गुरुवार, २१ मार्च, २०१९

जागर माणगाव परिषदेच्या आठवणींचा; शाहू-आंबेडकरांच्या स्नेहबंधाचा!





माणगाव येथे दक्षिण महाराष्ट्रातील बहिष्कृतांची परिषद या नावाने डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि राजर्षी शाहू महाराजांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या परिषदेच्या शताब्दी वर्षाला आजपासून प्रारंभ होतो आहे. २१ व २२ मार्च १९२० रोजी ही परिषद पार पडली. विलायतेहून उच्चशिक्षण आलेल्या डॉ. आंबेडकर या महार समाजातील तरुणाप्रती राजर्षींच्या मनात जागलेला जिव्हाळा आणि त्यापोटी त्यांनी त्यांच्यावर पुत्रवत केलेले प्रेम, ही गोष्टच मुळी भारावून टाकणारी! माणगाव परिषद आणि पुढे लगेच मे मध्ये झालेली नागपूर परिषद या दोन परिषदांना या दोन दिग्गजांची उपस्थिती लाभली. जूनमध्ये शाहूरायांच्याच मदतीने बाबासाहेब उर्वरित अभ्यासक्रम पूर्ण करायला लंडनला रवाना झाले. दरम्यानच्या काळात राजर्षींच्याच मदतीने बाबासाहेबांनी मूकनायक सुरू केले. या दोघांच्या प्रत्यक्ष भेटी कमी झाल्या असल्या तरी, लंडनला गेल्यानंतर दोघांचा पत्रव्यवहारही सुरू राहिला. त्यातील दोघांची एकमेकांप्रतीची अनौपचारिक भाषा वाचताना त्यांच्यातील स्नेहबंध किती परमोच्च अन् अतूट होते, याची प्रचिती आल्याखेरीज राहात नाही. एकमेकांवर हक्क गाजवायला जसे ते कमी करीत नाहीत, तसे समाजाच्या उन्नतीसाठी आपण परिषदेला उपस्थित नाही राहिलात आमचा रुसवा ओढवून घ्याल, अशी प्रेमळ धमकीही बाबासाहेब त्यांना देतात आणि केवळ त्या प्रेमापोटी राजर्षी नागपूर परिषदेला उपस्थित राहतात, हे वाचताना सुद्धा या दोघांविषयी प्रेमाने मन भरून येते. बाबासाहेबांचे एक पत्रच राजर्षींच्या जन्मतारखेचा अस्सल पुरावा आहे. त्यात त्यांनी २६ जून या आपल्या वाढदिवसानिमित्त मूकनायकचा विशेषांक काढावयाचे प्रयोजन असून त्यासाठी छायाचित्रे व माहिती देऊन सहकार्य करावे, अशी विनंती महाराजांना केली आहे. 
बाबासाहेब आणि शाहू महाराज यांचा एकमेकांशी परिचय झाल्यानंतर अवघ्या तीनेक वर्षांत महाराजांचे निधन झाले. तथापि, लंडनला उर्वरित विद्याभ्यास पूर्ण करण्यास जाईपर्यंत अवघे काही महिने प्रत्यक्ष आणि त्यानंतर त्यांच्या निधनापर्यंत पत्रव्यवहाराद्वारे अप्रत्यक्ष संवाद कायम राहिला. त्या दोघांमध्ये एकमेकांप्रती निर्माण झालेला मैत्रभावाचा ओलावा त्यांच्या पत्रव्यवहारातून पाहायला मिळतो. माणगाव येथे २१-२२ मार्च १९२० रोजी बाबासाहेबांच्या अध्यक्षतेखाली झालेली दक्षिण महाराष्ट्रातील बहिष्कृतांची पहिली परिषद आणि त्यानंतर ३०-३१ मे १९२० रोजी राजर्षी शाहू महाराजांच्या अध्यक्षतेखाली झालेली अखिल भारतीय अस्पृश्य परिषद या दोन परिषदा या दोघांचे विचार व स्नेहसंबंध समजून घेण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या आहेत. बाबासाहेबांना मूकनायक सुरू करण्यासाठी त्या काळात सुमारे २५०० रुपयांची देणगी देणे असो की, लंडनला रवाना होत असताना त्यांना दिलेला १५०० रुपयांचा निधी असो, या घटना म्हणजे शाहू महाराजांचे त्यांच्यावरील प्रेम दर्शविणाऱ्या आणि त्यांच्याकडून असणाऱ्या अपेक्षाच व्यक्त करणाऱ्या आहेत. भारताच्या सामाजिक चळवळीला या दोन व्यक्तीमत्त्वांनी प्रदान केलेले अधिष्ठान आणि प्रेरणा अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे त्यांचा संशोधकीय अभ्यास होणे नितांत गरजेचे आहे.
लंडनहून महाराजांना पाठविलेल्या एका पत्रात आपण या देशातल्या सामाजिक लोकशाहीचे आधारस्तंभ आहात, (Pillar of Social Democracy) असे गौरवोद्गार काढतात. आणि लंडन टाइम्समध्ये महाराजांच्या अकाली निधनाचे वृत्त समजताच शोकमग्न अवस्थेत राजाराम महाराजांना सांत्वनपर पत्रात ही माझी प्रचंड मोठी वैयक्तिक हानी तर आहेच, पण या देशातल्या वंचित समाजाने आपला महान मुक्तीदाता गमावला आहे, अशा शब्दांत आपल्या भावनांना वाट मोकळी करून देतात. अवघ्या दोन अडीच वर्षांच्या या स्नेहबंधाची सुरवात झाली ती माणगाव परिषदेपासून. आणि याच परिषदेने बहिष्कृतांना त्यांच्या अन्यायाविरोधात दाद मागण्याचा, आपल्या न्याय्य हक्कांची मागणी करण्याचा सनदशीर मार्ग खुला केला. म्हणून ही परिषद ऐतिहासिक महत्त्वाची...
राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या या स्नेहबंधांना काल उजाळा देता आला, तो शिवाजी विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्राच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या माणगाव परिषद शताब्दी वर्षारंभ उद्घाटन समारंभात आणि संचालक डॉ. श्रीकृष्ण महाजन यांच्या प्रेमळ आग्रहामुळे... प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, प्राचार्य डॉ. डी.जी. कणसे, डॉ. रत्नाकर पंडित आदींच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. डॉ. शिर्के यांनी तर विद्यापीठातर्फे पुढील वर्षभर या अनुषंगाने कोल्हापूरसह अगदी माणगावमध्येही विविध कार्यक्रम आयोजित करण्याची घोषणा केली. तर डॉ. महाजन यांनी या परिषदेच्या संदर्भातील कोणतीही कागदपत्रे, छायाचित्रे कोणाकडे असतील, तर केंद्राकडे सुपूर्द करण्याचे आवाहनही केले आहे. या फेसबुकच्या व्यासपीठावरुन माझेही आपणा सर्वांना आवाहन आहे की, खरोखरीच कोणाकडे अशी काही दुर्मिळ कागदपत्रे असतील, तर विद्यापीठास द्यावीत, जेणे करून त्या अनुषंगाने संशोधन करणे, काही नव्या गोष्टी उजेडात आणणे निश्चितपणाने शक्य होईल. माणगाव परिषद शताब्दी वर्षारंभाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा