गुरुवार, २४ नोव्हेंबर, २०१६

प्रभावी 'गुगलिंग'साठी!

(महाराष्ट्र शासनाचे मुखपत्र असलेल्या 'लोकराज्य'च्या नोव्हेंबर २०१६च्या अंकात 'गुगल' सर्च इंजिनचा प्रभावीपणे वापर कसा करावा, याविषयी लेख प्रसिद्ध झाला आहे. माझ्या ब्लॉग वाचकांसाठी येथे तो पुनर्प्रकाशित करीत आहे.- आलोक जत्राटकर)
साधारण अठरा वर्षांपूर्वी लॅरी पेज आणि सर्जी ब्रेन या दोघांनी 'गुगल' कंपनीची स्थापना करेपर्यंत जगाला केवळ क्रिकेटमधील 'गुगली' हा शब्द ठाऊक होता. गेल्या अठरा वर्षांत मात्र 'गुगल' या शब्दानं आपलं अवघं विश्व व्यापून टाकलं आहे. आजघडीला आपल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपण इतर कोणाही पेक्षा गुगलची मदत घेणं पसंत करतो. 'फॉर एनी काईंड ऑफ क्वेरी, आय जस्ट गुगल!' असं आपण अभिमानानं सांगतो. गुगल या कंपनीचा हा एका शब्दापासून ते क्रियापद होण्यापर्यंतचा प्रवास चकित करणारा आहे. आपल्या प्रत्येक शंकेचं समाधान करणारं गुगल हे जणू आपल्या दैनंदिन जीवनातला वाटाड्या, व्हर्च्युअल गुरूच बनलं आहे.
इंटरनेटवर एकूण चालणाऱ्या माहितीच्या शोधांपैकी सुमारे 70 टक्के शोध हे गुगल सर्च इंजिनच्या सहाय्यानं केले जातात. उर्वरित 30 टक्के शोध अन्य सर्च इंजिन्सच्या सहाय्यानं घेतले जातात. इंटरनेटवर कोणत्याही माहितीचा शोध घेण्यासाठी गुगलचा वापर करावा, हे एव्हाना प्रत्येकाला ठाऊक झाले आहे. किंबहुना, त्याच्या इंटरनेट सर्फिंगची सुरवातच मुळी गुगलच्या होमपेजपासून होते. त्यामुळं शोधासाठी गुगल वापरणं, हे ठीकच आहे; परंतु, गुगलवरून आपल्याला हव्या त्या माहितीचा शोध अधिक प्रभावीपणे कसा घ्यावा, याची येथे आपण चर्चा करणार आहोत.
सर्वप्रथम आपल्याला कोणत्या पद्धतीची माहिती शोधायची आहे, ते वापरकर्त्याने ठरवावे. उदा. छायाचित्रे, व्हिडिओ, बातमी, पुस्तके किंवा इतर काही. याचे कारण म्हणजे गुगलवर वापरकर्त्यांच्या सोयीसाठी अनेक विविध महत्त्वाचे प्लॅटफॉर्म विकसित केलेले आहेत. त्या त्या ठिकाणी जाऊन संबंधित कॅटेगरीमध्ये अधिक प्रभावीपणे शोध घेणे सोयीचे जाते. गुगलच्या या प्लॅटफॉर्ममध्ये छायाचित्रांसाठी इमेजिस, फोटोज, पिकासा इ., व्हिडिओज, युट्यूब, न्यूज (बातम्या), ट्रान्सलेट (भाषांतरासाठी उपयुक्त), मॅप्स (नकाशे) व गुगल अर्थ, डॉक्स (कागदपत्रे), बुक्स (पुस्तके), ब्लॉगर (ब्लॉग लेखन, वाचन इ.साठी), स्कॉलर (संशोधनविषयक माहितीसाठी) आदींचा समावेश आहे. या ठिकाणी जाऊन वापरकर्ता त्याला हव्या त्या प्रकारचे संदर्भ, माहिती शोधू शकतो. याखेरीज, व्यावसायिकांना व्यवसाय वृद्धीसाठी ॲडवर्ड्स, ॲडसेन्स, जी-सूट, गुगल बिझनेस, ॲडमोब असे काही स्वतंत्र प्लॅटफॉर्म आहेत.
याखेरीज, पुढील काही बाबींचा वापर करून गुगलवरून आपला शोध अधिक प्रभावी करता येऊ शकेल.
विरामचिन्हांचा योग्य वापर: विविध विराम चिन्हांचा वापर करून आपल्याला हव्या असलेल्या नेमक्या माहितीचा शोध घेणे शक्य होते.  
अवतरण चिन्ह: गुगलच्या सर्च बारमध्ये अवतरण चिन्हात आपल्याला शोधायचा असलेला शब्द किंवा शब्दसमूह टाकल्यास केवळ त्या शब्दाचा अथवा शब्द समूहाचा समावेश असलेल्या माहितीची पानेच गुगल आपल्याला दाखवेल.
उदा. समजा, आपल्याला केवळ शिवाजी विद्यापीठाशी निगडित माहिती घ्यायची आहे; तर, अशा वेळी सर्च बारमध्ये "Shivaji University" असे दुहेरी अवतरण चिन्हासह टाइप करावे, म्हणजे केवळ तीच माहिती आपल्याला दिसेल.
वजा (-) चिन्ह: आपल्याला काही विशिष्ट माहिती वगळून त्याखेरीज अन्य माहिती हवी असल्यास वजा चिन्हाचा वापर करता येतो.
उदा. समजा, आपल्याला विद्यापीठ वगळून शिवाजी या शब्दाविषयी अन्य माहिती हवी असेल, तेव्हा सर्च बारमध्ये Shivaji -University असे टाइप करावे. यावेळी आपल्याला शिवाजी विद्यापीठाशी निगडित असलेली माहिती वगळून अन्य माहिती असणारी पाने दिसू लागतील.
स्वल्पविराम: जेव्हा आपल्याला एकापेक्षा अधिक शब्दांशी निगडित माहिती शोधावयाची असते, अशा वेळी स्वल्पविरामाचा वापर करावा.
उदा. समजा, आपल्याला शिवाजी विद्यापीठ आणि डॉ. देवानंद शिंदे यांच्याविषयीची माहिती शोधावयाची आहे, अशा वेळी सर्च बारमध्ये Shivaji University, Dr. Devanand Shinde असे टाइप करावे. यावेळी आपल्याला शिवाजी विद्यापीठ आणि डॉ. देवानंद शिंदे यांची एकत्रित तसेच स्वतंत्र माहिती असणारी वेबपेजेस दिसू लागतील.
AND आणि OR या शब्दांचा वापर:
उपरोक्त शोध अधिक प्रभावी करण्यासाठी AND किंवा OR या शब्दांचा वापर करता येतो. आपल्याला शिवाजी विद्यापीठ आणि डॉ. देवानंद शिंदे या दोहोंचा समावेश असणारी पानेच केवळ पाहायची असतील, अशा वेळी त्या दोहोंमध्ये कॅपिटल AND वापरावे. तसेच, दोहोंपैकी कोणत्याही एकाचा समावेश असणारी पाने पाहावयाची असतील, तर अशा वेळी त्या दोहोंमध्ये कॅपिटल OR वापरले जाते.
तुलनात्मक माहिती घेण्यासाठी vs चा वापर:
जेव्हा आपल्याला दोन घटकांची तुलनात्मक माहिती घ्यावयाची असेल, त्यावेळी त्या दोन शब्दांच्या मध्ये 'vs' या शब्दाचा वापर केला जातो.
उदा. साखर आणि गूळ यांची तुलनात्मक माहिती हवी असल्यास सर्च बारमध्ये Sugar vs Jaggery असे टाइप केल्यास दोहोंची तुलना करणारी माहिती सादर केली जाते.   
ॲस्टेरिस्क (*) चिन्हाचा वापर: जेव्हा आपल्याला एखाद्या कवितेमधील किंवा सुविचारामधील काही ठराविक शब्दच माहिती असतील, अशा वेळी ॲस्टेरिस्क चिन्ह आपल्या मदतीला धावून येते. आपल्याला माहिती असणाऱ्या शब्दांच्या मध्ये हे चिन्ह टाकले की, त्या संपूर्ण कवितेचा, ओळीचा समावेश असणारी पाने गुगल आपल्यासमोर सादर करते.
उदा. समजा, आपल्याला शिवमुद्रेमधील सुरवातीचे 'प्रतिपश्चंद्रलेखेव' आणि अखेरचे 'मुद्रा भद्राय राजते' एवढेच शब्द ठाऊक आहेत. परंतु, हा संपूर्ण श्लोक जाणून घेण्यासाठी आपल्याला या दोन शब्दांच्या मध्ये ॲस्टेरिस्क (*) चिन्ह टाकावे लागेल. त्यानंतर आपल्यासमोर 'प्रतिपश्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता। शाहसनोशिवस्यैष मुद्रा भद्राय राजते' हा संपूर्ण श्लोक समाविष्ट असणारी पाने सादर होतात.
विशिष्ट वेबसाइटवरील माहिती शोधण्यासाठी:
आपल्याला संपूर्ण इंटरनेटवरील माहितीपेक्षा एका विशिष्ट वेबसाइटवरीलच माहिती शोधावयाची असल्यास site: असे टाइप करून त्यापुढे त्या वेबसाइटचा पत्ता आणि त्यापुढे त्यावर आपल्याला काय शोधायचे आहे, ते टाइप करावे.
उदा. समजा, आपल्याला महाराष्ट्र शासनाच्या वेबसाइटवर शासन निर्णय शोधावयाचे असतील, तर त्यासाठी सर्च बारमध्ये site:www.maharashtra.gov.in Government Resolution असे टाइप करावे.
शब्दार्थ, व्याख्या जाणून घेण्यासाठी:
एखाद्या शब्दाचा अर्थ किंवा व्याख्या जाणून घ्यावयाची असल्यास सर्च बारमध्ये कॅपिटलमध्ये DEFINE: असे टाइप करून ज्या शब्दाचा अर्थ, व्याख्या हवी आहे, तो टाइप करावा. त्याची व्याख्या गुगल आपल्यासमोर सादर करेल.
केवळ शीर्षकामधील, केवळ मजकुरामधील किंवा केवळ यु.आर.एल.मधील शब्द शोधण्यासाठी:
एखादा शब्द लेखाच्या शीर्षकामध्ये असेल आणि आपल्याला केवळ त्यावरुन लेख शोधावयाचा असेल, तर, allintitle: असे सर्च बारमध्ये टाइप करून त्यापुढे आपल्याला हवा असणारा शब्द लिहावा. केवळ अशी शीर्षके आपल्यापुढे सादर होतील. त्याऐवजी केवळ मजकुरातील शब्द शोधण्यासाठी allintext: असे टाइप करून तो शब्द लिहावा. त्याचप्रमाणे विशिष्ट यु.आर.एल.मधील (वेब ॲड्रेस) शब्द शोधण्यासाठी allinurl: असे टाइप करून त्यापुढे अभिप्रेत शब्द टाइप करावा. आपल्याला अपेक्षित वेबपेजेस गुगल सादर करेल.
कन्व्हर्जन:
आपल्याला एखादी रक्कम किंवा आकडा अन्य चलन अथवा मोजमाप यांत रुपांतरित करावयाचा असेल, तर त्यासाठी तो आकडा लिहून पुढे km to miles किंवा US dollar to Indian Rupees असे लिहीले की ते कन्व्हर्ट होऊन आपल्यासमोर सादर होईल.
व्हॉईस सर्च: स्मार्टफोन्समध्ये विशेषतः ॲन्ड्रॉईड सपोर्टेड मोबाईल फोनमध्ये होम स्क्रीनवरच गुगल सर्चचा महत्त्वाचा ऑप्शन असतो. त्यामध्ये सर्च बारच्या उजव्या बाजूला माईकचे चित्र असते. त्यावर क्लिक केले, की टाइप न करता केवळ आवाजाच्या माध्यमातून आपल्याला काय शोधायचे आहे, याच्या सूचना फोनला देता येऊ शकतात. आपण बोललेला शब्द सर्च बारमध्ये आपोआप टाइप होतो आणि तद्अनुषंगिक रिझल्ट स्क्रीनवर दिसू लागतात. पूर्वी हा पर्याय केवळ इंग्रजी भाषेसाठी उपलब्ध होता. आता अन्य भाषांसाठी सुद्धा ही सेवा कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यामुळे गुगलवरील शोधाची व्याप्ती आणखी वाढली आहे, हे निश्चित.
या लेखात सांगितलेल्या सोप्या सोप्या गोष्टींचा वापर करून गुगलवरील माहितीचा शोध आपण आणखी गतिमानतेने आणि अधिक नेमकेपणाने घेऊ शकतो. चला तर मग, लेट्स गुगल!

आणखीही काही महत्त्वाची सर्च इंजिन
गुगलची सर्च इंजिनच्या क्षेत्रात 70 टक्के मक्तेदारी प्रस्थापित असली तरी इतरही काही महत्त्वाची सर्च इंजिन आहेत. त्यामध्ये बिंग (Bing), याहू (Yahoo), चीनचे बैडू (Baidu), एओएल (AOL), आस्क डॉट कॉम (Ask.com), एक्साईट (Excite), डक-डक-गो (DuckDuckGo) आणि वुल्फ्रामअल्फा (WolframAlpha) यांचा समावेश आहे. डक-डक-गो हे सर्च इंजिन वापरकर्त्यांची प्रायव्हसी जपण्याला अधिक महत्त्व देते. त्यांची बिंग, याहू आणि यमली या सर्च इंजिनबरोबर भागीदारी आहे. त्याचप्रमाणे वुल्फ्रामअल्फा हे सर्च इंजिन कम्प्युटेशनल (गणितीय) नॉलेज इंजिन म्हणून वापरले जाते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा