार करू. वैज्ञानिक दृष्टीकोनातून सर्व गोष्टींकडे चिकित्सकपणे पाहू, याची ग्वाही ते देते. स्वातंत्र्य, समता या मूल्यांना विज्ञानाचा आधार आहे. विज्ञान विषमतेला, भेदांना मान्यता देत नाही. जाती, धर्म, भाषा, प्रांत या आधारे श्रेष्ठत्वाचा दावा करणाऱ्यांचे दावे फोल आहेत, कारण त्यांना वैज्ञानिक आधार नाही.

राजवैभव पुढे म्हणाले, संविधान सभेत आस्तिक, नास्तिक आणि वास्तविक असे सर्व प्रकारचे लोक असूनही संविधानाच्या प्रास्ताविकेची सुरवात ही आम्ही भारताचे लोक या शब्दांनी होणे, हाच या संविधान सभेचा मोठा वैज्ञानिक दृष्टीकोन होता. संविधान या देशातल्या नागरिकांना स्वातंत्र्य देत नाही, तर ते त्यांचे स्वातंत्र्य मान्य करते. विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि उपासना ही पाच स्वातंत्र्ये संविधान मान्य करते. ही स्वातंत्र्ये उल्लेखत असताना वैज्ञानिक दृष्टीकोन हे कर्तव्यामध्ये दिले आहे. स्वातंत्र्य आपण घेऊ शकतो, मात्र कर्तव्य हे निभावलेच पाहिजे, असा दृष्टीकोन त्यामागे आहे. या देशात संविधानाने प्रत्येक नागरिकाला जिविताचा, सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला आहे. मात्र मरण्याचा अधिकार कोणालाही दिला नाही. याचे कारण म्हणजे भारतीय नागरिक हे केवळ एक व्यक्ती नव्हे, तर राष्ट्राची संपत्ती आहेत, हा दृष्टीकोन त्यामागे आहे.

विज्ञान आणि संविधानाची या दोन्ही बाबींची आपण सृष्टी घेतली मात्र दृष्टी घेतली नाही, ही फार मोठी समस्या असल्याचे सांगून राजवैभव म्हणाले, सुखाच्या गावाचा रस्ता शोधणारा मार्ग हे संविधान आणि विज्ञान या दोहोंचेही अंतिम ध्येय आहे. एकाच वेळेला सर्वांचे भले व्हावे, असे मानणारी ही बाब असून सगळ्यांना सर्व मिळावे आणि तेही सगळ्यांना समान पद्धतीने मिळावे, अशी भूमिका त्यामागे आहे. त्याची मूल्येही स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता हीच आहेत. भेदभावाच्या मूल्यांना आपण कवटाळून राहणे घातक ठरणारे आहे. वैज्ञानिक शोधांचा देशाच्या भल्यासाठी, जगाच्या भल्यासाठी वापर करण्याची भावना संविधानातील विज्ञानवाद देतो. दैनंदिन घडणाऱ्या गोष्टींकडे आपण विज्ञानाच्या दृष्टीकोनातून पाहात असू, तर आपण योग्य मार्गावर असतो. संविधानाचा विचार घेऊन पुढे जायचे असेल तर संवैधानिक मूल्ये आणि वैज्ञानिक दृष्टीकोनच आवश्यक आहे. या देशात जे चांगले घडते, ते संविधानाच्या अंगिकारामुळे, जे वाईट घडते ते संविधान नाकारल्याने ही जाणीव सर्वदूर निर्माण होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादनही त्यांनी केले.

यावेळी आलोकशाही वाहिनीचे संपादक डॉ. आलोक जत्राटकर यांनी स्वागत, प्रास्ताविक करून आभार मानले.

 

 

रविवार, २८ एप्रिल, २०२४

डॉ. भालचंद्र काकडे स्मृती व्याख्यानमालेत यंदा

माजी कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे आणि अभियंते विनय कुलकर्णी

डॉ. माणिकराव साळुंखे

विनय कुलकर्णी


डॉ. भालचंद्र काकडे

कोल्हापूर, दि. २८ एप्रिल: येथील शिवाजी विद्यापीठाचे माजी विद्यार्थी आणि निपाणीचे सुपुत्र असणारे शास्त्रज्ञ डॉ. भालचंद्र काकडे यांच्या तृतीय स्मृतिदिनानिमित्त ‘डॉ. भालचंद्र काकडे स्मृती व्याख्यानमाला’ ऑनलाईन स्वरुपात आयोजित करण्यात आली आहे. यंदा या व्याख्यानमालेमध्ये देशातील पाच नामांकित विद्यापीठांचे कुलगुरूपद भूषविणारे ज्येष्ठ शास्त्रज्ञ व शिक्षणतज्ज्ञ डॉ. माणिकराव साळुंखे आणि अभियंते विनय कुलकर्णी यांची व्याख्याने होणार आहेत. दि. ३ व ४ मे २०२४ रोजी सायंकाळी ७.०० वाजता या व्याख्यानांचे आ’लोकशाही (@alokshahi) या युट्यूब वाहिनीवरून प्रसारण होईल. ही माहिती वाहिनीचे संपादक व व्याख्यानमालेचे संयोजक डॉ. आलोक जत्राटकर आणि संतोष पिसे यांनी दिली आहे.

दि. ४ मे रोजी डॉ. भालचंद्र काकडे यांचा तृतीय स्मृतिदिन आहे. त्यानिमित्त ही व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. या व्याख्यानमालेमध्ये दि. ३ मे रोजी माजी कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांचे ‘हरित रसायनशास्त्र’ या विषयावर व्याख्यान होईल. डॉ. साळुंखे यांनी कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठासह राजस्थान केंद्रीय विद्यापीठ (जयपूर), सिम्बायोसिस (इंदोर), यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ (नाशिक) आणि भारती विद्यापीठ (पुणे) या पाच विद्यापीठांचे कुलगुरूपद भूषविलेले आहे. रसायनशास्त्रज्ञ म्हणून त्यांनी विज्ञानाच्या क्षेत्रात आपले योगदान दिलेले आहेच, त्याबरोबरच धडाडीचे शैक्षणिक प्रशासक म्हणूनही त्यांनी आपला स्वतंत्र ठसा उमटविलेला आहे. ‘विद्येच्या प्रांगणात’ हे त्यांचे आत्मचरित्र अत्यंत लोकप्रिय आहे.

या व्याख्यानमालेत दि. ४ मे रोजी प्रसिद्ध अभियंते विनय कुलकर्णी यांचे ‘आविष्कार जल-अभियांत्रिकीचा’ या विषयावर व्याख्यान होईल. हायड्रॉलिक्स आणि वॉटर रिसोर्स मॅनेजमेंट या विषयातील एम.टेक. असणारे श्री. कुलकर्णी हे मूळचे निपाणीजवळील बेनाडी येथील असून गेल्या वीस वर्षांहून अधिक काळ देशातील एक महत्त्वाचे स्टॉर्मवॉटर स्पेशालिस्ट आणि वॉटर रिसोर्स अभियंते म्हणून काम करीत आहेत. ते सध्या पुण्यातील टाटा कन्सल्टिंग इजिनिअर्स लि. या कंपनीत उप-सरव्यवस्थापक या पदावर कार्यरत आहेत. देशातील अनेक धरणे, पायाभूत सुविधा प्रकल्प, स्मार्ट सिटी प्रकल्प यांचे मूलभूत संकल्पना अहवाल निर्मितीपासून ते त्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यापर्यंत त्यांचे योगदान राहिले आहे. फियाट, महिंद्रा, गोदरेज, एम्बसी, जॉन-डिअर आदी कंपन्यांसाठी इन्फ्रास्ट्रक्चर एक्सपर्ट म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. केंद्र सरकारच्या भारतमाला परियोजनेअंतर्गत सिल्चर, कोईमतूर येथील मल्टीमोडल लॉजिस्टीक पार्क उभारणीतही त्यांचे योगदान आहे.

डॉ. भालचंद्र काकडे स्मृती व्याख्यानमालेअंतर्गत गेल्या दोन वर्षांत शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, ज्येष्ठ भौतिकशास्त्रज्ञ डॉ. पी.एस. पाटील, वनस्पतीशास्त्रज्ञ डॉ. अजित तेळवे, ज्येष्ठ विज्ञान लेखक डॉ. व्ही.एन. शिंदे आणि कोविड-१९वरील लस संशोधनात ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या चमूमध्ये योगदान देणारे जागतिक कीर्तीचे भारतीय शास्त्रज्ञ डॉ. नानासाहेब थोरात यांची अतिशय लक्षवेधक व्याख्याने झालेली आहेत. ती आजही मोठ्या प्रमाणावर ऐकली जात आहेत. सदर व्याख्यानमाला आ’लोकशाही या युट्यूब वाहिनीवरुन प्रसारित होणार असून त्यात प्रेक्षकांना युट्यूबवर @alokshahi या वाहिनीवर जाऊन सहभागी होता येईल.


मंगळवार, २ मे, २०२३

डॉ. भालचंद्र काकडे स्मृती व्याख्यानमालेत

यंदा डॉ. व्ही.एन. शिंदे, डॉ. नानासाहेब थोरात

 

डॉ. भालचंद्र काकडे

डॉ. व्ही.एन. शिंदे

डॉ. नानासाहेब थोरात


कोल्हापूर, दि. २ मे: येथील शिवाजी विद्यापीठाचे माजी विद्यार्थी आणि निपाणीचे सुपुत्र असणारे उदयोन्मुख शास्त्रज्ञ डॉ. भालचंद्र काकडे यांच्या द्वितिय स्मृतिदिनानिमित्त डॉ. भालचंद्र काकडे स्मृती व्याख्यानमालाऑनलाईन स्वरुपात आयोजित करण्यात आली आहे. गत वर्षीपासून सुरू झालेल्या या व्याख्यानमालेमध्ये यंदा कोविड लस संशोधनात महत्त्वाची कामगिरी बजावणारे जागतिक कीर्तीचे भारतीय शास्त्रज्ञ डॉ. नानासाहेब थोरात आणि प्रख्यात विज्ञान लेखक डॉ. व्ही.एन. शिंदे यांची व्याख्याने होणार आहेत. दि. ३ व ४ मे २०२३ रोजी सायंकाळी ७.०० वाजता या व्याख्यानांचे आलोकशाही या युट्यूब वाहिनीवरून प्रसारण होईल.

दि. ४ मे रोजी डॉ. भालचंद्र काकडे यांचा द्वितिय स्मृतिदिन आहे. त्यानिमित्त ही व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. या व्याख्यानमालेमध्ये दि. ३ मे रोजी विज्ञान लेखक डॉ. व्ही.एन. शिंदे यांचे मराठी विज्ञान साहित्य या विषयावर व्याख्यान होईल. डॉ. शिंदे हे सध्या शिवाजी विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव असून विज्ञान लेखनाच्या क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान आहे. विज्ञान, वैज्ञानिक, वनस्पती व कृषी शास्त्रज्ञ यांविषयी त्यांची पुस्तके प्रकाशित असून या विषयांवर ते सातत्याने लेखन करीत असतात. त्यासाठी त्यांना राज्य शासनाच्या यशवंतराव चव्हाण पुरस्कारासह अनेक साहित्यिक पुरस्कार प्राप्त आहेत.

दि. ४ मे रोजी जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ डॉ. नानासाहेब थोरात यांचे आजचा भारत आणि विज्ञान या विषयावर व्याख्यान आयोजित केले आहे. डॉ. थोरात यांची ऑक्सफर्ड विद्यापीठातील कोविड लसनिर्मिती करण्यात यशस्वी ठरलेल्या चमूमध्ये महत्त्वाची भूमिका आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठासह ते आयर्लंडच्या लिमरिक विद्यापीठातील वरिष्ठ संशोधक आहेत. रॉयल सोसायटी ऑफ मेडिसीनचे ते फेलो आहेत. त्यांना जागतिक प्रतिष्ठेची मेरी क्युरी फेलोशीप तीन वेळा प्राप्त झाली आहे. नॅनो मटेरियल्स व नॅनो तंत्रज्ञानाच्या आधारे स्तन तसेच मेंदूच्या कर्करोगावर लस तथा औषध शोधण्याच्या दिशेने त्यांचे सातत्यपूर्ण संशोधन सुरू आहे.

सदर व्याख्यानमाला आलोकशाही या युट्यूब वाहिनीवरुन प्रसारित होणार असून त्यात प्रेक्षकांना https://www.youtube.com/@Alokshahi या लिंकद्वारे सहभागी होता येईल, अशी माहिती डॉ. आलोक जत्राटकर आणि संतोष पिसे यांनी दिली आहे.

बुधवार, ४ मे, २०२२

निसर्गसंपत्तीचा आस्वाद घ्या, ओरबाडू नका

वनस्पतीशास्त्रज्ञ डॉ. अजित तेळवे यांचे आवाहन

 


डॉ. भालचंद्र काकडे स्मृती व्याख्यानमालेत बोलताना डॉ. अजित तेळवे

(डॉ. भालचंद्र काकडे स्मृती व्याख्यानमालेअंतर्गत डॉ. अजित तेळवे यांच्या व्याख्यानाची ध्वनीचित्रफीत)


कोल्हापूर, दि. ४ मे: निसर्गाने मानवाला भरभरून साधनसंपत्ती दिली आहे. तिचा आस्वाद घ्या, पण तिला ओरबाडून नष्ट करू नका, असे आवाहन बारामती येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्रज्ञ डॉ. अजित तेळवे यांनी आज येथे केले.

संशोधक डॉ. भालचंद्र काकडे यांच्या ४ मे या स्मृतिदिनानिमित्त भालूज् फ्रेंड्स वॉट्सअप ग्रुप आणि आलोकशाही युट्यूब वाहिनी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित डॉ. भालचंद्र काकडे स्मृती व्याख्यानमालेमानवी जीवनातील जैविक विज्ञानाचे महत्त्व आणि उपयोजन या विषयावर ते बोलत होते.

डॉ. तेळवे म्हणाले, निसर्गचक्रात मानवी हस्तक्षेपामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. अन्य प्राणी आणि वनस्पतींप्रमाणेच आपणही निसर्गचक्राचा एक घटक आहोत, हे विसरून माणूस आपण या साऱ्यांचे मालक असल्याच्या आविर्भावात वागू लागला, तिथेच सर्व समस्यांचे मूळ आहे. वनस्पती त्यांच्यावर सोपविलेले अन्न-उत्पादनाचे कार्य पूर्ण करतात, अन्य जैविक घटकांकडे सोपवितात आणि शेवटी निसर्गातच मिसळून जातात. निसर्गातून येऊन पुन्हा निसर्गातच मिसळून जाण्याचा हा गुणधर्म मानव विसरला. त्याने प्लास्टीकसारखे निसर्गबाह्य घटक निर्माण केले, ज्यांच्या विघटनाला लाखो वर्षे लागू शकतात. त्यांच्यावर किमान पुनर्प्रक्रिया करून निसर्गाचे अस्तित्व जपण्याला प्राधान्य देण्याची गरज आहे. गरजेपेक्षा अधिक ओरबाडण्यापेक्षा शाश्वत विकासाची वाट धरणे आज नितांत गरजेचे आहे.

पर्यावरणाच्या संवर्धनाची गरज स्पष्ट करताना डॉ. तेळवे म्हणाले, वनस्पती आपल्याला अन्नासह चारा, औषधे, रंग, डिंक इत्यादी जीवनावश्यक पदार्थ देतात. प्राणीमात्रांच्या सर्व गरजा त्यातून पूर्ण होतातच, पण त्याचबरोबर प्रत्येक झाडाच्या परिसरात प्राणी, पक्षी, कीटक यांची एक स्वतंत्र परिसंस्था साकार झालेली असते. जगात अशा साडेचार लाख वनस्पती आहेत आणि प्रत्येक वनस्पती ही तितकीच उपयुक्त आहे. अन्नाचे उत्पादक असल्यामुळे वनस्पतींची परिसंस्थेत मूलभूत भूमिका आहे. आपल्या दैनंदिन आहारात मीठ वगळता इतर सर्व पदार्थ हे वनस्पतीजन्य असतात. एखादी वनस्पती जर नष्ट झाली, तर आपण तिच्यासारखी दुसरी पर्यायी वनस्पती निर्माण करू शकत नाही, हे तिचे महत्त्व असते. त्याखेरीज आपले पर्यावरण आल्हाददायक बनविण्याबरोबरच कार्बन डायऑक्साईडचे संतुलन राखणे, प्रदूषणाचे प्रमाण कमी करणे, जमिनीची धूप रोखणे या बाबीही वनस्पती करीत असतात. त्यांच्या या महत्त्वपूर्ण योगदानाकडे आपण दुर्लक्ष करतो.

भारत हा जैवविविधतेने समृद्ध देश असल्याचे सांगताना डॉ. तेळवे म्हणाले, जगामध्ये जैवविविधतेने संपन्न व समृद्ध अशी अवघी २४ ठिकाणे आहेत. त्यापैकी दोन एकट्या भारतात आहेत. एक म्हणजे हिमालय पर्वतरांग आणि दुसरी म्हणजे सह्याद्री पर्वतरांग. या सह्याद्रीच्या पट्ट्यातील रहिवासी म्हणून आपण स्वतःला सुदैवी समजायला हवेच, मात्र त्याचबरोबर या जैवविविधतेचे संरक्षण आणि संवर्धन करणे, ही सुद्धा आपलीच जबाबदारी आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या पर्यावरणाचे शक्य तितके संवर्धन करावे. आयुष्यात किमान एक झाड लावून ते वाढवावे, असे आवाहनही त्यांनी केले.

या कार्यक्रमात सुरवातीला डॉ. भालचंद्र काकडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ प्रा. विरेंद्र बाऊचकर (जयसिंगपूर), अभियंते श्रीनिवास व्हनुंगरे (बेळगाव) आणि सौ. सुलेखा सुगते-अटक (पुणे) यांनी आदरांजलीपर मनोगते व्यक्त केली. डॉ. काकडे यांच्याविषयी अनुप जत्राटकर मोशन पिक्चर्सच्या वतीने निर्मित विशेष ध्वनीचित्रफीतही यावेळी प्रदर्शित करण्यात आली.

रविवार, १ मे, २०२२

आ’लोकशाही युट्यूब वाहिनीवर ३ मेपासून

डॉ. भालचंद्र काकडे स्मृती व्याख्यानमाला



प्रा. (डॉ.) पी.एस. पाटील

 
डॉ. अजित तेळवे



(डॉ. भालचंद्र काकडे स्मृती व्याख्यानमालेचा प्रोमो)


कोल्हापूर, दि. १ मे: येथील शिवाजी विद्यापीठाचे माजी विद्यार्थी आणि निपाणीचे सुपुत्र असणारे शास्त्रज्ञ डॉ. भालचंद्र काकडे यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त डॉ. भालचंद्र काकडे स्मृती व्याख्यानमालाऑनलाईन स्वरुपात आयोजित करण्यात आली आहे. दि. ३ व ४ मे २०२२ रोजी सायंकाळी ७.०० वाजता या व्याख्यानांचे आलोकशाही या युट्यूब वाहिनीवरून प्रसारण होईल. 

भालूज् फ्रेंड्स वॉट्सअप ग्रुप आणि आलोकशाही युट्यूब वाहिनी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या व्याख्यानमालेचे उद्घाटन मंगळवारी (दि. ३ मे) शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के करणार आहेत. तर, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शास्त्रज्ञ तथा शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा. (डॉ.) पी.एस. पाटील हे उद्घाटनपर प्रथम व्याख्यानपुष्प गुंफणार आहेत. डॉ. पाटील हे विज्ञान, संशोधन आणि आपण या विषयावर व्याख्यान देणार आहेत. बुधवारी (दि. ४ मे) बारामती येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्रज्ञ प्रा. (डॉ.) अजित तेळवे हे जैविक विज्ञानाचे मानवी जीवनातील महत्त्व आणि उपयोजन या विषयावर व्याख्यान देणार आहेत.

सदर व्याख्यानमाला आलोकशाही या युट्यूब वाहिनीवरुन प्रसारित होणार असून त्यात प्रेक्षकांना www.youtube.com/c/DrAlokJatratkar या लिंकद्वारे सहभागी होता येईल. ही माहिती डॉ. आलोक जत्राटकर, संतोष पिसे आणि सागर कुलकर्णी यांनी दिली आहे.