मंगळवार, १२ नोव्हेंबर, २०१३

माध्यमांतर(मित्रवर्य रावसाहेब पुजारी यांच्या तेजस प्रकाशनच्या 'बदलते जग' या दीपावली विशेषांकाचा अतिथी संपादक म्हणून यंदा काम पाहिले. सोशल मिडिया विषयाला वाहिलेल्या या अंकामध्ये सोशल मिडियाचा अनेकांगांनी वेध घेण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. या अंकातील माझी कव्हर स्टोरी ब्लॉग वाचक मित्रांसाठी शेअर करतोय. जरूर वाचा.- आलोक जत्राटकर)
 
आजघडीला आपल्या तरुणाईचं सर्वाधिक आवडतं, पर्यटनाचं किंवा त्यांच्याच शब्दांत हँगआऊट करण्याचं ठिकाण कोणतं, असा विचार केला तर सोशल मिडिया असंच उत्तर आपल्याला द्यावं लागेल. सोशल मिडिया नामक ठिकाणं व्हर्चुअल असली तरी हरकत नाही, पण त्यांच्या माध्यमातून एकमेकांशी कनेक्ट राहण्यामध्ये आजची युवा पिढी धन्यता मानते आहे.
सोशल नेटवर्किंग या शब्दातील सोशल आणि नेटवर्क हे दोन्ही शब्द खूप महत्त्वाचे आहेत. मानव हा समाजशील प्राणी आहे, असं आपण जेव्हा म्हणतो, तेव्हा हरेक संस्कृतीमध्ये त्याच्या या समाजशीलतेचं प्रतिबिंब उमटलेलं आपल्याला हमखास दिसतं. काळानुरुप समाजामध्ये जे काही सामाजिक, आर्थिक बदल होत गेले, त्यानुसार त्या त्या काळातल्या संस्कृतीही बदलत गेल्या, तथापि, त्यांची मूळ समाजशीलतेची आस ही आजही कायम आहे. नेटवर्क हा शब्द या ठिकाणी दोन अर्थांनी घेता येऊ शकतो. पहिला अर्थ पुन्हा सामाजिक अर्थाने सामोरा येतो. एकमेकांशी जोडलं जाणं, कनेक्ट होणं असा त्याचा थेट अर्थ घेता येऊ शकतो आणि दुसरा अर्थ हा अर्थातच तांत्रिक अंगांनी आहे. तंत्रज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान यांच्या साह्यानं आविष्कृत झालेल्या या नवमाध्यमातून संवादाची भूक भागविली जाण्यासाठी समाज जेव्हा एकमेकांशी जोडलं जाण्यासाठी प्रयत्नरत होतो, तेव्हा या सोशल नेटवर्किंग वर्तुळ पूर्ण होतं; किंबहुना, हे जोडलं जाणं जिथं होत नाही, त्या नेटवर्कच्या परीघाविषयी आणि आवाक्याविषयीही शंका घ्यायला जागा आहे, असं थेटपणे आपल्याला म्हणता येऊ शकतं.
सोशल नेटवर्किंगच्या साह्यानं जी माध्यमं आविष्कृत झालेली आहेत, त्या समस्त माध्यमांना आपण सोशल मिडीया असं म्हणू शकतो. मानवाच्या संवादाची गरज भागविण्यासाठी माध्यमांचा विकास होणं, ही स्वाभाविक गोष्ट ठरली. तथापि, छपाईच्या शोधानं या प्रक्रियेला खरी गती आली. जोहान्स गुटेनबर्गच्या गॅलॅक्सीनं जगाच्या संवाद क्षेत्राला गतिमानता प्रदान केली. औद्योगिक क्रांतीनंतर नवतंत्रज्ञान आणि नवनवीन शोधांना मोठ्या प्रमाणात मिळालेल्या चालनेतून पुढे हे माध्यमांचं क्षेत्र अधिकच व्यापक होत राहिलं, विस्तारत गेलं. दूरध्वनीपासून ते दूरचित्रवाणी अशा इलेक्ट्रॉनिक माध्यमांपर्यंत हे क्षेत्र विस्तारलं. मानवाची माहितीची भूक भागविण्यासाठी अखंडितपणे ही माध्यमं सेवारत झाली, आजही आहेत. संगणक आणि त्यानंतर इंटरनेटच्या शोधानं या माहिती तंत्रज्ञान क्षेत्राला एक नवा आयाम मिळवून दिला, किंबहुना, या दोन गोष्टींच्या आस्तित्वाखेरीज माहिती तंत्रज्ञान क्षेत्रचं अस्तित्वात येऊ शकलं नसतं. काळानुरुप होत गेलेलं माध्यमांतर हा मानवजातीच्या प्रगतीमधील, विकासामधील अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे, असं म्हटल्यास अतिशयोक्तीचं ठरणार नाही. परंतु, गुटेनबर्गनंतर इलेक्ट्रॉनिक माध्यमं आस्तित्वात येण्याच्या दरम्यान सुमारे साडेतीनशे वर्षांचा काळ लोटला, पण त्यानंतर अवघ्या साडेतीन दशकांमध्ये माध्यमांनी ज्या गतीनं आपलं रुप पालटलं आहे, ती गती अचंबित करणारी आहे. आणि हे गतिमानतेचं चक्र केवळ इंटरनेट आणि त्याच्याशी संबंधित अनेकविध शोधांमुळंच तसं राहू शकलेलं आहे.
आजघडीला इंटरनेटशी निगडित आकडेवारीवर नजर टाकली तरी त्याच्या व्याप्तीची आपल्याला कल्पना येऊ शकेल. आज लोकसंख्येच्या दृष्टीनं विचार केला तर चीनमध्ये सर्वाधिक म्हणजे सुमारे ५७ कोटी लोक इंटरनेट वापरतात. टक्केवारीत मात्र हे प्रमाण ४२ टक्के आहे. दुसऱ्या क्रमांकावर आहे अमेरिका. अमेरिकेतील २५ कोटी लोक इंटरनेट वापरतात, त्यांची टक्केवारी आहे ८१ टक्के. आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे भारत. भारतातील साधारण १५ कोटी लोक इंटरनेटचा वापर करतात, त्यांचं प्रमाण आहे १३ टक्के. सन २०११च्या जनगणनेनुसार हे प्रमाण तीन टक्के घरांमध्ये केंद्रित झालेलं आहे. याच्या बरोबरीनं आज मोबाईल वापरणाऱ्यांची आकडेवारीही देशात वाढतेच आहे. जनगणनेनुसार देशातले साठ टक्क्यांहून अधिक लोक आज मोबाईलचा वापर करतात. गेल्या दोनेक वर्षांत स्मार्टफोननं मोबाईल क्षेत्रात आणखी क्रांती घडविली आहे. हातातला मोबाईल आता बोलण्यापलिकडं ई-मेल, सर्फिंगसाठी वापरात येऊ लागला आहे. जीपीआरएस तंत्रज्ञानानं ही गोष्ट शक्य केली तर टू जी, थ्री जी यांनी या डाटावहनाला अधिक गतिमानता प्रदान केली, ज्यामुळं खरं तर स्मार्टफोनची लोकप्रियता वाढत चालली आहे. आज इंटरनेटसाठी ब्रॉडबँड लाइन्सवरच अवलंबून राहण्याचा जमाना इतिहासजमा झाला आहे. टॅब्लेट पीसी, स्मार्टफोनमुळं हे सारं जग जणू आपल्या हातात नव्हे, मुठीत सामावलं आहे. डेस्कटॉप पीसी आणि लॅपटॉपवरुन जसं इंटरनेटचं स्मार्टफोनवर आगमन होऊ लागलं, त्यावेळी खऱ्या अर्थानं सोशल मिडियाच्या लोकप्रियतेचा आलेखही चढता बनण्यास सुरवात झाली.
सोशल मिडिया म्हटलं की, आजकाल सर्वाधिक पॉप्युलर असलेल्या फेसबुकचं नाव आपल्या तोंडी येतं. किंबहुना फेसबुक हे जणू सोशल मिडियाचं प्रतिनामच बनलं आहे. तथापि, आद्य सोशल मिडियाचा मान हा आपल्याला ऑर्कुटला द्यावा लागेल. ऑर्कुटवर अकाऊंट असणं, हा तेव्हा कैक ऑरकुट्यांचा  प्रेस्टीज पॉईंट बनला होता. आम्हीही होतो त्यामध्ये. ई-मेलच्या पुढं जाऊन अन्य काही गोष्टींचं शेअरिंग करता यू शकतं, याची प्रचिती तेव्हा आली. पण, काळाच्या गतीशी जुळवून न घेता आल्यामुळं म्हणा किंवा ती गती वेगळ्या स्वरुपात प्रवाहित करण्याच्या नादात म्हणा, ऑर्कुटचा गळा घोटला गेला. फेसबुकनं प्रचंड गतीनं त्याची लोकप्रियता टेकओव्हर कधी केली, हे कोणालाही समजलं नाही. त्या व्यतिरिक्त गुगल प्लस, ट्विटर, यू-ट्यूब, लिंक्ड-इन, हाय फाइव्ह, स्टंबल अपॉन, टम्बलर, पर्फस्पॉट अशा सोशल नेटवर्किंग साइट्सनीही आपापला वेगळा युझर वर्ग निर्माण करण्यात यश मिळवलं. त्याखेरीज फ्लिकर, पिकासा, शटरफ्लाय, फोटोबकेट, इमेजशेक, स्मगमग इत्यादी फोटो शेअरिंग साइट्सवरुनही खूप मोठ्या प्रमाणावर जगभरात छायाचित्रांची देवाणघेवाण सुरू असते, तीही प्रचंड गतीनं! त्याशिवाय अभिव्यक्तीचं एक उत्तम माध्यम म्हणून वेबलॉगिंग उर्फ ब्लॉगिंगच्याही अनेक साइट्सचे पर्याय या ठिकाणी उपलब्ध आहेत. त्याद्वारे होणारी विचारांची देवाणघेवाण, विचारांची घुसळण हा सुद्धा अतिशय क्रांतीकारक प्रकार आहे, असे म्हणावयास हरकत नाही.
अशा या सोशल मिडीयाचा आपण आतापर्यंत तरी खूप गांभीर्यानं विचार केला आहे, अशातला भाग नाही. पण तो केला गेला पाहिजे, याला कारण आहे. गेल्या काही दिवसांत सोशल मिडियाच्या ताकतीचा आपल्याला बऱ्यापैकी अंदाज आलेला आहे, पण पूर्णपणे नाही. भारतानं सोशल मिडियाला गांभीर्यानं घ्यावं असं जेव्हा मी म्हणतो, तेव्हा त्यामागं आकडेवारीचं वास्तव आहे, हे लक्षात घ्या. सुमारे १२५ कोटींच्या आपल्या देशात आजघडीला ४३ कोटी लोकसंख्या युवा आहे. सन २०२१पर्यंत हा आकडा ४७ कोटींच्या घरात जाण्याची शक्यता आहे. तेव्हा भारत जगातील सर्वाधिक तरुण देश असेल. आज आपली एक तृतिअंश लोकसंख्या किंवा तीनपैकी एक भारतीय आज तरुण आहे. आणि ही युवा पिढी आज इंटरनेट, मोबाईल किंवा टॅब्लेटमय झालेली आहे. संपूर्णतया नसेल, पण आज ना उद्या या नव्या तंत्रज्ञानाला त्यांना स्वीकारावं लागेल किंवा या तंत्रज्ञानानंच त्यांना कवेत घेतलेलं असेल. म्हणजे कोणाचीही यातून सुटका नाही.
या पार्श्वभूमीवर सोशल मिडियाचा विचार केला जाणे गरजेचे आहे. कमी खर्चिक आणि सर्वाधिक वेगवान, प्रसिद्धीसाठी अथवा अभिव्यक्तीसाठी कोणत्याही मध्यस्थाची नसलेली गरज, तुमच्या अकाऊंटचे तुम्हीच राजे आणि मालक, तुमच्यावर ना कोणी मालकी गाजवू शकतो, ना तुम्हाला अंकित करू शकतो, तुम्हाला वाटेल त्याला तुम्ही फॉलो करू शकता, नको त्याला अनफ्रेंड करू शकता, पटला तो विचार स्वीकारला, न पटला त्याला प्रतिवाद केला किंवा सोडून दिला, असे एक ना अनेक फायदे सोशल मिडियाचे आहेत. वैयक्तिक अभिव्यक्तीचं इतकं अप्रतिम व्यासपीठ यापूर्वी कधीही उपलब्ध नव्हतं, याची जाणीव आजच्या पिढीला झालेली आहे. त्यामुळंच अत्यंत निर्भयपणानं, निर्बिडपणानं ती या व्यासपीठावर व्यक्त होताना दिसते- अगदी व्यक्तिगत, स्थानिक समस्यांपासून ते अगदी जागतिक प्रश्नांपर्यंत. या माध्यमातून खूप मोठी वैचारिक घुसळण अगदी क्षणाक्षणाला होत असते. त्यातून या पिढीची आत्मविश्वासपूर्ण ठाम मते आपल्याला तयार होताना दिसतात. हां, त्यामध्ये एक गल्लत होऊ शकते की, ही ठाम मते कदाचित चुकीच्या दिशेला झुकलेलीही दिसतात. पण एकदा माध्यम स्वीकारले म्हटले की, त्याच्या बरोबरीने ते स्वतःचे फायदे-तोटे घेऊन येत असते आणि ते माध्यम आपल्याला त्यांच्यासहच स्वीकारावे लागते, हे ज्येष्ठ माध्यमतज्ज्ञ मार्शल मॅक्लुहान यांनी सांगून ठेवलेलेच आहे. त्यामुळे हे वास्तव स्वीकारण्याची आणि ती मते सकारात्मक विचारसरणीमध्ये बदलण्याची जबाबदारीही प्रतिवाद करत असताना स्वीकारण्याची गरज आहे.
आजच्या धामधुमीच्या, धावपळीच्या, स्पर्धेच्या युगामध्ये आपल्याला एकमेकांशी संवाद साधायला फुरसत नाहीय, असं आपण म्हणायचो. पण, या सोशल मिडीयामध्ये जगभरात दर क्षणाला जी काही संवादांची देवाणघेवाण सुरू असते, ती पाहिली की या माध्यमाला धन्यवाद दिल्याखेरीज राहवत नाही. आता प्रत्यक्ष फोन लावून बोलण्यापेक्षा वॉट्सॲपवर शेअरिंग हे अधिक होताना दिसतं आहे. फेसबुकवर तर विविधरंगी शेअरिंगची बरसातच सुरू असते. ट्विटरवरही अत्यंत मोजक्या म्हणजे कमाल 140 शब्दांत अत्यंत प्रभावीपणे व्यक्त होताना लोकांना काहीही अडचण येताना दिसत नाही. कमीत कमी शब्दांत आणि जास्तीत जास्त शब्दांत अशा दोन्ही प्रकारच्या अभिव्यक्ती या विविध प्लॅटफॉर्मवरून होताना दिसतात, ज्याने त्याने आपापल्या वेळेनुसार, आवडीनुसार, आवश्यकतेनुसार किंवा केवळ टाइमपास म्हणूनही ते वाचावे, पाहावे, अशी ही व्यवस्था आहे. त्यासाठी कोणावरही काही बंधन नाही किंवा निर्बंधही नाहीत, हेही महत्त्वाचे! सुरवातीला म्हटल्याप्रमाणं कनेक्ट होणं किंवा शेअरिंग करणं या आपल्या मूलभूत गरजा आहेत आणि त्यांचा विस्तार करणं, ही या माध्यमानं निर्माण केलेली उपलब्धी आहे. तिचा लाभ घेऊन आपल्या नेटवर्कमध्ये अधिकाधिक लोकांना सामावून घेणं, स्वतः अनेकांच्या नेटवर्कमध्ये सामावून जाणं, या गोष्टी सुद्धा खूप महत्त्वाच्या ठरतात. जात, धर्म, प्रांत, देश यांच्या सीमा ओलांडून मैत्रीचे बंध जोडले जातात, विचारांचे पूल बांधले जातात आणि हे केवळ या सोशल मिडियामुळंच शक्य होत आहे, हे कोणीही नाकारू शकणार नाही.
मघा म्हटल्याप्रमाणं, सोशल मिडियाच्या व्यासपीठानं सर्वसामान्य नागरिकांना स्वतःचं हक्काचं व्यासपीठ मिळवून दिलं. या व्यासपीठाच्या ताकतीवर गत दोनेक वर्षांमध्ये जगात आणि देशात नागरिकांनी, विद्यार्थ्यांनी अनेक आंदोलने यशस्वी केली, क्रांती घडवून आणली. या सर्वसामान्यांच्या ताकतीचा आणि या माध्यमाच्या अफाट क्षमतेचा अंदाज आल्यानंच त्या सर्व लोकांशी कनेक्ट होण्यासाठी अनेक पत्रकार, उद्योजक, व्यावसायिक, सेलिब्रिटी, नेते, कार्यकर्ते या साऱ्यांना सोशल मिडियाच्या व्यासपीठावर येणं भाग पडलं. एरव्ही, सर्वसामान्यांना केवळ रुपेरी किंवा टीव्हीच्या पडद्यावर दिसणारे हे लोक गावाकडं शिकणाऱ्या विद्यार्थ्याच्या फ्रेंड्स लिस्टमध्ये दिसू लागले. आपल्या फ्रेंड लिस्टमध्ये अशा चाहत्यांना सामावून घेण्यात सेलिब्रिटींनाही धन्यता वाटू लागली. त्यांच्या फॉलोअर्सच्या आकड्यांच्या बातम्या होऊ लागल्या, रेकॉर्ड प्रस्थापित होऊ लागले, हे खरोखरीच अपूर्व आहे.
थेट प्रतिक्रिया, थेट फिडबॅक हा सुद्धा या माध्यमाचा फायदा आहे. त्यासाठी तुम्ही कोणावर अवलंबून राहण्याची गरज उरत नाही. किंवा आज अन्य कोणत्याही प्रस्थापित माध्यमापेक्षाही अधिक जलदगतीने बातमी मिळण्याचे महत्त्वाचे ठिकाण म्हणजे सोशल मिडिया आहे. सध्याच्या माध्यमांचा पुढील विस्तारित अवतार जर कोणता असेल तर तो या सोशल मिडियाच्या स्वरुपातच असेल, हे नक्की. कारण आज मल्टीमिडिया ॲप्रोच हा माध्यम ते माध्यम असा वेगवेगळा राहिला नसून तो आंतरक्रियात्मक आणि एकमेकांना छेदणारा बनला आहे, यालाही इंटरनेटचे माध्यम कारणीभूत आहे. आज मुद्रित माध्यम असो की इलेक्ट्रॉनिक माध्यम, या साऱ्यांचे अस्तित्व साइटच्या रुपात, ब्लॉगच्या रुपात किंवा आता तर थेट सोशल मिडियामध्ये त्यांचे स्वतःचे अकाऊंट असते आणि त्यावरुनही त्यांचे बातम्यांचे शेअरिंग सुरू असते. म्हणजे प्रिंट मिडियातली बातमी जशी सोशल मिडियावर आहे, तसाच टीव्हीवरील बातमीची क्लीपही इथं उपलब्ध आहे. त्यामुळं माध्यमभेद दूर करून एक नवी माध्यम संस्कृती, माध्यमांतर संस्कृती सोशल मिडियाच्या प्लॅटफॉर्मवर आकाराला येते आहे. टॅब्लेट आणि स्मार्टफोनमुळं त्यांचे अनेकविध ॲपही अगदी मोफत किंवा अल्प दरात उपलब्ध आहेत, त्यामुळंही या संस्कृतीला चालना मिळत आहे. अमेरिकेतलं आघाडीचं आणि जगप्रसिद्ध दैनिक असलेल्या 'वॉशिंग्टन पोस्ट'ला ॲमेझॉन डॉट कॉम समूहानं गेल्या ऑगस्टमध्ये टेकओव्हर केलं, तेव्हा साऱ्या जगाच्या भुवया उंचावल्या. 'हिमनगानं टायटॅनिकला आधार दिला,' अशा स्वरुपाच्या बोलक्या प्रतिक्रिया व्यक्त झाल्या. पण, ही या माध्यमांतराची सुरवात आहे. टप्प्याटप्प्यानं ती साऱ्या जगात घडून येणार आहे, त्यासाठी साऱ्या जगानं तयार असलं पाहिजे, ही या माध्यमांतराची पूर्वअट आहे आणि सोशल मिडियाच्या प्लॅटफॉर्ममुळं ती अधिक प्रकर्षानं अधोरेखित होते आहे.
सोशल मिडियाच्या वाढत्या लोकप्रियतेमुळं इथं वेगवेगळ्या प्रकारच्या रोजगाराच्या संधीही दिवसागणिक निर्माण होत आहेत. विविध प्रकारची सॉफ्टवेअर्स, ॲप्स, साइट्स यांच्या निर्मितीचा आणि तद्अनुषंगिक उत्पादनांचा व्यवसाय सध्या तेजीत आहे. इथं कुशल आणि प्रयोगशील तरुणांना खूप मोठ्या प्रमाणावर संधी आहेत. त्यांचा लाभ घेऊन प्रगती साधण्यासाठीही तरुणांची मोठी फळी आपल्या देशात आकाराला येण्याची गरज आहे. सिलीकॉन व्हॅलीमध्ये जो ठसा भारतीय माहिती तंत्रज्ञान तज्ज्ञ अभियंत्यांनी उमटवला, तेच आता सोशल मिडियाच्या नव्या संधींच्या संदर्भातही होण्याची गरज आहे.
सोशल मिडियावर आपल्याला नवनवे तसेच खूप जुने-जुने मित्र-मैत्रिणी भेटतात, वयाच्या सीमारेषा पुसल्या जाऊन निखळ मैत्रीचे बंध इथं जोडले जातात, देश-प्रांत-भाषा इत्यादींच्या सीमारेषा पुसल्या जाऊन जन्मजन्मांतरीच्या लग्नगाठी इथं जुळल्या जातात, वीस वर्षांपूर्वी घरातून हरवलेला मुलगा, जो आता मेल्यातच जमा आहे, तो ही या माध्यमामुळंच आपल्या आईला प्रत्यक्ष सापडतो, हाही या सोशल मिडियाच्या प्लॅटफॉर्मचाच चमत्कार आहे. असं जरी असलं तरी मॅक्लुहान यांनी म्हटल्याप्रमाणं त्याचे काही तोटेही आहेत. त्यांचाही थोडक्यात परामर्ष याठिकाणी घेतला गेला जाणे गरजेचे आहे.
सोशल मिडियामध्ये सर्वाधिक वावर हा पौगंडावस्थेतील आणि विशी-पंचविशीतल्या तरुणाईचा आहे. या व्हर्चुअल जगतामध्ये त्यांचा अतिशय सुरक्षित वावर आहे. त्यांना इथे थेट कोणताही धोका उद्भवण्याची शक्यता नसते. तथापि, या आभासी जगताची सवय झालेल्या मनाला वास्तव जगामधील अनुभव कदाचित खूप हार्ष, भयंकर वाटण्याची शक्यता अधिक निर्माण होते. त्यातून त्याला बसणारा मानसिक धक्का हा खूप मोठा असू शकतो आणि त्यातून सावरण्याचं बळ, उपाय किंवा आधार हा त्यांना आभासी जगतात मिळण्याची शक्यता फार कमी असते. तिथे फार फार तर सहानुभूती मिळू शकेल, पण त्यातून अंतिम साध्यता काही होण्याची शक्यता नसते. मानसिकदृष्ट्या कोलमडून पडण्याची शक्यता इथे वाढते. दुसरी बाब म्हणजे प्रत्येक गोष्ट विनाकारण सोशल मिडियावर शेअर करायची आणि त्यावर प्रतिक्रिया आजमावण्याची, तसंच तिथल्या लाइक्स आणि कॉमेंट्सवर आपलं सोशल स्टेटस ठरवण्याची अत्यंत चुकीची सवय इथं लागते. अभ्यास करण्याच्या वयामध्ये सातत्यानं विद्यार्थ्यांचं लक्ष स्मार्टफोन किंवा टॅबवरल्या सोशल मिडिया साइट्सकडं लागून राहणं याचा दुसरा अर्थ म्हणजे त्याचं अभ्यासावरचं लक्ष केंद्रित करण्याचं प्रमाण कमी होणं, असा आहे. अभ्यासामधली प्रगती कमी म्हणजे भविष्यातल्या इतर शिक्षणाच्या, रोजगाराच्या संधींचीही कमी, असा थेट परिणाम होण्याची शक्यता वाढते. या सोशल मिडियाच्या अतिरिक्त वापरामुळे भेडसावणाऱ्या व्यसनाधिनतापूर्ण मानसिक रोगालाही 'फेसबुक फोबिया' असं नाव मानसोपचार तज्ज्ञांनी दिलं आहे. या रोगाने ग्रस्त असणाऱ्या युवा वर्गाचं प्रमाण जागतिक स्तरावर चिंताजनकरित्या वाढू लागलं आहे. अत्यंत पराकोटीची नैराश्यग्रस्तता हा या रोगाचा अल्टिमेट अंतिम परिणाम आहे.
व्यक्तिगत पातळीवर होणाऱ्या या रोगाबरोबरच आपण मांडलेली अतिरेकी, टोकाची मतेही दुराग्रही पद्धतीने रेटण्याची मानसिकता या माध्यमामुळे निर्माण होत असल्याचेही अलीकडे निदर्शनाला येऊ लागले आहे. व्यक्तिगत अजेंडा राबवायला कोणाची हरकत असण्याचं कारण नाही, परंतु ते विधायक असलं पाहिजे, समाजाचं, राष्ट्राचं आणि अखिल मानव जातीचं व्यापक हित त्यातून जपलं, जोपासलं गेलं पाहिजे. प्रत्यक्षात बऱ्याच जणांच्या बाबतीत तसं होताना दिसत नाही. समाजविघातक, देशविरोधी कारवायांची किंवा व्यक्तिद्वेषमूलक आक्रमक आरोपणांची पेरणी इथं होताना दिसते आहे. असे विघातक समानधर्मी लोकांचे समूह इथं स्थापन होताहेत. रेव्ह पार्ट्यांची आमंत्रणं इथून वाटली जाताहेत, दहशतवादी हल्ल्यांचे कट इथं आखले जाताहेत, हे खूपच भयावह आहे. त्यामुळं सायबर गुन्हे शाखेचं कामही खूप मोठ्या प्रमाणावर वाढतं आहे. आणि हे केवळ देशात नाही, तर एकूणच जगभरात सायबर गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. मैत्रीच्या आवरणाखाली फसवणुकीचे प्रकारही वाढत चालले आहेत. फेक अकाऊंट उघडून त्या माध्यमातून तरुण तरुणींची फसवणूक आणि चारित्र्यहननही याच ठिकाणी मोठ्या प्रमाणावर होताना दिसतं आहे. नकळत्या वयामध्ये नको त्या पद्धतीने सेक्शुअल मटेरिअलचा मारा तारुण्यात येऊ घातलेल्या युवक-युवतींवर सुरू आहे. त्यातून एकूणच निकोप स्त्री-पुरूष संबंधांपेक्षा लिंगभेदसापेक्ष, लिंगवर्चस्ववादी विचारसरणीचा भडिमार त्यांच्यावर होतो आहे. त्यातूनही अनेक सामाजिक समस्या आणि गुन्हेगारीला खतपाणीही इथूनच मिळत आहे. आणि या माहितीच्या या प्रस्फोटाला नियंत्रित करणं, ही आवाक्याबाहेरची गोष्ट आहे- साऱ्यांच्याच!
या पार्श्वभूमीवर सोशल मिडिया हे आपलं भवितव्य आहेच, हे नाकारता येत नसलं तरी त्याचा संयमित, नियंत्रित आणि व्यापक सामाजिक हित डोळ्यांसमोर ठेवून  वापर केला जाणे ही खूप आवश्यक बाब आहे. आणि ती केवळ सेल्फ रेग्युलेशनच्या माध्यमातूनच शक्य आहे. तरुणांनी जसा या माध्यमाला ॲक्सेप्टन्स दिला आहे, त्याच प्रमाणे सेल्फ रेग्युलेशन मेथडही त्यांनीच ॲडॉप्ट करणे, डेव्हलप करणे हा या सर्व चर्चेचा कळीचा मुद्दा आहे.

२ टिप्पण्या: