गुरुवार, ३ नोव्हेंबर, २०१६

पोर्नग्रस्त पौगंड!(ज्येष्ठ मित्र व संपादक श्री. सुभाष सूर्यवंशी यांच्या 'अक्षरभेट'च्या 'पौगंडवयीन तरुणाई आणि पालक' या विषयाला वाहिलेल्या २०१६च्या दिपावली विशेषांकात यंदा प्रकाशित झालेला लेख खास ब्लॉगवाचक मित्रांसाठी पुनर्प्रकाशित करीत आहे.- आलोक जत्राटकर)

 

सातवी-आठवीत असेन.. सुटीच्या काळात एका मित्राच्या शेतातल्या घरी आम्ही बरेच समवयस्क मित्र खेळण्यासाठी एकत्र जमायचो. दंगा, मस्ती, धुडगूस घालायचो नुस्ता... तिथला कुणाला त्रासही नसल्यामुळं आमचा हा दंगा खपून जायचा... अनेक वर्षांच्या सुटीतला आमचा त्याच्या त्या घरी जमून खेळण्याचा जणू एक प्रघातच पडला होता... पण, ते वर्ष थोडंसं वेगळंच ठरलं... एकदा खेळता खेळता, बॉल शोधायला किंवा काही कारणानं असेल, आमचा एक मित्र तिथल्या उंचावरल्या पोटमाळ्यावर डोकावला.. साधे पत्रे मारुन कामासाठी लागणाऱ्या वेगवेगळ्या वस्तू ठेवण्यासाठी सोय म्हणून बनवला असावा... त्या पोटमाळ्यावर काही पुस्तकं असल्याचं त्याला दिसलं... सुटीच्या दिवसांत पुस्तकं म्हटलं की, आम्हाला चैन पडायचं नाही... त्यानं ती पुस्तकं हात लांबवून खाली आमच्याकडं टाकली मात्र... त्या पुस्तकांचं, मासिकांचं कव्हर पाहूनच आमच्या साऱ्यांच्या काळजाचा ठोकाच चुकला... स्त्री देहाचं इतकं नग्न दर्शन त्या पुस्तकांच्या माध्यमातून आम्हाला प्रथमच होत होतं... जसजशी ती पुस्तकं आम्ही चाळत गेलो, तसतसं काही तरी वेगळीच भावना मनात आणि शरीरात जागृत होऊ लागली. आम्हा साऱ्यांचा वयात येण्याचा तो दिवस होता... टीनेज म्हणजे काय असतं आणि त्यात काय काय होत असतं, हे पुढं बऱ्याच काळानंतर वाचलं असलं तरी, त्या दिवशी त्याचा पहिला अनुभव आम्हाला आला... खेळणं, बागडणं त्या दिवसापासून थांबलं आणि या नव्या वाचन 'संस्कृती'नं आमचा ताबा घेतला.
वयानुसार असणारं स्वाभाविक कुतूहल साहजिकच स्वस्थ बसू देणार नव्हतं, देत नव्हतं... त्यामुळं या वाचनानं आणि त्याबरोबर त्या मासिकांतल्या उत्तान, चेतविणाऱ्या रेखाकृती हे सारं पाहून अत्यंत उत्तेजित व्हायला होत होतं... आजपर्यंतच्या आयुष्यात कधीही न पाहिलेलं, वाचलेलं असं एक वेगळंच विश्व इथं होतं... अशा पुस्तकांना पिवळी पुस्तकं म्हणतात, हेही नंतर 'अभ्यासांती' कळालं... मित्रांसोबत मी या पुस्तकांचा वाचक होतोच... माझ्या मित्रांवर त्याचा काय नि कसा परिणाम होत होता, झाला होता, ठाऊक नाही; मात्र मला ती पुस्तकं वाचताना खूप अस्वस्थ व्हायला झालं होतं... चित्रं, छायाचित्रं पाहून वेगळी अस्वस्थता मनात दाटत होती, हे खरं असलं तरी, ही नग्नता शुद्ध, प्युअर नाही, एवढं कुठं तरी मनाच्या कोपऱ्यात खोलवर जाणवत होतं... तेच त्या पुस्तकांच्या भाषेच्या बाबतीत... तोवरच्या आयुष्यात रामायण, महाभारत, संपूर्ण पंचतंत्र यांच्यासह चांदोबा मासिकाचा दरमहा वर्गणीदार म्हणून वाचनाचं वेड जोपासलेलं होतं... त्याखेरीज शाळेतल्या मोठ्या ट्रंकेत भरलेल्या आमच्या ग्रंथालयातली बहुतांशी पुस्तकंही वाचून झालेली... पण, त्या पुस्तकांतलं भाषावैभव आणि 'या' पुस्तकांतली भाषा यांच्यात जमीन-अस्मानाचा फरक होता. केवळ वाचकाला चेतविण्यासाठी, पेटविण्यासाठी वापरलेली अत्यंत उत्तान आणि उथळ अशी भाषाशैली त्यांची होती.. स्त्रीकडं मादी म्हणून, केवळ एक उपभोग्य वस्तू म्हणून पुरूषी नजरेतून केलेलं तिच्या देहाचं वर्णन हे कोणत्याही स्त्रीसाठी निश्चितच सन्माननीय नाही... हे मला पहिल्यांदा खटकलं... नंतर असंही लक्षात आलं की, हे सारं वर्णन केवळ वाचकाला भुलविण्यासाठीचं आहे... त्याला कोणताही शास्त्रीय आधार नाही... ही गोष्ट माझ्या लक्षात आली खरी.. पण, या साऱ्या शंकाकुशंकांचं निरसन होणार कुठं? हा माझ्यासमोरचा खरा 'शास्त्रीय' प्रश्न होता. आईवडिलांकडं विषय काढणं शक्यच नाही, शिक्षकांकडून मार मिळण्याचीच शक्यता अधिक... 'तू एवढा हुशार विद्यार्थी, आणि असले धंदे करतोस...' हेच ऐकून घ्यावं लागणार, याची खात्री होती... मित्रांसोबत काही चर्चा करावी, तर ते वेगळ्याच पद्धतीनं भारावलेले दिसत होते... त्यांचा जगाकडं, विशेषतः मुलींकडं पाहण्याचा दृष्टीकोनच पार बदलून गेलेला... खरं सांगतो, आयुष्यात कधी नव्हे एवढी कुचंबणा माझी त्या काळात झाली... शेवटी ग्रंथ हेच गुरू, असं मानून मी पुस्तकांच्या दुकानात, जुन्या पुस्तकांच्या संग्रहात स्त्री-पुरूष शरीर संबंधांच्या अनुषंगाने काही शास्त्रीय माहिती देणारी पुस्तकं आहेत का, याचा शोध आरंभला. या मोहिमेत डॉ. लीना मोहाडीकर यांचं एक पुस्तक मला मिळालं. खूप शांत चित्तानं मी ते वाचलं. या पुस्तकानं माझ्यातला माणूस जागृत ठेवण्याचं काम केलं, एवढं प्रामाणिकपणानं सांगतो. स्त्री-पुरूष संबंध, त्यांचं परस्परांप्रती सहजसुलभ आकर्षण ही सर्वसाधारण नैसर्गिक प्रवृत्ती आहे. निसर्गानं प्रजोत्पादनाच्या महत्त्वपूर्ण प्रक्रियेसाठी निर्माण केलेली कामभावना ही अत्यंत निकोप प्रवृत्ती आहे, तिच्याकडं तितक्याच निकोप पद्धतीनं पाहिलं जायला हवं, हे लक्षात आलं. पण, नेमकी हीच गोष्ट लक्षात न आल्यानं, लैंगिक संबंधांच्या अनुषंगानं चर्चा, विमर्ष यांवर अनेक सामाजिक निर्बंध असल्यानं या नैसर्गिक प्रकृतीच्या बाबतीत विकृतीच अधिक बळावत चालल्याचं दिसतं. त्यानंतरच्या काळात महाविद्यालये, विद्यापीठे येथील वसतिगृहांत मागील रेसिडेंटकडून पुढे अशी परंपरेने चालत आलेली अनेक देशी-विदेशी मासिकं पाहण्यात आली, वाचली सुद्धा.. पण, चवीपुरतीच. त्यातला पोकळपणा, निष्फळपणा जाणवत राहिला. पुढं फोटोग्राफीचा अभ्यास करताना 'नग्नता'सुद्धा किती नितांतसुंदर असू शकते, याची प्रचिती आली. 'ब्युटी इन न्यूडिटी'चा अभ्यास केला. नग्नतेकडं विकृत नव्हे, तर सौंदर्यशास्त्र म्हणून पाहण्याची एक नवीन दृष्टीही या अभ्यासानं प्रदान केली.
लेखाच्या सुरवातीला माझ्या टीनएजमधलं आणि त्यानंतरच्या तारुण्यातलं उदाहरण इतक्या तपशीलानं मुद्दामहून सांगण्याचं कारण म्हणजे पौगंडावस्थेत, किशोरावस्थेत पोर्नोग्राफीमुळं भावविश्व कसं ढवळून निघत असतं, याची वाचकांना प्रचिती यावी. खरं म्हणजे माझं उदाहरण प्रातिनिधिक असलं तरी, पौगंडावस्थेत प्रत्येकजणच कमी-अधिक फरकानं अशा भावनिक, मानसिक आणि शारीरिक दोलायमान अवस्थेतून गेलेला असतो; जावं लागत असतं.
आता मधल्या काळात गेल्या पंचवीसेक वर्षांत काय काय बदल झालेत हो? तंत्रज्ञानात्मक खूपच बदल झालेले आहेत. माहिती तंत्रज्ञानाच्या क्रांतीमुळं आणि पुढं डिजिटल व मोबाईल तंत्रज्ञानाच्या आविष्कारामुळं इंटरनेटनं साऱ्या विश्वाचा, विश्वातल्या प्रत्येक व्यक्तीचा ताबा घेतला आहे.
केवळ पोर्न आणि पोर्नोग्राफीचाच विचार केला तर, आमच्या काळात छुप्या पद्धतीनं सर्क्युलेट होणारी पिवळी पुस्तकं आणि लईत लई म्हणजे डेबोनेर पाहायला न् क्वचित हातात मिळायचं. आता, हे सारं इंटरनेटवर उपलब्ध आहे. जगभर खळबळ माजविणारं आणि लोकप्रियतेच्या कळसावर असणाऱ्या प्लेबॉय मासिकाचा खप या इंटरनेटच्या जमान्यात ओसरू लागल्यानं त्यांनी आता केवळ ऑनलाइन आवृत्तीच चालू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
पण, महत्त्वाचा मुद्दा असा आहे की, इंटरनेटचं विश्व हे केवळ शब्द, मासिकांचं नाहीय. ज्या गोष्टी पूर्वी केवळ शब्द वाचून इमॅजिन केल्या जायच्या, त्या गोष्टींचं इथं अतिरंजित, अवास्तव, किळसवाणं आणि बीभत्स व्हिडिओजच्या माध्यमातून दर्शन घडवलं जातं आहे. सेक्स ही मानवाची किंवा एकूणच प्राणिमात्राची नैसर्गिक प्रवृत्ती, गरज आहे. ती पूर्ण करण्याच्या प्रेरणा आणि भावनाही निसर्गदत्त आहेत. असं असताना अत्यंत अनैसर्गिक पद्धतीने तृप्ती करवून घेण्याच्या प्रकारांचे दर्शन या व्हिडिओ क्लिप्सच्या माध्यमातून घडविले जाते. मात्र, इथेही स्त्रीकडे केवळ उपभोग्य वस्तू म्हणूनच तिच्या देहाचं प्रदर्शन मांडल्याचं दिसतं. या पोर्न फिल्म्सच्या माध्यमातून दाखविलं जाणारं तेच खरं, असं जर या पौगंडावस्थेत मुलांच्या मनावर कोरलं गेलं, तर कायमची एक विकृती त्याच्या मनात निर्माण होईल. स्त्रियांकडं एक बरोबरीचा सामाजिक घटक म्हणून न पाहता केवळ एक कमॉडिटी म्हणून पाहण्याची सवय लागण्याची शक्यता इथे वाढीस लागते. त्याचबरोबर त्यांच्या मनाचा विचार न करता, केवळ शरीराचा विचार करण्याची सवय लागली, तर ते आपल्या एकूणच सामाजिक व्यवस्थेचं मोठं अपयश ठरेल.
काही मुलांच्या मनावर याच्या उलटही परिणाम होण्याची शक्यता असतेच. स्त्री शरीराकडं किळसवाण्या नजरेनं पाहण्याची दृष्टीही निर्माण होऊ शकते. निसर्गानं पुनरुत्पादनाच्या मूलभूत गरजेपोटी स्त्री-पुरूषांची शरीरं परस्परपूरक घडविलेली आहेत. त्यांच्या नैसर्गिक वर्तनामध्ये एक सहजसुलभता असणे आवश्यक आहे. प्रजोत्पादनाच्या गरजेपोटी काही विशिष्ट काळात मीलन घडविण्याची प्रेरणा निसर्ग अन्य प्राणीमात्रांत निर्माण करतो. याला मनुष्यप्राणी हा एकमेव अपवाद आहे. त्याच्या लैंगिक प्रेरणा सातत्याने जागृत असतात. हे वास्तव असताना या नैसर्गिकतेच्या विरुद्धच दृष्टीकोन एखादा पुरूष अथवा स्त्रीच्या मनात निर्माण झाला, तर ते खचितच योग्य नव्हे!
नेमके हेच आज होताना दिसते आहे. सहज नैसर्गिक लैंगिक प्रेरणांचे अतिरंजित दर्शन पौगंडावस्थेतच मुलांना अगदी सहजपणाने होते आहे. स्मार्टफोन्स, इंटरनेट, सोशल मीडिया साइट्स यांच्या माध्यमातून पोर्नोग्राफीक फिल्म्स, पोर्न क्लिप्स मुलांना पाहण्यास सहजपणे उपलब्ध होताहेत. वॉट्सअपसारख्या गतिमान मेसेजिंग ॲपच्या माध्यमातून या साऱ्या गोष्टी क्षणात अनेक समूहांकडे पाठविणे चुटकीसरशी शक्य झाले आहे. त्यामुळे काळ बदलला, तंत्रज्ञान बदलले, बदलत्या तंत्रज्ञानाने पोर्नचे स्वरुप बदलले, ॲक्सेसिबिलिटी वाढली, तरी मूळ प्रश्न मात्र बदललेला नाही. तो तसाच आहे, तो म्हणजे हे कसं बदलायचं आणि मुलांना सावरायचं कसं?
तत्पूर्वी, या ठिकाणी आणखी एका महत्त्वाच्या गोष्टीचा उल्लेख मला करावा लागेल, ते म्हणजे पूर्वीपेक्षा पुस्तकांव्यतिरिक्त माहिती मिळविण्याचे अनेक स्रोत माहिती तंत्रज्ञानाच्या कृपेमुळं आजच्या तरुणांना सहज उपलब्ध असले, तरी सेक्सच्या अर्थात शरीरसंबंधांच्या बाबतीत अनेक चुकीच्या समजुती, गैरसमज, गैर, विकृत कल्पना आणि न्यूनगंड त्यांच्या मनात असल्याचं दिसतं. मुंबईसारख्या मेट्रो शहराचंच उदाहरण घेऊ. कॉस्मोपॉलिटन कल्चरमुळं एक विशिष्ट पद्धतीचा खुलेपणा या शहरात दिसतो. पौगंडावस्थेतील तरुण-तरुणींचं एकमेकांशी बोलणं-वागणं यांमधील मोकळेपणा कधी कधी नको इतका आपल्या अंगावर येतो. असं असतानाही, या तरुण-तरुणींच्या मनातल्या सेक्सविषयीच्या संकल्पना मात्र अवास्तव म्हणाव्यात, इतक्या चुकीच्या असलेल्या दिसतात. मुंबईमध्ये मिड-डे, मिरर, आफ्टरनून या टॅब्लॉईड दैनिकांसह नियमित दैनिकांच्या पुरवण्यांमध्ये सेक्सविषयक शंकासमाधानाचे कॉलम चालविले जातात. मुंबईसह देशातले मान्यवर, नामांकित कौन्सेलर डॉक्टर त्यांच्या शंकांचं समाधान करण्याचा प्रयत्न करीत असतात. या कॉलममधले प्रश्न पाहता एकाचवेळी ते हास्यास्पदही वाटतात आणि या तरुणाईविषयी गंभीरपणानं चिंतन करावं, इतके अंतर्मुखही करतात. सेक्स म्हणजे केवळ शरीरसंबंध, शरीरांची तृप्ती आणि लिंग हे त्यासाठीचं निसर्गदत्त साधन इतकीच बेसिक कल्पना डोक्यात असणाऱ्या तरुणांचे त्यावर आधारलेले  प्रश्न पाहता खरोखरीच चिंताग्रस्त व्हायला होतं.
या पार्श्वभूमीवर, वर उपस्थित केलेल्या प्रश्नाचं उत्तर शोधायला हवं. हे बदलायचं कसं, मुलांना सावरायचं कसं? यावर, एकच उपाय आहे, तो म्हणजे शास्त्रशुद्ध लैंगिक शिक्षण! पौगंडावस्थेत अनेक शारीरिक, मानसिक बदलांना सामोऱ्या जात असलेल्या नवतरुण, तरुणींना त्याविषयीचं शास्त्रीय ज्ञान त्याच वयात दिलं जाणं खूप महत्त्वाचं आहे. याला काही तथाकथित संस्कृतीरक्षकांचा विरोध आहे. एकीकडं खजुराहोसारख्या लेण्यांना आपली प्राचीन शिल्प-संस्कृती म्हणून डोक्यावर घेऊन मिरवायचं आणि दुसरीकडं अत्यंत महत्त्वाच्या अशा लैंगिक शिक्षणाला विरोध करायचा, हा दांभिकपणा कुठेतरी थांबायला हवा, थांबवायला हवा. या दांभिकपणामुळं देशातली सर्वात तरुण महासत्ता ही विकृतीमध्ये वाहवत जाण्याचा धोका निर्माण झाला आहे, याची दखल घ्यायला हवी. यासाठी मुळात लैंगिक शिक्षण म्हणजे केवळ शरीरसंबंधांचं शिक्षण, इतका संकुचित अर्थ लावणे पूर्णतः चुकीचे आहे. शरीरसंबंधांसाठी शिक्षणाची गरज नाही, ते काम तर निसर्ग आपोआप घडवून आणेल, जेव्हा त्या सहजप्रवृत्ती निर्माण होतील त्या वेळी!  पण, लैंगिक शिक्षण म्हणजे हे एक प्रकारे समंजसपणाचं शिक्षण आहे. स्त्री-पुरूष यांना शारीरिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या शास्त्रीय पद्धतीनं समजून घेण्याचं, एकमेकांप्रती आदरभाव निर्माण करण्याचं, एकमेकांच्या शरीराचा मनाचा आदर करायला शिकविणारं हे शास्त्र आहे. लैंगिक भावनांचं अतिरंजितीकरण न करता नैसर्गिक पद्धतीनं त्यांचं दमन करायला शिकविणारं शास्त्र आहे. योग्य वयात हे शिक्षण मिळालं की, मुलामुलींच्या मनातलं एकमेकांबद्दलचं विशेषतः एकमेकांच्या शरीराबद्दलचं नैसर्गिक कुतूहल आपोआप मिटेल आणि त्याची जागा रिस्पेक्ट घेईल, अशा पद्धतीनं हे शास्त्र या पौगंडावस्थेतील मुलांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. त्याचबरोबर न कळत्या वयात काही अतिरेकी, अतिरंजित गोष्टी पाहून तोल न ढळू देणे आणि सामाजिक, कौटुंबिक जबाबदारीचं भान त्यांच्यात जागवलं जायला हवं.  आणि त्यायोगे येणाऱ्या जबाबदाऱ्या्वैराचारावर नियंत्रण आणण्यासाठी मोठ्या अभ्यासपूर्वक व प्रयत्नपूर्पूर्वजांनी लैंगिक स्वैराचारावर नियंत्रण आणण्यासाठी मोठ्या अभ्यासपूर्वक व प्रयत्नपूर्वक निर्माण केलेली विवाह संस्था आणि त्यायोगे येणाऱ्या जबाबदाऱ्यांचा स्वीकार याविषयी चर्चा व्हायला हवी. स्त्री-पुरूष समतेचा विचार हा लैंगिक शिक्षणाचा प्रमुख भाग आहे. स्त्री ही पुरूषाच्या बरोबरीचा महत्त्वाचा सामाजिक घटक आहे. तिचे अस्तित्व आपल्या अस्तित्वाचं कारण आहे, तिच्याकडं पाहण्याचा आदरभाव निर्माण होणं, ही आजच्या काळाची महत्त्वाची गरज आहे.
जगात जितक्या मानवी प्रकृती, प्रवृत्ती आहेत, तितक्याच विकृतीही आहेत. त्या असणारच.. पोर्न तयार करणारे, विकणारे, पाहणारे हे कमी अधिक या तीन कॅटेगरीमधलेच आहेत. पोर्नबंदी असूनही जगात पोर्न पाहणाऱ्या देशांत भारताचा जगात तिसरा क्रमांक लागतो, हे वास्तव आहे. हे एक मोठं आव्हान आपल्यापुढं आहे. कारण हे पाहणाऱ्यांत मोठ्या संख्येनं नवतरुण आहेत. त्या माध्यमातून निर्माण झालेल्या अतिरेकी लैंगिक भावनांचा निचरा करण्यासाठी बलात्कारासारखं पाऊल उचललं जातं. या बलात्काराला बळी पडणाऱ्यांत किशोरवयीन मुलींपासून ते सत्तर वर्षीय वृद्ध महिलांचाही समावेश असल्याचे आकडेवारी सांगते. ही निश्चितच निंदनीय आणि चिंतनीय बाब आहे. त्यामुळे योग्य लैंगिक शिक्षण हाच यावरचा महत्त्वाचा उपाय आहे, ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी. ते दिलं नाही, तर कुठूनही, कशीही आणि कसलीही मिळालेली माहिती खरी मानून त्यानुसार वर्तन करणाऱ्या तरुणांची पिढी निर्माण होईल. तसं होऊ द्यायचं नसेल, तर आताच खरी वेळ आहे, या नव्या महासत्तेची आशा असणाऱ्या नवतरुणांना सावरण्याची, योग्य दिशा देण्याची! अन्यथा, त्याच्या भल्याबुऱ्या परिणामांना सामोरे जाण्याची तयारी तरी ठेवायला हवी. काय करायचं, याचा निर्णय आपणच घ्यायचाय. आणि महत्त्वाचं म्हणजे केवळ धोरणकर्त्यांवर, राज्यकर्त्यांवर या जबाबदारीचं ओझं टाकण्याची चूक मात्र आपण करू नये. लैंगिक शिक्षणाची निकड विविध माध्यमांतून लावून धरल्यानंतरही अनेक संस्कृतीरक्षक हा निर्णय हाणून पाडणारे आहेत. त्यामुळे व्यापक स्तरावर, सार्वजनिक स्तरावर शाळा-महाविद्यालयांतून त्याचे अधिकृत शिक्षण कधी सुरू व्हायचे ते होईल, पण पालक, आई-वडिल, विविध समाजसेवक, कार्यकर्ते, डॉक्टर यांनी या संदर्भात संवादात्मक पावलं उचलण्याची गरज आहे. या पौगंडावस्थेतील गोंधळलेल्या मुलांना सावरण्यासाठी, त्यांचं प्रबोधन करण्यासाठी एखादा गुन्हा घडण्याची वाट पाहायची बिलकूल आवश्यकता नाही. गरज आहे ती कौटुंबिक पातळीपासून ते सर्व सामाजिक पातळ्यांवर योग्य सुसंवाद निर्माण करण्याची! या मुलांना योग्य पद्धतीने सावरण्याचे, दिशा देण्याचे काम संवादाच्या माध्यमातूनच होऊ शकेल, ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी. हा संवादाचा पूल निर्माण करण्यासाठी सर्वच घटकांनी प्रयत्न करण्याची गरज मात्र या निमित्ताने अधोरेखित करावीशी वाटते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा