गुरुवार, २७ ऑगस्ट, २०२६

कम्फर्ट झोनला धक्का देऊन प्रज्ञेचा विकास साधणे आवश्यक: प्रा. जे.डी. कांबळे

(कोल्हापूर येथील फुले, शाहू, आंबेडकर फोरमचा २८ वा वर्धापनदिन समारंभ दि. २६ ऑगस्ट २०२६ रोजी राजर्षी शाहू स्मारक भवन येथे पार पडला. फोरमचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य डॉ. हरिष भालेराव यांच्या अध्यक्षतेखाली आणि ज्येष्ठ समाजशास्त्रज्ञ डॉ. एन.डी. जत्राटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात ज्येष्ठ विचारवंत प्रा. जे.डी. कांबळे यांचे 'आंबेडकरी चळवळीपुढील आव्हाने' या विषयावर नितांतसुंदर प्रबोधक व्याख्यान झाले. या व्याख्यानाचा हा संपादित अंश...)

प्रा. जे.डी. कांबळे

कोल्हापूर येथील फुले, शाहू, आंबेडकर फोरमच्या वर्धापन दिन समारंभात बोलताना प्रा. जे.डी. कांबळे. मंचावर डॉ. एन.डी. जत्राटकर, प्राचार्य डॉ. हरिष भालेराव, डॉ. प्रकाश कांबळे, ए.बी. कांबळे आदी.


विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली प्रेरणा हीच आंबेडकरी समाजाची खरी ताकद आहे.  तेच आपले भांडवल आहे. एकटा माणूस जरी उरला, भोवती कोणीही नसले, तरी प्रतिकूल परिस्थितीच्या छातीवर पाय देऊन पुढे जाण्याची हिंमत जर कुठून मिळत असेल, तर ती बाबासाहेबांच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक तत्त्वज्ञानातून मिळते. माणूस हा विचार करणारा प्राणी आहे. मानवजातीच्या उत्क्रांतीमध्ये जेव्हा माणूस चार पायांवरून दोन पायांवर उभा राहिला, तेव्हा त्याचे हात मोकळे झाले आणि त्या मोकळ्या हातांनी, मोकळ्या मनाने आणि प्रगल्भ होत गेलेल्या मेंदूने विचार करायला सुरुवात केली. म्हणूनच विचार ही माणसाची प्रचंड शक्ती आहे, आणि ज्ञान ही त्याहूनही महान शक्ती आहे.

मानवेतर प्राणी हे प्रामुख्याने इन्स्टिंक्टवर, जैविक प्रेरणांवर आणि नैसर्गिक प्रवृत्तीवर जगतात. पण माणूस केवळ जैविक प्रेरणांवर जगणारा प्राणी नाही; तो शिकतो, वर्तन घडवतो, कसे जगायचे, कसे राहायचे, कशा पद्धतीने वागायचे याचा विचार करतो. या अर्थाने माणसाचे वेगळेपण आणि श्रेष्ठत्व हे त्याच्या विचारशक्तीत आहे. मात्र ही क्षमता केवळ उपजत असली तरी ती विकसित व्हायची असेल, तर भोवतालची सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीय व्यवस्था अनुकूल असावी लागते. माणसातील मनुष्यत्व जागवणारी ऊर्जा इन्स्टिंक्टमध्ये असली, तरी त्या ऊर्जेचे व्यवस्थापन समाजव्यवस्था करत असते. म्हणून माणूस आणि व्यवस्था, माणूस आणि समाज यांच्या परस्परसंबंधांचे आकलन झाले, तरच समाजपरिवर्तनाच्या दिशेने पाऊल टाकता येते.

माणसाच्या जगण्याला अर्थ हवा. केवळ जगणे पुरेसे नाही. कावळे-कोंबड्यांचेही जगणे असते; ते जन्मतात, जगतात आणि मरून जातात. पण माणसाचे तसे नाही. माणूस अर्थपूर्ण जीवनाच्या शोधात असतो. परिपूर्ण जीवनाच्या शोधात असतो. आज माणूस बाहेरून सुस्थितीत दिसतो — गाडी, बंगला, कुटुंब, सोयीसुविधा असतात — तरी आतून तो अस्वस्थ का असतो, कोलमडल्यासारखा का वाटतो, मनात पोकळी का जाणवते? याचे कारण असे की माझ्या वैयक्तिक गरजा भागल्या तरी माझ्या भोवतीचा समाज, माझा बांधव, माझे नातेवाईक, माझे गाव, माझा समुदाय, माझा समाज आणि अंतिमतः माझे राष्ट्र हे जर त्या उंचीवर पोहोचले नाहीत, तर माझे जगणे पूर्ण अर्थपूर्ण होत नाही. माझे एकट्याचे सुख पुरेसे नाही; माझ्या भोवतीच्या सर्व समाजाचे जीवन अर्थपूर्ण झाले पाहिजे. यालाच मानवतावादी दृष्टिकोन म्हणतात.

हा मानवतावादी दृष्टिकोन आपोआप येत नाही. तो शिकावा लागतो. वाचावे लागते, चिंतन करावे लागते, मनन करावे लागते. मोठ्या माणसांचे म्हणणे समजून घ्यावे लागते. ते केवळ बौद्धिक पातळीवर नाही, तर अंतःकरणात उतरले पाहिजे. बाबासाहेबांच्या नंतर आपल्या समाजामध्ये जी पोकळी निर्माण झाली, तिच्यामागेही सामाजिक मानसशास्त्र आहे. ज्या वेळेला एखाद्या व्यवस्थेत केंद्रीय नेतृत्व दिसेनासे होते, त्या वेळेला रणांगणात कॅप्टन पडल्यावर सैनिकांची जी अवस्था होते, तशी अवस्था समाजाची होते. पण मोठा माणूस गेला म्हणून जगणे थांबत नाही. जीवन निरंतर आहे. त्या जीवनामध्ये आपण आपल्या स्थानिक हितसंबंधांना जपत, आंबेडकरी चौकटीत पुढे गेले पाहिजे.

आज दलित समाजातील सुशिक्षित, सुसंस्कृत, जागरूक असा एक वर्ग स्थानिक पातळीवर लहान-मोठ्या संघटना निर्माण करून कार्य करत आहे. या उपक्रमांमागे वैचारिक स्पष्टता असेल, तर अशा संस्था- संघटनांचे वृक्ष मोठे होऊ शकतात. पण आजची पोकळी कशामुळे निर्माण झाली आहे, वास्तव काय आहे, आणि त्या वास्तवाचे आकलन किती खोल आहे, हे महत्त्वाचे आहे. आज जातीय भावना अत्यंत टोकदार झाल्या आहेत. राजकारणात जात हे हत्यार म्हणून अत्यंत हुशारीने वापरले गेले आहे. जात आणि धर्म यांचे विकृत राजकारण समाजासमोर येत आहे. त्यामुळे आपल्या खऱ्या प्रश्नांना बाजूला सारले जात आहे, आणि भव्य, दिव्य, आक्रसलेले, विक्राळ असे भासणारे खोटे प्रश्न समोर आणले जात आहेत.

आपले खरे प्रश्न आणि खोटे प्रश्न यांच्यात फरक करण्यासाठी विवेक, शहाणपण आणि ज्ञान आवश्यक आहे. केवळ माहिती पुरेशी नाही; माहितीच्या पुढचा टप्पा म्हणजे विवेक. आंबेडकरी समाजात हे विवेकशील शहाणपण परंपरेने आलेले आहे. कारण आमचे हितसंबंध आणि परंपरेत गुरफटलेल्या इतरांचे हितसंबंध यात जमीन-अस्मानाचा फरक आहे. आमच्यावर झालेले संस्कार आणि जातीय-धर्मवादी संस्कार यातही मोठा फरक आहे. म्हणूनच आपली मान्यता काय आहे, हे तपासणे महत्त्वाचे. कारण मान्यतांनुसार आपले वर्तन घडते, बोलणे घडते, चालणे घडते. मान्यता चुकीच्या असतील, तर संपूर्ण व्यवहार चुकीचा होतो. आपण जे समजतो तेच अंतिम सत्य आहे, अशी संकुचित मनोवृत्ती असल्यास भविष्य आपल्याला माफ करणार नाही.

आज आपण आर्थिकदृष्ट्या पूर्ण सक्षम नसू, पारंपरिक दृष्ट्या मागे राहिलो असू; पण बाबासाहेब वाचणारा, ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’चा अभ्यास करणारा, बाबासाहेबांचे तत्त्वज्ञान समजून घेणारा माणूस सामाजिक, आर्थिक आणि राजकीय जीवनाची रसायने आपल्या अंतःकरणात सामावून घेतो. हेच आपले खरे भांडवल आहे. आणि याच भांडवलाच्या जोरावर आपला भविष्यकाळ उज्ज्वल आहे. नरम व्हायचे काही कारण नाही. समाजाचा विकास कधी वर, कधी खाली असा चालू असतो. आज आपण ठप्प झाल्यासारखे वाटण्याचे कारण म्हणजे भोवतालचे वातावरण धर्मवादी झाले आहे. धर्माच्या विकृत व्याख्या करून, धर्माचे राजकारणाशी संगनमत करून, धर्मगट तयार करून, वोट बँक तयार करून, स्त्री-पुरुषांच्या संघर्षात नवीन भेगा निर्माण करून एक वेगळीच प्रक्रिया चालू आहे. त्याला तोंड देण्यासाठी व्यापक प्रबोधन आवश्यक आहे.

नवभांडवलशाहीने प्रचंड प्रमाणात रोजगाराची क्षति केली आहे. शिक्षण वाढले, पण रोजगार कमी झाला. बीए, बीकॉम, एमए, एमकॉम झालेली मुले फक्त परीक्षा पास होण्यापुरते शिकत आहेत; जीवनात उपयोगी पडेल, असे शिक्षण त्यांना मिळत नाही. त्यामुळे शिक्षण आणि रोजगार यांची सांगड बसणे अत्यंत आवश्यक आहे. मुलांना फक्त शिकवायचे नाही, तर ते शहाणपणाच्या दिशेने वळतील, संस्कारक्षम होतील आणि कुटुंब संस्था बळकट राहील, याकडेही लक्ष द्यावे लागेल. कारण कुटुंब संस्था डळमळीत झाली, तर सर्व काही डळमळीत होते. माणूस आपल्या बायको-मुलांवर, भावंडांवर, नातेवाईकांवर प्रचंड भावनिक गुंतवणूक करतो. मग उरलेल्या थोड्याशा ऊर्जेत तो सामाजिक चळवळीत सहभागी होतो. बाबासाहेबांचा त्याग सर्वांमध्ये येईलच असे नाही. पण कमीतकमी आपला कम्फर्ट झोन तोडण्याइतपत धैर्य हवे.

बाबासाहेबांच्या नंतर शिकलेली-सवरलेली पिढी, नोकरी मिळालेली पिढी, औद्योगिकीकरण आणि शहरीकरणाचे फायदे मिळवलेली पिढी हळूहळू कम्फर्ट झोनमध्ये अडकली. या झोनमधून बाहेर येण्याची ताकद प्रत्येकामध्ये नसते. पण काही माणसे हा झोन तोडतात, संघर्ष करतात, पुढच्या पिढीला वारसा देतात. आपणही तेच केले पाहिजे. कारण आपण स्वतःभोवती तयार केलेला कम्फर्ट झोन हेच खरे तर एक तुरुंग आहे. तो तोडणे म्हणजेच प्रज्ञेचा विकास. जर आपल्याला वाटत असेल की माझे कुटुंब आणि मी, याच्या पलीकडे जग नाही, तर आपण शहामृगासारखे वागतो — डोके वाळूत खुपसून बाहेरचे जग नाही असे मानतो. असे चालणार नाही.

यासाठी बाबासाहेब वाचले पाहिजेत. पण नुसते वाचून चालणार नाही; त्यांचे समाजशास्त्रीय, अर्थशास्त्रीय, राजकीय आणि सांस्कृतिक आकलन झाले पाहिजे. यालाच interpretative understanding म्हणतात. हे आकलन झाले की आपण कम्फर्ट झोनला धक्का देऊ शकतो. पण आपल्या भोवतीचा ब्राह्मण्यवादी, ब्राह्मणवादी विचार आपल्याला बाहेर पडू देत नाही. “आपले तेवढे पाहायचे, बाकी जगाशी काय करायचे” ही वृत्ती दिसायला साधी वाटते, पण तिचे परिणाम फार खोल असतात. ती आपल्या मुलांपर्यंत पोहोचते. मग पुढच्या पिढीला कळते की मागच्या पिढीने जे करायला हवे होते, ते झाले नाही.

म्हणूनच जीवन केवळ सुखी व्हायचे म्हणून नाही. चिरंजीवी विकास साधायचा असेल, तर आपण पुढच्या पिढीला जो वारसा देऊ, तो चिरंजीवी असला पाहिजे. आजचा सामाजिक, आर्थिक, राजकीय संदर्भ समजला, तर पुढच्या पिढीला काय द्यायचे, हे स्पष्ट होते. आणि मग माणसे एकत्र येऊ लागतात. एकत्र येणे सहज घडत नाही; त्यामागे प्रक्रिया असते. संघटन घडते, नेतृत्व घडते. मानवजातीच्या इतिहासात महामानवांचे योगदान प्रचंड आहे. बाबासाहेब म्हणतात, माणसाला इतिहासातून वजा केले, तर तो इतिहासच उरत नाही. मानवाला वगळून इतिहास समजत नाही.

आपला विश्वास मानवत्वावर आहे. मनुष्यत्वाची प्रतिष्ठा हेच जीवनातील सर्वश्रेष्ठ मूल्य आहे. याचा अर्थ असा की आपण दोन जगांत जगतो — बाह्य भौतिक जग आणि आंतरिक मानसिक जग. बुद्धांनी मनाला जीवनात सर्वोच्च स्थान दिले. बुद्ध आणि त्यांचा धम्म हे पुस्तक आशयासकट समजले नाही, तर ते अनेकदा वाचूनही उपयोग होत नाही. बाबासाहेबांचे सर्वात अद्वितीय, सर्वात तेजस्वी लेखन कोणते असेल, तर ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ हेच आहे. त्याचे आकलन झाले नाही, तर सामाजिक जीवनात आपली उणीव राहते, अहंकार वाढतो, संघटन होत नाही.

संघटित होण्यासाठी भ्रातृभाव, बंधुभाव, मैत्रीची भावना आवश्यक असते. जिथे द्वेष आहे, तिरस्कार आहे, मत्सर आहे, जिथे मी आणि तू वेगळे आहोत, तिथे संघटन अशक्य आहे. बाबासाहेब आणि बुद्ध यांच्यासारखी करिष्मॅटिक व्यक्तिमत्त्वे लोकांना आकर्षित करतात. पण असे महामानव दूर झाल्यावर त्यांच्या जागी कमी उंचीची माणसे येतात. अशा वेळी आपल्याकडे शहाणपण असले पाहिजे — कोणाचे म्हणणे ऐकायचे, कोणाचे म्हणणे अर्थपूर्ण आहे हे ओळखायचे.

आज आपल्या समाजात नकारात्मक दृष्टिकोन वाढत चालला आहे. त्यामुळे आई-वडील मुलांकडे, मुलं आई-वडिलांकडे, नातेवाईक एकमेकांकडे, गाव एकमेकांकडे नकारात्मकतेने पाहू लागतात. याचा परिणाम म्हणजे चांगल्या कामाचेही मातेरं होते. काही लोकांचा स्वभावच असतो विनाकारण वाद घालणे. कोणतेही प्रपोजल आले की पहिला विरोध करायचा. हा एक मानसिक रोग आहे. आपण रोगी आहोत, हे आपल्याला कळत नाही. आत्मपरीक्षण, आत्मटीका, आत्मचिकित्सा यांची गरज आहे. जे माणसे वाद घालून इतरांना गोंधळात टाकतात, त्यांना बाजूला ठेवून भ्रातृभाव निर्माण करायला हवा. आपल्या परीने का होईना, संघटित ताकद निर्माण करायला हवी.

केंद्रीय नेतृत्व आज नसले, तरी जगणे थांबत नाही. हा देश आपला आहे. देशाचे प्रश्न आपले प्रश्न आहेत. शहरांचे, गावांचे, तालुक्यांचे, जिल्ह्याचे, राज्याचे, देशाचे प्रश्न हे माझे प्रश्न आहेत, ही जाणीव प्रगल्भ झाली पाहिजे. आपण वैज्ञानिक पद्धतीने विचार करणार, आणि उपाययंत्रणांमध्ये सहभागी होणार, ही भूमिका घेतली पाहिजे. कोणतीही सामाजिक चळवळ शेवटी राजकीय चळवळीत रूपांतरित होते. जर तसे झाले नाही, तर ती चळवळ गोठते, साचते, कंटाळवाणी होते. राजकारण आणि अर्थकारण या दोन नाण्याच्या दोन बाजू आहेत. राजकीय अंग प्रगल्भ झाले नाही, तर अर्थकारण आपल्या हातून निसटते. त्यामुळे वैचारिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक भनंगता नष्ट करण्यासाठी व्यापक दृष्टी हवी.

संस्कृती आणि व्यक्तिमत्त्व यांचा अतिशय निकट संबंध आहे. जशी संस्कृती, तसा माणूस; जसा माणूस, तशी संस्कृती. संस्कृती वगळली, तर माणसाकडे काहीच उरत नाही. म्हणून आंतरिक जीवन प्रगल्भ होण्यासाठी संस्कृतीची आवश्यकता असते. बाबासाहेबांनी याचा अत्यंत खोलवर विचार केला. “मी कोण?” या प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही, तर माणूस पांगळा होतो. “मी बौद्ध आहे” या उत्तरामध्ये प्रचंड मानसिक कुवत, मनोबल आणि नैतिक शक्ती आहे. धम्माच्या चळवळीला कमी लेखण्याचे कारण नाही. माणूस नुसता भाकरीवर जगत नाही; त्याच्या अंतर्गत व्यवस्थेसाठी धर्म, विचार, भावना, बुद्धी, वृत्ती यांचे व्यवस्थापन आवश्यक असते.

बाबासाहेबांनी स्वतःबद्दल जेव्हा सांगितले की मी राजकारणी माणूस नाही, मी धार्मिक वृत्तीचा माणूस आहे, तेव्हा त्याचा अर्थ असा की त्यांच्या भव्य कार्यामागे त्यांची धार्मिकता, म्हणजेच नैतिकता, मनुष्यत्व आणि आंतरिक शुद्धी होती. धार्मिक वृत्तीमुळे माणसाचे मीपण कमी होते, टोकदार अहंकार बोथट होतो, आणि “मी आणि तू” या भिंती विरघळू लागतात. वी-फिलिंग, सामूहिकता, सामाजिक बांधिलकी ही त्यातूनच जन्मते. जर मीपणा वाढला, तर सामाजिक जीवन नासते.

पुढे वाटचाल करताना आपण हे विसरता कामा नये की टीव्हीवर दिसणारी काही माणसे म्हणजे अखंड भारतीय समाज नव्हे. सामान्य माणूस, त्याच्या आतल्या वेदना, संघर्ष, इच्छा, असुरक्षितता, हीच खरी समाजाची मूळ जमीन आहे. सामान्य माणूस विसरला, की एलिटिझम वाढतो. आपले आकलन मोठ्या प्रमाणात एलिटिस्ट झाले आहे. पण खालून वर येणारा दृष्टिकोन महत्त्वाचा आहे. मला या देशाबद्दल काय वाटते, माझ्या समाजाला काय वाटते, हे महत्त्वाचे आहे. धर्म हा चिकित्सेच्या बाहेर नाही. आज देवळांमध्ये प्रचंड गर्दी दिसते. ही श्रद्धा नसून अनेकदा असुरक्षितता, भय, अनिश्चितता यांचे प्रतिबिंब असते. माणूस अलौकिक शक्तीचा आधार शोधतो, पण ती मनाची शुद्धी नसते; ती अनेकदा विकृत मनोवृत्ती असते.

म्हणून धारणा बदलणे, वृत्ती बदलणे, प्रवृत्ती बदलणे आणि सुसंस्कृत माणसाची उंची काय असते, हे समजून घेणे गरजेचे आहे. बाबासाहेब म्हणतात, मी जिथे जाईन तिथे काट्यासारखा बोचत राहीन. ढेकळासारखा विरघळून जाणारा मी नाही. दगडासारखा आहे; पाणी त्याच्यावर कितीही आदळले तरी त्याला फारसा परिणाम होत नाही. आपल्यालाही व्यवस्थेला तसेच सांगता आले पाहिजे. परिस्थिती कितीही विकट असली, तरी हात टेकणे उपयोगाचे नाही. धम्म ही प्रचंड ताकद आहे.

अर्थकारणासाठी लढे द्यावे लागतील. राजकारणामध्ये नवी समीकरणे तयार करावी लागतील. व्यापक दृष्टिकोनाशिवाय राजकारण चालणार नाही, हे बाबासाहेबांनी स्पष्ट केले होते. मतांचे राजकारण नव्हे, लोकसंख्येचे आणि व्यापक सामाजिक गठबंधनाचे राजकारण आवश्यक आहे. जातीच्या पातळीवर निवडणुका लढवून यश मिळणार नाही. आपले मित्र कोण, आपले शत्रू कोण, याचे व्यापक आकलन हवे. जात आणि वर्ग यांचा संबंध समजून घ्यावा लागेल. जात वर्गामध्ये रूपांतरित झाली, तरच राजकारण गतिमान होते. जातीमध्ये अडकलेला रथ पुढे जात नाही.

आज आपले सामाजिक बांधव कोण, हे अचूक ओळखणे आवश्यक आहे. पूर्वी शेड्युल कास्ट फेडरेशनमागे बाबासाहेबांचा व्यापक वर्गनिर्मितीचा विचार होता. पण जातींची भावना इतकी टोकदार झाली की आपणच आपल्यात भांडत राहिलो. एकमेकांना शिव्या देत राहिलो. “हे महार-हे मांग” अशा पातळीवर अडकून राहिलो, तर रथ मागेच राहील. म्हणून प्रागतिक राजकारण करायला शिका. कोणाची गुलामी पत्करू नका. समतेचे राजकारण करा. कोणाच्याही पायावर डोके ठेवू नका. असे केले, तर ताठ मानेने राजकारण करता येईल. आपला प्रतिनिधी निवडून आला, तरी प्रेशर ग्रुप म्हणून, दबाव गट म्हणून आपली कामे करून घेता येतील. पण त्यासाठी नेतृत्वात कौशल्य हवे.

नेतृत्वाचा अभाव झाला, की गोंधळ माजतो. सामान्य माणूस भरकटतो, इकडे तिकडे धावतो, एकमेकांना नावं ठेवू लागतो. आपला समाज विकला जाणारा समाज आहे, अशी वरच्या स्तरावरील लोकांची समजूत आहे. ती समजूत मोडून काढली पाहिजे. नाहीतर “हा समाज विकतो” हा समज बळकट होत राहील. आणि मग आपण आंबेडकरवादी राहणार नाही. हे एका व्याख्यानात संपत नाही. यासाठी वारंवार सभा, प्रबोधन, लोकशिक्षण, लोकचळवळी, आणि त्यासाठी किंमत द्यायला तयार होणारे माणसे निर्माण करावी लागतील.

अशा प्रकारची माणसे आपण आपल्या समाजात निर्माण करू शकलो, तर भविष्यकाळ उज्ज्वल असेल. पुढच्या पिढीला गुणी, सक्षम, प्रगल्भ असा वारसा देता येईल. मी स्वतःही विविध ठिकाणी, विविध संघटनांमध्ये, पक्ष कोणताही असो, नेता कोणीही असो, माझ्या समाजाचे काही चाललेले असेल तिथे जात आलो, ऐकत आलो, गरज वाटली तर सूचना केली, गरज पडली तर बोललो. आपण शहाणे, समजूतदार, प्रज्ञावान आणि माणूस म्हणून तेजस्वी व्हावे, हीच व्यक्तिगत इच्छा आहे. आणि सामाजिक जीवनात बाबासाहेबांना अभिप्रेत असलेला मिलिटंट धम्म या देशात निर्माण करण्यासाठी आपण आपले योगदान द्यावे, हीच अपेक्षा आहे.

शुक्रवार, २१ ऑगस्ट, २०२६

सर्व महामानवांच्या सामर्थ्याची बेरीज म्हणजे भारत: डॉ. श्रीपाल सबनीस

लोकशिक्षक बाबा भारती पुरस्कार प्रदान सोहळ्याला मोठा प्रतिसाद

शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांना ‘लोकशिक्षक बाबा भारती जीवन गौरव’ पुरस्कार प्रदान करताना ज्येष्ठ विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस. सोबत (डावीकडून) डॉ. पांडुरंग भोसले, डॉ. रणधीर शिंदे, डॉ. एन.डी. जत्राटकर, महेंद्र भारती, डॉ. संजय थोरात आणि डॉ. आलोक जत्राटकर.

लोकशिक्षक बाबा भारती पुरस्कार प्रदान सोहळ्यात बोलताना ज्येष्ठ विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस. सोबत (डावीकडून) डॉ. पांडुरंग भोसले, डॉ. रणधीर शिंदे, डॉ. एन.डी. जत्राटकर, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजनीश कामत, महेंद्र भारती, डॉ. संजय थोरात आणि डॉ. आलोक जत्राटकर.




कोल्हापूर, दि. २१ ऑगस्ट: भारत हा कोणत्याही एका महामानवाचा, एका धर्माचा किंवा एका विचारपरंपरेचा नाही. बुद्ध, महावीर, संत ज्ञानेश्वर, महात्मा फुले, महात्मा गांधी, आगरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, कर्मवीर भाऊराव पाटील, अण्णाभाऊ साठे अशा सर्व महामानवांच्या मानवतावादी सामर्थ्याची बेरीज म्हणजे भारत आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष तथा ज्येष्ठ विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस यांनी आज केले.

पुणे येथील लोकशिक्षक बाबा भारती प्रतिष्ठानतर्फे येथील शाहू स्मारक भवनात आयोजित पुरस्कार वितरण समारंभात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांना ‘लोकशिक्षक बाबा भारती जीवन गौरव पुरस्कार’ आणि ज्येष्ठ समाजशास्त्रज्ञ डॉ. एन.डी. जत्राटकर आणि ज्येष्ठ पत्रकार, लेखक डॉ. संजय थोरात यांना ‘लोकशिक्षक बाबा भारती शिक्षक प्रतिभा पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.

डॉ. सबनीस म्हणाले, भारतीय संस्कृतीची निर्मिती केवळ एका जातीत, धर्मात किंवा अभिजन-बहुजनांच्या कोणत्याही एका समूहात झालेली नाही. सर्व जाती-धर्म, आदिवासी समाज, अभिजनांचे ज्ञान, बहुजनांचे श्रम आणि सामान्य माणसाचे योगदान यांतून भारतीय संस्कृती घडली आहे. त्यामुळे कोणत्याही एका विचाराला वगळून भारताचा समग्र विचार करता येणार नाही. 

बाबा भारती हे समन्वय, समता आणि संवादाचे प्रतीक

बाबा भारती यांच्या विचारांचे विवेचन करताना डॉ. सबनीस म्हणाले, बाबा भारती बौद्ध विचारांशी निष्ठावान असले तरी एका धर्माच्या चौकटीत अडकले नाहीत. बुद्ध धम्म, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, मार्क्सवाद, गांधीवादी विचार यांसह विविध ज्ञानपरंपरांचा त्यांनी चिकित्सक अभ्यास केला. विविध विचारांमधील मानवकल्याणकारी मूल्यांचा समन्वय साधणे ही त्यांची भूमिका होती. लोकशिक्षक बाबा भारती प्रतिष्ठानने त्यांची हीच समन्वयवादी भूमिका पुढे नेत विविध जातिधर्मांतील आणि सामाजिक क्षेत्रांत कार्य करणाऱ्या मानवतावादी दृष्टीच्या व्यक्तीमत्त्वांचा गौरव केला आहे, ही अभिमानाची बाब आहे. 

‘कुलगुरूंना बाबा भारती पुरस्कार मिळणे विशेष आनंदाचे’

शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांना बाबा भारती जीवनगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल विशेष आनंद व्यक्त करताना डॉ. सबनीस म्हणाले, “अनेक वर्षांत अनेक पुरस्कार दिले; मात्र एका कुलगुरूंना बाबा भारतींच्या नावाचा जीवनगौरव पुरस्कार प्रदान करताना मला विशेष धन्यता वाटते. डॉ. कामत यांच्या मनोगतात जातिधर्मभेदापेक्षा ज्ञानाला दिलेले महत्त्व स्पष्टपणे जाणवते. शिवाजी, ज्ञानेश्वर आणि बुद्ध यांच्या विचारांचा समन्वय करणारे कुलगुरू म्हणून डॉ. कामत यांची भूमिका उल्लेखनीय असल्याचे सांगितले.

शिवाजी विद्यापीठातील पाली भाषेच्या अभ्यासक्रमाला बाबा भारतींचे नाव देण्याबाबत विचार व्हावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

यावेळी मराठी अधिविभागाचे प्रमुख डॉ. रणधीर शिंदे यांनी बाबा भारती यांच्या कार्याचा गौरव करताना, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेत त्यांनी पाली भाषा, बौद्ध वाङ्मय आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी आयुष्यभर केलेले कार्य अतुलनीय असल्याचे सांगितले. १९८७ मध्ये प्रकाशित झालेला सुमारे २५ हजार शब्दांचा पाली-मराठी शब्दकोश हे त्यांच्या कार्याचे शिखर असून, पाली भाषेचा आणि बौद्ध वाङ्मयाचा विस्मृतीत गेलेला समृद्ध वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण काम त्यांनी केले, असे त्यांनी नमूद केले. कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांच्या शैक्षणिक नेतृत्वाचा उल्लेख करताना, संशोधन, तंत्रज्ञान, डिजिटल युगातील आव्हाने आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या संक्रमणकाळात त्यांनी विविध महत्त्वाच्या शैक्षणिक संस्थांचे नेतृत्व केले असून शिवाजी विद्यापीठाच्या ज्ञान, संशोधन व शिक्षणाच्या समृद्ध परंपरेला आधुनिक काळात पुढे नेण्याचे कार्य ते करीत असल्याचे डॉ. शिंदे यांनी सांगितले. चांगला शिक्षक, संशोधक, विचारवंत आणि लेखक आपल्या कार्याचा गंध दीर्घकाळ समाजात टिकवून ठेवतो आणि अशा कर्तृत्वाची स्मृती जिवंत ठेवण्याचे काम पुरस्कारांच्या माध्यमातून होते, असेही त्यांनी नमूद केले.

पुरस्काराला उत्तर देताना शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांनी लोकशिक्षक बाबा भारती यांच्या कार्याचा गौरव करताना, पाली-मराठी शब्दकोशाच्या माध्यमातून त्यांनी बुद्धांचे तत्त्वज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे अतुलनीय कार्य केले असल्याचे सांगितले. हा शब्दकोश केवळ शब्दांचा संग्रह नसून ज्ञानाचे लोकशाहीकरण करणारा आणि सामान्य माणसाला मूळ बुद्धविचारांशी जोडणारा महत्त्वपूर्ण सेतू असल्याचे त्यांनी नमूद केले. ज्ञान हे विद्यापीठे आणि ग्रंथालयांच्या चौकटीत मर्यादित न राहता समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचले पाहिजे, हीच लोकशिक्षकाची खरी भूमिका असल्याचे स्पष्ट करत त्यांनी शिक्षकापेक्षा लोकशिक्षक बनण्याचे मोठे सामाजिक दायित्व अधोरेखित केले. नव्या पिढीशी केवळ वर्गखोल्यांतून नव्हे, तर त्यांच्या मनाशी व हृदयाशी संवाद साधत ज्ञानाचा वारसा पुढे नेण्याची आवश्यकता व्यक्त करत, बाबा भारती यांच्या नावाने मिळालेला हा जीवनगौरव सन्मान आपण कृतज्ञतेने स्वीकारत असून शिवाजी विद्यापीठाच्या सामाजिक बांधिलकीला अधिक सक्षमपणे पुढे नेण्यासाठी प्रयत्नशील राहू, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

यावेळी प्रमुख अतिथी डॉ. आलोक जत्राटकर यांच्यासह पुरस्कारप्राप्त डॉ. एन.डी. जत्राटकर आणि डॉ. संजय थोरात यांनीही मनोगते व्यक्त केली. प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेंद्र भारती यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रांजली क्षीरसागर यांनी सूत्रसंचालन केले, तर प्राचार्य डॉ. पांडुरंग भोसले यांनी आभार मानले.

कार्यक्रमाला विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील, डॉ. हरिष भालेराव, डी.जी. भास्कर, डॉ. किसनराव कुराडे, डॉ. जी.बी. अंबपकर, अनिल म्हमाणे, डॉ. कैलास सोनवणे, डॉ. प्रभंजन माने, डॉ. मानसिंग टाकळे यांच्यासह शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुरूषोत्तम सदाफुले, विनायक ठोंबरे, अजित पाटील, मल्हार जोशी, आनंदा कांबळे, प्रकाश कांबळे, सचिन कांबळे, आर.के. कांबळे, आप्पा देशमुख, विजय कांबळे, हंबीरराव पाटील, रमेश ढाले, रविंद्र भारती, निमिष भारती, शार्दूल भारती, जय भारती, अमोल ढाले, राजरत्न गाडे आणि अभिजीत भोसले यांनी संयोजन केले.



बुधवार, ५ ऑगस्ट, २०२६

डी.वाय. दादांचं मोठेपण अधोरेखित करणारी ‘ती’...

 

पद्मश्री डॉ. डी.वाय. पाटील यांचे अंत्यदर्शन घेऊन श्रद्धांजली वाहताना डॉ. आलोक जत्राटकर


 

एखादी व्यक्ती जाते, तेव्हा तिच्या पद, पैसा आणि प्रतिष्ठा यावरुन तिच्या मृत्यूचे मोल ठरवले जाते; पण, त्यापेक्षाही अधिक तिने माणसे किती आणि कशा प्रकारे जोडली, हा निकष सर्वात मोठा आणि महत्त्वाचा असतो. 

शिक्षण महर्षी पद्मश्री डॉ. डी.वाय. पाटील आज अनंतात विलीन झाले. तत्पूर्वी, सकाळी त्यांच्या पार्थिव देहाचे अंतिम दर्शन घेऊन श्रद्धांजली वाहण्यासाठी कुलगुरू डॉ. राजनीश कामत, प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव आणि कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांच्यासह डॉ. पाटील यांच्या यशवंत निवास येथे गेलो होतो. देशभरातील मान्यवरांसह स्थानिक नागरिकांचीही आपल्या या लाडक्या व्यक्तीमत्त्वाचे अंतिम दर्शन घेण्यासाठी रीघ लागली होती. त्या गर्दीमध्ये आमच्या पुढे एक वृद्ध स्त्री चालली होती. पाठीला मोठे कुबड, कमरेत वाकलेली, हातात काठी, गरीबपण दाखवणारी अंगावरील साडी... बारीक रिपरिप पाऊस पडून गेल्यानं कधी काठी घसरायची, तर कधी अनवाणी पावलं... त्या वृद्धेकडं ना कोणाचं लक्ष होतं, ना ती कोणाची भीड बाळगून होती... तिचं लक्ष्य एकच होतं, ते म्हणजे आदरणीय दादांचं अंतिम दर्शन घ्यायचं. ती एकेक पाऊल जपून पण निर्धारानं टाकत निघाली होती. आम्ही गतीनं तिच्या पुढं निघून गेलो, पण या क्षणापर्यंत माझं मन तिच्यापाशीच रेंगाळतंय. 

अशी कोणती ऊर्मी असेल की ज्यामुळं ती दादांना अखेरचं पाह्यचं म्हणून आली असेल? दादांनी तिला अशी कोणती मदत केली असेल? तिच्या नवऱ्याला काही मदत केली असेल की तिच्या मुलाला कुठं नोकरीला लावून दिलं असेल? की, दादांच्या चांगुलपणाच्या गोष्टी ऐकून या माणसाला शेवटचं एकदा पाहायला हवं, असं तिच्या मनाला वाटलं असेल. स्वतः इतक्या असहाय्य अवस्थेत असूनही त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी येण्याचं बळ तिला कुठल्या गोष्टीनं दिलं असावं? असे एक ना अनेक प्रश्न मनात उठत राहिले... 

तिचा हा विचार करत असताना दुसरीकडं, दादांनीही तिच्यासमवेत नेकी करून ती केव्हाच दर्यामध्ये विसर्जित केली असेल. असं कित्येकांच्या बाबतीत त्यांनी केलं आहेच. गेले दोन दिवस त्यांच्या औदार्याच्या, दिलदारपणाच्या आणि माणूसपणाच्या कित्येक गोष्टी वाचत आहे, ऐकत आहे. त्यामध्ये अशा न सांगितलेल्या, न बोलल्या गेलेल्या, माहिती नसलेल्या चांगुलपणाच्या किती तरी गोष्टी असतील, ज्या केवळ आता त्यांच्या लाभार्थ्यांच्याच मनात रेंगाळत राहतील. त्यापैकीच ती एखादी असावी... 

त्या समग्र मान्यवरांच्या, प्रतिष्ठितांच्या मांदियाळीत त्या वृद्धेचं येणं माझ्या दृष्टीनं मोलाचं होतं. अशी कित्येक मंडळी त्या गर्दीत असतील. कदाचित, उद्या त्यांची नावं कुठल्या पेपरात छापून येणार नाहीत, की कोणी त्यांची दखल घेणार नाहीत. हजारोंच्या समुदायाचं एकक म्हणूनच कदाचित ती कायम गर्दीचीच ओळख अधोरेखित करीत राहतील. पण, हीच ती खरी मंडळी असतात, ज्यांच्या डोळ्यांत गेलेल्या माणसाच्या चांगुलपणाप्रती कृतज्ञतेचा एकेक अश्रू ओघळलेला असतो आणि हे अश्रूच माणसाला अमरत्व बहाल करत असतात. 

जिवंतपणी एखादा माणूस ओढूनताणून, धाकदपटशा करून त्याला हवं ते सारं मिळवेलही, पण गेल्यानंतर प्रजेकडून त्याला असं प्रेम मिळायचं नाही... आदरणीय डी.वाय. दादा यांचं नाव या प्रेम मिळवणाऱ्यांच्या यादीत समाविष्ट झालं आहे... त्यांना पुनश्च एकदा भावपूर्ण श्रद्धांजली!

सोमवार, ३ ऑगस्ट, २०२६

माणूस पेरणारा लोकसाहित्यिक अण्णा भाऊ साठे



शिवाजी विद्यापीठात अण्णा भाऊ साठे अध्यासनामार्फत आयोजित परिसंवादात बोलताना डॉ. आलोक जत्राटकर. मंचावर (डावीकडून) डॉ. मेघा पानसरे, डॉ. गिरीष मोरे व डॉ. अंबादास सकट.


अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शिवाजी विद्यापीठाच्या लोकशाहीर अण्णा भाऊ साठे अध्यासनामार्फत आयोजित परिसंवादात बोलण्याची संधी मिळाली, ती सुद्धा ज्येष्ठ विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस, डॉ. गिरीष मोरे, डॉ. शरद गायकवाड, डॉ. अक्षय सरवदे, डॉ. मेघा पानसरे यांच्यासारख्या दिग्गजांसमोर... हा केवळ एका साहित्यिकावर बोलण्याचा कार्यक्रम नव्हता; तर माणूसपण, समता आणि सांस्कृतिक संघर्षाचा अर्थ नव्याने समजून घेण्याचा एक विलक्षण अनुभव होता....
अण्णाभाऊ साठे यांचं साहित्य वाचताना प्रत्येक वेळी एक नवीन अण्णाभाऊ भेटतात. विद्यार्थी दशेत त्यांच्या कथा "गोष्ट" म्हणून वाचल्या; पण आज त्याच कथा वाचताना प्रत्येक वाक्यामागचा विचार, प्रत्येक प्रतिमेमागची सामाजिक जाणीव आणि प्रत्येक पात्रामागचं माणूसपण अधिक गहिरं होत जातं.
१९५८ च्या दलित साहित्य संमेलनातील त्यांचं ते ऐतिहासिक विधान आजही अंतर्मन हलवून जातं— "पृथ्वी शेषनागाच्या फण्यावर नव्हे, तर दलितांच्या तळहातावर तरलेली आहे." हे केवळ घोषवाक्य नव्हतं; तर त्यांच्या संपूर्ण साहित्याचं सार होतं. अण्णाभाऊंनी मनोरंजनासाठी लेखन केलं नाही. त्यांनी मानवमुक्ती, स्वाभिमान आणि समतेचा सांस्कृतिक घोष आपल्या लेखणीतून आविष्कृत केला.
त्यांच्या भाषेचं सौंदर्य अद्वितीय आहे. "एक ऊस मांडीएवढा," "सह्याद्रीचे दोन कडे एकमेकांकडे तोंड करून उभे होते," "तापलेल्या तव्यावरनं थेंब उडून जावा तसं पाणी आटलं होतं," किंवा "एखाद्या फौजदाराने कैद्याला बडवावं तसा पाऊस बडवत होता"— ही फक्त वर्णनं नाहीत; तर जीवन जगलेल्या माणसाच्या अनुभवातून आलेल्या जिवंत प्रतिमा आहेत. दीड दिवस शाळेत गेलेल्या लेखकाची निरीक्षणशक्ती किती विलक्षण असू शकते, याचा हा प्रत्यय आहे.
अण्णाभाऊंच्या साहित्याची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्यांनी माणसाला त्याच्या जातीने नाही, तर त्याच्या माणूसपणाने पाहिलं. फकीरामधील विष्णुपंत कुलकर्णी असो, वारणेचा वाघमधील सत्तू भोसले असो किंवा अन्यायाविरुद्ध उभं राहणारं कोणतंही पात्र— अण्णाभाऊंच्या लेखणीत न्यायाला जात नसते. अन्यायाविरुद्ध उभं राहणारा प्रत्येक माणूस त्यांचा नायक असतो.
आज आपण सिनेमॅटिक युनिव्हर्सबद्दल बोलतो; पण अण्णाभाऊंनी अनेक दशकांपूर्वी त्यांच्या कथा-कादंबऱ्यांमधून पात्रांचं एक सशक्त विश्व उभं केलं होतं. त्यांच्या प्रत्येक कथेत दृश्यात्मकता आहे. म्हणूनच त्यांच्या साहित्यावर अनेक चित्रपट निर्माण झाले आणि आजही नवीन पिढीला त्यांचं साहित्य पडद्यावर आणण्याची प्रेरणा मिळते.
अण्णाभाऊंचं साहित्य म्हणजे फुले-आंबेडकरी विचारांचा लोकभाषेतील सांस्कृतिक आविष्कार आहे. धर्मचिकित्सा, लोकशिक्षण, स्त्री-पुरुष समता, आंतरजातीय संबंधांची प्रतिष्ठा, श्रमिकांचा सन्मान, संसाधनांचं न्याय्य वाटप आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माणूसपण— ही त्यांच्या साहित्याची मूलभूत मूल्यं आहेत.
"जग बदल घालुनी घाव, सांगुनी गेले मला भीमराव..." या ओळीतील "घाव" हा माणसावर नाही; तर जातिव्यवस्थेवर, अंधश्रद्धेवर, विषमतेवर आणि माणुसकी नाकारणाऱ्या मानसिकतेवर आहे. म्हणूनच अण्णाभाऊंच्या साहित्यामध्ये विद्रोह आहे; पण द्वेष नाही. संघर्ष आहे; पण हिंसेचं समर्थन नाही. अन्यायाविरुद्धचा प्रखर आवाज आहे; पण त्याचबरोबर न्याय, आशावाद आणि परिवर्तनाची अढळ श्रद्धाही आहे.
त्यांच्या स्त्री पात्रांकडे पाहिलं तर ती दया मागणारी नाहीत. ती स्वाभिमानी आहेत, निर्णय घेणारी आहेत, अन्यायाला विरोध करणारी आहेत. अण्णाभाऊ स्त्रीला वस्तू म्हणून पाहत नाहीत; तर स्वतंत्र व्यक्तिमत्त्व म्हणून तिची प्रतिष्ठा जपतात.
स्मशानातलं सोनं असो किंवा आवडी, फकीरा, वारणेचा वाघ, वैजयंता, माकडीचा माळ— प्रत्येक साहित्यकृती समाजाच्या अंतरंगात डोकावणारी आहे. प्रत्येक कथा उपेक्षित माणसाचा आवाज बनते.
आणि त्यांच्या अनेक कथांत डोकावणारं एक अप्रतिम वाक्य...
"जमीन इतकी सुपीक की माणूस पेरला तरी उगवून येईल."
हे वाक्य फक्त जमिनीचं वर्णन नाही. ती अण्णाभाऊंच्या संपूर्ण साहित्याची जीवनदृष्टी आहे. त्यांनी माणूसपण पेरलं... समतेची बीजं पेरली... स्वाभिमानाची मशागत केली... आणि संघर्षाच्या उन्हात त्या विचारांना वाढवलं.
बाबासाहेबांनी विचारांची बीजं पेरली; अण्णाभाऊंनी त्या बीजांना लोकभाषेची माती, लोककलेचं पाणी आणि संघर्षाचं ऊन दिलं. म्हणूनच त्यांचं साहित्य पुन्हा पुन्हा वाचावं लागतं. प्रत्येक वाचनात नवा अर्थ सापडतो, नवा विचार उगवतो आणि नव्याने माणूस होण्याची प्रेरणा मिळते.
अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे त्यांचं साहित्य वाचणं, त्यातील माणूसपण समजून घेणं आणि समतेचा विचार आपल्या आचरणात उतरवणं होय.
(परिसंवादातील भाषणातून)