A Selfie to remember with Team Yunate Creations! |
कालची, मंगळवारची (दि. ७ नोव्हेंबर) संध्याकाळ
माझ्यासाठी महत्त्वाची आणि अत्यंत आनंददायी ठरली. कोल्हापूरच्या शाहू स्मारक भवनमध्ये दळवीज्
आर्ट्सच्या वतीनं ‘युनाते क्रिएशन्स’नं निर्माण केलेल्या चित्रांचं प्रदर्शन
भरवलंय... विषय, शैली या साऱ्याच बाबतीत हे प्रदर्शन वेधक ठरलंय. ‘शाहू छत्रपती इन मिनिएचर पेंटिंग’ असा विषय घेऊन युनातेच्या
तरुण मित्र-मैत्रिणींनी हा जो काही प्रयोग केलाय, त्याला तोड नाही. आता या टीममध्ये आमच्या लाडक्या चेचरांचा लाडका शुभम असला तरी, या टीमच्या सदस्यांचं स्वतंत्र नाव घेण्यापेक्षा त्यांना टीम युनाते म्हणणं मला अधिक योग्य वाटतं, कारण गेल्या दोन तीन वर्षांत या टीमनं एकत्रितपणे इथल्या कलेच्या वर्तुळात जे प्रयोगशील काम चालवलंय, ते महत्त्वाचं आहे. कोल्हापूरच्या कला क्षेत्राचं भवितव्य उज्ज्वल असल्याचा दिलासा देणारं आहे.
इथं माझ्या
स्वतःबद्दल आणि माझ्या चित्रकलेबद्दल एक गोष्ट प्रामाणिकपणानं मान्य केली पाहिजे,
ती म्हणजे, शाळेत पाचवीपर्यंत इतर विषयांत पहिला नंबर असल्यामुळं चित्रकलेचे
शिक्षक मला ३५-४० मार्क देऊन पास करायचे. सहावीनंतर जसा ५० मार्कांच्या कलाइतिहास
या विषयाचा माझ्या शिक्षणात प्रवेश झाला, तशी माझी कला क्षेत्रातली रुची, अभिरुची
आणि जिज्ञासा वाढीला लागली, सोबत मार्कही! आमचे चिकुर्डेकर सर शिकवायचेही अत्यंत
समरसून! तर, त्यावेळी साधारण आठवीपर्यंत देशविदेशांतल्या विविध चित्रकार, चित्रशैलींचा
चांगला परिचय मला झालेला होता. त्यावेळी मनापासून वाचल्यामुळं आजही समोर काही कलाकृती
आली की, संदर्भानं जुनं शिकलेलं पुन्हा मनात तरळायला सुरू होतं.
तर, काल संध्याकाळी
या युनातेच्या मुलांमुळं मला असं माझं लघुचित्रशैलीबद्दल शिकलेलं बरंच काही नव्यानं आठवू
लागलं. अगदी भुर्जपत्रांपासून ते मोगल, राजस्थानी आणि फ्युजन, असं बरंच काही काही!
पण, हे आठवलं नसतं
तरी, काही फरक पडला नसता कारण या मुलांचं कामच इतकं बोलकं झालंय की आजच्या पिढीला
लघुचित्रशैलीची ओळख करून द्यायला ते पुरेसं आहे. महत्त्वाचं म्हणजे लघुचित्रशैलीचे
विविध टिपिकल फॉर्म तर त्यांनी यशस्वीरित्या ट्राय केले आहेतच, पण त्या मूळ शैलीला
धक्का न लागू देता त्रिमितीय टच देण्याचा प्रयोगही त्यांनी सक्सेसफुली केलाय.
राजर्षी शाहू
महाराजांच्या चरित्रातील महत्त्वाचे निवडक प्रसंग, त्यांचे वेगवेगळे पोर्ट्रेट्स हे
इतक्या वैविध्यपूर्ण पद्धतीनं या मुलांनी चितारलंय की, प्रत्येक चित्र पुनःपुन्हा
पाहात राहावंसं वाटतं. लघुचित्रशैलीचे बारकावे असणाऱ्या प्रोफाइल, पानाफुलांचं बारीक डिझाईन,
रेखीव पशुपक्षी, कलाकुसरीचे नक्षीकाम हे जितकं प्रत्ययकारकरित्या उमटलंय, तितकंच लघुचित्रशैलीचं
वैशिष्ट्य असणाऱ्या चित्रांच्या नक्षीदार बॉर्डर्सही इतक्या वैविध्यपूर्ण आणि
चित्ताकर्षक आहेत की, संबंधित चित्राच्या मूल्यवर्धनाचं काम त्या आपसूक करतात.
पुन्हा त्या बॉर्डर्सची निवडही कोल्हापुरातल्याच विविध राजवाड्यांच्या नक्षींपासून
प्रेरित झालेली आहे.
छ. शिवाजी महाराज,
शिवस्नुषा महाराणी ताराबाई, संभाजी महाराज यांच्या पासून राजर्षी शाहू छत्रपती
महाराज ते आत्ताचे विद्यमान छ. शाहू महाराज अशी २३ चित्रं प्रदर्शनात आहेत. इथल्या
प्रत्येक चित्रानं त्याच्या वैशिष्ट्यपूर्णतेनं मला आकर्षून घेतलं तरी अंतिम छाप
राहिली ती तीन चित्रांची ते म्हणजे गॅलरीत बसलेले राजर्षी शाहू, शाहूंचा
राज्यारोहण सोहळा आणि सोनतळी कॅम्पातली शाहू-आंबेडकरांची भेट हे पूर्णतः
इमॅजिनेशनवर आधारलेलं चित्र. तिन्ही वेगवेगळे फॉर्म असले त्यांचं सादरीकरण अत्यंत
युनिक, एन्चॅंटिंग आहे. एकदम इंप्रेसिव्ह!
दळवीज्
इन्स्टिट्यूटनं प्राचार्य अजेय दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूरच्या कला
क्षेत्राला पुढे नेण्याचं काम अगदी मनापासून चालवलंय. त्यात युनातेसारख्या टॅलंटला
त्यांनी दिलेली संधी म्हणजे कोल्हापूरच्या कला क्षेत्राचं अवकाश अधिक विस्तारित
करणारी आहे. लघुचित्रशैलीचा फॉर्म कोल्हापूरमध्ये इतक्या सढळपणे यापूर्वी कोणी
वापरल्याचं पाहण्यात आलं नाही. (केलं असल्यास, ते माझं अज्ञान समजा!) मात्र, इथं मात्र या
मुलांनी जे काम केलंय, त्यानं मात्र कोल्हापूरमधून लघुचित्रशैलीचा उदय होतो आहेच,
मात्र त्याचबरोबर युरोपियन चित्रशैलीच्या प्रभावाता आणि प्रवाहात थोडासा मागे
पडलेला चित्रकलेचा एक महत्त्वाचा भारतीय फॉर्मही नव्यानं पुनरुज्जिवित होतो आहे. चित्रकलेतला
जाणकार असो अगर नसो, मात्र प्रत्येकानं या चित्रांचा आस्वाद जरुर घ्यायला हवा,
इतकं ते नेटकं आणि आकर्षक निश्चितपणे झालंय. हे प्रदर्शन केवळ इथंच भरवून न थांबता
आता महत्त्वाच्या ठिकाणी ते भरवावं आणि त्यासंदर्भात लोकांचं उद्बोधन करावं, एवढीच
युनातेंना माझी सूचना!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा