मंगळवार, २९ जानेवारी, २०१९

‘मूकनायका’ची शताब्दी

(डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ३१ जानेवारी १९२० रोजी मूकनायक हे वृत्तपत्र सुरू केले, त्याला यंदा शंभर वर्षे होताहेत. या निमित्ताने या वृत्तपत्राची निर्मिती आणि बाबासाहेबांच्या त्यामागील प्रेरणा यांवर प्रकाश टाकणारा लेख आज दि. ३० जानेवारी २०१९ रोजी दै. सकाळच्या कोल्हापूर आवृत्तीमध्ये प्रकाशित झाला आहे. तो सकाळच्या सौजन्याने माझ्या ब्लॉगवाचकांसाठी पुनर्मुद्रित करीत आहे.- आलोक जत्राटकर)


शनिवार, दि. ३१ जानेवारी १९२० हा दिवस भारतीय पत्रकारितेच्या दृष्टीने अनेकार्थांनी असाधारण स्वरुपाचा आहे. कारण या दिवशी डॉ. भीमराव रामजी आंबेडकर या विलायतेहून उच्चविद्याविभूषित होऊन आलेल्या आणि हजारो वर्षे अस्पृश्यतेच्या जोखडाखाली पिचलेल्या समाजाच्या उत्थानाच्या प्रेरणेने भारावलेल्या तरुणाने अत्यंत विचारपूर्वक या दिवशी मूकनायक या पाक्षिकाच्या प्रकाशनाला सुरवात केली.

बाबासाहेबांच्या आधी गोपाळबाबा वलंगकर (विटाळविध्वंसन), शिवराम जानबा कांबळे (सोमवंशीय मित्र), किसन फागू बंदसोडे (विटाळविध्वंसक) आणि गणेश आकाजी गवई (बहिष्कृत भारत) आदींनी स्वतःच्या पत्रांबरोबरच तत्कालीन सत्यशोधक वृत्तपत्रांतूनही अस्पृश्यता निवारणविषयक लेख लिहून त्यांनी आपले प्रबोधनाचे कार्य चालविले होते. त्यामुळे मूकनायक हे अस्पृश्य, दलित बांधवांसाठी निघालेले पहिलेच पत्र होते, असे नव्हे; पण, अस्पृश्यता निवारणाच्या लढ्यामध्ये सामाजिक, धार्मिक मुद्यांच्या पलिकडे जाऊन त्यांच्यात राजकीय हक्कांच्या जाणीवेचे वारे फुंकणारे आणि अस्पृश्यतेच्या प्रश्नाची अत्यंत मूलभूत शास्त्रशुद्ध मांडणी करणारे पत्र म्हणून मूकनायक हे निश्चितपणाने अत्यंत महत्त्वाचे आहे. 

बडोदा संस्थानची शिष्यवृत्ती थांबल्यामुळे विद्याभ्यास अर्धवट सोडून विलायतेहून परतलेल्या बाबासाहेबांना उच्चविद्याविभूषित असूनही बडोद्यातील नोकरीत जातीयवादाचा त्रास झाला. त्यामुळे ती नोकरी सोडून ते मुंबईतल्या सिडनेहॅम कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून रुजू झाले. नोकरी करून काही पुंजी साठवून पुन्हा विलायतेला जाऊन अपूर्ण अभ्यास पूर्ण करायचा, त्यांचा संकल्प होता. त्यामुळे सार्वजनिक कार्यात लक्ष घालण्याची त्यांची भूमिका नव्हती. तथापि, तत्कालीन राजकीय घडामोडीच अशा काही गतिमान झाल्या की, त्यात त्यांना पुढाकार घेणे भाग पडले. २० ऑगस्ट १९१७ रोजी माँटेग्यू सुधारणांची घोषणा झाली. त्या अंमलात आणण्यासाठी साऊथबरो कमिशनच्या वतीने येथील लोकांच्या साक्षी घेण्याचे काम सुरू होते. कमिशनसमोर अस्पृश्यांची बाजू स्वतंत्रपणे मांडणे आंबेडकरांना आवश्यक वाटले. म्हणून सरकारी नोकरीत असतानाही पत्रव्यवहार करून त्यांनी कमिशनसमोर साक्ष देण्यासाठी स्वतःची निवड करून घेतली आणि अत्यंत हिरीरीने अस्पृश्यांची कैफियत कमिशनसमोर मांडली.

या वेळी बाबासाहेबांना जाणीव झाली की, अस्पृश्यांची कैफियत नीटपणे मांडली गेली नाही, तर त्यांना राजकीय हक्क प्राप्त होणे दुष्कर आहे. त्यासाठी त्यांची बाजू सातत्याने मांडणारे साधन असणे जरुरीचे आहे. महाराष्ट्रात त्यावेळी पत्रे खूप होती, पण अस्पृश्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देणारी पत्रे नाहीत, असा त्यांचा अनुभव होता. वस्तुस्थिती तशी होतीच. अस्पृश्यांच्या हिताहिताची चर्चा करणाऱ्या वृत्तपत्राशिवाय अस्पृश्यांचे भवितव्य घडविणे अशक्य आहे, असे त्यांच्या मनाने घेतले. आणि त्यातूनच, ३१ जानेवारी १९२० रोजी 'मूकनायक' पाक्षिकाचा जन्म झाला.

बाबासाहेबांचा वृत्तपत्र सुरू करण्याचा मनोदय प्रत्यक्षात येऊ शकला, तो कोल्हापूर संस्थानचे सहृदयी राजे शाहू महाराज यांच्यामुळेच. महाराजांच्या चळवळीतील दत्तोबा संतराम पवार यांच्याकडून महाराजांना आंबेडकरांविषयी आणि त्यांच्या वृत्तपत्र काढण्याच्या भूमिकेविषयी समजले. त्यांना ही कल्पना पसंत पडली आणि त्यांनी त्यासाठी लगोलग अडीच हजार रुपयांचा भरघोस निधी दिला. तो हाती पडताच बाबासाहेबांनीमूकनायक सुरू केले. हजारो वर्षे चातुर्वण्याच्या, गुलामगिरीच्या ओझ्याखाली दबलेल्या, शोषित, वंचित, अस्पृश्य अशा ज्यांना या सामाजिक व्यवस्थेत अन्यायाविरुद्ध तोंडून ब्र सुद्धा काढण्याची परवानगी नव्हती, अशा अस्वस्थ समाजमनाचा हुंकार, आवाज म्हणजे मूकनायक. दबलेल्या समाजात अन्यायाविरुद्ध गर्जना करण्याचा आत्मविश्वास पेरणारा असा हा मूकनायक होता. सरकारी नोकरीत असल्याने संपादक म्हणून बाबासाहेबांनी वऱ्हाडातील अंडरग्रॅज्युएट तरुण पांडुरंग नंदुराम भटकर यांची नियुक्ती केली. पत्रावर बाबासाहेबांचे नाव नसले तरी त्याची प्रेरक शक्ती तेच आहेत, हे साऱ्यांना माहीत होते. मूकनायकचे पहिले चौदा अग्रलेख बाबासाहेबांचे होते. बाबासाहेबांनी स्वतःला इंग्रजीत विचार करण्याची इतकी सवय लावून घेतली होती की, आपल्या लेखनाचा मसुदा ते प्रथम इंग्रजीत तयार करीत आणि नंतर त्याचे स्वतःच मराठीत रुपांतर करीत, तेही अत्यंत दर्जेदार स्वरुपात. आपल्या पत्राला साजेशी बिरुदावली तुकारामांच्या अभंगांतून त्यांनी शोधली होती-
काय करू आता धरुनिया भीड।
निःशंक हे तोंड वाजविले।।
नव्हे जगी कोणी मुकियांचा जाण।
सार्थक लाजून हित नव्हे।।

बाबासाहेबांचा वृत्तपत्र काढण्याचा हेतूच स्पष्टपणे उद्घोषित करणाऱ्या या ओळी आहेत. तरीही वृत्तपत्र माध्यमाचे आपल्या चळवळीतील महत्त्व सांगताना पहिल्याच अंकातील मनोगत या अग्रलेखात बाबासाहेब स्पष्ट करतात की, "बहिष्कृत लोकांवर होत असलेल्या व पुढे होणाऱ्या अन्यायांवर उपाययोजना सुचविण्यास तसेच त्यांची भावी उन्नती व तिचे मार्ग यांच्या खऱ्या स्वरुपाची चर्चा होण्यास वर्तमानपत्रासारखी अन्य भूमी नाही; परंतु मुंबई इलाख्यात निघत असलेल्या पत्रांकडे पाहिले असता असे दिसून येईल की, त्यांतील बरीचशी पत्रे विशिष्ट अशा जातींचे हितसंबंध पाहणारी आहेत. इतर जातींच्या हिताची पर्वा त्यांना नसते. इतकेच नव्हे, तर केव्हा केव्हा त्यांना अहितकारक असेही प्रलाप त्यातून निघतात. अशा वृत्तपत्रकारांना आमचा एवढाच इशारा आहे की, कोणतीही एखादी जात अवनत झाली, तर तिच्या अवनतीचा चट्टा इतर जातींस बसल्याशिवाय राहणार नाही... एका जातीचे नुकसान केल्याने प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष नुकसान करणाऱ्या जातींचेही नुकसान होणार, यात शंका नाही. म्हणून स्वहितसाधू पत्रांनी इतरांचे नुकसान करून आपले हित करायचे पढतमूर्खाचे लक्षण शिकू नये. हा बुद्धिवाद ज्यांना कबूल अशी वर्तमानपत्रे निघाली आहेत, हे सुदैवच म्हणायचे. या पत्रांतून बहिष्कृत समाजाच्या प्रश्नांची चर्चा वारंवार होते; परंतु ब्राह्मणेतर या अवडंबर संज्ञेखाली मोडत असलेल्या अनेक जातींच्या प्रश्नांचा ज्यात खल होतो, त्यात बहिष्कृतांच्या प्रश्नांचा सांगोपांग ऊहापोह होण्यास पुरेशी जागा मिळणे शक्य नाही, हेही पण उघडच आहे. त्यांच्या अतीबिकट स्थितीशी संलग्न असलेल्या प्रश्नांची वाटाघाट करण्यास एक स्वतंत्र पत्र पाहिजे, हे कोणीही कबूल करील. ही उणीव भरून काढण्यासाठी या पत्राचा जन्म आहे." असे बाबासाहेबांनी स्पष्ट केले होते.

'मूकनायक' सुरू केल्यानंतरही बाबासाहेबांची इंग्लंडला विद्याभ्यास पूर्ण करायला जाण्याची धडपड सुरू होतीच. त्याची व्यवस्था होताच १९२०च्या जुलैमध्ये ते लंडनला रवाना झाले. व्यवस्थापक मंडळाच्या सल्ल्याने पत्र चालवावे, असे ठरले. मात्र, भटकरांकडून अंकाचे काम वेळेत होईनासे झाले म्हणून व्यवस्थापक मंडळाने संपादकीय सूत्रे ज्ञानदेव ध्रुवनाथ घोलप यांच्याकडे दिली. मात्र, घोलपांनाही ही जबाबदारी व्यवस्थित पेलता न आल्यामुळे अखेर ८ एप्रिल १९२३ रोजी 'मूकनायक' बंद पडले. तथापि, अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी अस्पृश्यांनी चालविलेल्या वृत्तपत्रांत 'मूकनायक'ला विशेष स्थान आहे. डॉ. आंबेडकरांच्या राजकीय नेतृत्वाच्या अगदी प्रारंभ काळातील एक उपक्रम म्हणूनही या पत्राला विशेष महत्त्व आहे. अस्पृश्यांच्या चळवळीला बाबासाहेबांसारख्या गाढ्या विद्वानाचे नेतृत्व लाभल्याने चळवळीला जे नवे वळण मिळाले आणि त्यातून जो इतिहास घडला, त्यातले हे पहिले महत्त्वाचे पाऊल होते. हिंदुस्थानच्या राजकारणात बहुजनांच्या पाठोपाठ अस्पृश्य वर्गाचीही उपेक्षा करून चालणार नाही, त्या वर्गात नवी जागृती येत आहे, तिची दखल सर्वांनी घेणे आवश्यक होते. 'मूकनायक' पत्र मूक जनांचे प्रतिनिधित्व करीत असले तरी त्याच्या त्या वेळी अबोल वाटणाऱ्या बाह्य स्वरुपामागे केवढी तरी सुप्त शक्ती वास करीत आहे, याची जाणीव व इशारा देणारे असे हे पत्र होते. अस्पृश्यांत अस्मिता जागविण्याचे 'मूकनायक'ने अल्पावधीत केलेले कार्य लोकजीवन घडविणारे होते. प्रबोधनाचा तो प्रभावी आविष्कार होता. त्याचप्रमाणे बाबासाहेबांच्या लोककल्याणकारी, सर्वव्यापी आणि सर्वसमावेशक पत्रकारितेचा तो आरंभबिंदू आहे. त्यानंतरच्या कालखंडात बाबासाहेबांनी बहिष्कृत भारत, समता, जनता आणि प्रबुद्ध भारत अशा वृत्तपत्रांचा प्रपंच थाटला. त्यांच्या या साऱ्या वृत्तपत्रीय कारकीर्दीमध्ये मूकनायकाचे स्थान हे अत्यंत मूलभूत आणि महत्त्वाचे आहे. म्हणूनच त्याचे मोल आज शंभर वर्षांनंतरही कायम आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा