सोमवार, ८ एप्रिल, २०१३

निखळ-६ : डेथ फॅसिनेशन!





(शतशः धन्यवाद!
या सदरातील माझ्या मागील तिसरा मृत्यू!’ या लेखाबद्दल अनेक वाचकांनी मला आवर्जून प्रतिक्रिया दिल्या. काहींनी फोन केले तरी कित्येकांनी एसएमएस! सामाजिक संवेदनशीलतेचं अतिशय हृदयस्पर्शी दर्शन यातून घडलं. काहींनी आपले अनुभव शेअर केले. माझ्या लेखनातून इतर काही साध्य झालं नाही तरी ही संवेदनांची देवाण-घेवाण होणं मात्र मला निश्चितपणे अभिप्रेत आहे. ते आपल्या सहृदयतेचं, सजगतेचं प्रतीक आहे. सामाजिक जाणीवांचा जागर असाच प्रवाहित राहो. आपलं प्रेम पाहून त्याबद्दल आभार मानल्यावाचून राहवत नाही. शतशः धन्यवाद!)


माझा मागचा लेख वाचून अनेक वाचक मित्रांकडून उत्स्फूर्त प्रतिक्रिया आल्या. तुमचे मृत्यूलेख वाचण्यासारखे असतात. मनाला स्पर्शून जातात. असा सर्वसाधारण सूर होता. एखाद्या व्यक्तीविषयी मनाच्या गाभाऱ्यातून जे कागदावर उतरतं, ते इतरांच्या मनालाही भिडल्याशिवाय राहात नाही, असा माझा अनुभव आहे. माझ्या बाबतीत सांगायचं झालं, तर जन्मापेक्षाही मृत्यूची मला अधिक अपूर्वाई आहे कारण त्यामध्ये अधिक व्हेरिएशन, विविधता आहे.
नववीत भूमितीमध्ये शिकलो- दोन बिंदू एक रेषा निश्चित करतात आणि एक प्रतल सुद्धा! आयुष्याचंही तसंच आहे. जन्म आणि मृत्यू हे दोनच महत्त्वाचे बिंदू. त्यांना जोडणारी आयुष्यरेषा आणि त्यांना समावून घेणारा जीवन नावाचा प्रतल. पण, इतकं साधं सरळ मांडता आलं, तर ते आयुष्य कसलं? म्हणूनच म्हणतो की, आय ॲम फॅसिनेटेड बाय डेथ बिकॉझ ऑफ इट्स व्हेरिएशन्स!’ जन्माच्या प्रक्रियेमध्ये ही विविधता नाही. फार तर स्थळ, काळाचा अन् वेळेचा फरक पडू शकतो. ज्योतिषांनी तर बारा राशींमध्येच त्याची विभागणी करून टाकली आहे. एखाद्या बाळाचा जन्म बसमध्ये, रेल्वेत झाला, तर त्याची चौकटीची एखादी बातमी छापून येऊ शकते. पण मरणाचं मात्र तसं नाही. त्यात कितीतरी प्रकारचं वैविध्य आहे. पाहा ना, अपघात, घातपात, खून, हत्या, वध, आत्महत्या, अगदी नैसर्गिक मृत्यूमध्ये सुद्धा स्थलकालसापेक्ष वैविध्य आहेच. आणि या उल्लेखलेल्या प्रत्येक प्रकारात सुद्धा पुन्हा आणखी वैविध्य आहे. केवळ अपघात झाला, एवढं म्हणून भागत नाही. त्या अपघातांतही वैविध्य आहे. म्हणूनच तिथं कहाणी आहे, न्यूज आहे. मानवी आयुष्याच्या पर्वसमाप्तीची उद्घोषणा या बिंदूमुळं होते. मानवी शरीराचं भौतिक आस्तित्व संपुष्टात येणं, या गोष्टीशी अनेक व्यक्तींच्या, समूहांच्या भावभावना निगडित असतात. तिथं कारुण्य आहे, दुःख आहे, धक्का आहे, चटका आहे. आपण सारेच इहवादी असल्यानं बुद्धाच्या निर्मळ मोक्षप्राप्तीचा आनंद मिळण्याला मात्र आपण पारखे (अपात्र म्हणा हवं तर!) असतो. मरणारा अगदीच वयस्कर किंवा आजारी असेल तेव्हा फार तर सुटला (किंवा सुटली) बिचारा!’ असा एक सुस्कारा सोडण्यात येतो, पण आनंद नाही. दैनिकात काम करत असताना एखाद्याच्या निधनाचा उल्लेख करताना दुःखद निधन असा करायचो. तेव्हा आमच्या सुरेश गुदलेंनी मला समजावलं होतं, अरे, निधन हे नेहमी कोणासाठी तरी दुःखदच असतं. अमूक-अमूक यांचं सुखद निधन झालं, असं कधी ऐकलंयस का?’ मला पटलं ते! तेव्हापासून एडिट करताना निधनाच्या बातमीतील दुःखद या शब्दावर कात्री चालवून मी माझं संपादन सुखद करत असे.
माझ्या मते, मृत्यू ही एक सीमारेषा निश्चित करत असते. ही सीमारेषा असते चैतन्याच्या आस्तित्वाची आणि चैतन्यहीनतेची! पाहा नं, आजोबा, घरी बरे होऊन येतील, हेच वाक्य त्यांचं निधन झाल्यानंतर बॉडी आणताहेत घरी, असं बदलून जातं. आजोबा संबोधनाचं एकदम बॉडीमध्ये रुपांतर होतं, म्हणजे नेमकं काय होतं? असतं ते काय आणि जातं म्हणजे तरी नेमकं काय? मला वाटतं, जन्मानंतरचा पहिला श्वास आणि अखेरचा श्वास यांच्या दरम्यान चैतन्याचा अखंड प्रवाह जो निसर्गानं, निर्मिकानं या पंचमहाभूतांनी बनलेल्या देहामध्ये खेळवलेला आहे, तो थांबणं म्हणजे मृत्यू आहे. असो! तो आध्यात्माचा विषय झाला.
एखाद्याच्या मृत्यूमागं काहीच कहाणी नाही, असं होऊच शकत नाही. माणूस कसा जगला, त्याचं संचित, गोतावळा आणि त्याचं मरण या सर्वांचा कार्यकारणभाव त्या कहाणीत एकवटलेला असतो. त्या व्यक्तीच्या मृत्यूला अधिष्ठान प्राप्त करून देण्याचं काम त्या कहाण्या करत असतात. माझ्या मनाला अतिशय चटका लावणारा मृत्यू होता तो म्हणजे कोल्हाट्याचं पोर लिहिणाऱ्या डॉ. किशोर शांताबाई काळे यांचा! डॉक्टरीचं आपलं ज्ञान तळागाळातल्या, गावकीबाहेरच्या भटक्या-विमुक्तांसाठी वापरणाऱ्या या डॉक्टरचा वयाच्या ३७व्या वर्षी सन २००७मध्ये अपघाती मृत्यू झाला. ते प्रवास करत असलेल्या रुग्णवाहिकेचा टायर फुटून ती उलटली, डॉक्टरांच्या मेंदूत रक्तस्राव झाला, उपचारांना प्रतिसाद न देता ते मरण पावले. वाईट म्हणजे, ज्या शांताबाईच्या आयुष्याला न्याय देण्यासाठी डॉक्टरांनी आवाज उठवला, पुन्हा त्या शांताबाईच्या आयुष्याची या समाजात परवडच झाली. तेच पुस्तक विकून त्या माऊलीला दिवस काढावे लागताहेत. म्हणजे आयुष्यभर संघर्ष वाट्याला आलेल्या डॉक्टरांच्या नशीबी तसाच मृत्यू का असावा? त्यांच्या आईला तशाच संघर्षरत आयुष्याचा सामना का करावा लागावा? सारंच अनाकलनीय.
मृत्यूनंतरही कित्येकदा अशी परवड एखाद्याच्या मृतदेहालाही सोसावी लागते. सन २००५च्या अतिवृष्टीमुळं कोल्हापुरात पंचगंगेला आलेल्या महापुरामुळं हायवेवर प्रचंड वाहतूक कोंडी झालेली होती. त्यात एक शववाहिनी अशीच अडकलेली. पुढे रस्ता पुरानं अडवलेला तर मागे वाहनांनी. दोन दिवस लागले, ते वाहन मागे फिरवायला. त्यातला मृतदेह आणि नातेवाईक दोहोंचेही हालहाल झाले.
मला वाटतं, पत्रकारितेमध्ये जसे सहा कारांचे प्रश्न महत्त्वाचे, तेच मृत्यूच्या कहाणीतही प्रमुख भूमिका बजावतात. या कहाण्यांतून बाकी काही साध्य झालं नाही तरी एक होतं, मागे उरलेल्याचं दुःख निश्चितपणानं हलकं होतं.
मृत्यूलेख लिहिण्याच्या बाबतीत एका व्यक्तीच्या लेखणीची सर अन्य कुणालाही येणार नाही, ती व्यक्ती म्हणजे आचार्य अत्रे! अत्र्यांचे मृत्यूलेख म्हणजे मृत व्यक्तीच्या जीवनकार्याचा एक साद्यंत मर्मस्पर्शी लेखाजोखाच. पंडित नेहरू यांच्याविषयीच्या अग्रलेखांची सूर्यास्त ही मालिका असो, की डॉ. आंबेडकरांच्या निधनानंतरची अग्रलेखांची ओघवती मन-भावनांनी ओथंबलेली मालिका वाचली म्हणजे मी म्हणतो त्याची प्रचिती येईल. इतकंच नव्हे, तर आपला ड्रायव्हर वारला तर माझा बाबू गेला हो.. असा टाहो अत्र्यांनी त्यांच्या अग्रलेखातून फोडला होता. अत्र्यांच्या विनोदी लिखाणाइतकंच, किंबहुना त्याहून अधिक हे लेखन मला जवळचं वाटतं.
शेवटी मृत्यूलेख म्हणजे तरी काय? एखाद्या व्यक्तीनं आपल्या हयातीत जे काही चांगलं केलं त्याचं शब्दरुपानं जतन, वाईटाचं विस्मरण आणि या ठेव्याचं हयात असलेल्यांना स्मरण करून देणं, हेच नव्हे काय?

२ टिप्पण्या: