गुरुवार, १० ऑगस्ट, २०२३

माझे वैचारिक मार्गदर्शक प्रा. हरी नरके

 

डॉ. आलोक जत्राटकर यांच्या 'निखळ: जागर संवेदनांचा' या ललितलेख संग्रहाच्या प्रकाशन समारंभास प्रा. हरी नरके प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संग्रहित छायाचित्र. 

प्रा. हरी नरके यांच्यासमवेत डॉ. आलोक जत्राटकर

(ज्येष्ठ विचारवंत प्रा. हरी नरके यांचे बुधवार, दि. ९ ऑगस्ट २०२३ रोजी अकाली निधन झाले. हा आमच्यावर खूप मोठा दुःखाचा आघात आहे. या निमित्ताने नरके सरांच्या आठवणींना उजाळा देणारा लेख सन्मित्र मोहसीन मुल्ला यांनी लिहवून घेऊन 'पुढारी ऑनलाईन'वर प्रकाशित केला. हा लेख दै. पुढारीच्या सौजन्याने माझ्या ब्लॉगवाचकांसाठी पुनर्प्रकाशित करीत आहे.- डॉ. आलोक जत्राटकर)

आयुष्यात असे काही प्रसंग येतात की जे तुम्हाला स्तब्ध, निःशब्द करून टाकतात. कालचा, ९ ऑगस्टचा दिवस माझ्या आयुष्यात असाच उगवलेला. ऑगस्ट क्रांतीदिनाच्या भरगच्च कार्यक्रमांचे वार्तांकन करण्याचे मनात नियोजन करीत घरातून बाहेर पडलो; तेवढ्यात दिनेश कुडचे याचा हरी नरके सर गेल्याचा तीन शब्दांचा संदेश प्राप्त झाला. सुन्न झालो. त्याच अवस्थेत ऑफिसमध्ये पोहोचलो. आमच्या कॉमन मित्रांपैकी एखाद्याला फोन करून वृत्ताची शहानिशा करावी, असंही वाटेना. तोवर सर्वच माध्यमांतून हे भयावह वृत्त खरे असल्याचे स्पष्ट झाले. एकीकडे कार्यालयीन कामांचा यांत्रिकपणे निपटारा करीत असताना दुसरीकडे सरांच्या आठवांचा कल्लोळ मनात उसळलेला होता. सरांविषयी लिहावं, असे काही माध्यमकर्मी मित्रमंडळींचे फोनही आले, पण रात्री घरी परतल्यानंतरही सरांच्या आठवणींनी मनात इतकी प्रचंड गर्दी केली की काय लिहावं अन् काय नको, अशी अवस्था होऊन गेली. मनातला कोलाहल वाढलेलाच होता. अस्वस्थता मनभर पसरलेलीच होती. अशाच अवस्थेत रात्री उशीरा कधी तरी झोप लागली.

हरी नरके सरांचं माझ्या आयुष्यात वैचारिक मार्गदर्शकाचं स्थान होतं. माझ्याच काय, एकूणच महाराष्ट्राचेही ते वैचारिक दिग्दर्शक होते. आम्हा दोघांमधील संवाद हा अत्यंत कम्फर्टेबल असायचा. फुले-शाहू-आंबेडकरी चळवळीला वैचारिक आणि संशोधकीय अधिष्ठानाच्या बळावर पुढे घेऊन जाण्याचं कार्य त्यांनी अंगिकारलेलं होतं आणि अत्यंत निष्ठापूर्वक त्यांनी ही धुरा त्यांच्या खांद्यावर अखेरच्या क्षणापर्यंत वाहिली. ५६ पुस्तकांबरोबरच त्यांच्या अगणित दैनंदिन पोस्टमधून त्यांचा हा संशोधकीय विचारवंताचा पैलू अत्यंत झळाळून आपल्यासमोर सिद्ध झालेला आहे.

सरांची व्याख्यानं ऐकणं आणि त्यांना बोलताना पाहणं, हा एक समृद्ध करणारा आनंदानुभव असायचा. सुरवातीला श्रोता म्हणूनच मी त्यांच्याशी जोडला गेलेलो होतो. मुळातच सर एक पट्टीचे वक्ते असल्यानं समोरच्या श्रोत्यांना खिळवून कसं ठेवायचं, याची उत्तम हातोटी त्यांना साधलेली होती. सातत्यपूर्ण वाचनामुळं त्यांच्याकडं विविध विषयांच्या संदर्भांची खाण असायची. या संदर्भांची आपल्या भाषणामध्ये पखरण करताना श्रोत्यांना ते बोजड न वाटता सहजपणानं लक्षात राहतील, अशा पद्धतीनं त्यांची पेरणी ते करत. भाषणात आक्रमकता असायची, पण ती मुद्द्यांवाटे सामोरी यायची. कित्येकदा टोकदार उपरोधानं समोरच्याला ते आत्मपरीक्षणाला भाग पाडत. त्यावेळी मंद हसत, डोळे बारीक करून हळूच मिचकावण्याची त्यांची शैलीही लाजवाब असायची. अशा वेळी त्यांच्या गालावर पडणारी खळी त्यांच्या व्यक्तीमत्त्वाला लोभसपणा प्राप्त करून द्यायची. श्रोत्यांमध्ये उपस्थित असलेल्या आपल्या मित्रपरिवाराचं नाव घेऊन संबोधण्याची त्यांची स्टाईलही युनिक होती.

प्रांजळपणा आणि परखडपणा या परस्परविरोधी गुणांचाही अत्यंत संतुलित संगम त्यांच्या व्यक्तीमत्त्वामध्ये होता. लोकांशी बोलताना कोणताही अभिनिवेश ते बोळगत नसत. साधेपणाने आणि आपुलकीने मिठ्ठास बोलत ते समोरच्याला आपलेसे करीत. फुले-शाहू-आंबेडकरांच्या बाबतीत कोणी वस्तुनिष्ठता सोडू लागला की अत्यंत कठोरपणाने ते त्यांचे मुद्दे खोडून काढत. टेल्कोतील नोकरी सोडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने समितीवर आल्यानंतर पहिले वेतन २७ महिन्यांनी मिळाले आणि दुसरे आणखी वर्षभराने, हे त्यांनी त्यांच्या संपादकीय टिपणीत स्पष्टपणे नोंदविले. वसंत मून गेले, तेव्हा त्यांचेही दोन वर्षांचे वेतन थकलेले होते, हेही त्यांनी परखडपणे लिहीले. अशा परिस्थितीतही आपल्या कुटुंबियांनी आपल्याला सांभाळून घेतले, याची प्रांजळ नोंदही त्यांनी त्यात केली.

फुले-शाहू-आंबेडकरांचे अनेक संदर्भ त्यांना मुखोद्गत असत. त्यांची स्मरणशक्ती अचाट होती. मी वेळोवेळी काही शंका अगर संदर्भांच्या अनुषंगानं त्यांना फोन करीत असे. त्यावेळी ते संदर्भांची मालिका त्याच फोनवर सांगायला चालू करत. पाहून ठेवतो, थोड्या वेळानं फोन कर,’ वगैरे कधीच त्यांनी सांगितलं नाही. त्या अर्थानं फुले-शाहू-आंबेडकरी विचारांचा ते चालताबोलता कोश होते, हे मी माझ्या अनुभवातून ठामपणानं सांगू शकतो. मंत्रालयात असतानाच्या काळात कधी काही शेअरिंग करायचं असलं की त्यांचं बॅरेक्समधलं कार्यालय हे माझं आनंदनिधान असायचं. वेळ मिळाला की तिथं जाऊन नरके सरांशी गप्पा मारणं आणि त्या गप्पांतून आपसूक मिळणारे नवीन वाचनासाठीचे संदर्भ, फुले-आंबेडकरांच्या कार्याच्या त्यांच्या संशोधनातून सामोरी आलेली नवी माहिती, त्यांचं नवीन लिखाण अशा अनेक बाबींवर चर्चा होत. माझ्या पीएच.डी. संशोधनादरम्यान तर माझी सर्वाधिक चर्चा ही नरके सरांशीच होत होती. त्यातून आमच्या वयातलं अंतर पार होऊनही एक आगळं मैत्र आमच्यात जोडलं गेलं. त्यामध्ये माझ्यापेक्षा त्यांचं प्रेम, आपुलकी आणि सौजन्य यांचा वाटा अधिक होता. विशेष म्हणजे हे मैत्र मी कोल्हापुरात आल्यानंतर सुद्धा अबाधित राहिलं. त्यांचा कोल्हापूर दौरा असला की, संबंधित कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका आणि उतरण्याचं ठिकाण याची माहिती ते आवर्जून पाठवायचे. त्यांचं व्याख्यान शक्यतो मी कधी चुकवायचो नाही कारण दरवेळच्या भाषणातून काही नवे संदर्भ निश्चितपणानं मिळायचे. अगदीच शक्य नाही झालं तर सकाळच्या अगर संध्याकाळच्या सत्रात आम्ही भेटायचो. छान गप्पा व्हायच्या, शक्य असल्यास आम्ही एकत्र नाश्ता अथवा भोजन घ्यायचो. वेळ असेल तर घरी जायचो. त्यांचं आतिथ्य करायला माझ्या पत्नीलाही आवडायचं कारण ताटातला अन्नाचा कण अन् कण टिपून खाऊन तृप्त होणारा हा एक समाधानी माणूस होता. त्या एकेका दाण्यासाठी आपला समाज कसा आसुसलेला असायचा आणि आज तो मिळत असताना त्याप्रती कृतज्ञभाव बाळगणं आवश्यक आहे, ही आम्हा दोघांचीही धारणा असल्यानं हा कौटुंबिक जिव्हाळाही सरांनी खूप आत्मियतेनं जपला. या व्यक्तीगत जिव्हाळ्यातूनच माझ्या पहिल्या निखळ: जागर संवेदनांच्या या ललितसंग्रहाच्या प्रकाशन समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून ते उपस्थित राहिलेच, शिवाय, माझ्याविषयी आणि पुस्तकाविषयीही अगदी भरभरून बोलले. त्यांचे हे शब्दच आता सोबत राहिले आहेत. त्यावेळी त्यांनी माझा आतेभाऊ नितीन याच्या हातचा तांबडा-पांढरा चाखलेला होता. त्याचे ते चाहतेच बनले होते. अगदी अलिकडेही एकदा त्यांनी त्याची आठवण काढली होती.

सरांच्या अखेरच्या कोल्हापूर दौऱ्यावेळी माझ्या लेकीसह मी त्यांची भेट घेतली. स्विनीची अतिशय ममत्वानं चौकशी करीत त्यांनी तिला तोंडभरून आशीर्वाद दिले. गप्पांच्या दरम्यान त्यांच्या समग्र आजारपणाविषयी आणि उपचारांविषयी ते सांगत होते. चेहऱ्यावरील आणि अंगावरील सूज लपत नव्हती, पण ती किती तरी कमी असल्याचं त्यांनी सांगितलं. जीभेवर मणामणाचं ओझं असल्याप्रमाणं ती उचलली जात नव्हती. हे ऐकताना तर अंगावर काटाच उभा राहिला. आताही बोलताना जीभेमुळं त्यांचा आवाज थोडा बदलला होता, पण लोकांचं प्रेम आणि आग्रह यामुळं आपलं सारं आजारपण बाजूला ठेवून ते व्याख्यानाला उभे राहात असत. आम्ही त्यावेळी पोहे खात होतो. सर म्हणाले, आलोक, तुला हे जितके तिखट किंवा खारट लागताहेत ना, त्याच्या किमान चौपटीने अधिक त्या चवी मला झोंबतात. म्हणजे त्यांच्या अगदी खाण्यावरही अशा प्रकारचे निर्बंध आले होते. उष्टे राखायचे नाही, म्हणून घेतानाच ते कमी अन्न घेत असत. यानंतर मात्र एकदा-दोनदा फोनवर बोलणं होऊन प्रकृतीची विचारपूस झाली, त्यापलिकडं भेट नाही. आणि सर असे अचानक निघून जातील आणि त्यांच्यावर स्मृतीलेख लिहीण्याची वेळ येईल, असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. पण, तसं झालंय खरं.

सरांविषयी किती लिहावं... भेटल्यावर प्रेमानं हात हातात घेऊन चौकशी करणं, कधी आठवण आली की मिस्ड कॉल करणं (बैठकीत वगैरे असल्यास डिस्टर्ब नको म्हणून), फुले-शाहू-आंबेडकरांच्या बाबतीत कोणत्याही प्रकारचा नॉनसेन्स खपवून न घेणं आणि त्याचा हिरीरीनं सप्रमाण प्रतिवाद करणं, ट्रोलधाडींना तोडीस तोड प्रत्युत्तर देणं, आरोग्य कितीही बिघडलेलं असलं तरी सातत्यानं लिहीत राहणं, लोकांना चांगल्या कार्यास प्रेरित करीत राहणं अशा एक ना अनेक गोष्टी आठवताहेत. त्यांच्या जाण्यानं एका ज्येष्ठ सहृदयी सन्मित्राला मुकल्याची भावना मनात दाटून राहिली आहे.

नरके सर कुटुंबवत्सल होते. आमच्या समानधर्मींच्या संमेलनामध्ये ते आदरणीय संगीता वहिनींना आणि प्रमितीला आवर्जून घेऊन यायचे. या दोघींविषयीही अपार प्रेम व वात्सल्यानं त्यांचं हृदय ओथंबलेलं असायचं. प्रमिती अभिनयाच्या क्षेत्रात स्वतःच्या बळावर यशाचा एकेक टप्पा सर करीत चालली आहे, त्याचं आणि त्याहूनही अधिक तिच्या प्रयोगशीलतेचं कोण अप्रूप त्यांना असायचं. प्रमितीही आमच्या घरात पुस्तकं राहतात आणि उरलेल्या जागेत आम्ही तिघं राहतो, असं सांगत वडिलांच्या पुस्तकप्रेमाचं अभिमानानं कौतुक करायची. या तिघांचं एक वेगळं विश्व होतं. त्या विश्वाचा एक कोन सरांच्या रुपानं लोपला आहे, ही त्यांची फार मोठी हानी आहे. आमच्याच आयुष्यात निर्माण झालेली पोकळी भरून निघणारी नाही. त्यांच्या तरी कशी निघावी? त्यांना सावरण्याचं बळ लाभो, एवढीच भावना या क्षणी मनात आहे.

मराठीला अभिजात दर्जा प्राप्त करवून देणं, फुले-आंबेडकरी चळवळींचं लोकशाही प्रस्थापनेसाठीचं महत्त्व सातत्यानं अधोरेखित करीत राहणं, ओबीसी समाजामध्ये जनजागृतीसह प्रबोधनाचं कार्य गतिमान करणं आणि भारतीय समाजाची जडणघडण संविधानाला अभिप्रेत अशी समताधिष्ठित करणं, ही आद्यकर्तव्यं घेऊन नरके सर मिशनरी भावनेतून अखेरच्या श्वासापर्यंत कार्यरत राहिले. त्यांची ही अंगिकृत कामं पूर्ण करण्यासाठी प्रयत्नरत राहणं, हीच हरी नरके यांच्या कार्याप्रती खरी आदरांजली ठरेल.


(पुढारी ऑनलाईनवर प्रकाशित लेखाची लिंक अशी- आंबेडकरी चळवळीला पुढे नेणारे लेखक हरपले | पुढारी (pudhari.news))

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा