गुरुवार, १७ जानेवारी, २०१९

"साहित्याने मानवी मूल्यांसाठी आग्रही असावे!"



(निपाणी येथे येत्या १९- २० जानेवारी २०१९ रोजी निपाणी भाग मराठी साहित्य संमेलन भरत आहे. या निमित्ताने दै. पुढारीच्या बेळगाव आवृत्तीमध्ये या संमेलनाकडून असलेल्या अपेक्षांविषयी मनोगत प्रसिद्ध झाले आहे. हा सविस्तर लेख माझ्या ब्लॉग वाचकांसाठी येथे पुनर्प्रकाशित करीत आहे.)


निपाणी येथे मराठी साहित्य संमेलन भरते आहे, याचा आनंद मोठा आहे. सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिकदृष्ट्याही निपाणी अतिशय कृतीशील आणि चळवळे ठिकाण आहे. येथे साहित्य संमेलन या शीर्षकाखाली साहित्य आणि साहित्यिकांचा मेळा प्रथमच भरत असला तरी, येथील महाविद्यालये आणि इतर क्रियाशील संस्था यांच्या विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून येथे मराठीतल्या अनेक महत्त्वाच्या साहित्यिकांचे येणे झालेले आहे. आता त्याला साहित्य संमेलनाचे अधिष्ठान लाभते आहे, इतकेच!
या पार्श्वभूमीवर, या साहित्य संमेलनाकडून काही अपेक्षा असणे स्वाभाविक आहे; त्याच वेळी या सुरवातीच्या क्षणी अपेक्षांचा डोंगर उभा करणेही इष्ट नाही. काही माफक पण मूलभूत अपेक्षांची पूर्ती मात्र या संमेलनातून होणे आवश्यक आहे.
निपाणीमध्ये मराठी साहित्य संमेलन होत असताना या शहराचे भौगोलिक आणि भाषिक स्थानही महत्त्वाचे ठरते. कर्नाटक-महाराष्ट्र सीमाप्रश्नाच्या लढ्यात या शहराचे योगदान आणि महत्त्व मोठे आहे. सीमाभागातील पहिले शहर म्हणून मराठीच्या अस्मितेचा झेंडा मोठ्या डौलाने येथे फडकविला जातो. मराठी भाषा आणि मराठी भाषिक यांच्या मुस्कटदाबीविरोधात वाचा इथेच फुटते. त्यामुळे मराठी भाषा हा इथे अभिमानाने मिरविण्याचा विषय आहे. त्याचवेळी स्थानिक मराठी बोलीभाषेवर कन्नड भाषेचा प्रभाव अगदी जाणवण्याइतपत ठळक आहे. ही भाषा कधी आपल्याला महादेव मोरेंच्या कथांतून; तर कधी राजन गवस यांच्या कादंबऱ्यांतून आपल्याला भेटत राहते. म्हणजे मराठीचा झेंडा उंचावत असताना त्यावरील कन्नडचा प्रभाव आपल्याला सहजी नाकारता येत नाही, येणार नाही. इथल्या मराठीचे नेमके हेच वैशिष्ट्य घेऊन आपल्याला स्वतःच्या साहित्य निर्मितीच्या प्रेरणा शोधल्या पाहिजेत आणि मांडल्या पाहिजेत. त्यासाठी अभिजात प्रमाण मराठीचा आग्रह प्रसंगी झुगारून आपल्या बोलीभाषेतून व्यक्त होण्यासाठी नवलेखक, साहित्यिकांना प्रोत्साहन द्यायला हवे. अशा साहित्याचा आणि साहित्यिकांचा सहभाग वाढविणे आणि त्यांचा तरुण पिढीशी संवाद घडवून आणणे, अत्यावश्यक आहे. जेणे करून मराठी भाषेच्या संदर्भातील न्यूनत्वाची भावना लोप पावून नवलेखक आपल्या भाषेतून सहजगत्या व्यक्त होण्यास पुढे सरसावतील आणि त्यांच्याकडून अस्सल, सकस साहित्यकृती निर्माण होतील.
महाराष्ट्रात आणि परिसरातील मराठी भाषिक टप्प्यात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाव्यतिरिक्त सुमारे अडीचशेहून अधिक लहानमोठी साहित्य संमेलने दरवर्षी भरतात. या साहित्य संमेलनांची संख्या वर्षागणिक वाढतेच आहे. सीमाभागातही कडोली, येळ्ळूर अशा अनेक ठिकाणी साहित्य संमेलने भरतात आणि मराठी भाषेच्या अस्मितेचा तिथला आग्रह हा महाराष्ट्रातील कोणत्याही अन्य साहित्य संमेलनाच्या तुलनेत अधिक आणि आक्रमक असतो. कर्नाटक शासनाच्या मराठीविरोधी धोरणांचा हा प्रतिरोध अभिव्यक्त होणे स्वाभाविक आहे. त्याचे प्रतिबिंब निपाणीच्या संमेलनातही उमटणे स्वाभाविक आहे. तथापि, निपाणीने या सीमाप्रश्नाच्या लढ्याला रसद पुरविण्याबरोबरच दिशा देण्याचे काम केले आहे. ते साहित्यिक संदर्भातही करावे लागणार आहे. सीमाप्रश्नाचा लढा भौगोलिकतेबरोबरच भावनिकही आहे, हे मान्य करूनही आणि मराठी भाषिक अस्मिता जपण्याची बाब अधोरेखित करूनही; या संमेलनाने मराठी आणि कन्नड भाषेमधील संवादाचा पूल म्हणूनही काम करावे, अशी माझी अपेक्षा आहे. कर्नाटकातील शिवराम कारंथ, गिरीष कर्नाड, श्री, कुवेंपु (के.व्ही. पुटप्पा) अशा महान कन्नड साहित्यिकांशी माझा परिचय झाला, तो उमा कुलकर्णी यांच्यामुळे. त्यांनी कन्नडमधील अभिजात, आधुनिक आणि पुरोगामी साहित्य आणि साहित्यिकांचा उभ्या महाराष्ट्राला परिचय करून दिला, तो आपल्या दर्जेदार अनुवाद शैलीने. म्हणजे भाषिक अस्मितेचा लढा लढत असतानाही आपल्याला भाषासमृद्धीच्या दृष्टीनेही प्रयत्न करण्याची मोठी संधी येथे उपलब्ध आहे. विशेष म्हणजे कन्नड आणि मराठी भाषांचे अनेक जाणकार या विभागात आहेत, त्यांनी असा पूल व्हायला हवे.
आज इंग्रजी भाषा समृद्ध आहे आणि वर्षागणिक होते आहे, याचे कारण म्हणजे दरवर्षी जागतिक भाषांतील हजारो शब्द ही भाषा आपलेसे करते. मराठीतले चपाती, कढी यांसारखे अनेक शब्द तिने सहजगत्या सामावून घेतले आहेत. हिंदी भाषाही अशीच लवचिक आहे. आपण मात्र मराठीचा अभिमान मिरविता मिरविता इतके दुराभिमानी बनून जातो की, इतर भाषांनाच नाकारू लागतो. हे भाषेची वृद्धी, समृद्धी आणि अस्तित्व या घटकांसाठी मारक आहे. नकारात्मकतेपेक्षा भाषिक स्वीकारार्हता, देशातील अन्य भाषांचा सन्मान आणि भारतीय भाषांचा अभिमान ही भाषा उंचावण्याची आणि देशाची अखंडता टिकविण्याची महत्त्वाची साधने आहेत. कन्नड भाषा नाकारण्याचे कारण नाही. तिचा राजकीय लाभासाठी गैरवापर केला जात असेल, तर ते निषेधार्हच आहे. तो निषेधही नोंदवायलाच हवा. मात्र, मराठी-कन्नड भाषाव्यवहार वाढायला हवा. त्यातून अंतिमतः मराठी भाषा आणि साहित्यच समृद्ध होईल, याची खात्री बाळगा.
मुळात साहित्याचे प्रयोजनच माणुसकीला आवाहन करण्याचे आहे. जे साहित्य माणसातील संवेदनशीलता जागृत ठेवत नाही, त्याला साहित्य म्हणावे कसे? साहित्याने मानवी मूल्यांचा आग्रह धरला पाहिजे. स्वातंत्र्य, समता, बंधुता या मूल्यांच्या प्रतिष्ठापनेसाठी आग्रही राहिले पाहिजे. यासाठी जे साहित्य काम करते, तेच चिरंतन राहते. अशा साहित्याच्या प्रेरणा घेऊन शोषित, वंचित यांना त्यांचे व्यवस्थेतील स्थान मिळवून देण्यासाठी साहित्याने काम केले पाहिजे. व्यवस्था त्यात कमी पडत असेल, तर त्या व्यवस्थेतील त्रुटींचे निर्देशन करायला हवे. व्यवस्था राबविणाऱ्या हातांना त्यासाठी प्रेरित करायला हवे. आणि त्याचबरोबर या वंचितांमध्येही स्वाभिमानाचे स्फुल्लिंग चेतविले पाहिजे. कोणत्याही साहित्याची आणि साहित्यिकाची ही मूलभूत जबाबदारी आहे, असे मला वाटते. त्या दृष्टीने निपाणी येथील मराठी साहित्य संमेलनाने दिग्दर्शकीय भूमिका पार पाडण्याची गरज आहे. नुकत्याच झालेल्या 92व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कर्नाटक सीमाभागातील मराठी गावांच्या विकासाला अग्रक्रम देण्याच्या मागणीचा ठराव करण्यात आला आहे. तो ठरावाच्या रुपातच राहणार आहे. तथापि, या विकासाचा कृतीशील आराखडा राज्यकर्त्यांना देण्याचे काम निपाणीच्या साहित्य संमेलनाने करण्याचे कार्य करावे. त्या दृष्टीने विभागातील मराठी साहित्यिकांमध्ये आत्मविश्वास व चैतन्य निर्माण करण्यात हे संमेलन निश्चितपणे यशस्वी होईल, असा विश्वास वाटतो.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा