शनिवार, ५ नोव्हेंबर, २०१६

ओॲसिस!

(दै. सकाळच्या कोल्हापूर आवृत्तीचा यंदा सलग दुसऱ्या वर्षी स्वतंत्र दिपावली विशेषांक प्रकाशित करण्यात आला आहे. यंदा 'प्रेरणोत्सव' विषयाला वाहिलेला हा अंक विशेष वाचनीय ठरला आहे. गतवर्षीप्रमाणे यंदाही या विशेषांकासाठी लिहीण्याचा आनंद लाभला. गेल्या वर्षीच्या लेखाचे आपण सर्वांनी स्वागत केले होतेच; हा लेखही आपणास निश्चित आवडेल, असा विश्वास आहे.- आलोक जत्राटकर)


 

प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात पदोपदी नित्यनव्या अनुभवांना सामोरी जात असते. त्या अनुभवांतून व्यक्तीमत्त्व समृद्ध होत असते. आयुष्याची दिशा त्यातून निश्चत होत असते. प्रत्येक अनुभव त्याच तोडीचा असेल, असे नाही; मात्र, काही अनुभव आपल्याला आरपार बदलून टाकणारे असतात. आयुष्यावर दूरगामी परिणाम करणारे ठरतात. काही अनुभव तुमची परीक्षा पाहणारे असतात; तर, काही आयुष्याचा धडा शिकवणारेही असतात. मी जेव्हा माझ्या आयुष्यातील अशा काही घटनांचा मागोवा घेतो, तेव्हा त्यातील एक अनुभव माझी परीक्षा पाहणारा आणि आयुष्याची दिशा ठरविणाराही होता. खरं तर स्मृतीपटलावरुन पार पुसून टाकावा, असा तो प्रसंग; पण माझ्या मनावर, हृदयावर त्या आठवणी इतक्या ठशीवपणानं कोरल्या गेल्या आहेत की, जणू काही कालच ते सारे प्रसंग घडून गेले आहेत. आठवलं तरी अंगावर काटा उभा राहतो आणि डोळ्यांत पाणीही... त्या एका प्रसंगानंतर मी आयुष्यात अचानक प्रथमच खूप मॅच्युअर झालो आणि आयुष्याकडं पाहण्याचा दृष्टीकोनही पार बदलून गेला. त्याची ही कथा...
सन 1995... जून महिन्यात बारावीचा निकाल लागला. अभ्यासात गती बरी असल्यामुळं चांगले मार्क मिळणार आणि इंजिनिअरिंगलाही सहज प्रवेश मिळणार, अशी भावना होती, माझी आणि आईवडिलांचीही. मेडिकल मला करायचं नव्हतं कारण बायोलॉजी आवडत असलं तरी चांगला डॉक्टर होऊ शकेन, असं माझं मलाच वाटत नव्हतं. नव्वद टक्क्यांची अपेक्षा नव्हती. माझ्या कॅलक्युलेशनप्रमाणं 70 ते 75 टक्क्यांच्या घरात ॲग्रीगेट आणि 80 टक्क्यांपर्यंत ग्रुपला मार्क मिळतील, असं गृहित धरून कागदपत्रांची जमवाजमव निकालाच्या आधीच चालू केलेली... अकरावीपर्यंत मी साधारणपणे जितके मार्क मिळू शकतील, असा अंदाज आईबाबांना सांगायचो, त्याच्या आसपास किंबहुना दोन-चार टक्के अधिकच मार्क मला मिळायचे. तसंच यंदाही होईल, असं वाटलेलं. हो, फिजिक्स-1चा पेपर मात्र त्या वर्षी इतका टफ होता की, तो पेपर बरा गेलाय, असं सांगणारा माझ्या कॉलेजातलाच काय, राज्यात मला भेटलेला एकही मित्र सांगत नव्हता. (आयआयटीच्या तयारीसाठी म्हणून पुण्यात एका खाजगी क्लासलाही मी जॉईन झालो होतो, तिथं राज्यभरातून आलेल्या मित्रांच्या प्रतिक्रियांवरुन हे लक्षात आलं.)
निकाल लागला... दोन्ही अर्थांनी! माझ्या अपेक्षेपेक्षा ॲग्रीगेट मार्क दहा टक्क्यांनी कमी पडले होते. मॅथ्स आणि बायो या दोन्ही ग्रुपलाही त्याच्या आसपासच म्हणजे 68 टक्क्यांच्या घरातच मार्क पडले. हा मोठा धक्का होता, माझ्यासह घरच्यांसाठीही! कारणमीमांसा करण्याच्या नादाला लागण्यात काही अर्थ नव्हता, पण मार्क कमी पडले, ही वस्तुस्थिती होती. ती स्वीकारण्याखेरीज पर्याय नव्हता. निकालाच्या वेळी मी आजारी होतो. झोपूनच होतो. निकाल घ्यायलाही वडीलच गेले होते. ज्या कॉलेजमध्ये ते शिकवत होते, जिथं त्यांच्या मुलाकडून चांगल्या मार्कांची अपेक्षा केली जात होती, तिथं माझं ते मार्कलिस्ट हातात पडल्यानंतर त्यांना काय वाटलं असेल, याची कल्पनाच करवत नाही. त्याशिवाय, जिथं इतर सहकारी प्राध्यापकांचीच नव्हे, तर कर्मचाऱ्यांचीही मुलं टॉपर म्हणून झळकली होती आणि आपल्या मुलाचीही तिथं असण्याची क्षमता आहे, अशी त्यांची धारणा असताना मी त्यांची ती माफक अपेक्षाही पूर्ण करू शकलो नव्हतो. सहकारी प्राध्यापकांच्या प्रश्नांना त्यांनी कसं तोंड दिलं असेल, कोणास ठाऊक! एक मात्र होतं की, इतर प्राध्यापकांच्या मुलांच्या यशापेक्षा त्या वर्षी माझं फेल्युअर (हो, कमी मार्क हे सुद्धा विद्यार्थी जीवनातलं मोठं फेल्युअरच होतं कारण तोपर्यंत नेहमी वर्गात पहिल्या एक दोन क्रमांकात राहणाऱ्यातला मी होतो.) हा अधिक मोठा चर्चेचा विषय 'बनविला' गेला होता खरा. असो..
बाबा घरी आले. त्यांच्या सहनशीलतेचा जणू अंत झालेला. मी तापानं फणफणलो होतो, निकालाच्या अस्वस्थतेच झोपलो होतो. त्यांनी मला उठवलं नाही. ते आमच्या घराच्या गच्चीवर बराच काळ गेलेले होते. तोपर्यंत आईही शाळेतून घरी आली. त्या दोघांचंही माझ्या निकालाविषयी बोलणं झालं. आईनंच मला उठवलं. मी उठल्यानंतर मला माझा निकाल दाखवला. तो माझ्या आयुष्यातला एक असा क्षण होता की, आईवडिलांच्या डोळ्याला डोळा भिडवण्याचं धाडस मला झालं नाही. पण, निकाल पाहताच माझ्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. आईनंही मला जवळ घेत तिच्या अश्रूंना वाट करून दिली. बाबा मात्र शेजारी उभे होते. त्यांच्या डोळ्यांत तेव्हा पाणी नव्हतं, पण डोळे सुजलेले होते.
थोड्या वेळानं बाबांनी मला जवळ घेतलं आणि समजावलं की, 'जे झालं, ते झालं. आपलं यश किंवा अपयश या दोन्ही गोष्टींसाठी जबाबदार आपणच असतो. नेहमीपेक्षा यंदा आपण अभ्यासात कमी पडलो, हे लक्षात घ्यायचं. इथून पुढं तसं होऊ द्यायचं नाही. आता मिळविलेले मार्कही काही कमी नाहीत. आहेत त्या मार्कांनिशी आपण पूर्ण तयारीनं इंजिनिअरिंगच्या भरती प्रक्रियेला सामोरे जाऊ या.' बाबांनी समजावलं खरं, पण माझं मलाच मन खात होतं. स्वतःला आयुष्यभर सर्वात हुशार समजणाऱ्या माझ्यासारख्यालाच कमी मार्कांचं शल्य  काय असतं, ते समजावून घेण्याची वेळ आलेली होती. त्यावेळी पहिल्यांदा वर्गात नेहमीच सर्वसाधारण परफॉर्मन्स असणाऱ्या विद्यार्थ्यांबद्दल मला जाम असूया वाटू लागली कारण ते नेहमीच सेफ झोन (?) मध्ये राहिलेले होते. पण, आत्ताच्या निकालानं मला मात्र वासरात लंगडी गाय ठरवलं होतं, हेच दुःख मला आतल्या आत कुरतडत राहिलं. आपले वर्गातले पहिले-दुसरे नंबर पुढं जगाच्या स्पर्धेत कसे कुचकामी ठरतात, याची प्रचिती मला त्या निकालानं दिली होती.
मी दुसऱ्या दिवशी सकाळी थोडं बरं वाटावं म्हणून गच्चीत गेलो, तर त्यावेळी एक अत्यंत विदारक चित्र नजरेस पडलं, जे कधीही विसरू शकणार नाही. गच्चीत बाबांनी आणि मी विविधरंगी गुलाबाच्या कुंड्या सजवलेल्या होत्या. त्या साऱ्या कुंड्या फुटलेल्या होत्या आणि त्यांचे तुकडे इतस्ततः विखुरलेले होते. जणू आमच्या आयुष्यातील एक नितांतसुंदर गुलाबांची बागच उद्ध्वस्त झाली होती, जी आता कधीच फुलणार नव्हती. त्या क्षणाला एक ठरवलं, गच्चीत पुन्हा गुलाब फुलेल की नाही, माहीत नाही; मात्र, आईबाबांच्या मनाची माझ्यामुळं विराण झालेली बाग मी पुन्हा निश्चितपणे फुलवणारच! हे मी कसं करणार होतो, हे त्या क्षणी काही मला समजत नव्हतं. पण करायचं होतं, एवढं मात्र नक्की!
इतकं सगळं होऊनही आईबाबा माझ्यावर रागावले मात्र नाहीत. त्यांना अजिबातच राग आला नसेल, असं नव्हे; पण, माझ्या बाबतीत त्यांनी त्या क्षणी जो समजूतदारपणा दाखविला, त्याला तोड नाही. आजही जेव्हा त्यांच्या जागी मी असतो, तर काय केलं असतं, याचा विचार करतो, तेव्हा त्या प्रसंगाची तीव्रता मला जाणवते. आणि त्याचवेळी इतके प्रेमळ आईवडिल मला लाभले, याबद्दल कृतज्ञताही मनात दाटून येते.
आई-बाबा दोघांनीही उलट माझीच समजूत घातली. कुठल्याही क्षणी माझ्या मनात नकारात्मक विचार येणार नाहीत, याची त्यांनी कसोशीने खबरदारी घेतली. उलट, आहे त्या मार्कांनिशी आपण विविध इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी प्रयत्न करू या, असा विश्वास माझ्या मनी जागविला.
आम्ही कर्नाटक-महाराष्ट्र सीमाभागात, निपाणीत राहात असल्यामुळे या भागातील विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्रात अभियांत्रिकी, मेडिकल आणि डेंटल अभ्यासक्रमासाठी काही जागा राखीव असतात. पॉप्युलरली या जागा बॉर्डर सीट म्हणून ओळखल्या जातात. त्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची जमवाजमव करण्यासाठीची धावपळ बाबांनीच केली. आमदारांच्या पत्रापासून ते स्थानिक प्रशासनाकडून आवश्यक ती सर्व कागदपत्रे त्यांनीच जमा केली.
मेडिकलमध्ये मलाच रस नसल्यामुळे केवळ अभियांत्रिकीसाठीच प्रयत्न करायचे होते. त्यासाठीची मध्यवर्ती प्रवेश प्रक्रिया होणार होती, पुण्याच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात. ज्या दिवशी ही प्रक्रिया होणार होती, नेमक्या त्याच कालावधीत बाबांनाही कॉलेजसंदर्भातलं काही महत्त्वाचं काही काम होतं, त्यामुळं ते काही माझ्यासोबत पुण्याला येऊ शकणार नव्हते. पण, माझी काही व्यवस्था करणं गरजेचं होतं. माझ्या वर्गातल्या स्वप्नील शहाचे वडील बाबांचे क्लासमेट होते. स्वप्नीलला घेऊन ते पुण्याला जाणार होते. त्यांच्याशी बोलून मलाही त्यांच्यासोबत नेण्याची विनंती बाबांनी त्यांना केली. जावेद शेख हा वर्गमित्रही त्याच्या वडिलांसोबत आम्हाला जॉइन झाला. त्यामुळं एक स्वतंत्र ट्रॅक्स करूनच जायचा निर्णय घेतला. प्रा. यादव काका हे शहा काका आणि बाबांचे कॉमन मित्र होते. त्यांचा मुलगा म्हणजे शैलूदादा इंजिनिअरिंगला असल्यामुळं ॲडमिशन प्रक्रियेचे माहीतगार म्हणून आणि माझे केअरटेकर म्हणून त्यांनीही आमच्यासोबत यावं, असं ठरलं.
त्यावेळी नव्या चारपदरी हायवेचं काम झालेलं नव्हतं. जुना पुणे-बेंगलोर महामार्ग दुपदरी होता. त्यावरुन पुण्याला पोहोचायचं, तर सात ते आठ तास लागत. त्यामुळं आदल्या दिवशीच आम्ही निघालो. पुण्यात स्वप्नीलच्या नातेवाईकांच्या घरी उतरायचं ठरलं होतं. त्याचे आईवडील सोबत होते. जावेदचेही वडील त्याच्यासोबत होते. माझ्यासोबत ते सारे होते, तरीही मी तसा एकटाच होतो. बाबांनी निघताना यादव काकांना माझ्याकडं 'लक्ष ठेवण्यास' परोपरीनं सांगितलं.
आम्ही निघालो. जातानाचा प्रवास हा साऱ्यांसाठीच आशेचा, आकांक्षेचा होता. मुलांच्या सुंदर भवितव्याची स्वप्ने पाहणारे पालक आणि त्या स्वप्नांना साकार करून आपले भावी जीवन अधिक आनंदी करण्याचे मनोरथ बाळगणारी मुलं माझ्यासोबत होती. माझ्या मनाची मात्र फारच दोलायमान स्थिती होती. उद्याचा दिवस जणू आजच माझ्यासमोर उभा ठाकला होता. ट्रॅक्सच्या मागच्या बाजूला मी बसलेलो होतो. तिथून मागे पडत जाणाऱ्या रस्त्याकडं मी पाहात होतो. आयुष्याच्या वाटचालीत आजपर्यंत असं मागे पडणाऱ्या रस्त्याकडं पाहण्याची वेळ आली नव्हती. आता मात्र त्याचा वेध घ्यावा लागणार आहे, असंच जणू तो रस्ता सूचित करीत होता. उद्या परतताना तो माझं स्वागत करणार होता किंवा कसे, हे त्यालाही ठाऊक नसावे. गरजही नव्हती त्याला. स्थितप्रज्ञता कोणी या रस्त्यांकडून शिकावी. पांथिकाला इप्सित स्थळी जाण्यासाठी मदत करताना स्वतः मात्र वर्षानुवर्षे आपली जागा न सोडण्याची निगर्वी वृत्ती या रस्त्याकडून घ्यावी. नाही तर, एखाद्या छोट्या गोष्टीसाठी कारण होणारे आपण मात्र त्या गोष्टीचा दंभ हयातभर मिरवित राहतो. सब बकवास!
रात्री आम्ही पुण्याला पोहोचलो. प्रवासानं सारेच थकले होते. जेवण झाल्यानंतर उद्यासाठीच्या कागदपत्रांच्या जुळणीवर पुन्हा एकवार नजर टाकून उद्याच्याच चिंतेत सारेच झोपले. बाप लोकांना झोप लागली असेल, असं मला तरी वाटत नाही. तिकडं दूर गावाकडं माझ्या आईबापाचाही डोळ्याला डोळा लागला नसेल, याचीही खात्री होती. भविष्याची दिशा निश्चित करणारा तो दिवस आमच्या ओंजळीत टाकण्यासाठी सूर्यही पावसाळ्याच्या दिवसांतही दर्शन देता झाला. लवकरच तयार होऊन सकाळी आठ वाजताच आम्ही सारे सीओईपीमध्ये पोहोचलो. कॉलेजच्या मोठ्या ऑडिटोरियममध्ये प्रवेश प्रक्रिया होणार होती. तिथे आमच्या कॉलेजमधले इतरही मित्र-मैत्रिणी आलेले होते. बॉर्डर सीटच्या प्रवेशासाठी बेळगावहूनही बरेच विद्यार्थी आले होते. मेरिटनुसारच प्रक्रिया होणार होती. जागा वीसच होत्या. त्यात बसावं लागणार होतं.
बॉर्डर सीटची प्रक्रिया सुरू झाली. एकेक विद्यार्थ्याचं नाव कॉल केलं जाऊ लागलं, तसतशी छातीतली धडधड वाढू लागली. क्रमांक पुढेपुढे सरकू लागले. ॲडमिशन मिळालेल्या मित्रमैत्रिणींचे आणि त्यांच्या आईवडिलांचे उजळलेले चेहरे पाहताना माझ्या चेहऱ्यावर मात्र चिंतेचं जाळं अधिकच गडद होत चाललं होतं. माझाच मित्र महादेव पाटील यालाच बहुधा बॉर्डर सीटमधलं अखेरचं ॲडमिशन मिळालं आणि प्रक्रिया पूर्ण झाल्याचं घोषित करण्यात आलं. महादेव हा गरीब परिस्थितीतला, अत्यंत होतकरू, कष्टाळू मुलगा होता. त्याला ॲडमिशन मिळालं, हे पाहून मला तशा परिस्थितीतही खूप बरं वाटलं होतं. त्याच्यानंतर माझा मित्र विनय कुलकर्णी आणि त्याच्या मागं मी, असे आमचे नंबर होते. विन्याच्या तोंडावर ॲडमिशन बंद झालं होतं, त्यामुळं माझ्यापेक्षा त्याचं दुःख अधिक मोठं होतं. विनू आणि महादेव एकत्र आले होते. त्यामुळं ॲडमिशनची उर्वरित प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी महादेवसोबत तोही थांबला. स्वप्नील आणि जावेदलाही ॲडमिशन मिळालं होतं. त्यामुळं माझ्यासोबतचे सारेच खूष होते. यादव काकांच्या चेहऱ्यावर मला चिंता दिसत होती- माझ्यासाठीची.
एवढ्यात ॲडमिशन प्रक्रिया राबविणाऱ्या यंत्रणेकडून एक घोषणा करण्यात आली. झालं होतं असं की, बेळगावहून आलेल्या विद्यार्थ्यांमधल्या अनेक जणांना मराठी विषयात अनुत्तीर्ण असूनही पाच विषयांचा क्रायटेरिया लावून उत्तीर्ण दाखविण्यात आलं होतं, तिकडच्या उत्तीर्णतेच्या निकषानुसार. कर्नाटक बोर्डामध्ये मराठी ही थर्ड लँग्वेज असते. त्यामुळं कन्नड व इंग्रजी या भाषा विषयांत उत्तीर्ण झाला, की मराठीचा इतका विचार केला जात नसे. पण, इथे महाराष्ट्रात मराठी उत्तीर्ण असणं अत्यावश्यक होतं. त्यामुळं बेळगावकडचे जे विद्यार्थी मराठीत नापास झालेत, त्यांना मिळालेली ॲडमिशन रद्द करून त्या जागी गुणवत्ता यादीतील पुढील विद्यार्थ्यांचा विचार केला जाईल, असं घोषित करण्यात आलं. विनू आणि माझ्या आशा पल्लवित झाल्या. यादव काकांनीही ही घोषणा ऐकताच जाग्यावरच टुण्णकन उडी मारल्याचं आजही लख्ख आठवतंय. त्या त्यांच्या एका प्रतिक्षिप्त क्रियेनं या माणसानं मला जिंकूनच घेतलं- आयुष्यभरासाठी! आजही ते दृष्य जसंच्या तसं माझ्या मनावर कोरलं गेलंय.
मराठीत नापास असणारे बरेच विद्यार्थी गुणवत्ता यादीत असले तरी ॲडमिशन मिळालेल्यांत तसा एकच विद्यार्थी होता. त्याचं ॲडमिशन रद्द करण्यात येत असताना त्याचा आणि त्याच्या आईवडिलांचा मोठा रोष यंत्रणेला झेलावा लागला, पण इलाज नव्हता. त्याच्या जागी विनूचं नाव पुकारण्यात आलं. विन्या साल्याचं नशीब त्या दिवशी जोरावर होतं. बघा ना, हातातून निसटलेलं ॲडमिशन त्याला मिळालं होतं. आणि आता त्याच्या जागेवर मी होतो. माझ्या तोंडावर ॲडमिशन क्लोज झालेलं होतं. त्या क्षणी इंजिनिअरिंग करण्याची एक महत्त्वाची संधी माझ्या हातून निसटली होती. एका एका मार्काचं महत्त्व त्या वेळेला समजत होतं.
आज जेव्हा मी मागे वळून पाहतो, तेव्हा एक गोष्ट मला जाणवते, ती म्हणजे विनूला ॲडमिशन मिळालं, ही खूप चांगली गोष्ट झाली होती. कारण त्यानं त्यानंतर एम.टेक. होईपर्यंत जे कष्ट केले, जो अभ्यास केला, त्याला तोड नव्हती. त्याच्या या प्रगतीचा मी साक्षीदार होतो. तो एक अत्यंत चांगला इंजिनिअर झालेला आहे. तितका चांगला अभियंता मी झालो असतो की नाही, याबद्दल साशंकताच वाटते.
हे माझे आजचे विचार असले तरी, त्यावेळी वाईट नक्कीच वाटलं होतं, मात्र विनूबद्दल असूया किंवा राग अशी भावना मनात आली नाही. कारण एक तर तो चांगला मित्र होता, मोअरओव्हर एक चांगला माणूस होता. चांगल्याचं चांगलं झालं होतं; मीच अभ्यासात कमी पडलो होतो, ही भावना पुन्हा मनी दाटून आली. पण, त्या क्षणी माझं दुःख मी कोणाकडं व्यक्त करावं, अशी स्थिती नव्हती. यादव काका माझ्याजवळ आले, त्यांनी फक्त माझ्या खांद्यावर हात ठेवला, म्हणाले, चल, निघू या. त्यावेळी सीओईपीच्या त्या प्रांगणातून ट्रॅक्समध्ये बसून बाहेर पडताना मागे पडणाऱ्या त्या कॅम्पसकडं मी डोळाभरून पाहात राहिलो. या परिसरात राहून इंजिनिअरिंग करण्याची संधीही त्याबरोबर मागे मागे पडत चालली होती. मला खूप गलबलून आलं, पोटात ढवळल्यासारखं झालं आणि टचकन डोळ्यांत पाण्याचा एक थेंब उभा राहिला. पण, मी पटकन स्वतःला सावरलं; सावरणं गरजेचं होतं. कारण माझ्याबरोबर सारे आनंदी लोक होते. माझ्या दुःखानं त्यांच्या आनंदात मिठाचा खडा टाकणं योग्य दिसत नव्हतं.
बाहेर पडल्यानंतर जंगली महाराज रोडवरच्या एका उंची हॉटेलात जेवणाचा बेत ठरला होता. एरव्ही खाण्याच्या बाबतीत रसिक असणाऱ्या मला त्या दिवशी एकेक घास गिळणं मुश्कील बनलं होतं. पण, स्वप्नील आणि जावेदच्या, त्यांच्या कुटुंबियांच्या आनंदात सहभागी होणं गरजेचं होतं. त्यांच्या यशाच्या सेलिब्रेशनमध्ये माझं अपयश पाठीवर टाकून मी सहभागी झालो. शेवटी माझ्या या दोन्ही मित्रांना त्यांच्या आयुष्याची दिशा त्या क्षणी सापडली होती. मला आणखी थोडा शोध घ्यावा लागणार होता.
जेवून आम्ही निघालो, परतीच्या प्रवासाला. आयुष्यात अनेक प्रवास केले असतील. निपाणी-पुणे असा प्रवासही अनेकदा केला होता. पण, त्या दिवशीचा प्रवास मात्र खूपच दीर्घ होता. काही केल्या रस्ता संपत नव्हता आणि मला तर कधी एकदा घरी पोहोचतो, असं झालं होतं. त्यावेळी मोबाईल तर नव्हतेच, पण, आमच्या घरी टेलिफोनही नव्हता. त्यामुळं आईबाबांशी संपर्क साधून त्यांना काही सांगताही आलं नव्हतं. म्हणजे तिकडं त्यांचा जीव अजूनही टांगणीला होता. मी घरी पोहोचल्याशिवाय त्यांना काही समजणार नव्हतं. आणि इकडं प्रवास तर संपतच नव्हता. रात्री उशीर झाल्यामुळं पुन्हा हायवेवरच्याच एका धाब्यावर जेवण घेतलं. दुपारी भुकेपोटी थोडंफार खाल्लं तरी होतं. आता मात्र एक घासही घशाखाली उतरत नव्हता. जेवणापेक्षा मला घरी पोहोचण्याची भूक अधिक लागली होती. त्यानंतर गाडीत बसताना जावेदच्या वडिलांनी माझ्याकडं ज्या करूणामयी दृष्टीनं पाहिलं, त्यांची ती नजर आजही मी विसरलेलो नाही. त्या नजरेनं मला माझ्या बाबांची आठवण करून दिली आणि पुन्हा एकदा मला तातडीनं घरी पोहोचावं, असं वाटू लागलं. पण, प्रवास पूर्ण केल्याखेरीज ते शक्य नव्हतं.
रात्री साडेबाराच्या सुमारास आम्ही निपाणीत पोहोचलो. मी आमच्या गल्लीच्या कोपऱ्यावरच मला सोडायला सांगितलं. बॅग घेऊन ट्रॅक्समधून उतरलो. साऱ्यांना 'गुड नाईट' केलं आणि घराच्या दिशेनं निघालो. काही फुटांचंच तेही अंतर. पण, एकेक पाऊल टाकताना जड झालेलं. घर दृष्टीपथात आलं. रस्त्यावरच्या लाईट चालू होत्या; आमचं घर मात्र काळोखात तुडूंब बुडालेलं. खांबावरची सप्लाय केबल तुटली होती. चांदण्याच्या प्रकाशात आईबाबा माझी वाट बघत घराच्या पोर्चमध्येच बसलेले होते. त्यांना पाहताच माझ्या मनात खूपच कालवाकालव होऊ लागली. पण, मी निग्रहानं स्वतःला कंट्रोल केलं. गेटमधून आत गेलो. आईबाबांनी एकदमच विचारलं, 'काय झालं?' यावर 'नाही झालं,' एवढंच उत्तर देऊन मी पटकन घरात गेलो. त्या दोघांच्या डोळ्याला डोळा देण्याचं धाडस मला झालं नाही. मनात अपराधीपणाची भावना दाटून आलेली; त्यापेक्षाही अधिक गहिवरुन आलेलं. मी तडक माझ्या खोलीत गेलो. दाराला आतून कडी घातली. बॅग बाजूला ठेवली आणि बिछान्यावर स्वतःला झोकून दिलं. उशीत तोंड खुपसून दिवसभरात साचलेल्या दुःखाला वाट करून दिली. बाहेर आईबाबांचीही काही वेगळी अवस्था असेल, अशातला भाग नव्हता. खूप वाटत होतं, त्यांच्या गळ्यात पडून मोठ्यानं रडावं; पण आधीच त्यांना खूप दुःख दिलं होतं. पुन्हा आपण त्यांना अधिक दुःखी करावं, असं वाटत नव्हतं. बराच वेळ मी तसाच रडत राहिलो. त्या अश्रूंबरोबर माझ्यातला आत्मविश्वासाचा एकेक थेंबही जणू गळून पडत राहिला. पूर्ण हतबल झाल्यासारखं वाटत होतं. तशीच पहाटे केव्हा तरी झोप लागली. सकाळी आईच्या दार ठोठावण्यानंच जागा झालो. दोन दिवसांचा वृत्तांत आईबाबांना चहा घेता घेता सांगितला. आणि अजून थर्टी पर्सेंट कोट्यातून आपण प्रयत्न करू शकतो, असा दिलासाही मीच त्यांना दिला, पण, आता कॉन्फिडन्सच गेल्यानं मनातून त्याविषयीही साशंक होतो.
पुढच्या आठवड्यात सांगलीच्या वालचंद कॉलेजमध्ये थर्टी पर्सेंट कोट्याची मेरिट लिस्ट लागणार होती. ॲडमिशन प्रक्रियेच्या आदल्या दिवशी मी जाऊन मेरिट लिस्ट पाहून बाबांना कॉलेजवर फोन करून कळवायचं आणि दुसऱ्या दिवशी ते ॲडमिशनसाठी पैसे घेऊन येणार, असं ठरलेलं. त्याप्रमाणं मी आदल्या दिवशी गेलो, तर तिथंही वेटिंग लिस्टमध्ये माझं नाव होतं. मी बाबांना तसं फोन करून सांगितलं. मीच त्यांना म्हटलं की, आता कशाला येताय? ॲडमिशन कन्फर्म होण्याची शक्यता खूप कमी आहे. तेव्हा राहू द्या. मीच उद्या परत येतो. तेव्हा बाबांनीच मला तिथंच थांबायला सांगितलं. उद्या मी आलो की पाहू, असंही सांगितलं.
आता ॲडमिशन मिळवायची असेल तर पेमेंट सीटशिवाय पर्याय नव्हता. पण, ते फारच खर्चिक ठरणार होतं. त्यावेळी पेमेंट सीटसाठी रितसर फीच 35 हजारांच्या घरात होती, 'इतर खर्च'वेगळा. आज ही रक्कम छोटी वाटत असली तरी, 1995 साली ती खूपच होती.
बाबा दुसऱ्या दिवशी आले, ते काहीही करून ॲडमिशन घ्यायची, या हिशेबानेच. त्यांच्या हँडबॅगमध्ये 50 हजार रुपये त्यांनी सोबत आणले होते. नुकतंच आम्ही घर बांधलं होतं. आईबाबांची सारी जमापुंजी त्यात गुंतली होती. असं असतानाही बाबांनी काय काय करून ते पैसे उभे केले असतील, कोणास ठाऊक! मला माझं मन कुरतडत होतं.
आम्ही दोघे त्या परिसरात लावलेल्या राज्यातल्या विविध कॉलेजच्या टेबलना भेटी देत असतानाच आमच्या परिचयाचे एक स्नेही डॉक्टरकाका त्यावेळी भेटले. लहानपणापासून ते मला ओळखत होते. त्यांचा मुलगा आणि मी आठवीपर्यंत एकाच वर्गात होतो. त्याच्या ॲडमिशनसाठी ते आले होते. ते बाबांबरोबर बोलत उभे होते. माझ्या मार्कांविषयी ऐकताच त्यांच्या बोलण्यात माझ्याविषयी हेटाळणीचा सूर मला जाणवला. इथपर्यंत ठीक आहे, पण ते त्यानंतर जे काही बोलले, तशा बोलण्याची मी त्यांच्याकडून कधीही अपेक्षा बाळगली नव्हती. एक चांगला माणूस म्हणून त्यांची माझ्या मनात जी प्रतिमा होती, तिला त्या क्षणी तडा गेला, कायमचाच. ज्यांचा मुलगा आठवीपर्यंत माझ्या मदतीशिवाय कधीही चांगले मार्क पाडू शकला नव्हता, त्याचा बाप माझ्या बाबाला नको नको ते बोलत होता, केवळ माझ्यामुळं. इतका ॲरोगन्स, इतका दुराभिमान त्यांच्या बोलण्यातून ओसंडत होता की मलाच आश्चर्य वाटत होतं. त्यांचं बाकीचं बोलणं मला लख्ख आठवत असलं तरी, त्यातलं फक्त एकच वाक्य सांगतो, ते म्हणाले, सर, उगाच पेमेंट सीटची रिस्क घेऊ नका. आज पैसा भराल, पण इंजिनिअरिंगचा अफाट खर्च तुम्हाला झेपणार कसा? त्यातही चिरंजीव पास होत गेले तर ठीकाय, नाही तर वाढीव खर्च पडेल तो वेगळाच! त्यामुळं पुन्हा एकदा विचार करा.
डॉक्टरकाका निघून गेले. त्यांचं बोलणं ऐकून बाबांचा चेहराही पडला होता. पण, त्या क्षणी त्यांचा निर्धारही पक्का झाला. काही झालं तरी आज मुलाचं ॲडमिशन नक्की करूनच घरी परतायचं. ते मला म्हणाले, कितीही खर्च आला तरी चालेल, मी तो भागवेन, पण आज तुझं ॲडमिशन करायचंच!
ते काका बोलले, त्या क्षणी त्यांच्या मनात काही नसेलही. त्यानं आमच्या भावना दुखावल्या गेल्या होत्या एवढं निश्चित. पण, ते जे बोलले होते, त्यात तथ्यही होतंच की. तो एक क्षण माझ्या आयुष्यातला एक महत्त्वाचा टप्पा होता. काही दिवसांपूर्वी गमावलेला आत्मविश्वास पुन्हा जागा होण्याचा क्षण. मी बाबांना म्हणालो, "बाबा, तुमचा माझ्यावर विश्वास असेल तर एक गोष्ट सांगतो. मला पेमेंट सीटमधून ॲडमिशन घेण्याची खरंच इच्छा नाही. मी अभ्यास करेन की नाही, पास होईन की नाही, म्हणून नव्हे; तर, इतका प्रचंड खर्च केवळ इंजिनिअरिंगच्या शिक्षणावर करावा, असं मला वाटत नाही. त्यापेक्षा मी बी.एस्सी. करीन आणि माझ्या आयुष्यात निश्चितपणे चांगलंच काही तरी करीन. काय करेन ते आताच सांगता येणार नाही, पण, तुम्हाला अभिमान वाटेल, असं काही तरी निश्चित करेन!"
माझ्या बापाच्या डोळ्यांत त्या वेळेला मला अभिमानाची चमक दिसली आणि बऱ्याच दिवसांनी आनंदाचे अश्रू! आतापर्यंतच्या वाटचालीत माझ्यामुळं त्यांच्या डोळ्यांत आलेले ते अखेरचे अश्रू ठरले असले तरी आजपर्यंत त्यांच्या डोळ्यातील ती अभिमानाची चमक जपून ठेवण्यात मी यशस्वी ठरलो आहे, यापेक्षा आयुष्यातले मोठे यश दुसरे कोणते असू शकेल?

1 टिप्पणी: