आपल्या भावी पिढ्या स्मार्ट- अगदी ओव्हरस्मार्ट म्हणाव्यात
अशा असल्याचं दिसताहेत... पण, आपल्या मागील पिढ्या ह्या सर्जनशील अधिक, आणि या
दोहोंना जोडणारा दुवा म्हणजे वर्तमान पिढी. प्रा. अशोक चोकाककर यांनी त्यांच्या
मातोश्री पार्वती कृष्णा चोकाककर यांच्या मौखिक परंपरेतील गद्यपद्याचं केलेलं
शब्दांकन नुकतंच वाचून संपवलं. ‘काय नवाल इपईलं’ असं या पुस्तकाचं
नाव. आपल्या लोकसाहित्याच्या परंपरेमध्ये प्रा. चोकाककर यांनी या पुस्तकाच्या
रुपानं फार मोलाची भर घातलेली आहे. आपल्या आईच्या प्रत्येक शब्दाचं शब्दांकन
करावं, त्याचं जतन करावं आणि ते भावी पिढ्यांना सुपूर्द करावं, या भावनेतून
त्यांनी हा उपक्रम हाती घेतला. आईनंही सहकार्य केलं, पण ध्यानीमनी नसताना आईचं
निधन झालं. त्यामुळं बरंचसं असं लिहून घ्यायचं राहून गेलेलं आहे; मात्र, जितकंही
शब्दसंचित हाती लागलेलं आहे, ते सारं या पुस्तकाच्या रुपानं चोकाककर यांनी साकार
केलेलं आहे. आईचा हा ठेवा त्यांनी तिलाच अर्पण करणं स्वाभाविकच आहे.
तसं पाहता हे पुस्तक म्हणजे कृतज्ञताभावाचं
मूर्तीमंत प्रतीक आहे. म्हणजे प्रा. चोकाककर यांची त्यांच्या आई आणि एकूणच पूर्वजांप्रतीची
कृतज्ञता आहे आणि त्या कृतज्ञतेला त्यांच्या आईंच्या कृतज्ञताशब्दांचं अधिष्ठान
आहे. या कृतज्ञताभावाची सुरवात पहिल्या कवितेपासूनच होते.
एवढा माझा पिंड
माझ्या बयाच्या
डाव्या कुशी
माझ्या जल्मादिशी
बया येळाची उपाशी
माझ्या त्या बयाला
मागं परतून बोलू कशी
आम्हाला जन्म दिला, पोसलं म्हणजे काय उपकार केले
का, असा भाव आईबापाप्रती आजच्या पिढीमध्ये दिसतो. त्या पार्श्वभूमीवर आपल्याला
जन्म देताना आई उपाशी होती, तशा अवस्थेत तिनं आपल्याला जन्म दिला, याची कृतज्ञता
कशी आणि कोणत्या शब्दांत तिच्याकडं व्यक्त करावी, असं आईंना वाटतं. अशा
कृतज्ञभावानं ओथंबलेल्या अनेक कविता इथं पानोपानी आहेत. आईबापासह माहेरच्या माणसांपासून
ते अगदी नणंद-भावजया, सासू-सासरे यांच्याविषयीही तो ठिकठिकाणी प्रकट झाला आहे.
पिताजी माझा पिंपळ
बया माझी ती पिपरनं
दोघांच्या सावलीला
झॉप लागली सपरून
झाडामंदी झाडं
सावली बाबळ बाईयची
साऱ्या गोतामंधी
मया आगळी आईची
पिंपळ-पिंपरणीच्या सावलीच्या गारव्याची उपमा
आई-बापाच्या प्रेमाला इथं देऊन त्याची महत्ता केवढी नेमकेपणानं त्या सांगतात.
विज्ञान, नवतंत्रज्ञान यांच्या सहाय्यानं
गावामध्ये दाखल होणाऱ्या वेगवेगळ्या वस्तूंविषयी कुतूहलपूर्ण स्वागतशीलताही या
काव्यातून डोकावते.
चोकाक गावामंदी
काय नवलं इपईलं
शिवा-अर्जुनानं
हिरीवर
पाण्याला नवं इंजान
जुपईलं
तोवर मोठ्या कष्टानं शेताला मोटेनं पाणी
शेंदणाऱ्या आपल्या विहीरीवर आता ते काम रस्टन कंपनीचं नवं इंजिन कसं करतंय, याचं
मोठं अप्रूप आईंना वाटतं आणि तेच या चार ओळींतून झळकतं. इपईलं म्हणजे घडलं.
नातेसंबंध सांभाळताना, कष्टताना या पिढीनं अनेक
वेदनेचे प्रसंगही सोसले, पाहिले, त्यालाही इथं शब्दरुप आपसूक आलं आहे.
किसन पार्वतीनं
रगात आटवून
हाडं समदी झिजवूनं
केलं लेकांना सरदारं
त्ये आपल्या
राण्यांनाच
घालत्यात ज्वार
उपसत्यात तलवार
जल्म दिल्याल्या
आई-बा वर
करत्यात वरमी वार
एवढा अन्याय का झाला?
तर आई बापानं
जलमच का दिला?
समोरच्याच्या दुःखानंही आईंच्या हृदयाला पाझर
फुटून त्यातून असे शब्द बाहेर पडताना दिसतात. कृषीसंस्कृतीचं दर्शन तर इथं पानोपानी
होतंच, पण अगदी मृत्यूचं अपरिहार्यत्व आणि त्यातून उमगणारं जीवनाचं तत्त्वज्ञानही
या काव्यातून सामोरं येताना दिसतं.
अशा जवळपास साठभर वेगवेगळ्या प्रकारच्या
काव्यरचना यामध्ये आहेत. यात कवनं, ओव्या, पंचमीची गाणी, उखाणे, पाळणा अशांचा
समावेश आहे.
हा लोकसाहित्यप्रवास केवळ काव्यरचनांपर्यंतच मर्यादित
नाही, तर लोककथा आणि स्वकथनात्मक गद्यसाहित्यही इथं आहे, हे एक वेगळेपण इथं दिसतं.
चिमणी पडी खिरी, चिमणा काय करी?, करणी तशी भरणी या लोककथांच्या माध्यमातून त्या
सदुपदेश करतात. करणी तशी भरणी वाचताना, कशी गंमत झाली एका दुष्ट बाईची- जी आपल्या नवऱ्यालाच
त्याच्या आईला पुरात टाकून द्यायला सांगते.
दळाप दळतुया घरात
गं, सासू माझी पुरात गं
असा विकृत आनंद व्यक्त करणाऱ्या या सुनेला तिचा
नवरा जेव्हा
गाडी बैलं दारात गं,
पट्ट्याची आई घरात गं
असं उत्तर देतो, तेव्हा आपल्यालाही त्यातलं मर्म
उमगून वाचकाला त्यात मौज वाटून तो त्यात रमल्याशिवाय राहात नाही. आणि आपसूकच काय
घ्यायचा तो बोध तो घेतो. मोहना, कुस्ती परंपरा, एका आतड्याचं दोन तुकडं, उतमा पडला
हिरीत, अशोकचा जन्म, किसनरावांचं कष्ट हे लेख म्हणजे चोकाककर घराण्याचा त्यांच्या पणजांपासूनचा
इतिहासच आहे. पार्वतीबाईंनी या घरात सून म्हणून आल्यानंतर या घराण्याची इतकी
माहिती मिळवली की, संचित म्हणून ती त्यांनी आता पुढील पिढ्यांना सुपूर्द केलीय.
त्यांच्या या संचितामधूनच त्यांची पणजी मोहना हिच्या कष्टाळू वृत्ती आणि खमकेपणातूनच
हे घराणं सुखसमाधानाचे, वैभवाचे दिवस पाहात असल्याचं त्या सांगतात. हा इतिहास अगदी
आजपर्यंत आणून जोडतात. त्या काळातल्या माणसांचं चांगुलपण अधोरेखित करणाऱ्या गोष्टी
त्या आवर्जून सांगतात. त्यांची कृतज्ञ दखल घेतात. आईंचे अनुभव हे कोरडे शब्दरुप
घेऊन येत नाहीत, तर त्या भाषेला निरीक्षणांची जोड आहे, विशेषणांची पखरण आहे.
त्यातून एक आगळंच सौष्ठव तिला प्राप्त झालेलं आहे. आज आपण तरी आपले अनुभव इतक्या
रसाळ, ओघवत्या आणि वाचनीय पद्धतीनं सांगू शकू का, असा प्रश्न पडल्याविना राहात
नाही. शब्दबंबाळतेला इथं थाराच नाही. जे आलंय ते थेट हृदयातून आणि अत्यंत
नेमकेपणानं. त्यामुळं वाचकालाही हे भाषासौंदर्य भुरळ घातल्याशिवाय राहात नाही.
आईच्या या आठवसंग्रहामध्ये मग चोकाककर सरांनी छायाचित्रं, आडनावाचा दस्तऐवज,
हेळव्याचं पत्र, यादी वंशावळी, कुटुंबविस्तार, व्यक्तीविषयक टीपा आणि महत्त्वाचं
म्हणजे शब्दार्थ सूची अशी पुस्तीही जोडलेली आहे. त्यातून या पुस्तकाला एक पूर्णत्व
देण्याचा त्यांचा प्रयत्न स्तुत्य आहे. मोग्गलान श्रावस्ती यांनी मुखपृष्ठासाठी
आईंचं जे पेंटिंग केलेलं आहे, त्यातूनच त्यांचं एकूण कष्टातून आलेलं रापलेपण आणि सुख-समाधानाचं
अस्तित्व त्यांचे डोळे आणि व्यक्तीत्वातून स्पष्ट होतं.
या प्रसंगी बहिणाबाई आणि त्यांचे चिरंजीव सोपान
यांची आठवण होणंही साहजिकच. चोकाककर सरांनी त्याचप्रमाणं आपल्या आईचं हे संचित
समाजाकडं सुपूर्द केलंय. असे सोपान त्या काळात घरोघरी निर्माण झाले असते, तर
भारतीय लोकपरंपरेतील लोकसाहित्याचं दालन हे आजच्या पेक्षा कितीतरी अधिक समृद्ध
झाल्याचं पाहायला मिळालं असतं. त्या दृष्टीनं पार्वती चोकाककर यांच्या वाणीला
शब्दरुप देऊन आपल्यापर्यंत पोहोचविणाऱ्या प्रा. अशोक चोकाककर यांच्या प्रयत्नांचं अनमोलत्व
आपण लक्षात घ्यायला हवं.
पुस्तकाचं शीर्षक: काय नवाल इपईलं
पार्वती कृष्णा
चोकाककर (शब्दांकन: प्रा. अशोक चोकाककर)
अत्तप्रज्ञ प्रकाशन,
कोल्हापूर
पृष्ठे: १४४
किंमत: रु. २००/-
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा