बुधवार, ७ फेब्रुवारी, २०२४

आपके पाॅंव बहोत हसीन हैं; इन्हें सॅंभालिए।

डॉ. सुनील करी यांच्यासमवेत बंधू अनुप आणि अस्मादिक


मागील महिन्यात मी आठेक दिवस हुबळीत होतो, हे आपणास सांगितलेच. आई मधुमेहग्रस्त असल्याने त्या अनुषंगाने तिच्या पायावर एक महत्त्वाची शस्त्रक्रिया करण्यासाठी आम्ही तिथे होतो. तेथील सौ. मंदाकिनी मेमोरियल ट्रस्ट हॉस्पिटलचे निष्णात डॉ. सुनील करी यांनी ही अतिशय कौशल्यपूर्ण शस्त्रक्रिया केली. ही पोस्ट मी व्यापक माहितीसाठी टाकतो आहे कारण आम्ही डॉ. करी यांचेपर्यंत पोहोचण्यात माहितीअभावी खूप विलंब केला. तो इतरांच्या बाबतीत होऊ नये आणि वेळीच उपचार होऊन पाय वाचवले जावेत, या भावनेतून ही माहिती देत आहे.
भारतात मधुमेही रुग्णांची संख्या आशियाई देशांमध्ये सर्वाधिक आहे. त्यातही मधुमेहामुळे पायाला जखमा होऊन बोटे किंवा पायच गमावण्याची वेळ येणाऱ्या रुग्णांची संख्या आपल्याकडे अधिक आहे. डॉ. करी हे अशा डायबेटिक फूटवरील तज्ज्ञ आहेत. त्यांच्याकडे वेळेत जाऊन उपचार घेतल्यास पुढील गुंतागुंत टाळता येऊ शकते. ॲम्प्युटेशन केलेल्या पायांना योग्य आकाराचे शूज देऊन रुग्णाचे चालणेही ते सुकर करतात. आईच्या बाबतीत ॲम्प्युटेशननंतर एक वर्ष उलटून गेलं आणि त्यातून पायात विकृती उद्भवली. हे डॉ. करींची माहिती नसल्यामुळं झालं. केवळ शूजमुळं जी गोष्ट साधली गेली असती, त्यासाठी मोठी शस्त्रक्रिया करण्याची वेळ आली. हे टाळता येऊ शकतं. पायाच्या अवयवांना रक्तपुरवठा करणाऱ्या वाहिन्यांमध्ये ब्लॉकेज तयार होऊन पुढे तो अवयव काढून टाकण्याची वेळ येते. मात्र अशा बाबी मॉनिटर केल्यास आणि डॉक्टरांकडे गेल्यास पुढील गुंतागुंत रोखता येते. करी सरांचे चिरंजीव डॉ. शशांक हे सुद्धा व्हॅस्क्युलर व एन्डोव्हॅस्क्युलर सर्जन आहेत. रक्तवाहिन्यांतील ब्लॉकेज काढून पायाचा रक्तपुरवठा सुरळीत करून अवयव वाचविण्याची कामगिरी त्यांनी करुन दाखविली आहे. मधुमेही पायांची काळजी घेणं आणि वेळीच उपचार घेणं, हा ते वाचविण्याचा एकमेव मार्ग आहे. डॉ. करी यांच्याकडं देशविदेशातून रूग्ण उपचारांसाठी येत असतात. ते उत्तम सर्जन आहेतच, पण एक चांगला माणूसही आहेत. महत्वाचं म्हणजे रूग्णाला आणि नातेवाईकांना येणाऱ्या खर्चाबद्दल ते अनभिज्ञ ठेवत नाहीत. ऐनवेळी पळापळ टाळण्यासाठी हे महत्त्वाचं ठरतं. "भावी काळात भारतात मधुमेही रुग्णांची संख्या वाढत जाणार आहे. डायबेटिक फूट अल्सरच्या रुग्णांची संख्या त्या प्रमाणात वाढणार आहे. त्यासंदर्भातील जागृती फार महत्त्वाची आहे." असं डॉक्टर सांगतात. त्या दृष्टीनं त्यांनी काही अवेअरनेस मटेरियलही तयार केलंय. तेही यासोबत माहितीसाठी जोडतोय. आपल्या आसपास असे कोणी नातेवाईक, मित्र, सुहृद असतील, तर त्यांना तातडीने उपचार घेण्यास प्रवृत्त करा... पायांची निगा राखा... योग्य ती काळजी घ्या...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा