सोमवार, ७ सप्टेंबर, २०२६

पी.के. जोशी सर, लव यू व्हेरी मच...

पी. के. जोशी



आयुष्यात काल एक फार मोठी हानी झाली, ती म्हणजे माझ्यावर निरतिशय प्रेम करणारे, अर्जुननगरच्या मोहनलाल दोशी विद्यालयातील माझे पदार्थविज्ञानाचे शिक्षक पी.के. जोशी सर यांचं वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झालं... सरांशी मी फार संपर्कात नव्हतो, पण ते सदैव स्मृतींमध्ये असायचे, राहतील. खरं सांगू, सरांचं पूर्ण नावही मला आज ते गेले, तेव्हा समजलं- प्रभाकर काशीनाथ जोशी! पण, ते माहिती असतं, तरी ते माझ्यासाठी सदैव पी.के. जोशी सरच राहिले असते. 

 पी. के. जोशी सर हे नैतिक मूल्ये, शिस्त आणि वेळेचे अत्यंत काटेकोर पालन करणारे शिक्षक होते. वावगे त्यांना कधीच खपत नसे. त्यांच्या दृष्टीने विद्यार्थी नेहमीच उत्तम घडला पाहिजे, त्याच्या हातून चांगली कामे झाली पाहिजेत, तो चांगला अभ्यास करणारा आणि चांगला नागरिक बनला पाहिजे, यासाठी त्यांची तळमळ त्यांच्या प्रत्येक शब्दांतून आणि वर्तनातून सतत जाणवत असे. ते जितके कडक होते, तितकेच मृदू आणि मुलायम स्वभावाचेही होते. त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील ही दोन्ही रूपे त्यांच्या नजरेतून स्पष्टपणे दिसत असत.

जोशी सरांचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण जडणघडणीकडे सातत्याने लक्ष दिले. केवळ अभ्यासात हुशार असलेला किंवा परीक्षेत भरपूर गुण मिळवणारा विद्यार्थी एवढ्यापुरते त्यांचे लक्ष मर्यादित नव्हते. उलट, जो विद्यार्थी अभ्यासासह विविध उपक्रमांमध्ये सहभागी होत असे, अशा विद्यार्थ्यांकडे त्यांचे अधिक बारकाईने लक्ष असायचे. माझेच उदाहरण घ्यायचे झाले, तर अभ्यासात मी चांगला होतोच; त्याचबरोबर वक्तृत्व, स्पर्धा, निबंध स्पर्धा, शाळेतील विविध गुणदर्शन कार्यक्रमांचे सूत्रसंचालन, इतर उपक्रम आणि क्रीडा यामध्येही माझा सहभाग होता. त्यामुळे सरांचे माझ्यावर विशेष प्रेम होते; परंतु ते प्रेम त्यांनी कधी उघडपणे व्यक्त केले नाही. त्यांच्या कृतीतूनच ते सतत प्रकट होत असे, आणि तेही इतक्या बेमालूमपणे की इतर विद्यार्थ्यांच्या मनात फेवरिटिझमची भावना निर्माण होणार नाही. तरीसुद्धा, सरांचे माझ्यावरचे हे विशेष लक्ष इतर विद्यार्थ्यांच्या लक्षात येतच असे.

याचे उदाहरण म्हणजे, फिजिक्सच्या जर्नलमध्ये बाकी सर्व विद्यार्थ्यांना “ब”, “ब प्लस” असे शेरा असायचे, पण त्या वेळी  मला मात्र “अ” शेरा दिलेला असे. 

 अशीच एक आठवण क्रीडा स्पर्धेशी संबंधित आहे. शालेय वार्षिक क्रीडा स्पर्धांमध्ये मी बॅडमिंटन, रिंग टेनिस आणि विशेषतः हॉलिबॉल हा माझ्या आवडीचा खेळ खेळत असे. त्या खेळात माझ्या टॅप सर्व्हिसेस अतिशय चांगल्या असत. एकदा मी सलग सहा गुण फक्त सर्व्हिसवर मिळवले आणि समोरच्या बाजूला पी. के. जोशी सर उभे होते. हॉलिबॉल त्यांनाही आवडत असे. मी गुण मिळवत असताना सरांनी “वारे पठ्ठ्या” असे म्हणत मारलेली आनंदाची उडी आजही माझ्या डोळ्यांसमोर तशीच आहे. बाकी मुलांचा जल्लोष एकीकडे आणि सरांचा तो उत्स्फूर्त आनंद दुसरीकडे ! हा प्रसंग माझ्या मनात कायमचा कोरला गेला. मी राज्यस्तरीय स्पर्धांपर्यंत खेळलो, पण त्या क्षणी मिळालेला आनंद आणि सरांची ती प्रतिक्रिया माझ्यासाठी सर्वांत मोठी होती.

शिस्तपालनाच्या बाबतीतही सरांचा आदर्श अतिशय प्रेरणादायी होता. अनेक वर्षे  सर सायकलवरूनच शाळेत येत असत. आम्ही दहावीला गेलो त्या काळात त्यांनी लुना वापरायला सुरुवात केली. पण त्यांची वेळेची शिस्त एवढी काटेकोर होती की १०:३० च्या शाळेसाठी १०:०५ वाजताच शाळेच्या कोपऱ्यावरून त्यांचे वळणे ठरलेले असायचे. ही वेळेची शिस्त त्यांनी स्वतःच्या अंगी इतकी बाणवली होती की त्यात कोणतीही तडजोड नसे. त्यानंतर शाळेत येऊन साहित्य ठेवून ते बरोबर १०:१० वाजता छडी घेऊन शाळेच्या गेटवर उभे राहत. उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना दारातच सर दिसले, की छडीचा प्रसाद घेऊन मगच त्यांना आत प्रवेश मिळायचा. अशा प्रकारे वेळ व शिस्त पालनाचा धडा सरांनी केवळ सांगून नव्हे, तर स्वतःच्या वर्तनातून विद्यार्थ्यांना दिला.

सरांच्या स्वभावातील गमतीशीर पण लक्षवेधी गोष्ट म्हणजे ते मुलांना प्रेमाने विविध टोपणनावे देत असत. विशेषतः “न्हावी” हे त्यांचे आवडते संबोधन होते. आजच्या काळात अशा संबोधनाकडे वेगळ्या नजरेने पाहिले जाऊ शकते; मात्र त्या मागे कोणताही जातीवादी दृष्टिकोन नव्हता. उलट, ते स्वतः ब्राह्मण असूनही ब्राह्मण विद्यार्थ्यांना केवळ जात म्हणून कधीही झुकते माप देत नसत. बदमाशी करणाऱ्या कोणत्याही विद्यार्थ्याला, तो कोणत्याही जातीचा असो, त्यांनी कधीही पाठीशी घातले नाही. बहुजनांची मुले शिकली पाहिजेत, घडली पाहिजेत, ही त्यांच्या मनातील तळमळ त्यांच्या वर्तनातून आणि शिक्षणातून स्पष्ट दिसत असे. त्यांची अशी संबोधने ही केवळ उदाहरणार्थ, संवाद सुलभ व्हावा आणि विद्यार्थ्यांकडून काही चांगले घडावे, या भावनेतून असत. विद्यार्थ्यांच्या भवितव्याबद्दलची काळजी त्यांच्या बोलण्यातून सतत पाझरत असे.

मी माझ्या 'सेल्फ अप्रायझल ऑफ हेअर कटिंग' या लेखात त्याविषयी लिहिलं होतं. ते इथं थोडं उद्धृत करतो, "मला मोहनलाल दोशी विद्यालयातले पी.के. जोशी सर आठवले... जबरदस्त माणूस आणि शिक्षकही... अभ्यास न करणाऱ्या तमाम पोरांना ते न्हावी (त्या काळात सामाजिक अस्मिता अशा शब्दांशी निगडित नव्हत्या, विषमतापूर्ण वर्तनाशी होत्या.) संबोधत... जसे की, शिंत्रे न्हावी.. जत्राटकर न्हावी... म्हणायचे कसे- ‘मास्तर, तुमी शाणपणा सांगू नका... आमी काय शिकणार न्हाई... आमी न्हावीच होणार... चौकाचौकात दुकानं टाकणार... समोरनं मास्तर सायकलवर टांग टाकून जाताना दिसला की दोरी टाकून त्येला पकडणार... म्हनणार... या मास्तर, तुमची हजामत करतो... मास्तरला खुर्चीवर बशीवनार... तोंडाला साबण फासणार आनि शेवटी मास्तरच्या गळ्यावर वस्तरा ठेवनार... आता मास्तराची दाढी करनार का गळा कापनार, हे आता त्यो हजामत कशी करायला शिकलाय, त्यावर अवलंबून राहनार...’ सरांचा हेतू एकच असायचा की, पोरांनी रोजच्या रोज अभ्यास करावा... पण, त्याबरोबरच शाळा न शिकता एखादं कौशल्य शिकला, तरी ते सुद्धा प्रामाणिकपणानंच आणि परफेक्ट शिकण्याची गरज त्यातून अधोरेखित होत होती, हे आत्ता कळतंय...."

पी. के. जोशी सरांविषयी सांगण्यासारख्या अनेक आठवणी आहेत. आज त्या आठवणी जपणे हेच त्यांना खरे स्मरणांजली अर्पण करणे आहे. माझ्या आयुष्यात मी जे पहिले मोठे लिखाण केले, ते एम. जे. सी.चे डिझर्टेशन, ते मी माझ्या प्राथमिक शाळेतील गुरुजी ढोले गुरुजी आणि हायस्कूलमधील पी. के. जोशी सर यांना अर्पण केले होते. माझ्या हातून पुढे काही लेखन होईल किंवा नाही, याची मला खात्री नव्हती. पण जे काही लेखन झाले होते, ते त्या शिक्षकद्वयांच्या प्रेरणेतून झाले, अशी भावना असल्याने त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा तो माझा प्रयत्न होता. 

पी. के. जोशी सरांच्या हाताखाली माझे वडील घडले, मी घडलो आणि माझ्या भावालाही त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ झाला. अशा प्रकारे आमच्या घरातल्या तीन पिढ्या त्यांच्या हाताखाली शिकल्या. त्यामुळे त्यांच्याविषयीची कृतज्ञता माझ्या मनात फार खोल आहे. एक महान शिक्षक आपल्या मधून गेला याचे दुःख निश्चितच आहे. पण असे शिक्षक गावोगावी, खेडोपाडी निरलसपणे, समाजशील वृत्तीने, कृतज्ञतेने आणि समर्पणभावनेने विद्यार्थी घडवत असतात. अशा शिक्षकांचे कार्य हे केवळ शिक्षणापुरते मर्यादित नसते; ते समाजनिर्मितीचे कार्य असते.

आजच्या तरुणांनी, विशेषतः शिक्षकी पेशात येऊ इच्छिणाऱ्यांनी, पी. के. जोशी सरांचा आदर्श समोर ठेवून वाटचाल केली पाहिजे. आपण स्वतः शिक्षकी पेशात असो वा नसो, अशा व्यक्तिमत्त्वांकडून शिस्त, निष्ठा, तळमळ, आणि विद्यार्थ्यांवरील प्रेम यांचा आदर्श घ्यायला हवा. पी. के. जोशी सरांसारखे शिक्षक हे केवळ शिक्षक नसतात, तर ते पिढ्या घडवणारे संस्कारकर्ते असतात.

त्यावेळी महेश भटचा 'सर' हा चित्रपट आला होता. त्यातले विद्यार्थी सर असलेल्या नसीरला उद्देशून 'सर, वी लव यू' असं गाण्यातून सांगतात. त्यावेळीही आम्हाला आम्ही आमच्या शिक्षकांना असं काही सांगू शकू, असं वाटलं नाही आणि त्यानंतरही! याचा अर्थ आमचं त्यांच्यावर प्रेम नव्हतं, असं नाही, मात्र अतीव आदरयुक्त भीतीपोटी आम्ही ते कधीही व्यक्त करू शकलो नाही, याची कबुली द्यायलाच हवी. मात्र पी.के. जोशी सरांचं अंतिम दर्शन घेताना मला आक्रंदून त्यांना सांगावंसं वाटत होतं - सर, माझं आपल्यावर खूप खूप प्रेम आहे हो... पण, हे सांगायला खरंच खूप उशीर झाला...


सरांना भावपूर्ण श्रद्धांजली!!!