रविवार, ३ नोव्हेंबर, २०१३

निखळ-21 : आशेचे दीप, तेवू द्या मनी!
(सोमवार, दि. 4 नोव्हेंबर 2013 रोजी 'दै. कृषीवल'मध्ये 'निखळ' सदराअंतर्गत प्रकाशित झालेला माझा लेख...)

माझ्या तमाम वाचकांना दीपावलीनिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा!
मित्रहो, अनेक पौराणिक, ऐतिहासिक दाखले देऊन दिवाळी सण साजरा करण्यामागील हेतू पटवून दिला जात असतो. पण, त्या गतकाळात रमण्यापेक्षा कृषी संस्कृतीशी या सणाचं जवळचं असलेलं नातं मला अधिक पटतं, आवडतं. तसं आपले बहुतेक सण शेतीच्या कामांच्या विविध टप्प्यांवर साजरे होत असल्यानं कष्ट करून दमलेल्या जीवांना थोडासा श्रमपरिहार व पुढच्या उर्वरित कामांसाठी उत्साहवर्धक म्हणून या सणांचा खूप मोठा वाटा असे. शिवारातली पिकं उभी राहिलेली असताना ऐन सुगीच्या भरात दिवाळीचं आगमन हा या साऱ्या उत्साहाचा कळसबिंदू असे. वर्षभराची भौतिक आवश्यकतांची खरेदी या निमित्तानं व्हायची. त्यात नवलाई असे, अपूर्वाई असे.
आता मात्र दिवाळीच्या या अपूर्वाईचे दिवस राहिलेले नाहीत. खिशात सदोदित खुळखुळणारा पैसा असल्यामुळं आणि भौतिक सुखांतच सर्वस्व मानणाऱ्या आणि तत्सम साधनांच्या मालकीवरुनच आपला सामाजिक स्तर ठरवणारी नवी संस्कृती वाढत्या शहरीकरणाच्या  झंझावातात सर्वत्रच फोफावली आहे. त्यामुळं आपल्याकडं 'हर दिन दिवाली', अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. तरीही दिवाळी म्हणून पुन्हा नेहमीपेक्षा अधिक खरेदी, असं एक समीकरणही त्याच्या जोडीनं उदयाला आलं आहे. तथापि, एका वर्गाचा सामाजिक-आर्थिक स्तर उंचावला जात असताना, दुसऱ्या बाजूला हा स्तर घटत चाललेल्या, कमकुवत होत चाललेल्या वर्गाचीही संख्या वाढत चालली आहे. ही सामाजिक-आर्थिक दरी सांधण्याचा तसंच ती अधिक रुंदावत जाणार नाही, याची दक्षता घेण्याचा निश्चय या दिवाळीच्या निमित्तानं आपण साऱ्यांनीच करायला हवा.
आपल्या लोकशाहीप्रधान देशात एकाच वेळी 'इंडिया' आणि 'भारत' असे दोन देश राहात असल्याचं प्रतिपादन माध्यमांतून केलं जात आहे, त्यात निश्चितपणानं तथ्य आहे. 'इंडिया'तील नागरिकांनी 'भारता'तील नागरिकांची काळजी घेण्याची गरज आहे; त्यांना आपल्या बरोबरीला आणण्यासाठी साह्य करण्याची आवश्यकता आहे. पण, तसं होताना दिसत नाही. त्यामुळं 'भारता'तल्या लोकांना 'इंडिया'तल्या लोकांविषयी आस्था, आपुलकी वाटण्याऐवजी त्याची जागा असूयेनं घेतलेली आहे. पुढं त्याचं रुपांतर विद्वेषात, असंतोषात होणार नाही कशावरुन? मध्यमवर्गीय आणि उच्च-मध्यमवर्गीय हे मधले स्तर जोपर्यंत आहेत, तोपर्यंत त्या खालच्या आणि वरच्या लोकांमधला दुवा म्हणून जरी नसला तरी, त्या दोहोंत काहीतरी संबंध आहे, हे दर्शविलं जात राहील. परंतु, सध्याच्या मध्यमवर्गाला उच्च-मध्यमवर्ग बनण्याची आणि उच्च-मध्यमवर्गाला उच्च वर्गामध्ये लवकरात लवकर समाविष्ट होण्याची आस लागून राहिलेली आहे. त्यांची सारी धडपड ही त्यासाठीच आणि त्याच दिशेने चाललेली आहे. मात्र, या धडपडीचा परिणाम असा होईल की, मध्यमवर्गातले बरेचसे नीच स्तरामध्येही ढकलले जातील आणि उच्च-मध्यमवर्गातले उच्च स्तरामध्येही जातील. ही मधली फळी नष्ट करण्याच्या धडपडीला यश येईल, पण, त्यावेळी आपण कम्युनिझमच्या दरवाजावर उभे ठाकलेले असू. जागतिकीकरणानं जन्माला घातलेल्या या नव्या भांडवलशाही व्यवस्थेतून उदयाला आलेल्या चंगळवादी संस्कृतीचा परिपाक 'आहे रे' आणि 'नाही रे' या दोन वर्गांच्या निर्मितीमध्ये होण्याची दाट शक्यता वाटते. एकदा का हा संघर्ष पेटला की तो समाजवादी, न्यायवादी दिशेनं नेण्याची जबाबदारी त्याच्या नेतृत्वावर असते. परंतु, असे समंजस नेतृत्व लाभेल, याची शाश्वती कशी बरं देता येईल? त्यामुळं ही ठिणगी पडू न देता, पणतीप्रमाणं मंद, शांत परंतु तेजस्वीपणानं  अशी परिस्थिती आपल्या देशावर येणारच नाही, याची दक्षता घेण्याची जबाबदारी आजच्या नेतृत्वावर आणि तमाम नागरिकांवर म्हणजे आपल्यावरच आहे.
दिवाळी हा खरं तर अशा तेजाचाच सण आहे. तिमिराचा नाश करण्याची शक्ती एका पणतीच्या ज्योतीमध्ये आहे, हा संदेश आपल्याला हा सण झळाळून देत असतो. अपप्रवृत्तींवर चांगुलपणामुळं अधिक प्रभावीपणे मात करता येऊ शकते आणि ती अपप्रवृत्ती कायमची नष्ट होण्याची शक्यताही त्यामुळं वाढते. ही गोष्ट आपण ध्यानात घेण्याची गरज आहे. प्रत्यक्षात झालंय असं की, आपला चांगल्या गोष्टींवरचा आणि चांगुलपणावरचाच विश्वास उडत चाललाय. ही खरी समस्या आहे. असेल, आपल्या भोवतालची परिस्थिती तशी असेलही. पण, गळेकापू स्पर्धा म्हटली की, त्या जोडीनं येणाऱ्या साऱ्या लाभ-नुकसानीचाही स्वीकार करण्याची आपली मानसिकता हवीच. पण, त्यामुळं सारंच वाईट चाललंय आणि सारे आपल्या वाईटावरच टपले आहेत, असं म्हणणं आणि मनात सदोदित तीच खदखद बाळगणं कितपत योग्य आहे? त्यामुळं या भोवतालच्या परिस्थितीकडं नकारात्मक दृष्टीकोनातून पाहणं आपण थांबवलं पाहिजे. कारण एकदा आपली मानसिकताच नकारात्मक बनली की, सर्वप्रथम सकारात्मक विचारांपासून ती आपल्याला तोडते. सर्वत्र जणू काळोखच पसरला आहे, चांगलं काही घडतंच नाहीये, आता काही खरं नाही, अशा विचारांनी आपण अधिकच निराशाग्रस्ततेकडं वाटचाल करू लागतो. एकदा का ही निराशा मनाच्या आभाळभर भरून राहिली की, त्या कृष्णमेघांच्या दाट छायेतून आशेचे प्रकाशकिरण कधीच आपल्या मनाच्या जमिनीपर्यंत पोहोचू शकणार नाहीत. त्यामुळं आपण ही सवय बदलली पाहिजे. ठीक आहे, वाईट गोष्टी होत असतातच, होणारच. वाईट गोष्टी, प्रवृत्ती आहेत, म्हणूनच चांगल्याचं महत्त्व अबाधित आहे, हे तरी कसं नाकारून चालेल? त्यामुळं या वाईटाच्या भडिमारातही ज्या काही चांगल्या गोष्टी होताहेत, त्यांच्याकडं आपण पाहिलं पाहिजे. चांगल्याला अधिक चांगलं कसं करता येईल, किमान त्या चांगल्याकडं चांगल्या नजरेनं कसं पाहता येईल, हा दृष्टीकोन आपल्या ठायी विकसित झाला, तरी एकूण परिस्थितीमध्ये खूपच सकारात्मक बदल झाल्याचं आपल्या लक्षात येईल. चांगलं-वाईट या प्रवृत्ती सिस्टीममध्ये नाहीत, तर आपल्या मनामध्ये खोल रुजलेल्या आहेत. त्या निपटून काढून फेकून दिल्या तरी आपण खूप काही साध्य केलेलं असेल. तेव्हा 'इडा पीडा टळो, बळीचं राज्य येवो', असं म्हणण्याची वेळ उरणार नाही. कारण एकीकडं आपणच बळीचा बळी घेतो आणि पुन्हा दुसरीकडं त्याचं राज्य येवो, असं अरण्यरुदन करतो, याला काही अर्थ नाही. सकारात्मक मानसिकता आणि सामाजिक कृतीशीलता यांच्या बळावरच पुन्हा हवं तर, बळीराज्याची प्रस्थापना करता येऊ शकते. एवढ्या एका संकल्पाचा दिवा तरी आपण यंदाच्या दिवाळीला लावू या, एवढंच या निमित्तानं मागणं!
शुभ दीपावली!!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा