शुक्रवार, ८ मार्च, २०२४

'ब्रेकिंग न्यूज'चे स्वागत...
इट्स ऑल्वेज बेटर लेट, दॅन नेव्हर...  ती वेळ मात्र यावी लागते. 

पत्रकारितेमधील आमचे एक (खरेखुरे) अजातशत्रू मित्र विजयकुमार पाटील यांच्या 'ब्रेकिंग न्यूज' या पुस्तकाचा कच्चा मसुदा वाचून काही वर्षं झाली, तेव्हापासून हे पुस्तक लवकरात लवकर आलं पाहिजे, यासाठी आग्रही होतो. कारण न्यूजच्या अलीकडील माहिती देणारं आणि फीचरच्याही पलीकडील असं हे लेखन आहे. त्यांनी ज्या काही ह्यूमन इंटरेस्ट स्टोरी केल्यात, त्यातीलच काही निवडक अद्भुतमय, रहस्याच्या जवळ जाणाऱ्या पण तरीही वास्तव अशा गोष्टींचं अतिशय वाचनीय असं हे संग्रहण आहे. केवळ स्टोरीजचं संग्रहण नाही, तर त्या स्टोरीमागील स्टोरीजचा यात समावेश आहे. यात बच्चनला 'पती' मानून त्याच्याच नावचे उखाणे घेणाऱ्या शानूरपासून ते शाहू महाराजांनी उभारलेल्या देशातल्या पहिल्या ग्रीनहाऊसच्या स्टोरीजचा समावेश आहे. अशा १८ स्टोरी पुस्तकात आहेत. मात्र, यातली शामराव -विशाखाची प्रेमकहाणी काळजात खोलवर रूतून बसणारी. पत्थरालाही पाझर फोडेल अशी. शंभर वर्षांच्या चित्रपटसृष्टीच्या इतिहासात आजवर अशी एकही प्रेमकथा रुपेरी पडद्यावर आलेली नाही, हे मी पैजेवर सांगतो. इतकी उदात्त, निर्मळ आणि खरीखुरी प्रेमकथा विजयरावांनी जगासमोर आणलीय. बाकी १७ कथा एकीकडे आणि ही एकीकडे. वाचकांनी केवळ एवढ्या एका गोष्टीसाठी पुस्तक घेतलं तरी पैसावसूल.

 अशा या पुस्तकातून एका सजग पत्रकाराच्या वृत्तपत्रीय लेखनामागील प्रेरणांचा, सामाजिक संवेदनांचा एक उत्तम दस्तावेज या निमित्ताने साकार झाला आहे. त्यात विजयरावांची लेखनशैली संवादी अन् प्रवाही असल्यामुळं वाचक त्यात गुंततो आणि एकामागून एक स्टोरी वाचत जातो. वाचकाला भावनिक हिंदोळ्यावर झुलवत ठेवण्याचं काम या स्टोरी करतात. एखाद्या कथांचं पुस्तक असल्याप्रमाणं वाचक या स्टोरी पुनःपुन्हा वाचण्यासाठी प्रवृत्त होतो. त्यामागील सच्च्या जाणीवा वाचकाच्या विवेकाला, माणूसपणाला आवाहन करीत राहतात, ही या पुस्तकाची जमेची बाजू. विजयरावांनी आता अधिक खुलेपणानं लिहीतं व्हावं, अशी एक मित्र म्हणून  अपेक्षा आहेच... त्यासाठी त्यांना मन:पूर्वक शुभेच्छा!

---

ब्रेकिंग न्यूज या पुस्तकाविषयी...


पत्रकार विजय पाटील यांच्या ब्रेकिंग न्यूज या पुस्तकाची प्रत माझ्या हाती आली, तेव्हा आणखी एक न्यूज फीचरचे पुस्तक बाजारात दाखल होते आहे, अशी प्रतिक्रिया माझ्या मनात उमटली. मात्र, घरी जाऊन मी जेव्हा हे पुस्तक वाचायला घेतले, तेव्हा अगदी पहिल्या अमिताभला पती मानणाऱ्या शानूरच्या बातमीपासून माझ्या मनाची इतकी पकड घेतली की, ते वाचून संपवल्याखेरीज बाजूला ठेवणे झाले नाही. हे पुस्तक म्हणजे केवळ बातम्या किंवा फीचर यांचा संग्रह असल्याचा माझा गैरसमज या वाचनाने दूर झाला. एक वेगळे पुस्तक वाचल्याचे समाधानही लाभले.

लेखकाने खरे तर ब्रेकिंग न्यूजऐवजी ब्रेकिंग ऑफ न्यूज असे नाव द्यायला हवे होते, असाही विचार मनात चमकून गेला. कारण या पुस्तकाच्या माध्यमातून पत्रकारिताविषयक साहित्याच्या क्षेत्रामध्ये लेखनाचा एक नवीन प्रवाह विजय पाटील सादर करीत आहेत, असे मला वाटते. हा प्रवाह म्हणजे एखाद्या अत्यंत वाचकप्रिय बातमीमागील बातमीची वाचकांना फोड करून सांगण्याचा आहे. विजय पाटील यांनी केवळ बातम्यांचा संग्रह केला असता तरी चालले असते कारण त्यांना मानवी संवेदनांना हात घालण्याची लेखनशैली साधलेली आहे. त्यामुळे त्यांच्या बातम्या वाचकांना खिळवून ठेवतातच. मात्र, आपल्या लोकप्रिय बातम्यांमागील बातमी, त्यासाठी केलेली धडपड आणि त्या बातमीचा केलेला पाठपुरावा यासाठीची यातायात यांची खरी गोष्ट श्री. पाटील येथे सांगताहेत. आजकाल कॉलम भरण्याच्या नादात केवळ बातमी दिली जाते; मात्र, तिचा पाठपुरावा बातमीदारांकडून म्हणावा तितका होताना दिसत नाही. या पार्श्वभूमीवर, पाठपुरावा हा विजय पाटील यांच्या बातमीदारीचा एक महत्त्वाचा गुणविशेष आहे, हे मला आवर्जून नमूद करावेसे वाटते. हा पाठपुरावाही केवळ शब्दांचा अथवा घटनेचे वार्तांकन करण्यापुरता मर्यादित नाही, तर, संबंधित समस्या कायमस्वरुपी मिटविण्यासाठी व्यक्तिगत पातळीवर संबंधितांना भेटून त्यावर तोडगा, मार्ग काढण्यास प्रवृत्त करणारा एक कृतीशील पाठपुरावा आहे. त्यांच्या या कृतीशीलतेचे दर्शन सदर पुस्तकात पानोपानी होते. तथापि, या निवेदनामध्ये विजय पाटील यांचा अभिनिवेश डोकावत नाही, तर लोकांचे प्रश्न मार्गी लावण्यात खारीचा वाटा उचलल्याचे समाधान त्यातून उमटलेले दिसते. पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये काम करीत असताना आवश्यक असलेले पराकोटीचे सामाजिक जबाबदारीचे भान विजय पाटील यांच्या लेखणीत आणि व्यक्तीमत्त्वात आढळते. त्यांनी पत्रकार म्हणून पुस्तक लिहीले असले तरी त्यांच्यातल्या सहृदयी माणसाचे प्रतिबिंब म्हणजे हे पुस्तक आहे.

बातमीला किंवा वर्तमानपत्राला एक दिवसानंतरची रद्दी, असे काही जण उपहासाने म्हणतात. वर्तमानपत्रातील माहितीचा योग्य विनियोग नाही केला, तर त्या म्हणण्यातील वस्तुस्थितीही नाकारता येणार नाही. तथापि, विजय पाटील यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांच्या आणि एकूणच समाजाच्या जिव्हाळ्याच्या बनलेल्या बातम्यांना चिरंतनत्व प्रदान केले आहे. हे चिरंतनत्व त्या बातमीबरोबरच तिच्या विषयालाही आपसूकच प्राप्त झाले आहे.

ह्युमन इंटरेस्ट स्टोरीजमध्ये किती प्रकारचे वैविध्य असू शकते, याची प्रचिती ब्रेकिंग न्यूज वाचताना येते. मात्र, हे वैविध्य जपत असताना विजय पाटील आपल्या सामाजिक बांधिलकीचे भान कधीही हरपू देत नाहीत, ही बाब महत्त्वाची वाटते. उदाहरणच द्यायचे झाले तर, भुताच्या फोटोची बातमी असो, अगर प्रार्थना करणाऱ्या श्वानाची बातमी असो, त्यातील कुतुहलाचा भाग सांगण्याबरोबरच तज्ज्ञांची समर्पक प्रतिक्रिया घेऊन ते आपली बातमी अंधश्रद्धेला खतपाणी घालणार नाही, याची काटेकोर दक्षता घेतात. त्याचबरोबर बोर्डाच्या परीक्षेला घाबरून आत्महत्येला प्रवृत्त होणारी मुले असोत की अंधारात हरवलेली वसाहत असो, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ते बातम्यांवर बातम्या लिहीतातच, पण बोर्डाच्या अध्यक्षांना भेटून, लोकप्रतिनिधींना भेटून त्या समस्येवर चोख तोडगा काढण्यासाठी प्रवृत्त करतात आणि त्यालाही व्यापक प्रसिद्धी देण्यासाठी प्रयत्न करतात. हे विजय पाटील यांच्या पत्रकारितेचे वेगळेपण, वैशिष्ट्य आहे.

हातात लेखणी आणि त्या लेखणीतून उमटणारा प्रत्येक शब्द छापणारे व्यासपीठ असले की, त्याची हवा पत्रकाराच्या डोक्यात जाण्यास वेळ लागत नाही. ती हवा त्याच्यातील अहंभावाला अधिकच वारे देत असते. ती कायम राखण्यासाठी मग कोणताही विधिनिषेध न बाळगता वाट्टेल त्या गोष्टीसाठी आपली लेखणी कोणाच्याही दावणीला बांधणारे अगर प्रसिद्धीच्या लाटेवर स्वार होण्यासाठी काहीही करण्यास तयार असणारे काही पत्रकार असतात. विजय पाटील त्यालाही अपवाद ठरतात. पत्रकारितेची हवा डोक्यात न जाऊ देता, सकारात्मकतेकडे झुकणारी त्यांची पत्रकारिता आहे, याचे दर्शनही या पुस्तकात घडते. ब्लॅक पार्टीची बातमी हे याचे ढळढळीत उदाहरण. पुण्यामध्ये अलीकडे स्तोम माजविलेल्या रेव्ह पार्टीच्या धर्तीवर कोल्हापुरातही ब्लॅक पार्टी झडत असल्याची बातमी अत्यंत कष्टाने, अगदी सप्रमाण मिळवून त्यांनी प्रसिद्ध केली. या बातमीमुळे प्रचंड सनसनाटी निर्माण होणे स्वाभाविक होते. तशी ती झालीही. या सनसनाटीच्या लाटेवर आरुढ होऊन इलेक्ट्रॉनिक माध्यमांना त्या पार्ट्यांचे फुटेज पुरवून ते आणखी पॉप्युलर होऊ शकले असते. पण, या क्षणीही त्यांनी कळत्या- न कळत्या वयात या पार्टीत सहभागी होणाऱ्या मुलांच्या भवितव्याचाच विचार केला. बातम्या छापून येतात, हे पाहून ती मुले पुन्हा तसे धाडस करणार नाहीत, असा विश्वास त्यांच्या मनात होता. तो खराही ठरला. काही मुले त्यांना भेटावयास आली, त्यांचे यथाशक्ती कौन्सिलींगही त्यांनी केले आणि त्यांना या गर्तेत गुरफटण्यापूर्वीच बाहेर काढले. पत्रकार म्हणून बातमी दिली तेव्हाच त्यांचे काम संपले होते. पण, या देशाचा जबाबदार नागरिक म्हणून त्यांनी पत्रकारितेच्या परिघापलिकडे जाऊन आपले कर्तव्य बजावले, याचे समाधान मोठे आहे.

पर्यावरणाच्या रक्षणाप्रती असलेली त्यांची सजगता वाघाच्या आणि कासवांच्या तस्करीच्या बातम्यांतून झळकते. येथेही पुन्हा वन विभागाच्या अधिकाऱ्यांना सातत्याने बातम्यांच्या माध्यमातून रसद पुरवून लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मदत करण्याची आणि पर्यावरणाचे रक्षण करण्याची त्यांची धडपड दिसून येते.

राजर्षी शाहू महाराज यांच्या कार्याप्रती विजय पाटील यांच्या मनात असलेल्या निरतिशय आदराची प्रचितीही यातील काही बातम्यांतून येते. लोकोत्तर काम करणाऱ्या या राजाच्या कार्याचे जतन करण्याच्या जबाबदारीची जाणीव ते करून देतात.

यातील प्रत्येक बातमी आणि त्यामागील बातमी ही पानागणिक आपला पत्रकारितेवरील विश्वास अधिक दृढ करते. पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जातो. या स्तंभाला डळमळीत करण्याचे प्रयत्नही चहूबाजूंनी होत असल्याचेही दिसते. मात्र, विजय पाटील यांच्यासारख्या जागल्या पत्रकारांनी आपल्या लेखणीच्या टोकावर हा स्तंभ तोलून धरला आहे. जोपर्यंत विजय पाटील यांच्यासारखे संवेदनशील पत्रकार या देशात आहेत, तोपर्यंत या देशातील नागरिकांचे घटनादत्त अधिकार आणि मानवी मूल्यांची प्रतिष्ठा सदोदित कायम राहील.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा