('दै. नवशक्ति'मध्ये सुरू असलेल्या माझ्या 'नितळ' या मालिकेमधील पुढील भाग माझ्या ब्लॉग वाचकांसाठी पुनर्मुद्रित करीत आहे.- डॉ. आलोक जत्राटकर)
माणूस
हा समाजशील प्राणी खराच; पण, त्याच्यामध्ये ही समाजशीलता इतकी भिनलेली
आहे की त्याच्या प्रत्येक कृतीवर कोणत्या ना कोणत्या प्रकारे समाजाची प्रेरणा अथवा
दबाव असतो. गंमतीचा भाग म्हणजे कृतीवर जसा हा प्रभाव असतो, तसाच किंवा
त्यापेक्षाही अधिक एखादी कृती न करण्यामागे असतो. म्हणजे पाहा ना, एखादी साध्यात
साधी कृती करण्याचा विचार जरी आपल्या मनात आला, तरी त्याच वेळेला ‘लोक काय म्हणतील?’ हा विचार आपल्या
मनी ठाकतो. आणि शेकडा ९९ वेळा आपण मनात आलेला कृतीशील विचार कोणत्याही कृतीविना
पाठीवर टाकून रिकामे होतो. कदाचित एक चांगलं काम आपल्या हातून होता होता मागं पडतं
किंवा राहूनही जातं. लोकांनी काही म्हणू नये, या दृष्टीनं आपलं जीवनाचं रहाटगाडगं
मग आपण फिरवित राहतो.
सौरऊर्जेच्या
प्रचारासाठी दशकभराच्या भारतभ्रमण यात्रेवर असलेल्या चेतन सोळंकी यांची अलिकडेच भेट
घेतली. ऊर्जा संवर्धनाच्या दृष्टीनं त्यांनी अनेक गोष्टी सांगितल्या. त्यामध्ये
सध्या सुरू असलेली उर्जेची अनाठायी उधळण आणि बचत करण्यासाठी छोटे-छोटे उपाय
त्यांनी सुचविले. बोलता बोलता ते म्हणाले की, आपण प्रत्येकाने घरगुती पातळीवर
कपड्यांना इस्त्री न करता ते वापरले तरी आपण खूप बचत करू शकतो कारण इस्त्री जवळपास
१००० वॅट वीज खाते. त्यांनी रेफ्रिजरेटर, गीझर वगैरे साधनांचाही वापर सहज टाळता
येऊ शकतो, हे सांगितलं. यातल्या फ्रीज, गीझर यांसाठी कौटुंबिक संमती मिळवणं तत्काळ
शक्य नव्हतं; मात्र, व्यक्तीगत स्तरावर स्वतः इस्त्री न
केलेले कपडे वापरणं सहजशक्य आहे. म्हणून मी तिथून सुरवात करण्याचा निर्णय घेतला.
अगदी शाळेत असतानाही स्वच्छ धुतलेला युनिफॉर्म कुठे दर वेळी इस्त्री केला जात होता? धुतलेला ड्रेस
रात्री छान घडी घालून उशाखाली किंवा अंथरूणाखाली ठेवला की सकाळी कडक नसली तरी
चांगली दिसेल अशी इस्त्री झालेली असे. त्यामुळे मी धुतलेला शर्ट इस्त्री न करता
चढवला अंगावर बाहेर पडताना. त्यावेळी बायकोचा पहिला प्रश्न हाच होता की, ‘लोक काय म्हणतील?’ मी उत्तरलो, ‘कोणी काही म्हणणार
नाही, पण म्हणालं तर मी सांगेन ना!’ यावर तिचा तिरपा
कटाक्ष पाठीवर घेऊन मी घरातून बाहेर पडलो.
पाहा
ना, एक साधारण कृती, जिच्यामुळं कोणाला कसलाही त्रास होणार नाही की अन्य कोणाचंही
जीवन कोणत्याही प्रकारे प्रभावित होण्याचं कारण नाही, अशा वेळीही जर ‘लोक काय म्हणतील?’ या प्रश्नाचा सामना
करावा लागत असेल, तर लाखो, कोट्यवधी लोकांचं जीवन प्रभावित करण्यासाठी हयात
वेचणाऱ्या लोकांना किती वेगवेगळ्या पातळ्यांवर संघर्ष करावा लागत असेल? आधी व्यक्तीगत
स्तरावर विचार आणि स्वीकार, यानंतर पुढे कुटुंब, नातेवाईक, स्थानिक भोवताल आणि
त्यानंतर मग इतर समाजघटक असा त्या विचाराचा विस्तार व स्वीकार वाढविण्यासाठी कोण
झगडा समाजप्रवर्तकांना, प्रबोधकांना करावा लागत असेल, याचा आपण कधी विचारच करीत
नाही.
डॉ.
बाबासाहेब आंबेडकर हे बडोद्याच्या शिष्यवृत्तीची मुदत संपल्यामुळे इंग्लंडमधील
विद्याभ्यास अर्धवट सोडून भारतात परतले. उरलेला अभ्यास पूर्ण करण्यासाठी परत जायचे
म्हणून त्यांनी अनेक प्रकारची कामे केली. शिकवण्या घेतल्या, गुंतवणूक सल्लागार
म्हणून काम केले,शेवटी सिडनेहॅम कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून तात्पुरती नोकरी
स्वीकारली. या समग्र काळामध्ये ते प्रचंड काटकसर करून पै न पै साठवित होते.
यामध्ये माता रमाबाईंना ते अतिशय नेमकी रक्कम दरमहा खर्चाला देत. अगदी काडेपेटीच्या
प्रत्येक काडीचाही हिशोब त्यात असे. बाबासाहेब परदेशी असतानाही या माऊलीने कोणतीही
तक्रार न करता लोकांच्या घरची कामे करून आपला निर्वाह चालविला. आणि बाबासाहेब
उच्चशिक्षित होऊन परतले, आता तरी आपल्यामागचे शुक्लकाष्ठ संपेल, या आशेवर असणाऱ्या
रमाबाईंचे सांसारिक कष्ट कमी झाले नाहीत. उलट ही काटकसर करावी लागली. मात्र,
त्यांनी बाबासाहेबांच्या आणि समाजाच्या उन्नतीसाठी हे कष्ट विनातक्रार सोसले.
एवढ्या प्रकांडपंडिताची बायको, पण ‘लोक काय म्हणतील?’ म्हणून त्यांनी
कष्टत्याग केला नाही. उलट आरोग्याच्या अनेकविध तक्रारी असूनही अजिबात कुरकूर न
करता त्यांनी साऱ्या झळा सोसल्या, म्हणूनच बाबासाहेबांच्या उत्कर्षामध्ये आणि
असामान्यत्वामध्ये रमाबाईंच्या साधेपणाचा, सामान्यत्वाचा वाटा जगन्मान्य ठरला.
महात्मा फुले आणि माता सावित्रीबाई यांचा संघर्ष तर ‘लोक काय म्हणतील?’ या प्रश्नाला
अजिबातच थारा न देण्यामध्ये आणि त्या पलिकडला आहे.
राजर्षी
शाहू महाराजांचाही इथे दाखला देता येईल. राजर्षींनी ज्या कालखंडात त्यांच्या
सामाजिक सुधारणांच्या चळवळीला हात घातला, प्रतिगामित्व ठासून भरलेल्या त्या काळात
समाजमानसावर रुढी, परंपरांचा पगडा मोठा होता. राजर्षींनी स्वतःपुरत्या साऱ्या
भेदभावांना तिलांजली दिलेली होती. त्यांनी आपल्या धार्मिकतेला तिलांजली दिलेली
नव्हती, पण कोणताही धर्म विषमतेला थारा देत नाही, याविषयी त्यांची धारणा पक्की
होती. आणि माणसा-माणसांत भेद मानणं, हा अधर्म आहे, याविषयी तर त्यांची खात्रीच
होती. मात्र, ही मानसिकता राजघराण्यातल्या सर्वांचीच असेल, असे कसे म्हणता येईल? आपण केवळ या अंगाने
विचार केला, तरी डोक्याला मुंग्या येतील की राजर्षींना मग त्या स्तरावर किती
टोकाचा संघर्ष करावा लागला असेल. जितके मोठे कार्य तितका हा झगडा मोठाच. मात्र,
त्यावरही मात करून अथवा ‘घरचे काय म्हणतील?’ वा ‘लोक काय म्हणतील?’ याची फारशी फिकीर न
करता महाराजांनी आपलं सामाजिक कार्य जोमानं सुरूच ठेवलं आणि एक राजा म्हणून ते
लोकांच्या गळीही उतरवलं. म्हणून तर ते 'लोकराजा' उपाधीला पात्र ठरले.
म्हणजे
एखादं व्यापक, समाजहितैषि कार्य हाती घ्यायचं, तर झगडा मोठा आहेच. पण,
छोट्या-छोट्या प्रभावहीन बाबींसाठी सुद्धा ‘लोक काय म्हणतील?’ हा अडथळा ओलांडणं
अथवा झुगारून पुढं जाणं, ही फार महत्त्वाची, कसोटीची पहिली पायरी आहे. मुळात आपण
आपल्या सामान्यत्वाच्या कक्षांमधून बाहेर पडून थोड्याफार तरी असामान्यत्वाच्या
दिशेनं जाणार की नाही, याचा निर्णय, या प्रश्नाचं तुम्ही काय काय उत्तर देता,
यावरच अवलंबून असतं. बापलेक आणि गाढवाची गोष्ट आपणा सर्वांना माहिती असूनही अकारण
या प्रश्नाच्या बेड्या आपल्या पायबंद बनून राहणार असतील, तर आपण आपल्या
सामान्यत्वाच्या कक्षेतून कधी बाहेरच पडणार नाही. ‘लोगों का काम है
कहना...’ यारों, समझो!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा