मंगळवार, २३ एप्रिल, २०१३

निखळ-७ : मृत्यूत्रयी अर्थात ‘ट्रिलॉजी’!



मौत तू एक कविता है,
मुझसे एक कविता का वादा है, मिलेगी मुझको।।
डूबती नब्ज़ों में जब दर्द को नींद आने लगे,
ज़र्द सा चेहरा लिये जब चांद उफक तक पहुँचे
दिन अभी पानी में हो, रात किनारे के करीब,
ना अंधेरा, ना उजाला हो, ना अभी रात ना दिन
जिस्म जब ख़त्म हो और रूह को जब साँस आऐ,
मुझसे एक कविता का वादा है, मिलेगी मुझको।।

मित्र हो, या कवितेत गुलजार यांनी मृत्यूची अटळता अधोरेखित केली आहेच, पण ही अपरिहार्य भेट आपण आत्मियतेनं घेतली पाहिजे, असं सुचवतात. जगात जन्म आणि मृत्यू या दोनच गोष्टी शाश्वत आहेत आणि त्या दोन्ही आपल्या हाती नाहीत. जन्मानं प्राप्त झालेला जगण्याचा अधिकार आपण जसा स्वच्छंद, उन्मुक्त आणि अनिर्बंध उपभोगतो, त्याच पद्धतीनं आपण मृत्यूला सामोरं जाण्यासाठी हरघडी तयार असलं पाहिजे. तो कुठं, कधी, कसा येईल, माहीत नसतं. त्यामुळं या दुसऱ्या शाश्वताचाही स्वीकार करण्यास आपण सदैव तत्पर असलं पाहिजे.
मृत्यूसारख्या नैसर्गिक गोष्टीच्या संदर्भातली उपरोक्त आध्यात्मिकता सांगायला-ऐकायला ठीक आहे. पण, जन्म-मृत्यू या दोन बिंदूंच्या दरम्यान जे भावबंध, पाश, मैत्र, नातेसंबंध निर्माण झालेले असतात, त्यांचं मोल या मर्त्य जगात मोठं आहे, ही गोष्ट आपण कशी काय नाकारू शकणार? त्यामुळं मला मृत्यू अस्वस्थ करतो. मृत्यू हा वाईटच असतो- मरणाऱ्याच्या मागं उरलेल्यांसाठी!
आमच्या विद्यापीठात एक खूप चांगली प्रथा आहे. एखाद्या मोठ्या व्यक्तीच्या निधनानंतर प्रांगणात सर्व वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी, प्राध्यापक गोळा होऊन जशी सर्वत्र श्रद्धांजली वाहिली जाते, तशी ती इथं वाहिली जातेच; मात्र, विद्यापीठात काम करणाऱ्या कोणाही कर्मचाऱ्याचं- अगदी तो शिपाई असो किंवा कंत्राटी कामगार, निधन झाल्यानंतर त्याच दिवशी अगदी कुलगुरूंपासून ते शिपायापर्यंत सर्व अधिकारी-कर्मचारी सिनेट हॉलमध्ये जमतात, त्या व्यक्तीविषयी त्याचे सहकारी आठवणी सांगतात, त्याचे अधिकारी त्याचं चांगलेपण सांगतात आणि दोन मिनिटं उभं राहून श्रद्धांजली वाहतात. निधन झालेल्या व्यक्तीचं स्मरण करण्यासाठी ही दोन मिनिटं जशी महत्त्वाची, तशीच तिथं जमलेल्यांमध्ये विश्वासाचा, माणुसकीचा बंध निर्माण करण्यासाठीही महत्त्वाची ठरतात.
मी इथं नव्यानंच रुजू झाल्यानं प्रत्येक मृत व्यक्तीला व्यक्तिशः ओळखत होतोच, असं नाही. पण या प्रथेमुळं त्यांच्या मृत्यूनंतरही मी त्यांच्याशी जोडला गेलो.
आपल्या एखाद्या सहकाऱ्याप्रती असा आदरभाव जागृत ठेवणं, ही फार मोठी गोष्ट आहे. कामकाजाचं वर्गीकरण हे कामाच्या सोयीसाठी केलेलं असतं आणि त्याखेरीज कोणतीही संस्था उभी राहू शकत नाही. कामकाजाच्या सुरळीतपणासाठीच कुणी अधिकारी आहे तर कुणी शिपाई. पण माणूस म्हणून आपण सर्वजण एकाच पातळीवरचे आहोत, ही जाणीव असणं, खूप महत्त्वाचं असतं. कुणाला यात औपचारिकतेचा भाग वाटत असेलही, पण संबंधित व्यक्तीचं हे माणूसपणाचं मोलच अशा श्रद्धांजली सभांतून जपलं जातं, अशी माझी भावना आहे. मौनाच्या दोन मिनिटांमधील अंतर्मुखताही महत्त्वाची ठरते. ज्याला आपण कधीच पाहिलं नाही, कधीच भेटलो नाही, अशा व्यक्तीच्या निधनानं हृदयात कळ उठणं, त्याच्या मागे राहिलेल्या कच्च्याबच्च्यांसाठी डोळ्यांत अश्रूचा थेंब उभा राहणं, या गोष्टी आपल्या संवेदना जागृत असल्याची साक्ष देतात. त्या जागृत आहेत, तोपर्यंत आपल्या हातून कुणाचंही वाईट होणार नाही, याची खात्री बाळगायला हरकत नाही.
मृत्यू हा तर भौतिक देहाला अखेरचा निरोप असतो. पण एखाद्या कार्यालयात आयुष्यभर सेवा करून निवृत्त होतानाचा क्षणही निवृत्त होणाऱ्यांच्या मनात कालवाकालव करणारा असतो. मंत्रालयात रुजू होऊन एखादं वर्ष झालं असावं, तेव्हाचा प्रसंग! माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या वृत्त शाखेत एक महिला शिपाई होत्या- सावंत बाई! नऊवारी नेसणाऱ्या सावंत बाईंचं राहणीमान साधं, नीटनेटकं! आपण भलं की आपलं काम भलं, असा शांत स्वभाव! माझा त्यांच्याशी फारसा संवाद किंवा परिचयही नव्हता. कामाच्या निमित्तानं बोलणं होई तेवढंच! अशा या सावंत बाई एके दिवशी निवृत्त होत असल्याचं मला समजलं. का कोणास ठाऊक, माझ्या आईसारखी ही महिला निवृत्त होत असताना तिला अखेरच्या दिवशी थोडासा दिलासा द्यावासा वाटलं. विभागीय संपर्क कक्षातल्या आमच्या मानेंना सांगून एक पेढ्याचा बॉक्स आणि बुके मागवला. संध्याकाळी सावंत बाईंना बोलावलं आणि त्यांना तो बुके आणि पेढे देऊन त्यांचा सत्कार केला, विचारपूस केली आणि उत्तरायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. सावंत बाईंच्या डोळ्यांत समाधानाचे अश्रू तरळले. मलाही समाधान लाभलं.
पुढं तीन-चार महिन्यांनी पेन्शनच्या कामानिमित्तानं सावंत बाई मंत्रालयात आल्या, तेव्हा त्या आवर्जून मला भेटायला आल्या. भरभरून बोलल्या. आपल्याविषयी, आपल्या कुटुंबाविषयी सांगत राहिल्या. त्यावेळी एक गोष्ट माझ्या लक्षात आली की, आमच्यातलं अधिकारी-शिपाई नातं गळून पडलं होतं. आम्हा दोघांमध्ये निखळ आपुलकीचं, माणुसकीचं नातं प्रस्थापित झालं होतं आणि केवळ त्या बंधामुळंच सावंत बाई माझ्याशी सख्ख्या मुलाप्रमाणं संवाद साधू शकल्या होत्या.
आपल्या आयुष्यात हे जोडलं जाणंच खरं तर खूप महत्त्वाचं आहे. रक्ताच्या नात्याचे बंध कधी कधी विसविशीत होण्याची शक्यता असू शकते; पण असे जोडलेले, विणलेले माणुसकीचे, मैत्रीचे बंध आपल्याला अखेरच्या क्षणापर्यंत साथसंगत करतात. आपल्या जाण्यानं त्यांच्या डोळ्यांत उभ्या राहणाऱ्या दोन सच्च्या थेंबांतच मोक्ष आहे. त्यामुळं मौत ही तर कविता खरीच! ती आपली होणारच, पण तिची वाट पाहतानाच जीवनालाही माणुसकीच्या नात्यानं भेटत राहण्यात सुद्धा काव्य दडलंय, हेही आपण जाणायला हवं.

२ टिप्पण्या: