गुरुवार, ९ मे, २०१३

निखळ-८ :वुई आर बीईंग वॉच्ड!



काही दिवसांपूर्वी माझ्या एका हितचिंतक सहकाऱ्याचा मला फोन आला. मी माझं फेसबुक अकाऊंट बंद करून टाकलंय. तू सुद्धा तुझं फेसबुक अकाऊंट तातडीनं बंद कर. वुई आर बीईंग वॉच्ड. त्या सहकाऱ्यानं अगदी सद्हेतूनं फोन केला, याबद्दल शंका घेण्याचं काही कारण नव्हतं, पण फेसबुकचं अकाऊंट काही कारण नसताना, कोणीतरी वॉच ठेवून आहे, म्हणून बंद करावं, हे काही मला पटेना. मी त्याला म्हटलं, काही लोक लक्ष ठेवून आहेत, म्हणून मी अकाऊंट बंद करावं, असं काही मला वाटत नाही. त्यांना त्यांचं काम करू दे, माझं मी करतो. त्यांच्यासाठी माझ्या मित्रांशी संपर्कात ठेवणाऱ्या या उत्तम (आणि फुकट) सुविधेचं द्वार बंद करावं, असंही वाटत नाही. यावर त्यानं सबुरीचा सल्ला आणखी एकदा देऊन फोन ठेवला.
आजच्या व्हर्चुअल रिॲलिटीच्या, सोशल मिडियाच्या या दुनियेत ज्यानं प्रवेश केलाय, त्याची प्रत्येक ॲक्टिव्हिटी ही कुठे ना कुठेतरी रजिस्टर होते आहे, तिच्यावर वॉच ठेवला जातो आहे, हे दोनशे टक्के सत्य आहे. हे वास्तव आपल्याला स्वीकारलंच पाहिजे. मुळात सोशल मिडियाचा हेतूच त्याच्या या सोशल संबोधनातून दृग्गोच्चर होतो. हां, आता सोशल मिडियाचा वापर ज्या व्यक्ती, प्रवृत्ती अन्-सोशल गोष्टींसाठी करत आहेत, त्यांना या माध्यमाच्या गैरवापराबद्दल शिक्षा ही व्हायलाच हवी. अनेकजण या माध्यमांमध्ये येऊन आपले छुपे अजेंडे खुले करतात. सोशल मिडियाचं व्यासपीठ हे प्रत्येकासाठी पर्सनली उपलब्ध आहे. व्यक्तिगत अभिव्यक्तीसाठी उपयुक्त आहे, म्हणूनच या माध्यमाचा बोलबाला आहे, पॉप्युलॅरिटी आहे. अशा समान अभिव्यक्तीचे लोक या व्यासपीठावर एकत्र आले की, ग्रुप फॉर्म होतात आणि विचारमंथनही सुरू होतं. गेल्या एक-दोन वर्षांमध्ये या माध्यमाच्या संघटनशक्तीचा अनेक चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही प्रकारच्या बाबींमधून प्रत्यय आला आहे. अण्णांच्या (पहिल्या) आंदोलनाला इथूनच पाठिंबा संघटितरित्या व्यक्त झाला; तर त्याचवेळी कित्येक रेव्ह पार्ट्यांची निमंत्रणंही याच मिडियामधून दिली गेली. दिल्लीतील बलात्कार प्रकरणाच्या विरोधाची आग इथूनच चेतविली गेली आणि रस्त्यावर उतरली; तर लहान मुलाच्या विक्रीची जाहिरातही खुलेपणानं इथूनच दिली गेली.
अशा चांगल्या-वाईट दोन्ही प्रकारच्या गोष्टी या माध्यमाच्या साह्यानं घडवल्या गेल्या असल्या तरी वाईटाच्या बाबतीत प्रत्यक्ष या माध्यमाचा दोष किती, असा जर विचार केला तर तो फारच कमी असल्याचं दिसेल. खरे दोषी आहेत, ते त्याचा वापर करणाऱ्या प्रवृत्ती! सोशल मिडियाच कशाला? आधुनिक विज्ञान-तंत्रज्ञानाचा कोणताही आविष्कार असू द्या, त्याचे चांगले आणि वाईट असे दोन्ही उपयोग असतात. तो कोणत्या कारणासाठी करावयाचा, हे संपूर्णतया वापरणाऱ्यावरच अवलंबून असतं. अणुचा शोध लागला, ही चांगली गोष्ट झाली. पण त्या अणूचा वापर ऊर्जानिर्मितीसाठी करायचा की बाँबनिर्मितीसाठी करायचा, हे त्या शोधाची माहिती ज्या हातांत आहे, त्या हातांवर अवलंबून असतं, हे विसरून चालणार नाही. म्हणूनच हाती असलेल्या तंत्रज्ञानाचा वापर कसा करायचा, हे ज्या-त्या हातांवर अवलंबून आहे.
माझा या सोशल मिडियात येण्याचा उद्देश एकदम क्लिअर आहे. आज मला असं वाटतं की, आपण कोणीतरी आहोत. या कोणीतरी असण्यातून अनेक मैत्रसंबंध प्रस्थापित झाले आहेत- त्यांच्याशी, आणि ज्यावेळी मी कोणीही नव्हतो, तेव्हा कोणत्याही उद्देशाविना, हेतूविना ज्यांच्याशी माझं मैत्र जोडलं गेलं होतं, अशा सर्व मित्र-मैत्रिणींशी पुन्हा एकदा व्हर्चुअली का असेना, पण संपर्क प्रस्थापित करावा. आणि मला सांगायला आनंद वाटतो की, माझा हा उद्देश बहुतांशी सफल झाला आहे. त्यामुळं इथल्या माझ्या एकूण फ्रेंड्सपैकी किमान दोन तृतीअंश माझे वन टू वन परिचयातले आणि जवळचे मित्रमैत्रिणी आहेत. उर्वरित काहींना मी फॉलो करतो तर काही जण मला फॉलो करणारे आहेत. काही कार्यालयीन कामकाजामुळं लिस्टेड-कनेक्टेड आहेत. माझा एखादा विचार एकाचवेळी इतक्या लोकांशी शेअर करण्याचं आणि त्यावर त्यांची मतं आजमावण्याचं इतकं उत्तम व्यासपीठ दुसरं असूच शकत नाही.
आता यातल्या प्रत्येकाच्या प्रत्येक मताशी मी सहमत असेन, अशातला भाग नाही. किंवा माझं प्रत्येक मत त्यांना आवडायलाच हवं, असा माझाही आग्रह असण्याचं कारण नाही. पण आजपर्यंत तरी मी आणि माझ्या मित्रमंडळींनी मानवी स्वभावाचं हे बेसिक तत्त्व गृहित धरूनच एकमेकांशी गोष्टी लाइक/शेअर केल्या आहेत, त्यावर कॉमेंट केली आहे किंवा सोडून दिली आहे.
या पार्श्वभूमीवर काही व्यक्तींनी आता याला पकडायचंच, म्हणून जर वॉच ठेवण्याचं ठरवलं असेल, तर तो त्यांच्या इच्छेचा भाग आहे. त्यांनी खुशाल ठेवावा वॉच! इथं एक गोष्ट महत्त्वाची ठरते, ती म्हणजे माझी (आपली) सहृदयता. सोशल मिडियातला आपला वावर हा सोशल आणि संवेदनशीलच असला पाहिजे, असा माझा आग्रह असतो. मूलभूत मानवी संवेदनांची, सहवेदनांची आणि व्यापक सामाजिक जाणिवांची देवाण घेवाण जर या व्यासपीठावरुन होत असेल, तर त्याला कोणाचाही आक्षेप असण्याचं कारणच उरणार नाही. पण आपल्याच हेतूंविषयी समोरच्याच्या मनात किंतु निर्माण करणाऱ्या पोस्ट आपण क्रिएट करणार असू, शेअर करणार असू तर मग आपण स्वतःहूनच अशा वॉचमन्सच्या हातात आयतं कोलीत दिल्यासारखं होईल.
      या मित्राचा फोन येण्याआधी काही दिवस आधीच मी सोशल मिडियावर माझा अधिक वेळ जात असल्याचं लक्षात येऊन स्वतःच स्वतःला रेस्ट्रीक्ट केलं आणि सलग तीन दिवस (अगदी स्मार्टफोनवर) सुद्धा लॉग-इन केलं नाही. आणि असं कमी करत करत अगदी माफक वेळ मी आता या मिडियावर असतो. तेवढ्या वेळात काही चांगले लेख, सुंदर छायाचित्रं, उत्तम सुविचार असं बरंच काही मला वाचता येऊ शकतं, ते केवळ माझ्या मित्र-मैत्रिणींनी शेअर केल्यामुळंच. माझ्या वाचनात आलेलं, मी लिहिलेलं असं काही मी सुद्धा शेअर करतो. शेअरिंगचं हे इतकं नितांत सुंदर व्यासपीठ मी आताच सोडावं, अशी काही परिस्थिती नाही. हां, कोणी वॉच ठेवतंय म्हणून नाही, पण उद्या आलाच (ऑर्कुटसारखा) कंटाळा तर करू बंद, आहे काय त्यात? आणखी नवीन काही आलेलं असेलंच की तोपर्यंत!

४ टिप्पण्या:

  1. Ho mi karate jatratkar sir yanna watch. mazya swarthasathi.. mazi tyanchi olakh news chya madhyamatun zali. tyanna mi amantran dila aahe mazya college la yeun lecture denyasathi.... agadi na kalat....teva tyanna mi far olkhat hote asa nahi. mazya students sathi mala sir yanna parichit karun ghyayacha aahe..hach maza swarth !
    pan tyanche vichar vachayala far avadatat.. tyanchya blog ver. mhanun shodhate roj kadhi yetoy tyancha blog...mala vatat nahi ,i kahi chukicha karatey.chotya city t rahanare aamhi lok. itkya mothya oolakhi kuthun asanar na aamchya? pam Gmail mule sir samajale mala.
    Sir, asach lihit raha. aamhi watch karat rahu tumhala
    smt. Dhanashri Palande, Ratnagiri

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. धनश्री मॅडम, खूप खूप धन्यवाद. आपणा सर्व मित्र-मैत्रिणींच्या या प्रेमापोटीच मी लिहितो आहे. आपण आणि आपल्याप्रमाणेच माझ्या अनेक मित्र-मैत्रिणी कधी ब्लॉगवर, कधी इ-मेल वर, कधी मोबाईलवरुन तर कधी प्रत्यक्ष भेटल्यावर जेव्हा लेख आवडल्याचं सांगतात, कधी काही विचार न पटल्याचंही सांगतात, सुधारणेसाठी काही सूचना करतात, तेव्हा खूप बरं वाटतं. आपणा सर्वांशी व्हर्च्युअली का असेना पण मला कनेक्टेड राहता येऊ शकते आहे, हे खरं या नवतंत्रज्ञानाचं वरदान आहे. यापुढेही आपल्या प्रेमळ प्रतिक्रिया येत राहोत, या सदिच्छेसह,
      पुन्हा एकदा धन्यवाद.

      हटवा
  2. Keep it up mitra...punha ekda sundar lekh...
    Bhalchandra

    उत्तर द्याहटवा
  3. भालू मित्रा, माझा हा इंटरनेटी लेखन 'अत्याचार' तू स्वतःहून वाचून सहन करतोयस, हीच माझ्यासाठी मोलाची गोष्ट आहे. पुन्हा एकदा तुला खूप खूप धन्यवाद.
    आलोक

    उत्तर द्याहटवा