बुधवार, २ नोव्हेंबर, २०१६

अनबॉक्सिंग बिग बिलियन ग्रेट इंडियन ऑनलाईन रिटेल मार्केट!





(रविवार, दि. ३० ऑक्टोबर २०१६ रोजी 'दै. पुढारी'च्या साप्ताहिक 'बहार' पुरवणीत ई-कॉमर्स कंपन्यांच्या उलाढालीच्या अनुषंगाने आढावा घेणारा लेख प्रकाशित झाला आहे. हा लेख माझ्या ब्लॉग वाचकांसाठी पुनर्प्रकाशित करीत आहे.)

गेल्या आठवड्यात कल्याणमध्ये होतो. खडकपाडा सर्कल परिसरात एक परिचयाचा दुकानदार आहे. भांडीकुंडी, होम अप्लायन्सेस वितरक आहे. गेलो की भेटतो त्याला. तसाच यावेळीही भेटलो. विचारलं, कैसा चल रहा है भाई?’ त्यावर नेहमी हसतमुखानं आपकी दुवा से अच्छा चल रहा है साब. असं सांगणाऱ्या त्या तरुण व्यापाऱ्याच्या चेहऱ्यावर मला चिंता दिसली. हातात हात घेऊन तो म्हणाला, साब, ऑनलाइन बेचनेवालों की वजह से हमारे धंदे की बरकत कम हो गई है। लोग भी अब दुकान में कम ही आते हैं। यहीं सब चीजें अगर उन्हें घर बैठे और हमसे भी कम दामों में मिलने लगीं, तो वो आएँगे भी तो कैसे? हमें उतने कम दाम में बेचना परवडता ही नहीं, तो बेचें कैसे? अब लोग हमारे पास किंमत पुछते हैं, और उससे भी सस्ते में ऑनलाइन मँगवाते हैं। ऐसा ही चलता रहा तो हमारी कोई खैर नहीं। व्यापारी मित्राच्या शब्दाशब्दांतून चिंता झळकत होती, त्याच्या अस्तित्वाची. त्यानं मलाही अंतर्मुख होऊन विचार करायला भाग पाडलं, एकूणच भारतातल्या रिटेल मार्केटविषयी!
त्यानं जी वेदना बोलून दाखविली, ती आज देशातल्या साऱ्याच किरकोळ वस्तू विक्रेत्यांची सार्वत्रिक वेदना जशी आहे, तसंच एक न नाकारता येणारं वास्तवही आहे. डिजीटल क्रांतीनं ज्या काही क्रांतीकारक गोष्टींची देणगी आपणास दिली आहे, त्यामध्ये ई-कॉमर्स ही एक महत्त्वाची बाब आहे. संगणकीय ॲप्लीकेशन्स मोबाईल क्रांतीमुळं आता थेट ग्राहकाच्या तळहातावर येऊन विसावल्यामुळं या ई-कॉमर्स क्रांतीला गतिमानता आली आहे. गेल्या काही दिवसांत तर आपण सारे ग्राहक या क्रांतीचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष किंवा मूक साक्षीदारही बनलो आहोत.
यंदाच्या वर्षाची गंमत म्हणजे गणेशोत्सवापासून जी आपल्या सणासुदीच्या दिवसांना सुरवात झालीय, ती आता थेट दिवाळीपर्यंत येऊन ठेपली आहे. दोन सणांच्या मध्ये जास्तीत जास्त दहा ते पंधरा दिवसांचाच कालावधी आपल्याला मिळाला. एरव्हीही थोड्या फार फरकानं तसंच असतं, पण साधारण दोन सणांत किमान तीन ते चार आठवड्यांचा कालावधी ग्राहकाला मिळतो. आणि यंदाच्या वर्षाचं आणखी एक वेगळेपण म्हणजे गेली तीन चार वर्षे हवा तसा पाऊस न झाल्यानं किंबहुना, कधी नव्हे इतक्या दुष्काळाच्या झळाच अधिक सोसाव्या लागल्यानं सणासुदीत बाजारपेठेचा हमखास ग्राहक असणारा सर्वसामान्य, शेतकरी वर्ग बाजारापासून दुरावला होता. नोकरदार वर्गाच्या भरवशावर मार्केट तग धरून होतं. या पार्श्वभूमीवर यंदा पीकपाणी चांगलं झाल्याचा आनंदही मार्केटमध्ये पसरला आणि किरकोळ बाजारपेठेत यंदा कधी नव्हे, इतकी चहलपहल दिसली. किरकोळ वस्तूंच्या दुकानांइतकीच किंबहुना, नजरेत भरण्याइतकी उलाढाल ई-कॉमर्स कंपन्यांकडून झाल्याचं दिसून आलं. गणेशोत्सवापासूनच दसरा-दिवाळीच्या खरेदीचे पडघम या ई-कॉमर्स कंपन्यांनी वाजवायला सुरवात केली. यामध्ये भारतीय फ्लिपकार्ट, स्नॅपडील आणि मूळची अमेरिकन असलेली ॲमेझॉन-इंडिया या तीन कंपन्यांनी ऑनलाइन मार्केटमध्ये जोरदार गाजावाजा करीत ग्राहकांना आकर्षित करून घ्यायला सुरवात केली. ॲमेझॉननं ग्रेट इंडियन फेस्टीव्हल, फ्लिपकार्टनं बिग बिलीयन सेल आणि स्नॅपडीलनं आता अनबॉक्स दिवाली अशा महायोजना जाहीर करीत ग्राहकांवर ५० ते ७० टक्क्यांपर्यंत सवलतींचा वर्षाव केला. काही वस्तूंवर तर ९० टक्क्यांपर्यंतही डिस्काऊंट जाहीर केला. यात विशेषतः स्मार्टफोन्स, इलेक्ट्रॉनिक वस्तू, होम अप्लायन्सेस, होम फर्निशिंग, फर्निचर, फॅशन, कपडे आदी गोष्टींचा समावेश राहिला. या मेगा-सेलना भारतीय ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला.
यंदा उपरोक्त वस्तूंच्या थेट विक्रीच्या तुलनेत ऑनलाइन मार्केटमधून त्यांच्या खरेदी-विक्रीचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले. आणि यापुढील काळात ही आकडेवारी उत्तरोत्तर वाढतच जाणार आहे.
भारतात रिटेल इंडस्ट्री ही सध्या अत्यंत गतिमानतेने वाढत आहे. राष्ट्रीय सकल उत्पन्नात या क्षेत्राचा वाटा दहा टक्क्यांहून अधिक आहे, तर रोजगार निर्मितीचे प्रमाण ८ टक्क्यांच्या घरात आहे. रिटेल उद्योगांच्या बाबतीत भारत जगात पाचव्या स्थानी आहे. रिटेलर्स असोसिएशन ऑफ इंडिया आणि द बोस्टन कन्सल्टिंग ग्रुप यांनी संयुक्तपणे प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, सन २०१५मध्ये भारतातील रिटेल मार्केटमधील उलाढाल ६०० अब्ज अमेरिकी डॉलरच्या घरात होती, ती सन २०२०पर्यंत १००० अब्ज डॉलरचा आकडा पार करण्याची शक्यता वर्तविली आहे. एकूण रिटेल मार्केट दरसाल १२ टक्के दराने वृद्धींगत होत असून त्यामध्ये ई-कॉमर्ससारख्या आधुनिक रिटेलचा वृद्धी दर २० टक्के तर पारंपरिक रिटेल बाजाराचा वृद्धी दर १० टक्के इतका राहील, असे वस्तुस्थितीनिदर्शक भाकीत या अहवालात वर्तविण्यात आले आहे. ई-कॉमर्समध्ये बिझनेस टू बिझनेस (बी-२-बी) मार्केटचा विस्तार सन २०२०पर्यंत ७०० अब्ज डॉलरच्या घरात होणार असून बिझनेस टू कन्झ्युमर (बी-२-सी) मार्केट १०२ अब्ज डॉलरच्या घरात पोहोचेल, असेही त्यात म्हटले आहे. विशेष म्हणजे येत्या पाच वर्षांत ऑनलाइन रिटेलचा बाजार हा थेट रिटेल मार्केटच्या बरोबरीचा असेल, असेही निरीक्षण यात नोंदविण्यात आले आहे.
भारत सरकारने ऑनलाइन रिटेल मार्केटमध्ये शंभर टक्के थेट परकीय गुंतवणुकीस दिलेली परवानगी आणि इंटरनेट वापरकर्त्यांची वाढती संख्या या दोन्ही बाबींमुळे भारत ही जगातली सर्वाधिक वेगाने वाढणारी रिटेल बाजारपेठ ठरली आहे. त्यामुळे भारतात ऑनलाइन रिटेलर्सची आणि सेवा पुरवठादारांची संख्या वाढत जाणार आहे, हे निश्चित. या पार्श्वभूमीवर, सन २०१६मध्ये ३० अब्ज डॉलरच्या घरात असलेली येथील ई-कॉमर्सची उलाढाल सन २०२०पर्यंत १२० अब्ज डॉलरच्या घरात जाण्याची शक्यता आहे. सकल व्यापारी मूल्याच्या (ग्रॉस मर्कंडाईज व्हॅल्यू- जी.एम.व्ही.) निकषावर सन २०२५पर्यंत भारतीय रिटेल बाजारपेठ २२० अब्ज डॉलरच्या घरात तर ग्राहकांची संख्या ५३० दशलक्षाच्या घरात असेल. इंडिया डायरेक्ट सेलिंग असोसिएशनच्या अहवालानुसार, वित्तीय वर्ष २०१९-२०पर्यंत भारतातील थेट किरकोळ विक्री उद्योग २३,६५४ कोटी (३.५१ अब्ज डॉलर) इतक्या उलाढालीचा असेल. डिपार्टमेंट ऑफ इंडस्ट्रीयल पॉलिसीज ॲन्ड प्रमोशन्सच्या अहवालानुसार, एप्रिल २००० ते मार्च २०१६ या कालावधीत भारतीय किरकोळ व्यापारात सुमारे ५३७.६१ दशलक्ष अमेरिकी डॉलरची थेट परकीय गुंतवणूक झाली आहे.
उपरोक्त साऱ्या आकडेवारीची चर्चा करण्याचे कारण असे की, त्यावरुन भारताची रिटेल मार्केटमधली क्षमता आणि भवितव्य यांचा अंदाज वाचकाला यावा. ही वस्तुस्थिती पाहता, भारतात अमेरिकी जायंट वॉलमार्ट असो, की जागतिक बँकेचा वित्तीय विभाग असो की जगातील व देशातील प्रचंड मोट्या कंपन्या असोत, भारतातील किरकोळ व्यापारी क्षेत्रामध्ये घेत असलेल्या रसाचे आणि करीत असलेल्या गुंतवणुकीचे आश्चर्य वाटण्याचे कारण नाही.
या पार्श्वभूमीवर, भारतात गेले महिनाभर ॲमेझॉन, फ्लिपकार्ट आणि स्नॅपडील या कंपन्या घालत असलेल्या धुमाकुळाकडे पाहणे आवश्यक आहे. जास्तीत जास्त ग्राहकांना आपल्याशी जोडून भारतातील वृद्धिंगत होत चाललेल्या ई-कॉमर्स बाजारपेठेत आपले वर्चस्व प्रस्थापित करणे आणि वृद्धिंगत करणे या हेतूने या कंपन्यांनी वाटचाल चालविली आहे. गेल्या वर्षी म्हणजे ऑक्टोबर २०१५मध्ये या तिन्ही कंपन्यांनी दिलेल्या उत्सवी ऑफर्सच्या अंतर्गत सुमारे नऊ हजार कोटी रुपयांच्या वस्तूंची विक्री झालेली होती. यंदा हा आकडा दहा हजार कोटींच्या घरात जाण्याची शक्यता आहे.
सुरवातीला म्हटल्याप्रमाणे गणेशोत्सव आणि नवरात्रौत्सवात ग्राहकांवर ऑफर्सचा मोठा वर्षाव या कंपन्यांनी केला. आणि आता, वर्षातला सर्वात महत्वाचा दिवाळीचा हंगाम एन्कॅश करण्याचा या ऑनलाइन ई-कॉम कंपन्यांचा प्रयत्न आहे. दसऱ्याच्या काळात एक ते पाच ऑक्टोबर या दरम्यान ॲमेझॉन इंडियाने 'ग्रेट इंडियन फेस्टीव्हल' तर फ्लिपकार्टने दोन ते सहा ऑक्टोबर या काळात 'बिग बिलियन डे' ही योजना जाहीर केली. स्नॅपडीलने खास दिवाळीसाठी 'अनबॉक्स दिवाली' ही योजना जाहीर केली आहे. या साऱ्या योजनांतून ग्राहकांवर सवलतींची इतकी खैरात करण्यात आली आहे की, कोणीही त्याकडे आकर्षित झाल्यावाचून राहणार नाही. यामध्ये फ्लिपकार्टने यंदा आपले भारतीय ऑनलाइन बाजारावरील आपले प्रभुत्व सिद्ध केले.
फ्लिपकार्टने पाच दिवसांत १५.५ दशलक्ष इतक्या वस्तूंची विक्री केली आणि त्या माध्यमातून सुमारे ३००० कोटी रुपयांची उलाढाल केली. ३ ऑक्टोबर या एकाच दिवसात कंपनीने १४०० कोटी रुपयांच्या वस्तूंची विक्रमी विक्री केली. ६ ऑक्टोबरला केवळ दहा तासांत ६५० कोटींची उलाढाल केली.
'ॲमेझॉन इंडिया'ने त्या खालोखाल कामगिरी नोंदविली. त्यांनी १५५० ते १६५० कोटी रुपयांच्या घरात उलाढाल केली. गेल्या वर्षीच्या तुलनेत कंपनीच्या विक्रीत यंदा ४१ टक्के इतकी लक्षणीय वाढ झाली. ॲमेझॉनने यंदा अनेक विक्रम नोंदविले. योजना बंद होण्याच्या अखेरच्या सहा तासांत कंपनीकडे दीड कोटी ऑर्डर्स प्राप्त झाल्या. पहिल्या बारा तासांत १५ लाख वस्तूंची, तर पहिल्या अर्ध्या तासात एक लाख वस्तूंची विक्री कंपनीनं केली. स्नॅपडीलनेही यंदा आपली कामगिरी उंचावत गतवर्षीपेक्षा ७ टक्के अधिक वृद्धीदर नोंदविला. त्यांनी ८०० कोटी रुपयांची उलाढाल केली. दिवाळीत स्नॅपडीलची उलाढाल १७०० ते १८०० कोटींच्या घरात जाण्याची शक्यता आहे.
या साऱ्या उलाढालीत या कंपन्यांमधली शाब्दिक चकमकही पाहायला मिळाली. फ्लिपकार्टनं ॲमेझॉनवर टीका करताना असं म्हटलं की, कंपनीनं आपली विक्री वाढविण्यासाठी चूर्ण आणि हिंगही विकायचं शिल्लक ठेवलं नाही. याला प्रत्युत्तर देताना ॲमेझॉननं म्हटलं की, आमच्या ग्राहकांनी केवळ त्यांच्या शहरात न मिळणाऱ्या वस्तूच नव्हे, तर चूर्ण आणि हिंगाच्या खरेदीलाही मोठं प्राधान्य दिलं. यावरुन एक गोष्ट लक्षात येईल की, किती या ऑनलाइन बाजारात किती टोकाची स्पर्धा सुरू आहे. ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टच्या विक्रीमध्ये फारसं अंतर नाही. बाजारावरील वर्चस्वासाठी त्यांच्यात टोकाची स्पर्धा सुरू आहेच. पण, त्यामध्ये केवळ एकमेकांशी स्पर्धा एवढेच कारण नाही, तर नजीकच्या काळात ऑनलाईन मार्केटमध्ये जगभरातील अनेक दिग्गज प्रायव्हेट प्लेअर्स उतरणार आहेत. प्रचंड मोठी गुंतवणूक या क्षेत्रात होते आहे. त्या कंपन्या येण्याआधीच बाजारात आपला लॉयल ग्राहकवर्ग निर्माण करणे आणि जास्तीत जास्त मार्केट शेअर आपल्या ताब्यात ठेवणे, यासाठी त्यांचा संघर्ष सुरू आहे. मात्र, ऑनलाइन बाजारात नेमका लॉयल ग्राहक मिळणे आणि तो टिकवून ठेवणे, हेच मुळात मोठे आव्हान आहे. कारण हा ग्राहक बाजारात नवीन काय आलंय, याचा सातत्याने शोध घेत असतो आणि नवनवीन गोष्टी ट्राय करण्याकडे त्याचा कल असतो. म्हणूनच नवीन विशेषतः परदेशी कंपन्यांनाही इथे अजून बरीच संधी असल्याची जाणीव आहे. भारतातील वाढत्या नागरीकरणामुळे दुय्यम, तिय्यम दर्जाच्या शहरांतील ग्राहकवर्ग अद्याप या ऑनलाइन बाजाराशी जोडला जायचा आहे. तो मिळविण्यासाठीच ई-कॉमर्स कंपन्या आता सरसावल्या आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा