बुधवार, ५ डिसेंबर, २०१८

समाजमाध्यमे अन् शिवराळपणा!


(संपादक मित्रवर्य श्री. सुभाष सूर्यवंशी यांच्या 'अक्षरभेट'च्या यंदाच्या दिवाळी अंकात प्रकाशित झालेला माझा लेख माझ्या ब्लॉगवाचकांसाठी साभार पुनर्प्रकाशित करीत आहे.- आलोक जत्राटकर)


सोशल मीडिया तथा समाजमाध्यमे ही आजच्या जगण्यातले एक प्रमुख अविभाज्य वास्तव आहे. टीनेजर, तरुण, मध्यमवर्गीय आणि आता ज्येष्ठ नागरिकही कोणत्या ना कोणत्या समाजमाध्यमाद्वारे एकमेकांशी कनेक्टेड राहण्याला प्राधान्य देऊ लागली आहेत. प्रत्येक पिढीचे समाजमाध्यमांच्या वापराचे कारण वेगवेगळे असले तरी तरुण पिढी ही त्यामुळे एकलकोंडी होऊ लागली, तर दुसरीकडे ज्येष्ठांचा एकटेपणा थोडासा दूर होऊ लागला, असे याचे काही परिणाम होताहेत, हेही खरे आहे.
मी नेहमीच म्हणतो की, मी माध्यमांचा अभ्यासक या नात्याने समाजमाध्यमांचा कट्टर समर्थक समर्थक आहे. कारण कोणतेही माध्यम हे वाईट नसतेच मुळी. ते ज्या हातांत पडते, ते हात त्याचा वापर कसा करतात, त्यावर त्याची भलीबुरी दिशा, गती-दुर्गती ठरत असते. आजपर्यंत सर्वच माध्यमांच्या बाबतीत असाच अनुभव आलेला आहे. अणुचेच उदाहरण घेऊ या. अणुपासून समाजाच्या हितासाठी उपकारक अशी अणुऊर्जाही निर्माण करता येते आणि अणु बॉम्बही तयार करता येतो. आणि जगातील सामर्थ्यशाली राष्ट्रांचा कल हा कोणत्या बाजूला आहे, हे आपण पाहतो आहोतच. समाजमाध्यमेही याला अपवाद नाहीत. एक तर नवीन डिजीटल तंत्रज्ञानाच्या वारुवर आरुढ होऊन ज्या गतीने समाजमाध्यमांनी आपले अवकाश विस्तारले आहे, ती गती अचंबित करणारी आहे. मुद्रणकलेला शे-दोनशे वर्षे, रेडिओला चाळीसेक वर्षे आणि टीव्हीला विसेक वर्षे असा कालावधी लागला होता, जगभरात आपला परीघ विस्तारण्याला. परंतु, समाजमाध्यमांच्या विविध प्रकारांचे आयुष्यच मुळी आता कमाल दहा वर्षांपर्यंत सीमित झाले आहे. अत्यंत गतीने जगभरात विस्तारलेली समाजमाध्यमे अवघ्या दहाएक वर्षांतच लयाला गेल्याची उदाहरणे गेल्या दशकभरात आपल्यासमोर घडलेली आहेत. फेसबुकने यातली मेख जाणली, सातत्याने बदलण्याचे धोरण स्वीकारले आणि आपले रुप बदलत बदलत आपले अस्तित्व कायम राखण्यात यशस्वी ठरले आहे, आतापर्यंत तरी.
समाजमाध्यमांच्या वापरकर्त्यांच्या बाबतीत एक गोष्ट आपण लक्षात घ्यायला हवी, ती म्हणजे या वापरकर्त्यांचा वयोगट हा सर्वसाधारणपणे आहे, १६ ते ४० या दरम्यानचा. त्यातही पौगंड वयातील मुलामुलींचे येथील प्रमाण हे सर्वाधिक आहे. त्यामुळे शिक्षणाचे, व्यवहाराचे, सर्वंकष ज्ञानाचे संस्करण ज्यांच्यावर अद्याप पूर्ण होणे बाकी आहे, किंवा होऊ घातले आहे, असा हा गट आहे. अत्यंत संस्कारक्षम असलेला हा गट म्हणजेच या देशाचे भवितव्य आहे, असेही आपल्याला म्हणता येऊ शकेल. मात्र, समाजमाध्यमांच्या प्लॅटफॉर्मवरुन ही संस्कारशील मने घडविण्याऐवजी बिघडविण्याकडे कल असणारा एक अत्यंत (कु)महत्त्वाकांक्षी गट या प्लॅटफॉर्मवर धुमाकूळ घालतो आहे आणि त्याच्या या धुमाकुळाला ही सारी मने बळी पडत आहेत, ते पाहता एक चिंतेचे वातावरण साऱ्या देशभरात निर्माण झाले आहे.
साधारणतः २०१४नंतरच्या कालखंडात ट्रोलिंग हा शब्द समाजमाध्यमांच्या संदर्भात सातत्याने ऐकू येऊ लागला. आणि २०१६मध्ये आलेल्या स्वाती चतुर्वेदी यांच्या आय एम अ ट्रोल या पुस्तकामुळे समाजमाध्यमांवर धुमाकूळ घालत असलेल्या ट्रोलर्सच्या फौजफाट्याची कहाणीच जगासमोर आली. समाजमाध्यमांच्या गैरवापराचं एक उघडंनागडं वास्तव या पुस्तकाच्या माध्यमातून जगासमोर आलं. कोणी आपल्याविरोधात काही लिहीतो आहे, असं दिसलं की त्याच्यामागे पगारी ट्रोलर्सची फौज सोडून द्यायची आणि इतकं संत्रस्त करून सोडायचं की, त्यानंही विचलित होऊन त्याच्या हातून काही चुकीचं लिहीलं जावं आणि त्यानंतर मग त्याला बरोबर कैचीत पकडता यावं, असा हा ट्रोलिंगचा ट्रॅप करून त्यात भल्याभल्यांना गुंडाळण्याचं एक मोठं षडयंत्र समाजमाध्यमांवर कार्यरत करण्यात आलं आहे. आणि आता तर पगारी ट्रोलर्सच्या पलिकडे स्वयंसेवी ट्रोलर्सनीच या माध्यमांवर धुमाकूळ सुरू केला असल्याचं दिसून येत आहे.
एखादी व्यक्ती आपली काही भूमिका घेऊन लिहीते आहे, समाजमाध्यमांवर व्यक्त होते आहे, घटनेच्या, कायद्याच्या चौकटीत तसेच सामाजिक भानाच्या बाबतीतही कुठेही तोल सुटलेला नाही, अशा प्रकारचे हे लेखन आहे; मात्र, काही इझमचे झेंडे घेऊन कार्यरत असलेल्या गटांना त्यात त्यांच्या हेतूंना बाधा आणणारं असं काही आढळलं की, त्या संबंधितावर पद्धतशीर वॉच ठेवला जातो आणि त्याच्याकडून अगदी प्रबोधनात्मक असंही काही पोस्ट झालं तरी, त्यावर अत्यंत विपर्यास करणारी, आक्षेपार्ह किंवा कधी कधी जाहीररित्या आपण उच्चारणार नाही, अशा अत्यंत असंसदीय, शिवराळ भाषेत टिप्पणी केली जाते. आणि मग लेखकाचा संबंधित पोस्ट टाकण्यामागचा मूळ हेतू, त्यातला विचार बाजूला पडून या ट्रोलर्सचा समाचार घेणाऱ्या प्रतिक्रियांचा पाऊस पडू लागतो. साहजिकच, इथे लेखकाचा प्रबोधनाचा मूळ हेतू आपोआपच बाजूला सारला जातो, चर्चा नको त्या दिशेला भरकटवली जाते. आणि आपोआपच ट्रोलिंगचा मूळ हेतू सफल होऊन जातो. पुढे या साऱ्या प्रकारांना कंटाळून संबंधित प्रबोधनकाराने या समाजमाध्यमांवरुन एक तर आपला गाशा गुंडाळावा किंवा त्याने येथे लिहीणे तरी थांबवावे, याच दिशेने त्याला हैराण केले जाऊ लागते. या पार्श्वभूमीवर, प्रबोधनकारांचे समर्थकही आक्रमक होऊ लागतात, ते ट्रोलर्सना तितक्याच चोख, अतिरेकी किंवा तशाच शिवराळ भाषेत प्रत्युतरे, दुरुत्तरे करू लागतात आणि येथे ट्रोलर्सचा हेतू पुन्हा दोनशे टक्के यशस्वी होतो कारण अँटी-ट्रोलर्सचीही एक फौज समाजमाध्यमांमध्ये आकार घेऊ लागते. अँटी जरी असले तरी ट्रोलिंगच ते! त्यामुळे ज्यांचे प्रबोधन करण्यासाठी संबंधिताने पोस्ट लिहीली, त्यांचे त्या मूळ पोस्टऐवजी दुसरीकडे लक्ष विचलित करण्यात ट्रोलर्स यशस्वी होऊन जातात. म्हणजे काही झाले तरी, इझमवाद्यांना आपले इझमिक हेतू साध्य करण्यामध्ये ज्या सुष्टांचा, विचारवंतांचा अडथळा होतो, त्या विचारवंतांचा व्हर्चुअल काटा काढण्यासाठी सरसावलेली, प्रशिक्षित केलेली, पगार देऊन पदरी बाळगलेली एक मोठी फौज येथे प्रचंड मोठ्या प्रमाणात कार्यरत आहे.
याचे कारणही महत्त्वाचे आहे, ते म्हणजे आज आपल्या देशाचे बहुसंख्य तरुण बळ हे समाजमाध्यमांच्या व्यासपीठावर कार्यरत आहे, माहितीसाठी अवलंबून आहे. पुस्तके, वृत्तपत्रे यांच्यासारख्या अधिकृत माहिती देणाऱ्या व्यासपीठांपेक्षाही तत्काळ माहिती प्राप्त करून देणारे व्यासपीठ म्हणून समाजमाध्यमांचा वापर केला जातो खरा; मात्र, त्याच व्यासपीठाचा वापर करून फेक न्यूज, बनावटी पोस्टचा मारा करून या तरुणाला खऱ्या माहितीपासून वंचित ठेवून, माहितीची शहानिशाही न करता तिचा प्रसार करण्यास प्रवृत्त करणाऱ्या अपप्रवृत्ती येथे जोमाने फोफावल्या आहेत. खोटी माहिती, अफवा क्षणभरात देशात पसरवून त्या माध्यमातून देशात अराजक निर्माण करण्याचे, देशाला वेठीला धरण्याचे, भेदाभेद वाढविण्याचे प्रकार हरघडी घडताहेत. पाकिस्तानातल्या कराचीत एका बालकाचे अपहरण झाल्याचा व्हिडिओ व्हायरल करून ते अपहरण आपल्या परिसरातच घडल्याची वार्ता समाजकंटकांनी पसरवली ती या समाजमाध्यमांमधूनच. त्यामुळे देशातील पालकांत अस्वस्थता पसरली आणि ठिकठिकाणी अपहरणकर्ते समजून गोरगरीब समाजातल्या लोकांना ठेचून मारण्यापर्यंत या देशातल्या निष्पाप जनतेची मजल गेली. पारधी समाजातल्या असहाय गरीब लोकांना गावच्या चावडीत कोंडून त्यांना दगडाने ठेचून मारणाऱ्या एकाच्याही मनाला त्यांच्या निष्पापतेची शहानिशा करावीशी वाटत नाही, दगड मारताना हात थरथरत नाही, इतकी असंवेदनशीलता या समाजात निर्माण होण्यास कारणीभूत कोणाला ठरवावे? लोकांना, व्यवस्थेला, समाजमाध्यमांना की त्यावरील या ट्रोल फौजेला? म्हणजे तुम्ही गरीब असा, पण गरीब दिसायचे मात्र नाही; अशी ही विचित्र कोंडी आहे. दुसरीकडे, साधे मटण घेऊन निघालेल्या लोकांना गोमांसाचे वहन करतात म्हणून पेटवून मारले जाते.
ही केवळ असंवेदनशीलता आहे का? हो आहे, मात्र असंवेदनशीलतेहून अधिक काही तरी यामागे गुंतले आहे, कार्यरत आहे. हे नेमके काय आहे? माझ्या मते, आपल्या समाजाला ज्या जातिधर्माच्या भेदाभेदांचा शाप गेली हजारो वर्षे ग्रासलेला होता आणि भारतीय राज्यघटनेने त्या सर्वांना कायद्याने कागदोपत्री समता, बंधुता, सामाजिक न्याय आणि सहिष्णुतेचा संदेश देऊन तिलांजली दिलेली होती, देण्यास भाग पाडले होते आणि गेल्या साठ-सत्तर वर्षांत एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हणून आपला जगभरात ठसा उमटविण्यात आपण यशस्वीही झालो आहोत. त्या सर्वांना आता तिलांजली देण्याचे प्रयत्न अत्यंत जोरदारपणे पुन्हा डोके वर काढत आहेत. समाजमाध्यमांना त्यासाठी हस्तक म्हणून मोठ्या प्रमाणात वापरले जाऊ लागले आहे.
आपल्या देशातल्या प्रत्येक समाजाच्या जातिगत संवेदनांना आवाहन करून त्या नव्याने नकारात्मक पद्धतीने चेतविल्या जात आहे, त्यांना आवाहन केले जात आहे, आव्हान दिले जात आहे, एकमेकांविरुद्ध उभे राहण्यास भाग पाडले जात आहे. त्यांनी एकमेकांविरुद्ध उभा राहावे, त्यांच्यादरम्यान कायमस्वरुपी एक दरी निर्माण व्हावी; त्यांनी एक राष्ट्र, एक समाज म्हणून पुन्हा उभे राहू नये, यासाठी एक कणखर यंत्रणा सक्षमपणे भूमिगत पद्धतीने, समाजमाध्यमांच्या व्हर्च्युअल व्यासपीठांचा वापर करून पद्धतशीरपणे कार्यरत करण्यात आली आहे. एके काळी एखादा समाज आपल्या हाताखाली गुलाम म्हणून काम करीत होता, तो आता शिक्षणाने विचारी, समंजस होऊन ताठ मानेने आपल्यासमोर उभा राहतो, हे गेल्या पिढीपर्यंत रुचत नव्हते, हे काही अंशी आपण मान्यही करू. पण, आता जागतिकीकरणाच्या कालखंडात जी पिढी जन्मली आहे, जी संपूर्ण स्वातंत्र्याचा उपभोग घेते आहे, तिच्याकडून ग्लोबल भाषा बोलली जाण्याची, अवलंबली जाण्याची अपेक्षा धरायची की पुन्हा त्यांनी आपल्या बापजाद्यांच्या जातीचा दुराभिमान बाळगून नव्याने जातिव्यवस्थेचे समर्थक म्हणून तोंड वर काढावे, असा आग्रह धरायचा? नव्या पिढीमध्ये हा जात्याभिमान, धर्मातिरेकी असहिष्णुता नव्याने बिंबविणारी एक स्वतंत्र यंत्रणा गतिमान केली जाते आहे, समाजमाध्यमांच्या व्यासपीठावरुन. आपल्याला प्रगतीपथावरुन च्युत करण्यासाठी, देशबांधवांप्रती आपल्या संवेदना, सहवेदना, सौहार्दाची भावना संकुचित करण्यासाठी या साऱ्याचा वापर करण्यात येतो आहे; अगदी आपलाही त्यासाठी वापर केला जातो आहे, याचे भानही या पिढीमध्ये न येऊ देता, जाणीवही होऊ न देता त्यांना इमानेइतबारे आपल्या सुप्त हेतूंसाठी वापरून घेण्याचा या ट्रोलर्सचा हेतू सफल होऊन जातो. हा जात्याभिमानाचा अंगार त्यांच्यात आत खोलवर कुठेतरी ठसठसत होताच, फक्त त्याला सातत्याने फुंकर घालून फुलवत ठेवण्याचे काम समाजमाध्यमांच्या माध्यमातून करण्यात येऊ लागले आहे. मग कधी आरक्षणाने त्यांच्यावर झालेला अन्याय अतिरंजित स्वरुपात त्यांच्यासमोर मांडला जातो, तर कधी गोमातेचा अवमान केल्याचे दाखवून त्यांच्या धार्मिकतेला आव्हान दिले जाते. त्यामागचे वास्तव कधी उलगडून दाखविले जात नाही, किंवा जात्याभिमानाने अंध झालेले हे तरुण ते जाणून घेण्याचा कधी प्रयत्नही करीत नाहीत. जे करतात, त्यांना देशद्रोही ठरवून त्यांचा न्यायनिवाडा करणाऱ्या न्यायाधीशाच्या भूमिकेत हे ट्रोलर्स शिरताना दिसतात, तेही देशभक्तीचा, राष्ट्रवादाचा गोंडस बुरखा पांघरुन!
देशातल्या मूळ प्रश्नांना भिडण्याऐवजी सातत्याने निरुपयोगी, व्यवस्थेला निरुपद्रवी असे यक्षप्रश्न (?) निर्माण करून त्यांच्या सोडवणुकीच्या मागे लोकांना लावण्यात येते. देवधर्म, अध्यात्म यांच्या तात्त्विक चर्चेकडे सारा मोहरा वळविण्यात येतो. लोकांना त्यात गुरफटवून ठेवण्यात येते. सारी भांडवलशाही यंत्रणा त्या दिशेने कार्यान्वित करण्यात येते. त्यासाठी माध्यमबलाचा पुरेपूर वापर सातत्याने करण्यात येतो. जास्तीत जास्त उत्पादक मनुष्यबळ हे अनुत्पादक बाबींमध्येच कसे गुंतून राहील, या दृष्टीने सारी यंत्रणा काम करू लागते. या व्यवस्थेमध्ये लोक गुंतू लागले की, मूळ व्यवस्थेच्या प्रश्नांपासून तिचे लक्ष आपोआप हटते. एक मोठी पॅसिव्हिटी, अकार्यक्षमता, अक्षमता समाजमानसाचा ताबा घेऊन राहते. असा पॅसिव्ह, भांडवलशाहीद्वारा उपकृत समाज हा अशा व्यवस्थेचा मोठा आधार असतो. व्यवस्थेने, भांडवलशाहीने फेकलेल्या स्वादिष्ट तुकड्यांचा आस्वाद या समाजाने घ्यावयाचा असतो, त्यांना प्रश्न विचारावयाचे नसतात. प्रश्न विचारणारे, उपस्थित करणारे लोक या तंदुरुस्त (?) व्यवस्थेला आवडत नाहीत, नको असतात. अशा लोकांचा काटा काढण्यासाठी मग काही उपव्यवस्था कार्यरत करण्यात येत असतात. समाजमाध्यमांवरील ट्रोलिंग ही या उपव्यवस्थेची एक शाखा म्हणून काम करीत असते, हे इथे लक्षात घ्यायला हवे.
समाजमाध्यमांची व्हर्चुअलिटी हा जसा त्यांचा एक महत्त्वाचा लाभ आहे, तसाच तो एक मोठा तोटा म्हणूनही आता सामोरा येताना दिसतो आहे. एखाद्या विचारवंताला समारोसमोर प्रश्न विचारायचे, किंवा दुरुत्तरे करण्याची कोणाची प्राज्ञा असायची नाही. त्याच्या तोडीस तोड ज्ञान असणाराच एखादा विषयाच्या अनुषंगाने त्यांच्या मताचा प्रतिवाद करण्यास पुढे येत असे. किंबहुना, ज्ञानाच्या क्षेत्रात अशा वाद-प्रतिवादांना अत्यंत मोलाचे, महत्त्वाचे स्थान असायचे, असते. मात्र, आज अशा विचारवंताच्या पायाचा धूलिकण होण्याचीही ज्याची पात्रता नाही, अशी व्यक्ती समाजमाध्यमांच्या व्यासपीठावर त्याच्यावर अत्यंत असंसदीय शिवराळ भाषेत आगपाखड करताना दिसते, तेव्हा मनाला होणाऱ्या यातनांचे वर्णन करणे केवळ अशक्य आहे. योग्य ज्ञान मिळविणे दूरच, हाती आलेल्या माहितीचीही खातरजमा न करता त्यावरुन असा शिवराळपणा करणे हे कितपत संयुक्तिक, याचा विचारही होताना दिसत नाही. यामध्येही तरुणांचे प्रमाण अत्यधिक आहे, हे सांगताना तर अधिकच वेदना होतात. केवळ अरे ला कारे म्हणण्यापुरते हे मर्यादित नाही, तर त्यातून एकूणच या समाजाचा सामाजिक, मानसिक, वैचारिक असा ऱ्हास करण्यालाही या साऱ्या बाबी कारणीभूत ठरतात.
भारतीय राज्यघटनेने हा देश- स्वातंत्र्यापूर्वी कधीही एकसंध नसणारा भारत देश एकरुप, एकजीव करण्याचे काम केले. ज्या सांविधानिक मूल्यांची, मानवी मूल्यांची देणगी राज्यघटनेने आपल्याला प्रदान केली आहे, तिला हरताळ फासण्याचे, तिलांजली वाहण्याचे प्रकार समाजमाध्यमांच्या व्यासपीठांवरुन हरघडी होताना दिसत आहेत. व्हर्च्युअल माध्यमांपुरताच हा हिंसाचार मर्यादित असता तरी एकवार त्याकडे काणाडोळा करता येणे शक्य झाले असते. मात्र, प्रत्यक्षात या देशात ठिकठिकाणी माजलेल्या अराजकाच्या द्वारे कित्येक लोकांची प्राणाहुती, बळी आणि राष्ट्रीय, सामाजिक-आर्थिक संपत्तीचे नुकसान या देशाला सोसावे लागले आहे, गेल्या नजीकच्या कालखंडात. काही समाजकंटकांची तर राज्यघटनेची होळी करण्यापर्यंत मजल गेली. हे धाडस कसे होऊ शकते? येते कोठून? ज्या राज्यघटनेने स्वातंत्र्याचे मूल्य प्रदान केले, त्या स्वातंत्र्याचा दुरुपयोग राज्यघटनेचीच होळी करण्यासाठी केला जाणे, हे किती क्लेशकारक! मनुस्मृती आणि राज्यघटनेची तुलनाच कशी होऊ शकते? मनुस्मृतीच्या राज्यात या स्वातंत्र्याची तिरीप तरी आपल्यापर्यंत पोहोचू शकली असती का?, याचा विचारच केला जात नाही आणि अशा प्रकारे अविवेकी, अविचारी कृती केल्या जातात, जाणीवपूर्वक घडवून आणल्या जातात. त्यांना प्रोत्साहन दिले जाते. आज संपूर्ण जगभरात माजलेले अराजक, अस्वस्थता, दहशतवादाचे भीषण वास्तव आणि भारत देशातले सामाजिक, राजकीय चित्र पाहता, एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की, जगातल्या भीषण वास्तवापासून या देशाचे संरक्षण जर कोण करीत असेल तर ते म्हणजे भारताचे संविधान. या संविधानाचे छत्र जर भारतीयांच्या माथ्यावरुन हरपले, तर मायबाप हरवलेल्या अनाथ मुलासारखी या देशाची आणि देशातल्या प्रत्येक समाजघटकाची अवस्था होऊन जाईल. त्यामुळे समाजमाध्यमांचे व्हर्चुअल व्यासपीठ असो की प्रत्यक्ष मैदानावरची लढाई असो, या सर्व ठिकाणी सांविधानिक मूल्ये, मानवी मूल्ये यांचा बचाव करण्यासाठी प्रत्येकाने आपापल्या परीने तत्पर राहायला हवे. दुष्प्रवृत्तींचा सामना करण्यासाठी सुष्टांची फळी तयार होणे ही आजघडीची फार महत्त्वाची गरज आहे. चांगल्या लोकांनी, सत्प्रवृत्तींनी या क्षणी कोषात जाणे या देशाला कदापि परवडणारे नाही.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा