मंगळवार, २८ नोव्हेंबर, २०१७

शिक्षणाची ‘दीक्षा’

(‘तेजस प्रकाशनाच्या बदलते जग या दिवाळी वार्षिकांकाचं हे सातवं वर्ष. या वार्षिकांकाचा सलग सहाव्या वर्षी अतिथी संपादक होण्याचा बहुमान मित्रवर्य श्री. रावसाहेब पुजारी यांनी बहाल केला. त्यांचे शेतीप्रगती मासिक यंदा दिमाखदार तेरावा दिवाळी विशेषांक सादर करीत असताना गेल्या सहा वर्षांत तरुण मनांची स्पंदनं टिपण्याचा प्रयत्न करणाऱ्या बदलते जगनंही यंदा चेंजमेकर्स- वेगळ्या वाटा शोधणारी तरुणाई असा विषय घेऊन यंदाचा 'बदलते जग'चा अंक सादर केला आहे. गेल्या सहा वर्षांत या अंकानं तरुणांना डोळ्यांसमोर ठेवून शैक्षणिक क्षेत्र, सोशल मीडिया, कौशल्य विकास, डिजीटल इंडिया, डिजीटल यूथ आणि दूरशिक्षण अशा विषयांचा वेध घेतला. आपण वाचकांनीही त्यांचे मनापासून, उत्स्फूर्त स्वागत केले. यंदा चेंजमेकर्स-वेगळ्या वाटा शोधणारी तरुणाई असा विषय घेण्यामागं काही विशेष कारणं आहेत. आजच्या तरुण पिढीवर मागील पिढ्यांकडून अनेक प्रकारचे आक्षेप घेतले जातात. आजचे तरुण वाया जाताहेत, ती करिअरविषयी जागरूक नाहीत, त्यांना सामाजिक भान नाही वगैरे वगैरे आक्षेपांचा त्यात समावेश असतो. आजचा तरुण नित्य या आक्षेपांना सामोरा जात असतो. पण, पूर्वीच्या पिढ्यांत नसलेली एक बेफिकीरी जरूर त्याच्यात आहे; ही बेफिकीरी म्हणजे नेमकं काय मनावर घ्यायचं आणि काय नाही, याचा विवेक त्याच्यात आहे. त्यामुळे तो यातलं काही मनावर न घेता आपले मार्ग धुंडाळण्यात धन्यता मानतो. याचा गैरअर्थ काढला जात असतो. पण, या अंकाचं काम करीत असताना या साऱ्या आक्षेपांना धुडकावून लावतील, अशी सोन्यासारख्या तरुणांची खाणच आमच्या हाती लागली. सुरवातीला असे तरुण मिळतील का, असा विचार आमच्याही मनी आला. पण अंक होता होईतो, पानांच्या मर्यादेत बसणार नाहीत, इतके कर्तृत्ववान तरुण आमच्या हाती लागले. यामध्ये अगदी शैक्षणिक, सामाजिक, आरोग्य आदी विविध क्षेत्रांत जागतिक स्तरावर काम करणाऱ्या तरुणांपासून ते अगदी आपल्या अवतीभोवतीही कुठल्याही प्रसिद्धीची, मोबदल्याची अपेक्षाही न ठेवता काम करणारे तरुण आमच्या नजरेत आले. आमची पृष्ठमर्यादा लक्षात घेऊन त्यातील काही निवडक तरुणांच्या कर्तृत्वाला आम्ही या अंकात स्थान देऊ शकलो आहोत. हा अंक वाचल्यानंतर हा केवळ शब्दरंजन नाही, तर एक प्रेरणास्रोताचा झरा आम्ही आपल्या हाती ठेवण्याचा प्रयत्न केला आहे, हे आपल्या लक्षात येईल. आजचा आपला भोवताल अनिश्चिततेच्या भोवऱ्यात सापडला आहे खरा, पण त्याचवेळी त्याला निश्चिततेचे ठोस आयाम प्रदान करणारे, सावरणारे तरुण हातही आहेत, हे वास्तवही खरेच! सकारात्मकतेच्या या प्रवासाचा आनंद आपल्यालाही यातून लाभेल. सारंच काही वाईट, चुकीचं होतंय, या धारणेला छेद जाऊन चांगलंही बरंच काही होतंय, चांगलं घडविण्याचा प्रयत्न करणारे आशेचे दीप उजळविणारे तरुण हातही आहेत. या हातांत आपल्या देशाचे भवितव्य सुरक्षित आहे, याची जाणीव वृद्धिंगत होईल. सकारात्मक सामाजिक जाणिवांचा, संवेदनांचा जागर या अंकाच्या माध्यमातून आम्ही मांडला. या अंकाच्या माध्यमातून असे काम करणाऱ्या काही तरुणांच्या कामगिरीचा वेध घेण्याचा प्रयत्न मी स्वतःही केला आहे. त्यातील लेख क्रमाक्रमाने माझ्या ब्लॉगवाचकांसाठी 'बदलते जग'च्या सौजन्याने येथे पुनर्प्रकाशित करीत आहे. आपल्याला आवडतील, अशी अपेक्षा आहे.- आलोक जत्राटकर)


प्राथमिक स्तरावरच केवळ अपंगत्वामुळं समान शिक्षणाच्या संधी नाकारली गेलेली एक बालिका पुढे मोठ्या जिद्दीने वंचित घटकांसाठी शैक्षणिक समाजकार्य करून संयुक्त राष्ट्रसंघाची जागतिक युवा शिक्षण राजदूत बनली. तिची ही संघर्षगाथा...

जन्मजात अपंगत्वाबरोबर येणाऱ्या सर्व अडीअडचणी तिच्या वाट्याला आल्या. चांगल्या खाजगी शाळांनी एकदा नव्हे, तर तीनदा तिला प्राथमिक वर्गात प्रवेश नाकारला. त्यामुळं म्युनिसिपालिटीच्या शाळेत शिक्षण घ्यावं लागलेलं. तिथंही अपंगत्वामुळं हालचालींवर पूर्ण मर्यादा. त्यामुळं दुपारच्या जेवणाचा डबा खातानाही कुणी सोबत थांबायचं नाही. जिथं मैत्री मिळण्याची अपेक्षा असायची, तिथं सहानुभूती वाट्याला यायची. या साऱ्याविषयी एक मोठी नकारात्मकता मनभर पसरलेली असायची. आईवडिलांनाही सांगता यायचं नाही. त्यांना वाईट वाटेलसं वाटायचं. अशाच परिस्थितीत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण केलं. एकदा एका आश्रमशाळेच्या कार्यक्रमात तिला खऱ्या अर्थानं तिच्या जीवनाचं लक्ष्य गवसलं. मनातलं सारं मळभ दूर होऊन सकारात्मकतेचा प्रकाश मन व्यापून उरला. या प्रकाशाची ती पथिक बनली. शिक्षणाची समान संधी नाकारली गेलेली ती युवती संयुक्त राष्ट्रसंघाची जागतिक युवा शिक्षणदूत बनली. या मुलीचं नाव दीक्षा दिंडे!
दीक्षाचा जन्म पुण्यात एका सर्वसामान्य कुटुंबात झाला. वडील रिक्षाचालक आणि आई टेलरकाम करणारी. पुण्यातल्या एका चाळीत त्यांचं वास्तव्य. दीक्षाला जन्मजात अपंगत्व होतं. शासकीय आकड्यांत ८४ टक्के, पण प्रत्यक्षात न के बराबर! त्यामुळं सातत्यानं आईवडिलांवर अवलंबून राहणं होतं. त्या दोघांनीही दीक्षाला कधीही तिच्या अपंगत्वाची अडचण होत असल्याचं कधीही जाणवू दिलं नाही. पण, शाळेत प्रवेश घ्यायची वेळ आली, तिथं पहिल्यांदा तिला ती अन्य सर्वसामान्य मुलांपेक्षा वेगळी असल्याचा पहिला मोठा फटका बसला. तीन खाजगी शाळांनी केवळ तिच्या दिव्यांगत्वावरुन तिला प्रवेश नाकारला. शेवटी तिला महापालिकेच्या शाळेत प्रवेश घ्यावा लागला. इथं मदत करणारे लोक भेटले. कडेवर दीक्षा असल्यानं तिची स्कूलबॅग घ्यायला कधी शिपाई, तर कधी खुद्द मुख्याध्यापकही पुढे यायचे. एरव्ही मात्र शाळेत तिच्यासोबत राहतील असे मित्रमैत्रिणी तिला मिळाले नाहीत. तिच्यासोबत थांबलं तर ना खेळायला मिळेल, ना काही गंमत करायला, असा विचार ते करत असावेत. मात्र, यामुळं दीक्षाचा जीव गुदमरायचा. नकारात्मक विचार मनाचा ठाव घ्यायचे. आपण असे अपंग जन्मण्यापेक्षा मरून का गेलो नाहीत किंवा थेट आत्महत्येचे टोकाचे विचार यायचे. यामुळं तिनं अभ्यास केला, मात्र तिचा जीव खऱ्या अर्थानं शाळा-कॉलेजात कधी रमलाच नाही. कदाचित जबाबदारी वाढेल म्हणून पै-पाहुण्यांनीही कधी तिला, तिच्या आईला अगत्यानं घरी बोलावलं नाही. समाजात वावरताना पदोपदी करून देण्यात येणाऱ्या अपंगत्वाच्या जाणीवेनं दीक्षाचं मन उदास होई. या काळात सातत्यानं नकारात्मक विचारच तिच्या मनी येत.
या दरम्यान, वडिलांचं रिक्षा चालवणं २००५मध्ये अपघातामुळं थांबलं. आईनं मात्र एकहाती संसाराचा गाडा रेटताना दीक्षाला काही कमी पडू दिलं नाही. आपण कुणावर ओझं होऊ नये, या गोष्टीचं दीक्षाच्या मनावर इतकं दडपण होतं की, तिनं अक्षरशः आपलं वजनही अजिबात वाढू दिलं नाही. नकारात्मक विचारांनी मनाचा घेतलेला ताबा, त्यामुळं खचलेला आत्मविश्वास, त्यातूनच उदयास आलेला अबोलपणा ही पूर्वीच्या दीक्षाची स्वभाववैशिष्ट्य होती.
सन २०१२-१३ मध्ये मात्र हे चित्र पालटलं. घरातील एका कार्यक्रमाच्या निमित्तानं अनाथाश्रमातील काही मुलांशी तिची भेट झाली आणि तिला तिच्या जीवनाची दिशा त्या क्षणी गवसली. त्यावेळी ती चाणक्य मंडलमध्ये स्पर्धा परीक्षेची तयारीही करत होती. याच काळात तिला असे काही लोक भेटत गेले की, ज्यांनी तिला ती जशी आहे तसं स्वीकारलं. दिशाच्या मनात आत्मविश्वास आणि त्या आत्मविश्वासाचं तेज तिच्या डोळ्यांत झळकू लागलं. या काळात भेटलेल्या मित्रमैत्रिणींमुळे इतरांसारखेच आपणही एक माणूसच आहोत, ही जाणीव झाली. आपल्याकडे काय नाही, यापेक्षा काय आहे, याकडं ती सकारात्मकतेनं पाहू लागली. साहजिकच पूर्वी तिच्या मनात असलेल्या कुरूप जगाचं रुप पालटलं, ते सुंदर, अधिकाधिक सुंदर बनत गेलं. त्यातूनच तिनं रोशनी या एनजीओच्या माध्यमातून वंचित मुलांच्या शिक्षणासाठी काम करायला सुरवात केली. काम होते, स्नेहालय-नगर यांच्या कात्रजमधील 'शारदा बालभवन' या प्रकल्पातील मुलांसाठी 'अक्टीव्हीटी बेस्ड लर्निंग अन्ड ओपन एज्युकेशन' या संकल्पना राबविणे. संस्कार वर्ग, खेळ, गोष्टी, नृत्य, वाचन, स्पर्धा या विविध गोष्टींच्या माध्यमातून मुलांमध्ये संस्कार रुजवण्याचे काम तिनं दोन वर्षे केले. नेहरु युवा केंद्र संघटनेशीही ती जोडली गेली. नेहरू युवा कार्यकर्ता म्हणून काम करू लागली. सी.ए.एस.पी. आणि नंतर विद्यादान सहाय्यक मंडळ यांच्या मदतीमुळे तिची स्वप्नं तिला पूर्ण करता आली.
दीक्षाच्या कामाचा विस्तारही वाढत गेला. अपंगांचे हक्क, महिला सक्षमीकरण, मासिक पाळी स्वच्छता, असे अनेक विषय तिने हाताळले. आयुष्यात तिला ज्या समस्यांना तोंड द्यावं लागलं किंवा तिनं जे अनुभवलं ते या विशिष्ट गटाला सहन करावं लागू नये, या तळमळीतून तिनं तिच्या कामाचा फोकस निश्चित केला. या लोकांना त्यांच्या हक्कांचे स्वातंत्र्य मिळवून देऊन, समाजाने त्यांना आपलंसं करावं, सामाजिक समावेशनाच्या संकल्पनेची रुजवात खऱ्या अर्थाने होण्यासाठी तिचे प्रयत्न सुरू आहेत.
दीक्षाला तिची खरी ओळख मिळाली ती तिच्या ग्रीन सिग्नल शाळेमुळं. मृण्मयी कोळपे या तिच्या मैत्रिणीनं साधारण ७-८ वर्षांच्या सोनी या पोलिओग्रस्त मुलीची, तिला भीक मागायला लावून अर्थार्जनाचं माध्यम बनविणाऱ्या तिच्या कुटुंबियांपासून तिची सुटका केली. तेव्हा रस्त्यांवरील बालकांसाठी काम करण्याची प्रेरणा त्यांच्या मनात जागृत झाली. त्यातूनच ग्रीन सिग्नल स्कूलया बिनभिंतीच्या शाळेचा उदय झाला.
रोशनी संस्थेमार्फत पुण्यातल्या झेड ब्रिजच्या खाली अनेकदा सण साजरे करायला किंवा काही विशेष दिवस साजरे करायला दीक्षा जायची. त्यावेळी ब्रिजखाली राहणाऱ्या महिलांसाठी मासिक पाळीविषयक स्वच्छता सत्रही या मैत्रिणींनी घेतलेलं होतं. डेक्कन परिसर त्यांच्या दैनंदिन रहदारीचा असल्यानं तिथल्या लोकांशी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे संबंध यायचा. यांच्यातली बरीचशी मुलं सिग्नलवर किंवा ज्ञानप्रबोधिनी, गुडलकच्या चौकात त्यांना दिसायची. त्यांच्यासाठी काहीतरी करायला हवं, असं नेहमी वाटायचं. म्हणून त्याच भागात शाळा सुरू करण्याचं त्यांनी ठरवलं.
मार्च २०१६ मध्ये दीक्षाची संयुक्त राष्ट्रसंघाची जागतिक युवा शिक्षण राजदूत म्हणून निवड झाली आणि त्याच वेळी बार्शीच्या अजित फाऊंडेशनच्या संपर्कात त्या आल्या. पुणे आयुक्तांच्या परवानगीनं 7 नोव्हेंबर 2016 रोजी ग्रीन सिग्नल स्कूल सुरु झाले. बिनभिंतींची शाळा यासाठी म्हणायचं की, कोणत्याही भिंतींशिवाय ही शाळा पुलाखालच्या नदीपात्रात भरवण्यात येऊ लागली. गेल्या पंधरा-वीस वर्षांपासून पुलाखाली तीसेक बिऱ्हाडं राहात आहेत. मूळचे गुलबर्गा भागातले हे सर्व स्थलांतरित पारधी आहेत. पोट भरण्यासाठी पुण्यात आले, ते इथलेच झाले. चोरटे, दरोडेखोर अशी चुकीची ओळख झालेला हा समाज. त्यांचा मुख्य व्यवसाय फुगे, खेळणी विकणे किंवा मुलांना भीक मागायला पाठवणे. या लोकांसाठी त्यांची मुलं ही धंद्यातली निव्वळ गुंतवणूक आहेत- पोट भरायचं एक माध्यम.
या पार्श्वभूमीवर, पहिल्या दिवशी सहा-सातच मुलं आली, तीही 2-3 वर्षांची. जेव्हा त्या भागाचा सर्वे केला, तेव्हा तिथं जवळजवळ 88 मुलं असल्याचं निदर्शनास आलं. त्यामुळं पहिल्या दिवशी बाकीची मुले कुठं गेली, हा प्रश्न होता. दीक्षानं तिथल्या एका महिलेला विचारलं की, दीदी बच्चे कहाँ गये? तर त्यावर ती उत्तरली, "बच्चे तो चले गयें चतुर्शृंगी मांगने और गुब्बारे बेचने। कल से ये बचे हुए बच्चे भी जाएँगे।" म्हणजे पहिल्याच दिवशी शाळेच्या भवितव्याविषयी भलंमोठं प्रश्नचिन्ह दीक्षासमोर उभं राहिलं. मात्र, या मुलींची शिकविण्याची तळमळ म्हणा किंवा तिथल्या लहानग्यांची साथ म्हणा, शाळा सुरू राहिली आणि विशेष म्हणजे मुलांची संख्याही वाढत जाऊन चाळीसवर गेली.
सुरवातीला शाळेच्या वेळात मुलांच्या कामाचे दोन तास बुडतात म्हणून आई वडील मुलांना शाळेतून घेऊन जायचे किंवा पाठवायचेच नाहीत. बरेचदा त्यांना मुलांना काहीतरी आमिष दाखवून शाळेत आणावं लागायचं. हळूहळू परिस्थिती बदलली. काही आई वडील स्वतः मुलांना शाळेत घेऊन येऊ लागले. म्हणायचे, "हमने जो सपनें अपने बच्चों के लिये देखे थे, वो आप लोग पुरा कर रहें हो। हम आपका साथ देंगे।" "दीदी, हम तो अंधे हैं, असली आँखें तो भगवान ने आपको दी हैं। इस लिये तो आप हमारे लिये इतना करते हो।" अशा शब्दांत त्या वंचित घटकांकडून त्यांना शाबासकीची पावतीही मिळाली. पूजा मानखेडकर, अमोल गोरडे, सेवा शिंदे, प्रियांका जगताप या सहकाऱ्यांच्या मदतीशिवाय हे अशक्य होतं, असं दीक्षा आवर्जून सांगते. आम्ही सर्व विद्यार्थी आहोत. त्यामुळे जास्त वेळ देता येत नाही, आणि पुढे किती दिवस हे काम चालू राहील माहित नाही , परंतु त्या मुलांचं आयुष्य घडवल्याशिवाय हे काम काही थांबणार नाही, असा विश्वास मात्र ती व्यक्त करते.
दीक्षाच्या या कामावर संयुक्त राष्ट्रसंघाच्या जागतिक युवा शिक्षण राजदूतपदाची जशी मोहोर उमटली, तसाच महाराष्ट्र शासनानं राज्य युवा पुरस्कार देऊनही तिला गौरवलं आहे. आपल्या समाजकार्याबरोबरच युपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या दीक्षाला सनदी अधिकारी होऊन आपल्या कार्याचा परीघ अधिक विस्तारायचाय. शिक्षण, दिव्यांग, वंचित समाजघटक, महिलांचे आरोग्य अशा अनेक प्रश्नांवर ती आज काम करते आहे, त्या कार्याला तिला देशव्यापी आयाम प्राप्त करवून द्यायचे आहेत. उराशी बाळगलेलं हे ध्येय ती निश्चितपणानं जिद्दीनं पूर्ण करणार आहे, असा विश्वास तिच्या शब्दाशब्दांतून ओसंडून वाहताना दिसतो.
बदकांच्या या मोठ्या थव्यात स्वतःला वेडं, कुरूप समजणाऱ्या या पिल्लाला आता त्याच्यातल्या राजहंसत्वाची जाणीव झालीय आणि मोठमोठ्या राजस भराऱ्या मारण्यासाठी तो सिद्धही झालाय. 

फरक पडू शकतो; पडतोय!
ग्रीन सिग्नल शाळेच्या प्रयोगाविषयी आणि त्याच्या यशस्वितेविषयी माहिती देताना दीक्षा सांगते, आई वडिलांच्या मारामाऱ्या, भांडणं, शिव्या, दारू हे पाहातच मोठी होणारी मुलं त्यामुळं अगदी लहान वयातच विविध व्यसनांच्या आहारी जाताना दिसतात, ताडी पिणं, गुटखा खाणं हे तर सर्रासच. या मुलांमध्ये स्वच्छता, निर्व्यसनीपणाचे संस्कार रुजवण्यावर आम्ही भर देतो. आमच्या वागण्या-बोलण्यातून ही मुलं शिकावीत, असा आमचा प्रयत्न असतो. एक्टीव्हीटी बेस्ड लर्निंगबरोबर त्यांना अंक आणि अक्षरओळख करून देण्यावरही भर देतो. दोन ते पंधरा वयोगटातली मुलं इथं येतात. मुलगी वयात येताच तिचं लग्न केलं जातं. साहजिकच तिथं जन्माला आलेली मुलं कुपोषित असतात. त्यामुळं शिक्षणाबरोबरच कुपोषणावरही काम करावं, असं वाटून आम्ही मुलांना पोषण आहार देण्यास सुरुवात केली. वरण-भात व एक उकडलेलं अंडं असा आहार दिला. दरम्यानच्या काळात मृण्मयीची संयुक्त राष्ट्रसंघाच्या युनिव्हर्सल एम्बॅसॅडर्सने एम्बॅसॅडर ऑफ होप म्हणून निवड केली आणि त्यांच्यामार्फत या मुलांना दोन महिने हे जेवण दररोज मिळाले.
या मुलांमध्ये झालेला फरक अधोरेखित करताना दीक्षा सांगते, शाळेला 7-8 महिने होता-होताच मुलांच्या वागण्या-बोलण्यातला फरक जाणवला. रस्त्यात कुठेही मुलं दिसली की ती घाबरून पळूनच जातात. एक चॉकोलेट कमी दिलं म्हणून रडून गोंधळ घालणारी पूनम आज शाळेची मॉनिटर म्हणून काळजी घेते. या छोट्या-छोट्या गोष्टींतून मोठा फरक होऊ शकतो, आपण मोठा फरक घडवू शकतो, याची जाणीव झाली. त्यामुळे या पुढच्या काळात ऍक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग आणि मुक्त शिक्षणपद्धतीवर भर देऊन माझा या मुलांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न राहील. हा उपक्रम मुलांच्या सर्वांगीण विकासावर लक्ष केंद्रित करणारा आहे. पालकांची मानसिकता बदलवणं, मुलांना भीक मागण्यापासून परावृत्त करणं आणि त्यांना पोषण आहार देऊन त्यांचं आरोग्य व्यवस्थित ठेवणं, अशा गोष्टींवर आम्ही भर देत आहोत.
 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा