सोमवार, १० जून, २०१३

‘गुरूमित्रा’चं यश!



Sunjay Awate

Alok Jatratkar
 मित्र हो, यंदाचा वीकेंड हा गेल्या वर्षभरातला माझा सर्वाधिक अविस्मरणीय असा ठरला. या शनिवारी-रविवारी (दि. ८/९ जून) मी अलिबागला (रायगड) गेलो होतो... नाही... तुम्हाला वाटलं तसं फिरायला नव्हे तर माझे गुरू आणि मित्र (गुरूमित्रसंबोधन मस्त वाटेल ना!) संजय आवटे सरांनी दै.कृषीवलच्या ७७व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने दोन दिवसांच्या पहिल्या स्तंभ विचार परिषदेचे आयोजन केलं होतं. कृषीवलचे बरेचसे स्तंभलेखक या परिषदेला उपस्थित राहिले आणि प्रा. हरी नरके सर, न्या. डॉ. यशवंत चावरे, ज्येष्ठ पत्रकार भगवान दातार आदी मान्यवरांच्या सान्निध्यात अप्रतिम अशी वैचारिक मेजवानीच मिळाली. बरोब्बर वर्षभरानंतर पुन्हा अलिबागला गेलो तरी यंदा अलिबागचा किल्लाच काय, पण किनाराही पाहता आला नाही. पण त्याचं शल्य बिल्कुल नाही कारण या वैचारिक लाटांच्या तुषारांनीच आम्ही सारे चिंब चिंब झालो. या विचार सागराच्या किनाऱ्यावर बसलेल्यांनाही कळालं नाही की, आवटे सरांनी केव्हा त्यांना या प्रवाहात खेचलं आणि त्यात डुंबण्याचा आनंद मिळवून दिला. आमच्या या गुरुमित्रानं अवघ्या दोन दिवसांमध्ये केवळ स्नेहमेळावा म्हणता म्हणता इतका अप्रतिम आणि नेटका कार्यक्रम आयोजित केला की आम्ही (सारे) खरोखरीच त्यांच्या नियोजन कौशल्यानं प्रभावित झालो. (गडी बिनधास्त; त्याला अभ्यास अन् आत्मविश्वासाची जोड! मग यश मिळेल नाही तर काय?)
शनिवारी सायंकाळी ५ वाजता न्या. चावरे, प्रा. नरके यांच्या हस्ते परिषदेचं उद्घाटन झालं आणि पुढे रात्री अकरापर्यंत अलिबागच्या पीएनपी सभागृहात सलग सहा तास एक नितांतसुंदर वैचारिक, सांस्कृतिक मैफलच जमली. प्रा. नरके यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात एकूणच पत्रकारितेतील प्रवाहांचा आणि सद्यस्थितीचा आढावा घेत असताना वृत्तपत्रीय लेखनाची सर्वंकष चिकित्सा केली. समाजाभिमुख विचारांची मांडणी वृत्तपत्रीय स्तंभलेखनातून होण्याची अपेक्षा व्यक्त करतानाच दै. कृषीवलने या क्षेत्रामध्ये द हिंदू या इंग्रजी वृत्तपत्राच्या आदर्शाबरहुकूम वाटचाल चालविली असल्याचे गौरवोद्गारही काढले.
आवटे सरांनी यावेळी ही जात का जात नाही?’, ’लिहील्यानं काय फरक पडतो?’ आणि माझी.. बाई माणसाची कहाणी!’ अशा तीन अतिशय वेगळ्या परिसंवादांचंही आयोजन केलं. कृषीवलच्या स्तंभलेखकांनी या तीन परिसंवादात सहभाग घेतला. पहिल्या परिसंवादामध्ये माझा आणि माझे मित्र जगदीश मोरे यांचा सहभाग होता. जात ही मनात खोलवर रुजलेली गोष्ट आहे, व्होट बँक म्हणून तिला मिळणारे राजकीय पाठबळ ही चिंतेची बाब आहे. आंबेडकरांनी दिलेल्या स्त्री-पुरूष समानता, संसाधनांचे फेरवाटप, आंतरजातीय विवाह, धर्मचिकित्सा आणि लोकशिक्षण या पंचसूत्रीची अंमलबजावणी जोपर्यंत सार्वत्रिक प्रभावी रितीने होणार नाही, तोपर्यंत ती नष्ट होण्याची अपेक्षा करता येणार नाही, असा सूर या परिसंवादात व्यक्त झाला.
लिहिल्यानं काय फरक पडतो?’ या परिसंवादात अन्य मान्यवरांबरोबरच माझे मित्र युवराज पाटील सहभागी झाले होते. लिहिणं ही वैयक्तिक अभिव्यक्तीबरोबरच आत्मानंद देणारी आणि वैयक्तिक अनुभवांना वैश्विक समावेशनाचा अर्थ देणारी बाब आहे. वैयक्तिक आणि सामाजिक अभिव्यक्ती आणि अभिसरणाच्या दृष्टीनं लिहीण्याचं महत्त्व या परिसंवादात अधोरेखित झालं.
अखेरच्या माझी... बाईमाणसाची कहाणी!’ या परिसंवादात कृषीवलच्या समस्त स्त्री स्तंभलेखकांनी सहभाग घेतला. हा परिसंवाद अतिशय वेगळा ठरला. सहभागी लेखक महिलांचं अनुभवविश्व, कार्यक्षेत्र वेगवेगळं होतं. त्यामुळं बाई म्हणून आणि माणूस म्हणून समाजात वावरताना आलेले त्यांचे अनुभव वेगवेगळे असले तरी उपस्थितांना अंतर्मुख करून विचार करायला लावणारे होते. अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्येही बाईचं माणूसपण नाकारलं जातंय, याची जाणीव अधोरेखित झाली. पण त्याचवेळी आयुष्यात आलेल्या अडचणींना सामोरे जात त्यांचा कणखरपणे मुकाबला करणाऱ्या अश्विनी सातव-डोके आणि स्मिता पाटील- वळसंगकर यांचे अनुभव प्रेरणादायी होते, आशा पल्लवित करणारे होते.
त्यानंतर झालेल्या काव्य संमेलनामध्ये तर तरुणांपासून अलिबागमधील वयस्कर महिलांपर्यंत साऱ्यांनी ज्या उत्स्फूर्तपणे कविता सादर केल्या, त्या पाहून साऱ्या सभागृहात चैतन्याचा प्रवाहच जणू वाहू लागला. यामध्ये आमचा मनस्वी चिंतक मित्र हर्षवर्धन पवार यानंही नागरीकरणासंदर्भातली कविता वाचली. गझलकार दिलीप पांढरपट्टे यांचा गझलेचा अभ्यास आणि दांडगा व्यासंग यांचंही दर्शन यावेळी झालं. भारीच!
या काव्य संमेलनानंतर छोटेखानी लघुपट महोत्सव झाला. पुण्याच्या प्रथमेश इनामदार याच्या लाइफ सर्कल या लघुपटाचा प्रिमियर शो सुरवातीला झाला. मूल दत्तक घेण्यायासंदर्भात आजही समाजामध्ये असलेल्या जाणीवेचा अभाव आणि रक्ताच्या नात्यापलिकडल्या नातेसंबंधावर प्रकाश टाकण्याचा त्याचा प्रयत्न अतिशय स्तुत्य होता. दादू.. एक निःशब्द हुंदका हा अलिबागच्या किरण साष्टे याचा लघुपट अतिशय सर्वांगसुंदर होता. एका मुक्या गरीब कोळ्याची, मुलीच्या वाढदिवसाला केवळ तिच्या शाळेत चॉकलेट वाटण्यासाठीच्या खर्चाची तजवीज करण्यासाठीची धडपड याची ही कथा. अतिशय नेटकं दिग्दर्शन, उत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी आणि भावस्पर्शी कथानक यामुळं खरंच हृदयाचा ठाव घेणारा लघुपट अलिबागच्या मुलांनी साकारला आहे. यानंतर माझे बंधू अनुप जत्राटकर यांची महाराष्ट्र शासनाच्या वसुंधरा चित्रपट महोत्सवात नावाजल्या गेलेल्या पंचगंगा: द जर्नी फ्रॉम संगमा टू संगमा या ४० मिनिटांच्या लघुपटाचा १० मिनिटांचा शॉर्ट-व्हर्जन प्रदर्शित करण्यात आला. कोल्हापूरच्या पंचगंगा नदीच्या प्रदूषणाच्या अनुषंगानं एकूणच जलप्रदूषणाच्या समस्येवर प्रकाश टाकणारा हा लघुपट आहे. या प्रत्येक कार्यक्रमाच्या अध्येमध्ये अलिबागचा एक उत्कृष्ट तरुण नकलाकार प्रतीम सुतार यानं त्याच्या विविध नकलांनी अक्षरशः धमाल आणली.
पहिल्या दिवसाचं हे सत्र रात्री अकरा वाजता संपलं, तरी उपस्थितांचा उत्साह कायम होता. त्याच उत्साहात किहीम बीचवरील रिसॉर्टच्या दिशेनं साऱ्यांनी कूच केलं. गरमागरम चवदार जेवणाचा आस्वाद घेत तिथं पुन्हा साऱ्यांची एक अतिशय अनौपचारिक मैफल रंगली. आणि रात्री रुममध्ये जगदीश, युवराज, हर्षा आणि मी, अशी मैफलीनंतरची मैफल, उत्तररात्रीपर्यंत रंगली. बऱ्याच दिवसांनी आम्ही असे निवांत मोकळेपणी भेटत होतो, बोलत होतो. थँक्स टू संजय आवटे सर!
पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी रायगड जिल्ह्यातील पत्रकार मित्रांसाठी आयोजित पत्रकारितेतील बदलते प्रवाह आणि बातमीदारांची तयारीया विषयावरील कार्यशाळेसाठी आम्ही पीएनपी सभागृहात आलो. ७९ पत्रकारांची नोंदणी हा रायगडच्या इतिहासातील विक्रम होता, असं सरांनी सांगितलं. ज्येष्ठ लेखक विचारवंत प्रा. जी.एस. भोसले यांच्या हस्ते उद्घाटन झालं. एबीपी माझाचा प्रसन्न जोशी याची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. त्यानं त्याच्या नेहमीच्या तडाख्यात इलेक्ट्रॉनिक्स आणि मुद्रित माध्यमांसंदर्भात तुलनात्मक बदलांचा आढावा घेतला. त्यानंतर बातमी कशी लिहावी?’ या विषयाबाबत सांप्रत लेखक महोदयांनी (म्हणजे मीच!) मार्गदर्शन केलं. टेक्निकल आणि बेसिक गोष्ट असल्यानं रटाळपणाची झलक त्यात होती, तरीही नेटानं रेटलं. बातमीदारी करत असताना बातमीचं लेखन या मूलभूत गोष्टीकडं बरेचदा काणाडोळा होण्याचा धोका असतो, तो उलगडून दाखविण्याचा माझा प्रयत्न बराचसा यशस्वी झाल्याचं संपादक महोदयांनी सांगितलं. त्यामुळं होस्ट खूष तो आपुन भी खूष, अशी भावना मनी दाटली. कोसळत्या पावसाचा मुकाबला करत कोल्हापूर नगरीला परत फिरावयाचं असल्यानं स्मिता वळसंगकर आणि जगदीश यांची दोन लेक्चर ऐकून आम्ही निघालो. तत्पूर्वी वरिष्ठ पत्रकार अशोक तुपे, जयंत धुळप यांची भेट झाली. निघता निघता विनायक पात्रुडकर सरही दारातच भेटले. बऱ्याच दिवसांनी त्यांची भेट झाल्यानं आनंदही वाटला.
अशा प्रकारे एक उत्साहित करणारा वीकेंड आवटे सरांनी अतिशय कष्टपूर्वक आणि प्रयत्नपूर्वक घडवून आणला, नव्हे आम्हाला गिफ्टच केला. जुन्या मित्रांना भेटण्याचा योग होताच, पण बरेच नवे मैत्रीचे धागेही या परिषदेच्या निमित्तानं जुळून आले, ही त्यातली आमची फार मोठी कमाई. या स्नेहमेळ्याचं आयोजन करण्यासाठी आमच्या गुरूमित्राचं यश ही त्यातली माझ्यासाठी सर्वाधिक आनंददायी बाब ठरली. आगे बढिए, सर। हम तुम्हारे साथ है!

८ टिप्पण्या:

  1. Very nice to see your blog. Thanks for penning down the emotions . that was a very memorable experience


    उत्तर द्याहटवा
  2. http://www.marathwadaneta.com/maharashtra/%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A4%B2%E0%A4%A4%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B9-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%9C%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE.php

    उत्तर द्याहटवा